डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

माझ्या दृष्टीने साधनाचा सध्याचा वाचक हा एस.एम.,ना.ग.गोरे, यदुनाथ थत्ते, सेवादल व समाजवादी विचारसरणीच्या लोकांना मानणारा असावा. हा वर्ग आणखी 10/15 वर्षांनी संपेल. नवा वाचक मिळविण्यासाठी साधनाच्या स्वरूपात अल्पसा बदल करून, काही नवे प्रयोग करावे लागतील. तरुणांना आवडतील अशा विषयांवर लेखन करावे लागेल.

तरुणाईला भावणारे लेखन अभावानेच!

साधनाचा मी सुरुवातीपासून वाचक असून, सध्या माझे वय 90 आहे. साधनाने चालविलेली वैचारिक सामाजिकता नि:संशय खूप आवडते. माझी मुले 40 वर्षांची आहेत. त्यांना मी म्हटले, ‘तुम्ही साधना वाचत जा.’ तर एक म्हणाला, ‘साधनात आम्हा तरुणांना वाचण्यासारखे काय असते? आम्ही न पाहिलेल्या गांधीवर वीस लेख, शेतीवर काही लेख. नेल्सन मंडेलांवर लेख, ज्याने देश तोडला त्या जीनांवर लेख, विनोबांवर लेख, हमीद दलवाईंवर लेख व विशेषांक. अनेक विषयांवरील वैचारिक व क्लिष्ट लेख. आम्हा तरुणांना भावतील असे लेख क्वचितच असतात. म्हणून साधना वाचावासा वाटत नाही. या सर्व लेखांबद्दल व लेखकांबद्दल पूर्ण आदर असूनही आम्हा तरुणांना, आमच्या मनाला-विचारांना भावतील असे लेख अभावानेच आढळतात.’ माझ्या मुलाचे म्हणजे आजच्या तरुणांचे हे प्रातिनिधिक विचार असावेत, असे मला वाटून गेले. मग तरुणांना आवडतील असे विषय डोळ्यांसमोर आलेत त्यांचा निर्देश करीत आहे. महात्मा फुल्यांचे समाजकार्य, शाहूराजांचे वैचारिक कार्य, गोखल्यांचे नेमस्त राजकारण, न्यायमूर्ती रानडे यांचा सामाजिक दृष्टिकोन, लो.टिळकांचे इंग्रजांना बोचणारे व टोचणारे साहित्य व राजकारण, आगरकरांची सामाजिक सुधारणा, आंबेडकरांचे जीवन व कार्य, कर्मवीर भाऊरावांचे कार्य, सावरकरांचे क्रांतिपर्व, साने गुरुजींचे आंतरभारती विचार, पंढरपूर विठ्ठल मंदिर दलितांना मुक्त करण्यासाठी केलेले उपोषण, कुष्ठरोगी निवारण्याचे बाबा आमटेंचे अलौकिक कार्य, प्रकाश आमटे यांची समाजसेवा, भारतातील क्रांतिकारकांचे कार्य, राष्ट्र सेवादल उदय आणि कमकुवत झालेले कार्य- अशा किती तरी विषयांवर लेख किंवा लेखमाला होऊ शकतील, असे वाटते.

माझ्या दृष्टीने साधनाचा सध्याचा वाचक हा एस.एम.,ना.ग.गोरे, यदुनाथ थत्ते, सेवादल व समाजवादी विचारसरणीच्या लोकांना मानणारा असावा. हा वर्ग आणखी 10/15 वर्षांनी संपेल. नवा वाचक मिळविण्यासाठी साधनाच्या स्वरूपात अल्पसा बदल करून, काही नवे प्रयोग करावे लागतील. तरुणांना आवडतील अशा विषयांवर लेखन करावे लागेल. उदा.तीन तरुणांनी केलेला रोमहर्षक प्रवास, आपल्या लष्करातील वीरांनी गाजवलेला पराक्रम, काही कथा, कुसुमाग्रजांच्या कवितांचा क्रांतिकारक विचार, व.पु.काळेंच्या कथा असे तरुणांच्या मनांना मोह घालणारे लेखन दिले गेल्यास तरुणवर्गालाही भावेल. त्यामुळे ‘साधना’चा खप वाढेल. अधिक पैसा मिळेल आणि आजच्या ‘साधना’ची पृष्ठसंख्याही वाढेल. आपण चिकित्सक आहात. साने गुरुजींच्या साधनाला अधिक उत्कृष्ठ बनविण्याची आपणात क्षमता आहे. मला योग्य वाटतील असे विचार कळविले आहेत, विचार व्हावा.

 मधुकर पाठक, भुसावळ, जळगाव

 काळजाला भिडलेले स्वगत

29 डिसेंबरच्या अंकातील संपादकीय लेखात क्रिकेट खेळीचे उपरोधिक उदाहरण अत्यंत बोलके वाटले. प्रसंगोचित, आटोपशीर तेवढेच वास्तववादी. प्रत्येक वाचकाने आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थबोध घ्यावा, असे. शांतपणे दमदार खेळून हाताबाहेर जाऊ पाहणारा सामना परत आणता येतो, हा खरे तर बहुमोलाचा सल्ला आहे. पण, केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विचारधारेत घिरट्या घालणारी घार पाच-सहा महिन्यांत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आक्रमक की बचावात्मक पवित्रा घेते, हादेखील विचार प्रवृत्त करायला लावणारा प्रश्न आहे. संपादकीयामधील उल्लेखानुसार प्रेक्षकांची- अर्थात, मतदारांची भिस्त येणाऱ्या काळातील वातावरणावर विसंबून असेल, हेसुद्धा नाकारून चालणारे नाही.  याच अंकात डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस यांच्या ‘मंच-11’मधील रणरागिणी ‘सुनीला’च्या विचारांचा स्पष्टवक्तेपणाही विशेष भावला. बायबलमधील पृथ्वी उत्पत्तीसंबंधी धर्मगुरूंपुढे उभा केलेला रोखठोक सवाल, त्यानिमित्ताने वैज्ञानिक गवाक्षातून घातलेला वाद-विवाद आणि अखेरपर्यंत आपल्या मतावर ठाम असलेली सुनीला- हे लेखकाच्या म्हणण्यानुसार ‘समाजामध्ये विवेक खरोखरच किती जागृत आणि शिल्लक आहे,’ याचे मूर्तिमंत लक्षण आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गाणे वेदनेचे... हे ललितवजा भावनिक स्वगत अक्षरश: काळजाला भिडून गेले. कोयलकूजनाचे सूर मनावर फुंकर घालतात, तसे फादर दिब्रिटोंचे प्रत्येक वाक्य भावनेच्या निराळ्या शब्ददुनियेत घेऊन जात असल्याचा अनुभव आला. त्यांच्या शब्दांची नजाकत पोहोचवून गेली ती ना.सी.फडकेंच्या ‘कुहू कुहू’ कादंबरीतील ‘अबोली’च्या प्रदेशात. ‘सुखापेक्षा दु:ख अधिक गहिरे असते,’ असे फादर दिब्रिटोंनी म्हटल्याप्रमाणे चुकीचे खचितच नाही! दु:ख जेव्हा एकटे-एकाकी असते, तेव्हा त्याचा दाह अधिक जुलमी असतो. दु:खाचा पहाड कोसळलेला कोकिळ ज्या वेळी हरपलेल्या श्रेयाबद्दल शोक व्यक्त करीत होता, तेव्हा दुष्ट शिकाऱ्याच्या गोफणीतून सुटलेला दगडगोटा आपल्या जोडीदारणीला आपल्यापासून नकळतपणे विलग करेल, याची पुसटशी कल्पनाही कोकिळच्या मनाला शिवली नसावी. रक्ताच्या थारोळ्यात पाचोळ्यावर कोसळलेली कोकिळा... तिच्या कलेवराची राखण करीत बसणारा तिचा साथी... आणि तो विलापात असताना त्याच्या प्राणप्रियेला अलगद झडप घालून नेणारे गिधाड, हे सारे काही कल्पनाविलासाच्या पलीकडचेच! ध्यानाला आवाजामुळे नाही, तर दु:खितांच्या उसाशामुळे अडथळा येत असतो. वेदना अस्तित्वाच्या कंदाला स्पर्श करते, जगण्याचे अवघे रसायन ढवळून काढते. म्हणून लेखकाने कुंती आणि मरियमच्या वेदनेची सतार ओढून संक्षिप्त, मात्र खूप काही सांगण्याचा खटाटोप केल्याचे जाणवते. शेक्सपिअरचे ब्रीद तसेच शेवटी ‘प्रिय स्वरसम्राटा’, काळीज पिळवटणारे... तूर्त पुरे. जानेवारी 2019 पासून साधनात प्रकाशित होणाऱ्या सुरेश द्वादशीवार यांच्या अभ्यासपूर्ण ‘जवाहरलाल नेहरू’ या नव्या लेखमालेची उत्कंठा शिगेला. बस्स!

 नरेश रावताला, धुळे

Tags: नरेश रावताला मधुकर पाठकर वाचक पत्रे प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके