डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संपादकीय जबाबदारीतून निवृत्ती

साधनेच्या स्वातंत्र्यदिन रौप्य महोत्सव विशेषांकात राजा ढाले यांनी 'काळा स्वातंत्र्यदिन' या नावाने लेख लिहिला. त्या लेखावरून वाद निर्माण झाल्यावर साधनाचे तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते व कार्यकारी संपादक अनिल अवचट यांनी राजीनामे दिले. ते राजीनामे  2 सप्टेंबर 1972 च्या साधना अंकात प्रसिद्ध झाले आहेत.

साधनेच्या स्वातंत्र्यदिन रौप्य महोत्सव विशेषांकात दलितांचे स्वातंत्र्य हा एक विभाग देण्यात आला होता त्या अंकात श्री राजा ढाले यांचा एक लेख असून त्यात राष्ट्रध्वज, लोकमान्य टिळक आणि श्रीमती दुर्गा भागवत यांच्याबद्दल अभद्र अशी विधाने आली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिरंगी झेंड्याबद्दल मी परम आदर बाळगीत आलो. बेचाळीसच्या चळवळीत याच तिरंगी झेंड्याखाली इंग्रजी सत्तेविरुद्ध जी झुंज दिली गेली, त्यात माझाही खारीएवढा वाटा आहे. तोच तिरंगा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज झाला याचा मी उरी अभिमान बाळगला. त्या राष्ट्रध्वजबद्दल अभद्र असे लिखाण माझ्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या साधनेत दुर्दैवाने प्रसिद्ध झाले! राष्ट्रध्वज हे राष्ट्राच्या पुंजीभूत पुण्याईतून निर्माण झालेले प्रतीक असते. त्याचा शाब्दिक अधिक्षेप व अपमानदेखील होता कामा नये असे मला वाटते. 

लोकमान्य टिळकांनी भारताला स्वराज्याचा मंत्र दिला, एवढेच नव्हे तर स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाचे तंत्रही दिले. त्यांच्या परिश्रमातून, त्यागातून आणि प्रतिभेतून स्वातंत्र्याची भावना देशात जोपासली गेली, ही गोष्ट माझ्यासारख्याला विसरणे शक्यच नाही. 

श्रीमती दुर्गा भागवत यांच्याबद्दल त्याच अंकाच्या संपादकीयात गौरवपूर्ण लिहिले आहे. त्यांचा प्रगाढ व्यासंग, त्यांची समाजाभिमुख वृत्ती, साहित्याबद्दलची सखोल जाण यांचा मी चाहता आहे. त्यांचे ‘ऋतुचक्र’ साधनातून क्रमशः प्रसिद्ध झाले आणि मराठीला ललामभूत झाले, याचा मला अभिमान आहे. साहित्य अकादमीने त्यांच्या ‘पैस’ला पारितोषिक देऊन गौरवले तेव्हा साधनेत त्यांच्याविषयी आवर्जून प्रा.ग.प्र. प्रधान यांचा लेख प्रकाशित केला. 
अशा स्थितीत वरील तीनही गोष्टीसंबंधी अभद्र विधाने एका लेखकाने करावी व ती संपादकीय संस्काराशिवाय तशीच प्रसिद्ध व्हावी, या गोष्टीमुळे वाचकांप्रमाणेच मीही अतिशय व्यथित झालो. अभद्रपणाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याचे पहिले पाऊल लगेचच टाकले. पण तेवढ्याने झाल्या गोष्टीची भरपाई होणे शक्य नाही असे वाटत राहिले. साधना विश्वस्तांना मी माझा मनोदय कळवला की, झाल्या गोष्टीसाठी मी संपादक-मुद्रक-प्रकाशक या पदांतून मुक्त होऊ इच्छितो, कारण त्याबाबतची अंतिम जबाबदारी माझीच आहे आणि ती मी टाळू इच्छित नाही. झाल्या प्रकाराबद्दल अनुताप व्यक्त करण्याचा माझ्या आवाक्यातला मार्ग म्हणजे संपादकपदाचा राजीनामा देणे. माझा राजीनामा मी विश्वस्तांच्या हाती सुपूर्द केला  आहे. 

साने गुरुजींनी पाचारण केले म्हणून मी 1949 च्या जानेवारीत एस.एम. जोशी यांच्या साक्षीने साधनेत प्रविष्ट झालो. साने गुरुजींच्या वात्सल्यपूर्ण छत्रछायेत घालवलेला तो काळ हा माझ्या जीवनातील एक अनमोल ठेवा आहे. त्यानंतर रावसाहेब पटवर्धन आणि आचार्य जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तपत्र संपादनाचे धडे गिरवायला मिळाले. प्रा.वसंत बापट आणि सदानंद वर्दे यांची साथ-संगत सुरुवातीपासूनच राहिली. साधनेतील ही तेवीस वर्षे हा माझ्या जीवनातील कृतार्थतेचा काळ आहे. गेली जवळपास सतरा वर्षे संपादक-मुद्रक-प्रकाशक म्हणून माझे नाव साधनेच्या अखेरीस मुद्रांकित होत आले आहे. हा प्रकार न घडता तर साधना साप्ताहिकाशी जडलेला अनुबंध बहुधा तसाच कायम राहिला असता. साधनेच्या संपादक पदातून निवृत्त होण्याचा प्रसंग यातना देणारा असला तरी, सामाजिक मूल्यांचे जतन करण्यासाठी तसे करणे मला कर्तव्यरूप वाटते आणि म्हणून अतिशय व्यथित अंतःकरणाने मी राजीनामा देत आहे. झाल्या चुकीला जी काही सजा होईल ती प्रायश्चित्त म्हणून भोगण्याला माझ्या मनाची मी तयारी ठेवली आहे. 

पण या सबबीसाठी दलितांच्या ज्या व्यथा वेदना व्यक्त झाल्या आहेत, त्यांची उपेक्षा होऊ नये. गेली तेवीस वर्षे साधनेच्या सर्व चाहत्यांनी व मित्रांनी जो जिव्हाळा आणि जे प्रेम दिले त्यातून उतराई होणे शक्य नाही. माझ्या जडणघडणीत साधनेचा वाटा मोठा आहे. थोरा-मोठ्यांचे साधनेशी जे नाते आहे, त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे समाधान आहे. चार-पाच प्रसंगी संपादकाची जबाबदारी पार पाडण्यात कसूर झाल्यामुळे वाचकांचा रागही ओढवला, पण त्यांचे प्रेम आणि विश्वास एवढा अथांग की त्यात सर्व राग आणि किल्मिष वाहून गेले. सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संपादकपदाचा राजीनामा मी विश्वास्तांकडे पाठवत आहे. 

माझाही राजीनामा 
अनिल अवचट 

15 ऑगस्टच्या साधना अंकात दुर्गा भागवत यांचा वैयक्तिक उल्लेख राजा ढाले यांच्या लेखात आला आहे. तो अत्यंत गलिच्छ आणि अपमानास्पद आहे. या विभागाचे संपादन मी केले होते. सदर वाक्य माझ्या नजरेतून निसटले. त्या चुकीची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. त्याबद्दल दुर्गा भागवत यांना त्वरीत दिलगिरीचे पत्र मी पाठविले. मुंबईस त्यांना भेटायलाही गेलो, पण त्या तेव्हा पुण्याला आल्या होत्या. राष्ट्रध्वजाबद्दलचे वाक्य अवमान करण्याच्या हेतूने लिहिले असे मला वाटले नाही. जिवंत माणसांचे पावित्र्य हे मी सर्वश्रेष्ठ मानतो. पण त्या वाक्यातली अभिव्यक्ती बरी नव्हती. झाल्या प्रकारामुळे मी माझ्या साधनेतील संपादकीय विभागातील कामाचा राजीनामा देत आहे. मला साधनेनेच वाढविले. मी उतराई आहेच. 
 

Tags: Anil Awchat Yadunath Thatte Raja Dhale काळा स्वातंत्र्यदिन अनिल अवचट यदुनाथ थत्ते राजा ढाले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके