टाकसाळे स्वतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाढलेले असल्यामुळे ग्रामीण परिसराकडे बघण्याची त्यांची दृष्टी अकृत्रिम आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विश्वाशी आपला चांगला परिचय होतो. त्यांच्या कथा एखाद्या स्थिर बिंदूपर्यंत पोहोचल्या की जबरदस्त वळण घेतात. त्यामुळे कुतूहल आणि हास्य सतत वाढत जाते. त्यांनी आपल्या कथांमधील काही पात्रे उत्तम रंगविलेली आहेत. याच संदर्भात मला तुटपुंज्या भांडवलावर दूर मजल मारणाऱ्या माणसावरची 'बहिणाबाईंचा नातू' ही कथा, आपली खोटी जन्मतारीख दिलेले उघडकीला आल्यावर 'राधेने ओढला पाय' या कथेतील बक्षीस गमावणारा नायक आणि नायकाचे भाषण हुबेहूब चोरून 'मी आचार्य अत्रे कसा झालो नाही' या कथेत बक्षीस मिळविणारी त्याची सहपाठी विद्यार्थिनी ही पात्रे खूप रुचली.
कोणत्याही भाषेत विनोदी लिखाण करणे अतिशय अवघड असते. विनोदी लिहिताना समाजात जाणवणाऱ्या विसंगती, लोकांच्या स्वभावातील विचित्रपणा, वेगवेगळ्या विसंगत/हास्यास्पद परिस्थितींबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचे केलेले सूक्ष्म निरीक्षण अशा अनेक गोष्टींचा स्वाभाविकपणे समावेश होतो. अलीकडच्या काळात मराठीतील सुप्रसिद्ध विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांची पाच पुस्तके वाचण्याचा सुयोग आला. त्यातील 'हसता हसता' या पुस्तकाचे पुण्यात 22 जून 2025 ला माझ्या हस्ते प्रकाशनदेखील झाले. एका लेखकाचे इतके सातत्याने वाचन आणि शेवटी पुस्तक प्रकाशन केल्यावर, त्यांच्या विनोदबुद्धीवर आणि लिखाणावर काही तरी लिहावे असे मनापासून वाटले. कारण हसण्याला आणि विनोदाला जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे.
टाकसाळे यांच्या विनोदाने मला अनेकदा अगदी खळखळून हसविले. त्यांची शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झालेली परिस्थितीवरील किंवा माणसांवरील जिवंत वाटणारी व्यंगचित्रे, हजरजबाबी भाषा, शब्दांच्या कोट्या आणि टोमणे हे सर्व मला भावले. तत्कालीन समाजावर, राजकारणावर आणि जगण्यावर त्यांची निरीक्षणे आणि मारलेले शेरे वाचताना माझ्या मनाला कायम गुदगुल्या करत होते. मुळातच विनोदी लेखक कमी असतात. बरेचदा विनोदी किंवा विनोद नसलेली अनेक पुस्तकेसुद्धा त्यातील पाल्हाळीक शैलीमुळे आणि सामान्य आशयामुळे रटाळ आणि कंटाळवाणी वाटतात. सगळे पुस्तक पूर्ण आवडले असे सहसा होत नाही. पण एखादे पुस्तक बहुतांशी पसंत पडले असेल तर अशा लेखकाला दाद द्यायला हवी.
अर्थातच, त्यामुळे एखाद्या बहुतांशी चांगल्या लिहिल्या गेलेल्या विनोदी पुस्तकाची प्रशंसा करताना कद्रूपणा दाखविला, तर चांगले विनोदी लेखक निर्माण होणार नाहीत. उत्तम विनोदी वाक्याचा नेहमीच दुष्काळ होता आणि असतो. आपल्या कलाकृतीचे सार्थक कोणत्याही लेखकाला किंवा कलाकाराला थोडी टीकात्मक प्रशंसा केली तरच मिळू शकते. चांगल्या कलाकृतीला योग्य प्रतिसाद आणि मान्यता दिली, तर लेखकाचा/कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो आणि त्याला पुन्हा काही तरी चांगले लिहावेसे वाटते. तेव्हा ही गोष्ट पूर्णपणे ध्यानात ठेवून, मी वाचक म्हणून किती शहाणा आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून देण्यापेक्षा, टाकसाळे यांच्या विनोदाकडे मी कोणत्या दृष्टीने बघितले आणि त्यांना समजण्याचा प्रयत्न कसा केला या गोष्टींवर या लेखात जास्त भर असेल. त्यांच्या लेखनाचे वस्तुनिष्ठ परीक्षण नव्हे, तर त्यावर प्रतिक्रिया देणारा हा एक साधा लेख आहे.
लेख सुरू करण्यापूर्वी माझ्या कुवतीबद्दल आणि मी आधी वाचलेल्या मराठीतील विनोदी लिखाणाबद्दल काही निरीक्षणे अगदी स्पष्ट शब्दांत मांडतो. मला साहित्याची कितीही आवड असली, तरी मी स्वतःला मराठी साहित्याचा समीक्षक वगैरे मुळीच समजत नाही. शिवाय गेली 54 वर्षे मी महाराष्ट्राबाहेर आहे. त्यामुळे मराठीतील लिखाणाशी माझा सलग संबंध कधीच नव्हता. अनेक दशके इंग्रजीमधून आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहिल्यावर मी महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या माझ्या घरट्यात अलीकडेच परतण्याचा निश्चय केला. हा लेख त्याच पार्श्वभूमीवर वाचला जावा अशी माझी वाचकांना विनंती आहे.
साधारणपणे मी कोणत्याही लिखाणामुळे सहसा हुरळून जात नाही आणि विनोदी लिखाणामुळे तर अजिबातच नाही. माझ्या लहानपणी मी राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, अच्युत बळवंत कोल्हटकर इत्यादी लेखकांना थोडेफार वाचले होते. त्या पुढच्या काळातील आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांचे बहुतेक लिखाण मी वाचले आहे. अत्रे यांचे विनोद मला मनापासून आवडले होते. ते उत्तम वक्ते होते आणि त्यांची अनेक भाषणे मी ऐकली आहेत. ते चांगल्या मूडमध्ये असले, तर त्यांच्या विनोदांवर टाळ्यांचा कडकडाट होत असे. एकंदरच ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. पु.ल. देशपांडे यांच्या विनोदाशी मी फारसा समरस होऊ शकलो नाही. एकदा आमच्या वर्गात शिक्षकांनी त्यांच्या 'गोळाबेरीज' या पुस्तकाचा काही भाग वाचला होता. इतर मुले ते वाचत असताना खो खो हसत होती, पण मला त्यांचा विनोद पांचट आणि शैली पाल्हाळीक वाटली. त्यामुळे लहानपणी तरी मी त्यांच्या लिखाणाकडे पूर्वग्रहदूषित मनाने बघत असे. अर्थात, त्यांचे 'व्यक्ती आणि वल्ली' हे पुस्तक मात्र मला अनेक अर्थाने मनापासून आवडले होते. एकंदर त्यांचे लिखाण मध्यमवर्गाला जास्त आवडेल असेच होते. अशा लेखनात मध्यमवर्गाचा सामान्यपणा किंवा mediocrity अगदी ठासून भरल्यासारखी वाटते. तरीही सतत काही दशके केवळ मध्यमवर्गीय लोकांचे लक्ष वेधून घेणे ही कलासुद्धा खूपच कठीण आहे आणि ती मात्र पुलंना पूर्णपणे साधली होती. पुलं हेसुद्धा बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते आणि आपल्या अभिनयामुळे किंवा अचूक निरीक्षणाने उत्तम नकला करण्याच्या कलेमुळे त्यांचा श्रोत्यांवर सहज प्रभाव पडत असे. त्यांनी मराठी मध्यमवर्गीय सांस्कृतिक विश्वात आपली अमीट छाप सोडली आहे. आजही ते शहरी मध्यमवर्गाचे 'हिरो' आहेत. अत्रे आणि पु.ल. यांच्याखेरीज द. मा. मिरासदार यांचे विनोदी लेखन मला आवडत असे. प्रत्येक लेखक शेवटी त्याच्या स्थळ-काळाच्या संदर्भात वाचावा आणि अनुभवावा लागतो. तो काळ आणि ती परिस्थिती संपली की, येणाऱ्या पिढ्यांना जुने लेखक आणि त्यांचे लिखाण आवडेनासे होते. परंतु, 'पुलंनंतर मराठीतील विनोद संपला' अशी विधाने केली जातात तेव्हा मला आश्चर्य वाटते. कारण मराठी संस्कृती आणि सभ्यता यांना विनोदाचे वरदान लाभले आहे. तेव्हा मराठी भाषेत वेगवेगळ्या स्तरांवर विनोदी लेखक कायमच असतील, याची मला पूर्ण खात्री आहे. तर एकूणच अशा या माझ्या मर्यादित वाचनाच्या, आकलनाच्या आणि मराठी संस्कृतीपासून काहीसे दूर गेल्याच्या पार्श्वभूमीवर मी टाकसाळे यांना वाचायला सुरुवात केली. कारण महाराष्ट्र कसा बदलला आहे हे मला जाणून घ्यायचे होते.
त्यामुळे त्यांची काही पुस्तके मी काही आठवड्यांत वाचून पूर्ण केली 'पु.ल. देशपांडे', 'मुका म्हणे', 'तिरपागड्या कथा', 'हसता हसता' आणि 'हसरी टाकसाळ'. यातील 'पु.ल. देशपांडे' हे पुस्तक पुलंच्या विविध गुणांचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एक सरळ पण उत्तम आढावा घेते. 'तिरपागड्या कथा' या पुस्तकातील काही कथा त्यांच्या 'हसरी टाकसाळ' या कथासंग्रहात पुनर्प्रकाशित झाल्या आहेत. त्यामुळे वाचकांना त्यांच्या विनोदाची ओळख करून देताना, उरलेल्या तीन पुस्तकांतील मला आवडलेल्या काही गोष्टींबद्दलच लिहिणार आहे.
'मुका म्हणे' हे पुस्तक त्यांनी आपल्या अनेक नियमित लिहिलेल्या सदरांतील निवडक मजकूर पुनर्प्रकाशित करून सादर केले आहे. त्यातील जवळजवळ प्रत्येक लेख अतिशय खुसखुशीत शैलीत, परिस्थितीचे योग्य भान ठेवून लिहिला गेलेला आहे. अशा लेखात लेखकाने परिस्थितीतील विसंगती आणि विरोधाभास यांवर नेमके बोट ठेवून, कोपरखळ्या मारत, स्वतःचे मुद्दे परिणामकारकरीत्या मांडले आहेत. शिवाय परिस्थितीचे गांभीर्य वाचकांच्या ध्यानात आणून आपले परखड विचार निर्भीडपणे मांडताना लेखक कोठेही कचरल्यासारखा जाणवला नाही. लेखकाच्या धैर्याची उदाहरणे देण्यासाठी मी खालील लेखांचा सारांश आणि मथितार्थ मुद्दाम मांडत आहे.
त्यांच्या 'दीदी आणि मोदी' या लेखात लता मंगेशकरांच्या संगीतातील विलक्षण प्रतिभेबद्दल नक्कीच आदर व्यक्त केलेला आहे. 'जिथे लताबाईंचा आवाज पोहोचला तो भारत' अशी भारताची व्याख्या केली, तर अखंड भारत होण्यास वेळ लागणार नाही. तो दैवी आवाज अक्षरशः सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. टाकसाळे म्हणतात, खरे म्हणजे लताबाईंना आणखी मोठे होण्यासाठी खूप वाव होता. परंतु त्या संकुचित राहिल्या. सत्तेची जवळीक साधताना मोदी पुन्हा प्रधानमंत्री होतील किंवा व्हावे हे जाहीर म्हणण्याचा मोह त्यांना आवरला नाही. शिवाय हिंदुत्वाच्या संकुचित विचारांची चौकट किंवा अशा विचारांचा विळखा जणू त्यांच्याभोवती होता. त्यामुळे गाण्यातील आणि चित्रपटातील उत्तम परधर्मीय लोकांशी संबंध येऊनसुद्धा त्या अशा विळख्यातून बाहेर पडू शकल्या नाहीत. तसेच बाळासाहेब ठाकऱ्यांपासून राज ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांनी केलेली जवळीक यावर टाकसाळे यांनी आपले विचार परखडपणे मांडले आहेत.
दुसऱ्या एका लेखात बक्षिसे देण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी 'सचिन तेंडुलकर यांना लवकर भारतरत्न हा बहुमान मिळाला' असे नमूद करून सचिनच्या अनेक जाहिरातींवरील सहभागावर सडेतोडपणे लिहिले आहे. 'अशा जाहिराती देऊन भारतरत्न या सन्मानाची प्रतिष्ठा कमी होते का?' असा सरळ प्रश्न ते विचारतात. पण अजून तरुण असल्यामुळे तेंडुलकर आणखी काय करू शकतील, यावरसुद्धा त्यांनी चर्चा केली आहे. अशा पुरस्कारांच्या दुसऱ्या टोकाकडे बघितले, तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा व्ही. शांताराम, राज कपूर, भालजी पेंढारकर आणि शशी कपूर यांना उतारवयात मिळाला. त्यातले काही तर पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हील चेअरवर बसून आले होते. त्यामुळे वय, एखाद्या क्षेत्रातील यशस्वी कामगिरी आणि पुरस्कार यांचा योग्य तो समन्वय कसा साधायचा यावर लेखकाने मार्मिक टिपणे केली आहेत.
'सत्यमेव जयते' हा लेख आमीर खान यांच्या कार्यक्रमावर आहे. त्यात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची आत्मप्रेमामुळे स्वतःला चलाखीने सारखी पुढे करायची प्रवृत्ती फार सहजपणे रंगविली आहे. 'स्वतःबद्दल जास्त का बोलावे' असे म्हणता म्हणता न्यायमूर्ती कोणतीही भीड न बाळगता, अतिशय शिताफीने, आत्मपुराण आणि आत्मस्तुती करतात. हे समजल्यावर लक्षात येते की, खरोखरच स्वतःवरच खूश असलेली अशी अनेक माणसे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात.
मला त्यांचा 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे...' हा लेख अप्रतिम वाटला. बरीच माणसे वयाने आणि कीर्तीने मोठी झाली, तरी त्यांचे वागणे अगदी लहान मुलांसारखे असते. कदाचित आपले लहानपण ते नकळत जपतात. इंग्रजी भाषेत सांगायचे तर, 'They behave like grown up children.' आपल्या विचारात आणि आचारात अगदी सहज दिसणाऱ्या विसंगतीचेसुद्धा त्यांना भान राहत नाही. या संदर्भात आपल्या लेखात प्रा. राम शेवाळकरांचे व्यक्तिमत्त्व रेखाटताना टाकसाळे म्हणतात, "शेवाळकर ज्या पद्धतीने विनोबांचे गुणगान करतात, त्यामुळे अहिंसेचे महत्त्व त्यांना क्षणभर पटले असे वाटते. पण तेच शेवाळकर सावरकरांच्या त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या हजर होतात." आणि त्यानंतर टाकसाळे यांच्या शब्दांत सांगायचे तर, "शेवाळकर अशा समारंभात पुढे जेव्हा 'हिंसा सम्राट नरेंद्र मोदी' यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, तेव्हा आपल्या 'निरागसपणा'चा अगदी कहर करतात. असल्या निरागसपणामुळे ते गांधी-विनोबांपासून ते नरेंद्र मोदीपर्यंत उलटासुलटा प्रवास लीलया करू शकतात." शेवाळकर 'निरागस' असू शकतील, परंतु दिल्लीच्या माझ्या वास्तव्यात असला उलटासुलटा प्रवास करणाऱ्या अनेक संधिसाधू आणि महाधूर्त लोकांशी माझा संबंध आला. सत्तेच्या आणि प्रसिद्धीच्या जवळ राहण्यासाठी लोक कोणत्या थराला जातात याची मला पुरेशी कल्पना आहे.
'भूमिका जगणारे नट' हा लेखसुद्धा खूप काही सांगून जातो. एक नट लोकमान्य टिळकांचे काम करत असे आणि गणेश उत्सवात प्रत्यक्ष टिळक होऊनच फिरत असे. तसेच विष्णुपंत पागनीस यांनी सुप्रसिद्ध 'तुकाराम' या चित्रपटात तुकारामाची भूमिका केली होती आणि त्यानंतर ते संत तुकारामांसारखे वागू लागले. अशा नटांच्या यादीतील सर्वोच्च बिंदू म्हणजे शरद पोंक्षे. नथुराम गोडसे यांची भूमिका सादर करता करता ते बाहेरील जगातही साक्षात नथुराम झाले आणि जाहीर कार्यक्रमात गांधी खुनाचे समर्थन करू लागले. 'आज जशा आपल्याला नेत्यांना गोळ्या घालाव्याशा वाटतात तसेच नथुरामला वाटले आणि त्याने गांधींना गोळी मारली', असेच काहीसे ते बोलू लागले. असे विचार समाजात वाढू लागले तर नेता होण्याचे धाडस कुणी करेल असे मला वाटत नाही.
टाकसाळे यांनी राजकारणी लोकांच्या संदर्भात विचार करायला लावणाऱ्या काही गोष्टी लिहिल्या आहेत. उदाहरणार्थ, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, ठाकरे यांची समाधी शिवाजी पार्कच्या मैदानावर व्हावी या मताचे होते आणि 'ते जर नियमात बसत नसेल तर नियमच मोडून टाका' असे ठामपणे म्हणाले होते. यात मोठी माणसेसुद्धा कशी नियमांना गुंडाळायला तयार होतात या गोष्टीची प्रचिती येते. तसेच मा. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचा उताराचा काळ सुरू झाला, तेव्हा महत्त्वाची माणसे त्यांच्याकडे लक्ष देण्यास जात नव्हती. एका कार्यक्रमात तर वसंतदादा अगदी एका बाजूला बसलेले होते, परंतु तत्कालीन सूचना प्रसारण मंत्री वसंतराव साठे यांच्याकडे सर्व लोक सारखे लक्ष देत होते. राजकारणाच्या संदर्भात विविध पक्षांतून वाढत जाणारी घराणेशाही आणि लाचलुचपतीचे वाढते प्रमाण यांचाही उल्लेख त्यांच्या लिखाणात आहे.
वरील लेखांचा आढावा घेतल्यावर मोठ्या माणसांचा छोटेपणा, माणसाची सत्ताधीशांच्या परिघात एखाद्या रानपारव्यासारखी घुमत घुसण्यासाठी चाललेली धडपड, सत्तेतील स्थित्यंतरे आणि त्यातून उद्भवणारा संधीसाधूपणा या गोष्टी ध्यानात येतात. समाजाचा विद्रुप आणि कुरूप चेहरा विजय तेंडुलकर आपल्या धक्कादायक लिखाणातून दाखवत होते. टाकसाळे मात्र संयत भाषेत, थोड्या उपहासात्मक पद्धतीने आपले विचार मांडतात. त्यांच्या शैलीत वर वर विनोद असला तरी त्यांच्या लिखाणाचा गाभा मला गंभीर वाटतो.
टाकसाळे यांच्या 'हसता हसता' ह्या पुस्तकात 48 लेख आहेत. त्यात काही दीर्घ आणि बऱ्याच लघु लेखांचा समावेश केला गेला आहे. त्यांची लिहिण्याची शैली खुसखुशीत आणि प्रसंग पाहून समाजजीवनाला चिमटे काढणारी आहे. पुस्तक वाचताना ते कुठे रेंगाळते आहे, असे मला मुळीच वाटले नाही. त्यातील मला अधिक भावलेल्या काही लेखांचा उल्लेख करतो. 'मी आणि राहुलकुमार बजाज' या लेखात तरुणपणी बी.ए.ची परीक्षा दिल्यावर लेखकाची नोकरी मिळवण्याची धडपड आणि घाई. त्यामुळे नंतर पुण्यास जाऊन थेट बजाज यांच्याशी संपर्क साधून त्याने नोकरी मागण्याचे केलेले धाडस मला मजेशीर वाटले. अर्थात, जशा त-हेच्या नोकऱ्या बजाज उद्योग समूहात होत्या, त्यासाठी लेखकाची योग्यता नव्हती म्हणून त्यांना नोकरी मिळाली नाही. शेवटी लेखकाने प्रवास करत, कारखान्यापर्यंत केलेल्या खर्चाचा मोबदला मागितला आणि तो त्याला बजाज यांच्या सुंदर पत्रासकट मिळाला. हे सगळे विलक्षण आहे. इतका सुंदर नकार नोकरीसाठी खटपट करणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला का येत नाही? असा प्रश्न पडतो. पुस्तकातील 'बिच्चारा घाशीराम' हासुद्धा एक वाचनीय लेख आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा ऱ्हास होत चाललेल्या पेशवाईत, घाशीराम कोतवालसारखा एक मामुली अधिकारी किती अमानुषपणे आपल्या हाती आलेल्या सत्तेचा दुरुपयोग करतो, हे ते गोष्टीरूपात मांडतात. त्यासाठी पार मोरोबा कान्होबा यांनी घाशीरामवर 1863 मध्ये लिहिलेल्या एका गमतीशीर पुस्तकापासून ते विजय तेंडुलकरांपर्यंत 'घाशीरामा'ला कसा वेठीस धरला आहे, याचा ते हलक्याफुलक्या शैलीत आढावा घेतात.
टाकसाळे यांनी 'हे (नि) बंध रेशमाचे' या लेखात अतिशय खेळकरपणे एखादाच मजकूर पूर्ण ध्यानात ठेवून तो कोणत्याही स्थितीत परीक्षेत निबंध लिहिताना कसा उपयोगी ठरू शकतो, हे उत्तम मांडले आहे. तर 'बाबूजी धीरे चलना' हा लेख सुधीर फडके यांनी सावरकरांवर चित्रपट निर्माण केला, तेव्हा दिग्दर्शक ते नट-नट्या किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये कसे वेळोवेळी बदल झाले आणि त्यात कसा अमाप पैसा खर्च झाला हे मांडतो. या कार्यात इतकी माणसे गुंतली की, त्यामुळे ह्या उपक्रमातून अक्षरशः 'सावरकर उद्योग सेना' तयार झाली. तसेच 'टिळक मारक मंदिर' हा लेख पुण्याच्या टिळक स्मारक मंदिराच्या मूळ वास्तूचे कसे अगदी भजे करून टाकले, हे उपहासात्मक शैलीत मांडतो. आजकाल देशभक्तीचा पुळका आणि पाकिस्तानचा द्वेष या गोष्टी कशा निगडित होत चालल्या आहेत, हे केवळ 'पाक' या शब्दाशी खेळून 'आले हिंदुस्थान' या लेखात सुचविले आहे. त्यामुळे 'आलेपाक' विकणाऱ्या मुलाच्या आरोळ्यांवरून कसा एका माणसाला देशभक्तीचा झटका येतो आणि तो कसा बिथरतो हे लेखकाने रसभरीत शब्दांत लिहिले आहे. मला 'तुकारामांच्या गप्पा गोष्टी' हा लेख खूप आवडला, कारण त्यामुळे मलाही 'गाढव गेले आणि ब्रम्हचर्यही गेले' या म्हणीचा अर्थ व्यवस्थित समजला.
'हसरी टाकसाळ' हा त्यांच्या निवडक पंधरा कथांचा संग्रह आहे. या सर्व कथा कोणत्या निकषांवर निवडल्या हे लेखकाने प्रस्तावनेत स्पष्ट करायला हवे होते.
अर्थात, मला त्यातील काही कथा अत्यंत आवडल्या. त्या वाचताना पुणे आणि महाराष्ट्राचा शहरी परिसर कसा झपाट्याने बदलत चालला आहे, याची जाणीव होत जाते. अलीकडच्या काळात एक महत्त्वाचा बदल म्हणजे मराठी मध्यमवर्गीय लोकांचे अमेरिकेत जाण्याचे वाढते प्रमाण आणि त्याबरोबरच प्रवासी भारतीयांशी त्यांचा वाढत जाणारा संपर्क. त्यातूनच काही मजेशीर गोष्टी लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, 'कूक कूक कूक कूक' या कथेत नायक एक तथाकथित मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपल्या एका जुन्या मैत्रिणीकडे जातो. परंतु अमेरिकेतील मैत्रिणीचे कुटुंब अल्पशा वेतनावर त्याचा एखाद्या स्वयंपाक्यासारखा उपयोग करून घेते आणि त्याला शेवटी कंटाळून मायदेशी परतावे लागते. 'बाळंत पर्यटन' ही गोष्टही आपल्या मुलांच्या बाळंतपणाच्या काळात मदत करायला पालक कसे उत्साहाने जातात आणि काहीशा निराशेने परततात यावर आहे. मला स्वतःला 'अमेरिकन अभिषेक' ही कथा खूप आवडली. ऐन समारंभात नाडीविना जुना पायजमा वापरून फजिती झालेल्या अमेरिकन अभिषेकचे वर्णन हसवून सोडते. 'चोखंदळ चुलत चुलता' आणि 'सखूची डायरी' या कथासुद्धा खूप भावल्या. चोखंदळ चुलत्याला आपल्या रेस्टॉरंटमधील जागेवरून हलविण्यासाठी कशी भयानक गोष्ट सांगितली जाते, ती ऐकण्यासारखी आहे. त्यामुळे तो आपली जागा सोडून पळ काढतो. तसेच सखू ह्या मोलकरणीला मालकिणीने शिक्षित केल्यावर ती स्वतःची डायरी लिहू लागते. मालकिणीचा नवरा सखूशी कसे प्रेमाचे चाळे करायचा प्रयत्न करतो, हे सखू मालकिणीच्या अपरोक्ष पण तिच्या मैत्रिणींच्या उपस्थितीत, आपल्या डायरीतून वाचून दाखविते आणि त्यामुळे त्या मनापासून हसत राहतात.
टाकसाळे स्वतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाढलेले असल्यामुळे ग्रामीण परिसराकडे बघण्याची त्यांची दृष्टी अकृत्रिम आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विश्वाशी आपला चांगला परिचय होतो. त्यांच्या कथा एखाद्या स्थिर बिंदूपर्यंत पोहोचल्या की जबरदस्त वळण घेतात. त्यामुळे कुतूहल आणि हास्य सतत वाढत जाते. त्यांनी आपल्या कथांमधील काही पात्रे उत्तम रंगविलेली आहेत. याच संदर्भात मला तुटपुंज्या भांडवलावर दूर मजल मारणाऱ्या माणसावरची 'बहिणाबाईंचा नातू ही कथा, आपली खोटी जन्मतारीख दिलेले उघडकीला आल्यावर 'राधेने ओढला पाय' या कथेतील बक्षीस गमावणारा नायक आणि नायकाचे भाषण हुबेहूब चोरून 'मी आचार्य अत्रे कसा झालो नाही' या कथेत बक्षीस मिळविणारी त्याची सहपाठी विद्यार्थिनी ही पात्रे खूप रुचली. प्रत्येक कथेचा शेवट फार सुंदर केलेला आहे आणि वाचक आपोआपच शेवटापर्यंत वाचत जातो. त्या कथांवर अधिक लिहिण्यापेक्षा वाचकांनी हे पुस्तक विकत घेऊन त्या वाचून काढाव्यात, असा माझा खास आग्रह आहे.
एकूणच मध्यमवर्गीय आणि ग्रामीण जीवनात दिसणाऱ्या लोकांच्या प्रवृत्ती आणि सवयींचे सखोल निरीक्षण करून, टाकसाळे यांनी त्यांची अनेक सूक्ष्म निरीक्षणे आपल्या अफलातून विनोदांत गुंफलेली आहेत. खुसखुशीत सदरे लिहिण्यापासून ते मजेदार गोष्टी लिहिण्यापर्यंत त्यांनी केलेला प्रवास आकर्षक आहे. त्याबरोबरच सामाजिक जाणिवेमुळे किंवा बांधिलकीमुळे आपले विचार निर्भीडपणे मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यापुढे आपला विनोद अधिक व्यापक स्तरावर कसा नेता येईल, यावर विचार करून त्यांनी भावी आयुष्यात या क्षेत्रात आणखी पुढे मजल मारावी, हीच माझी सदिच्छा आणि शुभेच्छा.
मागील 50 वर्षे मराठीत गंभीर व वैचारिक विनोदी लेखनासाठी ओळखले जाणारे मुकुंद टाकसाळे यांच्या नावावर दोन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अलीकडेच त्यांच्या निवडक लेखांचे व निवडक कथांचे अशी दोन पुस्तके रोहन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली आहेत. त्या प्रकाशन समारंभाला राजन हर्षे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आयुष्याच्या सुरुवातीचे पाव शतक पुण्यात वाढलेल्या डॉ. हर्षे यांचे वास्तव्य नंतरचे अर्धशतक महाराष्ट्राबाहेर होते. त्यामुळे, पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मराठी साहित्य यांच्याकडे नव्याने पाहताना त्यांनी त्या पुस्तकांवर आणि त्यांनी वाचलेल्या टाकसाळे यांच्या लेखनावर लिहिलेला हा लेख आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या