डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझे आवडते विचारवंत लेखक विनय हर्डीकर यांचे जून 2019 या महिन्यात दोनदा साधनातून दर्शन घडले. 8 जूनचा अंक - भाजपच्या बुलंद विजयाचे रहस्य कसले ते? ते रहस्य नव्हतेच मुळी- हे माझे मत आणि तसेच नेमके हर्डीकरांच्या लेखात आढळले.

नावडतीचे मीठ’ आणि ‘सहजसुंदर लेख

दि. 8 जूनच्या साधना अंकात विनय हर्डीकर यांचा ‘दुरून त्सुनामी साजरी’ हा लेख आहे. पृष्ठ 28 वर हर्डीकर लिहितात, ‘ही संघाची आणि भाजपची माणसं सरसकट सरासरी काढली तर फार बुद्धिमान नसतात, हे खरं आहे; पण त्यांचे जे वरच्या फळीतले लोक असतात, ते अतिशय बुद्धिमान असतात.’ हर्डीकरांना अतिशय बुद्धिमान, बुद्धिमान आणि फार बुद्धिमान नसलेली म्हणजे सामान्य माणसं अशी उतरण अभिप्रेत असावी. पृष्ठ 30 वर ते समरसता मंचाविषयी लिहितात- ‘‘या देशामध्ये हिंदू समाजांतर्गत जे संघर्ष आहेत त्यावर पडदा टाकत राहायचं, याला त्यांनी ‘सामाजिक समरसता’ असं नाव दिलं आहे. मी त्यांना विचारतो की, ‘एवढा तुमचा सामाजिक समरसता मंच आहे, तर मग तुमच्यामधले धनगर स्वयंसेवक आणि मराठा स्वयंसेवक पुढे येऊन का म्हणत नाहीत की, आम्हाला आरक्षण नको; आम्हाला सामाजिक समरसता आर्थिक फायद्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते आहे.’’

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य बुद्धीचा माणूस सामान्यपणे असामान्य विचार करीत नाही, केलाच तर तो आपोआप बुद्धिमंतांच्या वरच्या श्रेणीत जातो. हे रोजच्या जीवनातही आपण अनुभवतो. असे असामान्यपण विनय हर्डीकरांना सामाजिक समरसता मंचाच्या सरसकट सरासरी बुद्धीच्या सामान्य सभासदांकडून अपेक्षित आहे का? स्वार्थ कोणाला सुटला आहे का? एके काळी एका गव्हर्नरच्या मुलाने आर्थिक सुबत्ता असूनही आरक्षणाद्वारे शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. दुसरे असे की, आरक्षण घेऊन पुढे सरकून एखादा साधा सभासद असामान्य कर्तृत्व करू शकला व त्याचा फायदा पुढे-मागे मंचाला/समाजाला होणार असेल, तर त्याने स्वत:चे पाय का छाटून घ्यावेत? नावडतीचे अळणी मीठ म्हणावे का?

दि.29 जूनच्या अंकातील विनय हर्डीकर यांचाच ‘कवि, कुछ ऐसी तान सुनाओ’ हा सहजसुंदर लेख वाचून आनंद झाला. माझ्यासारख्या कवितेशी फारशी जवळीक नसलेल्या, पण कवितेबद्दल आपुलकी वाटणाऱ्या वाचकांच्या मनातील गोष्टी त्यांनी त्यांच्या छान भाषेत लिहिल्या आहेत. मला लहानपणाची आठवण झाली. तेव्हा दशग्रंथी ब्राह्मणांच्या बाबतीत ‘त्यांनी किती म्हटलं आहे’ असे विचारले जात असे. हर्डीकर म्हणतात, ‘कविता ही वाचायची गोष्ट नाही, म्हणायची आहे.’ मंगेश पाडगांवकर कविता वाचीत नसत, म्हणत असत. आत्मकेंद्रित कविता आणि समाजकेंद्रित कविता, हे कवितेचे दोन भाग हर्डीकरांनी केले आहेत. गेयता हे काव्याचे एकमेव लक्षण नसले तरी, ते अत्यावश्यक आहे; म्हणूनच 1990 पर्यंतच्या अनेक कविता गीतांच्या रूपाने पुढे आल्या आणि त्या सामान्य माणसाच्या लक्षात राहिल्या. त्यानंतरच्या कवितातलं ‘गाणं’ हरवत चालल्यामुळे कवितांचा प्रसारही फारसा होताना दिसत नाही.

चंद्रकांत खरे, मुंबई

ते काम सर्वेक्षणाचे आहे, संशोधनाचे नाही!

दि.22 जूनचा साधना अंक नेहमीपेक्षा दोन दिवस विलंबाने मिळाला. (पोस्ट/टपाल खात्याची कृपा!) या अंकात प्रकाशित ‘विशेष वार्ता’ माझ्यासारख्या गणेश देवी यांच्या प्रशंसकांसाठी खूप अभिमानाची व आनंदाची होती. या वार्तामधील एका वाक्यावर मात्र आक्षेप नोंदवावयाचा आहे. ते वाक्य म्हणजे- ‘देशातील 750 भाषांची नोंद करण्याचे संशोधनाचे ऐतिहासिक काम त्यांनी 3000 सहकारी अभ्यासकांच्या साथीने तीन वर्षांत पूर्ण केले.’ या वाक्यातील संशोधन या शब्द-संकल्पनेवर माझा आक्षेप आहे. कारण ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या (डॉ.गणेश देवी हे मुख्य संपादक व खंड संपादक अरुण जाखडे असलेल्या) खंडात अगदी स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ब्रिटिश काळात ग्रिअर्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणाची ही नक्कल नाही. त्याचे पुनर्सादरीकरण नाही किंवा ग्रिअर्सन यांच्या सर्वेक्षणाला हा नवा पर्याय नाही. तो आजच्या स्थितीतील भारताच्या भाषिक वास्तवाची व सामाजिक- सांस्कृतिक बदलाची नोंद घेणारा आहे. तो त्या-त्या भाषांचा अतिशय संशोधनात्मक अभ्यास वा सर्वेक्षण नाही. शिवाय, अभिनव मराठी-मराठी शब्दकोश या व्हिनस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व द.ह.अग्निहोत्री यांनी संपादित केलेल्या शब्दकोशाचा भाग पाचवा, पृष्ठ 149 वर नमूद संशोधन = 1. नवीन शोध लावण्याची क्रिया, 2. शुद्धी; तपासणी; चौकशी, 3. दुरुस्तीची सूचना या शब्दार्थानुसारसुद्धा ‘संशोधन’ ही संकल्पना अर्थसूचित होते. म्हणजेच सारांशाने असे स्पष्ट होते की, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण हे प्रचंड मेहनतीचे काम सर्वेक्षणाचे असले तरी संशोधनाचे मात्र नाही.

लखनसिंग कटरे, गोंदिया

इब्न खल्दून बागायतदार शेतकऱ्यांनाही लागू

दि. 22 जूनच्या अंकातील रामचंद्र गुहा यांचा ‘सोनिया गांधींनी इब्न खल्दून का वाचायला हवा?’ हा लेख खूपच उद्‌बोधक आहे. या लेखामध्ये इब्न खल्दूनची ‘राजकीय घराणेशाहींना शक्यतो तीन पिढ्यांनंतर आपला प्रभाव आणि विश्वासार्हता टिकवून ठेवता येत नाही’ ही मांडणी केवळ वरिष्ठ पातळीवरील राजकीय घराण्यापुरतीच मर्यादित राहात नाही, तर नगदी पीक घेणाऱ्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या कुटुंबातही पुरेपूर खरी असते, हे जलसंपदा विभागात प्रत्यक्ष काम करत असताना मी अगदी जवळून पाहिले आहे. पहिली पिढी जिराईत जमिनीला पाणी मिळणार असल्याने ऊसपीक घेण्यासाठी शेतबांधणी करण्यापासून अंग मेहनतीचे सर्व काम करत राहते. दुसऱ्या पिढीतील मुले वडिलांबरोबर कष्ट केलेली असतात व ऊसपीक जोमात ठेवून जमल्यास साखर कारखान्याचे संचालक होतात. तिसऱ्या पिढीला शेतीमध्ये तसे काही कामच नसते, कारण मुळातच ऊसपीक आळशांचे पीक म्हटले जाते. तिसऱ्या अथवा चौथ्या पिढीचा सदस्य शेती कमी व इतरत्र गावाची विकास सोसायटी, जिल्हा बॅंक ते राजकारण यातच फिरत राहतो अन्‌ शेती तोट्यात जाते. ऊस बागायतदार आपले खंदे पुरस्कर्ते-समर्थक मानणारे राज्य व देशपातळीवर वजन असल्याचा आभास निर्माण केलेले नेते दीर्घ काळ ऊस उत्पादकाच्या उडाणटप्पू तिसऱ्या-चौथ्या पिढीवर अवलंबून राहिल्याने तेही नेते उतरणीला लागलेले आज दिसून येत आहेत. अखेरीस इब्न खल्दूनच्याच सिद्धांतापाशी आपण पुन्हा येतो, हे मात्र खरे!

भाऊसाहेब नेवरेकर, पुणे.

तो जनतेचा कौल आहे ना?

माझे आवडते विचारवंत लेखक विनय हर्डीकर यांचे जून 2019 या महिन्यात दोनदा साधनातून दर्शन घडले. 8 जूनचा अंक - भाजपच्या बुलंद विजयाचे रहस्य कसले ते? ते रहस्य नव्हतेच मुळी- हे माझे मत आणि तसेच नेमके हर्डीकरांच्या लेखात आढळले. या अंकातील दुसरा लेख अभय टिळक यांचा, तोही समतोल साधणारा आहे. संपादकीयात मात्र भाजपचा विजय तुम्हाला खुपलेला जाणवतो आहे. का बरे? जनतेने दिलेला तो कौल आहे ना?

29 जूनचा अंक - कविमनाचे हर्डीकर इतक्या सविस्तरपणे आणि इतक्या लवकर पुन्हा दिसतील असे वाटले नव्हते. त्यांनी खुलासेवार स्पष्ट केलेली कविता- तिचे लक्षण पटले. गोयंच्या कविसंमेलनात उडालेला भडका वाचून   करमणूक झाली. नाही तरी गोयंकरांना विसंवादी सूर आवडत नाही, हे माहीत आहे. मीसुद्धा गोव्याचा आहे!

आणखी एक तुम्हाला सांगायचे आहे, जे गेले कित्येक दिवस मला खुपते आहे. साधनाच्या अंकात अलीकडे लेखाच्या मांडणीमध्ये एक बदल केला गेला. लेखाची सुरुवात ज्या पानावर होते त्याचा अर्धा भाग इंट्रोसारखा असतो, पण त्याचा टाईप लेखातील अक्षरांशी मिळता-जुळता असतो. निदान माझ्या डोळ्यांना तो तसा दिसतो. एक सुचवतो हा इंट्रो भाग असलेली अक्षरे ठळक करावीत. दुसरे असे की, आपण लेखाचे शीर्षक आणि लेखकाचे नाव सर्वप्रथम छापता आणि त्याखाली एका गोलात लेखकाचा चेहरा असतो. पण कधी कधी तिथे दुसरेच काही असते. 29 जूनच्या अंकात आपण रामचंद्र गुहा यांचा लेख ‘गिरीश कार्नाडांच्या आठवणी’ हा छापलात. गोलात गुहांचे छायाचित्र आहे. पुढील लेख राजाभाऊ शिरगुप्पे यांचा आहे- शीर्षक ‘गिरीश कार्नाड कधी मरत नाही...’ येथे गोलात मात्र कार्नाडांचे छायाचित्र!

मंगेश नाबर, मुंबई

‘ईव्हीएम’ घोटाळा आणि मतदार

काँग्रेस पक्षाने एके काळी देशात मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर सुरू केला. त्याच पक्षावर तो बुमरँगसारखा उलटला. आता भाजपाने दोन वेळा केंद्रात सत्ता मिळाल्यावर व काँग्रेसचे पूर्ण पानिपत झाल्यावर पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जाऊ लागले आहे. देशभर गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावर प्रचंड असंतोष असूनही, पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा प्रचंड मताने मोदी सरकार आले कसे? असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही पडत आहे.

मोदी सरकार विजयी व्हायला अनेक कारणे आहेत. त्यांचा विचार पुन्हा कधीतरी करू, मात्र ईव्हीएम मशीन घोटाळ्यावर प्रचंड आरोप होऊनही भाजपा मिठाची गुळणी घेऊन का गप्प आहे? असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसालाही निश्चितच पडतो. ईव्हीएम घोटाळ्याबाबत रयतेचे राजे म्हणविणारे नेतेसुद्धा आता आरोप करताना दिसतात. मात्र त्याविरोधात ठोस कारवाई करण्याला ते का घाबरतात, याचा प्रश्न पडतो. माझ्या बौद्धिक कुवतीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एक न्यायालयीन प्रयोग करू शकतील व त्यातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ सिद्ध होईल.

माझ्यामते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील किमान 10000 मतदारांनी (विशेषत: विरोधी मतदारांनी) ॲफिडेव्हिट घालून ‘मी अमूक पक्षाच्या उमेदवाराच्या चिन्हाचे बटन दाबले आहे’ असे लेखी प्रतिज्ञापत्र योग्य त्या कोर्टात घातल्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाकडून त्याची खातरजमा करण्यासाठी या पक्षांनी केस दाखल करावी व आयोगाने त्या मतदानाची खातरजमा करून ती कोर्टापुढे गुप्तपणे सादर करावी. मग कोर्टाने प्रत्येक मतदाराची खातरजमा करून काय तो निर्णय द्यावा. त्यातून जर मत मी एकाला दिले, पण ते प्रत्यक्ष दुसऱ्या उमेदवाराकडे गेले का, हे स्पष्ट होईल. जर असा उपक्रम कोणी केला तर मी पहिले प्रतिज्ञापत्र घालण्याला तयार आहे. रयतेच्या राजाने हा सोक्षमोक्ष एकदा करावा. यापूर्वी काँग्रेस विजयी झाल्यावर तत्कालीन भाजपवाले हाच आरोप काँग्रेसवर करीत होते, ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वि. द. बर्वे, सांगली

रॉ मटेरियल या संकल्पनेचे कौतुक

दि. 29 जूनच्या साधना अंकातील गिरीश कार्नाड यांच्यावरील दोन्ही लेख फार छान आहेत. विनय हर्डीकरांचा कवितेवरील लेख मास्टरस्ट्रोक आहे. अशोक दा. रानडे म्हणत- जे मोडायचे त्यावर आधी हुकूमत मिळवा आणि मग मोडा. हर्डीकरांच्या या लेखाचा निष्कर्ष तोच आहे. निव्वळ स्फूर्ती म्हणजे कविता नव्हे, रचनाबांधणीही महत्त्वाची. रॉ मटेरियल ही संकल्पना विनयने आणली म्हणून त्याचे कौतुक. वृत्ते, मात्रा इत्यादीचा अभ्यास व विचारमंथन करून विनयने मते मांडली आहेत. काव्यसमीक्षेचा अभ्यास करताना प्रत्येकाला या लेखाचा टिकेकरता आणि कौतुकाकरताही विचार करावा लागेल. विनयच्या काव्यविचारांचा कवींनी गांभीर्याने विचार केला तर कवितेचा प्रसार व तिची लोकप्रियता वाढेल. ‘राइट ॲन एसे’ टाईप कवितांचे प्रस्थ आपोआप कमी होईल.

माधव ढेकणे, पुणे   

Tags: 20 जुलै 2019 वाचकपत्रे प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके