डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

2 फेब्रुवारीच्या ‘साधना’त प्रसिद्ध झालेले (आपले मित्र) श्री.अवधूत परळकर यांना आपण लिहिलेले पत्र व त्यांचे उत्तर वाचले. श्री.परळकरांनी आपण निवृत्तीनंतर काय करावे हा मित्रत्वाचा दिलेला सल्ला लक्षात घेऊन, निदान त्यांच्या लेखनाचे परीक्षण करण्यात वेळ दवडू नये, असे मलाही वाटते. काहीही पुरावे न देता किंवा संदर्भ न देता, बेधडक विधाने करायची, राजकारण, अणुऊर्जा करार, अर्थशास्त्र, क्रिकेट किंवा वाङ्मय अशा कोणत्याही विषयावर बिनदिक्कत लिहायचे, हे परळकर यांचे तंत्र आहे. कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी, केव्हातरी केलेले ‘भाषा ही सत्य लपविण्याचे साधन म्हणून अधिक वापरली जाते, खास करून भाषाप्रभूंकडून’ असे संदर्भरहित विधान परळकरच स्वत:चे म्हणून करू शकतात. व श्री.विजय तेंडुलकरांनाही त्या वादात ओढू शकतात. बंगाली सिनेमे जास्त पाहिल्याच्या जोरावर बंगाली साहित्यावर ते अधिकारवाणीने विधाने करतात. त्यामुळे तुम्हा आम्हालासुद्धा अमिताभचे हिंदी सिनेमे बघून हिंदी साहित्याबाबत फुशारक्या मारण्यास हरकत नाही. पहिल्या परिच्छेदात काय लिहिलेले आहे, याचा विसर त्यांना दुसरा परिच्छेद लिहिण्याच्या वेळी पडलेला असतो.

नोंद

‘छोटे-मोठे राज आणि अबू’निर्माण होऊ नयेत यासाठी ‘आरोग्य सेने’च्या तीन मागण्या

‘छोटे-मोठे राज आणि अबू सर्वत्र निर्माण होणार’हे 16 फेब्रुवारीच्या ‘साधना’अंकातील संपादकीय अतिशय सडेतोड आहे.कोणतीही शेरेबाजी न करता ‘राज’कारणाचे विश्लेषण यात अतिशय समर्पक शब्दांत केलेले आहे. कोणत्याही राज्यात या प्रकारच्या अशांततेच्या काळात सत्ताधारी पक्ष, प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षनेते, लोकप्रतिनिधी, संस्था-संघटना यांनी त्या प्रवृत्तीविरुद्ध तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असते. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने परप्रांतीयांविरुद्ध जे आंदोलन उभे केले ते सर्वथैव निषेधार्हच आहे; परंतु वर उल्लेख केलेल्या घटकांचाही यात गाफिलपणा दिसून येतो. कोणत्याही राज्यांत ‘छोटे-मोठे राज आणि अबू’पुढील काळात निर्माण होऊ नयेत यासाठी-

1) महाराष्ट्रात विविध ठिकाणी कामधंदे करून उदरनिर्वाहासाठी राहणाऱ्या उत्तरप्रदेशवासीयांना त्यांच्या घरी जाऊन मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हुसकावले. त्यांच्या घरातील रोख पैसे आणि मौल्यवान वस्तूही या कार्यकर्त्यांनी पळवल्याच्या अनेक घटना घडल्या. मनसे कार्यकर्ते हल्ले करत असल्याची छायाचित्रे अनेक वृत्तपत्रांत आणि दूरचित्रवाणीवरून दाखवण्यात आली.(सर्वसामान्यांमध्ये सर्वत्र दहशतीचे वातावरण असते तेव्हा –‘राष्ट्रीय एकात्मतेची भावना नागरिकांमध्ये रुजविणे, शांतता प्रस्थापित करणे यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे.’ नागरिकांना प्राथमिक सेवासुविधा पुरविणे आणि त्यांच्या जीवितांचे रक्षण करणे यांची जबाबदारी अंतिमत: या दोघांवर येते.) परंतु त्या दहा-बारा दिवसांत महाराष्ट्रातील एकाही जिल्हाधिकाऱ्याने किंवा पालकमंत्र्याने रस्त्यावर येऊन शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जनतेला जाहीर आवाहन केल्याचे दिसून आले नाही. आता तरी- ‘वृत्तपत्रांतील छायाचित्रांच्या आधारे त्या-त्या भागातील पोलिस स्टेशन्सनी संबंधित कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर खटले दाखल करावेत’, असे आदेश त्यांनी तातडीने द्यावेत.

2) महाराष्ट्रात विविध ठिकाणी राहणाऱ्या परप्रांतीयांची झालेली एकूण नुकसानभरपाई आणि राष्ट्रीय संपत्तीची मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली हानी यांचा प्राथमिक अहवाल तयार करावा. तेवढ्या रकमेचा दंड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सरकारजमा झाल्यानंतरच विविध जिल्ह्यांत अटक केलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करावा.

3) कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस खात्यास आदेश देण्याचे सर्वोच्च अधिकार ज्यांच्याकडे आहेत, अशा मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचीही दखल न्याय यंत्रणेने घ्यावी.

आरोग्य सेनाप्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली, 10 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे ‘राज ठाकरे - अबू आझमी - परप्रांतीय आणि राष्ट्रीय एकात्मता’या विषयावर ‘अदालत’आयोजित करण्यात आली होती. ‘राज ठाकरे व अबू आझमी यांना तातडीने एकाच वेळी अटक करण्यात यावी आणि मुंबईचे पोलीस कमीशनर श्री. धनंजय जाधव यांना सेवेतून मुक्त करावे’ अशी मागणी यावेळी ‘आरोग्य सेने’ तर्फे करण्यात आली होती. त्यानंतर नाट्यमय घटना घडल्या.तसेच - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी परप्रांतीय दोन भय्यांना पळवून लावल्याचे छायाचित्र (दैनिक पुढारी - पुणे आवृत्ती, 13 फेब्रुवारी पान नं. 11) प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार आरोग्य सेनेने ‘कणकवली पोलिस स्टेशन’कडे पाठपुरावा केला. तेथील पोलिस अधिकारी श्री. कोळी यांनी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली.

-सत्यजित वैद्य
(राष्ट्रीय सरचिटणीस - आरोग्य सेना) 
Email - arogyasena@yahoo.co.in, satya100.vaidya@rediffmail.com
website :www.arogyasena.org
----
अभिमानाच्या भावना जमा झाल्यात...

मी ‘साधना’चा पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. ‘साधना’ आर्थर रोड, मुंबईमध्ये असताना साधनाच्या आर्थिक व्यवहाराचे हिशेब पाहणारे स्व.वसंतराव वडके यांच्याबरोबर काही काळ साधनाच्या कार्यालयात काम करण्यात मी घालविली आहेत.

आजची साधना बहुरूपी, बहुश्रुत व बहुगुणी झाल्यासारखी वाटते. त्यामुळे साधनाबद्दल माझ्या मनात आदराच्या, कौतुकाच्या व अभिमानाच्या भावना जमा झाल्यात. स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांच्या काळात ‘मोस्ट बॅकवर्ड नेशन’ पासून सुरू झालेली भारतीय अर्थव्यवस्था आज जगाला स्वप्नवत वाटणाऱ्या वेगाने लोकशाहीच्या मार्गाने प्रगती करणारे ‘120 कोटी लोकांचे राष्ट्र’ झाले आहे. आतापर्यंत साधनाने तरुणाईसाठी राबवलेल्या अनेक उपक्रमातून नवीन विचार ठेवले आहेत. यापुढील काळात भारतीय लोकशाही, अर्थव्यवस्था, समाजातील विविध घटक, धार्मिक सामंजस्य, देशांतर्गत सुव्यवस्था याबद्दलच्या चिंतनाचे पडसाद साधनाच्या भावी काळातील अंकातून उमटावेत ही इच्छा.

श्री. दिनेश रघुनाथ पांगम 
13 चंद्ररश्मी, माधवदास अमरसी रस्ता, अंधेरी (प.) मुंबई 58.
----
भेंडे यांचा लेख वाचल्यावर 

2 फेब्रुवारीच्या अंकातील डॉ.सुभाष भेंडे यांचा कवी मनमोहन यांच्याविषयीचा माहितीपूर्ण ललित लेख आवडला. ‘कसा ग गडे झाला?’ आणि ‘ती पहा, बापूजींची प्राणज्योती’ ही दोन्ही गाणी आमच्या लहानपणी खूपच लोकप्रिय झाली होती. त्यापैकी पहिले गीत थोडे थिल्लर स्वरूपाचे आहे, अशी माझी (मुखड्यावरून) समजूत होती. परंतु भेंडे यांनी उद्धृत केलेल्या पुढच्या ओळी किती काव्यात्म आहेत!

एकदा आमच्या घरासमोरील छोटाणीवाडीत (ग्रँट रोड) सत्यनारायणाची सार्वजनिक पूजा होती. त्यावेळी आर.एन.पराडकर यांचे गाणे आयोजित केले होते. तेव्हा त्यांनी काही भावगीते म्हटली. (पुढे ते फक्त दत्ताची भजने गात असे ऐकले) त्यात त्यांनी ‘कसा ग गडे झाला?’ हे गीत प्रथम ऐकवले. मग ते म्हणाले, ‘या प्रश्नाला राधेचे उत्तर काय आहे, त्याविषयीचे गाणे आता ऐका.’ या दुसऱ्या गीताचे शब्द होते.

“जो तो रे मनमोहना, मला विचारीत सुटला 
अंबाडा हो राधाबाई सैल कसा झाला?” 
पुढच्या ओळी आठवत नाहीत, पण या धृवपदाची चाल अजून लक्षात आहे.

त्याची ध्वनिमुद्रिका निघाली नसावी. कारण पुढे ते कुठेच ऐकले नाही. परंतु आता भेंडे यांचा लेख वाचल्यावर वाटले की या दुसऱ्या गीतावरील ‘मनमोहना’ हे संबोधन मूळ गीताच्या कवीला उद्देशून होते की काय!

साधना कामत, 
ए/3, 'आनंदाश्रम', शामराव विठ्ठल मार्ग, मुंबई 400007.
----
शांताबाईंवरील कथा वाचा 

9 फेब्रुवारीच्या ‘साधना’तील ‘कैफियत’मध्ये राजन गवस यांनी शांताबाईंविषयी (आणि सगळे गाव शांताबाईंच्या गुडघ्यावर डोके ठेवून दाढी-डोई करू लागले!) छान लिहिले आहे. पतीच्या निधनानंतर नाभिकी करून त्या स्वत:ला व कुटुंबाला सावरतात. कडुकरसाहेब त्यांना तो व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देतात, लेख सकारात्मक दृष्टिकोन देतो. मात्र याच शांताबाईविषयी सीताराम सावंत यांनी ‘वस्तरा चालवणारी बाय’ या नावाने ‘शब्दालय’ (श्रीरामपूर)च्या 2007 च्या दिवाळी अंकात सुंदर कथा लिहिली आहे. मात्र शांताबाईंचे नाव बदलले आहे. तो व्यवसाय करताना त्यांना कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागले, हे त्यांनी अतिशय कलात्मकतेने मांडले आहे. राजन गवस यांच्या लेखात आहे तो सर्व भाग त्यात आहे, शिवाय काही काल्पनिक भागही समाविष्ट करून त्यास कथास्वरूप दिले आहे. सत्य घटना व काही काल्पनिक भाग मिळून ती सुंदर कथा झाली आहे.

राजन गवस म्हणतात ‘शांताबाईंकडे कोणीच लक्ष दिले नाही’ पण तसे नव्हे, यापूर्वी शांताबाईविषयी सर्व दैनिकांमध्ये बातम्या आलेल्या आहेत. सीताराम सावंत यांनी कथा लिहून व ‘शब्दालय’ने ती प्रकाशित करून वाचकांसमोर मांडलेली आहे. जिज्ञासूंनी ती कथा अवश्य वाचावी.

प्रा. रमेश दिवटे, कराड
----
मेमरी गार्डन

पुन्हा एकदा झाले 
बुद्धदेवाचे आगमन 
अन् महानिर्वाण 
बाबा आमचे त्यांचे नाव...
सगळेच होत नाहीत बाबा 
की घ्यावे त्यांचे नाव 
नावेच ठेवावीत अशीच सारी 
इथून तिथून गाव...
एक नाव अन् एक गाव 
मात्र झाले बुद्ध देवाचे गाव 
जे सडलेले म्हणून तुसडलेले 
त्यांनाच निवडले 
बाबा आमटे त्यांचे नाव...
विल्या म्हणतो नावात काय आले?
नावात तर सर्व काही आहे 
गांधीबाबा, गाडगेबाबा 
त्याच नावाचे झाले नामांतर 
बाबा आमटे त्यांचे नाव 
‘मेमरी गार्डन!’
ठाई ठाई तरीही 
अंतोदयाचा अजूनही 
ठावठिकाणा नाही!

- चंद्रकांत बोराटे 
पुणे 411042.
----
ते विधान विचार करण्यासारखे

प्रिय संजय जोशी,

2 फेब्रुवारीच्या ‘साधना’त प्रसिद्ध झालेले (आपले मित्र) श्री.अवधूत परळकर यांना आपण लिहिलेले पत्र व त्यांचे उत्तर वाचले. श्री.परळकरांनी आपण निवृत्तीनंतर काय करावे हा मित्रत्वाचा दिलेला सल्ला लक्षात घेऊन, निदान त्यांच्या लेखनाचे परीक्षण करण्यात वेळ दवडू नये, असे मलाही वाटते. काहीही पुरावे न देता किंवा संदर्भ न देता, बेधडक विधाने करायची, राजकारण, अणुऊर्जा करार, अर्थशास्त्र, क्रिकेट किंवा वाङ्मय अशा कोणत्याही विषयावर बिनदिक्कत लिहायचे, हे परळकर यांचे तंत्र आहे. कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी, केव्हातरी केलेले ‘भाषा ही सत्य लपविण्याचे साधन म्हणून अधिक वापरली जाते, खास करून भाषाप्रभूंकडून’ असे संदर्भरहित विधान परळकरच स्वत:चे म्हणून करू शकतात. व श्री.विजय तेंडुलकरांनाही त्या वादात ओढू शकतात. बंगाली सिनेमे जास्त पाहिल्याच्या जोरावर बंगाली साहित्यावर ते अधिकारवाणीने विधाने करतात. त्यामुळे तुम्हा आम्हालासुद्धा अमिताभचे हिंदी सिनेमे बघून हिंदी साहित्याबाबत फुशारक्या मारण्यास हरकत नाही. पहिल्या परिच्छेदात काय लिहिलेले आहे, याचा विसर त्यांना दुसरा परिच्छेद लिहिण्याच्या वेळी पडलेला असतो.

श्री.अवधूत परळकरांची काही विधाने मात्र सत्य आहेत. प्रतिकूल मतप्रदर्शनाने अनेक थोर थोर लेखक बिथरतात, हे या थोर लेखकाने आपल्याला दिलेल्या उत्तरानेच सिद्ध होते. ‘साधनाच्या संपादकांना बहुदा अभ्यासू माणसे मिळत नसावीत.’ हे विधानही विचार करण्यासारखे आहे.

रमेश पां. दोंदे, 
1/5, मधुकुंज सोसायटी, जयानगर, दत्तपाडा, मुंबई 400069.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके