डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • अन्याय असा गोंडस बनतो
  • अस्थानी कौतुक
  • अपेक्षाभंग!
  • मुस्लिम स्त्रियांची मुक्ती

अन्याय असा गोंडस बनतो 

मग केव्हा तरी याचीसुद्धा जाणीव होते. कुणी तरी झोपडीवालाच उठतो. हलचल माजवण्याचा प्रयत्न करतो. पण असं होण्यानं सत्ताधाऱ्यांचा, भांडवलदारांचा तोटा ते मग त्यांच्यासाठी दलित साहित्य, देखण्या सवलती औषधांचा उपयोग करतात.

आणि हे रामबाण ठरतं. कारण स्वतःला दलित म्हणवणाऱ्या या मागासवर्गाला कसं खेळवावं हे या पुढारल्या वर्गाला चांगलं माहीत असतं. थोडक्यात अन्यायाविरुद्ध दाद मागणारा तो झोपडीवाला स्वत:च त्याचा समर्थक बनतो. अन्याय असा गोंडस बनतो. 
- राजा शिरगुप्पे. 

अस्थानी कौतुक 

22 जुलैच्या अंकातील शरद पवारांवर आपण जी स्तुतिसुमने उधळली आहेत ती वाचून सखेद आश्चर्य वाटले.

तुम्ही म्हणता की त्यांनी असामान्य धैर्य दाखवून काँग्रेस नेत्यांची इतराजी पत्करली व नव्या सरकारचे नेतृत्व स्वीकारले. तथाकथित असामान्य धैर्य पवारांजवळ असते व स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यांची त्यांना कळकळ असती तर त्यांनी इंदिराजींची इतराजी पत्करून आणीबाणीत एकाधिकारशाहीशी लढा दिला असता.

स्वजनांशी लढणे बिकट असते व ममत्व अनेकदा सिद्धांतावर मात करते असे तुम्ही म्हणता. पवारांच्याबाबत सत्ताकांक्षा ही ममत्व व सिद्धांतावर मात करते एवढेच सिद्ध होते, अन्यथा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला नसता.

- त्यांच्या तथाकथित धैर्याच्या मागे यशवंतरावांचे आशीर्वाद आहेत हे निर्विवाद. 
- त्यापुढे एकाधिकारशाहीशीस लढा देणारे असे त्यांचे मुल्यमापन आपण दुरान्वयाने करता. एकाधिकारशाहीशी लढणारे व एकाधिकारशाहीचे लांगुलचालन करणारे यांच्यातील लक्ष्मणरेषा एकदाच ओढावयाची वेळ आली आहे. माझ्या मते जगजीवन रामाच्या कांग्रेस त्यागानंतर एक दोन दिवसांतील काळ ही सर्वात 'लिबरल' लक्ष्मणरेषा होऊ शकते. त्या दिवसानंतर इंदिराजींच्या विरोधातील लढवय्ये व बाकीचे भेकड हे ढोबळ मूल्यमापन व्हावे.

साने गुरुजींचा वारसा सांगणाऱ्या आणि आणीबाणीत एकाधिकारशाहीस धैर्याने तोंड देणाऱ्या साधनासारख्या नियतकालिकाकडून अशी भूमिका अपेक्षित नव्हती.
- चंद्रशेखर देशपांडे, मुंबई.

अपेक्षाभंग! 

साधनेचा 22 जुलैच्या अंकावर नवे मुख्यमंत्री शरद पवार यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ना. पवार यांनी काँग्रेस पक्षातून फुटून केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेने जनता पक्षाशी संगनमत केले. ही गोष्ट निखळ स्वच्छ आहे. परंतु या बंडखोरीमुळे जनता पक्ष गादीवर स्थानापन्न होत आहे, या खुशीने सुखावून साधनेने शुभेच्छा व्यक्त करताना, “नवे युवा नेतृत्व, ममत्वची सिद्धांतावर मात, स्वजनाची लक्षणे बिकट, हितसंबंधावर पाणी सोडून लोकशाही सुदृढ, परिशुद्ध व प्रगल्भ करण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता यांच्या पायावर देशाची पुनर्रचना." अशी भलावण केली आहे. 

कोणत्या हितसंबंधावर ना. पवारांनी उदक सोडले नकळे. केवळ शब्दांची उधळमाधळ करून राजकीय मतलब गोंडस रूपाने मांडण्याचा साधनेचा प्रयत्न निश्चित प्रशंसनीय नाही. साधनेने समाजकारण करणे प्रामुख्याने अपेक्षित आहे. शुभेच्छेमध्ये अंत्योदयाच्या दृष्टीने नव्या सरकारकडून आशा व्यक्त केली, हे रास्त व सुसंगत आहे. परंतु राजकारणी मंडळी जशी हिरीरीने स्वतःच्या प्रचाराच्या दृष्टीने सावधान, आग्रही असतात व भल्याबुऱ्याचा विधिनिषेध बाळगीत नाहीत, तशी वृत्ती साधनेने तरी अंगी बाणवू नये. 
- यशवंत नारायण भोसले, पुणे. 

मुस्लिम स्त्रियांची मुक्ती 

22 जुलैच्या अंकातील डॉ. साविरा वेग यांचा लेख वाचला. मुस्लिम बांधवामध्ये वैषयिक वासना जास्त असतात हे त्यांचे म्हणणे एकतर्फी वाटते. वैषयिक वासना धर्म किंवा जात थोडीच जाणते? वासनातृप्तीचे बहु-पत्नित्व हे एक साधन मुस्लिम समाजात उपलब्ध आहे असे फार तर म्हणता येईल. इतर धर्मातल्या पुण्यात वैषयिक वासना कमी असती तर जगातला सर्वात जुना व्यवसाय इतका फोफावताना.

लेखात उल्लेख केलेली बहिण-भावाच्या आणि पिता-पुत्रीच्या संबंधांची उदाहरणे इतर धर्माच्या लोकांतदेखील अनेक दाखवता येतील. तेव्हा निव्वळ मुस्लिम बांधवांना याबाबतीत वेगळे काढून त्यांच्यावर हल्ला करणे अन्यायाचे ठरेल.

मुल्लामौलवीच्या पकडीतून सुटून राष्ट्रीय प्रवाहात मुस्लिम समाजाने सामील झाल्याशिवाय मुस्लिम पुरुषांची आणि स्त्रियांची देखील उन्नती होणे अवघड वाटते. यासाठी मुस्लिमांनी आधुनिकीकरणाचा स्वीकार करणेच त्यांचा अंतिम हिताचे ठरणार आहे. तुर्केस्तान, फार काय शेजारच्या पाकिस्तानमध्ये देखील द्विभार्याप्रतिबंधक कायदा असताना भारतातल्या मुसलमानांचा मात्र त्याला विरोध असावा ही आश्चर्याचीच गोष्ट नाही काय?

हिंदू धर्मात झालेल्या समाजसुधारकांच्या संस्थेच्या मानाने मुस्लिम समाजसुधारकांची समस्या आणि त्यांचा एकंदर मुस्लिम समाजावर झालेला परिणाम जवळजवळ नगण्य वाटतो. एकटे हमीद दलवाई सोडले तर दुसरे नावदेखील आठवायला डोके खाजवावे लागेल.

लेखात दिलेली उदाहरणे खरोखरच हृदयस्पर्शी आहेत परंतु एकंदर मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनात मूलभूत परिवर्तन झाल्याशिवाय अशा गोष्टींना आळा बसणे अवघड आहे. त्या दृष्टीने मुस्लिम स्त्रियांच्या मुक्तीच्या प्रश्नाकडे एक मुस्लिम समाजसुधारणोचा भाग म्हणूनच पाहिले पाहिजे.
- विलास करवीर, डोंबिवली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके