डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सरकारची समस्यांची समज, जागरूकता, संवेदनशीलता व समस्यांच्या सोडवणुकीसाठी लागणारे मनोबल एखाद्या आंदोलनाची दिशा, व्याप्ती व स्वरूप ठरवीत असते. सरकार राजकीय निर्णय घेत असताना दिसत असले तरी ते आपली राजकीय ध्येय धोरणे वेळीच व स्पष्टपणे मांडताना दिसत नाहीत. अशा अस्पष्टतेमागे सरकारचे राजकीय हीतच दडलेले आहे असे जाणवते. अशी संदिग्ध परिस्थिती असल्याने राजकीय पक्ष आपल्या परीने आपल्या हितासाठी तिचा उपयोग करून घेत असतात. आज तरुण द्विधा मन:स्थितीत दिसतात याचे मोठे कारण हे आहे की, त्यांच्या समस्या व त्यांचे सरकारच्या ध्येयधोरणात न दिसणारे प्रतिबिंब हा इच्छापूर्तीचा संघर्ष टाळण्यासाठी तरुणांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.

अंतुलेंचे खरेच काही चुकले का?

अंतुले जे म्हणाले त्या मागच्या वेदना व तर्कशास्त्र लक्षात न घेता, त्यांच्यावर खूप आगपाखड झाली. साधना (17 जानेवारी) मधील रमेश दोंदे यांचे ‘अंतुले यांची हकालपट्टी न करणे म्हणजे अल्पसंख्याकांच्या  देशभक्तीबद्दल शंका घेणे!’ हे पत्र म्हणजे तर अगदी कहर झाला.

अंतुलेंचे खरेच काही चुकले का? हिंदुत्ववादी संघटना हेमंत करकरे यांच्या कामात व्यत्यय आणून त्यांना प्रचंड मातना देत होत्या. राजनाथसिंग यांनी तर जाहीरपणे ‘करकरे यांचीच नार्को टेस्ट करा’ अशी मागणी केली होती! एका हिंदुत्ववादी मान्य वरवृत्तपत्राने त्यांना ‘महात्या हेमंत करकरे’ असे संबोधून या महात्म्यांना मार्गावर आणणारे ‘क्रांतिवीर’ या देशात आहेत याची आठवण करून दिली होती. त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करणार होते, त्यांना धमकी देणारे दूरध्वनी येत होते. करकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या ‘सर्वांमुळे आपण प्रचंड मानसिक तणावाखाली आहोत’ असे सांगितले होते. आणखी एक अजिबात लक्षात न घेतलेली गोष्ट आहे, ‘हिंदू व्हॉइस’ या मासिकाने डिसेंबरच्या अंकात चौकटीत एक मजकूर छापला आहे. मजकूर असा ‘हिंदूधर्म  शास्त्राप्रमाणे माणसांना त्यांच्या वाईट कृत्यांची शिक्षा पुढील जन्या त वा याच जन्या त मिळते. प्रज्ञासिंगसारख्या वंदनीय साध्वीला त्रास दिल्या बद्दल करकरे यांना मृत्युदंड मिळाला आहे’. ‘हिंदू व्हाइस’च्या अग्रलेखात सर्व सरसंघचालकांचे वारेमाप कौतुक केलेले आहे. मी‘हिंदू व्हाइस’ वाचतो. कारण माझे प्रबोधन व्हावे म्हणून, माझ्या एका मित्राने, (जो संघाचा वरिष्ठ अधिकारी आहे) मला तो सुरू केला आहे!

ते असो. दोंदे यांनी ‘अंतुले यांनी करकरे यांच्या बरोबरच साळसकर व कामटे यांच्या मृत्युच्या चौकशीची मागणी का केली नाही’ असे विचारले आहे. त्यांनी खरे तर हा प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारावयास हवा. कारण हेमंत करकरे यांचा ‘वध’ झाल्यावर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या पत्नीला एक कोटी रुपये  देऊ केले, तसा धनादेश घेऊन ते कामटे व साळसकर यांच्या घरी का गेले नाहीत? हिंदुत्ववादी शक्ती हेमंत करकरे यांचा ‘वध’ झाला असे जरूर म्हणोत. भारतीय जनता त्यांना कायम ‘हुतात्मा हेमंत करकरे’ म्हणेल आणि एक कोटी रुपयांच्या धनादेशासकट, नरेंद्र मोदी यांना घराबाहेर काढणाऱ्या त्यांच्या वीरपत्नीला ‘प्रणाम’ करेल.

दत्तप्रसाद दाभोलकर, ‘या’, सदर बझार, सातारा.

.....................................

पळशीकरांनी मनसेवर आगपाखड न करता...

सुहास पळशीकर यांचा ‘साधना’ 17 डिसेंबर 2008 मधील लेख वाचला आणि शब्दबंबाळ झालो. बराच वेळ मी काय वाचतोय ते मलाच कळत नव्हते. हा काही त्यांचा दोष नाही. असे वाचणे माझ्या सवयीचे नाही.

त्यांच्या लेखातून मला समजलेला मुद्दा असा की, ‘आपली गाऱ्हाणी, आपले प्रश्न, आपल्या समस्या लोकशाहीमध्ये सनदशीरमार्गाने लोकांपुढे, सरकारपुढे मांडाव्यात. त्या सवडीने, सबुरीने, सलोख्याने मार्गी लावण्याचा, सोडविण्याचा प्रयास करावा. आपल्या समस्या सोडवून घेत असताना इतर प्रश्न निर्माण करू नयेत.’

हे तत्त्वज्ञान म्हणून सांगायला सोपे आहे, पण एवढ्या सहजतेने समस्यांचे निराकरण होते का? मुळात अशा समस्या ऐकल्या व समजावून घेतल्या जातात का? आंदोलने उभी राहतात ती समस्या निराकरणाच्या जाणीवेच्या अभावामुळे. पुण्यात येऊ घातलेल्या ‘डाऊ’चे उदाहरण घ्या. ‘डाऊ’ ही मागासलेल्या देशांत विषारी उत्पादने निर्माण करणारी व विकणारी कंपनी आहे. अमेरिकेत बंदी असलेल्या या कंपनीला केंद्र व राज्य सरकारने मान्यता देताना लोकजीवन व पर्यावरणाला पोषक अशा अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांचे उल्लंखन केले. परिणामी मानवी हक्क व अधिकार यांची पायमल्ली केली. सनदशीर मार्गाने जाणाऱ्या वारकरी आंदोलनाकडे दुराग्रही सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे सर्व प्रसारमाध्यमांनी या कंपनीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे डोळेझाक करून व या नेक आंदोलनाला कमी लेखून एका परीने कंपनीला व सरकारला सहाय्य केले. वेळप्रसंगी आंदोलकांचा बुद्धीभेदही केला. मग मात्र ग्रामस्थांनीं आक्रमक धोरण अवलंबून डाऊ कंपनीचे बांधकाम उद्‌ध्वस्त केले. या आंदोलनाची धग सहन न होऊन मुख्य मंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे संकेत दिले व सर्व वाकऱ्यांवरील खटले मागे घेण्याची घोषणा केली. या घडामोडींमुळे कोणता संदेश दिला गेला?

दुसरे उदाहरण बॅ.अंतुले यांचे. जनाब अंतुले विद्यमान केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री असून त्यांच्याकडे ‘अल्पसंख्यांकांचे कल्याण’ हे संवेदनशील व जबाबदारीचे खाते देण्यात आले आहे. तरीही त्यांनी लोकसभेत व बाहेर दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या करकरे यांच्या मृत्यूबद्दल संशम व्यक्त करणारे अतिशय संकुचित, बेजबाबदार व तितकेच राष्ट्रहिताला बाधक ठरणारे विधान केले. काँग्रेस पक्षाने ‘हे त्यांचे मत आहे असे सांगत आपली जबाबदारी झटकली. विरोधकांनी लोकसभेत व लोकसभेबाहेर त्यांचा तीव्रशब्दांत निषेध केला. अंतुले पाकधार्जिणे व फितुर आहेत अशी संभावनाही करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली व त्यांनी तो मानभावीपणे दिलाही. खरे तर आपल्या सहाध्यामी गृहमंत्र्याशी सल्लामसलत करून त्यांना त्यांच्या संशयाचे निराकरण करता आले असते. तसे न करता त्यांनी वादग्रस्त वक्तव्य का करावे हे एक गूढच आहे. एवढा गदारोळ झाला असतानाही ते आपल्या वक्तव्याशी ठाम राहिले. अशा या अवलक्षणी मंत्र्याला एक क्षणही मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नव्हता. दुर्दैवाने पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. लोकक्षोभापेक्षा पंतप्रधानांची अगतिकता श्रेष्ठ ठरली. या घडामोडींमुळे कोणता संदेश दिला गेला?

सरकारची समस्यांची समज, जागरूकता, संवेदनशीलता व समस्यांच्या सोडवणुकीसाठी लागणारे मनोबल एखाद्या आंदोलनाची दिशा, व्याप्ती व स्वरूप ठरवीत असते. सरकार राजकीय निर्णय घेत असताना दिसत असले तरी ते आपली राजकीय ध्येय धोरणे वेळीच व स्पष्टपणे मांडताना दिसत नाहीत. अशा अस्पष्टतेमागे सरकारचे राजकीय हीतच दडलेले आहे असे जाणवते. अशी संदिग्ध परिस्थिती असल्याने राजकीय पक्ष आपल्या परीने आपल्या हितासाठी तिचा उपयोग करून घेत असतात. आज तरुण द्विधा मन:स्थितीत दिसतात याचे मोठे कारण हे आहे की, त्यांच्या समस्या व त्यांचे सरकारच्या ध्येयधोरणात न दिसणारे प्रतिबिंब हा इच्छापूर्तीचा संघर्ष टाळण्यासाठी तरुणांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.

यापूर्वीही पत्राद्वारे मी पळशीकरांना विनंती केली होती, आजही करतो. पळशीकरांनी मनसेवर आगपाखड न करता भाषावार प्रांतरचना ही संकल्पना व ती महाराष्ट्रात अपयशी का ठरली यावर लेख लिहावा. माझ्या सारख्या वर्तमानपत्री वाचन करून एकांगी विचार करणाऱ्यांना त्याचा फायदा होईल. तसेच तरुणांचे प्रबोधन होऊन जनतेच्या निकोप संघटना बांधण्यासाठी तिचा उपयोग होईल.

शरद खेडेकर, विहार सोसायटी, खार (प.), मुंबई 52.

……………………………..

तीन गोष्टी ठरवा आणि न विसरता पाळा!

दिवाळी अंकानंतर ‘नवी उमेद नवा विश्वास’ची आशा दाखवणारा साधना साप्ताहिकाचा 22 नोव्हेंबरचा अंक व त्यानंतरचे अंक मिळाले. परंतु काही खटकणाऱ्या त्रुटींकडे आपले लक्ष वेधून घेण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.

29 नोव्हेंबरच्या अंकात डॉ.प्रकाश जोशी यांनी गणित सोपे करून दिलेली लेखमाला संपली, त्यानंतर लहान मुलांसाठीचा बाल/कुमार साधना हे सदर अदृश्य झाले आहे. नव्या वर्षात आपण हा नवा नियम केला आहे की काय?

3 जानेवारीच्या अंकात भारंभार सदरांची यादी दिलीत, पण 10 जानेवारीच्या अंकात राजकीय घटनांवर सारे लेख देऊन साधनाने अंकाचा तोल पार बिघडवून टाकला आहे. बांगलादेशी राजकारणावर आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांवर दोन दोन लेख? गोव्यात कुणाच्या ही ध्यानात न आलेल्या साधारण चित्रपट महोत्सवावर नऊ पाने? पाकिस्तानी सत्ताधीशांचा पुळका येणारा आपला समाजवाद आम्हाला तरी रूचलेला नाही. या देशाचा जन्य व दैनंदिन कारभार भारताच्या द्वेषाशिवाय घडत नाही. ती तर त्यांची कार्य प्रणाली आहे, हे आपल्याला कधी उमजणार बरे? 3 जानेवारीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर नकाशा कशासाठी दिला आहे ते कळेल काय?

नव्या वर्षाच्या संकल्पात पुढील तीन गोष्टी ठरवा आणि त्यान विसरता पाळा... प्रत्येक अंकात प्रतिसाद आणि बालकुमारसाधना, एका विषयावर एकच लेख असावा.

रमानाथ सावंत, नामगाव, मुंबई 14

…………………………………..

कुमारसाधना

स्वर्ग

रेणू गावस्कर

स्वर्ग म्हणजे काय, हे सांगण्याची मुलांमध्ये अहमहमिका लागली. विषय हळूहळू पृथ्वीवरच आपण स्वर्ग निर्माण करू शकतो का, या कल्पनेवर आला. मुलांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याची कल्पना एकदम उचलून धरली. मुलं आपापल्या स्वर्गीय कल्पना सांगू लागली.

गोष्ट सांगायची म्हटलं की मोठी गंमत येते. सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा. फक्त त्यात एक अडचण असते. जग इतकं मोठं आहे ना, की गोष्ट सांगायची ठरवली तर कोणती सांगायची हा खरा प्रश्न होऊन बसतो. पण एक मात्र नक्की. सगळ्यात छान गोष्टी असतात. सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘आजीचे घड्याळ’ या कवितेत याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘रात्रीच्या वेळी आजूबाजूला सारं कसं शांत, शांत झालं असताना, आजीच्या जवळ अगदी तिच्या कुशीत बसून भुताच्या गोष्टी ऐकण्याची मजा काही न्यारीच आहे. भूताची गोष्ट ऐकताना जरा कुठं खुट्ट झालं की, आजीच्या पदराखाली डोकं लपवलं की, भीती कुठल्या कुठे पळून जाते.’’

आचार्य अत्रे यांनी मुलांसाठी खूप छान छान गोष्टी लिहिल्या. अगदी अप्रतिम. आमच्या लहानपणी, म्हणजे चाळीसेक वर्षांपूर्वी ‘नवयुग वाचनमाला’ नावाची क्रमिक अभ्यासाची पुस्तकं होती. त्या पुस्तकात इतक्या मस्त गोष्टी असायच्या की,  दुसरं पुस्तक वाचावंसंच वाटत नसे. त्या पुस्तकातल्या ‘दिनूचे बील’, ‘चांदोबाचा अंगरखा’ अशा कितीतरी गोष्टी आजसुद्धा मनाला आनंद देतात. अजूनही पुस्तकांच्या दुकानात गेले की, हटकून नवयुग वाचनमाला मागावीशी वाटते आणि ती नाही मिळाली की, निराश वाटतं.

पुढे मोठी होता होता खूप गोष्टी वाचल्या. त्या वाचत असताना लक्षात आलं की, गोष्टी नुसत्या वाचून नाही चालणार. त्या ऐकल्या पाहिजेत आणि सांगितल्या सुद्धा पाहिजेत. आपल्या एकूण पुराणग्रंथात मी वाचलं की, एका राजपुत्राला गोष्टी ऐकण्याचा फार म्हणजे फारच नाद होता. तो आपला सारख्या गोष्टी ऐकायचा. पण त्याच गोष्टी सांगण्याच्या बाबतीत मात्र महाकंजूष होता तो. त्यानं इतरांना गोष्टी न सांगितल्या नं त्या गोष्टी राहिल्या त्याच्या पोटात. त्यामुळे त्या पाच गोष्टी रागावल्या. रात्री राजपुत्राला गाढझोप लागली असता त्याच्या उघड्या तोंडाचा फायदा घेऊन झाडावर जाऊन बसल्या आणि राजपुत्राला काय शिक्षा करावी याचा विचार करू लागल्या. सुदैवाने राजपुत्रालावेळीच जाग आली. त्यानं गोष्टींची क्षमा मागितली आणि सर्वांना गोष्ट सांगायला सुरुवात केली. पूर्वी तर म्हणे गोष्टी ऐकून माणसांची दुखणी बरी व्हायची. एका राजाला पोटदुखीचा आजार होता. राजा रोज गोष्टी ऐकायला लागला आणि त्याची पोटदुखी पार पळून गेली.

तर अशा या गोष्टी. वेगवेगळ्या  देशांच्या, भाषांच्या,  प्रकारांच्या दरवेळी मी तुम्हाला एकवेगळी गोष्ट सांगणार आहे. पण हीच मला एका मुलानं एक अशी काही गोष्ट सांगितली की, ज्याचं नाव ते!

झालं असं की पाचगणीतल्या एका शाळेत एक नाही, दोन नाही, चांगली 120 आदिवासी मुलं राहतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतून ती तिथं आली आहेत. त्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला मी नेहमी जाते तिथं. त्यांना गोष्टी सांगते, त्यांच्याशी गप्पा मारते, ती मला गोष्टी सांगतात.

एकदा अशाच गप्पा मारताना अचानक स्वर्गाचा विषय निघाला. स्वर्ग म्हणजे काय,  हे सांगण्याची मुलांमध्ये अहमहमिका लागली. विषय हळूहळू पृथ्वीवरच आपण स्वर्ग निर्माण करू शकतो का, या कल्पनेवर आला. मुलांनी पृथ्वीवरस्वर्ग निर्माण करण्याची कल्पना एकदम उचलून धरली. मुलं आपापल्या स्वर्गीय कल्पना सांगू लागली. मध्येच एकदम शिवानावाचा मुलगा उठला. म्हणाला, ‘माझा स्वर्ग कसा आहे ते सांगतो.’ शिवानं आपली स्वर्गाची कल्पना गोष्टीरूपानं आम्हाला सांगितली. तो म्हणाला, ‘एकदा माझा भाऊ आणि मी सायकलवरून आमच्या गावाकडे निघालो होतो. मी मागच्या सीटवर होतो. अचानक आम्हाला रस्त्याच्या कडेला बसलेले एक आजोबा दिसले. बसचे पैसे नसल्यानं ते तसेच रस्त्याच्या कडेला बसून होते. आम्ही त्यांची चौकशी केली. सगळी परिस्थिती कळल्यावर आम्हाला खूप वाईट वाटलं. मी सायकलवरून खाली उतरलो. आजोबांना नीट सायकलवर बसवलं. माझ्या भावानं त्यांना सांभाळत हळूहळू सायकल पुढं न्यायला सुरुवात केली. मी पायीच गावची वाट पार केली. गाव चांगलं आठ-दहा मैल दूर होतं. पण मला त्याचं काहीच वाटलं नाही. माझा भाऊही सायकलवर चढून बसला नाही. आजोबांना बसवून त्यानं सायकल चालवत आणली. आजोबा आरामात आपल्या गावी पोचले, याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला. तोच आमचा स्वर्ग.’’

शिवाची ही गोष्ट मी ऐकली, त्याला चांगला पंधरवडा उलटून गेला. पण माझ्या मनात शिवाच्या स्वर्गाची गोष्ट अगदी पक्की बसली. लिहायला बसले आणि शिवाची ‘माझा स्वर्ग’ हीच गोष्ट आठवली. वाटलं, या आदिवासी गोष्टीनंच आपल्या या ‘कथामालेची’ सुरुवात करूया. शिवाय शिवाची ही पहिली गोष्ट, मुलांना नेहमी निरनिराळ्या गोष्टी सांगणाऱ्या साने गुरुजींना अर्पण करूया, असंही वाटलं. कारण गुरुजींना शिवाची गोष्ट तर आवडली असतीच, पण शिवाही आवडला असता.

रेणू गावस्कर,
7 इंदिरा अपार्टमेंट, चिंतामणीनगर,
सहकारनगर, नं. 2, पुणे 411009.
भ्रमणध्वनी : 9850894504

Tags: renu gavaskar dattaprasad dabholkar suhas palshikar sadhana vachak vachak readers letters weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके