डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इतक्या सर्वांगसुंदर व परिपूर्ण विशेषांकात आपण ‘तीट लावणे’ ह्या मिथकीय म्हणीचा (कदाचित नकळत) अगदी यथायोग्य(!) वापर केला आहे की काय, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. अंकातील एक लेख मला असा ‘तीट लावण्याच्या’ स्वरूपाचा वाटला. त्या लेखाचा उल्लेख मी जाणूनबूजून टाळत आहे, कारण मला त्या लेखाच्या (तुलनेने तरुण) पालकाचा, अकारण रोष ओढवून घेण्याची भीती(?) वाटते. असो. 

गोव्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा ‘वसाहतवाद’ 

दि. 24 एप्रिलचा ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विषयावरील अंक वाचला. त्यात मित्रवर्य दत्ता दामोदर नायक यांनी, अल्बर्ट एलिस यांच्या ‘अ गाईड टू रॅशनल लिविंग’ या पुस्तकाचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला, हे सांगणारा लेख लिहिला आहे. त्यात काही कारण व संदर्भ नसताना त्यांनी महाराष्ट्राला वसाहतवादी ठरवले आहे. 

गोव्यातील व महाराष्ट्रातील अनेकांचे आजही असे मत आहे की, कोकणी ही मराठीची बोली आहे. त्यामध्ये मित्रवर्य नायक यांचे कुटुंब येते, पण हा विषय 1967 च्या जानेवारीत झालेल्या ओपिनियन पोलने कायमचा निकालात निघाला. फक्त 36 हजारांच्या मताधिक्याने गोवा महाराष्ट्रापासून दूर झाला. त्यानंतरच्या 54 वर्षांत महाराष्ट्राने गोव्याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही. महाराष्ट्र हा लोकशाही मानणारा, आकाराने जसा विशाल तसाच मनानेही विशाल(महा) आहे. कोकणी समृद्ध झाली तर तुळू, डोगरी समृद्ध झाल्या, एवढाच आनंद त्याला होईल. त्याने कधीही गोव्याचा दु:स्वास केलेला नाही. 

गोव्यातून मात्र दत्ता नायक यांच्यासारखे मित्रवर्य संधी मिळेल तेव्हा किंवा या लेखातल्याप्रमाणे निमित्त शोधून महाराष्ट्राबद्दलचा आपला विद्वेष प्रगट करतात. महाराष्ट्रातून गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, ही त्यांची तक्रार. शिवाजी, संभाजी हे मराठी राजे गोव्यामध्ये येऊन (मोगली आक्रमणामुळे) गोवा न घेता परतले. पुढे अठराव्या शतकात सावंतवाडीकर सावंत आणि कान्होजी आंग्रे हे मराठी राजे पोर्तुगीजांविरुद्ध एक होणार होते. पण तेही काळाच्या लीलांमुळे होऊ शकले नाही. अन्यथा गोवा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखाच महाराष्ट्रातील एक जिल्हा म्हणून दिसले असते. 

खुद्द गोव्यातून गोवा मुक्त करण्यासाठी जे प्रयत्न झाले, तसेच शर्थीचे प्रयत्न मराठी स्वातंत्र्यवीरांनी केल्याचे मित्रवर्य नायक विसरतात. अगदी अलीकडचा इतिहास पाहिला तर 1946 मध्ये लोहियांनी मडगाव येथे केलेल्या आंदोलनानंतर (पिटर अल्वारिस हे धर्माने ख्रिश्चन होते, पण कर्माने अस्सल मुंबईकर महाराष्ट्रीय समाजवादी होते) पाठोपाठ 1953-54 मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील दादरा, नगरहवेली, दमण सिल्वासा हे कोणी मुक्त केले? सुधीर फडके, राजाभाऊ वाकणकर, काजरेकर आणि अन्य हे महाराष्ट्रीयच होते ना? बेलीच्या पोर्तुगीज पोलीस चौकीवर गोळीबार करून अनेक वर्षे पोर्तुगीजांचा तुरुंगवास व अनन्वित छळ झालेले मोहन रानडे कोठले होते? 1955 च्या सत्याग्रहात पोर्तुगीजांच्या गोळ्या झेलून हुतात्मा झालेले हिरवेगुरुजी, विष्णुपंत चितळे महांकाळ हे कोठले होते? आणि सुधाताई जोशी? पुणेकरच! मधु लिमये, मधु दंडवते हे कोठले? एस.एम., नानासाहेब गोरे, नाथ पै, जयंतराव टिळक हे मूळ कोकणातले- महाराष्ट्रातीलच ना? गोवा मुक्तीसाठी झगडणारे! 

कोकणीला महाराष्ट्रामध्ये दलित कोणी म्हटले याचा पुरावा मित्रवर्य नायक देतील का? वरील सर्व नेत्यांनी महाराष्ट्राच्या वसाहतवादाला प्रोत्साहन दिले, हा आरोप ते सिद्ध करू शकतील का? अल्बर्ट एलिसचा विवेकवाद डोळ्यांसमोर ठेवून मित्रवर्य नायक यांनी स्वतःला विचारावे. 

‘जिवाभावाचा गोवा’ हे दोन आवृत्त्या निघालेले पुस्तक लिहिणाऱ्या प्रस्तुत लेखकासाठी गोवा हे जिवाभावाचे आहे, त्यामुळे तो महाराष्ट्राला वसाहतवादी कधीच म्हणणार नाही. मित्रवर्य दत्ता नायक साधनामध्ये सुरेख मराठीतून लिहितात, हाच लोभ त्यांनी मराठी भाषा व महाराष्ट्र यांच्यावर कृतज्ञतापूर्वक ठेवावा, हीच विनंती! 

मधु मंगेश कर्णिक, मुंबई 

----   

प्रेरणा देणारा व संदर्भमूल्य असणारा विशेषांक 

जागतिक पुस्तकदिनानिमित्त संपादित केलेला दि.24 एप्रिल 2021 चा विशेषांक हाती पडताच तो संपूर्ण वाचूनच खाली ठेवला, इतका तो वाचनीय व आकर्षक झाला आहे. आजवरच्या साधनाच्या विशेषांक परंपरेत हा अंक मला उत्कृष्ट वाटला. ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विषयावरच्या पंधरा लेखकांचे लेख मला अनेक अर्थाने आजच्या मराठी विचारविश्वातील एक प्रातिनिधिक घटना वाटते. यातून निवडलेल्या संबंधित लेखकांसोबतच तुमचे संपादकीय कौशल्य मला मोलाचे वाटते, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. संपादकीयात नमूद केल्याप्रमाणे लेखकांना पत्र पाठवून, प्रभावित करून गेलेल्या पुस्तकाविषयी लिहिताना त्यांच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे हा विशेषांक मौलिक ठरला आहे. एरवी अशा विषयावरचे लेख अत्यंत व्यक्तिगत आवड-निवड जपणारे आणि एकूण संपादन दिखाऊ होणाची भीती असते. पण हा अंक माझ्या दृष्टीने मराठी वाचन, अभिरुची, विविध चळवळी आणि वर्तमान विचारविश्व या संदर्भात ऐतिहासिक झाला आहे. त्यासाठी सर्व लेखकांचे अभिनंदन आणि तुमचे आभार. 

आज जगभर नवभांडवलशाहीने बाजारमूल्यप्रधान चंगळवादी व्यवस्था सर्व स्तरांवर निर्माण केली आहे. त्यातून सामाजिक व सांस्कृतिक व्यवहारात असहिष्णुता, मूलतत्त्ववाद आणि धार्मिक-वांशिक एकाधिकारशाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची मुळे गेल्या अर्धशतकात जगभर लोकशाही, समाजवाद व उदारमतवाद यांना लागलेली ओहोटी यात आहे- असे एकूण आकलन यातील लेख वाचताना मला होत होते. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्या आक्रमक-अमानुष व्यवस्थेला तोंड देण्यासाठी समांतरपणे काही वैचारिक चळवळी विविध देशांत सुरू होत्या. त्याची जाणीव मराठी समाजमनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही लेखकांना कशी होती, ते त्यांच्या वाचनातून लक्षात येते. त्यांनी त्यांना प्रभावित करणाऱ्या पुस्तकांच्या निमित्ताने ते वाचकांपुढे मांडले आहे. ही जाणीव अल्प असेल, क्षीण असेल, पण या अंतस्तरात झिरपलेल्या जाणिवांनीच महाराष्ट्रातील विधायक चळवळी उभ्या झाल्या आहेत, तेही खरे आहे. वर्ण-जातींची विषमता, शिक्षण-आरोग्यासारख्या क्षेत्रातील चुकलेले मार्ग, पर्यावरण-ऱ्हासाचा विनाशाकडे नेणारा मार्ग आणि स्त्री-पुरुषसंबंधातील शोषण या क्षेत्रात गेल्या तीन-चार दशकांत ज्यांनी मराठी विचारविश्वाला वळण देण्यासाठी अप्रत्यक्ष सहभाग दिला आहे, अशा लेखकांची आपण केलेली निवड त्यांनी त्यांच्या चिंतनातून सार्थ ठरवली आहे. 

त्यातही गिरीश कुबेर, दत्ता नायक, डॉ.आनंद नाडकर्णी, संध्या गोखले, शिल्पा कांबळे, अतुल देऊळगावकर, डॉ.हमीद दाभोलकर, रझिया पटेल, सदानंद मोरे, भारत सासणे, दासू वैद्य यांचे आणि तुमचा स्वतःचा प्रधान मास्तरांच्या कादंबरीवरील लेख माझ्यासारख्या नवोदित लेखकाला प्रेरणा देणारे संदर्भमूल्य असल्यामुळे संग्राह्य वाटतात. (यातील प्रत्येक लेखाने मला काय दिले, हे लिहिण्याचा माझा मानस आहे; पण तो दीर्घ लेख होईल, असो.) आपण ह्याचे पुस्तक करणार आहात, हा आणखी आनंदाचा भाग आहे. ती मराठी वाचकांसाठी मोलाची ठेव ठरेल. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि पुनश्चः अभिनंदन. 

प्रमोद मुनघाटे, नागपूर 

----

एक लेख ‘तीट’ लावण्याच्या स्वरूपाचा वाटला 

दि.24 एप्रिल 2021 चा विशेषांक अप्रतिम व संग्राह्य झालाय. या विशेषांकातील (एक अपवाद वगळता) सारेच लेख ‘गागर में सागर’ या म्हणीची प्रचिती आणून देतात आणि त्या-त्या लेखकाने सांगितलेले पुस्तक वाचण्याची प्रेरणा जागृत करतात. मी स्वतःला एक  voracious वाचक समजायचो, पण या विशेषांकातील ‘अनुभवाचे बोल’ वाचून माझा हा भ्रम भुईसपाट झाला. अंजली जोशी आणि शब्द पब्लिकेशनच्या सौजन्याने अल्बर्ट एलिस मी थोडाबहुत वाचलाय, त्याच्या REBT चा फॉलोअरसुद्धा आहे. माझ्या जीवघेण्या अपघातानंतर आणि कँसरसोबतच्या माझ्या दोस्तीनंतरही मला REBT चाच सहारा घ्यावा लागला होता. (जरी तोवर माझी ओळख (!) अल्बर्ट एलिससोबत झाली नव्हती तरी!)  

मला सतावणारा प्रश्न तुमच्यासारखाच- म्हणजे ‘माझी राजकीय विचारप्रणाली नेमकी कोणती?’ हाच आहे. त्यासाठी मी अजूनही न वाचलेले पुस्तक ‘साता उत्तराची कहाणी’ आता लवकरच वाचणार आहे. या लेखाने माझ्या आजवरच्या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मदत होणार आहे, त्याबद्दल मी खूप-खूप आभारी आहे. इतक्या सर्वांगसुंदर व परिपूर्ण विशेषांकात आपण ‘तीट लावणे’ ह्या मिथकीय म्हणीचा (कदाचित नकळत) अगदी यथायोग्य(!) वापर केला आहे की काय, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. अंकातील एक लेख मला असा ‘तीट लावण्याच्या’ स्वरूपाचा वाटला. त्या लेखाचा उल्लेख मी जाणूनबूजून टाळत आहे, कारण मला त्या लेखाच्या (तुलनेने तरुण) पालकाचा, अकारण रोष ओढवून घेण्याची भीती(?) वाटते. असो. 

या विशेषांकाने मला जे आत्मिक(!) समाधान मिळवून दिले, त्याचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे लवकरच हा अंक आणखी लेकुरवाळा होऊन पुस्तकरूपात येवो. 

लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया 

----

‘असा मी असा मी’ची आठवण झाली... 

पुस्तक दिवस विशेषांक खूप वेगळा वाटला. त्यातला आपला लेख फार आवडला. एखाद्या पुस्तकामुळे आपली राजकीय विचारप्रणाली कळायला मदत होणे, हा विलक्षण प्रवास आहे! ‘असा मी असामी’तला गृहस्थ तीन वेगवेगळ्या सभांना जातो आणि त्याला प्रत्येक विचारसरणीतले काही तरी आवडते, त्याची आठवण झाली! तुमच्या ‘उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवादी’ व्याख्येच्या जवळपास आपलाही कल आहे, हेही जाणवले!! असो. आपल्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा. 

रवी गोडबोले, अमेरिका 

----

लोकशाही समाजवाद हा सुवर्णमध्ये आहे... 

साधनातील ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ ह्या मालिकेतील आपला लेख वाचला. ‘साता उत्तराची कहाणी’ ह्या पुस्तकाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजले. आपल्या लेखातील सातही मुद्दे मला मनोमन पटले. किंबहुना माझ्या भावनांना तुम्ही शब्द दिले आहेत, असे वाटले. लोकशाही समाजवाद हा सुवर्णमध्य आहे, यात शंकाच नाही. साधनेचा हा विशेषांक खासच आहे! माझ्यासाठी तर ही पर्वणीच आहे. उत्तम लेखाबद्दल आणि संग्राह्य अंकाबद्दल आपले मनापासून, अभिनंदन. 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड

---- 

प्रधानसरांनी ते मान्य केले होते... 

दि. 24 एप्रिल 2021 चा ‘जागतिक पुस्तकदिन अंक’ वाचून संपवला. हमीद दाभोलकर आणि रझिया पटेल यांचे लेख विशेष आवडले. ते वाचून मी टोपी शुक्ला ही कादंबरी किंडलवर मिळवून एका दिवसात वाचून काढली. तुमच्याप्रमाणे ‘साता उत्तराची कहाणी’ हे माझ्याही विशेष आवडीचं पुस्तक आहे. जसं या पुस्तकात काँग्रेसच्या विचारांना प्रतिनिधित्व नाही, तसं उजव्या आर्थिक विचारसरणीलाही नाही. (हिंदुत्ववादी म्हणजे आर्थिक उजवे नव्हेत.) मी प्रधानसरांना तसं पत्र लिहिलं होतं. त्यांनी तत्परतेने दिलेल्या उत्तरात हे मान्य केलं होतं. या पुस्तकातल्या काळात भारतात आर्थिक उजवे विचार प्रबळ नव्हते, असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. एकूण उत्तम अंक. 

विवेक गोविलकर, नाशिक

---- 

चोखंदळ दृष्टी कारणीभूत... 

दि. 24 एप्रिलचा अंक खूप आवडला. पुस्तकदिनाचे औचित्य साधून निवडक लेखकांकडून मला ‘प्रभावित करून गेलेले पुस्तक’ लेख प्रसिद्ध केलेत, ते खूप वाचनीय आहेत. अर्थात त्यामागे आपली चोखंदळ दृष्टी कारणीभूत आहे. दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनच्या काळात एक उत्तम अंक सादर केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. 

डॉ. अशोक इंगळे, अकोला  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके