डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नक्षलवादी चळवळ स्वीकृत हिंसा ही लोकशाही विरोधी आहे हे कुणीही नाकारत नाही, पण हे स्वीकारतानाच तिची प्रेरणा आणि पूरक परिस्थितीचा विचार व्हावा असा यां विश्लेषणाचा मथितार्थ आहे. तिची पूरक परिस्थिती ही लोकशाही व्यवस्थेच्या नावाखाली चालणारी धन दांडग्यांची मनमानी, सामाजिक भांडवलाच्या आधारावर उच्च जातीयांची मनमानी आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या हस्तक्षेपातून उद्‌भवलेले प्रश्नही आहे आणि त्यामागील प्रेरणा ही लोकशाही व्यापक बनवणारी, तिचा आशय व्यापक करणारी, तिची फळे सर्वांना चाखावयास मिळावी असे म्हणणारी आहे. ही बाब समजल्याशिवाय नुसती पोलिसी सज्जता, लष्करी उठाठेव निष्फळ ठरेल!

नक्षलवादाचं आव्हान पेलायचंय!

गडचिरोलीतील 15 पोलिस मारले गेले. या निमित्ताने साधनाने संपादकीयामध्ये नक्षलवादी चळवळीवर एक टिपणी (नक्षलवादाचे आव्हान पेलवणार तरी कसे? : 14 फेब्रुवारी 2009 चा अंक) केली आहे. संपादकीय वाचून संपादकाच्या संबंधित प्रश्नाच्या आकलनाबाबत आणि भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होतात. संपादकीयामध्ये मांडलेल्या जवळपास सहा-सात मुद्यांमध्ये बरीच संदिग्धता आणि विसंगती जाणवते. ‘नक्षलवाद’ वाढतो आहे ही गंभीर बाब आहे, याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा आणि ते जर‘साधना’ सारख्या नामांकित साप्ताहिकाच्या पुढाकारातून होत असेल तर खूपच चांगली बाब आहे. पण संपादकीय टिपणीचा सूर असा आहे की, नक्षलवादी आता अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचार करणारे यांनाच मारत नाहीत तर ते जनतेवर दहशत बसवतात. शिवाय तस्करी व लूटमारी करतात. हा मुद्दा संपादकांनी अधिक स्पष्ट करायला हवा होता. 15 पोलिसांची हत्या ही दु:खद घटना आहे, पण यावरून नक्षलवादी विनाकारण निष्पाप लोकांना मारतात असा निष्कर्ष काढणे उथळ स्वरूपाचे आहे. शिवाय संपादकांनीच नमूद केलेल्या अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या यादीमध्ये सावकार, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी, राजकारणी इत्यादी सोबतच पोलिसांचाही समावेश आहे. मार्क्स, लेनिन, माओ यांच्या वर्गसंघर्षाचे विचार चारू मुजुमदार व कनू संन्याल यांना अर्धेकच्चे समजले होते, या निष्कर्षाप्रत संपादक कसे येतात हे या लेखातून समजत नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या ‘हजारो नक्षलवादी युवक तुमच्या नावावर प्राण द्यायला तयार आहेत, त्यांना थांबवत का नाही?’ या प्रश्नाला उत्तर देताना कॉ. मुजुमदार म्हणाले होते की, ‘जे होत आहे तेच होत राहील, हे युवक माझ्यासाठी नव्हे तर क्रांतीच्या आदर्शासाठी मरायला तयार आहेत.’ कॉ.मुजुमदारांना माओ प्रमाणे भक्कम जनाधाराचे वर्ग लढे उभे करता आले नाहीत, पण त्यांचे आकलन अर्धेकच्चे होते हे कशावरून?

संपादकांनी ‘नक्षलवाद’ हा विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे असे म्हटले आहे. दुसऱ्या एका वाक्यात ते सांगतात की, (फक्त) नक्षलवादी भागाच्या सर्वांगीण विकासातून हा प्रश्न सोडवायला पाहिजे. नक्षलवाद हा विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे, हे जसे ठासून सांगतात, त्याप्रमाणे विकृत विकास किंवा विषम विकास याचेच अपत्य नक्षलवाद आहे हे सांगत नाहीत. जरी सांगत असले तरी त्याचा भर नक्षलवादी भागाच्या विकासातील त्रुटीबाबत मर्यादित आहे. त्यांना असे वाटत असावे की, नक्षलवादी भाग सोडून बाकी सर्वमंगल आहे. नक्षलवादाचा हा प्रश्न कसा सोडवायचा याबाबत पोलिसी कार्य क्षमता- मग त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण करणे, त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देणे अशा उपाययोजनेवर जास्त भर देतात. त्यांच्या मते नक्षलवाद का रूजतो आणि का वाढतो, या संदर्भातखूप विचार मांडले गेले आहेत. आता कृती करण्याची वेळ आली आहे आणि ती कृती म्हणजे कार्यक्षम पोलिसांद्वारे सर्व नक्षलवादी संपवणे, असाच सूर या संपादकीय टिपणीचा निघतो.

ऊठसूट लोकांना मारणारे, कोणी तरी चारू मुझुमदार नावाच्या महाशयाने कधीतरी सांगून गेलेल्या बहकावणाऱ्या विचाराने वेडे असणारे क्रूर बंदूकधारी, जंगलात राहणारे अशी नक्षलवादाची कल्पना करणे किंवा नक्षलवादींनी किती निष्पाप लोकांना कुठे, कसे मारले हे सांगून पोलिस, लष्कर यांच्या सज्जतेतून तो प्रश्न सोडवला पाहिजे अशी चर्चा आपण अनेकदा ऐकतो. नक्षलवाद या गुंतागुंतीच्या प्रश्नासंबंधीची उथळ, वृत्तपत्रीय चर्चा दोन कारणांनी संभवते. एकतर प्रश्नाचे नीट आकलन न झाल्याने त्यातून अशी कल्पना निर्माण होते किंवा प्रश्नाचे नीट आकलन असूनदेखील प्रस्थापित हितसंबंधाच्या प्रभावातून किंवा प्रस्थापित व्यवस्थेतील आपल्या हितसंबंधांमुळे दारिद्य्र, सामाजिक विषमता, अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचार, सरकारी अनास्था इत्यादी नक्षलवादाच्या मूळ कारणांकडे दुर्लक्ष केले जाते.

नक्षलवादाच्या नैतिक योग्य-अयोग्यतेचा प्रश्नच उद्‌भवत नाही, कारण तो काही खुशीखुशीने स्वीकारलेला मार्ग नाही. मात्र प्रस्थापित व्यवस्थेने अवैध ठरवलेल्या मार्गाने, एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेत राहून, तुटपुंज्या शस्त्रास्त्रांद्वारे प्रचंड शक्तिशाली हिंसक राज्यव्यवस्थेशी टक्कर घेणे हे अव्यवहार्य ठरते. परंतु अभ्यासकांनी, विश्लेषकांनी, आपण पुरोगामी आहोत असे ज्यांना वाटते त्यांनी नक्षलवादाचे थेट आकलन वाढवायला हवे. कारण या नंतरच्या काळात नक्षलवाद वाढत जाईल अशी स्थिती निर्माण होत आहे. उच्च  शिक्षणाच्या पदव्या घेऊन बाहेर पडणारे तरुण केवळ डोनेशन देऊ न शकल्यामुळे बेकार राहतात. अंगात हत्तीचे बळ असूनही हाताला काम नाही, ज्या जंगलाचे पिढ्यान्‌पिढ्या रक्षण करत आले आहेत अशा आदिवासींना पर्यटन स्थळ, उद्याने किंवा इतर विकास प्रकल्पांच्या नावे विस्थापित केले जाते. विमानतळ, मॉल्स,एसईझेड इत्यादींसाठी झोपडीतील कष्टकऱ्यांचे संसार आणि त्यांना पोसणारे शेत त्यांच्यापासून हिसकावून घेतले जाते, इत्यादी विकृतीचा बळी ठरलेल्या व्यक्तींकडून त्याने काम करावे असे (प्रस्थापित) समाजाची अपेक्षा असते? त्याने साधनाचा अंक वाचून सुसंस्कृत लोकशाही मूल्य आत्मसात करण्यासाठी वर्गणीदार होणे तर दूरचेच पण ते त्याला फुकट वाचावयास दिले तरीसुद्धा ते वाचायला पोटात अन्न पाहिजे. अशा बळींनी चळवळीत सामील व्हायला पाहिजे असेही म्हटले जाईल. पण आज कोणत्या चळवळी शिल्लक आहेत. ज्या मूलभूत विकृत विकास धोरणाच्या विरोधी भूमिका घेऊन उभ्या आहेत. केवळ सभा, संमेलने घेणे, जयंत्या,  उत्सव, जन्मशताब्दी साजरी करणे आणि आपली एकगठ्ठा मते चळवळीची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मालकी मानणाऱ्या प्रस्थापितांच्या हस्तकाकडे सुपूर्द करणे, इतकेच शिल्लक आहे. अलीकडे चर्चेचे विषय बनलेल्या एनजीओज्‌नी तर रचनात्मक कामाची गरज स्पष्ट करीत चळवळीचा आशयच खाऊन टाकला आहे.

या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ नक्षलवादी कारवायांचे समर्थन करणे असा न घेतलेला बरा. नक्षलवादी चळवळ स्वीकृत हिंसा ही लोकशाही विरोधी आहे हे कुणीही नाकारत नाही, पण हे स्वीकारतानाच तिची प्रेरणा आणि पूरक परिस्थितीचा विचार व्हावा असा यां विश्लेषणाचा मथितार्थ आहे. तिची पूरक परिस्थिती ही लोकशाही व्यवस्थेच्या नावाखाली चालणारी धन दांडग्यांची मनमानी, सामाजिक भांडवलाच्या आधारावर उच्च जातीयांची मनमानी आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या हस्तक्षेपातून उद्‌भवलेले प्रश्नही आहे आणि त्यामागील प्रेरणा ही लोकशाही व्यापक बनवणारी, तिचा आशय व्यापक करणारी, तिची फळे सर्वांना चाखावयास मिळावी असे म्हणणारी आहे. ही बाब समजल्याशिवाय नुसती पोलिसी सज्जता, लष्करी उठाठेव निष्फळ ठरेल!

बसवंत विठाबाई बाबराव, राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

अपेक्षा आणि आक्षेप?

‘गडचिरोली जिल्ह्यात 150 नक्षलवाद्यांनी 15 पोलिसांना ठार केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 1500 पोलिसांची फौज पाठवली या घटनेवर केवळ प्रतिक्रिया देणारे अवघ्या 300 शब्दांचे संपादकीय टिपण ‘नक्षलवादाचे आव्हान पेलवणार तरी कसे?’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. त्यामुळे नक्षलवादाच्या समस्येचा उगम, विकास व विस्तार अशी विस्तृत मांडणीची अपेक्षा त्या टिपणातून करणे योग्य नाही. पण तरीही एका तरुणाच्या मनातील व्यथा-वेदना व्यक्त व्हावी म्हणून बसवंतचे काहीसे विस्कळीत पत्र, संपादकीय कात्री न लावता छापले आहे. वरील पत्रातील मुख्य आक्षेप (जाड ठशाच्या मजकुरातील) पूर्णत: चुकीचा आहे, कारण संपादकीयातील मूळ परिच्छेद असा आहे... ‘‘या बाबतचा विचार आतापर्यंत खूप मांडला गेला, पण त्यानुसार कृती झाली नाही. पर्यायाने आज विविध राज्य सरकारे व केंद्रसरकार यांना एकत्र येऊन ठोस व प्रभावी कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नक्षलवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास शक्य तितक्या वेगाने करीत राहणे आणि त्या भागातील पोलिसदल अधिक सक्षम व भक्कम बनवत राहणे अशा दुहेरी मार्गाने धावावे लागेल. शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी आणि उद्योग व व्यापार असा हा दीर्घकालीन प्रवास विकासासाठी करावा लागणार आहे. पण भौगोलिक परिस्थितीच्या मर्यादा, प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता व पायाभूत सुविधांचा अभाव हे तेथील विकासाच्या मार्गातील अडथळे ठरणार आहेत. त्यातच भर म्हणजे नक्षलवादाने प्रभावीत असलेल्या क्षेत्रात काम करायला नोकरदार, स्वयंसेवी संस्था व उद्योग-व्यापार करू इच्छिणारे लोक तयार करणे हे मोठेच आव्हान ठरणार आहे. हे आव्हान पेलवण्यासाठी त्या भागातील पोलिस-दल कार्यक्षम असले पाहिजे. पण परिस्थिती नेमकी उलटी आहे. अकार्यक्षम, भ्रष्ट किंवा नको असलेले अधिकारी व पोलिस अशा भागात पाठवले जातात. आणि जे कोणी नक्षलवाद्यांशी मुकाबला करू इच्छितात त्यांच्या हाती पुरेसे शस्त्र नसणे इथपर्यंत बिकट अवस्था केली आहे. आणि त्यामुळेच 15 पोलिस मारले गेल्यानंतर 1500 पोलिस पाठवण्याची नामुष्की सहन करावी लागली.

संपादक, साधना

जे.बी. डिसूझा व शिरीष पटेल यांचे नागरी निवारा प्रकल्पातील योगदान महत्त्वाचे...

7 मार्चच्या साधनात दिवंगत प.बा.सामंत यांच्या बद्दल वैशाली रोडे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. नागरी निवारा परिषदेचे भूतपूर्व कार्यकारी अधिकारी दिवंगत जे.बी.डिसोझा व प्रकल्प व्यवस्थापक आर्किटेट श्री.शिरीष पटेल यांनी विश्वस्तांनी लाच देण्याचं नाकारून घेतलेल्या काही निर्णयांवर टीका केली आहे असा उल्लेख त्या लेखामुळे आहे. या उल्लेखामुळे या दोन सल्लागारांबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे, म्हणून पुढील खुलासा करीत आहे.

महानगरपालिका व अन्य खात्यांतर्फे प्रकल्पांच्या कामांना मंजुरी मिळण्यात होणारी दिरंगाई टाळण्यासाठी बी.ई.बी. कंपनीला टेंडर देताना त्या दोघांनी सल्लागार म्हणून एक पर्याय विश्वस्तांपुढे ठेवला, ज्यात सदर मंजुरी मिळण्याची जबाबदारी कंत्राटदाराने घ्यावयाची होती. त्याबद्दल कंत्राटाची रक्कम वाढवून द्यावी लागणार होती. विश्वस्तांनी सदर पर्याय नाकारला व मंजुरीची कामे पार पाडण्याची जबाबदारी प्रकल्पाकडे घेतली. विश्वस्तांचा हा निर्णय श्री.जे.बी.डिसूझा व श्री.शिरीष पटेल यांनी स्वीकारला व त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. ‘संघर्ष नागरी निवाऱ्याचा’ ह्या पुस्तकातील शिरीष पटेलांच्या लेखात तर त्यांनी सदर निर्णयाबद्दल विश्वस्तांचे कौतुकच केले आहे.

जे.बी.डिसूझा व शिरीष पटेल हे नागरी निवारा परिषदेशी गेली 15 वर्षांहून अधिक काळ संबंधित आहेत. हा प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये त्या दोघांचा अतिशम महत्त्वाचा वाटा आहे. या योगदानाबद्दल विश्वस्त त्यांचे  नेहमीच ऋणी राहतील.

मृणाल गोरे, विश्वस्त ‘नागरी निवारा परिषद’, मुंबई 63.

यादवांना नेमके काय भोवले?

डॉ.आनंद यादवांनी अखेर सद्य:स्थितीचा विचार करून अध्यक्षपदाचा ते पद स्वीकारण्यापूर्वीच राजीनामा दिला. येथे सद्य:स्थिती म्हणजे वारकऱ्यांचा प्रचंड दबावच. क्षमा, माफीनामा झाल्यावर वारकऱ्यांचा अहंकार शमला नाही. राजीनाम्याने तर तो बळावलाच असणार. न्यूज चॅनेलवरील एका प्रश्नाला उत्तर देताना तर एकजण म्हणाले की, ‘आम्ही स्वत:ला संत समजत नाही’. ही नम्रता नसून टाकलेला डाव असावा. आपणास नेमके काय भोवले ते आता डॉ.यादवांनीच ठरवावे; लेखन स्वातंत्र्य की सामाजिक समरसता चळवळीशी जवळीक?

श्री. वि. सहस्रबुद्धे

Tags: श्री. वि. सहस्रबुद्धे लेखन स्वातंत्र्य अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ.आनंद यादव यादवांना नेमके काय भोवले? मृणाल गोरे नागरी निवारा परिषद जे.बी.डिसोझा वैशाली रोडे प.बा.सामंत अपेक्षा आणि आक्षेप? जे.बी. डिसूझा व शिरीष पटेल यांचे नागरी निवारा प्रकल्पातील योगदान महत्त्वाचे बसवंत विठाबाई बाबराव लोकशाही कनू संन्याल चारू मुजुमदार माओ लेनिन मार्क्स गडचिरोली नक्षलवादाचं आव्हान पेलायचंय सुहास पळशीकर मराठी भाषा बहुभाषिक देश प्रदीप तत्सत शरद खेडेकर सार्वजनिक व्यवहारामधल्या विवेकाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न वाद-संवाद साधना साप्ताहिक साधना मासिक S.v. Sahastrabuddhe साधना Writing Freedom Dr. Aanand Yadav Yadvana Nemake kaay bhovale Nagari nivara Parishad Mrunal Gore J.B. Desouza Nagari Nivara Parishad Viashali Rode P.B.Samant J.B. Desouza va Shirish Patel yanche nagari nivara praklpatil yogdan mahttvache Apeksha aani Aakshep Baswant Vithabai Babrao Democracy Kanu Sannyal Charu Mujumdar Maao Lenin Marks Gadchiroli Nakshalwadach aavhan pelayach kas Suhas Palshikar Marathi language Multingual Country Pradip Tatsat Sharad Khedekar Sarvajanik Vyvaharamadhlya vivekacha paathpurava karnyacha prayatn President’s Resigne Debate Sadhana Magzine Weekly Sadhana – Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात