डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनाचा हा युवा दिवाळी म्हणजे तरुणांच्या कर्तबगारीचा उद्याचा संग्रहित, संकलित प्रेरणादायक दस्तऐवज होईल, यात शंका नाही. कवी यशवंतांच्या भाषेत, ‘ही भेट, हा उमाळा। पाथेय यात्रिकाला’ असेच म्हणावे लागेल.

तैतरिय उपनिषदातील तरुणाईची सहा वैशिष्ट्ये सापडली...

साप्ताहिक साधना, युवा दिवाळी 2021 अंक दिलासादायक व उत्साहवर्धक नक्कीच आहे. समाजातील कर्तबगारी, साहस, चांगुलपणा टिपून तो सर्वांच्या नजरेला आणून देण्याचं कार्य साप्ताहिक साधना एक व्रत म्हणून करत आहे. युवा दिवाळी 2021 अंकातील सहा तरुणांच्या सहा मुलाखती म्हणजे सामाजिकता, कर्तबगारी, साहस आणि यश यांचे सहा प्रातिनिधिक आलेखच आहेत.

हा अंक वाचत असताना मला आपल्या तत्त्वज्ञानीय परंपरेतील तैत्तिरीय उपनिषदाचे स्मरण झाले. या उपनिषदात मानवी जीवनातील आनंदावर जोर दिला आहे. हा आनंद तरुणांच्या जीवनात जास्त प्रकर्षाने आणि प्राधान्याने आढळतो, असे या उपनिषदाचे ठाम मत आहे. तारुण्य म्हणजेच खरे जीवन, खरा आनंद- असे समीकरण मांडताना हे उपनिषद तरुणाईची सहा वैशिष्ट्ये सांगते ती अशी- 1) यौवन, 2) शिक्षण : म्हणजे प्रतिभा फुलवणे, विकसित आणि विस्तारित करणे, 3) उमेद व आशा. यात धैर्य, साहस व परिपक्वता यांचा समावेश होतो, 4) सर्जनता : म्हणजे नवनिर्माणाचा ध्यास, नव्या वाटेने जाणे, प्रयोगशीलता, 5) मनाची दृढता, दृढ प्रतिज्ञता, 6) शरीरस्वास्थ्य- शरीराचे आरोग्य, शरीराचे सामर्थ्य. जीवनात यश मिळवण्यासाठी पैसा लागतो, म्हणून संपत्ती हे तरुणाईचे सातवे वैशिष्ट्य आहे, असे हे उपनिषद मानते. ही सारी वैशिष्ट्ये कमी-अधिक प्रमाणात युवा दिवाळी अंकातील सहाही तरुणांत आढळतात, आणि म्हणूनच त्यांची व्यक्तिमत्त्वे उठून दिसतात, आदर्शभूत ठरतात आणि आशादायक वाटतात.

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या नेहमीच चौकटीबाहेर जात आणि पाहत राहतात. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे हा त्यांचा पिंड आहे. वाचनाला त्या सर्वांत जास्त महत्त्व देतात, कारण ते माणसाला ‘सर्व बाजूंनी समृद्ध करत असते’, त्याचे ‘भावविश्व रुंदावत असते’, अशी त्यांची धारणा आहे. फ्रॅन्सिस बेकन यांनी केव्हाच म्हणून ठेवले आहे की, Reading meketh a full man. माणसांशी संवाद साधणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. अशा संवादामुळे समाजजीवनात वायुविजन चालू राहते. विचारांची, भावनांची देवाण-घेवाण चालू राहते. ‘व्यासपीठावरील भाषणापेक्षाही एखादी कृती समाजाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देऊन जात असते’, असे त्यांचे मत असल्याने, एका कार्यक्रमात पोलिस स्टेशनच्या इमारतीचे उद्‌घाटन करण्यासाठी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून असतानाही त्यांनी त्या इमारतीचे उद्‌घाटन ठाणे अंमलदाराच्या हस्ते केले, कारण त्याने त्या इमारतीच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. मनाची खरी विशालताच, असे 'division of honour' म्हणजेच ‘मानसन्मान विभाजन’ करू शकते. (महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना प्रस्तुत लेखकाने एका भित्तिपत्रकाच्या उद्‌घाटनावेळी फीत कापण्याचा मान महाविद्यालयाच्या शिपायाला दिला होता.) असा आडवाटेचा प्रवासच समाजात नवी जीवनमूल्ये, नव्या ऊर्जा निर्माण करण्यात साहाय्यभूत ठरत असतो.

राही सरनोेबत यांचे नेमबाजी क्षेत्रातील कार्य हे कोल्हापूरच्या एकूण शौर्य आणि कर्तबगारी परंपरेला शोभणारे असेच आहे. पिस्तूल नेमबाजीची निवड ही राही यांची नव्या वाटेने जाण्याची वृत्ती अधोरेखित करते. ऑलिम्पिक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात त्यांनी भारताला तीन सुवर्णपदके मिळवून दिली. सर्वांनाच ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. कोणत्याही प्रकारचा प्लॅन बी, प्लॅन सी न ठेवता त्या ध्यास घेऊन ध्येयाच्या पाठीमागे लागतात. त्या आपल्या वरिष्ठांना मान देतात, शिक्षकांचा आदर करतात आणि इतरांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. प्राप्त केलेल्या गोष्टींपेक्षा अप्राप्त केलेल्या गोष्टीच त्यांना जास्त आकर्षित करतात. आंग्ल कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या 'The betty done, the undone vast'  या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणेच त्यांची मनोवृत्ती काम करत आहे. स्वत:चे युग निर्माण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा वाखाणण्यासारखीच आहे.

अलका धुपकर या नव्या वाटेने, न मळलेल्या वाटेने जाणाऱ्या पत्रकार आहेत. प्रांजळपणा, वैचारिक वस्तुनिष्ठता, दीनदुबळ्यांसाठी लढणे, गरज असेल तर परंपरांना छेद देणे, त्या पसंत करतात. शिक्षकांबद्दल आदर, मित्रांबद्दल स्नेहभाव, कृतज्ञता ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये दिसतात. ‘आवाज नसलेल्या लोकांच्या’ व ‘विकास प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या लोकांच्या’ बातम्या करून त्यांनी उच्च प्रकारचे सामाजिक भान जपले आहे. कुणालाही भावेल आणि आवडेल असा त्यांचा विचार आहे. ‘माझं भारत देशावर प्रेम आहे, मी गांधी मानते, सेक्युलॅरिझम मानते.’ हे त्यांचे साधे, सरळ विधान त्या जातीच्या निर्भीड पत्रकार आहेत हे सहज सिद्ध करून जाते.

सिनेमा बघत बघत सिनेमाचा दिग्दर्शक बनलेले चैतन्य ताम्हाणे हे असेच एक स्वतंत्र विचारांमुळे लोभस वाटणारे व्यक्तिमत्त्व. नवे काही शिकण्याचा सततचा प्रयत्न, अभ्यासू वृत्ती, दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची दुर्मिळ वृत्ती, इतरांनी केलेल्या बारीक-सारीक मदतीबद्दल कृतज्ञता, कसून संशोधन करणे व कलेतून सत्याचा शोध घेणे या त्यांच्या जमेच्या आणि म्हणून यशाला कारणीभूत ठरलेल्या गोष्टी होत. केवळ यशस्वी लोकांबरोबर काम करण्यापेक्षा सकारात्मक वृत्तीने काम करणाऱ्या लोकांबरोबर काम करणे त्यांना आवडते. ‘‘असे जे जे लोक मला माझ्या आयुष्यात भेटले, त्या सगळ्यांचा मी एक ‘प्रॉडक्ट’ आहे,’’ असे ते विशाल मनाने कबूल करतात आणि एक नवा भावनिक पायंडाच पाडतात.

खरे म्हणजे शेती हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. जीवनमरणाचा विषय आणि तितकाच दुर्लक्षित विषय. या अंकात दोन उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन साधनाने शेती हा विषय मध्यवर्ती आणला आहे. जयवंत पाटील हे बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स केल्यावर नोकरीत न रमता ते वेगळ्या वाटेने जाण्याचे ठरवतात. डॉ. अभय बंग यांच्या ‘निर्माण’मध्ये आपल्या मनाची मशागत केल्यानंतर ते मातीच्या मशागतीसाठी सेंद्रिय शेतीकडे वळतात, ‘द ऑर्गनिक कार्बन प्रायव्हेट लिमिटेड’ ही संस्था स्थापन करतात, तिच्या प्रगतीसाठी जिवाचं रान करतात आणि रानात जीव भरतात. ते म्हणतात, ‘‘दिवाळीचा एक दिवस वगळता आम्ही 364 दिवस काम करतो.’’

काबाडकष्ट करत, कधी मोलमजुरी करत आपले शिक्षण पूर्ण करणारे, बी.ए.ला इंग्रजी घेण्यासाठी हट्टाला पेटलेले संजय वायाळ हे आणखी एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व. ते ‘टिश्यू कल्चर’कडे वळले. ‘इश्वेद बायोटेक’ ही कंपनी सुरू करून त्यांनी आपल्या कामाचा व्याप अमेरिका, युरोपपर्यंत वाढवला. नव्या पद्धतीने विचार, नव्या पद्धतीने कृती हे त्यांचे जीवनतत्त्वज्ञान. आपल्या कंपनीत त्यांनी स्त्री-पुरुष असा भेदभाव केला नाही, करत नाहीत. जातीयवादाला त्यांच्या कंपनीत स्थान नाही. आपल्या देशात आडनावच जास्त आड येते, म्हणून त्यांनी आपल्या कंपनीच्या एम्प्लॉयमेंट अर्जावरील आडनावाचा कॉलमच काढून टाकला आणि कंपनीत जातीविरहित वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचे सामाजिक भान लक्षणीयच म्हणावे लागेल. शेती उद्योगात खूप संधी आहेत, असे हा तरुण इतर तरुणांना सांगतो, तेव्हा भारतीय शेतकऱ्यांचे नशीब आज ना उद्या बदलेल, उजळेल याची ग्वाही मिळते.

साधनाचा हा युवा दिवाळी म्हणजे तरुणांच्या कर्तबगारीचा उद्याचा संग्रहित, संकलित प्रेरणादायक दस्तऐवज होईल, यात शंका नाही. कवी यशवंतांच्या भाषेत, ‘ही भेट, हा उमाळा। पाथेय यात्रिकाला’ असेच म्हणावे लागेल.

- प्रा. डॉ. सहदेव चौगुले-शिंदे, कोल्हापूर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके