डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लेखकाचा हा परिचय करून देतानाच एक छोटीशी ओळ परिच्छेदाच्या शेवटी जोडली होती. त्यात म्हटले होतं, 'उत्तुंग प्रतिभेच्या या साहित्यकाराच्या लेखणीतून मानवी मन हलवून टाकणारे अनेक वाङ्मयप्रकार उमटले पण तरीही 'द ब्रदर्स' ही त्यांची कथा अक्षर वाङ्मय म्हणूनच ओळखली जाते. हे वाक्य वाचताना वाटलं, जसजशा कथा वाचते आहे, तसतसं कथेच्या या 'अक्षरतत्त्वाविषयी' असं समजतंय, की अशी कथा वाचताना प्रत्येकालाच ती कथा आपलीच आहे.

हल्लीच मुंबईला गेले असता चर्चगेट स्टेशनच्या समोर विखुरलेल्या पुस्तकांत एक अगदी  जीर्णशीर्ण पुस्तक हाताला लागलं. कथासंग्रहच होता तो. अनेक पानं निखळलेली होती. बघू या तरी, म्हणून पुस्तक उघडलं, सुरुवातीच्या 'द ब्रदर्स' या कथेनं लक्ष वेधून घेतलं. दुपारच्या निवांत वेळेनं एका बंद दुकानाची पायरी मोकळी ठेवली होती. तिच्यावर बसून सहा पानांची ती छोटीशी कथा वाचून टाकली आणि पुस्तकही मिळवलं. 

गोष्टीच्या लेखकाचं नाव जोर्नस्टन जोर्नसन, नॉर्वेच्या या लेखकाच्या आयुष्याचा कालखंड 1832 ते 1910 एवढा. नॉर्वेच्या राष्ट्रगीताचा हा जनक. तेथील जनतेला तो उत्तुंग प्रतिभेचा साहित्यिक म्हणून जेवढा भावला; तेवढाच उत्कट देशभक्त म्हणून आदरणीय वाटला, 1903 साली साहित्याचं नोबेल प्राईज देऊन त्याला सन्मानित केले गेलं.

लेखकाचा हा परिचय करून देतानाच एक छोटीशी ओळ परिच्छेदाच्या शेवटी जोडली होती. त्यात म्हटले होतं, 'उत्तुंग प्रतिभेच्या या साहित्यकाराच्या लेखणीतून मानवी मन हलवून टाकणारे अनेक वाङ्मयप्रकार उमटले पण तरीही 'द ब्रदर्स' ही त्यांची कथा अक्षर वाङ्मय म्हणूनच ओळखली जाते. हे वाक्य वाचताना वाटलं, जसजशा कथा वाचते आहे, तसतसं कथेच्या या 'अक्षरतत्त्वाविषयी' असं समजतंय, की अशी कथा वाचताना प्रत्येकालाच ती कथा आपलीच आहे. अस वाटायला लागतं. रॉजर्स नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणायचा ना, की अगदी खास, आपलीय वाटणारी कथा किंवा अनुभव, जगातील प्रत्येकाची कथा अगर अनुभव असू शकतो; याचं अगदी साधं, सरळ, सोपं कारण म्हणजे आपण सारी माणसं असतो. 'द ब्रदर्स' ही कथा वाचतानासुद्धा वाटलं, ही कथा खूप आवडतेय; कारण स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून ही अगदी थेट आपल्यापर्यंत येऊन पोचली आहे. कारण ती माणूसपणाची गोष्ट आहे. त्यातच कथेचं अक्षरतत्त्व सामावलं आहे.

कथेला ग्रामीण पार्श्वभूमी आहे. एका शेतकऱ्याच्या दोन मुलग्यांच्यात ही गोष्ट घडते. एकाचं नाव अँडर्स आणि दुसऱ्याचं नाव बार्ड, अँडर्स आणि बार्ड पाठीला पाठ लावून आलेसे भाऊ. त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे. सहभोजन, सहविहार, सहअध्ययन सारं काही एकमेकांसोबत करायचं, एकमेकांना धरून राहायचं. 

ही दोन्ही मुलं मोठी झाली, किंबहुना आता त्यांना मुलगे न म्हणता पुरुष अशी संज्ञा लागू पडायला लागली आणि एका दिवस जगरहाटीनुसार व्हायचं ते झालं. घडायचं ते घडलं  या दोघांचे वृद्ध वडील हे जग सोडून गेले. मरताना वडिलांनी बराच पैसा अडका, घरदार आणि पै. पैसा साठवून घेतलेल्या अनेक वस्तू या दोनही मुलांच्या स्वाधीन केल्या.

ती सारी दौलत पाहताना एक गोष्ट या दोनही भावांना जाणवली. अगदी प्रकर्षानं जाणवली; ती अशी, की यांची समान वाटणी करणं अतिशय अवघड आहे. किंबहुना अशक्यच आहे. ते. आपल्यात भांडण होतील असं मात्र त्यांना अजिबात म्हणजे अजिबातच वाटलं नाही. केवळ हे  कठीण काम सुकर व्हावं म्हणून त्यांनी अनेक जुन्या वस्तूंचा चक्क लिलाव करण्याचं ठरवलं. 

पण लिलावासाठी साऱ्या वस्तू मांडून ठेवल्या, आणि अचानक त्यांना ते दिसलं. सोन्याचे सुंदर, नाजूक बनावटीचं ते घड्याळ. लहानपणापासुन दोघांनाही ते खूप आवडायचं, त्याची ती सुबक बांधणी, सोन्याचं ते लखलखणारं तेज, त्याला जोडलेली ती लांबलचक साखळी, लहानपणी वडील हातात द्यायचे तेव्हा किती सुख वाटायचे! आता ते आपले व्हायलाचं हवं, असं दोघांनाही अगदी मनापासून वाटलं, पण ते एकाचंच होऊन शकेल, हे ध्यानात आल्यावर या घडयाळाच्या लिलावात आपणच दोघांनी भाग घ्यायचा असं त्यांनी ठरवून तर टाकलंच पण जाहीरही केलं.

लिलावाला सुरुवात झाली. बोलीचे आकडे वाढत गेले. हार कोणाची होणार? जिंकणार कोण? शेवटी अँडर्सनं हार मानली. बार्डची जीत झाली. त्या झळाळत्या सोन्याच्या घड्याळाची मालकी त्याच्याकडे आली. मात्र तेंव्हाच त्या अवलक्षणी वेळेनं आपला डाव साधला. आजवर जीवाला जीव देणाच्या त्या भावांनी एकमेकांच तोंड न बघण्याचा पक्का निश्चय केला, एका घड्याळानं वैराची ठिणगी टाकली.

दोन्ही भावांच्या आयुष्याच्या वाटा त्या घड्याळानं पार भिन्न करून टाकल्या. यथावकाश अँडर्सन लग्न केलं, पण बाईला त्या लग्नाचं आमंत्रण नव्हतं, अँडर्सच्या लग्नानंतर त्यांचे काही दिवस बरे गेले असतील, नसतील, एकामागून एक कोसळणाऱ्या संकटांनी त्याची जणू पाठच धरली. बार्डच्या कानांवर यांतील एक, एक बातमी जात होती. भावावर आदळणाऱ्या या आपत्तींनी त्याला विलक्षण बेचैन वाटायला लागलं होतं. 

शेवटी एक दिवस मोठा धीर करून बार्ड अँडर्सच्या दारात येऊन उभा राहिला. पण तोपर्यंत द्वेषानं आपली मुळं खूप खोलवर रुजवती होती, अँडसन भावानं पुढं केलेला मदतीचा हात तर नाकारलाच, पण भावाचं दर्शनही नाकारलं. 

पण बाईला आपल्या भावाविना सारं जग शून्य वाटायला लागलं होतं. शून्य, निरर्थक! काही दिवस गेले आणि पुन्हा एकदा धीर गोळा करून, ते सोन्याचे घड्याळ खिशात टाकून बाई अँडर्सच्या घराच्या दिशेनं चालू लागला. भावाला भेटावं त्याला गळामिठी घालावी, क्षमायाचना करावी; आणि ते सोन्याचं घड्याळ भावाच्या हातात बांधावं याखेरीज कोणतीच इच्छा बाईच्या मनात राहिली नव्हती. 

ठरल्याप्रमाणे बाई अँडर्सच्या घराजवळ गेला. गोव्यापर्यंत पोचतो न् पोचतो, तोच त्याला अँडर्स त्या बाजूला येताना दिसला. बार्डचं अवसान गळालं. गोठयाच्या एका कोपऱ्यात तो दडून बसला. अँडर्स गोठयातून परतेपर्यंत श्वास घेण्याचंही त्याला धाडस झालं नाही अँडर्स परत घरात गेला. पण आता दिलजमाईचा तो क्षण हरवला होता. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ गेली की गेलीच. बार्ड मानवी जीवनातील वेळेचं महत्त्व जाणून होता. त्यानं ओळखलं, की वेळ टळून गेली आहे, पण साऱ्या विनाशाचं मूळ असं ते घड्याळ परत घेऊन जाण्यास मात्र त्याचं मन मुळीच तयार नव्हतं. आसपास पडलेल्या गवताच्या साहाय्यानं त्यानं एक मंद ज्योत पेटवली; व त्याखाली सहज दिसेल अशा जागी घड्याळ ठेवलं. ते घड्याळ तिथं ठेवलं आणि बाईच्या मनावरचा केवढा मोठा भार उतरून गेला. ते घड्याळ गेली कित्येक वर्षे त्याला जणू एखाद्या जळवेसारखं चिकटलं होतं. सुटता सुटत नव्हतं. त्या बदल्यात भावाचं प्रेम, घराची उब सारं काही निसटून गेलं होतं. पण ते घड्याळ तिथं ठेवलं अन् बार्डचं शरीर आणि मन पिसासारखं हलकं झालं. एखाद्या बालकाच्या अवखळ चालीनं बार्ड घरी आला आणि क्षणात गाढ झोपी गेला.

मात्र दुसऱ्या दिवशी वाऱ्यासारख्या पसरलेल्या त्या बातमीनं त्याच्या पायाखालची जमीनच निसटली. रात्री अँडर्सच्या गोठ्याला आग लागून गोठण्याच्या आसपासचा सारा परिसर बेचिराख झाला होता बार्डनं पेटवून ठेवलेल्या ज्योतीचा प्रताप असावा बहुधा तो! 

बार्ड दुसऱ्या दिवशी लपतछपत अँडर्सच्या गोठयापाशी गेला. त्याला तिथं ते दिसलं. ते घड्याळ! साऱ्या वैराचं  मूळ! साऱ्या नाशाचं कारण! पण आता ते घड्याळाच्या रूपात नव्हतं. अग्नीच्या धगीनं उजळून निघालेला एक छोटा गोळा होता तो. वैराचं हीण जणू जळून गेलं होतं. स्पर्धा, मत्सर, हेवा सारं सारं जणू लयाला गेलं होतं.

पण वैराची भावना जितकी चटकन् रुजते तितकी चटकन् नष्ट होत नाही. बार्डच्या मनातून ती  गेली; पण इतरांच्या मनात त्याचं बीज खोलवर रुजलं होतं. बाईला आपल्या रात्री कोणीतरी गोठ्यापाशी पाहिलंय, त्यामुळे भावानंच भावाचा घात केला ही अफवा आगीहूनही अधिक वेगानं सर्वत्र पसरली. प्रकरण पार कोर्टापर्यंत गेलं. भाऊ, भाऊ परस्परांसमोर उभे राहिले. पण अँडर्सनं काहीही बोलणंच नाकारलं, संशय नाही, आरोप नाहीत, काहीच नाही. शब्द जणू मुके झाले होते.

हं, पण एक मात्र झालं. अँडर्स त्यांनतर बेसुमार प्यायला लागला. काही धरबंध नाही, कशाची आशा नाही. तोंडानं बोलला नाही. तरी खरंच का आपल्या भावानं आपलं सर्वस्व जाळलं असे वाटतं त्याला? आपल्या पाठीला पाठ लावून आलेल्या भावानं इतकं टोकाचं शत्रूत्व केलं असं वाटून का त्याची जीवनाविषयीची आसक्तीच मावळून गेली? पण अॅडर्सच्या अंतरंगातली खळवळ कळावी तरी कशी? त्यानं तर आपल्या ओठाला कुलूपच लावलंय ना! एकेकाळचा बोलभांड, भांडकुदळ अँडर्स पार गप्प होऊन गेला होता. रात्रंदिवस दारूच्या नशेत पडून राहात होता. बायकोच्या विनवण्या, मित्राच्या समजावण्या यांच्या पलीकडे जाण्याएवढं कसलं दुःख जाळत होतं त्याला? 

इकडे बार्डही आला काही दिवस ढकलत होता. एक अनाम भीती मनाला भेडसावत होती, कशाची तरी वाट पाहणं चाललं होतं. शेवटी तो दिवस आला, पांढरीफटक पडलेली त्याची वहिनी त्याला बोलवायला आली. बार्डला जणू सारं अपेक्षित होतं. तो उठला व त्या अकाली वृद्ध झालेल्या स्त्रीच्या पाठोपाठ चालू लागला. भावाच्या दारात उभा राहिला, 'तुझ्या दारात माझ्या सावलीचा काळोख कधीच पडणार नाही' स्वतःचेच भूतकाळात उच्चारलेले शब्द त्याच्या कामात प्रतिध्वनित होत होते.

समोर त्याचा भाऊ होता. बिछान्यावर तो होता हे ओळखूच येत नव्हतं. अस्थिपंजर अशी ती काया बघताना बार्डला भडभडून आलं. लहानपणी पाहिलेलं गुटगुटीत, लोभस शरीर डोळ्यांपुढे चमकून गेलं आणि तो पुढे झाला.

अँडर्स बार्डकडे पाहिलं. एक विलक्षण चमक डोळ्यांत उमटली. ओठांवर हसू  फुटलं, मनाचे बांध फुटले आणि देहात नवचैतन्य संचारलं, याच क्षणासाठी त्यानं जणू काही कुडीत प्राण घट्ट धरून ठेवले होते. दोघे भाऊ एकमेकांकडे टक लावून पाहत होते. अश्रूच्या महापुरात सारी किल्मिषं वाहून जात होती. अग्नीच्या धगीनं घड्याळाचं रंगरूप जळून जाऊन केवळ शुद्ध सोन्याचा तो छोटासा गोळा हाती राहिला तशीच अवस्था दोघांचीही झाली होती. अँडर्सची शहाणी, समजूतदार बायको हलकेच दार लावून कधी निघून गेली. कळलंच नाही दोघांना.

त्यानंतर दोघे भाऊ दीर्घकाळ बोलत राहिले. आपल्या मनीचं शल्य सांगत राहिले. किती बोलू, किती नको? काय सांगू, काय नको? रात्र सरली पण गप्पा सरल्या नाहीत. पहाटे, पहाटे कधीतरी दोघांचा डोळा लागला. सकाळ झाली. अँडर्स उठला. भावाला म्हणाला, 'आपण आता कायमचे एकत्र राहू या. आता आपण एकमेकांना कधीच सोडणार नाही. त्याच दिवशी अँडर्स वारला. त्याच्या बायकोला अन् मुलाला घेऊन बार्ड आपल्या घरी आला. त्यानं त्यांचा अतिशय जबाबदारीनं सांभाळ केला.

अँडर्स गेला, बाई मागे राहिला. पण याहूनही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली. अँडर्स आणि बार्ड यांचं हितगुज चार भिंतीत दडून राहिलं नाही. भिंतीला कान फुटले, शब्दांना पाय आले. पंचक्रोशीत, दशदिशांत अँडर्स आणि बाई यांचं संभाषण पसरलं. 

त्यानंतर बार्ड त्या परिसरातला सर्वांत आदरणीय माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. अतीव दुःखाचा सामना केल्यावरही शांतीची सिद्धी प्राप्त झालेला माणूस, अशीच त्याची ओळख होऊ लागली. बार्डला मात्र आपल्याला ही शांती कशामुळे लाभली, याचं नेमकं ज्ञान झालं होतं आणि ते ज्ञान गुरुजी या नात्यानं शाळेतल्या सर्व मुलांपर्यंत पोचवण्यात त्यानं अजिबात कुचराई केली नाही.

'प्रेम'! प्रेमानंच, केवळ प्रेमानंच माणसाला असीम व अनंत शांती मिळते, हे बार्ड आपल्या मुलांना सतत सांगत राहिला. सर्वांवर प्रेम करीत राहिला. शांतीचा उत्तराधिकारी होत राहिला. आपल्या विद्यार्थ्यांवर तर त्यानं इतकं जिवापाड प्रेम केलं की सर्व विद्यार्थ्यांचं त्याच्याशी दुहेरी नातं जुळलं. एका नात्यानं तो त्यांचा पिता बनला आणि दुसऱ्या नात्यानं तो त्यांचा दोस्त बनला. खास, जानी दोस्त.

Tags: बार्ड अँडर्स रॉजर्स जोर्नस्टन जोर्नसन द ब्रदर्स रेणू गावस्कर baard andars Rojars Jornstana Jornsan The Bradrs Bhau Renu Gavskar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके