डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधीजींबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाल्याने पाश्चात्त्य उच्चवर्णीय विदुषी इथे कशा आल्या, ही संजीवनी खेर यांची काहीशी माहितीपूर्ण लेखमालिका बऱ्याच दिवस चालत राहिली. यामधील अनेक जणी गांधीजींची पूर्वपरवानगी घेऊन व गांधींनी नकार देऊनही इथे येऊन धडकल्या, असे जरी असले तरी या सर्व जणींबद्दलच्या कथा समानच आहेत याचा पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावा लागला. ह्यापेक्षा एक-दोन जणींची पूर्ण कहाणी व इतर जणींचा नामोल्लेख जरी केला असता तरी पुरेसे झाले असते। त्यानंतरच्या लेखिकेचा अंतिम लेख मात्र जरूरी होता.

पंचसूत्रीतील पहिल्या मुद्यासंदर्भात काही मुद्दे...

दि. 2 जानेवारीच्या अंकातील संपादकीयाचा विषय पाहिल्यावर आधीच दोन मुलाखती होऊन गेल्यावर केशवरावांची तिसरी मुलाखत पुन्हा कशासाठी, असे क्षणभर वाटून गेले. पण संपादकीय वाचून झाल्यावर तिसरी मुलाखतही पहिल्या दोन्हींपेक्षा जास्त महत्त्वाची व निर्णायक असल्याने तिचे महत्त्व उलगडले.

गेल्या 10-15 वर्षांमध्ये वेगाने बदल होत असलेली माहितीची देवाण-घेवाण व आपली मते/प्रतिक्रिया रोखठोक मुक्तपणे समाजापुढे मांडण्याची सोय अनेक जण वापरायला लागल्याने प्रिंट व दृक्‌मीडियाचे महत्त्व घसरत आहे, असे दिसते. इतर अनेक अडचणी आणि त्यामध्ये मागील वर्षभरात ‘दुष्काळात तेरावा महिना’ यावा त्याप्रमाणे कोरोना संकटाने निर्माण केलेली अडचण ही भर पडलेली आहे. अशा सर्व बदलांना तोंद देताना संपादक म्हणून वैचारिक नियतकालिकाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपण विचारलेल्या योग्य प्रश्नांमधून तुम्ही मार्ग कसा काढावा यावर केशवरावांनी केलेले मार्गदर्शन (पंचसूत्री) किती महत्त्वाचे आहे, हे उलगडते.

पहिले सूत्र ‘दीर्घ लेखमाला टाळा’ याची दोन वेगवेगळी उदाहरणे आठवली. श्री.बागल यांनी एक अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण लेखमालिकेतील चीनमधील माओंपासून शी पिंग यांच्यापर्यंत राजकारणात काय काय, कसकसे व काय कारणाने बदल होत गेले याची सविस्तर पण संक्षिप्त चर्चा केली. चीनचा भूगोल, त्यातील वेगवेगळ्या प्रांतांचे लोकेशन, त्यांचे केंद्रीय सत्तेतील वजन, तेथील नेतृत्व व अशा सर्व नेत्यांचे परस्परसंबंध व स्पर्धा हे भारतीय वाचकांशी आजवर अपरिचित राहिले असल्याने किती वाचकांचे इंटरेस्ट टिकून राहिले, अशी शंका मनात आली. त्यामुळे श्री.बागल यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीबद्दल पूर्ण आदर राखून असे म्हणावेसे वाटते की, कदाचित माओंपासून आजपर्यंत ज्यांनी पक्षाचे नेतृत्व भूषविले, त्यातील प्रत्येकाबद्दल एक-एक लेख लिहिला असता तर जास्त योग्य झाले असते.

गांधीजींबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाल्याने पाश्चात्त्य उच्चवर्णीय विदुषी इथे कशा आल्या, ही संजीवनी खेर यांची काहीशी माहितीपूर्ण लेखमालिका बऱ्याच दिवस चालत राहिली. यामधील अनेक जणी गांधीजींची पूर्वपरवानगी घेऊन व गांधींनी नकार देऊनही इथे येऊन धडकल्या, असे जरी असले तरी या सर्व जणींबद्दलच्या कथा समानच आहेत याचा पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावा लागला. ह्यापेक्षा एक-दोन जणींची पूर्ण कहाणी व इतर जणींचा नामोल्लेख जरी केला असता तरी पुरेसे झाले असते। त्यानंतरच्या लेखिकेचा अंतिम लेख मात्र जरूरी होता.

पण एक लेखमाला बरीच लांबूनही माझ्याप्रमाणे इतर अनेक वाचकांना आवडली, असे मी समजतो. डॅनियल मस्कारणीस यांनी अतिशय मोकळ्या व खेळकर शैलीमध्ये वसईमधील मराठी भाषक ख्रिश्चन समाजामधील वैचारिक घुसळण उत्तम रंगवली होती, हेही आठवले.

असो, पंचसूत्रीतील पहिल्या मुद्यावरील लेखन बरेच लांबले. इतर मुद्यांवरही काही लिहिण्यासारखे उरले आहे असे वाटते. पण त्यासाठी पुन्हा वेगळा प्रतिसाद लिहावा लागेल. साधनाची मागील काही वर्षांत योग्य दिशेने झालेली प्रगती याबद्दल लिहायची इच्छा आहे.

रमेश आगाशे, सातारा
----
दुसऱ्यांदा वाचताना फार पटून गेलेला विचार अधोरेखित करते...

मी साधना साप्ताहिकाची वर्गणीदार झाले ते किती हितावह ठरले याचा प्रत्यय साधनाच्या प्रत्येक अंकामुळे वारंवार येतो. महामारीच्या काळातले ऑनलाईन पाठविलेले अंक मला मिळू शकले नाहीत, परंतु माझ्या असहायतेला प्रतिसाद देत साधनाने एप्रिल ते जुलै 2020 मधले सगळे अंक पाठवून दिले.

प्रत्येक अंकातील आवडलेले, मनन करायला लावणारे लेख मी पुन्हा वाचते. पहिल्या वाचनाचा प्रतिसाद मिळतो ‘व्वा!’, दुसऱ्यांदा वाचताना फार पटून गेलेले विचार अधोरेखित करते. तिसऱ्यांदा वाचते ते माझ्या लेखनात त्या विविध ठिकाणी, विविध अंगांनी उपयोग करता येतो म्हणून.

माझ्या सवयीप्रमाणे मला आवडलेले लेख इतरांनी वाचावेत म्हणून धडपडत (खास करून कोरोना काळात) अंक पाठवीत असते, समविचारी मित्रमैत्रिणींना वाचायला सांगते. इतरांना खूप महत्त्वाची खूप कामं असतात. मला दहाही दिशांनी मिळणारी माहिती संपुष्टात ठेवण्याखेरीज दुसरे कामच नसते. व्यासंगपूर्ण लेखनाला मी हमखास प्रतिसाद देते. त्यामुळे साधनात लिहिणाऱ्या अनेकांशी मी दूरध्वनीवरून संपर्क साधू शकले. हे सर्व लेखक साहित्यिक म्हणून माझ्यापेक्षा किती तरी ज्येष्ठ असूनही माझ्या प्रतिसादाने त्यांना झालेला आनंद निर्भेळ होता, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

लेखक आणि वाचकाला समृद्ध करणाऱ्या साधनाचे आभार मानावे तेवढे थोडेच.

शैला राव, गोवा
----
आपण असे का वागतो?

साधनामधील (9 जानेवारी 2021) हिंदी कवी मंगेश डबराल यांची स्मृती जागविणारा लेख वाचला. इतर भाषांतील प्रामुख्याने हिंदी भाषेतील कवींचे मोठेपण सांगत त्यांचे गारूड माराठी मनावर बसविण्याचा उपक्रम सध्या साधनापासून प.वा.पर्यंत सर्वत्र सुरू आहे.

आंतरभारती हवीच, पण त्यात आपल्या श्रेष्ठ कवींना आपण अगदी सहजपणे स्मृतीतून हद्दपार करण्यात यशस्वी होतो. लोककवी मनमोहन, ना.घ.देशपांडे आणि खरे तर भा.रा.तांबे यांच्याबद्दल आपण हे केलंय. आणि गुलजार आणि बच्चन हे महाकवी आहेत, हे आपण छानपणे मराठी मनावर कोरलंय. डबराल यांच्यावर साधनात लेख आला. तुलसी परब, गुरुनाथ धुरी, राजा ढाले यांची साधी नोंदही आपण त्या वेळी आणि आजही का घेत नाही? मराठी ही हिंदीची बोलीभाषा आहे, हे आपणच मराठी जनमानसावर नकळत बिंबवतोय का?

दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके