डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री.ज्ञानेश्वर मुळे यांनी ‘सा निशा पश्यतो मुने:’ याचे केलेले मराठी भाषांतर ‘जागृत जगात ज्ञानी लोकांना रात्र दिसते’- तद्दन प्रश्न, उपप्रश्न आणि असमाधान उपस्थित करणारे आहे. या श्लोकाच्या बाबतीत भगवान श्री.रजनीश यांनी म्हटले आहे की, ‘जी सगळ्यांसाठी अंधारी रात्र आहे तीसुद्धा संयमींसाठी जागरूकतेचा क्षण आहे. जी सगळ्यांसाठी निद्रा आहे तीसुद्धा ज्ञानी माणसासाठी जागृती आहे. हे महावाक्य आहे. हे सामान्य वक्तव्य नाही. हे महावक्तव्य आहे. याचे बहुआयामी अर्थ आहेत. दोन-तीन आयाम समजून घेणे आवश्यक आहे. 

जागते रहो 

श्री.ज्ञानेश्वर मुळे यांचा एक लेख ‘लोळणे विरुद्ध पळणे’ साधना साप्ताहिकाच्या 7 जुलै 2012 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी शेवटी म्हटले आहे की, ‘आमच्या या चळवळीचा नियम साधा आहे. जिथे असाल तिथे आराम करा, डोळे मिटा, शांतपणे मंद गतीने चाललेल्या जगाच्या विचाराने आनंदी व्हा. स्वप्नं पहा, दिवास्वप्नंही पहा. ‘यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने: (जागृत जगात ज्ञानी लोकांना रात्र दिसते!)’

वरील संस्कृत चरणातील ‘जागृति’ हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर वाटला नाही. त्यामुळे बरोबर शब्द कोणता आहे हे मुळातील मजकुरात पाहावे असे वाटले. पण वाट दिसेना, कारण ती संस्कृत रचना लेखकाने कोणत्या ग्रंथातून आणली आहे, हे त्या लेखात दिलेले नाही. मुळात तो शब्द कसा आहे हे पाहण्यासाठी मी चुळबूळ करू लागलो. पण वाट मिळेना. लेखकाने वापरलेला एखादा महत्त्वाचा चरण नावगाव, पत्ता न सांगता वाचायला लागणे म्हणजे वाचकाला टांगणीला लावणे होय. भरीस भर म्हणून त्या संस्कृत वचनाचे कंसातील मराठी भाषांतरही समजूतदार असण्याऐवजी त्रोटक वाटत होते. आणि त्यासाठी म्हणूनही त्या संस्कृत वचनाचे मूळ वसतिस्थान माहीत करून द्यायला हवे होते. पण लेखकाने याबाबत ‘मंद आराम’ केला होता. 

मी पार सैरभैर झालो. आणि मग त्या संस्कृत वचनाचा माग काढणे सोडून दिले. लेखकाने सांगितल्याप्रमाणे ‘जिथे होतो तिथे आराम केला, डोळे मिटले.’ तेव्हा अचानकपणे सुचले की हा संस्कृत चरण कदाचित भगवद्‌गीतेतला असावा. पण तेवढ्या सुचण्याने प्रश्न सुटत नव्हता. तो चरण गीतेच्या कोणत्या अध्यायात असेल? तेवढ्यासाठी अठरा अध्याय वाचत बसायचे काय? अध्यायाचा क्रमांक मिळाला तरी त्या अध्यायातील कितव्या क्रमांकाचा हा श्लोक असेल? पण श्लोकाचा क्रमांक शोधण्यासाठी त्या चरणाचा पूर्ण श्लोक आवश्यक होता. पण तेही काम लेखकाने केलेले नव्हते. मग श्लोकांची सूची बघणार तरी कशी? गोची. सगळी गोची... सगळा दिवस असा वाया गेला. 

दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहाने विनोबांची गीताई घेतली आणि पहिल्या श्लोकापासून प्रत्येकाची कसून तपासणी सुरू केली. पहिला अध्याय नकारघंटा. मग घेतला दुसरा अध्याय. मनाशी म्हटले श्री.ज्ञानेश्वर मुळे यांचा श्लोक मिळो ना मिळो, गीतेची उजळणी तरी होते ना! असे मनाला समजावत पुढे पाठ चालू ठेवला. स्थितप्रज्ञाचे श्लोक सुरू झाले. 65 वा श्लोक पुढ्यात आला. ‘प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडूनियां।प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे।।’ वाचून दम घेतला. आणि चार पावलांतच हवा तो श्लोक पुढ्यात येऊन ठाकला. सर्व भूतास जी रात्र, जागतो संयमी तिथें सर्व भूतें जागीं, ज्ञानी योग्यास रात्र ती।।69।।  

श्री. ज्ञानेश्वर मुळे मला अबोलपणे बोलले, ‘गडबड करू नका. शांतपणे मंद गतीने चाललेल्या जगाच्या विचाराने आनंदी व्हा.’ त्या आनंदाच्या भरातच संस्कृत गीतेतला 69 वा श्लोक वाचला. 

या निशा सर्वभूतानाम्‌ तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:।।69।।

सम्पूर्ण प्राणियों के लिए जो रात्री है, उसमें संयमी पुरुष जागता है। और जिसमें सब भूतप्राणी जागते है, मुनि के लिए वह रात्री है।

म्हणजे श्री.ज्ञानेश्वर मुळे यांनी ‘सा निशा पश्यतो मुने:’ याचे केलेले मराठी भाषांतर ‘जागृत जगात ज्ञानी लोकांना रात्र दिसते’- तद्दन प्रश्न, उपप्रश्न आणि असमाधान उपस्थित करणारे आहे. या श्लोकाच्या बाबतीत भगवान श्री.रजनीश यांनी म्हटले आहे की, ‘जी सगळ्यांसाठी अंधारी रात्र आहे तीसुद्धा संयमींसाठी जागरूकतेचा क्षण आहे. जी सगळ्यांसाठी निद्रा आहे तीसुद्धा ज्ञानी माणसासाठी जागृती आहे. हे महावाक्य आहे. हे सामान्य वक्तव्य नाही. हे महावक्तव्य आहे. याचे बहुआयामी अर्थ आहेत. दोन-तीन आयाम समजून घेणे आवश्यक आहे. 

‘एकतर अगदी सरळ अर्थ म्हणता येईल- असा शब्दश: अर्थ आहे तोसुद्धा याचा एक अर्थ आहे. साधारणपणे गीतेवर केलेली प्रवचने गीतेचा तथ्यगत अर्थ करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ही तर फारच चुकीची गोष्ट आहे की ह्या श्लोकाला ‘मेटॅफर’, रूपक म्हणून मान्यता मिळत आली आहे. पण तो श्लोक फक्त मेटॅफरच नाही. ‘जेव्हा ही गोष्ट सांगितली जाते की, जी सगळ्यांसाठी निद्रा आहे, तीसुद्धा संयमी आणि ज्ञानीसाठी जागरण आहे- हा पहिला अर्थ अगदी शाब्दिक आहे. जेव्हां तुम्ही रात्री झोपी जाता, तेव्हासुद्धा संयमी नाही झोपत. हे प्रथम समजून घेतले पाहिजे, कारण  आजवर हे सांगण्याची हिंमत केली गेली नाही. नेहमी याचा अर्थ सांगण्यासाठी ‘मोहरूपी निद्रा’ इत्यादी गोष्टी सांगितल्या गेल्या. ह्या सूत्राचा पहिला अर्थ अगदीच शाब्दिक आहे. ‘जेव्हा तुम्ही रात्री झोपता, तेव्हासुद्धा ज्ञानी झोपत नाही.’ 

ह्याचा अर्थ असा आहे का की, अंथरुणावर पडत नाही; ह्याचा अर्थ असा आहे का की, डोळे झाकत नाही, ह्याचा अर्थ असा आहे का की, रात्री तो आराम करत नाही? नाही, हे सगळे तो करतो, तरीसुद्धा तो नाही झोपत. दोन-तीन उदाहरणांवरून हे समजून घ्या. ‘‘कृष्ण म्हणतो की, जी सगळ्यांसाठी अंधारी निद्रा आहे, तीसुद्धा ज्ञानी पुरुषासाठी जागरण आहे. ‘‘तुम्हीसुद्धा पूर्णपणे नाही झोपत. कारण ज्ञानाचा कोणता ना कोणता तरी कोपरा तुमच्यात जागा असतो. इथे जेवढे लोक बसले आहेत, जर ते सगळे झोपी गेले आणि रात्री कोणी येऊन ओरडला, ‘राम.’ तर सगळ्यांना ऐकू नाही येणार. पण ज्याचे नाव राम असेल, तो पटकन जागा होऊन उठेल, अरे कोणी हाक मारली? कान सगळ्यांना आहेत, पण सगळे झोपले आहेत. ‘राम’ शब्द निनादला आहे आणि सगळ्यांना ऐकू आला, पण जो ‘राम’ आहे, तो म्हणतो की, ‘कोण बोलावते आहे? रात्रीच्या वेळी कोण गडबड करतो आहे? झोपू नाही देत?’ काय झाले!

नक्कीच ह्याच्यात चेतनेचा एक कोपरा ह्या रात्रीच्या वेळीसुद्धा जागा आहे; पहारा करतो आहे; ओळखतो की राम नाव आपले आहे. ‘आई रात्री झोपली आहे, बाहेर वादळ येवो, वीज चमको, तिची झोप मोडत नाही, पण तिचे बाळ थोडेसे किरकिरले तर ती लगेच त्याच्यावर आपला हात ठेवील. तिच्यामध्ये एक हिस्सा जागत असतो. आईचा हा हिस्सा पाहत राहतो. बाळाला काही कमीजास्त होत नाही ना! आणि बाळाची ही चुळबूळ इतकी हळुवार असते की आईच्या एका हिस्स्याला जागे रहावेच लागते. एक तात्कालिक व्यवस्था असते आतमध्ये. ‘इमर्जन्सी मेजर’ आहे तो आमचा. 

‘कृष्ण म्हणतो की ज्ञानी पुरुष झोपेतसुद्धा जागा राहतो. पहिला अर्थ, पहिल्या आयामचा अर्थ ‘वास्तविक निद्रेतसुद्धा जागरत असते. ‘आणि मी आपल्याला सांगतो की हे फार कठीण नाही. जो माणूस दिवसा जागत्या भागात बारा तास जागा राहून जगतो, तो रात्री जागता राहत झोपतो. ‘तुम्ही रस्त्यावर चालता आहात, जागे राहून चाला. तुम्ही जेवण करता आहात, जागे राहून खा. आपण कोणाशी बोलत आहात, जागे राहून बोला. ऐकता आहात, जागे राहून ऐका. हे काम झोपेतल्या झोपेत, ‘स्लिपी स्लिपी’प्रमाणे न होवो.

‘जर आम्ही जागे असतानासुद्धा झोपेत असतो, तर मग झोपेत जागे राहणे फार कठीण आहे. म्हणून मी म्हणतो की, ज्या लोकांनी गीतेतल्या ह्या महावाक्यावर भाष्य केले आहे, त्यांना स्वत:ला हा अनुभव आलेला नसतो. नाही तर हा पहिला अर्थ त्यांनी डावलला नसता. त्यांना स्पष्टपणे माहीत नसते की, झोपेत जागे राहता येते. पण जागे असलेले लोक झोपलेल्या लोकांनी झोपेत जागे रहावे हा विचार तरी कसा करू शकतील? म्हणून मग ते सगळे ‘मेटॅफोरिकल (रूपक) अर्थ करतात. तो अर्थ बरोबर नाही. ‘जो माणूस दिवसा जागा राहून चालेल, उठेल, बसेल, तो रात्रीसुद्धा जागा राहून झोपेल. 

देवीदास बागूल, पुणे

----

पक्ष्यांच्या वस्त्या माझ्या अंगणात होताना न्याहाळत राहिलो 

प्रिय ज्ञानेश्वर मुळे, आपल्या ‘स्लो-डाऊन क्लब’चे सभासदत्व आम्हाला द्याल काय? 

त्याचं असं झालं! धावलो, खूप धावलो! कधी परिस्थितीच्या मागे, कधी शिक्षणाच्या तर कधी पैशाच्या! एकूण प्रवास धावण्याचाच! मुंबईत असताना लोकल पकडा, बस पकडा, मस्टर पकडा! पाण्याच्या, दुधवाल्याच्या वेळा पकडा! खूप धावलो घाम गाळत! अख्खी मुंबई माझ्याबरोबर धावत होती! 

अरबस्थानात गेलो. लहानपणी खांद्यावर आडवी काठी ठेऊन गाणं गुणगुणत शांतपणे रानातून चाललेला गुराखी पाहिला होता. त्याचा दुपारच्या शांत वेळी झाडाखाली बसून वाजवलेला पावाही ऐकला होता. त्याचाच भाऊ मला तिथे भेटला. उंटाच्या चालीने चालणारा! हुक्का पीत बसलेला! तेथे पळण्याची शर्यत नव्हती! कोणी म्हणेल की, फुकटच्या तेलाने दिलेले हे शहाणपण आहे! पण ते तसे नव्हते. टोळीने राहण्याच्या संस्कृतीतून समृद्धीच्या वाटेने जातानाही जपलेला तो संथपणा होता. एका बाजूला लखलखणारी समृद्धी तर दुसरीकडे अलिप्त संथपणा! 

वाळूचे वादळ होईल, मृगजळ चकवा देईल, वाळवंटामध्ये वाट चुकेल! म्हणून काय झाले? त्यांना कोणी मागास म्हणोत बापडे! उंटाच्या पिलांना पिकअप व्हॅनमध्ये घालून घरी नेणाऱ्या स्त्रिया पाहिल्यावर त्यांना मागास कसे म्हणावे? प्रत्येकाचा वाहण्याचा वेग वेगवेगळा हेच खरे!

मी तर माझ्या ज्ञानाच्या आणि कष्टाच्या बदल्यात इथली समृद्धी माझ्या देशात न्यायला आलो होतो. माझ्या कुटुंबासाठी आणि म्हातारपणाची तरतूद करण्यासाठी! तसा उशीरच झाला होता, म्हणून कमालीचा धावत होतो. सांधा बदलताना कधी माझी  गाडी खडखडतही होती. मायदेशात परतण्याचे ठरवले आणि मुंबई सोडून पुण्यात यायचे ठरवले! तरुणपणात शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर भेटलेले आणि पुढे आयुष्यभर ज्यांनी प्रेमाचा ओलावा दिला त्या सुहृदांच्या आठवणींमुळे पुण्याची ओढ होती. 

¬¬येथे पुन्हा एकदा संथगतीचा अनुभव येत होता. तीस वर्षांपूर्वीचे पुणे कमालीचे संथ होते. मुंबईच्या तुलनेत स्लो-डाऊन क्लबच म्हणा ना! घरबांधणीला वेग येईना!
पुन्हा एकदा सांधे बदलून कामाच्या मागे पळायला लागलो तर मुंबईच्या आणि पुण्याच्या वेगाचा मेळ बसेना. परिस्थितीशी जुळवून घेत पुन्हा धावतच राहिलो, पण आता आपल्या स्लो-डाऊन क्लबचा सदस्य झालो.  रस्त्यावरून पळण्याऐवजी चालायला शिकलो. घराचा कोपरा न्‌ कोपरा फुला-पानांनी भरून टाकला. निसर्ग कवेत घेत पक्ष्यांच्या वस्त्या माझ्या अंगणात होताना न्याहाळत राहिलो आणि त्यामधून मिळणारा आनंद इतरांना वाटतानाही तितकाच स्थिरावलो आहे.
ना धावाधाव, ना आसक्ती, ना कुणाशी चढाओढ! तुमच्या स्लो-डाऊन क्लबच्या उद्दिष्टाप्रमाणे हे लोळणेच चालू आहे नाही का! 

दिगंबर उगावकर, पिंपळे निलख, पुणे    

----

‘लोळण’समाज संस्थापकास पत्र... 

आंतरराष्ट्रीय लोळण संप्रदाय संस्थापक 
श्री. ज्ञानेश्वर (मुळे) महाराज यांच्या 
पदकमली 
‘पळणे’ संप्रदायाचे निष्ठावंत पाईक,
प्रदीप आवटे
यांचे सादर ‘लोळण’ (लोटांगण!) 

आपल्या संप्रदायाचा जाहीरनामा वाचला, 
आम्ही थक्क झालो.
इतके थक्क की,
चक्क क्षणभर पळायचे थांबलो... 
आमच्या संप्रदायाचा कुळधर्म विसरलो...
या ‘पळणे’ संप्रदायाने संमोहित केले होते
आम्हाला,
म्हणे,
गती निव्वळ भास असतो,
पृथ्वी फिरते स्वत:भोवती
पण तरीही वाटते स्थिर,
झुकुझुकू धावते गाडी तेव्हा झाडेसुद्धा
धावत सुटतात, 
एवढे धावूनही झाडे, 
जाग्यावरून कुठे हलतात?
आता मनोमन वाटते,
आपल्या ‘लोळणे’ संप्रदायात सामील 
व्हावे,
‘पळणे’ सोडून ‘लोळणे’ अंगीकारावे...! 
पहिल्या ज्ञानेश्वरांनी, 
अचल असलेली भिंतही चालवली... 
आपण दुसरे ज्ञानेश्वर, 
पळणाऱ्याला लोळवत आहात...
कालाय तस्मै नम:
तसे फार पूर्वीच 
` In the Praise of Idleness’ 
सांगूनच गेला होता 
बर्ट्रांड रसेल... 
पण विस्मरणात जातात... 
सारे सुखाचे रस्ते,
आपणही सामील होतो, 
उंदरांच्या शर्यतीत...
एक भला मोठा उंदीर होऊन...!
‘उद्या’ लोळता यावे 
म्हणून आज पळतो आम्ही! 
पण,
‘उद्या’ला कुठे असतो शेवट? 
पण आपल्याला असतो तो, 
कधीही, कुठेही, कसाही गाठतो तो,
हे साधे सत्य विसरतो आपण! 
मेल नको, म्हटलात आपण 
पण इलाज नाही,
भारतीय पोस्ट फार पूर्वीपासून आपल्या
संप्रदायाचे निस्सीम भक्त
त्यामुळे आमचा निर्णय बदलायच्या आत 
आमचे म्हणणे,
आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 
ई-मेलचा आधार घेणे भाग पडले... 
कृपया आपल्या पंथातील आमचा प्रवेश 
आपण निश्चित करावा,
तसा मी सरकारी कर्मचारी 
म्हणजे आपल्या ‘लोळणे’ पंथातलाच, 
‘सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब’ 
ही आमची मराठी सारस्वताला दिलेली 
अमूल्य भेट...!
पण मध्येच काही कार्पोरेट व्हायरसनी 
आम्हांला पछाडले 
आणि...
आम्ही वेड्यासारखे धावू लागलो, 
तुमच्या संप्रदायात आल्यानंतर पुन्हा 
‘स्वगृही’ आल्यासारखे वाटेल... 
तेव्हा लोळत लोळत का असेना आमच्या
विनंती अर्जावर 
सहानुभूतीपूर्वक विचार करावा! 
अर्थात आपले होकाराचे पत्र येईल 
तेव्हा
ते वाचायला आम्हालाही वेळ मिळायला
हवा,
कारण आम्हीही त्या वेळी मस्त लोळत असणार... 
आणि 
आजकाल 
एका वेळी एकच काम करतो आम्ही...! 

आपला लोळण साथी 

प्रदीप आवटे, पुणे 
dr.pradeep.awate@gmail.com 

Tags: प्रतिसाद वाचक पत्रे reader's letters गीता कृष्ण उंट वाळवंट मृगजळ Gita black camel desert mirage weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके