डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हा विशेषांक तयार करताना आमच्या डोळ्यासमोर जो वाचक वर्ग होता, तो सर्वसाधारणपणे मराठी नियतकालिकांचा, सुशिक्षित, काहीसे वैचारिक लिखाण वाचण्याची इच्छा व आवड असणारा असा होता. दुर्दैवाने यापैकी बहुसंख्य वर्ग हा ‘सिने-साक्षर’ नाही.  मी गेल्या दहा वर्षांपासून सत्यजित राय यांच्या चित्रपटांवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत, आकाशवाणीवर मुलाखती दिल्या आहेत, दोन पुस्तके व सुमारे पंचवीस लेख लिहिले आहेत. यासंदर्भात अनेक वाचकांशी माझा जो संबंध आला त्या अनुभवावरून वरील विधान मी करतो आहे. राय यांच्याबद्दल ‘अपु त्रिवेणी’ किंवा ‘स्पेशल ऑस्कर’ वगैरे सोडल्यास बहुतेकांना काहीच माहिती नाही.

कोलाज आर्ट, कम्पोझिट आर्ट, परफॉर्मिंग आर्ट : हे तीनही शब्द चुकीचे...

महाराष्ट्रात फक्त साधनालाच सत्यजित राय जन्मशताब्दीची दखल घ्यावी असे वाटले. हे अभिमानास्पद आहे. मुखपृष्ठावरील छायाचित्र उत्कृष्ट आहे. पण ‘अपरिचित सत्यजित राय’ यातले अपरिचित हे विशेषण योग्य नाही, असे वाटते. बंगालचे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र राय यांना भेटायला सत्यजित गेले तेव्हा डॉ.राय यांना बिभूती भूषण आणि त्यांची ‘पथेर पांचाली’ ही कांदबरी पूर्णतः अपरिचित होती. याचे सत्यजित यांना आश्चर्य वाटले. व्यक्तीला रस असेल त्याप्रमाणे त्याला माहिती होत जाते. तेव्हा ‘अपरिचित’ हे विशेषण खटकले. यापेक्षा पाडळकर यांच्या येऊ घातलेल्या पुस्तकाचे नाव ‘एक उंच माणूस’ हे अधिक समर्पक वाटले असते.

सगळा अंक चाळल्यावर एका प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. ते म्हणजे ‘पथेर पांचालीने भारतीय सिनेमात नवचैतन्य आणले असे श्याम बेनेगल म्हणतात, पथेर पांचालीने भारतीय सिनेमात क्रांती केली असे अदूर म्हणतो,’ ते कोणते नवचैतन्य व ती कोणती क्रांती याचे उत्तर सापडले नाही.

‘पाहिलेच पाहिजेत असे राय यांचे 10 चित्रपट’, यातील 10 चित्रपटांची निवड अपूर्ण वाटली. कारण वर्तमान बंगालचे चित्रण करताना राय यांनी ‘अपू ट्रिलॉजी’प्रमाणे ‘कलकत्ता ट्रिलॉजी’ म्हणजे प्रतिद्वंदी, सीमाबद्ध आणि जनअरण्य असे तीन चित्रपट निर्माण केले होते. त्यातला एकही चित्रपट विशेषतः ‘जनअरण्य’ त्या 10 मध्ये नाही, हे पाहून आश्चर्य वाटले.

टागोरांचा भद्रलोक बंगाल आणि 70 नंतर झालेल्या अभद्र लोक बंगाली यांचा वेध सत्यजितनी ‘अरण्येर दिनरात्री’ पाहून घ्यायला सुरुवात केली. याचाही उल्लेख अरण्येर दिनरात्रीच्या परिचयात नाही. किंवा बिभूती भूषणांच्या दोन कादंबऱ्यावर तीन चित्रपट काढताना, मध्ययुगीन सरंजामशाही मूल्यव्यवस्थेकडून समाज हळूहळू कसा यंत्रयुगाकडे गेला, याचे चित्रण हे मूळ कांदबऱ्यांचे सिनेमासाठी राय यांनी केलेले इंटरप्रिटेशन याचाही उल्लेख नाही. या अंकाच्या संपादकीयांत सिनेमाला ‘कोलाज आर्ट’ म्हटले आहे. लक्ष्मीकांत देशमुख हे सिनेमाला कॅम्पोझिट आर्ट असे म्हणायचे. हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत. सिनेमा ही विज्ञानाने दिलेली आणि माणसाने आपल्या प्रतिभेने निर्मिलेली एक स्वतंत्र कला आहे.

सत्यजित राय आपल्या ‘अवर फिल्मस देअर फिल्मस’ या पुस्तकांत (नेमके हेच पुस्तक अंकातील संदर्भ ग्रंथाच्या यादीत नाही) लिहून गेले आहेत. "It also combines
the cold logic of science with the sutlest abstractions of human imagination'  राय यानीही सिनेमाला कोलाज आर्ट म्हटलेले नाही. अनेक लोक सिनेमाला ‘परफॉर्मिंग आर्ट’ समजतात, तेही चुकीचे आहे. सिनेमा ही यंत्राधिष्ठित दृश्यकला आहे. तिचे सौदर्यशास्त्र विसाव्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षात विकसित झाले. असे आणखी बरेच काही लिहिता येईल. सत्यजित राय जन्मशताब्दीची दखल घेतल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद.

सुधीर नांदगांवकर, माजिवडे, ठाणे (प).

----

अपु त्रिवेणी व स्पेशल ऑस्कर एवढेच बहुतेकांना माहीत आहे...

सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साधनाने प्रकाशित केलेल्या ‘अपरिचित सत्यजित राय’ या 1 मेच्या विशेषांकासंदर्भात श्री. सुधीर नांदगावकर याचे प्रस्तुत अंकात प्रसिद्धीसाठी आलेले व श्रीमती सुषमा दातार यांचे मागील अंकात प्रसिद्ध झालेले, अशी दोन्ही पत्रे वाचली. या दोन्ही व्यक्ती चित्रपट अभ्यासक व फिल्म सोसायटी चळवळीशी निगडित आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे या अंकाचा लेखक म्हणून काही गोष्टींचा खुलासा करणे मला आवश्यक वाटते.

 श्री.नांदगावकर यांनी ‘महाराष्ट्रात फक्त ‘साधना’लाच सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीची दखल घ्यावी असे वाटले हे अभिमानास्पद आहे’ असे नमूद केले आहे. हे वैशिष्ट्य त्यांनी नोंदविले याबद्दल आभार. राय यांच्या जन्मशताब्दीची दखल इतरत्र जवळजवळ घेतलीच गेली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट. सुषमा दातार यांनी मात्र अंकाच्या कोणत्याच चांगल्या वैशिष्ट्यांची नोंद न घेता, केवळ त्यांच्या दृष्टीने ज्या त्रुटी आहेत त्याच नोंदवल्या आहेत.

आता विशेषांकाच्या नावाबद्दल- ‘अपरिचित सत्यजित राय’ या नावातील ‘अपरिचित’ या शब्दावर पत्रलेखकद्वयांचा आक्षेप आहे. ‘अपरिचित’ हा subjective /व्यक्तीनिष्ठ शब्द आहे. एकाला जे परिचित वाटते ते अनेकांना अपरिचित असू शकते. या अंकासंबंधी जी अनेक पत्रे, फोन वा मेसेजेस आले त्यांत ‘आम्हाला हे माहीत नव्हते’ असाच एकंदर सूर आहे. 

हा विशेषांक तयार करताना आमच्या डोळ्यासमोर जो वाचक वर्ग होता, तो सर्वसाधारणपणे मराठी नियतकालिकांचा, सुशिक्षित, काहीसे वैचारिक लिखाण वाचण्याची इच्छा व आवड असणारा असा होता. दुर्दैवाने यापैकी बहुसंख्य वर्ग हा ‘सिने-साक्षर’ नाही.  मी गेल्या दहा वर्षांपासून सत्यजित राय यांच्या चित्रपटांवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत, आकाशवाणीवर मुलाखती दिल्या आहेत, दोन पुस्तके व सुमारे पंचवीस लेख लिहिले आहेत. यासंदर्भात अनेक वाचकांशी माझा जो संबंध आला त्या अनुभवावरून वरील विधान मी करतो आहे. राय यांच्याबद्दल ‘अपु त्रिवेणी’ किंवा ‘स्पेशल ऑस्कर’ वगैरे सोडल्यास बहुतेकांना काहीच माहिती नाही. हा अंक या बहुसंख्यांकासाठी आहे. या वर्गाच्या मनात राय यांच्याबद्दल जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांनी अधिक काही वाचावे व पाहावे हा उद्देश या प्रकल्पामागे होता. तो यशस्वीही झाला आहे, हे वाचकांच्या प्रतिसादावरून ध्यानात येते.  नांदगावकर व दातार हे फिल्म अभ्यासक असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी ‘अपरिचित’ न वाटणे स्वाभाविक आहे. तरी वादापुरते किंवा वाद टाळण्यासाठी मान्य करू की, हे नाव पुरेसे समर्पक नाही. ‘नावात काय आहे’ असे शेक्सपिअर म्हणून गेला आहेच. माझ्या आगामी पुस्तकाचे नाव नांदगावकर यांना समर्पक वाटले याचा आनंद आहे.

दुसरा मुद्दा दहा सिनेमांच्या निवडीबद्दलचा. अशी यादी करताना ती सर्वमान्य होणे, हे केवळ अशक्य आहे. कारण प्रत्येकाच्या यादीमागे काही वेगळी कारणमीमांसा असते, ती करणाऱ्याचे स्वभाववैशिष्ट्यही त्या यादीत प्रतिबिंबित होते. ‘जन आरण्य’ हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे, हे मला मान्य आहे. प्राथमिक फेरीत तो माझ्यासमोर होताही. पण तो घेतला तर कोणता तरी एक गाळावा लागला असता, त्याला माझी तयारी नव्हती. 10 चित्रपटांच्या ‘परिचयाबद्दल’. मुळात, जागेअभावी, विसेक ओळीत एका महान कलाकृतीचा परिचय देताना अनेक गोष्टी गाळल्या जातातच. तरी साधनाच्या संपादकांनी त्यांच्या नेहमीच्या अंकाच्या 44 पृष्ठांऐवजी वाढवत वाढवत मला 64 पृष्ठे दिली. या साऱ्या आणि आणखीही अनेक गोष्टी वाचकांना माझ्या आगामी पुस्तकात वाचावयास मिळतील.

सुषमा दातार यांच्या एका वाक्याबाबत मात्र माझा गंभीर आक्षेप आहे. त्या लिहितात, ‘परंतु इंटरनेटवरची एखादी माहिती देणारी साईट उघडल्यावर राय यांच्याबद्दल येतं त्याव्यतिरिक्त फार काही हाती या अंकातून लागत नाही.’

या अंकातील माहिती एवढी सहजसाध्य नाही. इंटरनेटवरील 100 साईटस्‌ उघडल्या तरी यात आहे त्यापैकी बरीच माहिती मिळणार नाही. काही अत्यंत दुर्मिळ पुस्तकांतून मी ती मिळविली आहे. असो. पत्रांबद्दल दोघांचेही आभार.

विजय पाडळकर, पुणे

----

सत्यजित राय समजून घ्यायला मदत झाली...

‘अपरिचित सत्यजित राय’ हा विजय पाडळकर यांनी लिहिलेला व संपादित केलेला 1 मेचा साधनाचा विशेषांक संपूर्ण वाचून काढला. पाडळकर यांनी चित्रपटांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे. त्यांनी सत्यजित राय यांच्या 10 महत्त्वाच्या चित्रपटांची थोडक्यात पण छान ओळख करून दिली आहे. राय यांनी केलेल्या पाच वृत्तचित्रपटांची निर्मितीही वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी आहे. ‘कांचनजंघा’ आणि ‘पथेर पांचाली’ ह्या दोन चित्रपटांवरील लेख त्या चित्रपटांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहेत. उंच माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या लेखात सत्यजित राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि स्वभावविशेषांचे लोभस दर्शन घडते. चित्रपटनिर्मितीच्या आधी त्याचे ‘स्केच बुक’ तयार करणारे सत्यजित राय हे चित्रपटांनी किती झपाटलेले होते, याची प्रचिती येते. राय यांचा धर्मविचार आणि सामाजिक बांधिलकी याविषयी पाडळकर यांनी नेमकेपणाने भाष्य केले आहे. सात परिशिष्टांमुळे सदर अंकाचे संशोधनमूल्य वाढले आहे. ह्या अंकामुळे सत्यजित राय हे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला खूप मदत झाली. एका वेगळ्या विषयावरील सर्वांगसुंदर विशेषांक वाचकांच्या हाती दिल्याबद्दल संपादक विजय पाडळकर आणि साधनाचे अभिनंदन आणि आभार!

सुरेश सावंत, नांदेड

----

ते विधान पुन्हा पुन्हा अरण्यरुदन ठरणार!

दि.29 मे 2021 चा ‘साधना’चा अंक मिळाला. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम संपादकीय (केशवरावांची सहावी मुलाखत) वाचून स्वतःला ढवळून काढले. मानवी विचार-व्यवहारात असे क्वचितच घडते की, एखाद्याचे विचार दुसऱ्या व्यक्तीलाही अगदी तंतोतंत  पटतात/भावतात. या संपादकीय व त्यातील विचार मला शंभर टक्के तंतोतंत पटले. नोकरी व शिक्षण यांतील आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण यासोबतच अध्याहृत असलेले आर्थिक मागासलेपणसुद्धा संविधानसंमत आहे, हे त्यातील विश्लेषण अगदी रास्तच आहे. आणि हे तीन घटक वेगवेगळे करून अंमलबजावणीत आणतो म्हटले तर मात्र ते संविधानसंमत ठरत नाही, उलट त्यामुळे समस्यांची श्रृंखलाच सुरू होते, हेसुद्धा योग्य विश्लेषण आहे. म्हणूनच क्रिमिलेयरची तरतूद आता सर्व आरक्षणयोग्य व आरक्षणप्राप्त प्रवर्गांसाठी लागू करणे क्रमप्राप्तच ठरेल; हे निदानही संविधानातील तरतुदीच्या मूलभूत संकल्पनेशी सुसंगतच ठरते. ते विचार आपल्या रॅशनल विचारविश्वानुसार योग्य असले तरी रॅशनॅलिटीशी काडीमोड घेणाऱ्यांना व/वा छद्म रॅशनॅलिस्टांना अडचणीचेच ठरणार हीसुद्धा दुर्दैवाने कटू वस्तुस्थिती (Bitter Reality)  आहे.

या मला पटलेल्या/भावलेल्या विचारांना एक स्वानुभवाची पुस्ती जोडू इच्छितो. ती अशी, की नोकरी व शिक्षणातील संविधानसंमत आरक्षणापैकी नोकरीतील आरक्षण हे फक्त सरळ पदभरतीपुरतेच असावे, पदोन्नतीतील असे सरसकट आरक्षण मूळ संविधानाशी सुसंगत नाही. नोकरीच्या पदश्रेणीतील वर्ग अ, ब, क, ड यांपैकी ज्या श्रेणीत ज्या आरक्षित प्रवर्गाचा अनुशेष असेल त्या त्या आरक्षित प्रवर्गातील सुयोग्य व्यक्तींची, सेवेच्या त्या त्या (अ, ब, क, ड) श्रेणीत, सरळ पद्धतीने आरक्षणाधारित पदभरती करण्यात येऊन तो अनुशेष अनिवार्यपणे भरण्यात यावा. परंतु सेवेतील सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नतीच्या पदांमध्ये सरसकट आरक्षण हे एकूणच प्रशासन व्यवस्थेसाठी बहुतेक वेळा धोकादायक ठरून प्रशासकीय यंत्रणा कमकुवत होऊ लागते. (याला काही अपवाद अवश्य आहेत/असतील, पण अपवाद हा स्वतः नियम नसून, विपरीत नियमाचा तो फक्त एखादा अपवादच असतो ही वैज्ञानिक संकल्पना डावलता येत नाही!)

ही (Bitter Reality)  स्वीकारणे बहुतेकांना जड जाऊ शकते, त्यामुळे आपल्या संपादकीयातील पुढील विधान पुन:पुन्हा अरण्यरुदनच ठरण्याची शक्यता उद्‌भवत आहे. ‘‘रॅशनॅलिटी ही नेहमी सावधच असते, म्हणून कदाचित इतरांना ती गोंधळलेली वाटते. आमची अशी पक्की धारणा आहे, की आरक्षणाचे धोरण योग्य प्रकारे म्हणजे मूळ संकल्पनेनुसार राबवले तर आधी त्या-त्या जातिसमूहांना फायदेशीर ठरते, नंतर आरक्षण नसलेल्या जातिसमूहांना फायदेशीर ठरते आणि अंतिमतः संपूर्ण देशाला फायदेशीर ठरते. आणखी पुढे सांगायचे, तर आरक्षण हे जातीयवाद कमी करण्यास व देशाला एकसंध करण्यास खूपच उपयुक्त ठरते.’’

लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया.

----

‘आम्ही’ आणि ‘ते’ ही भाषा अलगता राखणारी होती...

15 मेच्या अंकातील संपादकीय (भाजपच्या विस्तारवादाचे भय?) मधील शेवटचा परिच्छेद वाचला, त्याबाबत असहमती व्यक्त करून काही सांगावेसे वाटते-

भाजपामध्ये घराणेशाही नाही. लोकशाही पद्धतीने तो पक्ष चालतो. राष्ट्रवादी वैचारिक धारेवर हा पक्ष बांधला गेला आहे. सेक्युलॅरिझमच्या विकासासाठी या देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. तो विषय या पक्षाच्या जाहीरनाम्यातही समाविष्ट झालेला आहे. अल्पसंख्य समाजामधील अमानवी प्रथा जसे ‘ट्रिपल तलाक’ या पक्षामुळे रद्द झाला आहे. अशा प्रकारच्या इतर  प्रथा म्हणजे पॉलिगामी वगैरे रद्द करण्यास हा पक्ष प्रयत्नशील  आहे.

याउलट काँग्रेसने मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून असा प्रयत्न केलेला दिसत नाही. किंबहुना हिंदुत्वाचे पारिपत्य आणि अल्पसंख्याकांच्या धार्मिक संवेदनशीलतेची पाठराखण ही काँग्रेस राजवटीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत. त्यांचा आविष्कार स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदू-मुस्लीम संबंधांच्या संदर्भात स्पष्टपणे आढळतो. घटना समितीत चर्चा चालू असताना आचार्य कृपलानी यांनी सुचवले होते की, ‘समान नागरी कायद्याची तरतूद घटनेतच करावी’. तेव्हा मुस्लिमांच्या संदर्भात नेहरू म्हणाले, ‘‘ते त्यांचे त्यांना ठरवू दे.’’ मुसलमानांच्या बाबतीत ‘आम्ही’ आणि ‘ते’ ही भाषा मुसलमानांची अलगता अधोरेखित करणारी होती. त्यांना अलग टिकवण्यात मदत केली म्हणजे ते कृतज्ञ राहून काँग्रेस पक्षाशी बांधिलकी मानतील, हाच हिशोब त्यामागे होता. संसदीय पद्धत निश्चित झाल्यानंतर अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाला पर्याय नव्हता आणि त्याचेच प्रतिबिंब घटनेतील तरतुदीत आढळते.

किशोर मधुकर काकडे, बेळगाव.

----

एकाच देशात असे कसे असू शकते?

दि. 15 मे 2021 अंकातील  संपादकीय ‘भाजपच्या विस्तारवादाचे भय?’मधील शेवटचा परिच्छेद.  ‘सेक्युलॅरिझम विकसित होण्याची ती पूर्व अट आहे,’ हे वाक्य.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली सत्तर वर्षे इहवाद (सेक्युलॅरिझम) आणि  इहवादी राज्य (सेक्युलर स्टेट) या दोन संकल्पना भारतीय राजकारणातील परवलीचा शब्द बनल्या आहेत. त्यांच्या बरोबरीने ‘सर्वधर्म समभाव’ या आणखी एका शब्दाने ठाण मांडले आहे. तथापि सहसा असे आढळून येते की, या सर्व संकल्पनांचा वापर अतिशय संदिग्धपणे होतो आणि इहवादी राज्य म्हणजे नेमके काय तसेच इहवादी राज्यात शासनाचे धोरण काय असावे, या संबंधात एकूणच वातावरण गोंधळाचे आहे. त्यामुळे प्रत्येक जण इहवादी राज्य याचा अर्थ आपल्या समजुतीप्रमाणे किंवा राजकीय सोईप्रमाणे  लावतो. इहवादी राज्याच्या संदर्भात मतामतांचा गलबला आढळून येतो.

(इहवाद) सेक्युलॅरिझम व सेक्युलर स्टेट (इहवादी राज्य) म्हणजे नेमके काय? आपल्या देशात असलेला सेक्युलॅरिझम हा खरा आहे की खोटा? घटनेमध्ये काही त्रुटी आहेत का, ज्यामुळे सेक्युलॅरिझमला स्युडोसेक्युलॅरिझमचे स्वरूप आले आहे. उदा. महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री ‘पंढरपूरच्या विठोबाची शासनातर्फे होणारी पूजा इहवादाविरुद्ध आहे म्हणून नाकारतात’, पण तेच नेते ‘‘सरकारी निधीतून पुणे शहराच्या उपनगरात चारशे कोटी रुपये खर्चून ‘हज हाउस’ बांधून देऊ’’, असे जाहीरपणे निवेदन करतात. मग यातले नक्की सेक्युलर काय हा वाचकांना प्रश्न पडतो. दुसरे उदाहरण 42 व्या घटनादुरुस्तीने पुरवले आहे. आणीबाणीत सर्व विरोधी पक्षनेते गजाआड असताना ‘कम्युनिस्ट पक्षाच्या मदतीने’ केलेल्या या घटनादुरुस्तीने ‘भारत एक समाजवादी पंथनिरपेक्ष’ गणराज्य असा बदल करण्यात आला. तथापि घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये जम्मू-काश्मीरसाठी ज्या स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्यांत ‘समाजवादी पंथनिरपेक्ष’ हे शब्द   गाळले आहेत. याचा अर्थ काश्मीर हे ‘समाजवादी पंथनिरपेक्ष’ नसल्याचा निर्वाळा घटनेनेच दिला आहे. एकाच देशात असे कसे असू शकते?

संजय लडगे, बेळगाव

----

36 वर्षांपूर्वीची आठवण नोंदवावीशी वाटली

दि.17 एप्रिलच्या अंकातील ‘सनातन : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कादंबरी’ हा मनोहर जाधव यांचा संपादकीय जागेवरील लेख आवडला. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठतेचा ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त झाला. त्या कादंबरीचं अतिशय मार्मिक असं परिशीलन जाधव यांनी केलं आहे. नंतर 22 मे 2021 च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखतीतून त्यांचा साहित्यिक आणि वैचारिक प्रवास आला आहे. या निमित्ताने 36 वर्षांपूर्वी साधनाच्या 6 जून 1985 च्या अंकात त्यांच्या ‘अक्करमाशी’ या कादंबरीचं ‘संवेदनशील मनाला सुन्न करणारा अक्करमाशी’ हे माझं परीक्षण आल्याची आठवण नोंदवावीशी वाटली.

डॉ. अजित मगदूम, बेलापूर, नवी मुंबई.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके