डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनाचा 6 जुलैचा अंक वाचून मुद्दाम साधनाचे अभिनंदन करण्यासाठी लिहीत आहे. महाराष्ट्राच्या विभिन्न भागांमधील माणसे कशी जगत आहेत, याचे यथातथ्य चित्र ‘दुष्काळाने उसवलेले लोकजीवन’ या रिपोर्ताजमधून आसाराम लोमटे यांनी उभे केले आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. मराठीत लोकजीवनाच्या गोष्टी सांगण्याची व्यंकटेश माडगूळकरांनी सुरू केलेली परंपरा समर्थपणे चालविणाऱ्या लेखकांमध्ये लोमटे यांचे नाव आवर्जून घेतले पाहिजे.

सगळीकडे बनगरवाडीच

साधनाचा 6 जुलैचा अंक वाचून मुद्दाम साधनाचे अभिनंदन करण्यासाठी लिहीत आहे. महाराष्ट्राच्या विभिन्न भागांमधील माणसे कशी जगत आहेत, याचे यथातथ्य चित्र ‘दुष्काळाने उसवलेले लोकजीवन’ या रिपोर्ताजमधून आसाराम लोमटे यांनी उभे केले आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. मराठीत लोकजीवनाच्या गोष्टी सांगण्याची व्यंकटेश माडगूळकरांनी सुरू केलेली परंपरा समर्थपणे चालविणाऱ्या लेखकांमध्ये लोमटे यांचे नाव आवर्जून घेतले पाहिजे. ते लेंगरवाडीला गेले आणि माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’तील काय काय बदलले आहे, याचा शोध घेऊ लागले; तेव्हा सगळे बदलले तरी दुष्काळ कायम राहिला असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. ही महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेच्या थोबाडात मारलेली चपराक आहे. ही बनगरवाडी आता दूर-दूर पसरली असून, सगळा प्रदेशच बनगरवाडी बनला आहे, बनत आहे- हे वास्तव या रिपोर्ताजने मांडले आहे.

सत्तर वर्षांनंतरही दुष्काळ का हटला नाही, याचे उत्तर ऐका... साधनाचा अंक छापला जात होता, त्याच सुमारास सर्व वृत्तपत्रांमध्ये सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आपण पाहिली. या अर्ध्या पानाच्या रंगीत जाहिरातीत, पार्श्वभूमीला जंगलांची सूचना करणारे एक अंधुक छायाचित्र आहे आणि पुढच्या बाजूला एक मंत्रीमहोदय नव्याने लावलेल्या एका रोपाला झारीने पाणी देत आहेत. काही कोटी झाडे लावणार असल्याचे सांगण्यासाठी ही जाहिरात दिली आहे. एका मजुराच्या बारावीतील मुलाने ती जाहिरात पाहून तीन गोष्टींकडे माझे लक्ष वेधले. तो म्हणाला- पहिले म्हणजे जाहिरातीतील पुढाऱ्याने झारी मुठीत धरलेली नाही, ती त्यांच्या हाताला नंतर चिटकवली आहे. दुसरा दोष- समोर हिरवे रोप त्यांनी लावल्याचे दिसते, ते दुसरीकडचे चित्र उचलून झारीखाली चिकटवले आहे. या दोन ‘दुरुस्त्या’ करताना एक विनोद घडलाय की, झारी तिरकी ‘धरली’ असताना तिच्यातून पाणी पडताना मात्र दिसत नाही. झारी खोटी, झाड खोटे; मग त्याला पाणी तरी हवे कशाला? एवढ्या जाहिरातीत मंत्री तेवढे खरे!

कसे वाढणार जंगल? कसा वाढेल पाऊस? कसा हटेल दुष्काळ? सगळी फसवाफसवी. आपण सगळेच स्वत:लासुद्धा फसवतोय. या अंकाच्या संपादकीयात ‘बहुजन समाज’ या संज्ञेविषयी मांडलेला विचार सर्वांना कळतो, पण वळत नाही. याचे कारण त्यास जातीय अर्थांमध्ये रंगविण्यात सत्ताकारणाचा स्वार्थ गुंतला आहे. समाज जाती-जातींमध्ये विभागणे हे मतसंकलनाचे सुलभ व्यवस्थापन आहे. त्यात भाषेच्या दुरुपयोगाचे एक तंत्र बसविण्यात आले आहे. त्यात सामाजिक रचनाकार्य वगैरे संज्ञा फेकून लोकांना फसविले जाते. मागील पाऊण शतकात बहुजन समाजाचा अर्थ कसकसा बदलत गेला याचा शोध घेतला, तर त्याचा मतांच्या राजकारणाशी थेट संबंध स्पष्ट होईल. या राजकारणात बहुजन समाजासाठी नेमके काय व कोणी करायचे, हे मात्र अधिकाधिक संदिग्ध आणि आता तर अदृश्य बनले आहे, असेही लक्षात येईल. ही एक डोंगराएवढी फसवणूक आहे. मोठ्या फसवणुकीचा मोठा गुण हा असतो की, ती मुळी लक्षातच येणार नाही. या बहुजन समाजाच्या नावाखालीच राज्यात उसाचे राजकारण फोफावले आहे आणि यात आपले शोषण होत आहे, हे बहुजन समाजाला कळतसुद्धा नाही. 1972 च्या दुष्काळानंतरही महाराष्ट्रात ऊसबंदी केली गेली नाही, तशी मागणीसुद्धा कोणी करीत नाही. लोमटे यांनी रिपोर्ताजच्या शेवटी उसाच्या प्रश्नाचा मार्मिकपणे उल्लेख केला आहे.

सुरुवातीला साखरसम्राटांना खलनायक म्हणून त्वेषाने साकार करणारे नेते पुढे सत्तेच्या मांडवाखाली जातात, आणि मग त्यांचा विरोधही मावळतो, धार बोथट होते- असे लोमटे यांनी लिहिले आहे. बहुसंख्य शेतकरी सिंचनापासून वंचित असताना, साखर कारखान्यांसाठी ऊस लावण्याचा हट्ट लोकशाही नीतिमत्तेत ग्राह्य नाही. ऊस लावणे हा कोणाचाही हक्क असू शकत नाही. भूगर्भातील पाणी ही कोणाची खासगी मालमत्ता असू शकत नाही. त्याचे व्यवस्थापन सरकारवर सोपविले आहे ते संविधानाच्या आदेशानुसार, समग्रतेचे हित सांभाळण्यासाठी. त्यामुळे ऊस लावणे म्हणजे दुसऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी त्यांना नाकारणे! असा अन्याय सरकार करू शकत नाही, त्याला तो अधिकार नाही. हे ठावूक असूनही, सत्ताकारणाच्या पोटी येणाऱ्या लाचारीखातर प्रश्न सोडविण्याचा देखावा तेवढा केला जातो. ठिबक सिंचनाचे तंत्र खरोखर फलदायी आहे, पण पाण्याच्या विषम वाटपातून उद्‌भवणाऱ्या प्रश्नावर तो उतारा नव्हे. ठिबक सिंचन केल्याने वाचणारे पाणी दुसऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि दुष्काळी टापूला मिळते, असे घडले काय? झाले असे की- ऊस बागायतदाराने त्याच्या आणखी दोन एकरांत उसाचा विस्तार केला. बाकी जमिनींची वंचना कायमच राहिली. दुष्काळाविरुद्ध लढाईत समन्यायी पाणीवाटप हे पहिले पाऊल आहे. म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी तरी ऊस बंद केला पाहिजे. हे करण्याची महाराष्ट्राची तयारी नाही, त्यामुळे बनगरवाडीत दुष्काळ कायम आहे.

सरकार दुष्काळ हटवील आणि हटवू शकते, हा भ्रम लोकांनी सोडून दिला आणि स्वतःच स्वतःच्या गावापुरते मार्ग शोधले तर काही तरी आशा आहे. यासाठी गावाची लोकशाही स्वीकारली पाहिजे. साधनाने त्या दृष्टीने आणखी असेच रिपोर्ट प्रसिद्ध करीत राहावे, ही विनंती.

-सुभाषचंद्र वाघोलीकर, औरंगाबाद.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

आसाराम लोमटे यांनी केलेला दुष्काळावरील साधना अंक (6 जुलै) वाचला. दुष्काळावर स्वतंत्र अंक करण्याची संकल्पना, संपादक किती जमिनीवर आहेत याची द्योतक आहे. त्या संकल्पनेला लेखकाने पुरेपूर न्याय दिला आहे.

संपतराव पवारांनी छावणीला दिलेला पर्याय जमिनीवरील माणसाने दिलेला पर्याय आहे, पंख्याखाली बसलेल्या माणसांना तो समजण्याची सुतराम शक्यता नाही. ऊस जनावरांच्या अंगी लागत नाही, हा अनुभव आहे. खेड्यात, शहरात कोटी-कोटी रुपयांचे बंगले बांधले, मात्र त्यात प्यायलाच पाणी नसेल तर त्याची किंमत कवडीमोल ठरते. घरात भरपूर पाणी असले तर घर भरल्यासारखे वाटते, श्रीमंती वाटते; हा मुद्दा रिपोर्ताजमधील ‘श्रीमंत गाव, घोटभर पाण्याला महाग’ या लेखातून पुढे येतो.पाणी नसेल तर मन उदास होते.

यमुनाबाईंचे बोल खरे आहेत. त्या म्हणतात, ‘पाणीच नसंल तर बाकीचं काय, सगळं असून नसल्यासारखं हाय.’ मेंढपाळ मनोजला रानात चार पायांच्या लांडग्यांचीच नाही, तर दोन पायांच्या लांडग्यांची पण भीती वाटते. ‘शासनाने आमचे कष्टाचे लाख-लाख रुपये कसे बुडवले’ याची करुण कहाणी जालन्याच्या सुभद्राबाई सांगतात. खेड्यामधील पाणी योजनांची सांगितलेली दुर्दशा महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याचे प्रातिनिधिक चित्र आहे. ‘गावात पोटच भरता येऊ नये, असं काय करून ठेवलंय आपण एवढ्या वर्षांत?’ हा लाख मोलाचा प्रश्न लेखक विचारतात. सरकारकडे काय उत्तर आहे या प्रश्नाचे?

या अंकातील मुदखेडचे भगवान सूर्यकांत पोटे यांच्या कुटुंबीयांचा फोटो पाहून आणि त्यांची हृदयद्रावक कहाणी वाचून, संवेदनशील माणसाच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाहीत. गोरेपान छोटे बाळ हायवेवरील चौफुल्यावर किती बिनघोरपणे झोपलेय! हा फोटो अगदीच अंगावर आल्याशिवाय राहत नाही. फोटोतील भगवानच्या कारभारणीची नजर खूप काही सांगून जाते. या अंकाचा हा कळसाध्याय म्हणावा लागेल. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी बोअर घेऊन जमिनीच्या अगदी ‘चिंध्या’ करून टाकल्यात- किती समर्पक शब्द वापरलाय लेखकाने! ‘1200 फूट खोलवरून येणारं पाणी उकळतं असतं. आता फक्त लाव्हा तेवढा बाहेर यायचा राहिलाय’ असं लेखक म्हणतो. नगर तालुक्यात बोअरमधून लाव्हा वर येऊन बोअरची गाडी पेटल्याचा व्हिडिओ मी यू-ट्यूबवर पाहिलाय.  वृक्षारोपण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे, ही दिनकर पाटलांनी केलेली नवी मांडणी योग्यच आहे. उसाचं टिपरूही न येणाऱ्या माळरानावर पुढाऱ्यांनी कारखाने काढून ठेवले, हेसुद्धा महाराष्ट्राचे एक प्रातिनिधक चित्र आहे. बीडसारख्या कायम दुष्काळी जिल्ह्यात 10 साखर कारखाने आहेत, हे वाचून माहितीत मोठी भर पडली. एकूणच, या अंकामध्ये बीड जिल्ह्याचे केलेले चित्रण विस्मयकारक आहे. ह्नछावण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर छावणीत गुरे आणण्यासाठी चालकांना शेतकऱ्यांच्या दारोदार फिरावे लागले, हे वाचून शाळेत पोरे आणण्यासाठी घरोघर फिरावे लागणाऱ्या शिक्षकांची आठवण झाली. बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील छावण्यांची हकिगत वाचल्यानंतर, अहमदननगर जिल्ह्यातील छावण्यांचा मात्र अभिमान वाटला. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व छावण्या कशा एका रेषेत आणल्या! छावणीचालकांना चाळचूळच करू दिली नाही. उर्वरित महाराष्ट्राने द्विवेदीसाहेबांचा आदर्श निश्चितच घेण्यासारखा आहे. टँकरमुक्त आणि छावणीमुक्त महाराष्ट्र होणे अनेकांच्या तोट्याचे आहे, म्हणून ते होणार नाही. झालीच तर टँकरमध्ये आणि छावण्यांमध्ये वाढच होईल. एकूण सर्व अंक वाचनीय, लेखकाने प्रवासादरम्यान काढलेली छायाचित्रे अंकात छापल्याने सुंदर समन्वय साधलाय. अंक वाचल्यानंतर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे विचारल्याशिवाय राहवत नाही.

-कल्याण कदम, अहमदनगर

दुष्काळाचे वास्तवपूर्ण व दाहक दर्शन

दि.6 जुलैचा साधना अंक वाचून दुष्काळाची वस्तुस्थिती व दाहकता लक्षात आली. उभ्या महाराष्ट्रात काही ठिकाणी घोटभर पाण्यासाठी चाललेली वणवण, धडपड वाचून व छायाचित्रे पाहून अंगावर शहारे आले. कसं असतं जगणं काही जणाचं? किती दिवस वांझ वेदना सहन करायच्या, या दुष्काळपीडित जनतेने? कारण पुन्हा पुरेसा पाऊस नाही झाला तर पुढच्या वर्षी या परिस्थितीत फारसा बदल होईल, असे वाटत नाही. या महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याचे मोठे साठे व वितरणव्यवस्था तयार करून ठेवली गेली आहे. त्यांना ग्रामीण भागातील दुष्काळ व पाणीटंचाई यांची कल्पना आली असेल का, याची शंका वाटते. कारण शहरातील रस्त्यांवर तुफान वेगाने आलिशान वाहने धावताना दिसतात. मॉलमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येते. हॉटेल्स आणि बार यांच्याबाहेरही तीच परिस्थिती असते. शहरामधील गडबड, गोंधळ, धावपळ नेहमीप्रमाणेच आहे. शहरातील अशा परिस्थितीचा व दुष्काळाचा कसा संबंध लावायचा? संपादकांनी दुष्काळाबाबत अगदी योग्य व्यक्तीकडून हा रिपोर्ताज करवून घेतला आहे. आसाराम लोमटे यांनी आपल्या प्रवाही आणि प्रभावी लेखनशैलीने दुष्काळाचे व पाणीटंचाईचे भीषण चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभे केले आहे. मराठी वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवण्यांतून व इतरही नियतकालिकांतून या वर्षाच्या दुष्काळाबाबत काही लेख आले आहेत. परंतु महाराष्ट्रात फिरून एकसंध असा ‘आँखो देखा हाल’ साधनाच्या या अंकात आला आहे, त्याला तोड नाही. त्याबद्दल आसाराम लोमटे कौतुकास पात्र आहेत.
-प्रभाकर रामचंद्र बटगेरी, सोलापूर

वास्तवदर्शी रिपोर्ताजला सलाम!

दि.6 जुलैचा साधना : दुष्काळ विशेषांक वाचला. पत्रकार आसाराम लोमटे यांनी दुष्काळी भागाचा प्रत्यक्ष दौरा करून लिहिलेला रिपोर्ताज वाचून मन भयभीत झाले. हे जर असेच चालू राहिले तर पुढील पिढीला किती संकटांना तोंड द्यावे लागेल, या विचाराने मन उदास झाले. दुष्काळ हवाहवासा वाटणारे सरकारी बाबू, पुढारी, टँकरलॉबी, छावणीचालक यांचा दृष्टिकोन या निमित्ताने दिसून आला, समाजाची अधोगती झालेली पाहून भारत कधी महासत्ता होईल असा प्रश्न पडतो. सामान्य माणसांचे जीवन खूपच खडतर झाले आहे, त्यांच्या मृत्यूलाही फारशी किंमत नाही. या वास्तवदर्शी रिपोर्ताजला सलाम!

-डॉ.संजय लढ्ढा, शेवगाव, जि.अहमदनगर   

Tags: वाचकपत्रे प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके