डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सबलीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा वाटा हा लेख वाचला. त्यातील मताशी मी सहमत नाही . केवळ गलिच्छ वातावरणात चाललेल्या सत्तेच्या खेळात सहभाग घेऊन महिला सबला होतील अशी प्रा. भारती पाटील यांची अपेक्षा असेल तर ते चूक आहे.

प्रत्यक्ष प्रश्नांना सामोरे जाऊ या

2 जानेवारीच्या साधना अंकातील आपले संपादकीय वाचले. आपण विश्लेषण करताना खूप महत्त्वाच्या गोष्टींवर बोट ठेवले आहे. पण त्यामध्ये गाभ्याला हात घातलाच नाही. देशी उद्योगधंद्यांची कंबरडे मोडली. पण अशी स्थिती का झाली? देशी उद्योगधंदे चालविणारे याला अजिबातच जबाबदार नाहीत का? संरक्षणाची ढाल घेऊन उद्योगधंदे चालवायची सवय, गिऱ्हाईकांच्या गरजा लक्षात न घेता व वाटेल तसे उत्पादन, गुणवत्तेचा विचार न करता सरंजामी पद्धतीची दृष्टी यांमुळे उत्पादन कमी खर्चात न होणे, अशा त-हेची कारणेही स्पर्धेमध्ये टिकाव न लागण्यास कारणीभूत आहेत. हे केव्हातरी स्पष्ट सांगावे लागेलच की नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापारी संघटना कर्जे मंजूर करताना कामगार कमी करण्यास सांगतात हे खरे आहे पण ते असे का सांगतात? आपल्या सर्व क्षेत्रात अनुत्पादक कामगारांची भरती झाली आहे.

काम करणारे, उत्पादन वाढवणारे कामगार कमी करण्यास कोण सांगेल? स्वतःची वशिल्याची माणसे भरणे हा फक्त सरकारी, निमसरकारी खात्यातील गोंधळ नाही. तर सहकारी क्षेत्रात व खाजगी क्षेत्रातही हीच प्रथा आहे. समाजवाद, समता, भांडवलशाही या सर्वांचे पोषाख उतरून ठेवून ज्यावेळी आपण प्रश्नांना सामोरे जाऊ व या अधोगतीला मी किती कारणीभूत आहे याचा परखडपणे विचार करू तेव्हाच आपल्याला सद्य स्थितीतून बाहेर पडता येईल. नहून आपण सतत आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून मोकळे होऊ

- नारायण कानेटकर, पुणे

----------

स्त्रियांनी राजकारणापासून दूर राहणे इष्ट

2 जानेवारीच्या साधना अंकात प्रा. भारती पाटील यांची कव्हरस्टोरी(?) (इंग्रजी शीर्षक कशाला? प्रमुख लेख का म्हणू नये) स्त्रियांचा सत्तेतील सहभाग..... सबलीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा वाटा हा लेख वाचला. त्यातील मताशी मी सहमत नाही . केवळ गलिच्छ वातावरणात चाललेल्या सत्तेच्या खेळात सहभाग घेऊन महिला सबला होतील अशी प्रा. भारती पाटील यांची अपेक्षा असेल तर ते चूक आहे. स्त्रियांनी राजकारणापासून दूर राहणे इष्ट, त्यांनी शिक्षण , वैद्यकीय , स्थापत्य किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, बँका, संगणक व्यवसाय या व्यवसायात मोठ्या संखेने जावे व अर्थोत्पादन करावे. घरातील सर्व आर्थिक व्यवहार पहावेत. मुलांच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्यावे. मुलांचे चारित्र्य घडवावे. एवढे केले तर भारत खरोखरीच महान होईल. पुरुषांचे वर्चस्व सर्वच क्षेत्रात प्रामुख्याने आढळते. ते कमी करण्याचा प्रयत्न स्त्रियांनी कटाक्षाने करावेत. राजकारणापासून शंभर पावले दूर राहावे. फार तर ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महापालिका इतपर्यंत राजकीय सहभाग एक वेळ चालेल पण त्यांनी सामाजिक व्यवहारात सहभागी व्हावे हे उत्तम.

-पुंडलिक मोरजे, नाशिक

----------

पुरुषांना शतकाच्या दीर्घ रजेची गरज 

महिलांचे सबलीकरण ही कव्हरस्टोरी वाचली, या संदर्भात अमेरिकेतील मेमोरियल स्लोन केटरिंग सेंटरचे डॉ. लुई थॉमस या शल्य विशारदाची मते उद्बोधक ठरतील म्हणून थोडक्यात देत आहे. जगाच्या इतिहासातील विस्तृतपणे केलेल्या नोंदीचा अभ्यास केल्यास आतापर्यंत पुरुष राजकीय नेत्यांनी घातलेल्या धुमाकुळीवरून यानंतर त्यांच्या हातात नेतृत्व देणे धोकादायक वाटते, असे अनुमान काढता येईल. परिवर्तनाची गरज आहे. स्त्रियांना नेतृत्व करू दे. 

आपण सर्व पुरुष मंडळी शंभर वर्षाच्या राजकीय सुट्टीवर जाऊ या. मतदारांच्या यादीत सुद्धा आपली नावे नकोत. स्त्रियांनाच मतदानाचा हक्क द्या. एकदा प्रयत्न तरी करू या. हवे असल्यास शंभर वर्षाच्या मुदतीनंतर पुरुषांना परत एकदा मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कायद्यामध्ये बदल करा. या मधल्या काळात जगाच्या पाठीवर थर्मो- न्यूक्लियर बाँब असावेत की नकोत हे जगातील स्त्रियांनाच ठरवू द्यावे, बालकांचे संगोपन करणारे व समजून घेणारे काही जनुक स्त्रियांमध्ये असल्यामुळे स्त्रिया योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे. पुरुषांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पुरुषांच्या हातातच यापुढेही सूत्रे राहिल्यास कुणाच्या तरी शरीरातील ‘वाय’ गुणसूत्र, कुठल्या तरी चुकीच्या संदेशामुळे स्फोट मालिका सुरू करून जगाच्या पाठीवरील मनुष्यासकट सर्व प्राणीमात्रांचा विध्वंस घडवून आणेल. 

दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाच्या कक्षा बाढत आहेत. त्यामुळे ज्ञानाची योग्य विभागणी मागील शतकापेक्षा पुढच्या शतकात होणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंत स्त्रिया ज्ञानापासून वंचित राहिल्या आहेत. अपत्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांना प्रौढत्वापर्यंत वाढवून सुजाण व्यक्ती बनवणे हे एक पुढील शतकाचे मोठे आव्हान आहे . उपजतच शिक्षकाचे गुण असलेल्या या स्त्रिया योग्य तऱ्हेने ही भूमिका पार पाडतील याची मला खात्री आहे. सर्व पुरुषांना एका मोठ्या रजेवर पाठवा. कारण या दीर्घ रजेची आता त्यांना गरज आहे.

प्रभाकर नानावटी, पुणे

----------

वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद 

महाराष्ट्र फाऊंडेशनचा प्रकाशकांसाठीचा असलेला पुरस्कार यंदा साधना प्रकाशनाला मिळाला याचा मौज प्रकाशन गृहातील आम्हा सर्वांना फार आनंद व अभिमानही वाटला. विशिष्ट ध्येयवादाने व मूल्यनिष्ठेने प्रकाशन करणारे प्रकाशक महाराष्ट्रात फार थोडे आहेत आणि त्यांच्यात साधना प्रकाशनाचे स्थान प्रमुख आहे . त्याच्या कार्याची उचित अशी बूज या पुरस्काराने झाली असेच म्हटले पाहिजे. यापुढही साधना प्रकाशनाचे कार्य उत्तम प्रकारे चालो , असे चिंतितो. पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

श्री. पु. भागवत, मुंबई

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके