डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बुलडोझरस्वार हा वाईट शब्द इमरान खानही वापरत नाहीत. बाबरी पाडल्याचे दुःख लेखिकेला आहे. पण तीन हजार शिखांच्या शिरकाणाचे काय? नोटबंदीमुळे नोकऱ्या गेल्या, कुणाच्या? काळ्या पैसेेवाल्याच्या? भ्रष्टाचार बुलडोझरने जात नाही, हा लेखिकेचा नवा विचार फारच छान. खरेच राजीव गांधी या बाबतीत काय म्हणाले ते आठवावे. भ्रष्टाचार, कामचोरपणा, दिरंगाई, आतंकवाद, फाइव्ह स्टार संस्कृती, परिवारवाद, मामा-चाचा-भतीजावाद, हे कुणी फोफावत ठेवलं? लेखातील सर्व मुद्दे कम्युनिस्ट मुद्दे आहेत- जेे चीनप्रेमी आहेत. शिवाय मोदींना दोनदा निवडून दिलेल्या जनतेचाच अपमान लेखामुळे होत आहे. धार्मिक हिंसाचार गांधींपासूनचा आहे. हिंदू म्हणवून घ्यायला लाज का वाटावी? सुलक्षणाजी थोडं थांबा, आगे आगे देखिए होता है क्या? नुकताच राजीव गांधी पुरस्कार ‘मेेेजर ध्यानचंद’ झाला. आर्किटेक्ट नाही आता बुलडोझरस्वारचं देश-धर्म-संस्कृती वाचवणार तुमच्यासह व सर्व अल्पसंख्याकांसह.

अभ्यासातील सर्वांत महत्त्वाची पायरी दुर्लक्षित राहते...

दि. 17 जुलैच्या अंकातील ‘अभियान राबवा : गणिताची आवड व गाइडची नावड’ हा अग्रलेख आवडला. कुणीही सुज्ञ शिक्षणप्रेमी आपल्या विचारांशी सहमत होईलच. मी स्वत: 32 वर्षे माध्यमिक विद्यालयात गणित व विज्ञान शिक्षक म्हणून सेवा बजावून 12 वर्षांपूर्वी निवृत्त झालो. उत्तम गणित व विज्ञानशिक्षक म्हणून माझी ओळख होती. मी नवोपक्रम (गणित) विविध स्पर्धा व उपक्रम राबविले व यशही मिळाले. आजही सिंदुदुर्ग साहित्य संघ व छात्र प्रबोधन या संस्थांमधून कार्यरत आहे. गणित विषयाचा मॉडरेटर म्हणूनही मी कोल्हापूर व मुंबई बोर्डात अनेक वर्षे काम केले आहे. तथापि, माझ्या तीन-चार सहकाऱ्यांचा अपवाद सोडता माझे व बहुतेक शाळांतील शिक्षक-शिक्षिका या आपण लेखात म्हटल्याप्रमाणे नवनीत शिकविणाऱ्याच होत्या. शाळेतील ग्रंथालयाचा त्यांनी कधीही उपयोग केला नाही. मराठीतील ए, ऐ ही अक्षरे ऐ, एै अशी लिहिणारे आणि ञ हे अक्षर त्र असे वाचणारे व ‘नञ तत्‌पुरुष समासा’ऐवजी ‘नञ तत्‌पुरुष समाज’ असे शिकवणारे शिक्षकही मी पाहिले आहेत.

शाळेचा वार्षिक निकाल तयार करताना अ, ब आणि क अशा तीन गुणपत्रकातील गुणांची सरासरी काढली जाते. ‘अ’ म्हणजे प्रथम सत्रान्त परीक्षा अर्थात सहामाही व ‘ब’ म्हणजे द्वितीय सत्रान्त परीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षा. यात मिळालेले गुण हे गणित, विज्ञान यासाठी प्रत्येकी 150 गुणांपैकी व इतर विषयांसाठी प्रत्येकी 100 गुणांपैकी मिळालेले गुण असत. ‘क’ म्हणजे वार्षिक परीक्षा यात मिळालेले गुण हे गणिताची आवड मुलांमध्ये काय निर्माण करणार?

काही वर्षांपूर्वी एस.एस.सी.ला सर्व विषयांसाठी विद्यार्थ्यांना 20 व 30 गुण देण्याची सोय मंडळाने केली व पेपर 80 किंवा 120 गुणांचा. मग तर काय मुलांना 20 पैकी 18 व 30 पैकी किमान 27, 28 गुण शिक्षक उदार मनाने देऊ लागले. शिवाय मंडळाचे रिझल्टबाबतचे निकष याला हातभार लावणारेच होते. उदा. काहीही न येणाऱ्या मुलाला इंग्रजीत 20 पैकी 20 गुण, 80 गुणांच्या पेपरमध्ये 5 गुण अधिक 10 ग्रेस गुण मिळून 100 पैकी 35 गुण घेऊन विद्यार्थी पास झाला. मी त्या वेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये यावर लेख लिहिला होता.

त्यानंतर मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लागावी या चांगल्या हेतूने ‘प्रकल्प’ हा प्रकार आला. चांगल्या गोष्टीची वाट लावण्यात आपला समाज हुशारच आहे. त्यात शिक्षक कसा मागे राहणार? हे प्रकल्प बहुधा नजरेखालूनही घातले जात नाहीत. ते फक्त गोळा केले जातात. दोन वर्षांत शिक्षणाविषयी प्रचंड आस्था(!) असणाऱ्या प्रकाशन संस्थांनी मग अनेक प्रकल्प नजरेसमोर ठेवून प्रत्येक प्रकल्पासाठी दोन पुस्तिका बाजारात आणल्या. उदा. ‘महाराष्ट्रातील किल्ले’ असा प्रकल्प घेऊन एका पुस्तिकेत किल्ल्याचे नाव व मोकळी जागा आणि दुसऱ्या पुस्तिकेत किल्ल्याचे चित्र व थोडक्यात माहिती. मुलांनी दुसऱ्या पुस्तिकेतील चित्र कापून ते पहिल्या पुस्तिकेत चिकटवायचे व बाजूला त्याची माहिती लिहायची. शोधा, वाचा, शिका ही गोष्टच नाही. शिवाय हे प्रकल्प बहुधा पालकच तयार करतात.

आपली प्रश्नपत्रिका पाहिली तर त्यात आकलनावरील प्रश्न फार तर 5 ते 7 गुणांचेच असतात. खरे तर ज्ञानग्रहणातील अभ्यासातील शेवटची म्हणून सर्वांत महत्त्वाची पायरी आकलन आणि तीच दुर्लक्षित राहते. बुद्धिमान विद्यार्थ्यांना या परीक्षांतून वावच किंवा आव्हान नसते. मध्यंतरी गणित व भूमितीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. 5 व 6 हे अनुक्रमे ‘क’ व ‘ड’ गटातील प्रश्न असत. ‘क’ म्हणजे कठीण व ‘ड’ म्हणजे अतिकठीण. यामध्ये बुद्धिमान विद्यार्थ्यांना आव्हान, चॅलेंज असे. पण मंडळाने हे स्वरूप बदलले व प्रज्ञावान विद्यार्थ्यांवर अन्याय केला.

मार्क्सवाद व परीक्षार्थी घडविण्याचे कारखाने - बिचारा कार्ल मार्क्स हे आजही बहुतेकांना माहीत नसते. पण तरीही परीक्षांबद्धल आपण पुरे ‘मार्क्स’वादी बनलो. अगदी शिक्षणाधिकाऱ्यांपासून कुणीच याला अपवाद नाही. शिक्षण शिकविण्यापेक्षा पास होण्याच्या युक्त्या, क्लृप्त्या शिकवू लागले. अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर सुरू झाले. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणाऱ्या अनेक मुलामुलींना साध्या गोष्टी येत नाहीत हे मी स्वत: अनेकदा अनुभवले आहे. भूमिती हा पूर्णपणे समजून घेण्याचा आकलनाचा विषय, पण आता तर प्रमेयेसुद्धा पाठांतराच्या स्वरूपातही विचारली जातात. शिक्षक खूश, अधिकारी खूश, पालक तर केवळ खूशच नव्हे तर कृतार्थ. आणि बिचारी मुले शिकताहेत. शाळा म्हणजे कारखाने न बनता विद्यालये बनतील, तेथे परीक्षार्थी नव्हे तर विद्यार्थी घडवले जातील तो सुदिन!

लीलाधर घाडी, सावंतवाडी, जि.सिंधुदूर्ग

---

नवीन पटनाईक यांची दखल घेतली नाही...

साहित्य, कला व संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषिविज्ञान, शिक्षण संस्था अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत आपल्या भारतात दूरदृष्टीने अनेक दीर्घ योजना उभारणीचे कार्य आजवर अनेक वर्षे चालू होते. त्या योजना गेल्या काही वर्षांत कशा नष्ट केल्या गेल्या, याचे सविस्तर चित्र ‘आर्किटेक्ट आणि बुलडोझरस्वार’ - सुलक्षणा महाजन (साधना 7 ऑगस्ट) लेखामध्ये रेखाटले आहे. थोडक्यात, क्षेत्र कोणतेही असो, तेथे राजकारण केलेच पाहिजे अशी स्थिती सार्वजनिक जीवनात अनुभवायला मिळते.  दुर्दैवाने आरोग्य सेवा आणि क्रीडा क्षेत्रसुद्धा यातून सुटलेले दिसत नाही.

कोरोना प्रतिबंधक लशीच्या बाबतीतील सुरुवातीच्या दिरंगाईपासून सध्याच्या टंचाईबद्दलची स्थिती इतकी निराशाजनक आहे की, जवळपास प्रत्येक व्यक्तीला कोणत्यातरी अडचणीतून जावे लागणे क्रमप्राप्त होऊन बसले आहे. परवा पार पडलेल्या टोक्योे ऑलिंपिक 2020 स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी मिळवलेले यश नेत्रदीपक आहे यात दुमत नाही. आपल्या दोन्ही हॉकी संघांनी दाखवलेले नैपुण्यसुद्धा लक्षणीय आहे. किंबहुना पुरुष हॉकी संघाचा विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल. भारताच्या सध्याच्या लोकसंख्येपैकी सत्तर टक्के जणांच्या जन्मापूर्वी भारतीय हॉकी संघाने अखेरचे ऑलिंपिक पदक मिळवले होते, हे लक्षात घेतल्यास हे यश सध्याच्या युवा खेळाडूंना स्फूर्तिदायक आहे, हे मान्य करावे लागते. मोदी यांनी विजयी हॉकी संघाच्या खेळाडूंशी हिंदीतून थेट संपर्क साधून कौतुक करताना लाइव्ह येऊन त्या यशावर तसेच पदक मिळवलेल्या अन्य खेळडूंच्या यशावरही आपली मोहोर ठळकपणे उठवली. त्याचा आनंद परदेशी प्रशिक्षकानेही घेतल्याचे पाहण्यात आले.

हे सर्व अनुभवतांना भारतीय हॉकी संघांच्या विजयाची पार्श्वभूमी समजून घेण्याची आवश्यकता राजकारण्यांनी ठेवली नाही. चाळीस वर्षे पदकाच्या दीर्घ प्रतीक्षा करणाऱ्या भारताला हॉकीतील गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी ओडिशा राज्याने 2018 पासून या खेळाचे प्रायोजकत्व स्वीकारून नवोदित हॉकी खेळाडू तयार करण्याची योजना आखली आहे. तेथील सुंदरगड जिल्हा आता हॉकीची नगरी म्हणून ओळखली जाऊ लागला आहे. त्याचे एक दृश्य स्वरूप म्हणजे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जागतिक हॉकी स्पर्धेचे सुंदरगडमध्ये 2018 मध्ये केले गेलेले दिमाखदार आयोजन आणि सरावासाठी तयार केलेली अनेक ‘ॲस्ट्रो टर्फ’ची मैदाने. तसेच जगातील सर्वांत भव्य हॉकी स्टेडियमसुद्धा त्या राज्यातील राऊरकेला येथे उभे राहत आहे. अशा सकारात्मक प्रयत्नांतून वर्तमानातील आपले हॉकी खेळाडू तयार झालेत, यात कोणत्याही खऱ्या क्रीडाप्रेमीत दुमत नसावे. म्हणून एकीकडे देदीप्यमान यशाचे पंतप्रधानांकडून कौतुक केले जात असताना, त्या यशामागील ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या प्रयत्नांची दखल तितकीशी घेतली न जाणे याची खंत वाटली.

श्रीकांत परळकर, दादर, मुंबई

----

इतका वाईट शब्द इमरान खानही वापरत नाहीत...

7 ऑगस्टच्या साधनातील सुलक्षणा महाजन यांचा ‘आर्किटेक्ट आणि बुलडोझरस्वार’ हा दुर्दैवी लेख वाचून खूप वाईट वाटले व कीव करावीशी वाटली. सर्वप्रथम ‘आर्किटेक्ट’ हा शब्द लेखिकेने आम्हांला शिकविला. काँग्रेसने व त्यांच्या सर्व नेत्यांनी भारतासाठी खूप केले आहे, हे स्वतः मोदीच मानतात. सरदार पटेलांना बहुमताचं अनुमोदन असताना गांधींच्या हट्टापायी नेहरू पंतप्रधान झाले असे म्हणतात. गांधींनी ‘‘आता काँग्रेस विसर्जित करा,’’ असंही म्हटलं होत म्हणे. काश्मीर प्रश्न, चीनकडे गेलेला भारतीय प्रदेश, चीनला युनोत केलेली मदत, गवताचं पातंही उगवत नाही म्हणणारे आर्किटेक्ट- नेहरू, स्वतःच्या मुलीला पदासाठी तयार करणारे, राष्ट्र उभारणी करताना नैतिकतेला मूठमाती देणारे नेहरू, असो.

बुलडोझरस्वार हा वाईट शब्द इमरान खानही वापरत नाहीत. बाबरी पाडल्याचे दुःख लेखिकेला आहे. पण तीन हजार शिखांच्या शिरकाणाचे काय? नोटबंदीमुळे नोकऱ्या गेल्या, कुणाच्या? काळ्या पैसेेवाल्याच्या? भ्रष्टाचार बुलडोझरने जात नाही, हा लेखिकेचा नवा विचार फारच छान. खरेच राजीव गांधी या बाबतीत काय म्हणाले ते आठवावे. भ्रष्टाचार, कामचोरपणा, दिरंगाई, आतंकवाद, फाइव्ह स्टार संस्कृती, परिवारवाद, मामा-चाचा-भतीजावाद, हे कुणी फोफावत ठेवलं? लेखातील सर्व मुद्दे कम्युनिस्ट मुद्दे आहेत- जेे चीनप्रेमी आहेत. शिवाय मोदींना दोनदा निवडून दिलेल्या जनतेचाच अपमान लेखामुळे होत आहे. धार्मिक हिंसाचार गांधींपासूनचा आहे. हिंदू म्हणवून घ्यायला लाज का वाटावी? सुलक्षणाजी थोडं थांबा, आगे आगे देखिए होता है क्या? नुकताच राजीव गांधी पुरस्कार ‘मेेेजर ध्यानचंद’ झाला. आर्किटेक्ट नाही आता बुलडोझरस्वारचं देश-धर्म-संस्कृती वाचवणार तुमच्यासह व सर्व अल्पसंख्याकांसह.

किशोर मधुकर काकडे, बेळगाव.

----

तशी मूलभूत सुधारणा अर्थव्यवस्थेत केली नाही तर...

साधनातील 7 ऑगस्टच्या अंकातील ऋषिकेश गावडे यांचा ‘भांडवल, गतिशीलता आणि स्पर्धापरीक्षा’ हा लेख ‘चिकित्सा’ या सदरात प्रसिद्ध केल्याबद्दल साधना संपादकांचे मनःपूर्वक आभार. तसेच या महत्त्वाच्या वर्तमानकालीन विषयाबद्दल मूलाग्रही सविस्तर आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये मराठीत विवेचन केल्याबद्दल लेखकाचे आभार.

सध्याच्या भारतीय घटनेनुसार आर्थिक संपत्तीवरचा किंवा मालमत्तेवरचा एखाद्या व्यक्तीचा अधिकार तहहयातच नाही, तर तिच्या वंशजांमार्फत जगाच्या अंतापर्यंत शाबूत राहणे हेच कायदेशीर आहे. याचबरोबर आपल्या सध्याच्या अर्थव्यवस्थेमुळे एका ठरावीक मर्यादेपलीकडे मालमत्तेचा संचय झाला की, एखाद्या ब्लॅक होलप्रमाणे त्या संचयाकडे आर्थिक मालमत्तेचा ओघ  सुरूच राहतो. भाडे, व्याज, लाभांश आणि मालमत्तेच्या किमतीतील वाढ यांमुळे हा (रोग) ओघ निर्माण होतो. गावडे यांनी दाखवून दिल्याप्रमाणे समाजातील आर्थिक भांडवलाच्या विषमतेबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक भांडवलाचीदेखील पिढीजात विषमता निर्माण होते. अशा पक्क्या विषमतेचे घातक परिणाम आम जनतेला सोसावे लागतात.

यावर उपाय म्हणून संपत्तीची व मालमत्तेची मालकी कायमची न ठेवता तात्पुरती ठेवणे आवश्यक आहे व दरवर्षी व प्रत्येक पिढीला या मालमत्तेचा योग्य त्या प्रमाणात क्षय होत राहील, अशी घटनात्मक तरतूद करणे आवश्यक आहे. वाढत्या प्रमाणात द्यावा लागणारा संपत्ती कर व मृत्यूनंतर द्यावा लागणारा मालमत्ता कर यांच्या साह्याने अशी तरतूद करता येते. अशी मूलभूत सुधारणा जर आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये केली नाही तर मूळ दुखणे बरे होणार नाही. उलट वाढतच जाईल, इतर सर्व उपाय हे वरवरच्या मलमपट्टीप्रमाणे राहतील. या विषयावरचा श्रीयुत गावडे यांचा आणखी एक अभ्यासपूर्ण लेख जरूर मागवून प्रसिद्ध करावा ही विनंती.

सुभाष आठले, कोल्हापूर.

----

त्यांच्या लेखणीतून बापटांचा सौम्यपणा व कणखरपणा जाणवला

दि. 31 जुलैच्या साधना अंकातील श्यामलाताई वनारसे यांनी वसंत बापट यांच्याविषयी लिहिलेला लेख वाचला आणि अजून मजकूर हवा, असं मन मागणी करायला लागलं. त्यांच्या आठवणीतले बापट वाचताना मलादेखील त्यांच्या वेगवेगळ्या कविता आठवत गेल्या. मी मासवण या आदिवासी गावात काम करत असताना...

                              ‘देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना

                              सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना

                              दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना

                              वेदना जाणावयाला जागवू संवेदना

                              दुर्बळाच्या रक्षणाला पौरुषाची साधना’

ही प्रार्थना आठवत गेली. खूप कमी प्रार्थना मनाच्या आरपार प्रवेश करतात आणि मनाला शांततेची अनुभूती देतात, तशी ही प्रार्थना मला वाटते. मासवणला असताना प्रवास करताना, पायी चालताना रस्त्याचं अंतर कमी व्हावं म्हणून आम्ही कार्यकर्ते अनेक गाणी गात असू. त्यामध्ये...‘तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकंल सोन्याचं रान। चल उचल हत्यार गड्या होऊन तयार। तुला नव्या जगाची आन॥’ हे गाणं तितक्याच उत्साहाने म्हणायचो. ‘शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट’, ‘आभाळाची आम्ही लेकरे’, ‘केवळ माझा सह्यकडा’ असो, की ‘सदैव सैनिका’ असो... ही गाणी गाताना संपूर्ण शरीरातून एक जोश व्यक्त व्हायचा. मला स्वत:ला तर ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ हे साने गुरुजींचं गाणंही खूप आवडायचं, म्हणजे अजूनही आवडतं.  श्यामलाताईंच्या लेखामुळे वसंत बापट आणि ती सगळी गाणी आठवत राहिली. त्यांच्या लेखणीतून बापटांचा सौम्यपणा आणि कणखरपणा जाणवला. अहिंसेचा स्वीकार करून त्यांनी उचललेलं पाऊल त्यांच्या प्रत्येक गीतातून दिसत राहतं. श्यामलाताईंनी म्हटलं तसं ‘फुंकर’ कवितेतल्या नायिकेच्या डोळ्यांतले बाहेर न पडणारे अश्रू आठवले. प्रत्येक गाण्यातली लय, ताल मनात पुन्हा एकदा उमटत राहिला. कुठल्याही गीताला ओढाताण करण्याची गरज भासत नाही, हेही श्यामलाताईंचं म्हणणं तितकंच खरं. त्या लेखामुळे वसंत बापट आज हवे होते असं मन म्हणत राहिलं, पण त्याच वेळी ते समोर येऊन आत्मभान जागृत करत, ‘मी आहे’ असं सांगत  उभे राहिले हेही खरं.

दीपा देशमुख, पुणे

----

वसंत बापट अंक वाचून वाटलेली खंत

यंदा 2021 या वर्षी साधनाच्या ज्या तीन दिग्गज संपादकांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आहे, त्यांपैकी पहिले प्रा.वसंत बापट यांच्यावरील 31 जुलैचा विशेषांक मिळाला आणि आत्मीयतेने व उत्सुकतेने वाचायला घेतला. या अंकाचे तीन विभाग कसे आहेत, त्याविषयी संपादकीयात थोडक्यात सूचित केलेले आहे. त्यानंतर एकेक लेख वाचत गेलो.

अंकात वसंत बापट यांच्या एकूण साहित्यावर जसे असेल तसेच त्यांच्याविषयी चरित्रात्मक लिखाण असेल, अशी माझी अपेक्षा होती. कदाचित ती माझी गरज किंवा इच्छा म्हणा हवे तर. पण तसा एकही लेख आढळला नाही. प्रा. बापट यांना जवळून पाहिलेल्या आणि त्यांच्या संपर्कात येऊन गेलेल्या अशा फार थोड्या व्यक्ती आज आहेत हे आपण संपादकीयात स्पष्ट केले आहे, त्याबाबत मी सहमत आहे. त्यांच्यापैकी कोणाकडून असे लिहून घेता आले असते. आज यास्मिनबाई शेख, लीलाधरजी हेगडे आणि मृदुलाताई जोशी आहेत. त्यांच्याकडून असा लेख नक्कीच मिळाला असता. सुदैवाने ही सारी मंडळी आज जरी हयात असली तरी काही ना काही प्रकृतीच्या अडचणी असल्यामुळे कदाचित असे लेखन मिळवता आले नसेल, असे वाटते. झेलम परांजपे, आनंद करंदीकर या तरुण पिढीतील लेखकांनी जे लिहिले ते उत्स्फूर्त वाटतील असे अनुभव हा एक या अंकात मला दिलासा मिळाला. गोपाळ अवटी यांचा लेख त्रोटक वाटला. रामदासजी भटकळ यांचा प्रा. बापट यांच्याशी प्रकाशक या नात्याने किती जवळचा संबंध आलेला आहे; पण त्यांचा हा लेख नेहमीप्रमाणे जमला आहे असे मला वाटत नाही. सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांचा रसाळ लेख वाचून वाटले की याबरोबर विंदांचा लेख हवा होता. तसेच सदानंद वर्दे का नाहीत? पण तुम्ही पूर्वी प्रसिद्ध झालेले साहित्य न स्वीकारण्याचे ठरवले होते ना! (अपवाद मंगेश पाडगावकरांचा का बरे?)

वसंत बापट यांच्या राष्ट्र सेवादलाच्या कलापथकातील चौफेर नेतृत्वाविषयी कोणी सहकारी व्यक्तीने लिहिलेले आवडले असते. येथेही श्यामलाताई वनारसे, मृदुलाताई  जोशी यांचा अनुभव नक्कीच असणार अशी माझी अटकळ आहे. प्रा. बापट यांच्या तीन पुस्तकांतील लेख देण्यामागे तुमचा हेतू स्पष्ट आहे. त्या योगे ही तिन्ही पुस्तके वाचक विकत घेतील हे योग्य आहे. प्रा बापट यांच्या कवितांवरील तसेच त्यांच्या प्राध्यापकीय कारकिर्दीवरील सर्व लेख उत्तम आहेत. पण शेवटी बापट यांचे व्यक्तिगत चरित्र म्हणून या अंकातून काही हाताला लागत नाही, ही माझी खंत आहे एवढेच. बाकी आजचा हा अंक पाहता पुढील दोन महनीय संपादकांवर आपण नक्कीच वाचनीय अंक काढणार याचे भविष्य करण्याची गरज नाही. 

मंगेश नाबर, परळ, मुंबई

----

उच्चवर्णीयांनी त्यातून काहीच बोध घेतला नाही

दि. 10 जूनच्या अंकातील श्री. सुनील तांबे यांचा ‘लक्षद्वीप प्रशासनाचे तर्कहीन निर्णय’ हा लेख वाचला. याबद्दलच्या बातम्या आधीच वाचण्यात आल्या होत्या. मुळीच आश्चर्य वाटत नाही. कारण ‘आम्हीच वरिष्ठ, बाकीचे कनिष्ठ’ हा गंड मनूने स्थापित केला. त्याला अनुसरून उच्चवर्णीयांनी त्यांची मक्तेदारी असलेल्या लेखनकलेच्या जोरावर इतरांवर असे विचार लादले की, आपला जन्म हा वरिष्ठ जातीच्या लोकांचे ऐकण्यासाठीच झाला आहे. ते जे काही करण्यास सांगतील ते केले नाही तर घोर पाप होईल. आणि आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलो तर आपले भाग्य उजळून आपला पुढचा जन्म सुखाचा होईल अशी या कनिष्ठवर्गीय समाजाची पिढ्यान्‌पिढ्यांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे कितीही कष्ट पडले तरी सांगितले त्याप्रमाणे वागण्याची त्यांना सवय झाली आहे. उच्चवर्णीयांना याची पक्की खात्री असल्याने असे तर्कहीन निर्णय इतरांवर लादले जात आहेत. त्यांना जे विरोध करतात त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी ते भले-बुरे सर्व प्रकारचे मार्ग अवलंबतात. त्यासाठी त्यांना फार कष्टदेखील करावे लागत नाहीत. कारण आपल्या देशातील प्रचंड प्रमाणातील जातीभेद. प्रत्येक जातीला असलेल्या पराकोटीच्या जाती-अभिमानामुळे अशा दमनशाही वृत्तीच्या लोकांचे चांगलेच फावते व ते तर्कहीन निर्णय इतरांवर लादतात.

पेशवेकाळात अशा अनेक अन्याय्य प्रथा खालच्या जातींवर लादून त्यांचा अतिशय छळ केला. त्यामुळे त्यांनी त्या छळातून मुक्त होण्यासाठी परकीयांबरोबर मिळून पेशव्यांशी युद्ध करून पेशवाई बुडवली, देश पारतंत्र्यात सापडला. तरीही या उच्चवर्णीयांनी यातून काहीच बोध घेतला नाही. यासाठी समाजाचे प्रबोधन व परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकीने समाजातील वाईट प्रथा, चालीरीती, कर्मकांड यांचे उच्चाटन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले तरच यात सुधारणा होईल. यासाठी भरपूर वेळ देऊन कष्टदेखील करावे लागतील. आपल्या देशाला व समाजाला वैचारिक दृष्टीने प्रगत करायचे असेल तर सर्व विचारवंत सुधारकांनी एकत्र येऊन एकीने व एका विचाराने काम करणे हीच आजच्या काळात तीव्र गरज आहे. यासाठी ‘अंनिस’ने पुढाकार घ्यावा व हे शिवधनुष्य पेलावे असे मला वाटते.

सुभाष सिमरतमल गुगळे, निगडी, पुणे

----

ती कविता तरुणाईपर्यंत पोहोचवावी

वसंत बापट यांच्यावरील विशेषांक कालच पोहोचला. ‘अप्रतिम’ हा एकच शब्द विशेषांकासाठी योग्य आहे. श्यामला वनारसेंचा लेख उत्कृष्ट. मंगेश पाडगावकरांचे ‘मैत्री चिंतन’ उत्तम. रंग वसंताचे भाग 1 व 2 हे ऑडिओ मिळाले. वसंत बापटांची ‘केवळ माझ्या सह्यकडा’ ही कविता. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच आहे. ती विस्मृतीत जाऊ नये. आचार्य अत्रे यांनी बापटांना घरी बोलावून त्यांच्याकडून ती वाचून घेतली. ‘कबीर माझा, तुलसी माझा। ज्ञानेश्वर परि माझाच। जयदेवा जय बोला परि। माझा नाम्याचा नाच।’ यातला मराठी ठसका संस्मरणीय- न विसरता येणारा. ही कविता तरुणाईपर्यंत पोहोचायला हवी.

सुधीर नांदगावकर, ठाणे

----

ती कथा वाचून भूनाकाकांची आठवण झाली

दि.7 ऑगस्टच्या अंकातील अण्णा भाऊ साठे यांची ‘मला एकच बॉम्ब द्या’ ही कथा वाचली. अनपेक्षितपणे एक जुनी प्रेमातील व्यक्ती भेटली. भूपेंद्रनाथ मुकर्जी ऊर्फ भूनाकाका हे माझ्या वडिलांचे मित्र. अण्णा भाऊ लिहितात, श्री.भूपेंद्रनाथ मुकर्जी भूमिगत होते, पण ते अमरावतीतच होते, त्यामुळे घोटाळा झाला होता. त्यांना बाहेर पडताच येत नव्हतं, कारण साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड देह आणि लोकप्रिय नेता म्हणून त्यांना सर्वच लोक ओळखत होते. मार्क्सवादी असल्याने भूनाकाका 1962 नंतर काही काळ कैदेत होते, चीनधार्जिणे म्हणून. दर महिन्याला माझे आईवडील त्यांना भेटायला जाऊन हवे नको विचारत. एकदा आईला भूनाकाकांच्या मानेवर एक गाठ दिसली. आईच्या शब्दांत त्या धिप्पाड, देखण्या माणसाच्या मानेकडे लक्ष गेलं हेच आश्चर्यच! ती कर्करोगाची गाठ होती. आई डॉक्टर असल्याने तिला ती ‘साधी’ नाही, हे सुचत होतं. तिने पोलिसांना अंदाज सांगितला. राजकीय कैदी, तेही पोलिसांपर्यंत साऱ्यांचे लाडके, त्यामुळे निदान इलाज, शस्त्रक्रिया, सारे झपाट्याने झाले. चला! तेवढीच वसुली! या भूनाकाकांच्या शेऱ्यासोबत!

आज 9 ऑगस्ट 1942 ला स्मरून विदर्भातली महिलांची मांजरसेना, वेगवेगळ्या चळवळींमधले कमलाताई होस्पेटांचे कार्य- वगैरेंची वृत्तपत्रांनी आठवण काढली. एक प्रश्न पडतो. हा सारा इतिहास ‘डावा’ म्हणून नाकारता येणार आहे का? की ऑर्वेलच्या ‘नाईंटीन एटीफोर’मधल्यासारखा आमूलाग्र खोटा इतिहास रचून उजव्या शक्ती भावी पिढ्यांवर लादणार आहेत?

नंदा खरे, नागपूर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके