डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1986 साली आठव्या विधानसभेत ‘गर्भजलपरीक्षा’ हे खाजगी सदस्य बिल म्हणून मांडून त्यावर सरकारकडून बिल मांडून घेण्याचे काम मृणालने केले. आमदार श्याम वानखडे व शरयू ठाकूर यांनी साहाय्य केले. या वेळी मृणालने केलेले भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी झाले. सरकारनेही एक वर्षाच्या आत हे बिल सरकारी बिल म्हणून पास केले. हा कायदा करवून घेण्याचे श्रेय मृणालचे आहे. सर्व देशात तो कायदा आपल्या महाराष्ट्रात प्रथम झाला. गेल्या 15 वर्षांत त्या कायद्याला कसा तुडवलाय ते आपण पाहतोय. कायदा मदतरूप होतो, पण त्यासाठी समाजमानस तयार करणारे कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत हेच खरे.

22 जून 2012. माझ्या व मृणालच्या आयुष्यातील शेवटच्या भेटीचा दिवस! नेहमीप्रमाणे ही भेट काही तासांची नव्हती. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत अगदी सलग वेळ. दोन दिवसांनी येणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व तिच्या-माझ्या आयुष्यात काय काम यापुढे करता येईल याबद्दलही बोललो. निराशेचा सूर कुठेही नव्हता. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास विधानसभा ग्रंथालयाचे माजी ग्रंथपाल श्री.अ.सु.थोरात आले आणि मृणाल विधानसभेच्या आठवणीत अगदी रंगून गेली. त्यांच्या भेटीचा तिला अगदी मनापासून आनंद झाला होता. 

श्री.थोरात निघून गेल्यावर पुढचे आमचे बोलणे लोकप्रतिनिधी म्हणून तिने केलेल्या कामाबद्दल झाले. नुकतेच स्वातंत्र्य मिळाले व तिचे लग्न झाले. सर्वजण अजून स्वातंत्र्य चळवळीत व सेवादलाच्या कामातही चमकणाऱ्या मुली आता भराभर लग्न होऊन स्थिर जीवनाकडे वळल्या होत्या. काहींनी चळवळीतील जोडीदार निवडले होते. एकाने राजकीय काम करावे व दुसऱ्याने घर-संसार पहावा अशी वाटणी होत असे. मृणाल व बंडू त्याला अपवाद होते. बंडू गोरे, मधू लिमये, सदाशिव बागाईतकर, विनायक कुलकर्णी हे मृणाल व तिच्या आठ-दहा मित्र-मैत्रिणींनी सुरू केलेल्या ‘साथी-सहाध्यायी’ या मुंबई उपनगरातील अभ्यासगटाच्या संपर्कात आले. वसंत खानोलकर (मेधा पाटकरचे वडील), सदानंद वर्दे, दादा नाईक, आवाबेन हवेवाला, सुमन राव हे सर्व साथी वांद्रा ते सांताक्रूझ याच विभागातील- सगळे सेवादलाचे तरुण कार्यकर्ते. 

स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं होतं. स्वातंत्र्यात सेवादलाची भूमिका काय असावी, नवा देश घडविण्यासाठी कोणत्या मुद्यावर कार्यक्रम आखावेत, समाजशास्त्रीय दृष्टी कोणती असावी, धोरण म्हणजे काय या प्रश्नांचा अभ्यास त्यांनी उंबरगावी शिबिर घेऊन केला. त्यांचे विचारमंथन त्यांनी एस.एम.जोशी व सेवादल समितीसमोर मांडले. ते मान्य झाले नाही. तेव्हा तरुण तुर्कांनी आपल्या विचारानेच पुढे जायचे ठरविले. हा क्रियाशील गट व सेवादलाची मुख्य धारा यांच्यामध्ये थोडा दुरावा निर्माण झाला. मृणालने यातून आपला मार्ग निवडला. खार ते चेंबूर विभागात तिने प्रौढ शाखा सुरू केल्या. त्यात प्रौढ स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. त्या वेळचा मृणालचा कार्यक्रम म्हणजे एका बाजूला सेवादलाची संघटना आपल्या विचाराप्रमाणे बांधायची व दुसऱ्या बाजूला राजकीय घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी बौद्धिक सत्रे घडवायची असा होता. 

हे काम सुरू झाल्यावर मृणालला आपले वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन पूर्णवेळ हेच काम करावे असे वाटले. आणि एके दिवशी आपला कॉलेज सोडण्याचा निर्धार तिने जाहीर केला. सगळे मोहिले कुटुंब हादरले. बंडू गोरेंच्या व तिच्या मैत्रीबद्दल घरात कळल्यामुळे त्याच्यामुळेच तिने हा निर्णय घेतला असे मोहिले कुटुंबाला वाटले, पण बंडूनांही तिच्या निर्णयाने धक्का बसला! आपल्याशी याबाबत आपल्या प्रेयसीने काहीही चर्चा केली नाही याचे त्यांना दु:ख झाले. मृणालचा हा निर्णय त्यांना दुर्दैवी वाटला. 
एकदा विचार करून एखादा निर्णय घेतला की त्याचे चांगले फळ मिळविण्यासाठी त्यावर तुटून पडायचे हा तिचा गुण पहिल्यांदाच लक्षात आला. 

बंडू गोरेंची प्रकृती, पक्षाचे सर्ववेळ सेवक म्हणून मिळणारे अत्यंत अल्प मानधन, दोघांमधलं दहा वर्षांचं अंतर यामुळे वडीलधारे त्यांच्या लग्नाबाबत नाखूष होते. मृणालचा बंडूशी लग्न करण्याचा निर्धार अगदी पक्का होता. भौतिक सुखसोयींत तिचे मन रमत नव्हते. तिला समाज व राजकारणाची ओढ होती. आपल्या विचारांना खतपाणी घालणारा जोडीदार हा बंडूशिवाय कोणी असूच शकत नाही. वडीलधाऱ्यांची नाराजी, ओढघस्तीचा संसार हे सगळे अडथळे पार करून तिने आपल्या मनाचा कौल मानला. 

पुढच्या आयुष्यातही तिचा हाच स्वभाव तिच्या प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत मला जाणवला. आमच्या मैत्रीला सुरुवात यापूर्वीच झाली होती. बंडू उदारमतवादी होते. पण त्यातही त्यांचे वेगळेपण मृणालला जाणवले ते त्यांच्या मनात असलेली स्त्रियांच्या परिस्थितीबद्दलची अपार सहानुभूती व त्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन ते सोडविण्यासाठी त्यांना लागलेली आच. 

आपल्या इतर काही सामाजिक कार्यातील मैत्रिणींप्रमाणे आपणही नोकरी करावी, घर चालवता चालवता कामही करावे असे तिला वाटणे स्वाभाविक होते. पण बंडूंनी लग्न केले होते ते बायकोने तडजोडीने आपला संसारगाडा ओढावा म्हणून नव्हे तर तिने एक स्त्री म्हणून स्वतंत्र विचाराने वागावे म्हणून ‘माझ्या कामात मला फक्त मदत नको, तुझा आत्मा हवा.’ असा त्यांचा आग्रह होता. मृणालने सेवादल पक्षाच्या बैठका व घरकाम करून फक्त संसार एके संसार करू नये, तर स्त्रियांमध्ये काम करून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवावे आणि म्हणूनच मृणालने महिला मंडळापासून कामाला सुरुवात करावी. महिलांची प्रगती होईल असे कार्यक्रम द्यावे असे बंडू गोरे यांना वाटे. त्याचसाठी सार्वजनिक कामातील शिस्तीचे धडेही त्यांनी तिला दिले. 

सार्वजनिक कार्यकर्ता स्वच्छ चारित्र्याचा व पारदर्शी कारभार करणारा असावा. आपण अचानक मेलो तर लगेच कार्यकर्त्यांना सगळा हिशोब मिळाला पाहिजे. याकरता रोजचे काम रोज झाले पाहिजे ही शिस्तही मृणालला लागली. मृणालच्या सामाजिक कार्याला मार्गदर्शन, प्रेरणा व शिस्त देणारा गुरू म्हणजे बंडू. त्यांच्याच आग्रहाने तिने ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. अंजू अगदी लहान होती व अशा वेळी ग्रामपंचायतीत इतका वेळ देणे मृणालला शक्य नव्हते, म्हणून अंजूची जबाबदारी स्वत:वर घेऊन तिला निवडणूक लढविणे त्यांनी भाग पाडले. 

त्यापूर्वीच घरात गोरेगाव महिला मंडळाचे काम सुरू झाले होते. ग्रंथालय, शिवणक्लास, भजनी मंडळ, खाद्यपदार्थ स्पर्धा यांत बायका रमतात, म्हणून ते चालू ठेवले तर त्यातूनच बायकांचे संघटन होऊ शकते असे मृणालला वाटले. म्हणून महिला मंडळात सांस्कृतिक कार्यक्रम घडवून त्यांचा कामासाठी एकत्र आणण्यासाठी उपयोग करून घेणे हे मृणालला गरजेचे वाटले. 

परिवार नियोजन हे नाव त्या वेळी मोठे परिचित नव्हते. सहसा स्त्रिया पुरुष डॉक्टरकडून तपासून घ्यायला तयार नसत. त्यांची मानसिकता तयार करण्याचे काम गोरेगाव महिला मंडळाद्वारे मृणालने केले. ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत आरोग्य मंदिर सुरू झाले होते. त्याच्या वर्धापनदिनी त्या काळच्या मान्यवर डॉ.जिराड यांनी या कामाचे अत्यंत कौतुक केले होते. 

संपत्ती व वारसाविषयक व वैवाहिक संबंधातील स्त्रियांच्या वादांकरता न्याय मिळवून देण्यासाठी ‘स्वाधार’ या संस्थेची स्थापना मृणालने केली. ‘स्वाधार’च्या सदस्या स्त्रियांवरील अत्याचारां- विरोधात कायम उभ्या असतात. मग ते जळगावचे वासनकांड असो की सावंतवाडीतील अत्याचार असोत वा भंवरीदेवीवरील बलात्कार असो. 

मोठमोठे कार्यक्रम आखून लोकांचे व वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेण्यापेक्षा घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचे अवलोकन करून न्याय मिळवून द्यावा ही मृणालची स्वाधारला शिकवण आहे.  संस्थेचे जेव्हा उत्तम चालू लागते, तिचे नाव होते व नेत्याची कोणत्याही कारणाने त्यावरची पकड ढिली होते त्या वेळी सुरुवातीची शिस्त, खेळीमेळी गळून केव्हा पडते ते कळत नाही. तो अनुभव मृणाललाही आला, हे तिच्या बोलण्यातून सुचवले जाते की काय अशी शंका मला येते. अशा सर्व महिला संघटनांतून जाणूनबुजून नेतृत्वाचे पैलू असणाऱ्या स्त्रिया निवडून काढून त्यांना कामातून प्रशिक्षण दिले पाहिजे, या गोष्टीकडे तिचे दुर्लक्ष झाले हे ती आजकाल आमच्याशी बोलताना बोलून दाखवीत असे. 

कार्यक्रमाचा अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्यांची निवड करताना दूरदर्शन किंवा चित्रपट अभिनेत्रीच्या नावाचा आग्रह धरला जात असे त्या वेळी मृणालला वेदना होत. स्मिता पाटील, शबाना आझमी अशा सामाजिक बांधलकी मानणाऱ्या स्त्रियांच्याबद्दल तिचा आक्षेप नसे. दूरदर्शनवर ‘चार दिवस सासूचे’सारखी निरर्थक मालिका वर्षानुवर्षे चालू शकते याचे तिला आश्चर्य वाटे. अंधश्रद्धेवर आधारलेली भाग्यलक्ष्मीसारखी मालिका पाहून स्त्रिया विरोधात उभ्या राहत नाहीत याचेही तिला दु:ख होते. 

आमच्यातून या सर्वांविरुद्ध लढणारी पिढी का निर्माण झाली नाही, की आम्हीच त्यांना लहानसहान समजून बाजूला ठेवले? असे प्रश्न मला नेहमी पडत. मृणालबरोबर चर्चाही होई. जग आपल्या कल्पनेपेक्षा झपाट्याने बदलतंय असे ती म्हणे. पण मला जाणवे की ती स्वत:च या उत्तराच्या शोधात असावी.  सामाजिक कार्यातील तिची आणखी दोन महत्त्वाची कामे म्हणजे नागरी निवारा. शासन घराच्या प्रश्नाचे उग्र स्वरूप समजून घेत नाही याबद्दल अजूनही तिला खेद वाटत असे. झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यासाठी 180 फूट जागा मिळे. त्यात कुटुंब राहू शकत नसे. त्यामुळे सर्व सोयींनी युक्त घरे लोकांना देण्यासाठी तिने वसंतदादा पाटील या मुख्यमंत्र्यांकडून भूखंड मिळवून नागरी निवाऱ्याची निर्मिती केली. वसंतदादांचा जमीन देण्याचा निर्णय पुढच्या मंत्र्यांनी धुडकावून लावला. त्यासाठी मृणाल व तिच्या सहकाऱ्यांनी उपोषण केले. आज दिंडोशीला (गोरेगावचा एक भाग) नागरी निवारा दिमाखात उभा आहे. ती एक जणू टाऊनशिप कॉलनीच झाली आहे. त्यासाठी 10 वर्षे मृणालची अखंड धडपड होती. 

हिंद महिला समाजात ‘स्त्रियांच्या चळवळी’ या विषयावर प्रमिलातार्इंचे भाषण झाले. आपल्या भाषणात प्रमिलातार्इंनी महागाईच्या प्रश्नाला सामाजिक बाजूही आहे, म्हणून रोज एका महिला मंडळाने सत्याग्रह केला तर महागाईचा प्रश्न बिगरराजकीय होईल असा विचार मांडला होता. या विचारावर सर्व महिला संस्था एकत्र आल्या व त्यांनी ‘महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती’ स्थापन केली. मृणालला त्याची अध्यक्ष निवडले. या समितीच्या आंदोलनाच्या यशाबद्दल नव्याने काही सांगायची गरज नाही. मृणाल या वेळी विधानसभा सदस्य होती. बाहेरील आवाज ती सभागृहात  पोहोचवीत होती. आपल्या सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर मंत्र्यांच्या भेटी घडवून आणणे हे तिला त्यामुळे शक्य झाले. 

दारूमुक्तीचा प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न व त्यासाठी केलेली आंदोलने याबद्दलही मी नव्याने सांगण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविका संघटनेचे अध्यक्षपद तिने घेतले, त्यावेळी तिची व माझी पाच मिनिटे गरमागरमी झाली. तिच्या राजकीय भूमिकेला व कामाला महत्त्व आहे. त्या कामाकडे सर्व महाराष्ट्र काही अपेक्षेने पहातो व स्त्रीचळवळही पाहाते तेव्हा तेथील लक्ष थोडेही बाजूला होऊ नये. जबाबदारीच्या जागा घेतल्या की किती नाही म्हटले तरी ते होणार. म्हणून तिने हे पद घेतले ते मला आवडले नाही.

मृणालचे म्हणणे असे की, ‘काही माणसांच्या भोवती समाजाने व कार्यकर्त्यांनी एक वलय निर्माण केलेले असते. सामान्य माणसांना महिनोन्‌हिने साधी 10 मिनिटांची भेटही न देणारे मंत्री, अधिकारी केवळ माझ्या नावाचा उपयोग झाल्यामुळे भेट देतात. मी त्यांना घेऊन जाते, विषय मांडायची तयारी त्यांच्याकडून करून घेते, त्यांना आपली बाजू मांडायला सांगते व जरूर तेव्हाच मधे बोलते. असे केल्याशिवाय त्या बायकांचा आत्मविश्वास व कामाशी निष्ठा वाढणार नाहीत. मी त्यांना या विषयावरची पुस्तके वाचायला सांगते. एक तर त्या वाचत नाहीत, नाही तर वरवर वाचतात. कोणत्याही गोष्टीत सहभाग घ्यायचा असला तर वाचनासारखा गुरू नाही. माझ्याबरोबर सामाजिक कार्यात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी हे सर्व सातत्याने सांगते, पण दहांतील एखादी वाचते. 

मृणालची लोकप्रतिनिधी म्हणून कारकीर्द गोरेगाव ग्रामपंचायतीपासून सुरू झाली. ग्रामपंचायत ते लोकसभा हा तिचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास. जसजसे काम वाढू लागले तसतसे वाचन कमी होऊ लागले. बाबूराव सामंत यांचा मृणालच्या यशात तिच्याइतकाच वाटा आहे. विधानसभेतील अंतुले प्रकरण हे त्याचे मोठेच उदाहरण. इतरही कार्यकर्ते गावोगावाहून माहिती पाठवीत. गोरेगावच्या समाजवादी गटाबरोबर वारंवार चर्चा करणे, माहितीची टाचणे करून घेणे व पुढे त्याला धरून तयारी करून घेणे. 

मुळात लोकप्रतिनिधीला लोकांच्या प्रश्नांशी भिडण्याची पोटतिडीक असली पाहिजे. विरोधी पक्षात स्वत:ला सिद्ध करायची संधी असते, पण भोवती तसेच कडवे कार्यकर्ते लागतात. तेव्हा प्रतिभा पाटीलही विरोधी पक्ष पुढारी होत्या, पण हे पद गाजवले ते मृणालने. आणीबाणीत मृणाल जेलमध्ये होती. तिला गर्भलिंग चाचणीबद्दलच्या कायद्यासंबंधी टिपण तयार करून पाठवायचे होते. या विषयावरची पुस्तकं मी तिला पाठवावी असा तिने मला निरोप दिला. मी पुस्तकं पाठविली तर मी व ती ग्रंथालये अडचणीत येतील असे कळल्यामुळे मी ती पाठवू नये असे ठरले, पण विधानसभेच्या ग्रंथालयातून ती पाठवता आली व मृणालने त्याचा अभ्यास करून जवळजवळ 100 पानांचे टिपण सरकारकडे पाठवले. 

1986 साली आठव्या विधानसभेत ‘गर्भजलपरीक्षा’ हे खाजगी सदस्य बिल म्हणून मांडून त्यावर सरकारकडून बिल मांडून घेण्याचे काम मृणालने केले. आमदार श्याम वानखडे व शरयू ठाकूर यांनी साहाय्य केले. या वेळी मृणालने केलेले भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी झाले. सरकारनेही एक वर्षाच्या आत हे बिल सरकारी बिल म्हणून पास केले. हा कायदा करवून घेण्याचे श्रेय मृणालचे आहे. सर्व देशात तो कायदा आपल्या महाराष्ट्रात प्रथम झाला. गेल्या 15 वर्षांत त्या कायद्याला कसा तुडवलाय ते आपण पाहतोय. कायदा मदतरूप होतो, पण त्यासाठी समाजमानस तयार करणारे कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत हेच खरे.

मृणालने मांडलेली लक्षवेधी सूचना किंवा अर्ध्या तासाची चर्चा ही सरकारी बाकावरील लोकांची डोकेदुखी होती. कारण तिची मांडणी कार्यकर्त्यांच्या फक्त खबरीवर अवलंबून नसून जरूर तिथे घटनास्थळाला स्वत: भेटून गोळा केलेली असे व म्हणून ती विश्वासार्ह असे. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी स्पीकर बॅ.वानखडे मृणालचे मत विचारात घेत. सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून ते सभागृहात मृणालला ‘मृणाल’ असे संबोधायचे.

मृणाल एक शेजारी, मैत्रीण, नेता, अभ्यासक या सर्व दृष्टींतून मला भावली. तिचे व माझे मैत्र चांगले जमले. मी खूप बोलकी तर तरुणपणापासूनच मृणाल विचारपूर्वक वाक्य बोलणारी. आता सणवार पूर्वीसारखे साजरे होत नाहीत, म्हणून पारंपरिक पदार्थ घरात होत नाहीत, याचा खेद करणारी. संसार सुरू झाला तेव्हा कोणालाही जेवायला बोलवायचे नाही हा नियम. बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना मात्र जेवल्याशिवाय पाठवत नसे. स्वयंपाक करणे तिला आवडायचे. कॅरॅल पुडिंग ती छान करायची. नातवंडे त्यासाठी तिच्याकडे हट्ट करीत. 

गेली 25-30 वर्षे स्वयंपाकाला बाई होती, पण तिने ते कसे करायला हवे त्याच्या सर्व सूचना मृणाल तिला देई. त्यामुळे अंजलीही सुग्रण झाली. पुरणपोळ्या खाव्या तर अंजूच्या हातच्या असे ती म्हणे. मृणाल आपले सामान्य गृहिणीपण कधीच विसरली नाही. आईची जबाबदारीही तिने कधी टाळली नाही. सासर-माहेरचे बिघडलेले संबंध, पण शेवटी सर्वांचेच प्रेम लग्नापासून अवघ्या काही वर्षांत संपादन केले. आजूबाजूचे कार्यकर्ते, शेजारी, मैत्रिणी यांच्यावर अखंड आपुलकीचा वर्षाव केला.

‘अगं वेळ कुठे आहे, हे बायकांचे पालुपद तिला आवडत नसे.’ वेळ शोधून काढावा लागतो असे ती म्हणे. महानगरपालिकेत मराठी भाषेतून कामकाज चालावे असा ठराव पास करून घेणारी, महिलांसाठी बसमध्ये आरक्षण, गाडीचा स्वतंत्र डबा, गर्भजलपरीक्षा अशा अनेक गोष्टी करणारी मृणाल गोरे ही एका सामान्य मध्यमवर्गीय घरातली एक असामान्य महाराष्ट्रकन्या होती. 1977 ला तिच्या प्रचार सभेत पु.ल.देशपांडे म्हणाले होते, ‘मृणाल गोरे इथे राहते म्हणून तुमच्या गावाचे नाव गोरेगाव.’ यापेक्षा अधिक सन्मान तो कोणता? 

Tags: महानगरपालिका गर्भजलपरीक्षा विधानसभा गोरेगाव मृणाल गोरे Municipal Corporation Garbhajal Pariksha Vidhan Sabha Goregaon Mrinal Gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके