डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिग्गजांच्या नव्या सिनेमांनी अपेक्षाभंग केला का?

‘द ट्रुथ’ ही एका फिल्मस्टारची गोष्ट आहे. ‘एक थोर अभिनेत्री बनण्यासाठी एक वाईट आई, एक वाईट मैत्रीण असणं मला नेहमीच मान्य होतं,’ असं म्हणणाऱ्या आणि आयुष्य उतरणीला लागलेल्या फिल्मस्टारची. पण वय वाढलं म्हणून तिचा तोरा कुठेही कमी झालेला नाही. सिनेमाच्या सुरुवातीलाच तिची मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराशी बोलताना ती तिच्या समकालीन अभिनेत्री जिवंत आहेत की नाहीत हेही आपल्याला माहीत नाही असं अगदी सहजी बोलून जाते. आपण अजूनही काम करतो आहोत आणि त्या विस्मृतीत गेल्या आहेत हे अधोरेखित करणं हा तिचा उद्देश आपल्यापासून लपून रहात नाही

केन लोच, पेद्रो आल्मादोवार, हिरोकाझू कोरिडा आणि फतिह अकिन या चार नामवंत दिग्दर्शकांचे नवे कोरे सिनेमे गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पाहायला मिळाले, त्याविषयी... आधी अपेक्षाभंग न झालेल्या सिनेमांची दखल घ्यायला हवी.

केन लोच यांचा ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ पाहिल्यानंतर त्यांच्या याआधीच्या, 2016 च्या ‘आय, डॅनिएल ब्लेक’ची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. (या सिनेमाला कानमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाम अ दोअर पुरस्कार मिळालेला होता). केन लोच यांच्या सिनेमांचा रोख समाजातल्या निम्न स्तरावर जगणारी माणसं हा कायमच राहिलेला आहे. सिनेमातून मांडलेल्या त्यांच्या भूमिका थेट असतात, पण म्हणून त्यांच्या सिनेमावर प्रचारकी असल्याचा शिक्का कधीही मारता येत नाही. किंबहुना, सिनेमा म्हणून तो सकस असतोच आणि आजच्या काळात जगभरातल्या परिस्थितीमुळे तो अधिक समर्पकही असल्याचं जाणवतं. ‘सॉरी, वुई मिस्ड यू’च्या तुलनेत ‘आय, डॅनिएल ब्लेक’ हा अधिक बारकावे आणि अधिक पदर असणारा सिनेमा होता. डॅनिएल ब्लेकचं आयुष्य आपल्यासमोर उलगडत असताना त्याच्या अवतीभोवती वावरणाऱ्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या जीवनात दिग्दर्शकाने आपल्याला नेलं होतं. त्यात गुंतवून ठेवलं होतं. त्या तुलनेत ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ कमी पडला असला, तरी स्वतंत्रपणे इथेही एक उत्तम सिनेमा पाहिल्याचा आनंद निश्चितच मिळतो, यात शंका नाही.

‘सॉरी, वुई मिस्ड यू’मध्येही कामगारवर्गातून आलेल्या एका कुटुंबाची गोष्ट तो सांगतो. रिकी टर्नर, त्याची बायको अँबी, त्यांचा वयात येऊ लागलेला बंडखोर मुलगा सेब आणि अकरा वर्षांची लहान वयात समंजस झालेली पण त्या समंजसपणाचं ओझं न पेलणारी मुलगी लिझा. 2008 च्या आर्थिक मंदीमध्ये खूप सारं कर्ज झालेले हे नवरा-बायको. पैसे कमावण्यासाठी प्रचंड श्रम घेण्याची दोघांचीही तयारी आहे. बायको ही केअरगीव्हर- म्हणजे एकट्या राहणाऱ्या आजारी माणसांच्या घरी जाऊन त्यांना न्हाऊ-माखू घालण्याचं, जेवण  भरवण्याचं काम करते- अतिशय सेवाभावी वृत्तीने. चेहऱ्यावर कधी त्रागा नाही की कंटाळा नाही. रिकीचीही कोणत्याही कष्टाला ना नाही. एक नवी संधी येते आणि हप्त्यासाठी जमवलेले पैसे आणि बायकोची गाडी विकून तो नवी व्हॅन विकत घेऊन डिलिव्हरी सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करतो. एका कुरिअर कंपनीला रोजच्या रोज अशा अनेक व्हॅन्सची गरज असते, त्यामुळे आपल्याला कामाची कमतरता कधीच भासणार नाही याची रिकीला खात्री वाटत असते. आपल्या सगळ्या समस्यांचा शेवट करण्याचा हा मार्ग आहे, असा त्याचा ठाम समज असतो. वरवर पाहता, सुरुवातीला सगळंच छान वाटतं. कंपनीचा सुपरवायझर काम देताना सांगतो, ‘‘इथे ना कोणी नोकर, ना कोणी मालक. आपण सगळे सहकारी आहोत. तू नुसताच ड्रायव्हर नाहीस, तर मालक- ड्रायव्हर आहेस. तुला पगार नाही, तर तुझी फी देण्यात येणार आहे.’’

पण वस्तुस्थिती एवढी सोपी असती, तर काय हवं होतं! सुपरवायझरचे शब्द म्हणजे नुसते बुडबुडे आहेत- जार्गन्स आहेत, हे कळण्याएवढा रिकी हुशारही नाही आणि त्याच्यापाशी विचार करायला तितका वेळही नाही. मात्र, वरवर सुरेख दिसणारं भविष्याचं हे चित्र वास्तवात मात्र अनेक खड्ड्यांनी भरलेलं आहे याची प्रचिती त्याला पहिल्याच दिवशी येते. दरम्यान, घरीही आर्थिक चणचणीमुळे निर्माण होणारे ताणतणाव वाढताहेत. नवरा-बायकोची भांडणं, बाप- मुलाची बाचाबाची, बायकोची ओढाताण, लहान मुलीचं बावरलेपण... अशा अनेक भावनांमध्ये हेलकावे खाणारं हे कुटुंब लंडनमधलं असलं तरी त्यांचं दु:ख थेट आपल्यापर्यंत पोचतं. विशेषत:, सिनेमाच्या शेवटच्या भागात रिकीच्या सुपरवायझरशी हताश झालेल्या अँबीचं टेलिफोनवरचं संभाषण तर घशात आवंढा आणणारं आहे. कारण ते खरं वाटतं, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीशी नातं सांगणारं वाटतं.

ताकदीचा, मेंदूला आणि हृदयाला भिडणारा आणखी एक सिनेमा केन लोच यांनी सादर केला आहे. सिनेमा इंग्लिश भाषेत असल्यामुळे तो आपल्याकडे प्रदर्शित होण्याची पूर्ण शक्यता आहे. ‘आय, डॅनिएल ब्लेक’ही थिएटरमध्ये लागला होता. त्याचप्रमाणे ‘सॉरी, वुई मिस्ड यू’सुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तर तो अजिबात चुकवू नका.

0

वयाच्या 83 व्या वर्षी केन लोच असे हार्ड हिटिंग सिनेमा बनवताहेत. पण पेद्रो आल्मादोवर मात्र वयाच्या 70 व्या वर्षी किंचित हळुवार होत आहेत, असं त्यांचा ‘पेन अँड ग्लोरी’ पाहताना वाटतं. आल्मादोवर 1980 पासून सिनेमे बनवताहेत. ‘बॅड एज्युकेशन’, ‘ब्रोकन एम्ब्रेसेस’, ‘लाइव्ह फ्लेश’, ‘ऑल अबाऊट माय मदर’, ‘टॉक टू हर’, ‘द स्किन आय लिव्ह इन’ यासारखे त्यांचे अनेक सिनेमे पाहिल्यानंतर तर असं निश्चितच वाटतं.

‘पेन अँड ग्लोरी’मध्ये वय झालेला आणि गेली कित्येक वर्षं काम न केलेला एक दिग्दर्शक साल्वादोर माल्लो हा आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना आपल्याला दिसतो. आपलं बालपण, आपली आई, आपली कारकीर्द, दिग्दर्शक म्हणून आपण केलेली भांडणं, आपल्या रिलेशनशिप्स या सगळ्याकडे पाहताना त्याच्यात अलिप्तपणा मात्र आलेला नाही. तो पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त झालेला आहे, दिवसभरात औषधांच्या अनेक गोळ्या घ्याव्या लागत असल्याने कंटाळलेला आहे, आपल्या आयुष्यावर ब्लॉग्ज लिहितो आहे. या दिग्दर्शकाच्या प्रवासात आपण अगदी रममाण होऊन जावं, अशा रीतीने आल्मादोवरने ते आपल्यासमोर पेश केलंय. त्यात विनोद आहे, दोस्तांची मारामारी आहे, गरिबीवर मात करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवणारी कणखर आई आहे, स्पेनमधलं मोकळंढाकळं जग दाखवणारं लोकगीत आहे- ज्यात पुरुषांप्रमाणेच आपल्यालाही पूर्ण नग्न होऊन नदीत उतरायला कसं आवडेल याचं वर्णन बायका करताहेत. आणि अर्थातच आल्मादोवरचा स्टॅम्प असलेली त्याची रंगसंगतीही आहे.

पेद्रो आल्मादोवरच्या प्रत्येक- अगदी प्रत्येक सिनेमात प्रकर्षाने जाणवतं ते तो वापरत असलेलं रंगांचं पॅलेट. अत्यंत श्रीमंत पण गोष्ट सांगण्याच्या कुठेही आड न येणारं. विशेषत: त्याचा लाल रंगाचा वापर अचंबित करणारा आहे. ‘पेन अँड ग्लोरी’ची टायटल्स सुरू होतात, तेव्हाही आपल्याला पहिल्या क्षणापासून आल्मादोवरचे रंग बांधून ठेवतात. मग वेगवेगळ्या फ्रेम्समधून- कधी भिंतीवरच्या पेंटिंगमधून, कधी एखाद्या व्यक्तिरेखेच्या वेशभूषेमधून, कधी उजेड नसलेल्या थिएटरमधल्या खुर्च्यांपैकी एका खुर्चीवरच्या लालभडक पर्समधून- ते आपल्याला खुणावत राहतात. या नायकाचं वेगळेपणही निरनिराळ्या प्रसंगांमधून दिसत राहतं. एका दृश्यात, तीस वर्षांपूर्वीच्या आपल्या एका सिनेमाविषयी बोलताना तो म्हणतो, ‘‘त्या वेळी नायकाचं  काम मला अजिबात आवडलं नव्हतं. मला तसा अभिनय अपेक्षित नव्हता. पण अलीकडेच मी तो सिनेमा पुन्हा पाहिला आणि या वेळी त्याने चांगला अभिनय केलाय, असं मला वाटलं.’’

हा सिनेमाविषयी बोलतोय की नाटकाविषयी, हे क्षणभर लक्षात येत नाही. सिनेमातला अभिनय बदलेल कसा? आल्मादोवर जिला आपली म्युझ मानतो, ती पेनेलोपे क्रूझ ‘पेन अँड ग्लोरी’मध्येही आहे. आवर्जून उल्लेख करायला हवा तो साल्वादोरचा अभिनेता- मित्र- शत्रू-मित्र बनलेल्या आल्बर्तोचं काम करणाऱ्या एसिए एत्झेआन्दियाचा. (हा उच्चार चुकीचाही असू शकतो, या नटाच्या नावाचं स्पेलिंग आहे - Asier Etxeandia). तीस वर्षांनी साल्वादोर आणि आल्बर्तोची भेट होते. जुनं शत्रुत्व उफाळून येतं, मैत्री होते, भांडण होतं. अशातच साल्वादोरने लिहिलेला आत्मकथनात्मक मोनोलॉग आल्बर्तोच्या हाती लागतो. नाव असतं ‘अँडिक्शन’. या नटाने नट म्हणून स्टेजवर केलेला अभिनय आणि एरवीचं त्याचं असणं यातला फरक अतिशय नेमका दाखवलाय.

पण हा सिनेमा खऱ्या अर्थाने अँन्टोनिओ बन्डेरासचा आहे. या नटाला पडद्यावर पाहताना आपल्याला केवळ आल्मादोवरचा दिग्दर्शक दिसत राहतो. त्याला आलेली निराशा, पाठीच्या दुखण्यामुळे त्याचं उठणं-बसणं, डोकेदुखीमुळे बेजार होणं, मधूनच गुदमरल्यामुळे श्वास कोंडणं या सगळ्या व्याधी आणि त्या सहन करत त्याचं वावरणं अफाट आहे. अँन्टोनिओ बन्डेरासची ही सर्वोत्कृष्ट भूमिका ठरावी इतकी त्याने ती जीव ओतून वठवली आहे. आल्मादोवरनेही अपेक्षाभंग केला नाही, असं निश्चितच म्हणता येईल.

0

हिरोकाझू कोरिडा यांचा पहिला वहिला फ्रेंच सिनेमा ‘द ट्रुथ’ मात्र या कसोटीवर उतरला नाही. हा सिनेमा वाईट निश्चितच नाही, पण त्यात त्यांच्या जपानी सिनेमांमधला प्रामाणिकपणा दिसत नाही. इथे कलेऐवजी कुसर जास्त आहे, असं वाटत राहतं. सगळं कसं ठरवून, विचारपूर्वक केलेलं, पण आत्म्याशिवाय. त्यामुळे अपेक्षाभंग होतो. सर्वसाधारणपणे दिग्दर्शक जेव्हा आपला कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्या भाषेत सिनेमा बनवू पाहतो, तेव्हा तो स्वत:वर आणि त्याच्या प्रेक्षकांवरही अन्याय करतो असं वाटतं. सरसकट सगळ्या दिग्दर्शकांना हे विधान लागू होणार नाही कदाचित, पण बहुतेक दिग्दर्शकांच्या बाबतीत हे खरं आहे.

‘द ट्रुथ’ ही एका फिल्मस्टारची गोष्ट आहे. ‘एक थोर अभिनेत्री बनण्यासाठी एक वाईट आई, एक वाईट मैत्रीण असणं मला नेहमीच मान्य होतं,’ असं म्हणणाऱ्या आणि आयुष्य उतरणीला लागलेल्या फिल्मस्टारची. पण वय वाढलं  म्हणून तिचा तोरा कुठेही कमी झालेला नाही. सिनेमाच्या सुरुवातीलाच तिची मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराशी बोलताना ती तिच्या समकालीन अभिनेत्रींविषयी बोलताना, त्या जिवंत आहेत की नाहीत हेही आपल्याला माहीत नाही- असं अगदी सहजी बोलून जाते. आपण अजूनही काम करतो आहोत, आणि त्या विस्मृतीत गेल्या आहेत हे अधोरेखित करणं हा तिचा उद्देश आपल्यापासून लपून राहत नाही. फाबियेनने वयाची सत्तरी ओलांडली आहे. पण ती अजूनही काम करतेय. किंबहुना, तिच्या नव्या सिनेमाचं शूटिंगही चालू आहे. सिनेमातला हा सिनेमाही वेगळा आहे. वय न वाढणाऱ्या आईच्या आणि वेगवेगळ्या वयांतल्या तिच्या मुलीच्या नात्याची ही गोष्ट आहे. पण फाबियेन इथे आई नाही, तर तरुण आईची सत्तरीमधली मुलगी आहे.

याच दरम्यान, तिचं आत्मचरित्र ‘द ट्रुथ’ नावाने प्रसिद्ध होतंय. प्रकाशन समारंभासाठी अमेरिकेत पटकथा-लेखक म्हणून काम करणारी तिची मुलगी लुमिर, सामान्य दर्जाचा अभिनेता असलेला तिचा नवरा हॅन्क आणि त्यांची आठ- दहा वर्षांची मुलगी शार्लोट पॅरिसमध्ये येतात. फाबियेन आणि लुमिरच्या नात्यामध्ये तणाव आहे, हे पहिल्या क्षणापासून आपल्या लक्षात येतं. त्यातच लुमिर आईचं आत्मचरित्र वाचते आणि आपल्या बालपणाविषयी आई बेधडक खोटं बोललीये, हे पाहून संतापते. आईशी वाद घालते. फाबियेन-लुमिरचे संबंध, सिनेमातल्या फाबियेनचे आणि तिच्या आईचे संबंध यातून दिग्दर्शक आपल्याला एका नात्याविषयी, त्यात असलेल्या तणावांविषयी आणि त्यात एकच एक ‘सत्य’ असू शकतं का याविषयी सांगू पाहतो.

सिनेमाचे संवाद स्वत: कोरिडांनीच लिहिले आहेत, जे काही वेळा तुमच्यावर आदळल्यासारखे वाटतात. नात्यांमधली गुंतागुंत कोरिडांच्या प्रत्येक सिनेमात असते. कुटुंब हे त्यांच्या सिनेमांमध्ये केंद्रस्थानी असतं. पण तरीही ते फक्त त्या एका कुटुंबाविषयी बोलत नसतात. त्यांना जे काही सांगायचंय त्याचा कॅनव्हास प्रत्यक्ष पडद्यावर दिसतंय त्यापेक्षा खूप मोठा आहे, हे जाणवत राहतं. ‘द ट्रुथ’मधून तो अनुभव मिळत नाही. यात कशाची तरी कमी आहे, असं वाटत राहतं. मग आपण ती कमतरता शोधू लागतो आणि सिनेमामधलं गुंतून जाणं कमी होतं. निदान माझं तरी असं झालं.

0

फतिह अकिन यांच्या ‘द गोल्डन ग्लोव्ह’मध्ये तर एका क्षणासाठीही मी गुंतून राहू शकले नाही. ही एक थ्रिलर फिल्म आहे. फ्रिट्‌झ हॉन्का या सिरियल किलरच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या एका कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. हॉन्काच्या हॅम्बर्गमधल्या घरातून अनेक महिलांच्या शरिराचे तुकडे 1970 च्या दशकात सापडलेले होते. अतिशय निम्न वर्गात राहणारा हा सिरियल किलर एखाद्या दिग्दर्शकाला सिनेमाचा विषय वाटला तर त्यात आश्चर्य नाही, पण त्यावरचा सिनेमा बनवताना प्रेक्षकांना त्या व्यक्तिरेखेबरोबरच सिनेमाचीही शिसारी आली तर ते दिग्दर्शकाचं अपयशच मानायला हवं.

सिनेमाची सुरुवात एका पलंगावरच्या मळलेल्या चादरीवर मरून पडलेल्या मुलीच्या दृश्याने होते. हॉन्का तिला एका पोत्यात कोंबतो आणि जिन्यावरून ते पोतं खाली नेऊ लागतो. पण त्या आवाजाने एक लहान मुलगी दरवाजा उघडून पाहते आणि आपण पकडले जाऊ, असं वाटून हॉन्का परत घरी येतो. आता त्याला एक नवी कल्पना सुचते- मुलीच्या शरीराचे तुकडे करण्याची. त्यानंतर गोल्डन ग्लोव्ह नावाच्या बारमधला हॉन्का आपल्याला दिसत राहतो. किडलेल्या दातांचा त्याचा भीतिदायक चेहरा, त्याचं विकृत सेक्स करणं, त्याचं किळसवाणं घर आपल्याला दिसत राहतं. पोटात मळमळल्यासारखं व्हायला, होतं आणि हा अत्याचार आपण स्वत:वर का करावा असा प्रश्न मनात उभा राहतो.

फतिह अकिन हा वेगळ्या प्रकारचे सिनेमे बनवणारा दिग्दर्शक आहे. (अनुराग कश्यप यांचा तो आवडता दिग्दर्शक आहे.) पण तरीही त्यांच्याकडून ‘द गोल्डन ग्लोव्ह’सारख्या सिनेमाची मी अपेक्षा केली नव्हती. ‘द एज ऑफ हेवन’सारख्या सिनेमांचा हाच का तो दिग्दर्शक, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. फार कमी वेळा सिनेमा अर्धवट सोडून येण्याचा विचार माझ्या मनात येतो; सिनेमा वाईट असला तरी त्याला थोडा वेळ द्यावा, असं वाटत राहतं. या सिनेमाच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही.
 

Tags: द एज ऑफ हेवन द गोल्डन ग्लोव्ह द ट्रुथ अँन्टोनिओ बन्डेरास पेन अँड ग्लोरी डॅनिएल ब्लेक आय वुई मिस्ड यू सॉरी फतिह अकिन हिरोकाझू कोरिडा पेद्रो आल्मादोवार केन लोच मीना कर्णिक इफ्फी २०१९ the age of heaven the golden glove the truth antonio banderas Pain and glory Asier Etxeandia Daniel Blake Sorry we missed you Fatih Akin Hirokazu Kore-eda Pedro almodóvar Ken Loach Meena Karnik International Film Festival of India #IFFI 2019 Cinema IFFI 2019 IFFI Meena Karnik इफ्फी 2019 इफ्फी चित्रपट सिनेमा मीना कर्णिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके