डिजिटल अर्काईव्ह

प्रतिसाद (31 ऑक्टोबर 2020)

आजच्या माध्यमजगताचे दर्पणाचे कार्य-कर्तव्य हे अंतर्वक्र आरशासारखे, तर दिग्दर्शनाचे कार्य-कर्तव्य बहिर्वक्र आरशासारखे झाले आहे. ही आजची कटु वस्तुस्थिती असून, ह्या वस्तुस्थितीबद्दल त्यात सुस्पष्ट मांडणी झाली आहे. प्रारंभीच्या परिच्छेदांतून माध्यम ही संकल्पना स्पष्ट करत माध्यमांचे प्रकार, त्यांची कामे व कर्तव्ये, त्यांचा इतिहास, मिशन, व्होकेशन व प्रोफेशन ही स्थित्यंतरे आणि तत्संबंधित संकल्पना यांची क्रमवार मांडणी करीत-करीत आजच्या वस्तुस्थितीची भयकंपित करणारी/करू शकणारी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या वाचकांना माध्यमजगताबद्दलच्या माहितीने समृद्ध करण्याचे काम साधले आहे. 

हिंदुस्थानच्या घडणीचे भ्रमजाल

श्री. प्रभाकर देवधर यांच्या लेखामुळे (आजच्या हिंदुस्थानची घडण : 26 सप्टेंबर 2020) बरीच कुतूहलशमक माहिती मिळाली. ‘आम्ही भारतीय जनता’ हिने घडविलेला ‘इंडिया दॅट इज भारत’ म्हणजेच देवधर यांचा हिंदुस्थान असावा! त्याचा नकाशा इंग्रजांनी बनविला, ही ऐतिहासिक माहिती त्यांनी सिद्ध केली आहे. त्यांच्याआधी इथे राजेलोक सर्रास एकमेकांशी लढत होते, पण इंग्रजांमुळे भारत ‘एकत्र’ आला, अशी भौगोलिक  माहितीही ते सांगतात. त्यांंच्या शाळेत दक्षिण भारताचा इतिहास फारच त्रोटक शिकवला गेला, याची त्यांना खंत वाटते. इतिहास व वर्तमानातील गुंतागुतीचे प्रश्न ते धारदार प्रहार करून उद्‌ध्वस्त करतात. अतिशय संघटित असलेली सेना ही एकच देशव्यापी संघटना आहे, हे हक्सले यांचे अज्ञान ते उघड करतात; कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही पण तशीच म्हणजे सेनेसारखी संघटना आहे, हे त्यांना म्हणजे हक्सले वगैरेंना ठाऊक नसावे, असा तर्क ते मांडतात. याचा अर्थ, नेहरूंनंतर सत्ता बळकावण्यासाठी लष्कर हे एकमेव दावेदार होते असे नसून, रा.स्व.सं. हासुद्धा तेवढाच दमदार तोडीस तोड संभाव्य दावेदार होता आणि या प्रतिस्पर्ध्यामुळेच नेहरूंनंतर लष्करशाही आली नाही आणि  देशात लोकशाही स्थिरावली, हेही त्यांनी जाता-जाता  चपखलपणे दाखवून दिले आहे. हे संपूर्ण नवे संशोधन असून त्याबद्दल आपण लेखकांचे आभार मानले पाहिजेत. वर्तमानाविषयीसुद्धा त्यांची माहिती अचूक व अद्ययावत आहे. देशात गरिबी हळूहळू निश्चितपणे कमी होत आहे. देशात 2014 पर्यंत जो प्रचंड भ्रष्टाचार होता, तो नव्या सरकारने आता बराचसा कमी केला आहे. देश संघटित आहे आणि लोकशाही स्थिर आहे. आज देशात कुठल्याही जातीचा माणूस असला तरी स्वकर्तृत्वावर मोठा होऊ शकतो. स्त्रीशिक्षण सर्व समाजात पसरल्यावर आता पुरुषमंडळींचे वर्चस्व जवळजवळ नाहीसे होत आहे, स्त्री-पुरुष समानता आता सर्वमान्य होत आहे, इत्यादी.

त्यांनी नोंदविलेली इंद्रलोकीची निरीक्षणे बारकाईने पाहणाऱ्या सर्व भारतीयांना रोजच्या रोजच अनुभवाला येत आहेत आणि त्यांना याचा अभिमान वाटला पाहिजे, हो की नाही? आता त्यांनी क्वचित शेरेबाजी केली आहे, जसे- पंडित जवाहरलाल नेहरू हे मग्रूर होते वगैरे. आता हा नवा शोध कुणी लावला, असा प्रश्न कृपया काढू नका. लेखक प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच अशी प्रमाणपत्रे  देत असणार.देवधर यांना काही तरी नेहरूंच्या मग्रुरीचा अनुभव आल्याशिवाय का ते असे बोलतील? मॅकमहोन रेषेचा प्रश्न ‘देवघेव’ करूनच सोडवावा लागेल, असे देवधर यांचे ठाम मत आहे. नेहरूंना त्या वेळी 1962 मध्ये हे देवघेव प्रकरण उमगले नाही, हीच तर त्यांची मग्रुरी नव्हे काय? विद्यमान राज्यकर्ते मात्र मग्रुरीने वागत नाहीत, मऊपणे वागतात. कारण देशात काय, परदेशात काय- देवाण-घेवाण करावी लागतेच, हे त्यांना समजते. म्हणूनच लडाख सीमा आता कशी शांत-शांत आहे! देवधर यांनी चीनप्रश्नाचे मर्म अचूक  दिलखुलास मांडले आहे, याबद्दल त्यांचे आणि संपादकसाहेब, आपलेसुद्धा अभिनंदन केले पाहिजे; नाही का?

आता भारताची (म्हणजेच हिंदुस्थानची?) घडण अशा चिकित्सक रीतीने समजून घेतल्यानंतर सामान्य वाचकाच्या  मनात एक छोटासा प्रश्न उरतो तो तेवढा  मांडतो. श्री. देवधर यांनी या हिंदुस्थानला’ सांधणारे पाच-सात दुवे सांगितले आहेत. त्यांच्या मांडणीचा हाच गाभा आहे आणि तेच त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे. या पाच दुव्यांमध्ये क्रिकेट व सिनेमा यांच्याबरोबर इंग्रजांनी भेट दिलेली नोकरशाही आणि इंग्रजी भाषा यांनी भारताला जोडून ठेवले आहे, असे त्यांना वाटते. याच लेखात आधी ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ब्राऊनसाहेबांची श्रेणी आयसीएस बदलून आयएएस केली, पण त्यांचे जनतेशी असेले संबंध जेते-जनता असेच राहिले’ असे त्यांनी सडेतोड मत नमूद केले होते. या जीत-जनता संबंधांमुळेच भारत एकत्र टिकून राहिला, असे लेखकाला सुचवायचे असेल ना? सलमान खानची अर्धनग्न अदाकारी, कंगनाचा कमरमोड नृत्याविष्कार, बप्पी लाहिरींचे कानांतील कचरा बदलून टाकणारे संगीत आणि तोकड्या स्कर्टमधले खटिया आयटम साँग (कुणाकुणाचे गुणगौरव करू? चुकभूल माफ करावी!) हे सगळे पापी पोट भरण्यासाठी नव्हे, तर भारताला एकत्र बांधून ठेवण्यासाठीच चालते, यातही शंका नाहीच!

पण ते असो. बरं का देवधरसाहेब आणि संपादक तुम्हीसुद्धा- यापेक्षा एक छोटीशी शंका मला सतावतीय, ती सांगायची का?  ती शंका अशी की- ‘हिंदुस्थानला’ सांधणारे पाच दुवे मोजताना, या देशातील जनतेने वसाहतशाही जोखडातून मुक्त होण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जो अभूतपूर्व लढा दिला (दिला ना?) आणि त्या लढ्याच्या मंथनातून जी मूल्ये आमच्या समाजाने घडविली, अंगीकारली आणि शेवटी संविधानामध्ये प्रतिष्ठित केली; त्यांचा आपल्याला कसा काय हो  संपूर्ण विसर पडला? म्हणजे काय, नेमके असे काय घडले की, आपल्याला दादाभाई-टिळक, गांधी-नेहरू, आझाद, असफअली आणि अन्य कोट्यवधी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी अपूर्व त्यागातून हा आजचा हिंदुस्थान म्हणा- भारत म्हणा की इंडिया म्हणा- तो घडविला आहे, याचीच आठवणसुद्धा राहिली नाही? आपण एक दुवा म्हणून देशाच्या संविधानाचा गौरव केला. हे संविधान आम्हाला कोणी दान केले नाही, जसे इतर वसाहतींना इंग्रजांकडून मिळाले होते, तर ते ‘आम्ही भारतीय जनतेने’च आपल्या  प्रतिनिधींच्या माध्यमातून लिहविले. ते आधीची जवळजवळ शंभर वर्षे लोकआंदोलनांमधून उत्क्रांत होत होते.

संपूर्ण स्वातंत्र्याच्या संकल्पाचा ठराव आमच्या लोकआंदोलनाने केला. त्या स्वातंत्र्याचा पाया माणसांचे  मूलभूत हक्क असतील, हे भारतीय जनतेने स्वातंत्र्य चळवळीतच ठरवून घेतले.  त्या स्वातंत्र्यात सर्वांसाठी समान संधी व श्रद्धास्वातंत्र्य राहील, अल्पसंख्याकांना समान स्थान असेल, हेही त्या चळवळीतच ठरले. कायद्याचे राज्य हे तत्त्वसुद्धा त्या लढ्यामधूनच आम्ही घडविले. ‘कसेल त्याची जमीन’, सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण यांसारखी पुरोगामी कारभाराची मूलगामी तत्त्वे लोकआंदोलनातून वर आली. तेव्हाच आम्ही भारतीय लोक तुरुंगांमध्ये आणि रस्त्यांवर, रक्ताच्या पाटांमधून स्वातंत्र्य घडवीत असतानाच, स्वावलंबन आणि अस्पृश्यतानिवारणासारख्या सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली. जाती-धर्मांमध्ये भाईचाराचे महत्त्व स्वातंत्र्य चळवळीनेच आम्हाला शिकविले. ही मूल्ये, स्वातंत्र्य चळवळीने दिलेला ठेवा हा भारताचा अमोल वारसा आहे. तेव्हा भारत म्हणजे केवळ समुद्रवलयांकित भूभाग नव्हे, भारत म्हणजे जीत-जेत्यांची नोकरशाही नव्हे, भारत म्हणजे दुसऱ्या कोणा देशाबरोबर गडगडाटी शत्रुत्व नव्हे आणि भारत म्हणजे सलमान खानचा सिनेमाही नव्हे; ते या सगळ्या पलीकडचे आहे. ती स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:ला पणाला लावून सिद्ध केलेली मूल्यप्रणाली आहे. 

सुभाषचंद्र वाघोलीकर, औरंगाबाद

----

ते विधान मला शंभर टक्के पटले

दि.10 ऑक्टोबरचा साधना अंक आजच मिळाला. अंकातील संपादकीय ‘माध्यमकर्मींनो, सिनिसिझमपासून स्वतःला वाचवा!’ आजच्या माध्यमजगताचे यथातथ्य असे सम्यक्‌ वर्णन व दर्शन घडवणारे झाले आहे. माध्यमांच्या अगदी प्राथमिक ते क्षितिज-विशाल अशी अंगभूत व मूलभूत कर्तव्ये आणि प्रयोजनाबद्दलची दोन मुख्य वैशिष्ट्ये- दर्पण व दिग्दर्शन- या संदर्भातील विवेचन आजच्या परिप्रेक्ष्यात अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. 

आजच्या माध्यमजगताचे दर्पणाचे कार्य-कर्तव्य हे अंतर्वक्र आरशासारखे, तर दिग्दर्शनाचे कार्य-कर्तव्य बहिर्वक्र आरशासारखे झाले आहे. ही आजची कटु वस्तुस्थिती असून, ह्या वस्तुस्थितीबद्दल त्यात सुस्पष्ट मांडणी झाली आहे. प्रारंभीच्या परिच्छेदांतून माध्यम ही संकल्पना स्पष्ट करत माध्यमांचे प्रकार, त्यांची कामे व कर्तव्ये, त्यांचा इतिहास, मिशन, व्होकेशन व प्रोफेशन ही स्थित्यंतरे आणि तत्संबंधित संकल्पना यांची क्रमवार मांडणी करीत-करीत आजच्या वस्तुस्थितीची भयकंपित करणारी/करू शकणारी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या वाचकांना माध्यमजगताबद्दलच्या माहितीने समृद्ध करण्याचे काम साधले आहे. 

संपादकीयात म्हटलेले, ‘कोरोनोत्तर कालखंडात सक्षम माध्यमांना अधिक मागणी असणार, हे उघड आहे.’ हे विधान मला शंभर टक्के पटले. ‘नकारात्मकता, तुच्छतावाद, विरोधाला विरोध, ठोकळेबाजपणा, पोथीनिष्ठता, पूर्वग्रह यांच्यावर स्वनियंत्रण ठेवून मूलभूत भारतीय विचारधारेशी सुसंवाद साधणारी, विश्लेषणापेक्षा संश्लेषणाला प्राधान्य देणारी कार्यप्रणाली अवलंबिणे,’ हे आता माध्यमकर्मींना आवश्यक आणि अनिवार्य ठरू लागेल, असेही माझे आकलन आहे.

लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया

----

तीन पैलू नमदू करणे ही एक विशेष दृष्टी

दि. 3 ऑक्टोबरच्या साधना अंकाचे संपादकीय (बिगरशेतकऱ्यांनो, शेतीविषयीचे आकलन वाढवा) फार गहिऱ्या मुद्यांबाबत मर्मग्राही लक्षवेध करणारे आहे. शेती आणि शेतकरी (सोबतच शेतमजूर) या सर्वांना कवेत घेणारे शेतीक्षेत्र आणि शेतकी समाज याबाबत 2008 पासून आढावा घेत-घेत या क्षेत्राचा मागोवा घेण्याकडे इशारा त्यात केला आहे.

‘सर्वाधिक सुख जिथे असण्याची शक्यता आहे, त्या शेती व शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे’ हा मध्यवर्ती मुद्दा छेडला आहे. त्यानंतर, या शेतीक्षेत्राची सद्य:स्थिती, अर्थकारणात स्थान आणि त्या नावाखाली चाललेले राजकारण असे महत्त्वाचे निगडित तीन पैलू नमूद करणे ही एक विशेष दृष्टी (व्हिजन) खुणावते. याचे आकलन, सुटे-सुटे व पुढे साकल्याने समग्रपणे होण्याची निकड आहे, हा कळीचा मुद्दा शेती व बिगरशेती या दोन्ही समाजघटकांकरिता अविभाज्य आहे. त्यातच दोहोंचे हित (‘विन-विन’) आहे.

या लेखाने संपादकांनी फार मोलाच्या पैलूकडे ध्यानाकर्षण केले आहे. ते विरून जाणार नाही व विस्मृतीत नाहीसे होणार नाही, असे प्रयत्न करू या!

अशोक बंग, वर्धा

----

निराशेच्या गर्तेत हरवलेलो असताना...

दि.17 ऑक्टोबरच्या साधना अंकाचे ‘डेक्कन कॉलेजचे द्विशताब्दी वर्ष आल्यावर केशवरावांच्या मनात आलेले विचार...’ हे संपादकीय वाचले. खरं तर दीडशे वर्षांनंतरही एखादी व्यक्ती ही विद्यमान राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दुरवस्थेबाबत उद्विग्नपणे रोखठोक विचार मांडते, हे सगळे खरेच कल्पनेपलीकडचे आहे. एके काळी न्याययंत्रणेत काम केलेले, पत्रकारिता केलेले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकलो, त्या कॉलेजचे ऋण आणि आत्मीयता एवढ्या वर्षांनंतरही जपली- त्यांच्या या वयातील स्मरणशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच... ‘आपण आगरकरवादी आहात, तर मग मागच्या एक ऑगस्टला टिळकांवर विशेषांक का काढलात?’ असा रोखठोक सवाल विचारणाऱ्या केशवराव आजोबांच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची खोली मोजणे फारच कठीण... सगळ्याच बाबतींत आपण निराशेच्या गर्तेत हरवलेलो असताना, केशवराव आजोबांसारखे खरे दीपस्तंभ आशेचा किरण दाखवत आहेत. अशा अनुभवसंपन्न 150 वर्षांच्या आजोबांची अनुभूती साधनाच्या या संपादकीयामधून दिलीत, याबद्दल मनःपूर्वक आभार.

ॲड. नकुल पार्सेकर, सिंधुदुर्ग

----

त्या काळातील विचारी माणसांच्या पिढीची शोकांतिका

दि.17 ऑक्टोबरच्या साधनातील ‘डेक्कन कॉलेजचे द्विशताब्दी वर्ष आल्यावर केशवरावांच्या मनात आलेले विचार’ हा अग्रलेख खूप आवडला. अग्रलेखातले केशवराव हे शिवरामपंत परांजपे यांच्या शतकापूर्वी लिहिलेल्या लेखातले व्यक्तिमत्त्व आहे, याचा भावनिक व वैचारिक मेळ या अग्रलेखातून अत्यंत हळुवारपणे व तितक्याच सामर्थ्याने व्यक्त होतो. शिवाय शिवरामपंतांच्या लेखातील केशवरावांची तीव्र वेदनाही या अग्रलेखात सहज प्रतिबिंबित होते. यातून देश पारतंत्र्यात जखडलेला होता, त्या काळातील शिवरामपंतांचे दुःख अधिकच ठळकपणे अधोरेखित होते. सुन्न करणारी ती त्या काळातील विचारी माणसांच्या पिढीचीच शोकांतिका बनून मनात ठसठसत राहते. मग ‘साधना’तला हा अग्रलेख व शिवरामपंतांचा लेख वेगळे राहातच नाहीत, तो एक उत्कट अनुभव बनतो!

शिवरामपंतांचा पुनर्मुद्रित केलेला ‘डेक्कन कॉलेजकडे पाहून केशव रावांच्या मनात आलेले विचार’ हा लेख वाचल्यावर तर या अग्रलेखाची काव्यात्मक उंची आणखीनच वाढते. तसेच अग्रलेख ‘असाही लिहिता येतो’ याचा एक वेगळाच भावणारा परिपाठ पाहायला मिळतो. यातून संपादकाचा 19 व 20 व्या शतकाचा अभ्यास व त्यापलीकडची सखोल दृष्टी हे दोन्हीही दाद देण्याजोगे आहे. तो काळ कल्पकतेने आजच्या काळाशी (समकालीन) जोडला आहे, त्यातले भावनिक नाते मनाला भिडणारे आहे! लाजबाब! खूप आनंद झाला व समाधान मिळाले! संपादकांना विनंती आहे की, शिवरामपंतांचा मूळ लेख व त्यांना लिहावासा वाटलेला हा सर्जनशील अग्रलेख याची प्रक्रिया सांगावी. 

विवेक सबनीस, पुणे

Tags: लखनसिंह कटरे अशोक बंग विवेक सबनीस सुभाषचंद्र वाघोलीकर कोरोनोत्तर जग माध्यम वाचक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक ( 1331 लेख )

साधना साप्ताहिकाचे वाचक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी