डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भारतीय महिला व स्वातंत्र्याचा लढा : 1857 ते 1947

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची एकूण माहिती तरुण पिढीला कमीच आहे आणि त्यातल्या त्यात स्वातंत्र्यलढ्यामध्ये गरिबापासून गर्भश्रीमंत स्त्रियांपर्यंत अनेक प्रकारच्या स्त्रियांनी केलेल्या कामगिरीबद्दल तर अज्ञानच आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या आणि सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या या शूर महिलांचा अल्प परिचय.

इ.स. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. ह्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी लाखो-करोडो स्त्री-पुरुष व बालक-बालके यांनी आपले प्राण दिले आहेत. 1997 ते 1998 हे भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे वर्ष, स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली पन्नास वर्षे स्त्रियांच्या स्वातंत्र्य युद्धातील कामगिरीकडे सतत दुर्लक्ष झाले आहे. महिला नेत्यांचे गुणगान अवश्य झाले परंतु आपण एक गोष्ट विसरलो. आंदोलनाला कर्तबगार नेत्याची आवश्यकता असते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बलिदान करायला निघालेल्या स्वयंसेवकांची असते. म्हणूनच या बड्या नेत्यांबरोबर समाजातील सर्व थरांतील महिलांनी कोणती कामगिरी केली हेही पाहणे जरूरीचे आहे. भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम 1857 मध्ये झाला. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध म्हटले की आपल्याला झाशीची राणी आठवते. 

राणी लक्ष्मीबाईन फक्त युद्धाचे नेतृत्व केले नाही तर मध्यप्रदेशातील स्त्रियांना युद्धाच्या कामात सहभाग करण्यास प्रेरणा व उत्तेजन दिले. लक्ष्मीबाईच्या दोन दासी काशी व सुंदर या युद्धकलेत प्रवीण होत्या त्यांची राणीवर फार मोठी निष्ठा होती. लक्ष्मीबाई ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून दासीच्या वेषांत रात्रीची निघून गेली. सधवा काशीने विधवा राणीचा वेष केला व राणीच्या पलंगावर झोपून राहिली. सुंदर शेवटपर्यंत राणीबरोबर लढत राहिली. हुतात्मा झाली. लक्ष्मीबाईने स्त्रियांचा एक गट लढाईचे शिक्षण देऊन तयार केला. घोड्यावर बसणे, बंदुका व तोफा चालविणे, भालाफेक, तलवारीचे हात व पोहणे असे शिक्षण या गटातील महिलांना दिले जाई, ललिता बक्षी नावाची एक प्रसिद्ध घोडेस्वार राणीच्या सेनेत होती. 

फुलकारी नावाची एक दलित महिला गस्त घालणे, गवंडीकाम करणे या कामात वाकबगार होती. राणीच्या स्वयंसेविका व महिला सैनिक शहर व किल्ला यांच्या सुरक्षिततेचे काम पाहात. इतकेच नाही तर ब्रिटिशांच्या बंदुकीच्या टापूतूनही त्या इमारतीच्या दुरुस्तीचे सामान जीवाची पर्वा न करता घेऊन येत, सैनिकांच्या औषधपाण्याची व्यवस्था बघणे, त्यांच्यासाठी जेवण बनविणे, ही कामे त्या करीतच. त्याशिवाय पुरुषांच्या पलटणीला सर्व प्रकारची मदत करण्यात त्या गुंतलेल्या असत. ना होती त्यांना आपल्या संसाराची पर्वा की ना स्वतःच्या जीवनाची! राणीच्या महिला पलटणीतील मोतीबाई नावाची महिला अत्यंत बुद्धिमान व मुत्सद्दी होती. लढाईचा आराखडा व सैन्याचा व्यूह रचण्यात तिचाच सल्ला महत्त्वाचा मानला जात असे. 

अझीझन नावाची कलावंतीण ब्रिटिशांच्या सैन्यातून बातम्या काढून आणण्याचे काम करीत असे. या सर्व स्त्रियांनी 1857 साली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण स्त्रीवर्गाने कामगिरी केली, त्याचे श्रेय राणीच्या नेतृत्वाला आहेच; पण म्हणून तिच्या हाकेला ओ देऊन आलेल्या या स्त्रियांचे महत्व कमी होऊ शकत नाही. लक्ष्मीबाईप्रमाणेच एक बादशाहीण व काही राण्या आपले ऐशआरामाचे जीवन सोडून 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात सामील झाल्या होत्या. झीनत महल ही दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जाफर याची पत्नी होती. बेगम झीनतने कधी आपल्या लाल किल्ल्याबाहेर डोकावूनही पाहिले नव्हते. बादशाहीण या नात्याने बेगमने लोकांना आपले मतभेद मिटवून एक होण्याचे आवाहन केले. या आवाहनाचा लोकांवर खूप मोठा प्रभाव पडला. 

1857 च्या युद्धात डावपेच लढविण्यात झीनत महलचा मोठा हिस्सा होता असे मानले जाते. बेगम हसरत महल ही अवधचा नवाब वाजिदअली शहा यांची पत्नी. वाजिदअली शहा राजाच्या जीवनापेक्षा कलावंताचे जीवन अधिक पसंत करीत. परिणामी ब्रिटिशांनी त्यांचे राज्य खालसा केल्याबरोबर त्यांनी पाठविलेल्या ठिकाणी ते निघून गेले. बेगमने त्यांच्याबरोबर न जाता अवधवर ताबा ठेवून इंग्रजांबरोबर लढणे पसंत केले. राणी व्हिक्टोरियाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला तिने सडेतोड उत्तर दिले. इंग्रजांशी तिने निकराने झुंज दिली. 1859 पर्यंत ती इंग्रजांना चकवत राहिली. तात्या टोपे व नानासाहेब पेशव्यांसारखे 1857 मातब्बर नेतेही अखेर तिच्याच आश्रयाला आले होते. एवढ्या मोठ्या साम्राज्याशी टक्कर देणे ही काय मामुली बात आहे? 

या तिन्ही राण्यांनी व त्यांच्या सहकारी महिलांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता जे बलिदान केले ते कधी आपण विसरू शकू का? उत्तरेप्रमाणेच दक्षिणेकडेही काही राज्यांनी स्वातंत्र्याकरता प्राण अर्पण केले. मद्रास प्रांतातील शिवगंगा नावाच्या छोट्या संस्थानाचा राजा बटुकनाथदेवर याची राणी वेलुंचीयार हिने ब्रिटिशांना आपल्या युद्ध कौशल्याने हैराण केले. ब्रिटिशांनी तिच्यापुढे हात टेकले व तिला हटविण्यासाठी डाकू कटू याची मदत घेतली. त्याच्या डरविण्या, धमकावण्याला राणी वेलूने व तिच्या प्रजेने दाद दिली नाही. शेवटी या झगड्यात राणी हुतात्मा झाली. 1857 च्या अंधःकार युगात या राणीने स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली होती. राणी भीमाबाई ही इंदूरच्या होळकर घराण्यातील. 

सन 1817 मध्ये होळकरांचा इंग्रजांनी महिदपूर येथे मोठा पराभव केला. या लढाईचे नेतृत्व राणी भीमाबाईने स्वीकारले होते. पराभव झाला म्हणून खचून न जाता राणीने जंगलाचा आश्रय घेऊन परत आपल्या सैन्याची रचना केली. गनिमी काव्याने लढून तिने इंग्रजांना जेरीस आणले. दोन्ही बाजूंचे खूप नुकसान झाले. कंपनी कमांडर सर मालकमसाहेब याला राणीचा पत्ता लागला. राणीला त्याने घेरले. त्या घेरावातून राणी घोडा फेकत बाहेर पडली. काय झाले हे ब्रिटिश फौजेला कळण्यापूर्वी राणी वायुवेगाने निघूनही गेली. ती इंग्रजांच्या हाती लागली नाही ती नाहीच. भीमाबाईंचे पुढे काय झाले तेही कळले नाही. कर्नाटकात कित्तूर नावाचे एक लहान संस्थान होते. या संस्थानातील अलोट संपत्तीची माहिती मिळाल्यामुळे या संस्थानातील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी संपत्ती मिळविण्यासाठी कित्तूरबर हल्ला केला. 

या संस्थानची राणी चेन्नम्माने इंग्रजांचा धुव्वा उडविला. त्यांचा सेनापती थॅकरे युद्धात मारला गेला. राणीची शौर्यगाथा कानडी साहित्यातील लोकगीतात वर्णन केली आहे. सन 1857 मध्ये महाराष्ट्रातील नरगुन्द नावाच्या एका छोटया संस्थानातील राण्यांनीही ब्रिटिश राज्याच्या विरोधात शस्त्र उचलले व त्या शहीद झाल्या. उत्तरप्रदेशात एक तुलसीपूर नावाचे संस्थान आहे. तुलसीपूरची राणी ईश्वरकुमारी हिला 1857 मध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले. तुलसीपूरचा राजा दिग्रजसिंग इंग्रजांच्या कैदेत होता, तो तिथेच मरण पावला. ईश्वरकुमारीने धीर सोडला नाही. 1859 मध्ये इंग्रज असिस्टंट कमिशनर आपल्या अहवालात म्हणतो की या राणीला शर्थीचा प्रयत्न केल्याशिवाय जिंकताच येणार नाही.. एकटीने लढणे अगदीच कठीण झाल्यावर राणी ईश्वरकुमारी बेगम हसरतला जाऊन मिळाली. 

19 व्या शतकातील भारताच्या या सुकन्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. त्यांची कथा खरोखरच प्रेरणादायक आहे. 1857 स्वातंत्र्ययुद्ध चिरडून टाकण्यास इंग्रजांनी भले-बुरे सर्व उपाय अंमलात आणले. खूप अन्याय, अत्याचार व हिंसा केली. लाखोंना झाडावर टांगून फाशी दिले. भयंकर घबराट निर्माण केली. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना होईपर्यंत अशीच अवस्था आपल्या देशांत होती. कॉँग्रेसची स्थापना झाल्यावर 56 वर्षांतच कॉंग्रेसच्या अधिवेशनाला महिला जाऊ लागल्या. पंडिता रमाबाई यांच्या नेतृत्वाखाली 1992 साली बंगाल व महाराष्ट्रातून मिळून 8-10 महिला पहिल्या प्रथम काँग्रेसच्या अधिवेशनाला गेल्या. घराच्या बाहेरील सार्वजनिक कामात भारतीय महिलांचे हे पहिले पाऊल पडले. यानंतर दरवर्षी काही महिला आपला पती अगर पित्याबरोबर काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाला हजर राहू लागल्या. परंतु या स्त्रिया समाजाच्या निंदेच्या भयाने अधिवेशनात भाग येत नसत तुम्ही घ्या ना भाग : तुम्ही बोलाना असा आग्रहही त्यांना कुणी करत नसे. 

श्रीमती कादंबिनी गांगुली हिने प्रथम व्यासपीठावर जाऊन बोलण्याचे धैर्य केले. महिलांसाठी व्यासपीठाचा दरवाजा तिने उघडून घेतला. आपल्या भाषणात तिने महिलांना काँग्रेसच्या कामकाजात भाग घ्यायचा अधिकार मिळालाच पाहिजे या मुद्द्यावर जोर दिला. “महिला म्हणजे काही कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात तुम्ही बायकांचे पुतळे जागोजागी उभे करा. आम्ही आता इथे पुतळे बनण्यासाठी येणार नाही-" असे तिने जोरात ठणकावले. कादंबिनीबाईच्या भाषणाचा काँग्रेस कार्यकर्त्यांवर खूप प्रभाव पडला. स्त्रियांची अबोल भावना बोलकी झाली. हळूहळू स्त्रिया काँग्रेसच्या अधिवेशनांत आपले विचार मांडू लागल्या. या पार्श्वभूमीवर विसाव्या शतकातील स्वातंत्र्यलयात स्त्रियांचा सहभाग कसा होता त्याची कथा आपण पाहू. 

महात्मा गांधींच्या भारतातील आगमनापूर्वीही महाराष्ट्रात नाशिक शहरात स्वदेशीची शिकवण देणारी एक महिला सभा होती. स्वा. वीर सावरकर यांची वडील वहिनी येसू वहिनी सावरकर ह्या या सभेच्या संस्थापिका. सावरकर बंधू अंदमानच्या काळकोठडीत शिक्षा भोगत होते. अभिनव भारत या त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेतील बहुतेक कार्यकर्ते तुरुंगात होते. त्यांच्या बायकांना बंडखोरांच्या बायका म्हणून पोलिसांकडून त्रास होई. सासरची व माहेरची माणसेही सरकारी भयामुळे त्यांना जवळ करीत नव्हती. येसू वहिनींनी या स्त्रियांची "आत्मनिष्ठ युवती संघ" नावाची संघटना स्थापली. या स्त्रियांनी स्वदेशीचे व्रत घेतले व त्याचा प्रसार केला. काचेच्या बांगड्याचा चुडा भरणे हे सुवासिनीचे प्रमुख लक्षण, आपल्या देशात पूर्वी काच बनत नसे. 

बांगड्या विदेशी असल्यामुळे सुवासिनीचे बांगड्या हे आवश्यक लक्षण असूनही त्यांनी हातात काचेची बांगडी घालायचे सोडले. साखर परदेशी म्हणून तीही सोडली. मराठीतील त्या वेळेचे प्रसिद्ध कवी विनायक यांच्या देशभक्तीपर कवितांवर सरकारने बंदी घातली होती. आत्मनिष्ठ युवतींनी त्यांच्या कविता पाठ करून त्यांचा तोंडी प्रसार करून त्या लोकप्रिय करण्याचे फार मोठे देशकार्य केले. युवती संघातील स्त्रिया मध्यम व कनिष्ठ मध्यम वर्गातल्या होत्या. सरकारी नासाने गांजल्या होत्या, तरीही त्यांनी स्वदेशी जागरणाचे आपले काम चालू ठेवले. 

विसावे शतक

विसाव्या शतकातील पहिली जगप्रसिद्ध स्त्री स्वातंत्र्यसैनिक भिकाईजी रुस्तुम कामा ह्या होत. त्या मादाम कामा नावाने ओळखल्या जातात. त्या खानदानी पारसी घराण्यातील. मादाम कामांनी आपल्या समाजसेवेला मुंबईतील झोपडपट्टीपासून सुरुवात केली. श्रीमंत रुस्तुम कामांना श्रीमंत व प्रतिष्ठित घराण्यातील आपल्या पत्नीने झोपडपट्टीतील लोकांच्यात मिसळावे ही गोष्ट बिलकुल पसंत पडली नाही. दोघांच्यात तेढ निर्माण झाली. मादाम कामा आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी घर सोडले व लंडनला गेल्या. लंडनला शामजी कृष्ण वर्मा व स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. त्या अभिनव भारत संघटनेत सामील झाल्या. 

जर्मनीमधील समाजवादी परिषदेत त्यांनी स्वतःच्या कल्पनेने स्वतंत्र भारताचा झेंडा बनवून तो फडकविला. ब्रिटिशविरोधी कारवायांचा त्यांच्यावर आरोप करून त्यांना लंडनमधून हद्दपार केले गेले.. त्या फ्रान्स देशात गेल्या व तिथे राहून भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले. म्हातारपणी त्यांची प्रकृती सारखी ढासळत राहिली. त्या भारतात परत आल्या. 1934 च्या सुमारास त्यांचे देहावसान मुंबईत झाले. अशा महान क्रांतिकारी स्त्रीच्या मृत्यूनंतर केवळ 4 ओळींत त्यांच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात आली. देशाचे पारतंत्र्य व स्त्रीच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करणारा भारतीय समाज या दोहोंचीही जाणीव या घटनेमुळे होते. मादाम कामांनी ज्याप्रमाणे परदेशात राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. 

त्याचप्रमाणे कुमारी बलीयाम्मानेही दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी स्त्रियांचे पथक तयार केले. विलयाम्माला सत्याग्रहात अटक झाली. तिला खूप मारझोड झाली होती. कैदेत तिला अन्नही दिले गेले नाही. तिचे जीवन धोक्यात आले. गांधीजींनी तिला सत्याग्रहातून माघार घे व तुरुंगातून बाहेर ये असा निरोप पाठविला. शूर महिलेने गांधीजींचा सत्याग्रहाचा आदेश मानला होता. खरा सत्याग्रही शरण जात नाही अशी तिला शिकवण मिळाली होती. तिने माघार घेतली नाही. तुरुंगातच अवघ्या 16 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. भारतीय वेलियाम्मा ही 20 व्या शतकातील स्वातंत्र्यलढ्यातील पहिली हुतात्मा स्त्री. तिच्या बलिदानाने दक्षिण आफ्रिकेतीस व भारतातील सर्व लोक हळहळले.

लाहोरची लाडो राणी झुत्शी 1918 मध्ये गांधीजींची अनुयायी बनली. दारूच्या दुकानांवर निदर्शने करण्यासाठी तिने स्त्रियांना एकत्र केले. दारूच्या बाटल्या फोडल्या. दारूच्या दुकानांना आगी लावल्या, व परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या 1919 मध्ये तिने हाताने बनविलेल्या वस्तूंची विक्री केली व जमा झालेला फायदा तिने जालियनवाला बाग कत्तलीत नुकसान झालेल्या लोकांमध्ये वाटला. लाडो राणीला निदर्शने करत असताना अगदी मरेपर्यंत मार बसला होता. 1920 ते 1942  पर्यतच्या अनेक चळवळीत तिला कारावास घडला. दारोदार फिरून स्वातंत्र्य लढ्याकरता महिलाशक्ती जागृत करण्याचे काम लाडो राणीने केले. लाडो राणीपासून स्वातंत्र्यलढ्यात उतरणाऱ्या स्त्रियांना स्फूर्ती मिळाली. लाडो राणीचा काळ हा गांधीयुगाचा आरंभ होय.

महात्मा गांधी यांनी भारतीय स्त्रीला तिच्या शक्तीची जाणीव करून दिली. आपल्या प्रत्येक भाषणात स्त्रियांकडे वळून ते म्हणत, महिलांनो, तुम्ही भारत देशाची अर्धी शक्ती आहात. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तुमचा सहभागही अर्धा असला पाहिजे." गांधीजींच्या आवाहनाला हाक देऊन महिला, काँग्रेसच्या कामात संथ गतीने का होईना पण येऊ लागल्या. गांधीजींची पहिली भारतीय शिष्या अवन्तिकाबाई गोखले. अवन्तिकाबाई मुंबईच्या रहिवासी गांधीजींच्या विचाराने भारावलेल्या अवन्तिकाबाईनी गांधीजीबरोबर चंपारण्यात सत्याग्रह केला. त्यांनी मराठीत लिहिलेल्या गांधीजींच्या चरित्राला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिली होती. अवन्तिकाबाईनी हिंद महिला- समाज नावाची संस्था स्थापन करून महिलांना काँग्रेसच्या विधायक कार्यक्रमासाठी संघटित केले. 

1930 मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही मार्गदर्शन केले. अवन्तिकाबाईना 1930 साली व 1932 साली कारावासाची शिक्षा झाली होती. स्त्रियांचे अधिकार व कल्याण, मजूर वस्ती व इस्पितळे यांबाबत काम करून त्या मुंबई शहराचे भूषण ठरल्या तर नवल काय? बंगालमधील सरलादेवी चौधरी ह्या रवींद्रनाथ टागोर यांची पुतणनात. बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारकांच्या शक्तीला एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले. देशभक्ती त्यांच्या नसानसातून भरली होती. 1 जानेवारी 1909 रोजी लाहोरमध्ये त्यांनी प्रथम वन्दे मातरमची घोषणा देऊन नववर्ष साजरे करण्याकरिता जमलेल्या लोकांना चकित केले, वन्दे मातरम् ह्या घोषणेला बंदी असता त्यांनी ती घोषणा दिली यावरून त्यांचे अतुल धैर्य दिसून येते. 1919  पासून त्या गांधीजींच्या प्रभावाखाली आल्या. स्त्रियांमध्ये आत्मविश्वास व नेतृत्व गुण वाढावेत यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 

1945 मध्ये मृत्यू होईपर्यंत त्या स्वातंत्र्यआंदोलनात सक्रिय होत्या गुजरातमधील हंसा मेहता या सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आल्या होत्या. 1919  मध्ये उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. त्या परत आल्या ते राष्ट्रीय चळवळीत सामील होण्याचे ठरवूनच, सायमन कमिशनला त्यांनी सक्रिय विरोध केला, स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीत येण्यास प्रेरणा दिली. राष्ट्रीय चळवळीतील सहभागामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विधायक सामाजिक कामांत लक्ष घातले. सरोजनी नायडूंचा जन्म बंगालमधील ब्राह्मणगावी झाला. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे सर्व शिक्षण हैद्राबादला आंध्रप्रदेशात झाले. सरोजनीदेवींनी गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या सत्याग्रहात भाग घ्यायचे ठरविले. दांडीयात्रेत त्या सामील झाल्या. त्यांचे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांमुळे त्यांना 1917 मध्ये "पोएट नाइटिंगेल ऑफ इंडिया" (भारताची कोकिळा कवयित्री) ही पदवी मिळाली होती. 

स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे कार्य, स्त्रीयांच्या मताधिकाराबद्दल त्यांनी केलेली चळवळ यांमुळे त्यांचा ठसा भारतीय इतिहासावर मोठा आहे. 1949 मध्ये त्यांना राज्यपालपद दिले गेले. भारतातील त्या पहिल्या महिला राज्यपाल होत. गुजरातच्या सरलादेवी साराभाई व त्यांचे सर्वच कुटुंब गांधीजींच्या सहवासात आले. परदेशी माल व कापडांची दुकाने व दारूची दुकाने यांवर निदर्शने करण्यासाठी त्यांनी महिलांना संघटित केले. गुजरातमध्ये स्वातंत्र्य आंदोलन तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे श्रेय सरलाबेनना आहे. मनमोहिनी झुत्शी या स्वातंत्र्यसैनिक लाहो-राणी झुत्शी यांची कन्या. 1929 पासून कौँग्रेसच्या विद्यार्थी चळवळीत त्यांनी हिरीरीने भाग घेतला भगतसिंगच्या फाशीविरुद्ध त्यांनी निदर्शने केली. परकीय सत्तेला धाडसीपणाने टक्कर देण्याचे त्यांचे काम तरुण पिढीला स्फूर्तिदायक ठरले. 

बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयातील विद्यार्थिनी अमलप्रभा दास यांनी 1930 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षणाला रामराम ठोकला. आसाममधील गोहाटी या आपल्या गावी येऊन त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी अस्पृश्योद्धारास वाहून घेतले. 1942  साली त्यांना परत पकडले. कारागृहात प्रकृती चांगली राहिली नाही म्हणून त्यांना कारागृहातून बाहेर आणून 1945  सालापर्यंत घरातच नजरकैदेत ठेवले होते. 

गांधीजींची चैतन्यदायी प्रेरणा

म. गांधीच्या हाकेला ओ देऊन स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या प्रमुख स्त्रियांची यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये जानकीदेवी बजाज, कमला नेहरू, विजयालक्ष्मी नेहरू (पंडित), राजकुमारी अमृत कुंवर, मृदुला साराभाई, सरसादेवी साराभाई अशा नामांकित घरांतील लेकीसुनाही स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात जात येत राहिल्या. श्रीमंत व मध्यम वर्गातील स्त्रियांनी आपले दागिने- की जे स्त्रीला प्राणप्रिय आहेत असे समजले जाते- गांधीजींकडे राष्ट्रीय कार्याकरता सोपविले. गांधीजींच्या शब्दांनी जणू त्यांच्यावर जादू केली होती. ही जादू फक्त हिंदू स्त्रियांवरच झाली असे नाही. मुसलमान व विदेशी महिलांचीही संख्या त्यांमध्ये मोठी आहे. उदाहरणार्थ 1920-22 मधील खिलाफत चळवळीत चमकलेल्या बाई अमन बानू बेगम. त्यांनी आपले मुलगे शौकत आली व महंमद अली यांना चळवळीत उतरण्याची प्रेरणा दिली. 

स्वतः पडदा सोडता व इतर सजातीय महिलांना पडदा सोडून सामाजिक व राजकीय कार्यामध्ये समाविष्ट होण्यास प्रेरणा दिली. कु. रहेना तय्यबजी या तर गांधीजींच्या एक जवळच्या स्नेही होत्या. त्या गांधीजींच्या आश्रमात राहू लागल्या. हिंदु मुस्लिम एकतेसाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. बिबी अमतुसलाम पतियाळाच्या मुस्लिम समाजातील. गांधींच्या चळवळीतील ती एक बिनीची लढवय्यी. 1930-31 मध्ये गांधीजींबरोबर राहून काम करण्यासाठी त्या गुजरातमध्ये आल्या. अत्यंत कष्टाळू व धैर्यवान बिबीने हिंदु-मुस्लिम एकतेसाठी आपले आयुष्य वेचले. हिंदु-मुस्लिम दंग्याच्या क्षेत्रात घुसून त्या दोन्ही पक्षांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत. अशीच काही उदाहरणे विदेशी स्त्रियांचीही आपल्याला देता येतील. या विदेशी स्त्रियांनी भारत हाच देश आपला मानला व त्यातील सामाजिक व राजकीय सुधारणांसाठी कष्ट झेलले. त्यांपैकी एक मार्गारेट कुझीन या आयरीश बाई संगीतशिक्षिका होत्या भारतीय स्त्रियांना एका व्यासपीठावर आणून त्यांनी या देशात स्त्रीमताधिकाराची चळचळ उभारली.

नीली सेनगुप्ता ही इंग्लिश कन्या भारताची सून, बंगालमधील चित्तगॉव. हे तिचे सासर सासरी आल्यापासून तिने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. अनेक वेळा नीली सेनगुप्तांना तुरुंगवास घडला, प्रदेश काँग्रेसये अध्यक्षपद त्यांनी भूषविले भारतीय स्वातंत्र्याशी कल्पनातीत निष्ठा असलेली नीली विदेशी होती असे कोण म्हणेल? अॅनी बेझंट या आणखी एक विदेशी भगिनी. त्या भारतात थिऑसॉफीच्या प्रचाराच्या उद्देशाने आल्या होत्या. इथे आल्यावर “होमरूल" चळवळ सुरू करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. मायदेशी परत जाण्याची भारत सरकारची आज्ञा त्यांनी मानली नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगवास घडला. गांधीजींच्या सहकाराच्या चळवळीला त्यांचा पाठिंबा नव्हता तरी घटनात्मक उपायांनी स्वराज्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असे त्यांना वाटे. आयुष्यभर त्यांनी तोच मार्ग चोखाळला. 

1917 साली अखिल भारतीय काँग्रेसच्या त्या अध्यक्ष होत्या. भारतातच 1933 साली अॅनी बेझंट यांचा मूत्यू झाला. शांत स्वभावाच्या मीरा बहेन या ईस्ट इंडिया स्टेशनचे कमांडर-इन-चीफ अॅडमिरल स्लेड यांची कन्या मेडेलाईन, रोमा रोल यांनी गांधीजींवर लिहिलेले पुस्तक वाचून प्रभावित झालेली ही ब्रिटिश कन्या 1925 मध्ये भारतात येऊन गांधीजींच्या आश्रमात राहिली. गांधीजींच्या या निष्ठावान अनुयायी स्त्रीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व सत्याग्रहांत भाग घेऊन तुरुंगवास भोगला. गांधीजींच्या आंदोलनात देशी, विदेशी व सर्व धर्मातील स्त्रिया सामील झाल्या होत्या. स्त्रियांकरिता आंदोलनाचा एक स्वतंत्र कार्यक्रमच गांधीजींनी बनविला होता. सूत कातणे, खादी विणणे, स्वदेशीचा प्रचार करणे, अस्पृश्यता निर्मूलन साक्षरता अभियान, दारूच्या दुकानावर निदर्शने इत्यादी कार्यक्रम गांधीजींनी दिले व भारतीय स्त्रियांनी ते अंगीकारले. 

आर्य महिला समाज, वनिता समाज, हिंद महिला समाज, बंगालमधील महिला कर्म समाज इत्यादी स्त्रियांच्या काही संस्थांची नावे सांगता येतील. या संस्थांच्या सदस्य स्त्रियांमध्ये राष्ट्रीय वृत्ती वाढीला लावण्याचे प्रयत्न केले जात. कथा-कीर्तनामध्ये इतिहासातील वीरांच्या कथा वर्तमान परिस्थितीशी सुसंगतपणे जोडून श्रोत्यांसमोर मांडण्याचे काम स्त्रिया करीत. यशोदाबाई भट नावाची मुंबईतील एक महिला अशा प्रकारची कीर्तने करण्यात प्रसिद्ध होती. यशोदाबाई आपल्या लहानग्या मुलीला घेऊन सत्याग्रह करीत व तुरुंगात जात. अवन्तिकाबाई गोखले यांनी हिंद महिला समाजाची स्थापना करून स्वातंत्र्य लढ्यासाठी स्त्रियांना संघटित केले व नेतृत्व दिले.

महिलांची सत्याग्रह पथके

1927 मध्ये सायमन कमिशनवर बहिष्काराची चळवळ सुरू झाली. त्यात काही महिलांनी भाग घेतला. देशबंधूदास यांची पत्नी बसंतीदेवी व बंगालमधील ऊर्मिलादेवी यांनी बंगाली महिलांचे नेतृत्व केले. लाठीमार सहन केला. लाला लजपतराय यांची पत्नी राधादेवी यांनी पंजाबच्या महिलांना प्रेरणा दिली. यानंतर म्हणजे 1930 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचे ठरविले. दांडी नावाचे गुजरातमधील समुद्र किनाऱ्यावरचे गाव त्यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी निवडले. गांधीजी अहमदाबादहून दांडीपर्यंत चालत जाणार होते. त्यांच्याबरोबर पुरुष सत्याग्रहींचा खूप मोठा जथा जाणार होता. स्त्रियांच्या शक्तीबद्दल विश्वास असणाऱ्या महात्माजींनी स्त्रियांनी या सत्याग्रहात सामील होऊ नये असे ठरविले. स्त्रियांनी पिछाडीला राहुन जखमी सत्याग्रहींची देखभाल करावी असे गांधीजींनी ठरविले. 

सरोजिनी नायडू यांना गांधीजींचा हा निर्णय समजल्याबरोबर त्या म्हणाल्या- "सत्याग्रहींची देखभाल तर आम्ही जरूर करू. पण आमच्यापैकी ज्या सत्याग्रहात भाग घेऊन देशासाठी बलिदान करण्याच्या इच्छेने आल्या आहेत, त्यांना सत्याग्रहात भाग घेऊ न देणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. सरोजिनीदेवी गांधीजींना म्हणाल्या की स्त्रियांनी सत्याग्रहात भाग घेण्याच्या मुद्यावर आम्ही स्त्रिया तुमच्यासमोर प्रथम सत्याग्रह करू. ते शस्त्र तुम्हीच वापरायला शिकवले आहे. सत्याग्रहात भाग घेऊन लाठी-गोळी खाणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे." शेवटी गांधीजीना स्त्रियांचे म्हणणे मान्य करावेच लागले. परिणामी देशभरच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत हजारो स्त्रिया सामील झाल्या. सत्याग्रहाबरोबरच विदेशी कपड्यांच्या होळ्या   करणे परदेशी मालावर बहिष्कार घालणे ही कामे फक्त स्त्रियांकडेच सोपविली. 

देशभरातील स्त्रियांनी "नमक का कायदा तोड दो जंगल का कायदा तोड दो." अशा घोषणांनी सारा देश दुमदुमून सोडला. हजारो स्त्रिया सत्याग्रह करून तुरुंगात गेल्या त्यांनी तुरुंग भरून टाकले मुंबईतील एका मोर्च्याचे नेतृत्व अवंतिकाबाई गोखले या गांधीजींच्या पट्टशिष्येने केले. सभा व मोर्चेबंदी धुडकावून मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचला. महिलांना आपापल्या घरी जाण्याचा हुकूम पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. पण काय आश्चर्य! झुरळालाही घाबरणाऱ्या या स्त्रिया पोलिसांच्या दंडेली हुकूमाला जराही घाबरल्या नाहीत. सगळ्याजणी शांतपणे उभ्याच राहिलेल्या पाहून पोलीस अधिकारी म्हणाला, "आता जाता की तुमच्या अंगावर घोडे सोडू?" तरीही बायका हलल्या नाहीत. लाठीहल्ला सुरू झाला. कृष्णाकुमारी सरदेसाई नावाची चौदा वर्षाची मुलगी मोर्चापुढे झेंडा येऊन उभी होती. तिच्यावर प्राणघातक लाठीहल्ला झाला तरी तिने हातातला झेंडा सोडला नाही. 

इतक्या लहान मुलीचे हे धैर्य पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले या प्रसंगावरून गांधीजींचा स्त्रियांच्या सहनशक्तीवरचा विश्वास किती सत्य होता याचाही अनुभव आला. याच काळात अलाहाबादमध्ये पंडित जवाहरलालांची कन्या कु. इंदिरा हिच्या नेतृत्वाखाली मुला-मुलींची वानरसेना बनली पोलिसचौकीजवळ जाऊन हूपहूप करणे, पोलिसांना व सोजिरांना हुपहूप करून चिडवणे हे त्यांचे काम होते. मुंबईला उषा  मेहता नावाची एक दहा वर्षांची मुलगी व तिच्या मैत्रिणी यांनी वानरसेनेच्या धर्तीवर मांजरसेना बनविली. मांजरसेनेत फक्त मुलीच होत्या. पोलिसांसमोर जाऊन त्या म्याऊ म्याऊ ओरडून त्यांना जेरीस आणील. प्रभात फेरीतील मुलीच्या हातातले झेंडे काढून घेतले जात म्हणून मांजरसेनेतील मुलींनी आपले परकर-पोलके तीन रंगी कापडात बनविले. मुलींनी शाळा कॉलेजे सोडली दारू दुकानावर निदर्शने करणाऱ्या स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. 

सुरवातीपासूनच मुंबई शहर स्वातंत्र्य आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. महाराष्ट्रात तुलनेने स्त्रियांची सामाजिक स्थिती ही बरी त्यामुळे मुंबईतील स्त्रिया स्वातंत्र्य आंदोलनात सर्वात पुढे होत्या. मोर्चे काढणे, प्रभातफेऱ्या काढणे ही कामे तर नित्याची-ती तर सर्व देशात होतच. याशिवायही मुंबईच्या स्त्रियांनी आणखी काही महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी देशसेविका संघाची स्थापना केली. केशरी रंगाच्या गोल साड्या नेसून त्या रस्त्यावर संचलन करीत. त्यांची दुसरी संघटना "हिंदुस्थानी सेविकादल" या नावाने ओळखली जाई. दादाभाई नौरोजींची नात पेरीन कॅप्टन, किसन घुमटकर, बच्चूबाई-वागळे अशा कितीतरी मुली या संस्थेच्या सदस्य होत्या. या दोन्ही संस्थांवर सरकारने बंदी घातली. सत्याग्रहात मोठ्या संख्येने स्त्रियांनी भाग घेतला. त्यांना ठेवायला तुरुंग अपुरे पडले. त्यामुळे काहींना सोडून द्यावे लागले. 

म. गांधीजी स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थान मानणारे होते. स्त्री पुरुषांच्या संमिश्र सत्याग्रहींच्या तुकड्यांचे नेतृत्व त्यांनी अवंतिकाबाई गोखले. भक्तिबा देसाई, सरोजिनी नायडू, कमलादेवी चटोपाध्याय यांसारख्या स्त्रियांना दिले होते. पुरुषांनी ते न कुरकुरता मान्य केले होते. गांधीजींनी स्त्रियांमध्ये खूपच परिवर्तन घडवून आणले. स्वातंत्र्याकरिता निर्भय होण्याची जरूरी त्यांनी स्पष्ट केली. देशासाठी प्राण देण्याकरताच नव्हे तर देशभक्तांचे प्राण वाचविण्यासही त्या मागे- पुढे पाहात नसत एक उल्लेखनीय उदाहरण पाहा :

सत्यभामाबाईचे साहस

सत्यभामाबाई कुवळेकर नावाची एक बालविधवा, 1920 ला गांधीजींचे भाषण ऐकले. व ती जणू संमोहित झाली. आपल्या अंगावरचे सर्व दागिने उतरून तिने गांधीजीकडे राष्ट्रीय कामासाठी म्हणून दिले व आजन्म सोने न वापरण्याची शपथ घेऊन पुढे ती पाळलीही. गांधीजींच्या कार्यक्रमानुसार काम करता करता त्यांचा परिचय एका देशभक्त कार्यकर्त्याशी झाला. विनायकराव हरोळीकर त्यांचे नाव. विनायकरावांवर स्वराज्य छापखान्याच्या संदर्भात खटला चालू होता. महारोगासारखा दुर्धर रोग त्यांना झाला. तुरुंगात योग्य ती वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना सोडून दिले. विनायकराव अविवाहित होते. एकटेच राहत. त्यांची सेवा करायलाही कुणी नात्यागोत्याचे नव्हते. एका सध्या देशभक्ताची आबाळ सत्यभामाबाईंना पाहवली नाही. त्या रोज विनायकरावांच्या घरी जाऊन स्वयंपाक पाणी, धुणीभांडी करू लागल्या. विनायकरावांच्या जखमा धुवून बांधण्याचेही त्या काम करू लागल्या. 

एक बालविधवा एका अविवाहित पुरुषाबरोबर दिवसाचे 4/5 तास घालवते हे पाहून लोक त्या दोघांबद्दल हवे ते बोलू लागले. हे पाहून विनायकरावांनी सत्यभामाबाईंना आपल्या घरी यापुढे येत जाऊ नका अशी विनंती केली. दुसऱ्या दिवशी सत्यभामाबाई गेल्या त्या स्वतःचे लग्न विनायकरावांशी करण्याचा प्रस्ताव घेऊनच. विनायकरावांनी सत्यभामाबाईंची परोपरीने समजूत घातली. सत्यभामाबाईंनी ते ऐकले नाही. आपले लग्न झाले तर आपण विनायकरावांची चांगली सेवा करून त्यांचा आजार वाढू देणार नाही असे त्यांना वाटले. एक-कार्यकर्ता काही वर्षे तरी काम करण्याकरता त्यांना वाचवायचा होता. सत्यभामाबाईंनी आपला निर्धार पुरा केला. विनायकरावांना बरोबर घेऊन पुढे सुमारे 15 वर्ष त्यांनी ग्रामसुधाराचे काम केले. सविनय कार्यदेभंगातही भाग घेतला. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यही त्या बनल्या. 

एक कार्यकर्ता वाचवायला केवढा हा आटापिटा व त्याग! विनायकरावांच्या मूत्यूनंतरही वयाच्या 85 वर्षापर्यंत त्या काम करीतच होत्या. अशा स्वार्थत्यागी देशभक्त पाईकांची माहिती या देशाच्या इतिहासात येणार तरी केव्हा? कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, सरोजिनी नायडू, आवंतिकाबाई गोखले, रुक्मिणीदेवी अरुंडेल, नीली सेनगुप्ता, पंजाबची सावित्रीबाई मदन या महिला नेत्या होत्या. यांच्या कामाकडे कानाडोळा करणे इतिहासाला शक्य नाही. परंतु ज्या स्त्रिया आपल्या प्राणांची बाजी लावून या आंदोलनात उतरल्या, ज्यांनी शिक्षण सोडले, घरसंसार सोडला, ज्यांना पतीच्या देशभक्तीमुळे व तुरुंगवासामुळे सरकार व समाज यांच्याकडून हाल सोसावे लागले त्यांचा त्याग, देशसेवा इतिहासात केव्हा येणार? त्यांच्या मूक कामगिरीवर या देशाचे स्वातंत्र्य उभारले गेले नाही का?

क्रांतिकारक महिला

शस्त्रास्त्रांचा वापर केल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही असा विचार असणाच्याही काही स्त्रिया या देशात होत्या. त्यांचा स्वातंत्र्याचा मार्ग म्हणजे क्रांतीचा मार्ग या मार्गात हिंसा अटळ होती व ती त्यांना मान्य होती. पंजाबची सत्यवती देवी ही अशाच स्त्रियांमधील एक. सत्यवतीवर मार्क्सवादी क्रांतिकारक विचारांचा पगडा होता. शेतकरी कामकरी यांचे क्रांतिद्वारा राज्य हे तिचे स्वप्न होते. वारंवार होणाऱ्या तुरुंगवासाने तिची तब्येत संपूर्ण ढासळली होती. दुसरी पंजाबमधील क्रांतिकारक विचारांची कन्या सुशीला दीदी. आपले सर्व दागिने तिने काकोरी कटाचा खटला चालविण्यासाठी दिले होते. सरदार भगतसिंग व इतर क्रांतिकारकांना तिने भूमिगत राहून मदत केली, तिला पकडून देणाऱ्याला ब्रिटिश सरकारने रु.2000 चे बक्षीस लावले होते. क्रांतिकारक तिचा सल्ला घेत. पोलिसांशी एखाद्या योद्धधाप्रमाणे ती सामना करी. 

1932  मध्ये तिने काँग्रेसच्या अधिवेशनासाठी स्त्री-स्वयंसेविकांचा जथा तयार केला होता. गरिबी व आजार या दोघांनी तिचा बळी घेतला. 1963 मध्ये तिचा मृत्यू झाला पण त्याची दादही कुणी घेतली नाही. भगवती चरण व्होरा नावाचे एक क्रांतिकारक उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. 1930 मध्ये बॉंब तयार करत असता स्फोट झाला व त्यात ते हुतात्मा झाले. त्यांची पत्नी दुर्गाभाभी. भाभीने आपल्या पतीचे काम पुढे चालविले. सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. स्वतःच्या कर्तबगारीवर त्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले. बंगालमधील कृष्णनगर या गावी बीना दास नावाची एक कॉलेज कन्या होती. सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी तिने मुलींचा एक गट संघटित केला. बीना पदवीधर झाली. 1932 साली आपली पदवी घेण्यासाठी ती व्यासपीठावर चढली. पदवी बंगालचे गव्हर्नर स्टनले जॅकसन यांच्या हस्ते दिली जात होती, इतक्यात बीनाने आपल्या पदरात लपविलेले पिस्तुल बाहेर काढून जॅकसनवर गोळ्या झाडल्या. 

जॅकसनच्या नशिबाने तो वाचला. बीनाला 9 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. 'मी माझ्या मातृभूमीवरील प्रेमामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यावर पिस्तुल झाडले. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मंजूर आहे. असे बाणेदार उत्तर बीनाने न्यायाधीशाला दिले होते. नागालँडची राणी गिदालू हिला क्रांतिकारक कारवायांमुळे अटक झाली. त्या वेळी ती फक्त 17 वर्षांची होती. स्वातंत्र्यलढयात स्त्रियांना ज्या शिक्षा झाल्या त्या सर्वांत अधिक शिक्षा गिदालूता झाली. 1932  साली शिक्षा झालेली गिदालू 1947 साली सुटली. कारावासात एकाकी ठेवल्यामुळे तिचे तारुण्य, प्रकृती व बळ पार जळून गेले, गिदालूला त्याचे कधीही वाईट वाटले नाही. आसाममधील कु. कनकलता बारुआ हिने 1942  च्या लढ्यात उडी घेतली. त्या वेळी ती फक्त 1 6 वर्षांची आल्लड किशोरी होती. 

पोलीसस्टेशनसमोर झेंडावंदन करण्यासाठी तिने युवक युवतींचा एक गट तयार केला. पोलिसस्टेशन समोरील मित्रमंडळीसमोर तिने प्रक्षोभक भाषण केले. झेंडावंदन होण्यापूर्वीच पोलिसांनी मुलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यातच कनकलताचा अंत झाला. भारतभूमीवर हुतात्मा होण्याचा भारतीय युवतीत पहिला मान कनकलताला मिळून ती अमर झाली. आफ्रिकेत कुमारी वेलीयाम्मा ही 16 वर्षांचीच युवती सत्याग्रह चळवळीत हुतात्मा झाल्याचे यापू्र्वी आपण पाहिले आहेच. या सर्व क्रांतिकारक मुलींनी आपल्या वयाची विशीही ओलांडली नव्हती. पुढे उभे आयुष्य जायचे होते. पालकांच्याही त्यांच्यापासून काही अपेक्षा असतीलच. देशप्रेमाने पेटलेल्या या मुलींनी धोक्याचे जीवन पत्करले, हालअपेष्टा व अनेक वर्षांचा तुरुंगवास पत्करला. त्यांच्यासमोर एकच ध्येय होते. मातृभूमीची परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्तता. धन्य ते माता-पिता ज्यांनी अशा धाडसी व देशप्रेमी मुलींना जन्म दिला. 

1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे जनतेला आवाहन केले. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे एकेका सत्याग्रहीने स्वतंत्रपणे एकट्याएकट्याने सत्याग्रह करून अटक करवून घेणे महाराष्ट्रात महिलामध्ये प्रथम सत्याग्रह करण्याचा मान पद्मावतीबाई हिरोलीकर (पूर्वाश्रमीच्या सत्यभामाबाई कुवळेकर) यांना मिळाला. देशभर अनेक महिलांनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणाऱ्या सर्व महिलांना एकएक वर्षाची सजा झाली होती. 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले, सरकारला युद्धासाठी नागरिकांकडून कोणतीही मदत मिळू नये याबद्दल महिला जागरूक असत. 

‘बयालीस का नया जमाना...’ 

1942  मध्ये 'चले जाव’ ची चळवळ सुरू झाली, 'ब्रिटिशांनो चालते व्हा, 'करू किंवा मरू', अशा घोषणांनी देशाचा कानाकोपरा दुमदुमला. गांधीजी म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण हा अखेरचा लढा देत आहोत.' ते खरे ठरलेच. देशभर प्रचंड धरपकड सुरू झाली. सगळी नेतेमंडळी पकडली गेली. तरुणांना या धरपकडीची कुणकुण होतीच. त्यामुळे जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, अरुणा असफली इत्यादी युवक नेते भूमिगत झाले. गांधीजी व अन्य पुढाऱ्यांच्या धरपकडीनंतर पुढे जवळजवळ 4 वर्षे ही चळवळ युवकांनी चालविली. युवतींचा त्यात बरोबरीचा भाग होता. काय नाही केले या तरुण मुलींनी? प्राणावर उदार होऊन गुप्त संदेश पोहोचविणे, चिटठ्या पोहोचविणे, स्फोटक द्रव्ये योग्य ठिकाणी नेऊन पोहोचविणे, गस्त घालणे, रेल्वे रूळ उखडणे, स्टेशन जाळणे इत्यादी. ही यादी आणखी कितीतरी मोठी होईल. अशी कामे तरुण मुलींनी केली. त्याकाळी टंकलेखन (टायपिंग) झेरॉक्स इत्यादी सोयी नव्हत्या. 

गृहिणी व उघडपणे चळवळीत भाग घेऊ न शकणाऱ्या मुली हस्तलिखित पत्रके तयार करीत. सार्वजनिक ठिकाणे, सिनेमागृहे इथे जाऊन त्या वाटीत असत डॉ. उषा मेहता या गांधीवादी विचारवंत म्हणून आज जगप्रसिद्ध आहेत. उषाताई 1942  मध्ये कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यांनी मुंबईमध्ये भूमिगत रेडिओस्टेशन चालविले. या रेडिओवरून, दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांची कशी पिछेहाट चालली आहे, देशाच्या कोणत्या भागात चळवळ जोरात चालू आहे, देशभरच्या चळवळीचे स्वरूप काय आहे. हे त्या समजावून सांगत. नेताजी सुभाषबाबू यांनाही या रेडिओमुळे भारतातील चळवळीची माहिती समजत असे. रेडिओकेंद्र नेहमी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवावे लागे. पोलिसांनी हे केंद्र शोधून काढण्याचा चंगच बांधला होता. उषाताईच्या कामाबद्दल माहिती असणाऱ्या एका फितुराने घात केला. परिणामी त्या रेडिओवर बातम्या देत असतानाच पकडल्या गेल्या. 

1942 च्या आंदोलनात सुचेता कृपलानी, अरुणा असफअली, मृदुला साराभाई, उषा मेहता, सावित्री मदन, पद्मजा नायडू, किसन घुमटकर, मृणालिनी देसाई, अनसूया लिमये, अहिल्या रणदिवे (रांगणेकर) इत्यादी युवतींनी स्वतःला झोकून दिले. सुचेता कृपलानी चळवळीचे प्रशासन पाहात. अरुणा असफअली पत्रके लिहीत व उषा मेहता काँग्रेस रेडिओ चालवीत. सुचेताताई व उषाताई पकडल्या गेल्या. त्यांना जबर शिक्षाही झाली. अरुणा असफअली मात्र अखेरपर्यंत इंग्रजांच्या हातात सापडल्या नाहीत, त्यांना पकडून देणार्यास रु.5000 /- चे बक्षीस होते. त्यांच्या बाबतीत युसुफ मेहरअल्ली लिहितात... 'झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनंतर अरुणाताई याच स्वातंत्र्ययुद्धाच्या नायिका होत्या. प्रेमा कंटक, हंसा मेहता, भक्तिबा देसाई, पद्माबाई हरोलीकर यासारख्या ज्येष्ठ नेत्या आधीच पकडल्या गेल्या होत्या. 

महाराष्ट्रातील एक जिल्हा सातारा. सातारा शहर ही मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी, जिल्हा आकाराने खूप मोठा तर होताच, शिवाय डोंगरदऱ्यांनी वेढलेला. स्वातंत्र्यानंतर सातारा जिल्ह्याचे दोन जिल्हे बनले. सातारा व सांगली. या सातारा जिल्ह्याने आपले स्वातंत्र्य घोषित केले. आपले समांतर सरकार स्थापन केले. प्रतिसरकार. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला. तुफानदल नावाची सैनिक व्यवस्था निर्माण झाली. तुफान दलाची स्त्रीशाखाही होती. येरवड्याच्या कारागृहातून पळून साताऱ्याला आलेल्या खानदेशामधील लीला पाटील तुफानदलाच्या कप्तान होत्या. त्यांच्या पुढारीपणाखाली डोंगर कपारीतील महिला संघटित झाल्या. बंदुका चालवायला शिकल्या स्वयंचलित शस्त्रेही चालवू लागल्या. गुप्त बातम्या काढून आणू लागल्या. 

सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारच्या (पत्री सरकारही म्हटले जाई) महिला कार्यकर्त्यांचा खूप छळ होई. काशीबाई हणवर नावाच्या एका महिलेच्या गुप्तांगात पोलिसांनी मिरची पावडर घातली. तिने हा अपमान, छळ व कौर्य सहन केले पण शेवटपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांचे नाव अगर पत्ता सांगितला नाही. तुफान दलातील 95 टक्के स्त्रिया ग्रामीण होत्या. निरक्षर होत्या. परंतु त्यांचे धैर्य, सहनशक्ती व समयसूचकता कौतुकास्पद होती. स्वातंत्र्यानंतर परत त्या आपल्या संसाराला लागल्या. राजूताई बिरनाळे, उर्फ जैनाची ताई, हंसाताई पाटील यांनी व अशा अनेकींनी तुफान दलात मोलाची कामगिरी केली आहे. भूमिगतांना लपविले आहे. त्यांना जेऊ खाऊ घातले आहे. 

त्यांचे निरोप व चिठ्ठ्या पोहचविल्या आहेत. नाना पाटील स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या एका सभेत म्हणाले होते. आमच्या भगिनी जर आम्हांला मदत करण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या नसत्या तर आम्हांला यश मिळणे कठीण होते. 1942 पर्यंतच्या सर्व चळवळीत स्त्रियांनी कशाप्रकारे भाग घेतला हे स्थूल मानाने पाहिले. त्याच वेळी भारताबाहेर लांब आग्नेय आशिया व पूर्व आशियात राहणाऱ्या भारतीय मुलींनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता देशाबाहेर कोणते प्रयत्न केले ते पाहणेही आवश्यक आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्यलयातील सहभागाचा तो रोमहर्षक भाग आहे. आपल्याला अभिमानास्पद भाग आहे

आझाद हिंद सेना 

1941 साली सुभाषचंद्र बोस नजरकैदेतून निसटले. अफगाणिस्तानमार्गे जर्मनीला व तिथून ते आग्नेय आशिवात गेले. तिथे त्यांनी आझाद हिन्द फौजेची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील स्त्रियांच्या कामगिरीबद्दल सुभाषबाबूंना मोठा अभिमान होता. त्यांनी आझाद हिंद फौजेत महिलांची एक स्वतंत्र पलटन उभी केली. ‘राणी झाशी पलटन' असे तिचे नाव ठेवले आग्नेय व पूर्व आशियामधील मलाया, सिंगापूर, थायलंड, ब्रह्मदेश, मनीला, हाँगकाँग अशा अनेक देशात नोकरी व व्यवसाय करणाऱ्या भारतीयांची संख्या खूप मोठी होती. इथल्या रहिवासी महिलांपैकी अनेकींनी भारत देश कधी पाहिलाही नव्हता. 

स्त्रियांच्या स्वतंत्र समेतील नेताजीचे भाषण ऐकून महिला एकदम भारावल्या. भराभरा उठून त्यांनी आपल्या अंगावरचे दागिने उतरून नेताजीच्या कार्यासाठी दिले. त्या सभेत दागिने उतरून न दिलेली एकही स्त्री नव्हती. डॉ. लक्ष्मी स्वामिनाथन यांच्याकडे पलटणीत स्त्रियांची भरती करण्याचे काम दिले गेल. डॉ. लक्ष्मीनी आपला दवाखाना बंद केला. पूर्व व आग्नेय आशियात दौरा केला. 150  मुलीची सैनिक म्हणून नोंदणी झाल्यावर त्यांचे लष्करी शिक्षण सुरू केते. डॉ. सक्ष्मी स्वतःही एक सैनिक झाल्या. सूर्योदयापूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत त्यांचे लष्करी शिक्षण चाले. जे शिक्षण पुरुष जवानांना नसे, ते परिचारिकेचे प्रशिक्षण हाही त्यांच्या लष्करी शिक्षणाचा भाग होता. 13 वर्षाच्या माया गांगुलीपासून तो 40 वर्षाच्या एम. सत्यवती थीवरपर्यंत सर्व वयाच्या स्त्रिया पलटणीत सामील झाल्या. 

150 वरून पुढे त्यांची संख्या 1500 पर्यंत गेली. भारतातील चळवळ अहिंसेवर उभारलेली. लाठ्या व गोळया खाणे व जेलमध्ये जाणे इतकेच कष्ट त्यांना सोसावे लागले. परंतु युद्धावर जाणाऱ्या या मुलींना जिवंत परत येण्याचीही आशा नव्हती. तरीही त्या भरती होतच राहिल्या. के. लक्ष्मी म्हणतात की एकदा भरती झालेली कोणीही मुलगी भीती वाटून पलटण सोडून गेली नाही. उलट रोज नवनव्या मुली येतच राहिल्या, एके दिवशी प्रौढ वयाच्या 10/12 तामीळ बायका नेताजीकडे गेल्या. त्यांना फौजेत दाखल व्हायचे होते. नेताजी म्हणाले. "सैन्यात भरती होण्यासाठी वयाची अट असते. तुम्ही सर्व प्रौढ बायका आहात, तुम्हांला मी भरती करून घेऊ शकत नाही. मला माफ करा. 

त्या वेळी एक बाई म्हणाली, 'नेताजी सैन्य लढते. त्यांना भूक असते ना? आम्ही जेवण करू, भांडी घासू, त्या कामासाठी तर वय आडवे येत नाही ना?' नेताजींना त्यांचा युक्तिवाद पटला. व त्यांची राणी झाशी पलटणीच्या स्वयंपाक घरात भरती झाली. आघाडीवर जाणाऱ्या सैनिकांबरोबर ही रसोईखान्यातील तुकडीही गेली होती. घनदाट जंगलात कोणत्याही प्रकारची साधनसामग्री हाताशी नसतानाही त्यांनी चवदार जेवण बनवून दिल्याची आठवण पलटणीतील अनेक भगिनी आजही सांगतात. त्यातील बहुतेकजणी निरक्षर होत्या. त्यांच्यामध्ये ज्या सुशिक्षित होत्या त्यांना अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दिले जाई. या पलटणीत हिंदू. इस्लाम, ख्रिस्ती अशा सर्व धर्माच्या मुली होत्या. जातिभेद, धर्मभेद त्या मानीत नसत. सर्व एकत्र एकच अन्न खात. बंदुका व मशिनगन चालविणे, दिवसाला तीसतीस मैलांचे पायदळ संचलन करणे, जखमी जवानांच्या शुश्रुषेसाठी 1/2 तास काम करणे यांत त्यांचा वेळ जाई. हिंदी भाषा शिकणे व ती बोलणे सक्तींचे होते. यांपैकी बहुसंख्य राण्या भारताबाहेरच जन्मल्या होत्या. 

भारतात जन्मलेल्या अनेक जणींनाही भारताची पुसटशीही आठवण नव्हती. या सर्व मुली एकाच धाग्याने बांधल्या गेल्या होत्या. मातृभूमीचे स्वातंत्र्य. 1500 स्त्री सैनिकांतून 150 स्त्री सैनिकांची पहिली तुकडी लढण्यासाठी भारताच्या सीमेपासून जवळच नेण्यात आली होती. पुरुष सैनिकांच्याही आधी त्या सीमेवरून आत प्रवेश करणार होत्या. दुर्दैवाने ती संधी त्यांना मिळाली नाही. जयाचे पारडे फिरले. अतिशय दुःखाने ही तुकडी परत आली. या तुकडीतील दोन मुली युद्धात शहीद झाल्या. गांधीजींच्या नंतर मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना संघटित करून स्वातंत्र्याच्या लढाईच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय नेताजी सुभाषबाबुनांच आहे : नेताजींचा स्त्री समाजावरचा विश्वास राणी झांशी पलटणीने खरा करून दाखविला. के. लक्ष्मी व राणी झांशी पलटण ही भारतीय स्त्री समाजाला अभिमानास्पद आहे.. 

नाविकांचे बंड, आझाद-हिंद-सेना, प्रति-सरकारची चळवळ, उत्तरेकडेही झालेली अशाच प्रकारची चळवळ, भूमिगतांच्या हालचाली, यांनी इंग्रज सरकार जेरीस आले. आपण आता काढता पाय घेतला तर बरे, नाहीतर हात दाखवून अवलक्षण होईल हे चाणाक्ष व्यापारी इंग्रजांनी ओळखले. त्यांनी हा देश सोडायचे ठरविले. हिंदु-मुसलमानात मांडणे लावणे हा इंग्रजांच्या हातचा मळ होता. इंग्रजांनी या देशात राज्य केले ते अशा कलागती लावूनच. जाता जाता या देशाचे त्यांनी दोन तुकडे केले. बहुसंख्य मुसलमान नागरिक असलेले पाकिस्तान आणि बहुसंख्य हिंदू नागरिक असलेला प्रदेश भारत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने स्वातंत्र्य स्वीकारले तर 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले.

देशांतर्गत स्वातंत्र्यलढे

जुनागढ व निजामाचे हैद्राबाद संस्थान येथील राज्यकर्ते मुसलमान होते. त्यांनी आपापली संस्थाने स्वतंत्र इस्लाम संस्थाने आहेत असे मानायला सुरुवात केली. या भागांतील नागरिकांनी व भारत सरकारनेही त्यांचे चुकीच्या आधारावर असलेले स्वातंत्र्य अमान्य केले. जुनागड संस्थान लवकरच शरण आले. पण हैद्राबाद मध्ये रझाकार संघटनेचा प्रमुख कासीम रझवी व त्याची संघटना यांनी धुमाकूळ घातला. हैद्राबाद संस्थानातल्या बऱ्याचशा भागात मराठी भाषिक लोक राहत. त्यांनी हैद्राबाद संस्थान भारतात सामील करण्याची चळवळ केली. मराठी भाषिकांच्या भागाला मराठवाडा म्हणत, मराठवाडा मुक्त करून तो महाराष्ट्राला जोडून घेणे हाही त्यांच्या चळवळीचा एक भाग होता. त्या चळवळीला 'मराठवाडा मुक्तिसंग्राम' म्हणतात. या मुक्तिसंग्रामातील स्त्रियांचे कार्यही अनमोल आहे. 

मराठवाडा हा मुसलमानी अंमलाखाली फार काळ राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा मागासलेलाच राहिला. बायका सणासुदीशिवाय घराबाहेर पडत नसत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण थोडे. मुलीच्या शाळेभोवती 15 ते 20 फूट उंचीच्या भिंती असत. मुसलमान मुली तर पूर्णपणे पडद्याआड. अशी सामाजिक व राजकीय परिस्थिती असतानाही स्वातंत्र्याच्या विचाराने पेटलेल्या काही स्त्रिया घराबाहेर पडल्या. ठिकठिकाणी त्यांनी सत्याग्रह केले. विमला मेलकोटे, तारा परांजपे, गीताबाई चारठाणकर, करुणा चौधरी इत्यादी महिला नेत्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आशीर्वादाने व उत्तेजनाने स्त्रियांना संघटित केले. सत्याग्रहात त्यांनी लाठ्या झेलल्या. गोळ्या खाल्ल्या. लता बोधनकर, हिंगोलीच्या सौ. वरुवले, सौ. गोगटे, परभणीच्या बकुळावाई पेडगावकर, सेलूच्या गीताबाई चारठाणकर, सौ. कुळकर्णी, प्रतिभा वैशंपायन, सुशिला दिवाण इत्यादी कार्यकर्त्यांचा, त्या, आपल्या घरात भूमिगतांना आश्रय देतात या सबबीवर पोलीस पिच्छा पुरवीत. 

25 ऑगस्ट 1947 ला बीड जिल्ह्यातील सर्व पुढाऱ्यांना हैद्राबाद संरक्षण कायद्याखाली अटक झाली. त्या सर्वांची विचारपूस करून त्यांना जेवण पोहोचविण्याचे काम स्त्रियांचा गट करीत असे. सुशिला भालेराव, कमल देशपांडे, आशा वाघमारे यांना रोज पोलिसस्टेशनवर हजेरी लावावी लागे. शहरातील कार्यकर्त्या दारुगोळ्याची ने-आण, बाँब ठेवण्यासाठी टेहळणी, भूमिगतांचे निरोप पोहोचविणे इत्यादी कामे करीत. शहरातील स्त्रिया पुढे आल्या तर खेड्यातील स्त्रिया कशा मागे राहतील? भूमिगतांना त्या शिताफीने अन्न पोहोचवीत. वडगावएकी तालुका-उदगीर येथील भूमिगतांना मदत करणाऱ्या 15  स्त्रियांची मालमत्ता सुटून त्यांची घरे रझाकारांनी जाळली. हैद्राबादच्या लढ्यात जिया आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे अशी महिला म्हणजे दगडाबाई देवराव पाटील धोपटेश्वरकर ऊर्फ वीर महिला दगडाबाई. 

औरंगाबाद जिल्ह्यात भोकरदन, सिल्लोड, कन्नड, पिशोर या भागा रोहिले, पठाण व अरब यांनी लुटालूट करणे, स्त्रिया भ्रष्ट करणे इत्यादी कृष्ण कृत्याद्वारे धिंगाणा घातला होता. भोकरदन तालुक्यातील टाकळी कोलत्याची या खेडेगावातील महिलांचा गट दगडाबाईंनी तयार केला. कांग्रेसच्या झेंड्याखाली संघटना तयार केली. 15 ऑंगस्ट 1947 ला मध्यरात्री स्वतः जाऊन घराघरावर तिरंगा लावला. संधी मिळताच घराघरावर तिरंगा लावण्याचे सत्र यापुढे तिने सातत्याने चालू ठेवले. त्यामुळे पाटील, पटवारी, पोलीस व जमीनदार हात धुवून तिच्या मागे लागते. म्हणून नाईलाजाने दगडाबाई सरहद्दीवरील खेड्यात जाऊन राहिली. तिथे राहून तिने लोकमत तयार केले. निजामविरोधी प्रचाराचा तिने सरहद्दीवर धुमधडाका उडविला. करोडगिरी चौक्या... पोलीस चौक्या... सरकारी जंगले तिने जाळली. होमगार्डचे शिक्षण तिने घेतले होते. होमगार्डच्या गणवेशातच ती घोड्यावरून फिरे ती स्वतः पिस्तुल व जांबिया थाळगत असे.. 

औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी हा 10/1 2 खेड्यांचा एक टापू आहे. तिथे रझाकार व नागरिक यांची लढाई झाली. 60/70 नागरिकांना 30*20 च्या खोलीत दोनतीन दिवस अन्नपाण्याविना रझाकारांनी कोंडून ठेवले, दगडाबाईने गवळणीच्या वेषात लाडसावंगी ते औरंगाबाद हे 25 मैलांचे अंतर रात्रीच्या काळोखात सोडून औरंगाबादच्या पोलीसठाण्यावर तक्रार नोंदविली. त्यानंतर सरकारी चाके फिरून हे नागरिक दोनतीन तासांतच सुटले वीर महिला दगडाबाई एक अशिक्षित ग्रामीण स्त्री. परंतु एखाद्या शूर शिपापालाही लाजवेल असा प्रतिकार तिने रझाकारांना केला. मराठवाड्यातील जनतेने वीर महिला ही पदवी देऊन दगडाबाईचा उचित गौरव केला. हैद्राबाद च्या मुक्तिसंग्रामातील कॉ. करुणा चौधरी, गीताबाई चारठाणकर, परंदाच्या माई कुळकर्णी व अष्ट्याच्या लीला कुळकर्णी यांचाही शासनाने गौरव केला आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात हुतात्मा झालेल्या 4/5 महिलांची नावे सापडतात. पूंजाबाई बुजर्गे ही रझाकारांच्या फौजेचा प्रतिकार करीत असता मारली गेली. स्वातंत्र्य सैनिकांना मदत करतात म्हणून पोसानीबाई राजलिंग व गंगाबाई लक्ष्मण यांची घरे लुटून त्यांना आत कोंडून रक्षाकारांनी घरे पेटवून दिली. त्यात त्या दोघींचा मृत्यू झाला. बाळूबाई पानसरे, लक्ष्मीबाई मयेकर य गोदावरी टेके या गोळीबारात हुतात्मा झल्या 15 ऑगस्ट 1947 ला स्त्री-पुरुषांच्या सहभागामुळे व त्यागामुळे मिळालेले स्वातंत्र्य अपूर्ण होते. पॉडेचेरी, दीव, दमण व गोवे हा प्रदेश अजून फ्रेंच व पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होता. इंग्रज चालते झाले. पण हे दोन युरोपीय देश सत्ता सोडून इथून गेले नाहीत. 1950 साली फ्रेंच लोक फारसा झगडा न करता गुपचूप निघून गेले. परंतु गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. या संघर्षातही भारतीय स्त्रिया मागे राहिल्या नाहीत. 

सत्याग्रही सहोदराबाईच्या देशाला गोळी लागली. काहीजणी आपली अजून अंगाखांद्यावर असणारी लहान मुले घेऊन गोव्याला सत्याग्रहासाठी गेल्या. त्यांच्या मुलांची व्यवस्था बघण्यास काही गृहिणी पुढे आल्या. सुधाताई जोशी, सिंधु देशपांडे यांना 12/12 वर्षांच्या शिक्षा झाल्या. 14/15 वर्षांच्या मुलींनाही 6-6 वर्षांच्या जबर शिक्षा झाल्या. काही जणींची लग्ने ठरली होती. आपण केव्हा सुटू किंवा कधीच सुटणार नाही याबद्दल त्यांना कल्पनाच करता येत नव्हती. आपत्ती लग्ने त्यांनी मोडून टाकली. आपल्याबरोबर त्या मुलाचेही या नाते संबंधामुळे पोर्तुगीज हाल करतील अशीही भीती त्या मुलींना वाटत होती. म्हणून ठरलेली लग्ने मोडून त्या नियोजित वरांचा मार्ग त्यांनी मोकळा केला. एकाच कोठडीत 20-25 मुलींना कोंडून ठेवले होते. त्यांना अगदी घाणेरड्या तांदळाचा भात व अगदी थोडेसे कालवण दिले जाई. 

कदान्न खाऊन त्या मुली आजारी पडल्या. त्यांना औषधोपधारही झाला नाही. सुधाताई जोशी यांनी तुरुंगात याकरता उपोषण आरंभले. भारताच्या लोकसभेचे त्यामुळे तिकडे लक्ष वेधले गेले पोर्तुगीज सरकारला स्त्री कैद्यांसंबंधीचे धोरण त्यामुळे बदलावेच लागले. सत्याग्रहात हातपाय तुटेपर्यंत मार फक्त गोव्याच्या मुलीनीच खाल्ला तुरुंगातील हाल अपेष्टांमुळे त्यांची प्रकृती ढासळली ती ढासळलीच त्यांनी परत उभारी धरलीच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्त्रिया गोवा सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आल्या. अर्थातच गोव्यातील मुलींची संख्या त्यांत जास्त असणे साहजिकच होते. त्या सर्वांच्या भगीरथ प्रयत्नाने भारताचे स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य झाले. भारतातील स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील सोन्याने लिहिलेले पान आहे. 

काँग्रेसने सुरू केलेल्या चळवळीत त्यापैकी अनेक हुतात्मा झाल्या. आझाद-हिंद फौजेत त्या कामी आल्या. मराठवाडा मुक्तिसंग्रामातही पाचसहा जणी हुतात्मा झाल्या. गोव्याच्या सत्याग्रही तर तुरुंगातील छळामुळे अर्धमेल्या झाल्या. हुतात्मा स्त्रियांची संख्या कमी असली तरी त्यांचे बलिदान त्यामुळे छोटे होत नाही. भारतात स्त्रियांसाठी राखून ठेवलेसे सर्व तुरुंग भरून गेले होते. त्यामुळे तुरुंगाशिवाय इतरत्रही त्यांना बंदोबस्तात ठेवले गेले. राणी झांशी पलटणीतल्या मुलींचे परदेशातील जीवन हे भारतीय मध्यमवर्गीय मुलींच्या मानाने कितीतरी सुखी होते. ब्रह्मदेशातील बहुसंख्य मुली तर कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यांनी कॉलेजे सोडली ऐशआरामी जीवनाचा त्याग केला. व लढाईत भाग घेतला. त्यांनी पैसाअडका दागदागिने फौजेला अर्पण केले. घरसंसार, शिक्षण या सर्वांचा त्याग करून देशासाठी बलिदान करायला त्या सिद्ध झाल्या. आपल्या या देश-विदेशातील भगिनींनी पुरुषांपेक्षा आम्ही कमी नाही, पण काकणभर सरसच आहोत हे सिद्ध केले. 

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सत्याग्रह केले.लाठया-गोळ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगसे, ज्यांना काही अडचणीमुळे घराबाहेर येता आले नाही त्यांनी पत्रकांच्या नकला केल्या निरोप पोहोचविले, भूमिगतांना लपविले सामग्री नेऊन पोहोचविली, गुप्त हेरगिरी केली. या देशाचे स्वातंत्र्य अशा ज्ञात व अज्ञात स्त्रियांच्या त्यागाच्या पायावर उभे राहिले. हे करत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर, सर्वांच्या हातांना काम, राहायला घर, शिक्षणाची सोय, आरोग्याची काळजी लोकांच्या हातांत राज्य असे भारताचे चित्र होते. स्वातंत्र्य सैनिकांपैकी फारच थोडे आज जिवंत आहेत. जे जिवंत आहेत त्यांना देशाचे त्यांच्या मनांतील चित्र काळवंडल्याबद्दल खूप दुःख होते. माणसाप्रमाणेच राष्ट्राच्याही जीवनात भले-वाईट दिवस येतात. त्यामुळे नाउमेद होण्याचे कारण नाही. आज देशात माजलेली ठोकशाही, महिलांवर होणारे अत्याचार, बोकाळलेला भ्रष्टाचाराचा दहशतवाद या सर्वांचा मोड करून स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांच्या स्वप्नातला भारत आपण उभा करणे हीच या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली होय.

Tags: सुभाषबाबू इंदिरा गांधी सरोजिनी नायडू फ्रेंच पोर्तुगीज गोवा हैद्राबाद बंगाल महात्मा गांधी भिकाजी रुस्तुम कामा राणी भीमाबाई राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्याचा लढा रोहिणी गवाणकर Subhashbabu Indira Gandhi French Portugij Goa Haidrabad Bangal Mahatma Gandhi Bhikaji Rustum kama rani Bhimabai Rani Lakshmibai War Of Indipendence Rohini Gawankar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Kishor Chaure- 27 Sep 2021

    Very informative information

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके