डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पत्रकार द्वादशीवार यांनी लेखक द्वादशीवार यांना नेहमीच ‘डॉमिनेट’ केले, ही माझी यापूर्वी केलेली तक्रार पुन्हा एकदा ‘तारांगण’ वाचताना आठवली. सुरेश द्वादशीवार यांनी त्यांच्या आईवर लिहिलेला मजकूर वाचला की मी म्हणतो याची प्रचिती येईल. (अकाली दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते गिरीश गांधी एक विशेषांक दरवर्षी प्रकाशित करतात. या वर्षीच्या अंकाचे संपादन मी केले आहे आणि या अंकात ‘नलिनी जनार्दन’ हा द्वादशीवार यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. अतिआग्रहानंतर हा लेख अखेर द्वादशीवार यांनी लिहिला आणि माझा हट्ट पुरवला.) द्वादशीवार यांच्या लेखनाचा एक हळवस्पर्शी पैलू या लेखातून आपल्याला भेटतो. असं हे हळवं, त्याचवेळी एक स्त्री म्हणून आईविषयी अलिप्तपणे लिहिताना ते अनेकदा आपल्याला लुब्धस्तंभितच करतात आणि आपले प्राण कंठाशी येतात इतकी ताकद त्या लेखनात आहे. लेखक द्वादशीवार यांच्या लेखनाची दखल घेताना यापुढे हा लेख ओलांडून पुढे जाताच येणार नाही. हा लेख ‘तारांगण’मध्ये समाविष्ट व्हायला हवा होताच. जरी ‘तारांगण’ द्वादशीवार यांनी आईला अर्पण केले असले तरी. पुढच्या आवृत्तीत हा लेख समाविष्ट करावा असा माझा आग्रह आहे. 

‘तारांगण’मध्ये तो लेख समाविष्ट करावा

सुरेश द्वादशीवार यांच्याशी माझा स्नेह 1981 पासून आणि तोही विविधांगी. विदर्भ साहित्य संघात आम्ही सोबत होतो. ते चंद्रपुरात आणि मी नागपुरात एकाच वेळी वार्ताहर होतो. ‘लोकसत्ता’ची नागपूर आवृत्ती सुरू झाल्यावर ते माझे बॉस झाले, पुढे त्यांच्या जागी मी संपादक झाल्यावर आम्ही पदाच्या बाबतीत समान पातळीवर आलो. अनेकदा आम्ही व्यासपीठावर सोबत वावरलो. अनेकदा एकाच व्यासपीठावरून काही विषयांवर प्रतिस्पर्धी म्हणूनही वावरलो. असे स्नेहाचे विविध पदर असले तरी नरहर कुरुंदकर हाच आमच्या स्नेहाचा गाभा आणि आधारही राहिला. द्वादशीवार नावाच्या माणसातली दिलदारी आणि उमदेपण लोभस आहे, त्या संदर्भात एकदा सविस्तर लिहायला हवेच. ‘तारांगण’ वाचताना हे सर्व आठवले. स्नेहाच्या इतक्या प्रदीर्घ कालखंडात ‘तारांगण’मधील अनेकजण शब्दबद्ध होण्याआधी द्वादशीवार यांच्याकडून ऐकण्याचा योग अनेकदा मला आलेला आहे. यांतील काहींचा पहिला खर्डा वाचण्याची संधी मला मिळाली आहे. ‘साधना’त प्रकाशित होतानाही हा सर्व मजकूर मी जीव लावून वाचला आहे आणि आता तो पुस्तक म्हणून वाचताना द्वादशीवार यांचा प्रातिभ आवाका पुन्हा एकदा स्पष्ट झाला. 

पत्रकार द्वादशीवार यांनी लेखक द्वादशीवार यांना नेहमीच ‘डॉमिनेट’ केले, ही माझी यापूर्वी केलेली तक्रार पुन्हा एकदा ‘तारांगण’ वाचताना आठवली. सुरेश द्वादशीवार यांनी त्यांच्या आईवर लिहिलेला मजकूर वाचला की मी म्हणतो याची प्रचिती येईल. (अकाली दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते गिरीश गांधी एक विशेषांक दरवर्षी प्रकाशित करतात. या वर्षीच्या अंकाचे संपादन मी केले आहे आणि या अंकात ‘नलिनी जनार्दन’ हा द्वादशीवार यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. अतिआग्रहानंतर हा लेख अखेर द्वादशीवार यांनी लिहिला आणि माझा हट्ट पुरवला.) द्वादशीवार यांच्या लेखनाचा एक हळवस्पर्शी पैलू या लेखातून आपल्याला भेटतो. असं हे हळवं, त्याचवेळी एक स्त्री म्हणून आईविषयी अलिप्तपणे लिहिताना ते अनेकदा आपल्याला लुब्धस्तंभितच करतात आणि आपले प्राण कंठाशी येतात इतकी ताकद त्या लेखनात आहे. लेखक द्वादशीवार यांच्या लेखनाची दखल घेताना यापुढे हा लेख ओलांडून पुढे जाताच येणार नाही. हा लेख ‘तारांगण’मध्ये समाविष्ट व्हायला हवा होताच. जरी ‘तारांगण’ द्वादशीवार यांनी आईला अर्पण केले असले तरी. पुढच्या आवृत्तीत हा लेख समाविष्ट करावा असा माझा आग्रह आहे. 

प्रवीण बर्दापूरकर, नागपूर 
----
चाकोरीबाहेरचे विजयकुमार सिंघल 


25 फेब्रुवारी 2012 राच्या साधनातील ‘लोकहितासाठी चाकोरीच्या बाहेर जा’ हा दि.मा.मोरे यांनी लिहिलेला लेख वाचला. कुठलाही सरकारी अधिकारी (बहुधा वरिष्ठ पदावरील) जर थोड्याही सामाजिक जाणिवेने वागला तर काय परिवर्तन घडू शकते हे त्या लेखात उल्लेख केलेले अधिकारी आणि त्यांच्या चाकोरीबाहेरील कामामुळे लक्षात येते. 

लेखातील एका उदाहरणात 2005 या वर्षातल्या नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख केला आहे. त्यात जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर मुंडे असे म्हटले आहे. परंतु भास्कर मुंढे (मुंडे नव्हे) कधीही जळगावचे जिल्हाधिकारी नव्हते. ते जळगावलगतच्या धुळे जिल्ह्याचे जून 2004 ते सप्टेंबर 2007 दरम्यान जिल्हाधिकारी होते. श्री.मुंढे यांनीसुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये नदीजोड प्रकल्पाचे उल्लेखनीय काम त्या दरम्यान केले होते. त्याबाबत नुकतेच त्यांचे ‘नदीजोड प्रकल्प’ हे पुस्तक महाराष्ट्राचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे. 

महत्त्वाचे म्हणजे मोरे यांच्या लेखात जळगाव जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख असून 2005 मध्ये जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.विजयकुमार सिंघल यांनीसुद्धा चाकोरीच्या बाहेर जाऊन आपल्यातील स्थापत्य अभियंता जळगाव जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पाच्या कामात दाखवून दिला. हा प्रकल्प प्रामुख्याने गिरणा नदी धारण क्षेत्रात केला. जळगाव जिल्ह्यातील लोकांना ज्या नद्या-नाल्यांना पूर कधी दिसले नाहीत, त्या जिल्ह्यात नदीजोड प्रकल्पामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे 700 मध्यम व लघुप्रकल्प, कोल्हापूर बंधारे, पाझर तलाव, गावतलावांचे पुनर्भरण करण्यासोबतच जवळपास 16000 विहिरी रिचार्ज झाल्यात. या दरम्यान पाऊस तर कमी झाला (आकडेवारी उपलब्ध आहे) परंतु नद्या, नाले, तलाव मोठ्या प्रमाणावर भरलेत. यावरून जळगाव जिल्ह्यातील नद्याजोड प्रकल्पाची यशस्विता स्पष्ट दिसते. जळगावात या   प्रकल्पाचा मोठा लाभ झाला असल्याने हा प्रकल्प राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातसुद्धा नावारूपास आला. 

या प्रकल्पासाठी चाकोरीच्या बाहेर जाऊन काम केल्याबद्दल श्री.विजयकुमार सिंघल यांना 2010 मध्ये ‘पंतप्रधान श्रेष्ठत्व पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्या आधी 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ‘जागतिक नदी महोत्सवात’ या प्रकल्पाचे सादरीकरण श्री.सिंघल यांनी केले होते. सदर परिषदेसाठी त्यांना ऑस्ट्रेलियन सरकारने बोलावले होते. राष्ट्रीय स्तरावरसुद्धा राजस्थान सरकारने त्यांना या प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी विशेष निमंत्रित केले होते. तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांनी ‘मॉडेल प्रोजेक्ट’ म्हणून सदर प्रकल्प राबवण्याचे जाहीर केले होते. 

सुधीर निंबाळकर, ठाणे 
----
नऊ वर्षांचा गुलाब 

गाव तसे आडवळणाचे. जाण्या-येण्यासाठी फाट्यावरून तेव्हा एक-दीड किलोमीटर पायीच जावे लागे, म्हणूनच की काय तेथील मराठी शाळेत बदली करून जाणारे शिक्षक दुर्मिळ असत. शाळा आणि गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं. साऱ्या गावची जमीन दगडी होती. 

मला हजर होऊन दोन वर्षे संपलेली आणि तिसरं सुरू झालेलं. मी मात्र खूष. शाळा दोन खोल्यांत भरत असे. वर्गखोल्या तशा पडक्या पण भावी नागरिक त्यांत घडत होते. गावातील लोक प्रेमळ व उद्योगी होते. शिक्षणप्रेमी नव्हते, परंतु शिक्षणाविषयी अल्पशी आस्था बाळगून होते. गावच्या वैभवात भर घालणारं धरणही वेशीवर आपली प्रतिमा टिकवून होतं. ते दरवर्षी तुडुंब भरायचं, लोकांच्या मनासारखं. वर्ग माझा चौथीचा आणि ते वर्ष होतं 1998. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना लोटला. जुलैला सुरुवात झाली. वर्गातील सर्वच मुलं चुणचुणीत होती. सुरुवातीपासून माझ्याकडं होती. 

ते दिवस म्हणजे पावसाळ्याचे. दोन-तीन दिवसांपूर्वी वारा व वादळासह पाऊस झालेला. त्या दिवसापासून गाव अंधारात. विजेशिवाय गावाचे व्यवहार कसेबसे सुरूच. गाव आपल्या जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या सीमेवर वसलेलं. त्याचं नाव ‘दगडी सबगव्हाण’. नावाप्रमाणेच गुणवैशिष्ट्यं असलेलं. 

माझ्या वर्गात एक गुलाब होता. नऊ वर्षांचा, भिल्ल जमातीत जन्माला आलेला. चेहऱ्यावरून कोणालाही दया यावी असा. अभ्यासातही चांगला आणि नियमित असा निरागस गुलाब. 

गुलाब आत्याकडे शिकायला आलेला. त्याचं कारणही असंच काही होतं. आत्या पायांनी पंगू व डोळ्यांनी अधू होती. दार नसलेल्या, सच्छिद्र, मोडकळीस आलेली अशा झोपडीत गुलाब आत्यासोबत राहत असे, अगदी हुबेहूब तुकडोजींची झोपडी. आत्या गावात, वाकून, काठीच्या आधाराने, रस्त्यावरून अंदाजे जात असे. कारण गुलाब शाळेत असायचा. 

तीन दिवसांपासून गावात वीज नाही, शाळा आपली नेहमीप्रमाणे सुरू आहे आणि वर्गात शिकवणंही. गावातील लोकांची विजेविषयी कुरबूर वर्गात ऐकायला यायची. त्यात उलटसुलट चर्चा आणि वीज मंडळाला शिव्याशापही. आमचं काही विजेवाचून अडत नव्हतं, म्हणून वर्गाचं कामकाज सुरूच होतं. 

अचानक वर्गाच्या पुढ्यात आत्या येऊन उभी- गुरुजी! गुरुजी!! गुरुजी!!! वाकून काठीचा आधार घेत क्षीण आवाजात बोलवले. कामात गुंग होतो म्हणून उशिरा ऐकू आलं, पाहिलं तर गुलाबची आत्या. जवळ गेल्यावर आत्या अहिराणी बोलीभाषेत म्हणाली,

‘गुरुजी, मना भासाले धाडी द्या’. मी आपला नेहमीच्या शिस्तीप्रमाणे संतापानेच म्हणालो, ‘तो अभ्यास करतोय. आत्ताच येणार नाही.’ यावर आत्या म्हणते- ‘गुरुजी मनं घरमा तीन दिनांपासून पीठ नहीसे, तेले पयासखेडाले (पळसखेडे) दयाले धाडनंसे.’ या वाक्यानं माझं मन हेलावून गेलं आणि गहिवरलो... डोळ्यांतले अश्रू आवरू शकलो नाही. डबडबलेल्या डोळ्यांनी मी गुलाबला जायला परवानगी दिली. ‘‘दोन-तीन दिवस उपाशीतापाशी असल्यावरही माझा विद्यार्थी गैरहजर नव्हता.’’ या विचाराने मी आनंदलो. परंतु पोटात अन्न नाही, आत्याच्या व गुलाबच्या, याचं दु:ख वाटलं.’ 

माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आणि त्यासोबत एक संदेश गुलाबनं इतरांसाठी दिला. ‘‘शिकण्याची आवड असेल तर भूकसुद्धा... शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही.’’ 

विलास पंडित महाजन, धरणगाव, जि.जळगाव

----

मानवंदना  

दत्ता ताम्हणे : शंभरीत पदार्पण


समाजवादी चळवळीचे अस्सल बावनकशी मूर्तिमंत रूप म्हणजे दत्ताजी ताम्हणे, 13 एप्रिलला त्यांनी वयाची 99 वर्षे पूर्ण करून 100 व्या वर्षात पाऊल टाकले.‘पुढच्या पिढ्या विस्मयाने विचारतील, खरेच हाडामासाचा असा माणूस या जगात झाला होता? हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईनचे म.गांधी यांच्याबद्दलचे उद्‌गार विख्यात आहेत. पण आपापल्या ठिकाणी आपले छोटे पाय रोवून याच दिशेने वाटचाल करणारे तपस्वी हे अशा समाजवादी चळवळीचे मोठेच बळ होते. दत्ताजी ताम्हणे हे अग्रदलात येतात. 1957 ते 1962 विधानसभेत आणि 1968 ते 1974 विधानपरिषदेत ते आमदार होते. आमदार झाल्या झाल्या हातात अर्थसंकल्प आला. दत्ताजी त्याबाबत पूर्ण निरक्षर होते. त्यांनी थेट डॉ.धनंजयराव गाडगीळांना पत्र टाकले. पुणे गाठले. अर्थसंकल्प कसा वाचावा हे शिकून घेतले आणि त्यांच्या भाषेत ‘नव्या आमदारांना त्याबाबत मार्गदर्शन करण्याऐवढे ते तरबेज झाले.’ लोकसभेत नाथ पै, मधु दंडवते, मधु लिमये यांची भाषणे सत्तारूढ पक्षनेतेही लक्ष देऊन ऐकत. हेच स्थान आपल्या कर्तृत्वाने आणि समर्पणाने दत्ताजींनी महाराष्ट्र विधिमंडळात मिळवले होते. त्यांच्या संपूर्ण जीवनावर म.गांधी, साने गुरुजी, एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे यांचा स्पष्ट ठसा आहे. ग. प्र. प्रधानसर हे त्यांचे जिवाभावाचे मित्र. ठाणे जिल्ह्यातील राजकीय जागृती, मासवण (ता.पालघर) येथील आदिवासी भागातील विधायक कामे, ठाणे जिल्ह्यात आजही राष्ट्र सेवादलाचा असलेला प्रभाव आणि संघटन या सर्व बाबी थेटपणे दत्ताजींच्या कार्यकुशलतेशी आणि प्रभावाशी येऊन भिडतात. अर्थात त्यांचे खंदे साथीदार नवनीतभाई शहा यांचाही यामध्ये मोलाचा सहभाग आहे. 

दत्ताजींची आमदारकी संपूनही आता उणीपुरी चाळीस वर्षे झाली, पण आजही सर्व पक्षांत त्यांना आदराचे स्थान आहे. पक्षाचे खंदे सैनिक असूनही पक्षापलीकडे समाजातील सर्व थरांत, विरोधकांतही व्यापक मान्यता मिळवणे ही बाब आज अशक्य वाटावी अशी आहे. दत्ताजींच्या सारखे लखलखीत निष्कलंक सार्वजनिक व राजकीय चारित्र्य असल्याशिवाय अशी मान्यता लाभत नाही. लाभली तरी आयुष्यभर टिकत नाही. 1978 साली दत्ताजींचे मोठे बंधू अण्णा यांनी वाचन मंडळ चालू केले. 1999 साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर वाचन मंडळ चालू ठेवण्याचे काम दत्ताजींनी स्वत:कडे घेतले. आजही या वाचन मंडळात अत्यंत नियमितपणे दररोज दत्ताजी येतात. पुढे तिथेच थांबतात. तिथे कितीतरी मंडळी भेटायला, म्हणजे दत्ताजीचे दर्शन घ्यायला, येत असतात. त्यांना ते आनंदाने भेटतात. या सगळ्याचा अर्थ दत्ताजी या वयातही शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी आहेत असा होतो आणि तो तसाच आहे. वयपरत्वे ऐकू कमी येते. जुनी स्मृती काही वेळा दगा देते. पण वृत्ती उमेदीची आहे. वाढदिवसाचा विषय निघाला की दत्ताजी म्हणतात, ‘काय घाई आहे? थोडं थांबा. 100 वर्षे पुरी होऊ द्यात. मगच वाढदिवस करू.’ 

एका बाजूला निरिच्छपणा, दुसऱ्या बाजूला अखंड आशावाद ही दत्ताजींच्या पिढीवर महात्मा गांधी यांनी केलेल्या गारुडाची खूण आहे. दत्ताजी म.गांधींच्या आश्रमात दाखल झाले. पहिल्याच महिन्यात शौचकूप साफ करणे, मैला उचलणे, तो दूर नेऊन सोनखत होण्यासाठी गाडणे हे काम त्यांच्याकडे आले. दत्ताजी म्हणतात, ‘मीपणा व अहंभाव यामधून मी या कामामुळे कायमचा मुक्त झालो’ आणि आयुष्यभर ते परनिंदा, प्रौढी, आत्मस्तुती यापासून दूरच राहिले. स्वातंत्र्यलढ्यातील तुरुंगातील व अन्य अनुभवांबद्दल ते बोलतात पण हा ‘मी’ त्यात जवळजवळ नसतोच. 

सध्याच्या देशकालमानाची रास्त चिंता अनेकांना वाटते. पण चांगले तेच रुजेल, भविष्यकाळ फुलेल या विचारावर दत्ताजी ठाम आहेत. मग अर्थातच आपल्यालाही निराशावादी बनण्याचा हक्कच राहत नाही, जीवेत्‌ शरद: शतम्‌ याच्या उंबरठ्यावर दत्ताजी उभे आहेत. म.गांधींना 125 वर्षे जगण्याची उमेद होती. दत्ताजी दमदारपणे त्या वाटेवर चालत आहेत. त्यासाठी समस्त साधना परिवाराच्या शुभेच्छा.   

Tags: पुस्तक. आईवरील लेख प्रवीण बर्दापूरकर सुरेश द्वादशीवार तारांगण Article on Mother Book Pravin Bardapurkar Suresh Dwadashiwar Tarangan global river project पंतप्रधान श्रेष्ठत्व पुरस्कार नदीजोड प्रकल्प गिरणा नदी जिल्हाधिकारी विजयकुमार सिंघल सुधीर निंबाळकर लोकहितासाठी चाकोरीबाहेर जा डी. बी मोरे वाचक प्रतिसाद Rivers Nadijod Prakalp Vijaykumar Sighal Beyond boundary Sudhir Nimbalkar D. B. More Readers Response शिक्षणाची आच भुकेलेला विद्यार्थी भिल्ल जमात गुलाब ९ वर्षांचा विद्यार्थी शिक्षकाचा अनुभव विलास पंडित महाजन आयुष्यानुभव starving Tribal boy Bhilla Gulab student Nine Years Teacher’s experience Vilas Pandit Mahajan गांधी आश्रम. Life experience आमदार विधानसभा १९७४ खंदे नेते समाजवादी शंभरीत पदार्पण ९९ वर्ष पूर्ण अभिवादन दत्ताजी ताम्हाणे Gandhi Ashram Finance minister MLA Vidhansabha 1974 Socialist 2012 Birthday 100th year 99 years Manvandana Datta Tamhane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके