डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • पारायण
  • पिल्लै आयोगाचा एकतर्फीपणा
  • योग्य इशारा
  • कठोर उपाय हवेत
  • दुसरे पारतंत्र्य!
  • त्याचा सांभाळ आम्ही करू
  • महामानवाबद्दल
  • आवाबेनची एक आठवण

पारायण 

असताना यंत्रणा
रयतेची रयतेसाठी
लुळे-पंगु-अंधांची
सडल्या-पिडल्या-नाडल्यांची
शोषीत-जखडल्या-डांबल्यांची
इमान-इभ्रतीस जागल्यांची
कलिजावर गोळ्या झेलणाऱ्यांची

असताना यंत्रणा
हक्क-कर्तव्य
मानव्य-भवितव्य
जगू दिले जात नाही

पण-
इथलेच बाप जेव्हा
होणार आहेत जागे
तेव्हा घडेल जे घडले नाही मागे
धुंद डोकी आणि हात
छाटले जातील
आणि उपसले जाईल
मूळ-कूळही

रस्त्यावर असणार नाही भिकारीही
किंवा दिसणार नाही
रयतेची कत्तल-साल्टही
रस्त्या रस्त्यावरही
सवंग न्याय मिळेल

समता कायद्याची
पारायणे जगली जातील चिरंतन
स्थिरावलेल्या घराघरातून 
चिघळलेला अंधार सरुन. 
- मिलिंद येरमाळकर, लातूर. 

पिल्लै आयोगाचा एकतर्फीपणा 

1 जुलैच्या अंकातील 'आर्थिक घडामोडी’ वाचून पत्र लिहिण्याची इच्छा झाली. बँक अधिकारी उच्चवेतनभोगी वर्गात मोडत असल्यामुळे त्यांच्या संपाबद्दल समाजवादी व्यक्तींच्या मनात गैरसमज असणे स्वाभाविकच आहे. म्हणून थोडा खुलासा.

अधिकाऱ्यांचा वेतनादींच्या सुसूत्रीकरणाला विरोध नाही. विरोध होता पिल्लै आयोगाच्या शिफारशींच्या एकतर्फी अंमलबजावणीला. अहवाल लागू करण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी मसलत करणे अगदी वाजवी आहे. अखेर शासनाने हे मानलेही. उच्च उच्चवेतनभोगी म्हणून लोकशाही अधिकार नाकारावयाचे काय?

आर्थिक नुकसान होणार नाही हेही खरे नाही. अधिकाऱ्यांची नाराजी बरीचशी यामूळे आहे हे कबूल करावेच लागेल.

आर्थिक मुद्दा वगळला तरी पिल्लै अहवाल बँकिंग क्षेत्राच्या प्रगतीला बाधक ठरेल असे वाटते. संख्यात्मक प्रगती पेलून गुणवत्ता आहे त्या प्रमाणात कायम ठेवण्यास तीन कारणे प्राधान्याने पोषक ठरली आहेत-

आकर्षक वेतन, काम करण्याची संधी व बढतीची शक्यता. 

आज स्टेट बँकेत कनिष्ठ अधिकारी चार वर्षांत बढतीला पात्र ठरतो. पिल्लै अहवाल हा काळ बारा वर्ष करू पाहतो. ऐन उमेदीच्या काळात अभिक्रमाचे चीज होण्याची शक्यता नसताना महत्वाकांक्षी तरुण बँकिंग क्षेत्राकडे कसे आकर्षित होणार? हे केवळ उदाहरणादाखल.

बँक अधिकारी समाजातील अन्य वर्गाप्रमाणेच आत्मकेंद्री, सुविधाकांक्षी व समाजविमुख आहेत. पण म्हणून एका वाइट अहवालाची एकतर्फी अंमलबजावणी समर्थनीय ठरू शकत नाही.
- एक अधिकारी, पंजाब. 

योग्य इशारा 

साधनेचा एक जुलैचा अंक पाहिला. ‘आचार्य कृपलानींचा इशारा’ वाचला नि लगेच ‘नग्न सत्तेचा उपभोग घेण्यासाठी हे एकत्र येऊ शकतात' या बाबा आमटेंच्या ओळींची आठवण झाली. ‘शासक पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात जे राजकीय अविश्वासाचे व मत्सराचे वातावरण मला दिसत होते त्यामुळे निवृत्त व्हायचे मला ठरवावे लागले' आचार्यांचे हे मत व्यथित करणारे आहे. सत्तास्पर्धेमुळे  जनतेचे जनता पक्षाला झालेले विस्मरण, पक्षाच्या, देशाच्या व लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. आपण आचार्यांच्या इशाऱ्याला अंकात को अग्रक्रम दिया तो योग्य वाटला.

याव्यतिरिक्त ‘आचार्य संत विनोबा माउलींचा जयजयकार' हा लेख याच अंकात देऊन आचार्य कोण? हा प्रश्न कित्येक वाचकांच्या मनात निर्माण केला. या लेखातील 'न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' ‘ज्यास अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी। तोचि साधू ओळखावा’ व 'साहे ओझे त्यासी तेचि द्यावे’ ह्या ओळींचा श्रीमतीजी व विनोबांच्या संदर्भात लावलेला अर्थ एकदम योग्य वाटला. परंतु विनोबा हे अशा प्रकारचे एकटेच आचार्य नाही. या प्रवृत्तीची एक खास परंपरा आहे. द्रौपदी वस्त्रहरण होत असताना पितामहांची भूमिका व सामाजिक प्रश्न भेडसावत असताना मठात बसणारे शंकराचार्य व सोयीनुसार सूक्ष्मात जाणारे विनोबा सगळे सारखेच-
याशिवाय अंकातील सी. आर. दळवी यांचा शाह कमिशनचा लेख अतिशय उपयुक्त वाटला. 
- प्रा. बी. वाय. कुलकर्णी, जालना. 

कठोर उपाय हवेत 

साधना साप्ताहिकाच्या एका अंकात बी. एड. चे विद्यार्थी कॉपी करतात हे वाचून सखेद आश्चर्य वाटले. 1 जुलैच्या लोकसत्तामध्ये श्री. यशवंतराव इंगळे यांचा न्यायालयातील भ्रष्टाचार हा लेख वाचूनही तीच भावना झाली. बिहारमध्ये कॉपी करायला दिली नाही म्हणून विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. वरील भ्रष्टाचाराचे प्रकार म्हणजेच श्रीमंतांकडून राष्ट्राचे शोषण थांबवण्यासाठी अत्यंत कठोर उपायांची आवश्यकता आहे. 
- प्रा. के. ग. आचार्य, मुंबई. 

दुसरे पारतंत्र्य! 

आणीबाणीमुळे गमावलेल्या स्वातंत्र्यासाठी लोकशक्तीद्वारे लढा देऊन झालेल्या लोकशाहीच्या स्थापनेला-पुनर्स्थापनेला-आता दुसरे स्वातंत्र्य संबोधण्यात येत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या माझ्यासारख्याला पारतंत्र्य हे प्रथम आणीबाणीतच जवळून बघायला मिळाले. हे माझ्या पिढीने पाहिलेले पहिले पारतंत्र्य आणि आणीबाणीनंतर, जनता पक्षाची केंद्रात सत्ता आल्यानंतर, सध्या जे भोगावे लागत आहे ते दुसरे पारतंत्र्य! हे दुसरे पारतंत्र्य आणीबाणीतील पारतंत्र्यापेक्षा अधिक भयानक व दुर्दैवी आहे. कारण आणीबाणीतील पारतंत्र्याविरुद्ध, व्यक्तिपूजेविरुद्ध, हुकुमशाही शक्तीविरुद्ध ज्या स्वातंत्र्यप्रेमींनी लढा दिला त्यांतीलच एक समुदाय हे दुसरे पारतंत्र्य इतरांवर लादत आहे. 

तुला तुझे मत आहे. मला माझे मत आहे आणि तुला तुझ्या मतांसकट मरण्याचा हक्क आहे पण जिवंत रहायचे असेल तर मात्र तुला आमचेच मत स्वीकारायला हवे,' असे म्हणणारे नक्षलवादी किंवा अतिरेकी कम्युनिस्ट; आणि ‘तुम्ही तुमचे विचार पुस्तकरूपाने छापा. आम्ही आमचे विचार पुस्तकरूपाने छापू पण तुमच्या पुस्तकांची विक्री करायचा प्रयत्न केला तर तुमची डोकी फोडू, पुस्तक जाळू' म्हणणारे 'झोत' विरोधक हे प्रवृत्तीने सख्खे भाऊ भाऊच म्हणायला हरकत नसावी. पण यातही फरक आहे. अतिरेकी कम्युनिस्ट आणि दहशतवादी नक्षलवादी हे लोकशाही मानणारे नाहीतच. पण व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली करणाऱ्या लोकशाहीच्या गळयाला नख लावू बघणाऱ्या इंदिरासत्तेचा विरोध करणाऱ्या घटकपक्षांचे काय? त्यांनी तर लोकशाहीची शपथ राजघाटावर म. गांधींच्या साक्षीने घेतली आहे ना? त्यांनी घेतलेली लोकशाहीची शपय हे ढोंग होते, की जातीयवाद, व्यक्तिपूजक हुकुमशाहीकडे नेणारे एकचालुकानुवर्तित्व मानणाऱ्या, कालबाह्य मूल्ये जपणाऱ्या संघटनांशी आमचा काहीही संबंध नाही. त्या स्वतंत्र सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना आहेत, असे जाहीर करत राहणे हे ढोंग आहे? ते ढोंगी नाहीत, प्रामाणिक आहेत असे मानलेच तर मग आपोआपच प्रश्न येतो की ‘झोत' सारखी पुस्तके विकण्याच्या संदर्भात जनता पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी दंगल का व्हावी? हाही प्रश्न बाजूला ठेवून खरी भीती व्यक्त करावीशी वाटते ती या गोष्टीबद्दल, की पक्षांतर्गत सांमजस्याच्या बुरख्याखाली सामान्य जनतेवर नकळत दुसरे पारतंत्र्य लादले जात आहे. आणि हे राजकीय सत्तेच्या संदर्भातल्या स्वातंत्र्याखाली दडपले जाण्याने माणसाचे सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातले विचार- पारतंत्र्य आहे. 

वेगवेगळे पक्ष जनता पक्षात विलीन झाले आणि दुसरे स्वातंत्र्य झाले. आता जनता पक्षातल्या या घटक पक्षांना फुटून बाहेर पडू नये म्हणून राजी राखणे आलेच, नाहीतर दुसरे स्वातंत्र्य परतपावली मागे फिरायचे. ते परतपावली मागे जावू नये, याची काळजी फक्त त्यांनीच घ्यायची की जे सहिष्णू आहेत. सहिष्णू तेच जे सदा पडते घेतील, परखड झोंबणारे विचार मांडणारी पुस्तके लिहिणार नाहीत, विकणार नाहीत. मग ते विचार सनातनी मुस्लिमांबद्दल असोत की सनातनी हिंदूबद्दल! म्हणजे हे दुसरे पारतंत्र्यच की!।
- प्रा. अनिल सोनार, कोपरगाव. 

त्याचा सांभाळ आम्ही करू 

चोवीस जूनचे अंकातील श्री. एस. एम. जोशी यांचा लेख चटका देवून गेला. रघुनाथ महतीने खरे सांगितले हाच त्याचा गुन्हा आणि ह्याची शिक्षा म्हणजे मृत्यु!!! त्याची पत्नी तर आधीच गेली. मुलांची आबाळ. त्याचा मुलगा आमच्या समाज सुधार मंडळाच्या दीनबंधू बालक गृहात पाठवावा. त्याची सर्व सोय आम्ही करू. तो स्वत:च्या पायावर उभा राहीपावेतो आम्ही त्याचा सांभाळ करू. 
- आत्माराम पाटील, धुळे.

महामानवाबद्दल 

आचार्य विनोबांवरील संपादकीयाने समाधान झाले नाही. एक तर या ठिकाणी विनोबा यांच्याविषयी 'महामानव व दयेचा सागर’ या दृष्टीने आपण पाहिले आहे. पण सध्याचे विनोबांचे इंदिरापंथाला मिळणारे आशीर्वाद समर्थनीय कसे म्हणता येतील? आणीबाणीत मौन, त्यानंतर त्यांचे शून्यात पाहणे, आणीबाणीला अनुशासन म्हणणे आणि आता चक्क आशीर्वाद! साधनाकारांकडून विनोबांविषयी अधिक स्पष्ट व धीट विचारांची अपेक्षा आम्ही का करु नये? त्या दृष्टीने आपले संपादकीय हळुवार व विनोबांकडे केवळ दया विषयाने पाहणारे वाटले. महामानव आणीबाणीत किंवा त्यानंतरही स्पष्ट बोलत नाही. तर महामानवाची मूल्ये आणि आचार यांकडे तो ‘महामानव' कोणत्या दृष्टीने पाहतो? आमचे दुर्दैव असे की साधन- शुचिता जोपासणारे आपण विनोबांविषयी स्पष्ट बोलत नाही! माझ्या भावना मी कळवल्या.
- श्रीपाद जोशी, जत.

आवाबेनची एक आठवण 

महिला विश्वमधील सौ. सुधाताई वर्दे त्यांनी कै. आवाबेन ह्यांच्याबद्दल दिलेली माहिती वाचून मला पण खालील आठवणी झाल्या. 1945 साली. फार जुनी गोष्ट. घाटकोपरला सेवा दलाचा 8 दिवसांचा कॅम्प होता. मी मामाकडे कोकणातून मुंबईला आले होते. अर्थात सेवा दलाची असल्यामुळे मामेबहिनीमुळे कॅम्पला गेले होते. तेव्हा मला गुजराथी अगर हिंदी काहीही येत नव्हते म्हणून मी एका बाजूला असावयाची. पण आवाबेन ह्यांना माझी अडचण कळली व त्या मला फारच सांभाळून घ्यावयाच्या. त्यांनासुद्धा तेव्हा मराठी जास्त येत नव्हते. त्या मला थोडे मराठी- गुजराथी व काही वेळा हाताने खुणा करून सर्व समाजावून देत असत. त्यामुळे मला सर्वात आवाबेन फारच आवडत असत. साधनेतील महिला विश्व सदर माहितीपूर्ण असते.
- सौ. शशी लाड, अंधेरी.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके