डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाच वर्षांचा मुलगा सैनिकांवर दगड फेकण्यास तयार होतो हे कसे काय? आणि काश्मिरी पंडितांचे काय? केवळ दादरी, बाबरीनंतर काश्मीरमधील मुसलमानांना भीती वाटते, पण ते काय शिकलेले नाहीत, त्यांना बरं-वाईट आणि जगातील मुसलमान व हिंदुस्थानातील मुसलमान किंवा अगदी पाकिस्तानातील हलाखीतले मुसलमान दिसत नाहीत का? काश्मिरी जनतेला समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? पाकिस्तानला आपला देशही सांभाळता आला नाही आणि येत नाही. याआधीच्या झालेल्या भारत-पाक युद्धानंतरच्या करारात काश्मीर मुद्दा नव्हता, ही चूक नव्हे काय? युद्धात कमावले ते करारात गमावले असेच ना! साधनाच्या परंपरेला राखत काश्मीर विषयांवर लिहिताना द्वादशीवारांनी मोदी, भाजप, संघ यांना दोष देण्याचे पुण्यकर्म केले आहे. आता देशातील सर्व बुद्धिवाद्यांनी मोदींकडे आपला प्रस्ताव मांडावा आणि काश्मीरसह इतर राज्यांचा घोळ एकदाचा मिटवून टाकावा. 

राष्ट्रसंघाचा ठराव आणि 370 वे कलम 

10 सप्टेंबरच्या साधना अंकात सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेला जम्मू आणि काश्मीरवरील अत्यंत सुंदर लेख वाचावयास मिळाला. काश्मीर एकीकडे जळत असताना व वेगवेगळी मते विविध राजकीय पक्ष मांडत असताना असा लेख लिहिणे ही काळाची गरज आहे. खरेतर हा लेख साधना साप्ताहिकात न येता, वा यासोबतच मोठ्या वर्तमानपत्रात ‘रविवार’ला आला असता तर बरे झाले असते असे वाटते. मात्र या लेखात एक मुद्दा सुटल्यासारखा वाटतो, तो म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची काश्मीरबाबतची भूमिका. नेहरूंनी हा मुद्दा राष्ट्रसंघात नेला म्हणून नेहरूंवर जवळपास सर्वच पक्ष मोठी टीका करीत असतात, पण राष्ट्रसंघाचा ठराव संपूर्णपणे भारताच्या बाजूने आहे, हे अनेकांना माहीत नाही आणि गंमत म्हणजे पाकिस्तान नेहमीच ‘राष्ट्रसंघाच्या ठरावाचे पालन झाले पाहिजे’ असेच तुणतुणे वाजवीत असतो. पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केल्यानंतर राष्ट्रसंघाने एप्रिल 1948 मध्ये जो ठराव पास केला त्यानुसार... 

1. जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसलेले पाकिस्तानचे सर्व सैनिक सध्या आहेत त्या ठिकाणीच थांबतील, यापुढे कोणीही जाणार नाही. (ही रेषा पुढे लाईन ऑफ कंट्रोल म्हणून ओळखली गेली.) 

2. पुढे पाकिस्तानने आपले सर्व सैनिक, कबाईली काश्मीरच्या भूमीवरून परत बोलवावेत, पण भारताचे सैनिक काश्मिरात राहू शकतील. 

3. भारतीय सैनिक जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता टिकवून ठेवतील व कोणतीही आंतरराष्ट्रीय शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतील.

4. शांत वातावरणात जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना वाटत असेल तरच जम्मू आणि काश्मिरात सार्वमत घेतले जावे. ते मँडेटरी स्वरूपाचे नाही तर रिकमेंडरी स्वरूपाचे आहे. यापैकी एका देशाने विरोध केला तरी सार्वमत घेतले जाणार नाही. वरील स्थिती भारताच्या बाजूने आहे, असे कोणीही सांगेल. कारण जर यु.एन.च्या ठरावाचे पालन करायचे असेल तर सर्वांत अगोदर पाकिस्तानला आपली सेना काश्मीरच्या बाहेर काढावी लागेल. दुसरे चीनला दिलेला 35000 चौ. किमीचा भाग आधी खाली करावा लागेल. या दोन्ही बाबी अशक्य आहेत. (मी काश्मीरमध्ये असताना, काश्मीर हायकोर्टाच्या एका रिटायर्ड जजचे लेक्चर अटेंड केल्यानंतर वरील मुद्दा जोरदारपणे मांडला होता, कारण त्यांच्या संपूर्ण भाषणातून यु.एनच्या या ठरावाचे खोडसाळपणे वर्णन केले होते असे मला आढळले. आपल्याकडेसुद्धा हीच स्थिती आहे.) 

आणखी एक मुद्दा या लेखात थोडाफार सुटलेला दिसतो, तो म्हणजे कलम 370 च्या इतिहासाचा. काश्मिरातील पंडितांनीच ‘दिल्लीतील नोकरदार वर्ग नको तर काश्मीरमधील शिकलेल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत’ (काश्मीरमध्ये आधीपासून पंडित वर्गच शिकलेला होता), अशी मागणी मुघल काळात करून विशेष अधिकार पदरात पाडून घेतले होते. आणि मुघलसुद्धा (विशेषतः अकबर) त्यांच्यावर जाम खुश होता असे सांगितले जाते, त्यांना ‘पंडित’ हे नावही अकबराने दिले होते असे सांगितले जाते. पुढे ब्रिटिश आल्यानंतरही त्यांना याच कारणातून जमीन घेऊ दिली नाही, त्यांना दाल सरोवरात आपली हाऊस बोट बांधावी लागली होती. हीच गोष्ट पुढे संविधानाच्या कलम 370 मध्ये आलेली आहे. या दोन बाबी द्वादशीवारांच्या त्या लेखात असाव्यात असे मला वाटते. बाकी संपूर्ण लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे, द्वादशीवारांच्या लिखाणाला आजच्या महाराष्ट्रात तोड नाही, याची मला माहिती आहे. फक्त सुटलेले डायमेन्शन सांगायचा हा प्रयत्न आहे. 

योगेश दुधपचारे, चंद्रपूर. 

काश्मीरला समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? 

काश्मीर सध्या नाजूक परिस्थितीत जात असताना श्री.सुरेश द्वादशीवार यांचा ‘काश्मीर : एक अलक्षित लष्करी व मानवी वास्तव’ हा अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध केलात, त्याबद्दल अभिनंदन. पण लेखकांनी ‘काश्मीरचा प्रदीर्घ चाललेला घोळ’ केवळ काँग्रेसच्या प्रदीर्घ राजकारणाचा परिणाम आहे, असं म्हणण्याचं टाळलं आहे. आजपर्यंतची केंद्र सरकारे म्हणजेच सर्व भारतीयांनी किती कोटी पैसा काश्मीरसाठी दिला व किती खर्च झाला व किती गायब झाला याची माहिती त्यात नाही. मोठ्या भावांनी लहान भावाला (काश्मीरला) किती किती द्यायचे व कुठपर्यंत द्यायचे हेही कळत नाही. सध्याच्या सरकारने चालविलेला हिंदुत्वाचा आग्रह व मुसलमानांच्या अधिकारांचा संकोच आम्हाला तरी जाणवत नाही. आणि आपल्या देशांत मुसलमानांच्या व इसार्इंच्या अधिकाराचा संकोच झालाच असता तर इथले हिंदू बुद्धिवादी शांत बसलेच नसते, विशेष काहीही न घडता पुरस्कारवापसी झालीच की! 

शिवाय, पाच वर्षांचा मुलगा सैनिकांवर दगड फेकण्यास तयार होतो हे कसे काय? आणि काश्मिरी पंडितांचे काय? केवळ दादरी, बाबरीनंतर काश्मीरमधील मुसलमानांना भीती वाटते, पण ते काय शिकलेले नाहीत, त्यांना बरं-वाईट आणि जगातील मुसलमान व हिंदुस्थानातील मुसलमान किंवा अगदी पाकिस्तानातील हलाखीतले मुसलमान दिसत नाहीत का? काश्मिरी जनतेला समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? पाकिस्तानला आपला देशही सांभाळता आला नाही आणि येत नाही. याआधीच्या झालेल्या भारत-पाक युद्धानंतरच्या करारात काश्मीर मुद्दा नव्हता, ही चूक नव्हे काय? युद्धात कमावले ते करारात गमावले असेच ना! साधनाच्या परंपरेला राखत काश्मीर विषयांवर लिहिताना द्वादशीवारांनी मोदी, भाजप, संघ यांना दोष देण्याचे पुण्यकर्म केले आहे. आता देशातील सर्व बुद्धिवाद्यांनी मोदींकडे आपला प्रस्ताव मांडावा आणि काश्मीरसह इतर राज्यांचा घोळ एकदाचा मिटवून टाकावा. 

किशोर मधुकर काकडे, बेळगाव 

त्या पराक्रमाला योग्य सलामी! 

‘साधना’च्या वर्धापनदिन अंकातील तीन मुलांच्या सायकल प्रवासाचे वर्णन वाचले आणि मन अक्षरशः सुन्न झाले, शून्यवत झाले. अंक वाचून जे सुचले ते लिहीत आहे. सर्वप्रथम त्या तिघांना माझा त्रिवार सलाम! कारण आजच्या तरुण पिढीचे विेश म्हणजे फेसबुक, व्हाट्‌सॲप, गर्ल/बॉय फ्रेंड, पोकेमोन यांच्यापलीकडे सहसा दिसत नाही. अशा पिढीचे हे प्रतिनिधी, आपला देश जाणून घ्यायला कम्फर्ट झोन विचारात न घेता जिथे पोलिससुद्धा जात नाहीत अशा दुर्गम आदिवासी क्षेत्रात सायकलने जातात, हे खरोखरच संपादकीयात म्हटल्याप्रमाणे ‘वेडात दौडलेल्या’ वीरांचेच काम आहे. आपल्या देशात असे काही क्षेत्र आहे असे माहीत असणे आणि त्याविषयी काही जाणून घेण्याची इच्छा या तरुण पिढीला होणे ही आधीच्या पिढीला दिलासा देणारी बाब आहे. कारण वातानुकूलित खोलीत बसून आपली संस्कृती समजून घेणाऱ्या व त्यावर लिहिणाऱ्या प्रखर आंधळ्या देशभक्त, धर्म/ संस्कृतिरक्षक यांना या सायकल सफरीने अक्षरश: थोबाडीत ठेऊन दिली आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे होत असतांना आपण नक्की कोठे आहोत, या कटु वास्तवाची जाणीव करून देऊन या तिघांनी लोकांच्या डोळ्यांवरील झापडे ओरबाडून काढली आहेत. आपल्या देशातच अजून एक अज्ञात असा दुसरा देश आहे हे ज्ञात करून दिले आहे. यांच्यासारखे लोक देशाला जोडणारा पूल बनतील अशी मला आशा आहे. आणि या तरुणांनी तिथे त्या दादा लोकांच्या क्षेत्रात (त्यांच्या ताब्यात असताना) जी परिपक्वता, धीरोदात्तपणा, आपापसातला ताळमेळ दाखवलाय, सहनशीलता दाखवलीय, आत्यंतिक तणावाला ज्या पद्धतीने तोंड दिले, त्याला तोडच नाही. (कशाचे बनलेले आहात रे तुम्ही? कसं जमलं या वयात तुम्हाला हे? मित्रांनो, हा प्रवास करून व त्याचे वर्णन लिहून तुम्ही जे काही लोकांच्या समोर आणले आहे, ती मोठी देशसेवाच आहे.) 

हा आगळावेगळा प्रवास ‘साधना’ने प्रकाशित केला याबद्दल साधनालासुद्धा सलाम. दोन आठवड्यांचा एकच संयुक्त अंक काढून तीन तरुणांच्या पराक्रमाला ‘साधना’ने योग्यच सलामी दिलीय. खरे तर या प्रवासावर एखादा छानसा चित्रपटसुद्धा निघू शकतो व त्यातून दुसऱ्या भारताचे दर्शन अन्य लोकांनाही होऊ शकते, नव्हे, ते झालेच पाहिजे. मीडियानेही याची योग्य दखल घेतली पाहिजे व लोकांचे डोळे उघडले पाहिजेत असे मला वाटते. 

उत्तम जोगदंड, कल्याण

बाबांचे अभियान छान समजले आहे

आदर्श... मित्रा साधना साप्ताहिकातला तुमचा तिघांचा सर्व प्रवास वाचला. आणि आवडलाही... सुंदर प्रवासाचे, वेगळ्या अनुभवांचे खूप छान लिखाण. पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. बाबा आमटे यांचे ‘भारत जोड़ो अभियान’ तुम्हाला छान समजले आहे असे म्हणता येईल. तुमच्या घरच्यांचेही कौतुक केले पाहिजे, त्यांच्या पाठिंब्यासाठी. कारण सुरक्षितता या गोष्टीपायी अनेक पालक मुलांचा मानसिक विकास खुंटवतात... असो. ‘साधना’चेही आभार मानले पाहिजेत... तुम्हाला तुमचे खरे अनुभव तुमच्या शब्दात मांडण्याची संधी दिली. 

डॉ. अमोल पुंडे 

बातम्या थोड्या वेगळ्या होत्या 

वर्धापनदिन अंक ‘तीन मुलांचे चार दिवस’ अत्यंत अप्रतिम म्हणावा असा आहे. ‘साधना’मध्ये या तीनही मुलांना त्यांच्या स्वत:च्या शब्दांत ‘माणूस’ समजून घेण्याच्या प्रवासातील अनुभव मांडण्याची संधी दिली याबद्दल आपले विशेष कौतुक वाटते. कारण पेपरमध्ये काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या बातम्या थोड्या वेगळ्या होत्या... त्या तिघांशीही बोलल्यावर अधिक आनंद झाला. असेच काहीशा वेगळ्या विषयावर साधनाचे अंक प्रसिद्ध व्हावेत. 

अमोल पांडे 

मग त्यांना राजीनामा देण्यास का सांगितले? 

6 ऑगस्ट 2016 च्या अंकातील प्रतिसादमध्ये सूर्यकांत सापते यांचे पत्र वाचले. ते म्हणतात, ‘या प्रकरणात खडसे यांची न्याय्य बाजू घेण्याऐवजी केवळ मोदी आकसापोटी या प्रकारचे संपादकीय लिहीणे आदर्श पत्रकारितेत बसत नाही.’ तेव्हा प्रश्न असा आहे की, खडसे यांची बाजू जर न्याय्य होती तर मग पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा देण्यास का भाग पाडले? खडसे हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे सापते यांना म्हणावयाचे आहे का? निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून खडसे यांनी सर्व महत्त्वाची पदे आपल्या लेकी-सुना-जावई-बायको यांना दिली, (जेणेकरून मलई फक्त आपल्याच घरी येईल) ही गोष्ट पत्रलेखकाला ज्ञात नाही असे दिसते. 

शान्ताराम मंजुरे, अंबरनाथ (पश्चिम) 

एक आगळा वेगळा सेल्यूट... 

‘‘बस्तरच्या जंगलांमधे अन्‌ अबूजमाडाच्या पर्वत रांगांमध्ये आज जे काही चालू आहे, त्यामधे बंदुकीची गोळी लागून मरणाऱ्यांपेक्षा औषधाची गोळी नाही मिळाली म्हणून मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.’’ आज सकाळीच बिहारवरून एका व्यक्तीचा फोन आला होता. साधनाचा अंक वाचून त्यांनी फोन केला होता. अबूजमाड आणि ओडिसा या परिसरामधे केलेल्या 10-12 वर्षाच्या अनुभवांवरून ते बोलत होते. त्यांचं ते वाक्य विचार करायला लावणारं असंच होतं. मनाला अस्वस्थ करणारं होतं. आत्ता असाच एक फोन आला, कोल्हापूरहून डॉ.किरण भिंगार्डे बोलत होते. आम्ही बोलत राहिलो अन्‌ जवळजवळ दीड तास आम्ही बोलतच राहिलो. त्यांनी फोन केला तेव्हा रात्रीचे 12:30 झाले होते. ते एका इमर्जन्सी सर्जरीमध्ये होते. पेशंटला भूल दिलेली असताना मधल्या वेळेत त्यांनी कॉल केला होता. विशेष म्हणजे शोधग्राम, गडचिरोली येथे आत्तापर्यंत त्यांनी 25 वेळा मोफत शस्त्रक्रिया शिबिरे घेतली आहेत. अंक वाचल्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा असा साधना अंकासोबतचा आगळावेगळा फोटो whatsappने पाठवला.

आदर्श पाटील 

Tags: शान्ताराम मंजुरे shantaram manjure pratisad योगेश दुधपचारे jammu Kashmir yogesh dudhpachare प्रतिक्रिया प्रतिसाद जम्मू काश्मीर सुरेश द्वादशीवार replay pratisad kishor madhukar kakade jammu kashmir suresh dwadashiwar किशोर मधुकर काकडे उत्तम जोगदंड uttam jogdand amol punde adarsh patil डॉ अमोल पुंडे amol pande adarsh patil नक्षलवाद तीन मुलांचे चार दिवस श्रीकृष्ण विकास आदर्श पाटील अमोल पांडे naxlism tin mulanche char diwas shrikrishna vikas adarsh patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात