एकाएकी डोरियन आपल्या पूर्वी केलेल्या विचित्र इच्छेचं स्मरण झालं. जीवनातील भलेबुरे परिणाम केवळ तसबिरीवर व्हावेत व आपला चेहरा मात्र तसाच निष्पाप, निरागस, तारुण्यानं उत्फुल्ल राहावा ही त्यानंच केलेली इच्छा त्याला आठवली. त्या इच्छेचं प्रत्यंतर तो समोर बघत होता, पण त्यानं आनंदित होण्याऐवजी दुःखाची, वेदनेची एक तीव्र कळ डोरियनच्या अंतर्यामी उमटली. आपण नुकतंच केलेलं कृत्य किती हीन दर्जाचं होतं, किती क्रूर होतं याची याद जणू समोरच्या चित्रातील त्याची छबी त्याला देत होती, देत राहणार होती. ती बघताना डोरियनचं मन विद्ध होऊन गेलं. आपण पाप केलं आहे व त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधला पाहिजे याची दाहक जाणीव त्याला झाली. सिबिलकडे जाऊन तिची क्षमायाचना करून, तिच्याशी लग्न करण्याचं त्यानं मनात ठरवलं तेव्हाच त्याला बरं वाटलं.
ऑस्कर वाइल्डच्या नाटकातील एक स्त्री पात्र दुसऱ्या पुरुष वर्गाला विचारते, "आपण जीवनाविषयी इतक्या तुच्छतेनं का बोलता?" उत्तर येतं. "कारण मला वाटतं जीवन इतकं महत्त्वाचं आहे की त्याविषयी गांभीर्यानंसुद्धा बोलणं शक्य नाही." ऑस्कर वाइल्डची शेवटची साहित्यनिर्मिती (गद्यातली) म्हणजे त्यानं लॉर्ड आल्फ्रेड डग्लस याला लिहिलेलं लांबलचक पत्र. आपल्या जीवनाच्या भूतकाळातील अनेक दुर्दैवी घटनांचा त्यानं या पत्रात ऊहापोह केला आहे व आपल्या दुर्गतीचं खापर 'बोसी’ वर (आल्फ्रेड डग्लस) फोडलं आहे. ऑस्कर वाईल्डच्या उत्तरार्धात त्याच्या वाट्याला आलेले (किंबहुना त्यानं आपणहून आणवून घेतलेले) भोग पाहता हे पत्र दुःख असणार यात काहीच शंका नाही. तरीही ते प्रकाशित झाल्यावर त्यावर लिहिताना जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटलं, "या पत्राच्या दोन ओळींमध्ये जो अदृश्य विनोद दडला आहे, त्याची तुलना एखाद्या विनोदी उपहासिकेशीही करता यायची नाही. इतका तो श्रेष्ठ आहे."
आपल्या आयुष्याच्या शोकांतिकेविषयी लिहितानाही लेखकाची विनोदबुद्धी शाबूत असावी, एवढंच नव्हे तर त्याच्या लिखाणातून तिनं आपलं अस्तित्व हलकेच दाखवत वाचकाच्या हृदयापर्यंत पोचावं ही प्रतिभा असामान्य नव्हे का? ऑस्कर वाईल्ड या प्रतिभासंपन्न लेखकाच्या काही कलाकृतीविषयी वाचायला वाचकांना नक्की आवडेल याची खात्री वाटते. सुरुवातीला ऑस्कर वाइल्डचं स्वतःविषयी काय मत होतं ते आपण जाणून घेऊया. वाईल्डनं लिहिलंय, 'येनकेन प्रकारेण मी प्रसिद्धीच्या झोतात राहीन याची मला खात्री वाटते. पण समजा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून माझी ख्याती नाही होऊन शकली तर निदान कुप्रसिद्ध तर नक्कीच होईन.' ऑस्कर वाइल्डचं हे स्वतः विषयीचं कथन अगदी शंभर टक्के अचूक ठरलं. वाईल्ड अमाप आणि अफाट लोकप्रियतेचा धनी तर झालाय. पण त्याच्या हयातीतच कमालीची कुप्रसिद्धी, तुरुंगवास या साऱ्यांना त्याला सामोरं जावं लागलं. ऑस्कर वाईल्ड यानं त्याच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना केवळ सात वर्षात जन्म दिला. 1888 मध्ये 'द हंपी प्रिन्स' या मुलांच्या गोष्टींनी सुरुवात केली आणि 1895 मध्ये 'द इम्पॉर्टन्स ऑक बिईंग अर्नेस्ट'नं या सोनेरी कारकिर्दीवर कळस चढविला. पण या लेखात आपण ऑस्कर वाईल्ड याला सामाजिक, मानसिक, आर्थिक अशा सर्व दृष्टीनं रसातळाला नेणाऱ्या घटनांतून जन्माला आलेल्या 'पिक्चर ऑव्ह डोरियन ग्रे’ या जगप्रसिद्ध कादंबरीविषयी जाणून घेऊया.
कादंबरीची सुरुवात लंडनमधील एका भव्य स्टुडिओच्या दर्शनानं होते. बेसिल हॉलवर्ड नावाच्या कलावंताचा तो स्टुडिओ आहे. स्टुडिओत बेसिलचा जुना, जानिता मित्र लॉर्ड हेन्री बसला आहे. उंची सिगारेटचा (ओपियमयुक्त) आस्वाद घेत तो बेसिलच्या एका असामान्य चित्राची स्तुती करतो आहे. खरं म्हणजे चित्राची स्तुती म्हणण्यापेक्षा चित्राचा मुख्य विषय असलेल्या तरुणाच्या सौंदर्याची स्तुती चाललीय तिथं. चित्रातील तो तरुण म्हणजे नुकताच परिचित झालेला डोरियन ग्रे नावाचा युवक आहे हे बेसिलला मान्य करावंच लागतं. लॉर्ड हेन्री आणि डोरियन ग्रे यांचा परस्परांशी परिचय करून देण्यास मात्र बेसिल नुसताच नाखूष नाही तर त्याला त्या गोष्टीची काहीशी भीतीच वाटतेय असं दिसतं. मात्र तेवढ्याच डोरियन ग्रे तिथं आल्यामुळे बेसिलचा अगदी नाईलाज होतो व तो डोरियन व लॉर्ड हेन्री यांचा परस्परांशी परिचय करून देतो. लॉर्ड हेन्री त्या क्षणापासूनच डोरियन ग्रेवर ज्या प्रकारे आपलं जाळं पसरतो ते पाहता आपली भीती मूर्तिमंत खरी ठरते आहे याचा अंदाज बेसिलला येतो पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
लॉर्ड हेन्री ही एक अजब वल्ली आहे. आयुष्य म्हणजे चैन, मजा आणि सुखलोलुपता, बस्स! एवढंच. हीच जीवनाची गोळाबेरीज, हेच आयुष्याचं सार्थक, याविषयी त्यांची स्वतःची बालंबाल खात्री तर आहेच पण हेच तत्त्वज्ञान डोरियन ग्रेच्या गळी उतरवण्यासाठी त्याचं मन अधीर झालेलं आहे. डोरियन ग्रेशी जवळीक झाल्याझाल्या लॉर्ड हेन्री आपलं पहिलं तत्त्व त्याला पटवून देतो. त्या तत्त्वाचा थोडक्यात सारांश असा मोहापासून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्या मोहाला शरण जाणं. हे असं जीवनविषयक तत्त्वज्ञान एखाद्या तरुण, सुंदर आणि मुळातच स्वैराचाराची ओढ असणाऱ्या तरुणापुढे वारंवार आणि तेसुद्धा आकर्षक पद्धतीन मांडलं गेलं तर त्याचे परिणाम काय होतील ते उघड आहेच ना? लॉर्ड हेन्रीन मांडलेलं तत्त्वज्ञान डोरियन ग्रे या उच्छृंखल तरुणाला असं काही आवडून गेलं की त्या तत्त्वज्ञानाला प्रत्यक्ष जीवनात आणण्याची तो पराकाष्ठाच करू लागला. थोडक्यात, डोरियन ग्रे हा लॉर्ड हेन्रीच्या भजनी लागला असं म्हणायला अजिबात हरकत नाही. मात्र लॉर्ड हेन्री आपली स्वैर विचारधारा डोरियनच्या समोर मांडत असतानाच जाणता, अजाणता किंवा अगदी हेतुपुरस्सर म्हणा, जीवनाचं एक चिरंतन सत्यही डोरियनसमोर मांडतो. डोरियनचं असामान्य सौंदर्य, चैतन्यानं ओथंबलेलं तारुण्य, कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्त्व यांमुळे त्याच्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस भारावून जातो हे तर खरंच.
डोरियनला याची जाणीव तर आहेच पण त्याविषयी अभिमान आहे, गर्व आहे. लॉर्ड हेन्री हलकेच त्याच्या हे लक्षात आणून देतो की हे अद्भुत सौंदर्य एक ना एक दिवस काळाच्या ओघात संपून जाणार आहे, नष्ट होणार आहे. जरा, वृद्धत्व या जीवनाच्या अवस्था डोरियनला माहीत नसतील असं थोडंच आहे? परंतु एखादं सत्य माहीत असणं आणि ते स्वतःच्या संदर्भात उघडया नागड्या रूपात समोर उभं राहणं यात केवढा फरक आहे. डोरियनचं मन अखंडपणे आपल्या सौंदर्याभोवती रुंजी घालतं आहे. लोकांच्या प्रशंसेच्या नजरा झेलताना त्याचा जीव अंतर्बाह्य सुखावून जातो आहे. अशा वेळी आयुष्यात अपरिहार्यपणे येणाऱ्या सौंदर्याच्या नाशाच्या जाणीवेनं तो हादरून जातो. त्याचं जगच उलटंपालटं होऊन जातं. त्या भरात आपल्याच अप्रतिम चित्राकडे बघत तो एक विचित्र इच्छा बोलून दाखवतो. डोरियन आपल्या विलक्षण देखण्या चित्राकडे बघत म्हणतो, “मी म्हणे म्हातारा होत जाणार. माझं हे अप्रतिम रूप ओसरलं जाणार. त्यावर वार्धक्याच्या सुरकुत्या चढणार नाही, हे होता कामा नये हे फारच भयंकर आहे. मी हे होऊ देणार नाही. पण…पण असं झालं तर? मी वृद्ध होण्याऐवजी माझ्या या चित्रानं म्हातारं व्हावं. वयाच्या वार्धक्याच्या खुणा माझ्यावर उमटण्याऐवजी या माझ्या चित्रावर उमटत जाव्यात. वृद्ध व्हावं तर हे चित्र: काळाची कोणतीही खूण माझ्यावर उमटू नये. असं झालं तर मी काय वाट्टेल ते देईन. अगदी कोणी माझा आत्मा मागितला तरी मी देईन.” त्यानंतरचं डोरियनचं आयुष्य म्हणजे केवळ लॉर्ड हेन्रीच्या उपदेशाची अंमलबजावणी करणं होतं.
जिथं मौजमजा असेल, जिथं चैन असेल, स्वैराचार असेल, व्यसनं असतील, नाचगाणी असतील तिथं डोरियन ग्रे असणार हे जणू समीकरणच ठरून गेलं. लंडनच्या एकही अवैध गल्लीबोळात डोरियनचा पदस्पर्श झाल्याशिवाय राहिला नाही. विलासात असा बुडून गेलेला असतानाच डोरियनच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं. होय, डोरियन प्रेमात पडला. शेक्सपिअरच्या नाटकातील स्त्रीभूमिका वठवणाऱ्या सिबिल नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात डोरियनची स्वारी आकंठ बुडाली. तिला प्राप्त करणं हीच त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता राहिली. मात्र सिबिलच्या भावाला हे समजल्यावर तो भयंकर चिडला. डोरियननं आपल्या बहिणीला कोणत्याही कारणानं दुःख दिल्यास आपण त्याला ठार मारू अशी प्रतिज्ञा त्यानं घेतली. मात्र डोरियन बेसिल आणि लॉर्ड हेन्री यांना घेऊन सिबिलची भूमिका असलेलं नाटक बघायला गेला आणि सर्वच चित्र पालटलं. डोरियनला सिविलच्या अभिनयसामर्थ्यातील मर्यादा जाणवल्या व आतापर्यंत प्राणापलीकडे वाटणारं त्याचं तिच्यावरचं प्रेम कापरासारखं उडून गेलं. कालपर्यंत प्रेमानं भरून गेलेल्या मनात आता तिरस्काराशिवाय काहीच राहिलं नाही. त्याला पुन्हा जिंकून घेण्याच्या सिबिलच्या प्रयत्नांच्या वाटयाला यश तर सोडाच पण धिक्कार मात्र आला.
सौंदर्यवती असलेली सिबिल अभिनेत्री म्हणून सामान्य आहे हे समजताक्षणी डोरियनच्या मनात साठून राहिली ती तिच्याविषयीची तुच्छता. पण डोरियन घरी गेला आणि बेसिलनं काढलेल्या चित्रातील स्वतःच्या छबीकडे बघताना त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. आपली प्रतिमा काहीशी क्रूर दिसत असल्याचं त्याला जाणवलं आणि तो हादरून गेला. ज्या क्रौर्यानं त्यानं सिबिलचं अंतःकरण दुखावलं होतं ते जसंच्या तसं जणू त्या चित्रात उमटलं होतं. एकाएकी डोरियन आपल्या पूर्वी केलेल्या विचित्र इच्छेचं स्मरण झालं. जीवनातील भलेबुरे परिणाम केवळ तसबिरीवर व्हावेत व आपला चेहरा मात्र तसाच निष्पाप, निरागस, तारुण्यानं उत्फुल्ल राहावा ही त्यानंच केलेली इच्छा त्याला आठवली. त्या इच्छेचं प्रत्यंतर तो समोर बघत होता, पण त्यानं आनंदित होण्याऐवजी दुःखाची, वेदनेची एक तीव्र कळ डोरियनच्या अंतर्यामी उमटली. आपण नुकतंच केलेलं कृत्य किती हीन दर्जाचं होतं, किती क्रूर होतं याची याद जणू समोरच्या चित्रातील त्याची छबी त्याला देत होती, देत राहणार होती. ती बघताना डोरियनचं मन विद्ध होऊन गेलं. आपण पाप केलं आहे व त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधला पाहिजे याची दाहक जाणीव त्याला झाली. सिबिलकडे जाऊन तिची क्षमायाचना करून, तिच्याशी लग्न करण्याचं त्यानं मनात ठरवलं तेव्हाच त्याला बरं वाटलं. पण त्याचं हे बरं वाटणं फारच अल्पजीवी ठरलं.
ज्या सिबिलकडे जाऊन तिची क्षमा मागण्याचा बेत त्यानं केला होता, तिनं प्रेमभंगाचा हा धक्का सहन न होऊन आपल्या आयुष्याचा अंत करून घेतल्याचं त्याला दुसऱ्याच दिवशी समजलं व चांगल्या वागण्याच्या निश्चर्याचे सर्व इमले कोसळले. डोरियन स्वतः ही कोसळण्याच्या बेतातच होता, पण लॉर्ड हेन्रीनं याहीखेपी त्याला मोठा 'अजब' धीर दिला. तिच्या मृत्यूतही एक वेगळ्याच सौंदर्याची अनुभूती घेण्याचा सल्ला लॉर्ड हेन्रीनं दिला व या पठ्ठ्यानं तो मानला. त्यानंतरचं डोरियन ग्रेचं आयुष्य म्हणजे स्वैराचाचा एक नमुना होता. सतत अठरा वर्षे अनेक तरुणांशी समलिंगी संबंध आणि अगणित व्यसनांची संगत हेच त्याचं जीवन, पण एक मात्र नक्की, त्याच्या चेहऱ्यावर या स्वैराचाराची एकही खूण उमटली नव्हती. बदलत चालली होती ती त्याच्या चित्रातील छबी. शेवटी डोरियनच्या हातून खून घडू लागले. माणसांना लुटणं, मारणं, त्यांच्या हत्त्या करणं हा त्याच्या हातचा मळ झाला, त्यावेळी ती छबी इतकी कुरूप झाली होती की, तिनं फक्त रक्त ओकणंच शिल्लक होतं, डोरियन दररोज आपल्या छबीकडे बघे आणि आपल्या पापांच्या खुणा जिवंत होऊनत्याच्या अवतीभोवती नाचू लागत. शेवटी एका खेडवळ मुलीवर अत्याचार करण्याचा मोह होऊनही त्यापासून कटाक्षानं दूर राहून आपल्या पापांचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न डोरियननं केला.
त्यानंतर मोठ्या आशेनं त्यानं आपल्या छबीकडे बघितलं. पाहतो तो काय त्याच्या ओठांच्या कडेला दांभिकतेचं, ढोंगाचं पोकळ हसू त्याला दिसले, आता सर्व संपलं याची प्रखर जाणीव डोरियनला झाली. त्या छबीतून त्याची सदसद्विवेकबुद्धी छातीठोकपणे त्याच्या समोर उभी होती. त्यानं जवळचा सुरा उचलला. डोरियननं सुरा उचलून काय केलं? कोणाचा अंत केला त्यानं? तो ज्या प्रकारचं आयुष्य जगला, त्याचं मूर्तिमंत प्रतिबिंब रात्रंदिवस त्याच्यासमोर उभ होतं. त्याच्या आयुष्याचा ताळेबंद मांडत होतं. डोरियनला ते प्रतिबिंब संपवून अपराधाच्या भावनेतून सुटका करून घ्यायची होती की, ज्या वाचकांनी मूळ कादंबरी वाचली आहे. त्यावर निघालेला सिनेमा पाहिला आहे. त्यांनीही क्षणभर तो सारा पट बाजूला ठेवून मानवी जीवनाच्या यां शोकांतिकेचा पुन्हा एकवार विचार करावा ही विनंती.
Tags: The Importance of Being Earnest George Bernard Shaw Lord Alfred Duglas Oscar Wild Renu Gavaskar 'द इम्पॉर्टन्स ऑक बिईंग अर्नेस्ट जॉर्ज बर्नार्ड शॉ लॉर्ड आल्फ्रेड डग्लस ऑस्कर वाइल्ड रेणू गावस्कर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या