डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रामानुजनच्या चरित्रकाराशी संवाद

1887 ते 1920 असे फक्त 33 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या श्रीनिवास रामानुजन यांना भारतातील प्रख्यात गणित शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते, इतके की त्यांच्या संदर्भात बोलताना-लिहिताना ‘जीनियस’ हा शब्द हमखास वापरला जातो. या रामानुजन यांची 125 वी जयंती 22 डिसेंबर 2011 रोजी दक्षिण भारतात आणि विशेषत: तामिळनाडूत सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी झाली. या निमित्ताने चेन्नईत आयोजित केलेल्या मोठ्या समारंभात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 2012 हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष, तर यापुढे दर वर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याची घोषणा केली. रॉबर्ट कॅनिगेल या अमेरिकन लेखकाने लिहिलेले (‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या शीर्षकाचे) रामानुजन यांचे चरित्र 1991 मध्ये प्रकाशित झाले आणि गेल्या वीस वर्षांत ते एक उत्तम चरित्र म्हणून चर्चिले गेले. त्यामुळे रामानुजन यांच्या 125 व्या जयंती समारंभाच्या निमित्ताने रॉबर्ट कॅनिगेल यांना ‘इंडियन ॲकॅडी ऑफ सायन्सेस’ या संस्थेने आमंत्रित करून विविध ठिकाणी त्यांची भाषणे व मुलाखती आयोजित केल्या. हे पुस्तक ग्रीक, जर्मन व स्पॅनिश भाषांत आले, पण एकाही भारतीय भाषेत आणि रामानुजनच्या मातृभाषेतही (तमिळ) प्रकाशित झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांची आर.रामचंद्रन यांनी घेतलेली मुलाखत ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या 27 डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाली, त्या मुलाखतीत चरित्रलेखनाच्या प्रक्रियेवर कवडसे टाकून मार्मिक भाष्य केले आहे, म्हणून तिचा अनुवाद करून प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक  

पुस्तकाच्या प्रस्तावनेध्ये असे म्हटले आहे की,  रामानुजन यांचे चरित्र आपण लिहावे असे प्रकाशकांनी सुचविले,  तोपावेतो रामानुजन यांचे नावही आपण ऐकलेले  नव्हते. मग तुम्हाला याविषयी एकाएकी असं काय आकर्षण  वाटलं,  ज्यामुळे तुम्ही स्वत:ला या कामात झोकून दिलंत  आणि हे सुंदर चरित्र निर्माण केलंत?

प्रकाशकाच्या संपादकांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्या एजंटशी  संपर्क साधला आणि त्याने माझ्याशी, तेव्हा माझा पहिला प्रतिसाद  ‘छे,  हे काही मला जमणार नाही’  असाच होता. त्या वेळी मला  जी. एच. हार्डी यांच्याबद्दलही फारशी माहिती नव्हती. माझी  पार्श्वभूमी गणिताची आहे,  पण मी गणितज्ज्ञ नाही. मात्र ह्या  कल्पनेला मी पूर्ण नकार दिला नाही;  ती माझ्या मनात घोळत  राहिली.

मग जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये मी याबाबत थोडं  प्राथमिक संशोधन करायला सुरुवात केली. त्यानंतर बीबीसीने  निर्माण केलेला रामानुजन यांच्यावरचा एक माहितीपट माझ्या हाती  आला. तोपर्यंत मला हार्डी कोण हे माहीत नव्हतं. आणि तिथे कसं  कोण जाणे मला हे जाणवलं की ही कल्पना केवळ रामानुजन यांच्या  जीवनाची नाही; त्यातील रामानुजन आणि हार्डी या दोघांध्ये  असलेला एक तणाव- (त्या दोघांधली मैत्री,  हितोपदेश,  आणि  अत्युच्च पातळीवर काम करणाऱ्या त्या दोन व्यक्तींधलं नातं)- या गोष्टींमुळे मी जास्त आकर्षित झालो.  त्या वेळेला मला रामानुजन किंवा दक्षिण भारतीय संस्कृती किंवा  तशी इतर काही माहिती नव्हती. परंतु माझ्या या सुरुवातीच्या कुतूहलाने भारलेल्या अवस्थेध्ये या दोघांधली अत्युच्च स्तरावर  असलेली मैत्री आणि एकमेकांना सहकार्य करणं ही गोष्ट म्हणजे  मला एक गूढ वाटत होतं.

परंतु रामानुजन यांच्या मानसिकतेबाबत तर आपण अगदी  विस्ताराने लिहिलं आहे- त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं घडलं,  जिथे ते  लहानाचे मोठे झाले त्या मंदिराभोवतालच्या छोट्या शहरातील  वातावरण,  त्यांची धार्मिक वृत्ती-जणू काही त्यांचं गणित  समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या मानसिकतेचाही कसून शोध  घेतला. त्यावरून असं दिसून येतं की रामानुजनच्या मनाच्या आध्यात्मिक कलाचा परिणाम त्यांच्या (विशिष्ट तऱ्हेच्या) गणितावर झाला. असं तुम्हालाही वाटतं का?  नाही. त्यांच्या आध्यात्मिकतेचा परिणाम त्यांच्या गणितावर  झाला असं मला वाटत नाही. खरं तर असा परिणाम अगदी शून्य  होता.

रामानुजन ज्या जगातून आले त्याचा ठाव घेण्याचा मी प्रयत्न  केला. ज्यांना त्यांच्या या जगामध्ये आणि त्यांच्या गणितामध्ये काय  संबंध आहे ह्याचा शोध घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा;  परंतु त्यांना  असा काही धागादोरा हाती लागेल असं मला वाटत नाही.  तरीही त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा  असेल आणि त्यांचं जग समजायला हवं असेल तर त्यांचं लालन  पालन,  त्यांच्यावर झालेले धार्मिक संस्कार,  दक्षिण भारत,  आणि  मुख्य म्हणजे ते आणि त्यांचे आई-वडील यांच्यामधले संबंध कसे होते हे सर्व आपल्याला शक्य तेवढं नीटपणे समजून घ्यायला हवं.  मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा स्वभाव यांचा त्यांच्या  गणिताशी काहीही संबंध नाही. रामानुजन यांच्यामध्ये  गणिताखेरीज आणखी बरंच काही आहे. शेवटी ते एक माणूस होते.

मला असं म्हणायचं होतं की-आपल्या पुस्तकाच्या  शीर्षकाचंच उदाहरण घेतलं तर आणि आपण ज्याचा उल्लेख  केलेला आहे ते म्हणजे त्यांनी शून्य आणि अनंतता यांचा देवत्वाशी जोडलेला संबध. उदा: आपण दिलेला दाखला- 2 प-1 असं समीकरण घेतल्यास रामानुजन यांच्या  म्हणण्याप्रमाणे त्याचं मूल्य हे ईश्वराविषयीच्या विचाराचं  प्रतीक असेल....

ही एक गोष्ट झाली,  एक कहाणी. रामानुजन ज्या संस्कृतीत  वाढले त्या दक्षिण भारतीय संस्कृतीच्या लोकांनी हा संबंध जोडला  आहे. ह्या गोष्टीला मी माझ्या पुस्तकामध्ये स्थान दिलं एवढंच. परंतु  त्याचा अर्थ असा नव्हे की,  त्यांची धार्मिकता आणि त्यांचं गणित  यांच्यामध्ये थेट आणि घनिष्ट संबंध आहे असं माझं मत आहे. मला वाटतं,  जेव्हा तुम्ही एखादं चरित्र लिहीत असता किंवा वाचत असता तेव्हा एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी- असा पटकन थेट  संबंध जोडणं चुकीचं आहे. चरित्र लेखनामध्ये आपल्याला सरळ-सरळ ‘अ’ या घटनेुळे ‘ब’ ही घटना घडली असं म्हणता येत नाही. फार तर तुम्ही असं म्हणू शकता की,  इतर घटनांबरोबर याही घटनेचा  त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर,  त्यांच्या जीवनावर, त्यांच्या स्वभावावर परिणाम झाला असावा.

आता आपल्याला रामानुजन समजेले आहेत का?  की अजूनही ते एक गूढच राहिले आहे?

मला वाटतं ते अजूनही गूढच राहिले आहेत. पण हे आपल्याला  सर्वच साहित्य,  कला यांच्याविषयी म्हणावं लागेल. पिकासो यांची  प्रज्ञा म्हणजे काय होतं?  त्याचं सोपंसं स्पष्टीकरण लोक आपल्याला  देतील,  पण मला वाटतं असं करणं अयोग्य आहे. माझ्या मते काही  जण खरोखरच आपण सामान्य लोक जगतो त्या पातळीच्या  कितीतरी पुढे निघून गेलेले असतात. आणि या प्रज्ञावानांकडे,  त्यांच्या कलात्मक संवेदनक्षमतेकडे,  त्यांच्या मर्मज्ञतेकडे काहीसं  गूढ किंवा काहीतरी सामान्यांच्या आकलनाक्षेत्रापलीकडचं अशाच  दृष्टीने पाहणं भाग आहे.  

याची आणखीही एक बाजू आहे. जगात वेगवेगळ्या क्षेत्रांध्ये  अतिशय हुशार आणि बुद्धिवान अनेक लोक असतात,  ते आपल्या  आयुष्याचं काहीच चीज करीत नाहीत. ते जिथे असतील तिथेच  राहतात. काही लोक त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या पलीकडे जाऊन  असामान्य असं काही करतात त्याला त्यांची वैयक्तिक वैशिष्ट्यं  कारणीभूत ठरतात- काही महत्त्वाकांक्षा,  काम करण्यास उद्युक्त  करणारी शक्ती- (कुछ करके दिखाना है) आणि त्यामध्ये कोणताही  अडथळा मी सहन करणार नाही अशी दुर्दम्य इच्छा. या जगात  पिकासो आणि रामानुजन कसे निर्माण होतात,  याचं आकलन करून  घेण्यामधला हाही एक भाग आहे.

त्यांना प्रवृत्त करणारी ही जिद्द कोठून आली...

ही जिध्द त्यांच्यामध्ये त्यांच्या आईकडून आली. त्यांची आईम  म्हणजे गती देणारे एक प्रेरक चैतन्य होतं.  आपण संशोधन करण्यासाठी भारतात आलात,  त्याआधी काही आराखडा आखला होता का?  का तुमच्या भ्रंतीमध्ये  तुम्हाला जी माहिती मिळाली ती गोळा करून त्यातून या  पुस्तकाची रचना केली?  इथे येण्यापूर्वी मी बरंच वाचन केलं होतं. त्यासाठी मी  केंब्रिजमध्ये दोन तीन आठवडे मुक्काम केला. रामानुजन यांच्या  जीवनामध्ये ज्या ज्या स्थळांचा संबंध आला होता त्या सर्व स्थळांना  भेट देण्यासाठी मी वेळेचं नियोजन केलं होतं. त्या सर्व ठिकाणी  जाऊन रामानुजन यांच्या जगाचं मी निरीक्षण केलं. त्यामध्ये 1988  सालाचा काळ आणि रामानुजन यांचा 20 व्या शतकाच्या प्रारंभीचा  काळ यांच्यातील तफावतीचं भान मी ठेवलं. काळ बदलतो,  परिस्थिती बदलते,  पण कुठेतरी सुरुवात करणं भाग असतं.

आपण स्थळं आणि घटना यांचं वर्णन असं केलं आहे की,  जणू काही रामानुजनच्या काळात आपण त्यांना प्रत्यक्ष भेटत  होतात. उदाहरणार्थ- रामानुजन कसे चालत असत याचंही वर्णन आपण केलेलं आहे.

अनेक जणांनी रामानुजन यांच्यावर लिहिलं आहे.  त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एस आर  रंगनाथन,  पी. व्ही. सेशु अय्यर,  आर रामचंद्र राव,  ई एच नेव्हिल,  स्वतः जी. एच. हार्डी आणि इतरही काही. या सर्वांनी रामानुजन बद्दल  छोटे छोटे चुटके लिहिले आहेत. हे सर्व चुटके समजून घेऊन ते मी  एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. कोणत्या बाबतीत त्यांच्यामध्ये  एकमत होतं आणि कोणत्या बाबतीत नव्हतं याचा शोध घेतला  आणि त्यातून मथितार्थ काढण्याचा प्रयत्न केला. म्हणून रामानुजन रस्त्यावरून फेंगडत व डुलत डुलत (बदकासारखे) चालायचे हे  मला समजलं. असलं काम मी बराच काळ करीत आलेलो आहे.

तब्बल 40 वर्षं मी व्यावसायिक लेखक म्हणून काम करतो आहे.  इतस्ततः विखुरलेल्या साहित्यातून  नवनवीन जगतं निर्माण करायची आणि  वाचकांपढे ती हुबेहूब, जणू आत्ता घडत  आहेत अशी परंतु सत्य काय आहे याचं  सतत भान ठेवून मांडायची. आणि या  खटाटोपात सत्यकथा आणि कल्पित कथा यांच्यामधल्या निसरड्या रेषेचं कधीही उल्लंघन करायचं नाही,  असा  माझा प्रयत्न असतो.

या दृष्टीने -द मॅन हू न्यू  इन्फिनिटी-हे पुस्तक जीवनाचे व घटनांचे शुष्क वर्णन करणाऱ्या इतर चरित्रांपेक्षा नक्कीच वेगळे आहे.

गेली तीस वर्षं अमेरिकेमध्ये एक  चळवळ चालू आहे. (तशी भारतात वा  आणखी कुठल्या देशांध्ये चालू आहे  की नाही,  मला माहीत नाही.) या  चळवळीला न्यू जर्नलिझम- नूतन  पत्रकारिता,  इमर्जिंग जर्नालिझम-उदयोन्मुख पत्रकारिता,  किंवा  नॅरेटिव्ह नॉनफिक्शन- कथनात्मक वर्णन असं म्हणतात. या सर्वांधून तुम्ही आत्ता ज्याचं वर्णन केलंत त्या कंटाळवाण्या,  नीरस,  केवळ काय घडलं हे सांगणाऱ्या लेखन पद्धतीपासून दूर जाण्याचा  प्रयत्न असतो. आम्हांला ज्या सत्य घटनांची माहिती मिळते त्यातून एक सत्यकथा फुलवायचा प्रयत्न असतो. मी स्वतःला याच  परंपरेतील लेखक समजतो.

बहुधा त्यामुळेच आपल्या पुस्तकावर काही लोक चित्रपट  काढायला उत्सुक आहेत. चित्रपटाच्या या प्रस्तावाचे पुढे  काय झाले?

सहा सात वर्षांपूर्वी चित्रपट संहिता लिहिणाऱ्या एका लेखकाने  एक पर्याय विकत घेतलेला आहे. त्यामुळे तो माझं पुस्तक,  पुस्तकाचं शीर्षक,  व त्यातील माहिती यांचा उपयोग करून चित्रपट  काढू शकतो. त्याने अनेक पर्यायी चित्रपट कथा लिहिल्या आहेत.  अनेक लोकांशी संपर्क साधून आणि सहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून  त्याने चित्रपटासाठी भांडवल जमवलं आहे. आता केवळ टिंब टिंब असलेल्या ओळीवर सही करायचं बाकी आहे. आणि माझ्या मते  माधवन या भारतीय सिनेकलाकाराने रामानुजन यांची भूमिका करण्याचं मान्य केलं आहे. पटकथा लेखक आणि निर्माता एडवर्ड  प्रेसमन हे संभाव्य वित्त पुरवठा करणाऱ्यांशी चर्चा करीत आहेत.

रामानुजन यांच्या केंब्रिजमधील आयुष्याविषयी  लिहिण्याअगोदर आपण बरीच पाने जी. एच. हार्डी यांच्याबद्दल लिहिले आहे. त्यांचे जग,  त्यांचे केंब्रिजमधले  जीवन,  ते ज्याच्याशी संल्लग्न होते त्या ॲपोस्टल सोसायटी- बाबत (प्रेषितांच्या मंडळाबाबत) सुद्धा लिहिलेले आहे.  तसेच त्यांच्या खाजगी जीवनाबद्दलही.  

काही अंशी हे दोन व्यक्तींचं संयुक्त  चरित्र आहे- रामानुजन आणि हार्डी या  दोघांचं. इतर लेखकांनीही रामानुजन  यांच्या चरित्रामध्ये हार्डी यांच्या  चरित्राला बराच वाव दिलाच असता.  प्रश्न आहे तो हा वाव किती मोठा आहे.  मला वाटतं रामानुजन यांच्या गणिती  आणि वैयक्तिक जीवनात हार्डींची  भूमिका इतकी महत्त्वाची होती की त्या दोघांधलं रसायन,  तणाव,  त्यांची मैत्री,  त्यांच्यातील परस्पर नातं हे सर्व हार्डी  यांच्याशी निगडित होतं. आणि म्हणून  मला असं वाटलं की वाचकांना  रामानुजन समजून घेताना हार्डी समजून  घेणंही तेवढंच आवश्यक आहे.

तरीही अखेरीस आपण म्हणता  की हार्डी यांना रामानुजन यांच्या केवळ गणितामध्ये रस होता.  त्या दोघांध्ये एकमेकांविषयी काही भावबंध नव्हता;  त्यांच्या मैत्रीमध्ये सुध्दा या अर्थाने की हार्डी यांना रामानुजन  यांची व्यक्तिशः एक माणूस म्हणून फारशी काळजी नव्हती.  रामानुजन यांच्याशी ते गणितापुरते एक प्रेळ शिक्षक म्हणून  वागले आणि रामानुजन यांना हार्डींचा अधिकार मान्य होता.

तुम्ही केलेल्या प्रत्येक विधानाशी मी सहमत आहे,  अगदी  अखेरच्या विधानाशी सुद्धा. हार्डी मास्तर होते का आणि रामानुजन  आज्ञा मानायला तत्पर होते का हे मला सांगता येणार नाही. परंतु  हार्डी यांचं रामानुजनशी असलेलं नातं मला काहीसं कोड्यात  टाकणारं वाटतं,  हे माझ्या पुस्तकातून दिसून येतं. आणि या बाबतीत  (इतर अनेक बाबींपेक्षा) मी जास्त परखडपणे लिहिलं आहे. हार्डी  यांनी रामानुजन यांच्यासाठी खूप काही केलं,  ते स्वतः मुळात एक  चांगले गृहस्थ होते आणि त्यांनी त्यांच्या परीने रामानुजन यांची  काळजी घेतली. तरीही ते इंग्लंडधले रामानुजन यांचे सर्वोत्तम मित्र  बनू शकले नाहीत. भावनिक दृष्ट्या जास्त जवळ पोचणारा मित्र  रामानुजन यांना त्या दिवसांध्ये मिळायला हवा होता.

अशा खऱ्याखुऱ्या मित्रत्वाच्या नात्याच्या अभावाचा परिणाम रामानुजन यांच्या गणितावर झाला असं आपल्याला  वाटतं का?

मला माहीत नाही. पण असं पहा की आपणा सर्वांचंच आपल्या  पालकांशी काहीना काही प्रकारचं कुरबुरीचं नातं असतं. त्या  नात्यामध्ये तणावही असतो. काही पालक आपल्या पाल्यांशी थोडे  फटकून वागतात. त्यांच्यामध्ये फारसे गुंतत नाहीत आणि  पाल्यांकडून ते अपेक्षाही जास्त करतात. मुलांनाही आपल्या  श्रीनिवास रामानुजन आईवडिलांशी फारशी जवळीक वाटत नाही. पण ती त्यांच्या अपेक्षांची कदर करतात. रामानुजन आणि हार्डी यांच्यातील नातं  असंच काहीसं असावं. मी एकाशी दुसऱ्याचा थेट संबंध जोडीत  नाही,  पण एक अस्पष्ट संदिग्ध नातं इथे मला दिसतं. रामानुजन यांना  ज्या प्रकारचा आदर्श मित्र असायला पाहिजे होता,  तसे हार्डी होते  असं मला वाटत नाही. ते एक आदर्श,  कडक शिस्तीचे, गणिताचे  कार्य करून घेणारे मास्तर असावेत. मला नक्की सांगता येणार नाही.  पण मला वाटतं,  काहीतरी केलंच पाहिजे असं रामानुजन यांना  वाटत होतं आणि त्यांची तशी इच्छाही होती. आणि हार्डी हे साऱ्या  यूरोपमधले गणिताच्या दृष्टीने रामानुजन यांच्याशी जवळीक  असलेले असे एकमेव गणितज्ज्ञ होते. आणि त्यामुळे त्यांना खुश  ठेवणं रामानुजन यांना आवडावं हे साहजिक होतं.

आपल्या या कथनामध्ये दोघांना वेगवेगळे आणि एकत्रित  असे दोन्ही तऱ्हेने समजून घेण्यासाठी ज्यांचा अजून शोध घेता  येईल असे काही मुद्दे आहेत का?

काही वेळा पुस्तकाचं परीक्षण करणारे- हे चरित्र अत्यंत सुस्पष्ट  आहे;  अंतिम स्वरूपाचे आहे- असे काहाबाही शब्दप्रयोग करीत  असतात. माझा त्यावर विश्वास नाही. मला वाटतं प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहता येणं शक्य आहे;  नवीन संशोधन  करण्यासारखे मुद्दे सापडणं शक्य आहे;  वेगळी दिशा देणं,  वेगळ्या गोष्टी लक्षात येणं,  वेगळे पैलू नजरेसमोर येणं शक्य आहे. जसा तुम्हाला एखादा फोटोग्राफ घेताना अनुभव येतो तसे. तो चौकटीत बसवताना तुमच्या चौकटीत नसलेल्या कित्येक गोष्टी तुम्ही त्यातून  गाळून टाकता. कुठलंही महत्त्वाकांक्षी लिखाण करायचं म्हणजे  त्यामध्ये असंच असणार.  मला अशी अपेक्षा आहे की,  केव्हातरी एखादा चरित्रकार पुढे  येईल आणि एका नव्या दृष्टिकोनातून रामानुजन आणि हार्डी यांच्या  कहाणीकडे पाहील आणि त्यातून आतापावेतो अंधारात असलेल्या  काही नवीन पैलूंवर,  काही तथ्यांवर प्रकाश टाकील.

आपल्या नजरेतून सुटलेल्या आणि या कथनाचे काही नवीन  दर्शन घडवू शकतील अशा काही गोष्टी आपल्याला दिसल्या  का?  रामानुजन यांचा प्राणघातक आजार कोणता होता?

पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर रामानुजन यांचा कोणत्या आजाराने  मृत्यू झाला याबाबत एक नवीन सिध्दांत उजेडात आला. तो  पुस्तकामध्ये आणता आला असता तर चांगलं झालं असतं.  याखेरीज आणखी काही माहिती उजेडात आली आहे की नाही हे  मला माहीत नाही. पण भविष्यात काही ना काही माहिती येईलच.

आपण आणखीही काही चरित्रे लिहिली आहेत.  त्यांच्याशी या चरित्राची तुलना कशी करता येईल?

प्रत्येक विषयाच्या स्वतःच्या समस्या असतात. टेलर यांच्या  बाबतीत (द वन बेस्ट वे: फ्रेड्रिक विन्सलॉ टेलर अँड द एनिग्मा ऑफ  द एफिशिअन्सी - रॉबर्ट कॅनिगेल) एक समस्या होती ती ही की टेलर  यांचं व्यक्तिमत्त्व चांगलं आणि मैत्री करण्याचं नव्हतं. ते काहीसं  गुंतागुंतीचं होतं. पण त्यांच्याबद्दल हवी तेवढी माहिती उपलब्ध  होती. रामानुजन यांच्या बाबतीत माझ्यापुढे येणाऱ्या समस्यांचे तीन भाग  होते. भारत,  इंग्लंड आणि गणित. गणित कठीणच आहे अमेरिकेहून  भारतात येऊन इथली परिस्थिती समजून घेणं अवघडच होतं. त्यातून  ह्या काळात तब्बल 75 वर्षांचं अंतर आहे. तसंच इंग्लंडचं. लोकांना  वाटतं, एखाद्या अमेरिकन माणसाला इंग्लंड काही परकं नाही. पण तसं  नाही. तेव्हा हे चरित्र लिहिताना या साऱ्या गुंतागुंतीच्या समस्या होत्या.  तसं तर प्रत्येक चरित्र लेखनामध्ये स्वतंत्र समस्या असतातच. रामानुजन यांच्या बाबतीत मी जे लिहिलं ते पाश्चिमात्य लेखकाचं  पहिलंच लेखन होतं. काही लोक चार्ल्स डिकन्स वा आयझॅक न्यूटन  यांचं चरित्र लिहितात. यांची पूर्वीच लिहिलेली वीस-वीस चरित्रं तरी उपलब्ध आहेत. नवीन काय लिहायचं ही त्यांची समस्या असते.  अशी समस्या माझ्यापुढे नव्हती. पण माझ्या समोर दुसऱ्याच काही  समस्या होत्या. पण हे चरित्र लिहिणं इतर चरित्रांपेक्षा कठीण होतं का  असं तुम्ही विचाराल तर ते तसं कठीण नव्हतं.

पण ह्या चरित्र लेखनामध्ये आलेले अडथळे पार करणं  इतरांपेक्षा जास्त आव्हानात्मक होतं असं तुम्ही म्हणाल का?

हो,  असं म्हणता येईल. एक तर त्यातील गणित किती कठीण  आहे! दक्षिण भारतीय संस्कृतीच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न  अर्थातच बराचसा अयशस्वी- आणि भरीला इंग्रजी संस्कृती हे सारं कठीणच होतं.

हे चरित्र तुम्ही आज लिहायला घेतलेत तर ते नवीन चरित्र  किती वेगळं असेल?

हा एक मोठा प्रश्न आहे. तरी मी -मॅन हू न्यू इन्फिनिटी - या  पुस्तकापासून सुरुवात करीन. अर्थातच आज पुन्हा लिहिलेलं चरित्र  वेगळं असणारंच. कारण आधीच्या चरित्रानंतर 25 वर्षांचा काळ  लोटला आहे, मी पहिल्यापेक्षा वयाने बराच म्हातारा झालो आहे.  त्यामुळे मी याकडे आता वेगळ्याच नजरेनं पाहाण्याची शक्यता  आहे. शिवाय हे सर्व आर्थिक संसाधनांवर अवलंबून आहे. तुम्ही  जास्त वेळ देऊ शकता की नाही यावर अवलंबून आहे. मला माहीत  नाही. नेव्हिलने रामानुजन यांच्याविषयी कित्येक लोकांना जी पत्रं लिहिली असतील ती वाचण्यात मला खूप रस वाटेल. हार्डीविषयी  मी असंच बरंचसं लिहीन असं मला वाटतं. बर्न्ट यांनी तर हे आपलं  जीवितकार्यच ठरविलं आहे. आणि त्यांनी इंग्रजीमध्ये अनेक  पुस्तकं लिहिली आहेत. त्यामध्ये त्यांनी रामानुजनबाबत इंग्लंडध्ये  आणि थोडंफार तमिळमध्ये मिळवलेल्या थोड्याशा नवीन साहित्याखेरीज आणखी काही नाही.  बहुधा मी सुरुवात करेन ह्या नवीन साहित्यापासून. कच्ची माहिती  आणि अखेरीस होणारी ग्रंथाची निर्मिती यामध्ये मी माझ्या मनामध्ये बरीच तफावत करतो. त्यातील काही कच्चं साहित्य लेखनासाठी  चांगलं असतं.

मराठी अनुवाद : सुमन ओक  

Tags: सुमन ओक   हार्डी चित्रपट गणित चरित्र रामानुदन chitrpat   ganit charitra Ramanujan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रॉबर्ट कॅनिगेल

अमेरिकन लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके