डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले अनावृत पत्र

काही प्रसारमाध्यमांनी कोविद-19 ला जातीय रंग देण्याची घाई केली. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून, तो कार्यक्रम आयोजित करण्याची ‘तबलिगी जमात’ची कृती दिशाभूल करणारी आणि दोषास पात्र होती, यात शंकाच नाही. मात्र त्याला जातीय रंग देण्याची आणि देशातील संपूर्ण मुस्लिम समाजाला त्यात ओढण्याची प्रसारमाध्यमांची कृती अत्यंत बेजबाबदार व निंदनीय आहे, असे आम्हाला वाटते.

दि. 22 एप्रिल 2020

प्रिय मुख्यमंत्री / नायब राज्यपाल

(एक प्रत माननीय पंतप्रधानांना रवाना)

केंद्रीय नागरी सेवेतून  निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा अखिल भारतीय पातळीवरील एक गट म्हणून आम्ही हे पत्र आपणास लिहीत आहोत. एक समूह म्हणून आमची बांधिलकी कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारप्रवाहाशी  नाही; मात्र भारतीय संविधानाशी संबंधित अशा समस्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संविधानाशी बांधिलकी असलेला गट म्हणून आम्ही मे 2017 पासून एकत्र आलो आहोत. तेव्हापासून विशेष महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर अधूनमधून आम्ही बैठका आयोजित करतो आहोत आणि वेळप्रसंगी देशातील घटनात्मक पदांवरील व्यक्तींना  वा समूहांना, वा अन्य घटकांना उद्देशून अनावृत पत्रे लिहीत आहोत.

आजचे हे पत्र अशाच एका समस्येशी संबंधित आहे. मार्च 2020 मध्ये दिल्लीतील निजामुद्दीन भागात ‘तबलिगी जमात’च्या झालेल्या कार्यक्रमानंतर, आलेल्या बातम्यांमुळे देशातील वेगवेगळ्या भागांत होत असलेल्या मुस्लिमांच्या छळवणुकीकडे आम्ही सखेद आपले लक्ष वेधू इच्छितो. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर, सामाजिक विलगीकरणाच्या तत्त्वाकडे दुर्लक्ष करून आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमाबद्दल ‘तबलिगी जमात’वर टीका करण्यात आली, ती बरोबरच होती. पण अशा प्रकारे एकत्र येण्याचा तो कदचित एकमेव राजकीय अथवा धार्मिक प्रसंग होता. तरीही देशभरात सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रसार करणे हा ‘तबलिगी’ जमात’चा हेतू आहे, असे चित्र निर्माण झाले. काही प्रसारमाध्यमांनी कोविद-19 ला जातीय रंग देण्याची घाई केली. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून, तो कार्यक्रम आयोजित करण्याची ‘तबलिगी जमात’ची कृती दिशाभूल करणारी आणि दोषास पात्र होती, यात शंकाच नाही. मात्र त्याला जातीय रंग देण्याची आणि देशातील संपूर्ण मुस्लिम समाजाला त्यात ओढण्याची प्रसारमाध्यमांची कृती अत्यंत बेजबाबदार व निंदनीय आहे, असे आम्हाला वाटते.

अशा प्रकारच्या वृत्तांकनामुळे देशाच्या निरनिराळ्या भागांत मुस्लिम समाजाविषयी द्वेष भडकवला गेला. कोविद-19 सर्वत्र पसरवण्यासाठी भाजीपाला व फळे यांची विक्री करणारे मुस्लिम विक्रेते, त्या भाजी-पाल्यांवर व फळांवर हेतुपुरस्सर थुंकत आहेत अशा चित्रफिती माध्यमांवर सतत फिरत होत्या. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांना त्यांच्या धर्माविषयी विचारणा होऊ लागली आणि त्यापैकी जे कोणी मुस्लिम होते त्यांच्यावर हल्लेही झाले, अशा प्रकारच्या घटनांची नोंद काही राज्यांमध्ये झाली आहे. त्या चित्रफिती समाजमाध्यमांमध्ये अजूनही फिरत आहेत. कोरोना साथीमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षिततेची भावना, यामुळे अनेक ठिकाणी  सार्वजनिक जागांपासून मुस्लिमांना दूर ठेवण्याचे प्रकार घडू लागले आहेत. उर्वरित जनतेचा कथित बचाव करण्यासाठी त्या कृतींचे समर्थनही  होऊ लागले.

पंजाब राज्यातील होशियारपूरमध्ये अशी नोंद झाली आहे की, पंजाबमधून हिमाचल प्रदेशात  स्वतःच्या गार्इंसह प्रवेश करू लागलेल्या मुस्लिम गुज्जरांना (हा समाज परंपरागत स्थलांतर करणारा आहे) पोलिसांनी मज्जाव केला. सीमेपलीकडच्या समूहाकडून तणाव निर्माण केला जाऊ शकेल, असे कारण त्यासाठी पोलिसांकडून देण्यात आले.

स्वात नदीच्या काठावर नाकेबंदी केली गेल्यामुळे, शेकडो लिटर दूध तिथेच ओतून द्यावे लागून, अनेकांना निवारा शोधावा लागला. तेथील स्त्रियांची, पुरुषांची व मुलांची छायाचित्रे पाहायला मिळत आहेत.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ गावच्या बाजाराची छायाचित्रे पाहायला मिळाली. त्यात असे दिसते की, मुस्लिमेतर व्यावसायिकांच्या हातगाड्यांवर झेंडे रोवले गेले होते. त्यातून असे सूचित केले जात होते की, या हातगाड्या मुस्लिमांच्या नाहीत, म्हणजे ग्राहकांनी केवळ अशाच गाड्यांवरून खरेदी करावी.

वरवर पाहता असे वाटेल की, केवळ विलगीकरणाच्या हेतूमुळे असे  प्रसंग घडत आहेत.  प्रत्यक्षात मात्र  यामुळे  मुस्लिमांना वाळीत टाकण्याची जनभावना वाढीस लागत आहे. याहूनही अधिक खेदजनक गोष्ट म्हणजे, काही ठिकाणी रुग्णालये व आरोग्यसुविधा यांच्यापासून मुस्लिमांना वंचित ठेवण्यात येत आहे. तसा भेदभाव केला गेल्याच्या बातम्याही ठिकठिकाणांहून येत आहेत. 8 एप्रिल रोजी अशी एक बातमी आली आहे की, वाराणसीतील मदनपुरा या भागात, मुस्लिमबहुल वस्तीत राहणाऱ्या फौजिया शाहीन या विणकर स्त्रीला प्रसूतीसाठी कोणत्याही दवाखान्यात किंवा रुग्णालयात दाखल करून घेतले गेले नाही (बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या सर सुंदरलाल रुग्णालयानेही  तिला दाखल करून घेण्यास नकार दिला), रुग्णालयाबाहेरच तिची प्रसूती झाल्यानंतरही !

उत्तर प्रदेशातील मीरत येथील एका कॅन्सर रुग्णालयाने अशी जाहिरात केली होती की, स्वतःची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे असा रिपोर्ट दाखवू शकणाऱ्या मुस्लिमांनाच येथे उपचारांसाठी दाखल करून घेतले जाईल. त्या जाहिरातीबाबत समाजमाध्यमांवरून बरीच ओरड झाली, म्हणून नंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार नोंदवली.

गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये आम्ही असे पाहिले की, कोरोनाबाधित मुस्लिम रुग्णांसाठी वेगळा शब्दच निर्माण करण्यात आला आहे.

यातच भर म्हणजे, आताच्या या काळात सरकारने रेशन व रोकड स्वरूपाचे काही विशेष अधिकार सर्वसामान्य जनतेला  देऊ केले आहेत, पण काही ठिकाणच्या मुस्लिम कुटुंबांना ते नाकारले गेले आहेत, अशा बातम्या मिळत आहेत.

सध्या सगळा देशच एका अभूतपूर्व अशा संकटग्रस्त अवस्थेतून जातो आहे. त्यामुळे एकजुटीने राहून आणि एकमेकांना मदत करूनच, या  आव्हानाला तोंड द्यायला हवे. तरच आपण जिवंत राहू शकणार आहोत. ही जाणीव ठेवून, ज्या राज्यांचे मुख्यमंत्री नेहमीच- आणि विशेषकरून या साथीच्या काळात-  दृढपणे सेक्युलर दृष्टिकोन बाळगून आहेत, त्यांची आम्ही प्रशंसा करतो. 

आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, भारताने जगातील बहुतांश मुस्लिम राष्ट्रांशी परंपरागत चांगले संबंध राखले आहेत आणि त्यांनीही भारताकडे मित्रराष्ट्र म्हणूनच पाहिले  आहे. त्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये  मूळचे भारतीय असलेले लाखो लोक राहत आहेत, नोकऱ्या करीत आहेत. त्या देशांमधून असे कळवले गेले आहे की, सध्या भारतात घडत असलेल्या वरील प्रकारच्या घटनांमुळे आम्हाला  गंभीर  काळजी वाटते आहे.  त्यामुळे, भारतातील सर्व राज्य सरकारांनी आपल्या कृती व मदत योजना भेद-भावरहित पद्धतीने राबवून , त्या देशांना असा विश्वास द्यायला हवा की, कोणत्याही अल्पसंख्याक समाजाला भारतात भीती वाटण्याचे कारण नाही.  तसे होऊ शकले तर,  त्या देशांच्या गैरसमजांचे निराकरण होऊ शकेल. आणि मग त्या देशांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या मोठ्या प्रमाणातील भारतीय लोकांच्या संदर्भातही काही अनिष्ट  व अपायकारक घडणे टळू शकेल.

तर आम्ही आपल्याला अशी विनंती करू इच्छितो की, आपापल्या राज्यातील व देशातीलही सर्व नागरिकांना आपण असे आश्वस्त करावे की, ‘सामाजिक विलगी-करणविषयक नियमांचे पालन करून (आणि चेहरा झाकणे, हात धुणे इत्यादी सवयी स्वतःला लावून) आपण कोविद-19 पासून सुरक्षित राहू शकतो. मात्र आपल्या देशातील कोणत्याही विशिष्ट गटामध्ये वा समुहामध्ये इतरांपेक्षा अधिक संसर्ग होतो आहे, अशा प्रकारची माहीती कोणी देत असेल, तर त्यात काहीही तथ्य नाही, त्या अफवा आहेत.’ हे सर्व ठासून सांगण्याची गरज आहे.

8 एप्रिल रोजी, कर्नाटक राज्यातील मंड्या  जिल्ह्यातील पोलीस चेकपोस्टमध्ये तीन हिंदू तरुणांनी, ‘आम्ही स्वतः कोरोनाबाधित मुस्लिम आहोत ’ असे खोटे सांगून गदारोळ निर्माण केला होता.  अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्वरित व ठोस कारवाई झाली पाहिजे (त्या घटनेमध्ये कर्नाटक पोलिसांनी ती केली होती.)

आम्ही आपल्याला अशीही विनंती करतो की, सर्व  अधिकाऱ्यांना आपण पुढील सूचना द्याव्यात :  देशातील कोणत्याही समूहाला सामाजिकदृष्ट्‌या बहिष्कृत केले जाणार नाही, याविषयी विशेष दक्ष राहावे. औषधे व आरोग्य-विषयक सुविधा, रेशन आणि आर्थिक साह्य इत्यादी प्रकारची मदत सर्व गरजूंना समान प्रमाणात उपलब्ध करून द्यावी.

या गंभीर संकटाच्या काळांत आपल्या देशाच्या  समाजमनात असलेल्या भेगा रुंदावणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी, असे आम्हाला तीव्रतेने वाटते. आणि म्हणून  सर्व भारतीयांना एकत्र ठेवण्यासाठी आम्ही आपल्या नेतृत्वावर भिस्त ठेवून आहोत.

सत्यमेव जयते!

आपले विश्वासू,

संविधानाशी बांधिलकी मानणारा गट...

(101 स्वाक्षऱ्या खालीलप्रमाणे)

101 निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची यादी

 1.    अनिता अग्निहोत्री, आयएएस (सेवानिवृत्त)     
        माजी अध्यक्ष, सामाजिक न्याय व सशक्तीकरण             
        मंत्रालय, भारत सरकार 
 2.    सलाउद्दीन अहमद, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी मुख्य सचिव, राजस्थान सरकार 
3.     शफी आलम, आयपीएस (सेवानिवृत्त) 
        माजी महासंचालक, राष्ट्रीय अपराध रेकार्ड्‌र्स                 
        ब्युरो, भारत सरकार 
4.     एस. एम्ब्रोज, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अतिरिक्त सचिव, जहाजबांधणी 
        व वाहतूक मंत्रालय, भारत सरकार 
 5.     आनंद अर्णी, आर अँड एडब्ल्यू (सेवानिवृत्त) 
        माजी विशेष सचिव, मंत्रिमंडळ सचिवालय 
 6.     महिंदरपाल औलख, आयपीएस (सेवानिवृत्त) 
        माजी पोलीस महासंचालक (कारागृह), 
        पंजाब सरकार
7.     जी. भालचंद्रन, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अतिरिक्त मुख्य सचिव, 
        पश्चिम बंगाल सरकार 
8.     वप्पला भालचंद्रन, आयपीएस (सेवानिवृत्त) 
        माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय, 
        भारत सरकार 
9.     गोपालन बालगोपाल, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी विशेष सचिव, पश्चिम बंगाल सरकार 
10.   चंद्रशेखर बालकृष्णन, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी सचिव, कोळसा मंत्रालय, भारत सरकार 
 11.   शरद बेहर, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी मुख्य सचिव, मध्य प्रदेश सरकार 
 12. अरबिंदो बहेरा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सदस्य, रेव्हेन्यू बोर्ड, ओडिसा सरकार 
 13.  मधू भादुरी, आयएफएस (सेवानिवृत्त)                 
        पोर्तुगालमधील माजी राजदूत 
 14.  मीरा सी. बोरवणकर, आयपीएस (सेवानिवृत्त)             
        माजी पोलीस महासंचालक, पोलीस संशोधन व             
        विकास मंडळ, भारत सरकार 
    15.     सुंदर बुर्रा, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी सचिव, महाराष्ट्र सरकार 
    16.     के. एम. चंद्रशेखर, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी मंत्रिमंडळ सचिव, भारत सरकार 
    17.     रेचल चटर्जी, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी विशेष मुख्य सचिव, कृषी, 
        आंध्र प्रदेश सरकार 
    18.     तिष्यरक्षित चटर्जी, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी सचिव, पर्यावरण व वने, भारत सरकार 
    19.     कल्याणी चौधरी, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अतिरिक्त मुख्य सचिव, 
        पश्चिम बंगाल सरकार
    20.     अण्णा दाणी, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र सरकार 
    21.     सुरजित दास, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी मुख्य सचिव, उत्तराखंड सरकार 
    22.     विभा पुरी दास, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, आदिवासी व्यवहार मंत्रालय 
    23.     पी. आर. दासगुप्ता, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी अध्यक्ष, भारतीय खाद्य निगम 
    24.    नागेश्वर दयाल, आयएफएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय 
        व उच्चायुक्त, युनायटेड किंगडम
    25.     प्रदीप के. देव, आयएएस (सेवानिवृत्त)  
        माजी सचिव, क्रीडा विभाग, भारत सरकार 
    26.     नितीन देसाई, आयइएस (सेवानिवृत्त)
        माजी सचिव, मुख्य आर्थिक सल्लागार, 
        वित्त मंत्रालय, भारत सरकार 
    27.     केशव देशीराजू, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी आरोग्य सचिव, भारत सरकार 
    28.     एम. जी. देवसहाय, आयएएस (सेवानिवृत्त)              
        माजी सचिव, हरियाणा सरकार 
    29.     सुशील दुबे, आयएफएस (सेवानिवृत्त)                 
        स्वीडनमधील माजी राजदूत 
    30.     ए. एस. दुलत, आयपीएस (सेवानिवृत्त)
        माजी विशेष कार्य अधिकारी (काश्मीर),                 
        पंतप्रधान कार्यालय, भारत सरकार 
    31.     के. पी. फेबियन, आयएफएस (सेवानिवृत्त)              
        इटलीमधील माजी राजदूत 
    32.     आरिफ घौरी, आयआरएस (सेवानिवृत्त)
        माजी शासकीय सल्लागार, डीएफआयडी,                 
        युनायटेड किंगडम (प्रतिनियुक्त) 
    33.     गौरीशंकर घोष, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी मिशन संचालक, राष्ट्रीय पेयजल मिशन 
    34.     सुरेश के. गोयल, आयएफएस (सेवानिवृत्त)              
        माजी महासंचालक, 
        भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद
    35.     एस. गोपाल, आयपीएस (सेवानिवृत्त)
        माजी विशेष सचिव, भारत सरकार 
    36.     मीना गुप्ता, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी सचिव, पर्यावरण व वन मंत्रालय, 
        भारत सरकार 
    37.     रवी विरा गुप्ता, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी डेप्युटी गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक  
    38.     वजाहत हबिबुल्लाह, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी सचिव, भारत सरकार 
        व मुख्य माहिती आयुक्त
    39.     दीपा हरी, आयआरएस (राजीनामा)  
    40.     सज्जाद हसन, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी आयुक्त, मणिपूर सरकार 
    41.     सिराज हुसेन, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, कृषी विभाग, भारत सरकार 
    42.     कमल जसवाल, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग, 
        भारत सरकार
    43.     नजीब जंग, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी लेफ्टनंट गव्हर्नर, दिल्ली 
    44.     राहुल खुल्लर, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अध्यक्ष, 
        भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण 
    45.     के. जॉन कोशी, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी राज्य मुख्य माहिती आयुक्त, प. बंगाल 
    46.     अजय कुमार, माजी संचालक, 
        कृषी मंत्रालय, भारत सरकार 
    47.     ब्रिजेश कुमार, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग 
    48.     पी. के. लाहिरी, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी कार्यकारी संचालक, 
        एशियन डेव्हलपमेंट बँक 
    49.     आलोक बी. लाल, ‘आयपीएस’ 
        माजी महासंचालक (अभियोजक), 
        उत्तराखंड सरकार 
    50.     सुबोध लाल, आयपीओएस (राजीनामा)
        माजी उपसंचालक, संचार मंत्रालय, 
        भारत सरकार 
    51.     हर्ष मंदर, आयएएस (सेवानिवृत्त) 
        मध्य प्रदेश सरकार 
    52.     अमिताभ माथूर, आयपीएस (सेवानिवृत्त)      
        माजी संचालक, विमान संशोधन व माजी 
        विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय, 
        भारत सरकार 
    53.     अदिती मेहता, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अतिरिक्त मुख्य सचिव, राजस्थान. 
    54.     दलिप मेहता, आयएफएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, भारत सरकार व अधिष्ठाता, 
        परराष्ट्र व्यवहार संस्था  
    55.     शिवशंकर मेनन, आयएफएस (सेवानिवृत्त)             
        माजी परराष्ट्र सचिव आणि माजी 
        राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
    56.     सोनालीनी मीरचंदानी, आयएफएस(राजीनामा)             
        भारत सरकार 
    57.     सुनील मित्रा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, वित्त मंत्रालय, भारत सरकार
    58.     जुगल मोहपात्रा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, ग्रामीण विकास विभाग, 
        भारत सरकार 
    59.     देब मुखर्जी, आयएफएस (सेवानिवृत्त)                 
        बांगलादेशचे माजी उच्चायुक्त आणि 
        नेपाळमधील माजी राजदूत 
    60.     शिवशंकर मुखर्जी, आयएफएस (सेवानिवृत्त)             
        माजी उच्चायुक्त, युनायटेड किंगडम 
    61.     पी.जी.जे. नामपुथिरी, आयपीएस (निवृत्त)             
        माजी पोलीस महासंचालक, गुजरात 
    62.     पी. ए. नासरेथ, आयएफएस (सेवानिवृत्त)
    63.     अमिताभ पांडे, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, आंतरराज्यीय परिषद,
        भारत सरकार 
    64.     निरंजन पंत, आयए व एएस (सेवानिवृत्त) 
        माजी नियंत्रक व महालेखापाल, भारत सरकार 
    65.     आलोक पेरती, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, कोळसा मंत्रालय 
    66.     आर. एम. प्रेमकुमार, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र 
    67.     एस. वाय. कुरेशी, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी मुख्य निवडणूक आयुक्त 
    68.     एन. के. रघुपती, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी अध्यक्ष, कर्मचारी निवड आयोग, 
        भारत सरकार
    69.     व्ही. पी. राजा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळ 
    70.     के. सुजाता राव, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी आरोग्य सचिव 
    71.     एम. वाय. राव, आयएएस (सेवानिवृत्त) 
    72.     सतवंत रेड्डी, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, रसायने व पेट्रोकेमिकल्स 
    73.     विजया ललित रेड्डी, आयएफएस (सेवानिवृत्त)             
        माजी उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, भारत सरकार 
    74.     ज्युलिओ रिबेरो, आयपीएस (सेवानिवृत्त)                 
        पंजाबचे राज्यपाल यांचे माजी सल्लागार 
        व रोमानियामधील माजी राजदूत, 
    75.     अरुणा रॉय, आयएएस (राजीनामा) 
    76.     मानवेंद्र एन. रॉय, आयएएस (सेवानिवृत्त)                 
        माजी अतिरिक्त मुख्य सचिव, पश्चिम बंगाल 
    77.     दीपक सनन, आयएएस (सेवानिवृत्त) 
        हिमाचल प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री यांचे 
        माजी मुख्य सल्लागार
    78.     जी. शंकरन, आयसी व सीईएस (सेवानिवृत्त)             
        माजी अध्यक्ष, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क 
        व सुवर्ण (नियंत्रण) अपीलीय न्यायाधिकरण 
    79.     श्याम सरन, आयएफएस (सेवानिवृत्त) 
        माजी परराष्ट्र सचिव व माजी अध्यक्ष, 
        राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ 
    80.     एस. सत्यभामा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अध्यक्ष, राष्ट्रीय बियाणे महामंडळ 
    81.     एन. सी. सक्सेना, आय.ए.एस.(सेवानिवृत्त)             
        माजी सचिव, नियोजन आयोग, भारत सरकार 
    82.     ए. सेल्वराज, आयआरएस (सेवानिवृत्त) 
        माजी मुख्य आयुक्त, प्राप्तिकर, चेन्नई, 
        भारत सरकार 
    83.     अर्धेंदू सेन, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी मुख्य सचिव, पश्चिम बंगाल 
    84.     अभिजीत सेन गुप्ता, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, 
        भारत सरकार
    85.     आफताब सेठ, आयएफएस (सेवानिवृत्त)                 
        जपानमधील माजी राजदूत 
    86.     अजय शंकर, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, उद्योग धोरण व संवर्धन विभाग 
    87.     अशोककुमार शर्मा, आयएफएस (सेवानिवृत्त)             
        फिनलँड आणि एस्टोनियामधील माजी राजदूत 
    88.     नवरेखा शर्मा, आयएफएस (सेवानिवृत्त)                 
        इंडोनेशियातील माजी राजदूत 
    89.     राजू शर्मा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सदस्य, महसूल मंडळ, उत्तर प्रदेश  
    90.     हरमंदर सिंह, (सेवानिवृत्त) 
        माजी महासंचालक, ईएसआय कॉर्पोरेशन 
    91.     त्रिलोचन सिंह, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग,             
        भारत सरकार
    92.     जवाहर सीरकर, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, 
        भारत सरकार आणि माजी मुख्य कार्यकारी                 
        अधिकारी, प्रसार भारती
    93.     नरेंद्र सिसोदिया, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, वित्त मंत्रालय, भारत सरकार 
    94.     संजीवी सुंदर, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी सचिव, परिवहन मंत्रालय, भारत सरकार  
    95.    परवीन ताल्हा, आयआरएस (सेवानिवृत्त)                 
        माजी सदस्य, केंद्रीय लोकसेवा आयोग 
    96.     थँकेसे थेकेकेरा, आयएएस (सेवानिवृत्त) 
        माजी अतिरिक्त मुख्य सचिव, 
        अल्पसंख्याक विकास, महाराष्ट्र सरकार 
    97.     पी. एस. एस. थॉमस, आयएएस (सेवानिवृत्त)             
        माजी सरचिटणीस, राष्ट्रीय मानवाधिकार समिती 
  98.     गीता थोपल,  आयआरएएस (सेवानिवृत्त)             
        माजी महाव्यवस्थापक, मेट्रो रेल्वे, कोलकाता 
  99.     हिंदल तैयबजी, आयएएस (सेवानिवृत्त)
        माजी मुख्य सचिव पद, जम्मू आणि काश्मीर. 
  100. अशोक वाजपेयी, आयएएस (सेवानिवृत्त)                 
        माजी अध्यक्ष, ललित कला अकादमी 
  101.     रमणी वेंकटेशन, (सेवानिवृत्त) 
        माजी महासंचालक, यशदा, महाराष्ट्र सरकार.
 

.

(अनुवाद- सुहास पाटील)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके