डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जॉर्ज ऑर्वेल : शेवटच्या माणसाला जाणून घेणारा (उत्तरार्ध)

ऑर्वेल यांच्या लिखाणाचा बाज समजून घेताना त्यांनी 1945 साली लिहिलेल्या ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम' या निबंधाचा उल्लेख करावासा वाटतो. या निबंधात त्यांनी ‘देशभक्ती आणि राष्ट्रवाद' या संकल्पनांमध्ये असलेला फरक अगदी थोडक्यात स्पष्ट केला आहे. ऑर्वेल यांच्या डाव्या विचारसरणीशी परिचित असलेल्यांना त्यांच्या, आपल्या मातृभूमीवर अतिशय उत्कटतेने प्रेम केलं पाहिजे, खरंतर असं प्रेम करणं ही मानवाची नैसर्गिक आणि सकारात्मक बाजू आहे

1946 साली ‘मी का लिहितो' या निबंधात जॉर्ज ऑर्वेल म्हणतात, “गेल्या दहा वर्षात माझे ध्येय एकच होते, ते म्हणजे राजकीय लिखाणाला कलात्मक रूप द्यायचं". पुढे जाऊन ते म्हणतात, “जेव्हा, जेव्हा राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन मी लिहीत नाही तेव्हा तेव्हा माझे लिखाण मलाच अतिशय रटाळ वाटायला लागतं. माझी वाक्यं पोकळ असतात, विशेषणं खोटी असतात. थोडक्यात, माझं सारं लिखाणच फसतं."

परंतु ऑर्वेल यांची संभावना केवळ ‘राजनैतिक लेखक' म्हणून करणं हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. ऑर्वेलना फार कमी आयुष्य लाभलं. जेमतेम सत्तेचाळीस वर्षांच्या आयुष्याच्या मध्यावर लेखक व्हायचं असा ठाम निर्णय त्यांनी केला. त्यांच्या लिखाणाची सुरुवात कादंबरी लेखनानं झाली आणि मृत्युसमयीसुद्धा ते एका कादंबरीची जुळवाजुळव करीत होते. निबंधकार म्हणून तर ऑर्वेल यांची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांचे अनेक निबंध राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन लिहिले गेले असले, तरी साहित्य, भाषा, सरकारी नियंत्रण यांवरच्या त्यांच्या निबंधांनी इंग्रजी भाषेच्या समृद्धीत भरच घातली आहे. 

पण यापेक्षाही पलीकडे जाऊन एक फार महत्त्वाची कामगिरी ऑर्वेल यांच्या लिखाणानं बजावली आहे. ऑर्वेल हे एक प्रतिभावंत पत्रकार होते. स्तंभलेखक म्हणून वृत्तपत्र लेखनात त्यांचे नाव आदराने घेतलं जातं. ‘ट्रिब्युन’साठी लिहिलेल्या ‘अ‍ॅज आय प्लीज' या त्यांच्या स्तंभलेखनात त्यांनी कधी गंभीर, कधी खट्याळ, कधी चिडवणारं, तर कधी अंतर्मुख करायला लावणारं लिखाण इतक्या कुशलतेनं केलं आहे की आजही तरुण वृत्तपत्र लेखकांना ‘आदर्श’ लिखाण म्हणून ते दाखवलं जातं. आणि तरीही त्यांनीच नव्हे तर इतरांनीही त्यांना प्रामुख्याने ‘राजनैतिक लेखक' मानले याचं कारण एका राजकारणी मुत्सद्याच्या शब्दांत, “आम्ही त्यांचं एकही पुस्तक कधी वाचलं नाही. पण त्यांचं स्तंभलेखन आणि निबंध म्हणजे आमच्यासाठी निरंतर शिक्षणाचा स्रोत होता." 

जॉर्ज ऑर्वेल यांच्या एकूण लेखनाचा अभ्यास करताना काही विषय लिखाणात पुन्हा पुन्हा डोकावताना दिसतात. निसर्गप्रेम, साहित्यप्रेम यांसोबत बुद्धिवंतांविषयी अविश्वास, सरकारी कारभाराबद्दल साशंकता साम्राज्यशाहीचा तीन विरोध, एकपक्षीय राज्यकारभारावर सडकून टीका, असे कडक विषयही लिखाणात आढळतात. जॉर्जंना साधी भाषा व साधं बोलणं फार आवडायचं. आपलं लिखाण साधं असावं, शक्यतो सर्वांना समजावं यावर त्यांचा फार कटाक्ष असे. स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, बंधुभाव, सुसंस्कृतता, देशभक्ती ही तर ऑर्वेल यांची आवडती मूल्यं. या मूल्यांच्या जपणुकीवर त्यांनी खास लिहिलंय; आणि त्यांच्या इतरही लिखाणातून ते डोकावतं. 

ऑर्वेल यांच्या लिखाणाचा बाज समजून घेताना त्यांनी 1945 साली लिहिलेल्या ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम' या निबंधाचा उल्लेख करावासा वाटतो. या निबंधात त्यांनी ‘देशभक्ती आणि राष्ट्रवाद' या संकल्पनांमध्ये असलेला फरक अगदी थोडक्यात स्पष्ट केला आहे. ऑर्वेल यांच्या डाव्या विचारसरणीशी परिचित असलेल्यांना त्यांच्या, आपल्या मातृभूमीवर अतिशय उत्कटतेने प्रेम केलं पाहिजे, खरंतर असं प्रेम करणं ही मानवाची नैसर्गिक आणि सकारात्मक बाजू आहे. या त्यांच्या भूमिकेचं आश्चर्य वाटायचं. ऑर्वेल म्हणायचे, माणसानं ‘क्रांतिकारी देशभक्त' असले पाहिजे. 

मात्र या क्रांतिकारी देशभक्तीशी निगडीत होतं सामान्य माणसाविषयी वाटणारं प्रेम, आस्था आणि कळकळ. ऑर्वेल यांच्या मते प्रत्येक देश आणि त्यांच्या परंपरा यांच्यावर सर्वात शेवटच्या माणसाचा हक्क आहे. मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू समाज देशावर, त्या देशाच्या भूमीवर किंवा त्याच्या परंपरांवर अधिकार सांगू शकत नाहीत. ही भूमी शेवटच्या माणसाची आहे; कारण या भूमीत फक्त त्याचेच श्रम मिसळले आहेत. त्यांच्या क्रांतिकारी देशभक्तीचा ओघ हा असा श्रमिक माणसांपर्यंत जातो. क्रांतिकारी देशभक्ताचे श्रमिकाशी अतूट नातं जोडतो. 

पण त्याचवेळी राष्ट्रवाद हा संकुचित असतो. तो इतर राष्ट्रांना वगळून आत्मतृप्तीत मग्न होतो आणि आपले वर्चस्व इतरांवर प्रस्थापित करण्यात गुंग होऊन जातो असा धोक्याचा कंदील ऑर्वेल यांनी आपल्या उपरोल्लेखित निबंधात दाखवला आहे. 

या शेवटच्या माणसाला जाणून घेण्याची, त्याच्या सुखदुःखाशी समरस होण्याची इतकी ओढ, इतकी उत्कटता ऑर्वेल यांना वाटली, की आपले मध्यमवर्गीय कपडे तर त्यांनी उतरवलेच पण मध्यमवर्गीय संस्कारही टराटरा फाडून फेकण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. आपल्या एका कादंबरीत या नवीन जीवनातील रोमांचकारी थरार त्यांनी एका प्रसंगातून रंगवला आहे. कादंबरीचा नायक म्हणतो, ‘माझ्या नवीन कपड्यांनी माझे जगच बदलून गेलं. प्रत्येकाची माझ्याशी वागण्याची पद्धत लगोलग बदलली. एका हमालाची पडलेली हातगाडी सावरली तर तो माझ्याकडे हसून बघत म्हणाला, मित्रा, आभारी आहे. ‘मित्रा!' यापूर्वी या नावानं मला कोणीच कधीच हाक मारली नव्हती- माझ्या कपड्यांनी ही किमया घडवून आणली होती.’

आयुष्यात अशा मुक्ततेचा, स्वातंत्र्याचा लाभ झाला आणि ऑर्वेल यांचे ‘अवघेचि' आयुष्य बदलले. त्यांचा तो काळ केवळ आनंदाचा नव्हता. अत्यानंदाचा होता. आनंदाच्या या अनुभूतीने गरिबीत, कष्टकऱ्यांचं आयुष्य जगणं हा एक छोटा प्रयोग राहिला नाही; तो एक प्रदीर्घ अनुभव ठरला. हे आयुष्य स्वीकारलं अन् मुक्ततेच्या आनंदाला करुणेची, दुःखाची धार यायला लागली. या दुःखाचं रूपांतर विषम समाजव्यवस्थेवरील रागात होऊ लागलं. ऑर्वेल यांचा नायक ट्रेनमधून जाताना त्याला जे दिसतं त्याचे वर्णन करताना म्हणतो- 

“ट्रेन सुरू झाली अन् नदीकाठालगतच्या झोपडपट्टीचं दर्शन घडू लागलं. एका घरापाठीमागे कचरा साठलेली मोरी साफ असलेली बाई दिसली. तिनं आगगाडीकडे पाहिलं आणि मी तिच्याकडे. ती जेमतेम पंचविशीची असावी, पण दिसत होती चाळिशीची. गर्भपात आणि प्रचंड काम यांचा तो परिणाम होता. ती विलक्षण थकलेली दिसत होती आणि तिच्या डोळ्यांतले भाव! बापरे! अतिशय दुःखाचे, निराशेचे भाव होते ते! आपलं काय होतंय आणि काय होणार आहे, याची यथार्थ जाणीव तिला होती, याची जाणीव मला त्या क्षणी झाली."

दुःखाच्या या प्रखर जाणिवेतून ऑर्वेल यांचा समाजवाद रुजत गेला आणि त्यातून जगप्रसिद्ध ‘अ‍ॅनिमल फार्म' चा जन्म झाला. 

‘अ‍ॅनिमल फार्म' या कादंबरीचा लेखनकाल नोव्हेंबर 1943 ते फेब्रुवारी 1944 च्या दरम्यानचा आहे. त्या काळात जर्मनीचा पराभव स्पष्ट दिसू लागला होता. युरोपात तिची पिछेहाट चालू होती आणि रशियात जर्मनीच्या अंतिम पराभवाची चिन्हं दिसत होती. अशा वातावरणात ऑर्वेल यांची मानसिक स्थिती उल्हसित झाली होती. त्यातूनच ही कादंबरी त्यांच्या अलौकिक प्रतिभेनं झळाळून उठली. एकीकडे राजकीय टीकेचे आसूड हाणत ही कादंबरी माणसाच्या शोकांतिकेकडे अगदी सहज प्रवास करते. टीकेचा सगळा रोख सोव्हिएत रशियावर आणि स्टॅलिनच्या एकाधिकारशाहीवर आहे. रशियावरच्या या घणाघाती टीकेमुळेच तर तत्कालीन प्रकाशक कादंबरीला हात लावायला कचरत होते. या काळात रशिया, अमेरिका आणि ब्रिटन ही दोस्त राष्ट्र होती. त्यामुळे ‘अ‍ॅनिमल फार्म'  भोवती प्रतिकूलतेचं सावट पडणं अपरिहार्य होतं. तरीही शेवटी ऑगस्ट 1945 मध्ये कादंबरीला प्रसिद्धीचा प्रकाश दिसला आणि रातोरात ‘अ‍ॅनिमल फार्म' प्रसिद्धीच्या शिखरावर गेलं. 

आपले चरित्र इतरांनी लिहावं या कल्पनेला ऑर्वेल यांनी कायम कडाडून विरोध केला. एकूणच आपल्या आयुष्याविषयी ते कमीत कमी बोलले, त्यांनी कमीत कमी लिहिलं. ते म्हणायचे, “एखाद्या व्यक्तीच्या अगदी खोल, अंतरंगात डोकावलं तर खरंच काय अनुभवाला येतं ? मानवी जीवन म्हणजे अनेक अपमान, अवहेलना आणि न संपणारी दुःखं यांची मालिकाच असते. ती दुःखं कशाला मांडायची?"

बर्मामध्ये पोलीस ऑफिसर म्हणून काम करत असताना त्या जीवनात अशा अपमान, अवहेलना आणि दुःखाचे किती चटके ऑर्वेल यांनी सोसले! ‘शूटिंग अ‍ॅन एलिफंट' या त्यांच्या प्रसिद्ध निबंधात ऑर्वेल म्हणतात, “बर्मात माझे वास्तव्य असताना अनेक लोक माझा प्रचंड तिरस्कार करायचे. गोऱ्या लोकांविरुद्ध इतकी चीड लोकांच्या मनात होती की त्यांचा प्रतिनिधी म्हणून पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात मी दिसलो की घृणेची, तिरस्काराची भावनाच त्यांच्या आविर्भावातून दिसायची. फूटबॉल खेळताना एखादा चपळ बर्मी खेळाडू माझ्या पायात पाय घालायचा आणि रेफरी नेमका त्याच वेळी दुसरीकडे पाहण्याचा बहाणा करायचा, त्यावेळी बघ्यांचे भेसूर हसू सहन करणं जड जायचं. बुद्धिस्ट धर्मगुरूंना तर युरोपियनांकडे तुच्छतेचे कटाक्ष टाकण्यावाचून काही येतच नसावं, असं वाटण्याइतकी भयानक परिस्थिती मी अनुभवत होतो." 

त्या काळात ऑर्वेल यांनी एका हत्तीला आपल्या बंदुकीनं ठार केलं. हत्तीनं एका माणसाला मारलं होतं हे जरी खरं असलं तरी ऑर्वेल यांनी त्याच्यावर गोळी झाडली तेव्हा तो अतिशय शांत झाला होता. केवळ ‘नेटिवांवर' छाप पडावी म्हणून हत्तीवर गोळी झाडावी लागली, ही दुःखाची टोचणी कितीतरी काळ ऑर्वेलना त्रास देत राहिली. त्याचवेळी आणखी एका सत्याचा साक्षात्कार मात्र त्यांना झाला. 

“ज्या क्षणी गोरा माणूस आपल्या सत्तेच्या जोरावर जुलमी बनला. त्याच क्षणी त्यानं आपलं स्वातंत्र्य गमावलं." 

सत्तेविषयीचा हा तिरस्कार मनात कायमचा ठाण मांडून बसला आणि त्यातून शब्द उमटले, 
सत्ताधीशांची सत्ता जेव्हा धुळीला मिळेल
सैनिकांना कापून काढलं जाईल 
किंवा पळता भुई थोडी होईल 
तलवारी रक्ताच्या रंगानं माखतील 
आणि जेव्हा.... 
हिंदूंच्या देवळात शेवटचा इंग्रज 
अखेरचा आचका देईल, 
तेव्हा लोकांची स्वप्नं खरी ठरतील. 
जुलमी झेंडे धुळीला मिळतील. 
लंडनमधली गटारं रक्तानं भरून जातील 
आणि कोसळत्या सिंहासनांच्या 
आवाजांनी मनोरे भयानं कापू लागतील. 
त्यावेळी.... 
आपल्या मरणानंतर या जगाला पुनश्च 
घेरणाऱ्या जुलमांचा विचार करणं… 
भविष्यातल्या त्या जुलमांचा, त्या 
दुःखाचा विचार करणं, 
किती भयंकर आहे!  
किती भयंकर आहे!
किती भयंकर आहे!
तरीही मित्रांनो, मला बोलू द्या. 
एकदा तरी त्या नटलेल्या असत्याचा 
त्याग करू द्या. 
मित्रांनो, मला खरं बोलू द्या, 
मला खरं बोलू द्या. 
मी गेलो की जगात काय घडेल, 
याची मला पर्वा नाही. 
मरू द्या ते लोक आणि 
त्यांच्या किंकाळ्या, 
जळू देत राजा आणि त्यांची प्रजा,
हजारो लोकांच्या वेदनामय किंकाळ्यांहून 
महत्त्वाची आहे मला माझी दातदुखी. 
जळून जाऊ दे ही पृथ्वी 
अन् मरू द्या तो देव. 
हे जगणं, ही पृथ्वी अन् हा काळ 
करणार आहेत माझी सुटका 
कायमची… 
माझं नातं फक्त त्या सुटकेशी आहे. 
सुटका!

Tags: बर्मा ट्रिब्युन राष्ट्रवाद स्टॅलिन युरोपियन जॉर्ज ऑर्वेल Burma Tribune Nationalism Stalin European George Orwell weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके