डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लफंग्याचं खरं नाव सुधीर. पण देवींदर त्याला लफंगा म्हणतो म्हणून रस्टीही त्याला लफंगा म्हणतो. देविंदरला रस्टी लहान असला तरी त्याला सावध करणं आपलं कर्तव्य वाटतं कारण, त्याच्या मते सुधीरइतका धोकेबाज माणूस आसपास शोधूनही सापडणं कठीण! तो इतका आकर्षक आहे, की तो आपल्याला कधी टोपी घालून जाईल ते सांगताच येणार नाही.

रस्किन बाँड यांच्या उपरोल्लेखित पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीचा परिचय वाचकांना करून दिला, तरच कदाचित त्या पुस्तकाला किंचितसा न्याय मिळाला असं गृहीत धरता येईल; पण जागेअभावी ते शक्य नसल्याने त्यातील काही निवडक, वेचक व्यक्तिरेखा सादर करण्याचा प्रयत्न करते.

'द बॉक्स मॅन' ही सर्वात कमी शब्दांत सामावलेली व्यक्तिरेखा. या वृद्धाची आणि लेखकाची ओळख काही तासांची. त्या काही तासांत हा वृद्ध लेखकाच्या मनात असा काही ठसून गेला की त्याला शब्दांच्या माध्यमातून कागदावर उतरविण्याशिवाय दुसरा उपायच काय होता?

लेखक आपल्या घराच्या दारात बसून देवदार वृक्षांची रांग डोंगरात अदृश्य होत जातानाचं दृश्य पाहात असताना त्याला त्या वृद्धाचं दर्शन होतं. अगदी सावकाश, एकेक पाऊल मोठ्या कष्टानं टाकत हा वृद्ध येतो आहे. पांढरीशुभ्र दाढी, ताणलेली त्वचा आणि या पार्श्वभूमीवर लुकलुकणारे तेजस्वी डोळे. त्याच्या डोक्यावर एक पत्र्याची बॅग आहे. लेखकापाशी येऊन तो काही विकत घेईल का, याचा अंदाज हा वृद्ध घेतो आहे.

रस्किन बाँडना वाटतं, याच्याजवळ असणाऱ्या कोणत्याही संसारी वस्तूंचा मला उपयोग तरी काय? पण दुसऱ्याच क्षणी त्या वृद्धाचा आत्यंतिक थकवा लक्षात येतो व अशा रीतीनं तो वृद्ध रस्किन बाँड यांच्या घरात प्रवेश करतो.

वृद्धाची पुढची कहाणी आपल्याला अपेक्षित अशीच आहे. तो या जगात एकटा अगदी एकटा आहे. त्याचा एकुलता एक मुलगा पाच वर्षांपूर्वी क्षयाच्या व्याधीनं मेलेला आहे. त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाची चिंता करण्याखेरीज वृद्धाला पर्यायच नाही. हे सारं शक्य तितक्या तटस्थपणे सांगत असताना त्यानं सांगितलेलं तत्त्वज्ञान मात्र विचारात पाडणारं आहे. तो थकून गेलेला म्हातारा रस्किन बाँड यांना म्हणतो, “साहेब, निरोगी जीवनाचा शाप म्हणतात तो हाच. तुमचे मित्र, तुमचे आप्त, तुमचे प्रिय सारेजण तुम्हांला मागे ठेवून पुढे निघून जातात. काही झाडंसुद्धा माझ्यासमोर वाढली, मोठी झाली आणि मेली. मी मात्र तिथंच आहे. पोटासाठी दररोज चढायला अवघड होत जाणारा रस्ता चढतोच आहे.’’

त्या वृद्धाकडून अजिबात उपयोगी नसलेल्या वस्तू खरेदी करताना आणि त्याचं आत्मनिवेदन ऐकताना बाँड यांना वाटत होतं. आता आपल्या या अंगणात हा म्हातारा पडला आणि रूजला तर पालवी फुटून तो नक्की जमिनीला फोडून बाहेर येईल व आपल्या वेड्यावाकड्या फांद्यांचा संभार मिरवीत पुन्हा एकदा उभा राहील.

लेखाच्या शेवटी रस्किन बाँड यांनी ती पत्र्याची पेटी म्हाताऱ्याच्या डोक्यावर उचलून ठेवली आहे. तो वृद्ध मोठ्या कष्टानं घराची एक, एक पायरी उतरून खाली जातो आहे. लेखक त्याच्याकडे मागून बघताहेत व त्यांच्या मनात विचार येताहेत- 'हा वृद्ध किती दिवस जगेल? किती वर्ष? की एखादाच दिवस? की केवळ एखादा तास? पण केव्हाही ती घटना घडली तरी एक गोष्ट मात्र नक्की, जे घडेल तो मृत्यू नाहीच. ती एक दीर्घ निद्रा असेल, अगदी गाढ झोप. एखादं पान झाडावरून अगदी हलकेच कसलीही चाहूल न देता गळून पडतं ना, तसं गळून पडणं असणार आहे वृद्धाचं.' 

रस्किन बाँड मृत्यूविषयी लिहितात ते नेहमीच असं मृदु, हलक, अगदी हळूच गळून पडणं असतं व म्हणूनच मनाला इतकं भिडून जाणारंही.

'द बॉक्स मॅन’च्या अगदी विरुद्ध टोकाचं व्यक्तिचित्रण म्हणजे 'द लफंगा' लेखाचं नाव इतकं समर्पक आणि अर्थपूर्ण आहे की बस्स! छोटा रस्टी (रस्किन बाँड) देवींदर नावाच्या त्याच्या मोठ्या मित्राबरोबर बाजारात गेला असता त्याला या लफंग्याचं पहिलं दर्शन घडतं. चांगला उंच उंच, सैल कपडे घालणारा, लांबट, निस्तेज चेहरा असणारा हा लफंगा तसा चारचौघांसारखाच. पण त्याच्या दोन खासियती त्याला इतरांपेक्षा वेगळा करून टाकतात. पहिलं म्हणजे त्याचे सैतानी चमक असलेले डोळे आणि बेसावध वाटणारं पण खरं तर दुसऱ्याला बेसावध ठेवणारं अत्यंत सुमधुर हास्य.

लफंग्याचं खरं नाव सुधीर. पण देवींदर त्याला लफंगा म्हणतो म्हणून रस्टीही त्याला लफंगा म्हणतो. देविंदरला रस्टी लहान असला तरी त्याला सावध करणं आपलं कर्तव्य वाटतं कारण, त्याच्या मते सुधीरइतका धोकेबाज माणूस आसपास शोधूनही सापडणं कठीण! तो इतका आकर्षक आहे, की तो आपल्याला कधी टोपी घालून जाईल ते सांगताच येणार नाही.

रस्टीला मात्र लोफर ऊर्फ सुधीरचा वेगळाच अनुभव येतो. रस्टीला पैशांची खरीखुरी गरज आहे आणि तो खऱ्याच अडचणीत आहे असं समजल्याबरोबर सुधीरचा नूरच बदलतो. आता पैशांची काहीतरी व्यवस्था करून द्यायला हवी, याविषयी त्याच्या मनात कोणतीच शंका राहत नाही. पण पैसे मिळविण्याचे त्याचे मार्ग मात्र जगावेगळे असतात. हंसिनी आणि मृणालिनी या त्याच्या दोघी मैत्रिणी. (की दोघींचा तो प्रियकर?) दोघींनाही सुधीर आवडत असल्यानं त्या परस्परांच्या कट्टर वैरिणी असणार हे काय वेगळं सांगायला हवं? मग प्रत्येकीला दुसरीकडून पैसे घेण्याची धमकी देऊन तो पैसे उकळतो व अर्थात आपलं कमिशन उकळून रस्टीला अगदी वेळेवर पैसे आणून देतो.

'द लफंगा' या व्यक्तिचित्रांत रस्किन बाँड यांनी समाजव्यवस्थेचं नेमकं चित्र रेखाटलं आहे. एके ठिकाणी देवींदर म्हणतो, “सुधीर खरं म्हणजे वाईट माणूस नाही. अर्थात तो श्री 420 आहे. यात शंकाच नाही. पण त्याची चारशेवीस गिरी, त्याचं आकर्षक व्यक्तिमत्त्व हे समाजातील उच्चभ्रू समजले जाणारे लोक हेरत असतात. थोडक्या, सोप्या पैशांसाठी अशी माणसं गळाला लागली जातात. पकडले गेले तर हे पकडले जाणार.’’

पण असं असलं तरी लेखाला कुठंही दुःखाचा बाज नाही की कारुण्याची धार नाही. सुधीर एकेकाळी या कामात गोवला गेला असला तरी आता तो आपल्यामधील गुणांची जाणीव होऊन, जाणुनबुजून, आनंदानं ही लफंगेगिरी करतोय, पण त्यातही काही नियम फार प्रतिभावानं पाळतात कारण सुधीरसाठी ही केवळ फसवणूक नाही, गुन्हेगारी ही एक उत्तम कला आहे. सुधीरच्या मते लुटायचं तर एखाद्या श्रीमंत माणसाला; कारण असं लुटून जाणं त्याला परवडू शकतं. लुबाडायचंच असेल तर एखाद्या लोभी, हावरट माणसाला कारण त्याची तीच लायकी असते. पण सुधीर एखाद्या गरिबाला कधीच लुबाडत नाही, यापाठी कोणताही उच्च मानवतावाद नसून गरिबाला लुबाडण्यात काही अर्थच नसतो हे त्याचं खरं कारण आहे.

मात्र याहूनही लक्ष एकवाटयचं एका व्यक्तीवर पण तिच्या अनुषंगाने तिच्या आसपासच्या, तिच्या आयुष्यात गुंतलेल्या अनेकांच्या आयुष्याचा गोफ कसा सहज, सुंदरतेनं विणत जावा हे शिकायचं असले तर ‘Bhabhiji and her Family’ वाचल्याशिवाय पुढं जाताच येणार नाही.

दिल्लीतील एक मध्यमवर्गीय कुटुंब. त्यातील 'भाबीजी' ही कुटुंबप्रमुख स्त्री. रस्किन बाँड दिल्लीत असतील तर शंभरातील नव्याण्णव वेळा मुक्काम भाबीजींकडे असणार.

भाबीजी तीन मुलगे, एक मुलगी, दोन सुना आणि चौदा नातवंडांच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत, व गेली कित्येक वर्षे अतिशय आत्मविश्वासानं व लीलया त्या आपलं हे राज्ञीपद सांभाळताहेत. ते करण्याची त्यांची पद्धतीही सोपी, सरळ आहे. पहाटे त्यांच्या सूनबाईनं शोधानं कितीही लवकर उठण्याचा प्रयत्न केला तरी भाबीजी तिच्यावर कुरघोडी करतातच. म्हणजे असं की भाबीजींना तशीही झोप येत नाहीच. त्यामुळे घरात शोभाला थोडीशी जाग येऊन तिनं कूस बदलण्याची चाहूल जरी भाबीजींना लागली तरी भाबीजी तत्क्षणी उठून स्वयंपाकघराचा ताबा घेणार. अशा रीतीनं भाबीजींनी हात लावल्याशिवाय दिवसाच्या कोणत्याही व्यवहाराची सुरुवात होत नाही व आपल्या सुना किती बेजबाबदार आहेत. याही वयात मुलांच्या रसोईची तयारी आपल्यालाच करावी लागते, असा कांगावा करायला भाबीजींना पूर्ण वावही राहतो.

एकत्र कुटुंबपद्धतीत किती ताण असतात हे रस्किन बाँड यांनी फार मजेशीर पद्धतीनं रंगवलं आहे. या तिन्ही मुलांतला अरुण आपल्या बायकोपुढं थोडासा नमतो. तिला खूष करण्याची एकही संधी सोडण्याची त्याला इच्छा नसते. पण त्याचवेळी भाबीजींचं आपल्यावर पक्के लक्ष आहे हे त्याला जाणवत राहातं. त्यामुळे रस्किन बाँड राहायला आले की त्यांना गुपचूप पैसे देऊन त्यांनी आपल्याला व आपल्या बायकोला बाहेर जेवायला न्यायचा बहाणा करावा अशी तो त्यांना विनंती करतो. अर्थात त्याची विनंती मानली जाते हे सांगायला नकोच.

मात्र दिवसभर भाबीजी सत्ताधीशाच्या भूमिकेत असल्या तरी रात्र झाली, सारं कुटुंब झोपेच्या अधीन होऊ लागलं की एखाद्या नातवंडाचा ‘आजी, गोष्ट सांग ना' असा नाजूक स्वर उमटतोच आणि भाबीजींमधली आजी त्या आग्रही मागणीला कधीच नाही म्हणू शकत नाही.

याव्यतिरिक्त रस्किन बाँड यांनी ज्या कुटुंबाला दत्तक घेतलं आहे त्या प्रेम व त्याच्या कुटुंबाची गोष्ट अतिशय वाचनीय आहे. पण ज्याला जमेल त्यानं ती स्वतः वाचावी अन्यथा त्या व्यक्तिचित्रणाचं मराठीत संपूर्ण भाषांतर होऊन ते सगळच्या सगळं वाचकांपुढे जावं असं वाटतं. त्याशिवाय 'My Father and I, My Mother, Keemat Lal" आणि "Uncle Bill- He said it with Arsenic" ही व्यक्तिचित्रंही संपूर्णपणे वाचकांपुढे यायलाच हवीत. पाहू या कसं काय जमतं ते.

'फ्रेंडस इन स्मॉल प्लेसेस' वाचल्यानंतर आपण भारताच्या काना कोपऱ्यात हिंडून आलो असं वाटत राहातं, पण त्यातही "The Kitemaker" हा लेख आपल्याला फाळणीपूर्वीच्या, राजा महाराजांच्या भारतात घेऊन जातो. पतंग बनवणं आणि उडवणं ही एक सुंदर कला आहे असं मानणाऱ्या लोकांमध्ये आणि तसं वाटू देणाऱ्या काळामध्ये घेऊन जातो. त्या काळी पतंग बनवणाऱ्या, त्यातही महमूद चाचासारखे कलात्मक, संगीतमय पतंग बनवणाऱ्याला केवळ राजाश्रयच नव्हता; तर लोकाश्रयही होता हे आपल्याला सांगतो. ते लोक गेले, त्या कला नामशेष झाल्या देशाची फाळणी झाली व महमूदचाचासारखे असंख्य लोक कलारसिकांच्या अभावानं एकाकी झाले. पतंग उडवण्याच्या कलेत माणसांना एकत्र आणण्याची केवढी ताकद होती हे जाणवून या जुन्या कलांचं पुनरुज्जीवन व्हावं असं वाटतं खरं.

Tags: लेखक द बॉक्स मॅन पुस्तक रस्किन बाँड लफंगा देवींदर सुधीर रेणू गावस्कर फ्रेंड्स इन स्मॉल प्लेसेस Author The Box Man Book Ruskin Bond Laphanga Devinder Sudhir Renu Gavaskar Friends in Small Places weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके