डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

28 एप्रिलच्या साधना अंकातील ‘साखर चरित्र’ हा सुनील तांबे यांचा लेख वाचला. लेखातून ऊसपिकाच्या प्रारंभापासूनचा इतिहास तर समजलाच, परंतु त्याचबरोबर पोषणमूल्य शून्य असलेल्या साखरेच्या कारखानदारीचा आणि ऊस दरावरून होणाऱ्या आंदोलनाचा, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि राजकारणावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासारखे आहे. साखरेची खरी गरज अन्नप्रक्रिया उद्योगधंदेवाल्यांनाच जास्त असून, साखरउत्पादक घटकांतील वर्गापेक्षा साखरेचा वापर करून अन्नप्रक्रिया उद्योगवालेच कितीतरी पटीने जास्त नफा मिळवितात हे लक्षात येते. यासाठी उत्पादक घटकाला योग्य न्याय मिळण्यासाठी लेखकाने काही उपायही सुचविले आहेत. खरोखर याबाबत योग्य विचार होऊन कार्यवाही झाल्यास दरवर्षीची आंदोलने थांबतील, समाजस्वास्थ्यही बिघडणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेचे आंदोलनात होणारे नुकसान टाळता येईल. लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे. 

मुत्सद्देगिरीच्या सर्व निर्णयामागची कारणे उघड करता येत नाहीत.

25 फेब्रुवारीच्या साधना अंकात नरहर कुरुंदकर यांचा ‘माऊंटबॅटन’ यांच्याविषयीचा लेख ‘भारताचा सच्चा मित्र’ या शीर्षकाखाली छापला आहे. त्यावरील दोन प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांतील एक प्रतिक्रिया श्री.अरविंद बाळ यांची असून ती 7 एप्रिलच्या अंकात आहे. यातील ‘आझाद हिंद सेने’बद्दलचा म्हणजे त्या सेनेतील सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात न घेण्याचा माऊंटबॅटनचा स्वार्थी सल्ला नेहरूंनी मानायला नको होता ह्या त्यांच्या मतांशी मी सहमत नाही. माऊंटबॅटन यांचा सल्ला पंडित नेहरूंनी मानला याचे कारण त्यांची व माऊंटबॅटन यांची मैत्री हे नव्हते, अगर त्यात कुठलाही भाबडेपणाही नव्हता, होता तो फक्त परिस्थितीचा दबाव! 

श्री.बाळ यांनी दै.सकाळचा 9 फेब्रुवारी 2003 चा अंक कुठे उपलब्ध झाल्यास पाहावा. त्यात गोविंद तळवलकरांनी ‘श्री. चंद्रशेखर दासगुप्ता’ ह्यांच्या पुस्तकाचा परिचय ‘काश्मीर ब्रिटिश डावपेच’ ह्या शीर्षकाने करून दिला आहे. मूळ पुस्तकाचे नाव आहे ‘War & Diplomacy in Kashmir’ (सेज प्रकाशन, दिल्ली) त्यात श्री.दासगुप्ता म्हणतात की 1947 साली भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश जरी स्वतंत्र झाले तरी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य नव्हते; तर वसाहतीच्या स्वराज्याच्या दर्जाचे होते. पूर्ण स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘लष्करी हालचाली व धोरणासंबंधीचे स्वातंत्र्य!’ भारत व पाकिस्तान ह्या दोन्ही देशांचे सेनापती ब्रिटिशच होते व दोन्ही सैन्यांचे सरसेनापती एकच म्हणजे ‘लॉर्ड ऑचिनलेक’. जवळजवळ 1948 पर्यंत ही स्थिती होती. त्यामुळे पंडित नेहरूंच्या मनात असते तरी ते आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात घेऊ शकले नसते असे वाटते. संशयाचा फायदा पंडित नेहरूंना द्यायलाच हवा.

आता पुढचा प्रश्न उभा राहतो तो असा की, एकदा ब्रिटिश सैन्य परत गेल्यावर व सैन्याची पूर्ण स्वायत्तता आपल्या हाती आल्यावर तरी पंडित नेहरूंनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आपल्या सेवेत का घेतले नाही? पंडित नेहरूंच्या दृष्टिकोनातून विचार करता जी कारणे संभवतात ती पुढीलप्रमाणे... त्या काळी भारत पूर्णपणे, म्हणजे शस्त्रास्त्रांपासून ते अन्नधान्य व रॉकेलपर्यंत, ब्रिटन व अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांवर अवलंबून होता. पाकिस्तानच्या विशिष्ट भौगोलिक रचनेुळे व अन्य काही कारणांनी ह्या पाश्चिमात्य देशांना पाकिस्तान स्वत:च्या पायावर उभा राहील हे पाहायचे होते. त्या दृष्टीने त्यांनी 1947 नंतर जेव्हा लगेच टोळीवाले आले तेव्हापासून पाकिस्तानचे हित जपण्याच्या दृष्टीनेच कारस्थाने केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंडित नेहरूंइतका दबदबा अन्य कुठल्याच भारतीय नेत्याचा नव्हता. (अगदी सरदार पटेलांचाही!) भारताला जी काही मदत मिळत होती; अन्नधान्याचा पुरवठा होत होता; तो पंडित नेहरूंच्या प्रभावामुळेच! अशा परिस्थितीत माऊंटबॅटनना दुखविणे नेहरूंना अवघड वाटत असावे. शब्द फिरविणारा नेता अशी आपली प्रतिमा होणे भारताला परवडणारे नाही, अशी त्यांची खात्री असावी; व म्हणून त्यांनी नाइलाजाने माऊंटबॅटनचा सल्ला मानला असावा. 

त्यावेळच्या आपल्या सैन्यात 50-60 टक्के सैनिक मुसलमानच होते. आझाद हिंद सेनाही त्यास अपवाद नव्हती. कारण युद्धकैदी म्हणून जपानने पकडलेले सैनिक भारतीय सैन्यातीलच होते व तेच सुभाषबाबूंच्या सेवेतील सैनिक होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते; पाकिस्तानची निर्मिती झाली होती. स्वाभाविकच ह्यातील काही सैनिकांचे राष्ट्रप्रेम डळमळीत झाले असण्याची शक्यता होती. खुद्द आझाद हिंद सेनेतही सर्व काही आलबेल नव्हते. पाकिस्तानवादी डोके वर काढू लागलेच होते. अगदी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला असे त्यांचे काही जवळचे सहकारीही आतून पाकिस्तानला फितूर झाले होते. (उदा. महंमद दुराणी व इकबाल शेपाई). सर्वच असे असतील असे नाही; तरी अशा विवाद्य विश्वासू सैनिकांना स्वतंत्र भारताच्या सैन्यात कसे घेणार? 

पंतप्रधानांकडे महत्त्वाच्या बातम्या येत असणारच व त्याच आधारे त्यांनी हा कटु निर्णय घेतला असणार. सर्वच गोष्टी उघड बोलता येत नाहीत ही मुत्सद्दी नेत्याची शोकांतिका! मात्र आझाद हिंद सेनेचे सर्वच नाही तरी काही सैनिक निश्चितच भारतीय सेनेत भरती करून घेतले असावेत असे मानण्यास जागा आहे. ‘विपुल’ ह्या मासिकाचा दिवाळी 2009 चा अंक पाहावा. त्यात ‘युद्धस्य कथा’ ह्या शीर्षकाखाली रोहिणी झेंडे यांनी काही निवृत्त सैनिकांचे अनुभव त्यांच्या शब्दात दिले आहेत. त्यांतील सुभेदार आनंद सिंग यांनी आपल्या कथेत म्हटले आहे की, ‘मी नेताजींच्या सेनेतून भारतीय सैन्यात आलो होतो.’ पुढे ते म्हणतात की, त्यांच्याबरोबर सुभेदार लक्ष्मीसिंग होते व तेही आझाद हिंद सेनेतून भारतीय सैन्यात आले होते. 1948 च्या पाकबरोबरच्या युद्धात हे दोघेही सहभागी झाले होते. त्यात ते म्हणतात, ह्या ‘युद्धात नेताजींच्या सेनेतील शिस्त कामी आली.’ आझाद हिंद सेनेतर्फे ते एक युद्ध लढले होते; पण फितुरीमुळे हार पदरी आली होती. मला वाटते की, वरील सर्व विवेचनावरून ‘आझाद हिंद सेने’च्या बऱ्याच सैनिकांना भारतीय सेनेत का घेतले नसावे हे स्पष्ट होईल. मुत्सद्देगिरीच्या सर्व निर्णयाांगची कारणे उघड करता येत नाहीत व असे कटु निर्णय घेणारा नेता टीकेचा धनी होतो ही शोकांतिका! पंडित नेहरू हे ह्याचे ज्वलंत उदाहरण! 

धनंजय आपटे, सिंहगड रोड, पुणे  

----

त्या शीर्षकातून केवळ अनुप्रासाचा बाज नव्हे तर सांस्कृतिक मूल्यव्यवस्थाही दिसते 

सुरेश द्वादशीवार यांच्या लेखणीने सजणारे साधनाचे ‘सेंटर पेज’ एक आगळी नवलाई घेऊन प्रकटत आहे. एकूणच का कुणास ठाऊक पण आपण राजकारणाला वर्ज्य विषय मानून पुढे जातो, पण तेही जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. आजच्या काळात तर ते सर्वस्पर्शी होऊ घातले आहे. यापूर्वीच्या ‘तारांगण’ लेखमालेमधूनही द्वादशीवार यांच्या सुप्रसन्न, टवटवीत लेखणीचा आविष्कार वाचायला मिळाला होता. द्वादशीवार हे ललित लेखक म्हणून मोठे की राजकीय विश्लेषक हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही. खरे तर त्यांच्या ठायी वसणारा एक जागरूक जीवनाभ्यासक आणि जीवनाला वाचणारा साधक महत्त्वाचा आहे. या संदर्भात त्यांनी लिहिलेले कन्नमवार आणि तारकेश्वरी सिन्हांचे चरित्रलेख अनेकांना आठवत असतील. ललित लेखनाला जशी संदर्भ समृद्धता लागते तशी राजकीय स्वरूपाच्या लेखनाला संपर्क बहुलता लागते. प्रत्यक्ष अंतरंग संपर्कामुळे विषय अधिक विश्वसनीय बनतो. 

इतिहास, कविता आणि कॅमेऱ्याची अशा लेखनाला गरज असते. मला यानिमित्त उत्तर प्रदेशातील गेल्या पिढीतील कन्हैय्यालाल मिश्र ‘प्रभाकर’ या व्रती पत्रकाराचे सहज स्मरण झाले. त्यांच्या लेखनातून- अगदी शीर्षकापासून- अशी विलक्षण प्रज्ञा आढळून यायची, द्वादशीवार यांच्या लेखनातूनही याचा सुखद प्रत्यय येतो. ‘सेंटर पेज’मधील ‘संघाचा सांगावा’ या लेखाच्या शीर्षकातून केवळ अनुप्रासाचाच बाज नव्हे तर सांस्कृतिक मूल्यव्यवस्था दिसून येते. यातील उपमा-उत्प्रेक्षा तर साहित्यधर्मी आहेतच, पण यातून उलगडणारा राजकीय व्यवस्थेचा एक अलक्षित पटही विलक्षण आहे. ‘साधना’ने विषयांचे वैविध्य जपले आहे. कुठल्याही ज्ञानविषयाला वर्ज्य मानले नाही. द्वादशीवार यांच्या अशा लेखनाचे सार्वत्रिक पुरश्चरण व्हायला हवे. 

प्रा.डॉ.विश्वास पाटील, शहादा, जि.नंदुरबार  

----

उत्पादक घटकाला योग्य न्याय मिळण्यासाठी... 

28 एप्रिलच्या साधना अंकातील ‘साखर चरित्र’ हा सुनील तांबे यांचा लेख वाचला. लेखातून ऊसपिकाच्या प्रारंभापासूनचा इतिहास तर समजलाच, परंतु त्याचबरोबर पोषणमूल्य शून्य असलेल्या साखरेच्या कारखानदारीचा आणि ऊस दरावरून होणाऱ्या आंदोलनाचा, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि राजकारणावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासारखे आहे. साखरेची खरी गरज अन्नप्रक्रिया उद्योगधंदेवाल्यांनाच जास्त असून, साखरउत्पादक घटकांतील वर्गापेक्षा साखरेचा वापर करून अन्नप्रक्रिया उद्योगवालेच कितीतरी पटीने जास्त नफा मिळवितात हे लक्षात येते. यासाठी उत्पादक घटकाला योग्य न्याय मिळण्यासाठी लेखकाने काही उपायही सुचविले आहेत. खरोखर याबाबत योग्य विचार होऊन कार्यवाही झाल्यास दरवर्षीची आंदोलने थांबतील, समाजस्वास्थ्यही बिघडणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेचे आंदोलनात होणारे नुकसान टाळता येईल. लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे. 

बी.आर.जाधव, इस्लामपूर, जि.सांगली 

Tags: आझाद हिंद सेना युद्धस्य कथा पंडित नेहरू वॉर अँड डिप्लोमा इन काश्मिर प्रतिक्रिया माऊंट बॅटन मुत्सद्देगिरी धनंजय आपटे Yudhsya Katha Pandit Nehru Army War & Diplomacy in Kashmir Reply Mount Baton Diplomacy Dhanajay Apte संघाचा सांगावा ललित लेख सुरेश द्वादशीवार सेंटर पेज विश्वास पाटील Sanghacha Sangava short article centre page vishwas patil Readers Response सार्वजनिक मालमत्ता नुकसान आंदोलने समाजव्यवस्था लेखक सुनील तांबे साखर चरित्र साखर उत्पादक बी. आर. जाधव वाचक प्रतिसाद Socialhealth Food Process Nutrional Value Sakhar charitra B. R. Jadhav Readers Response weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके