डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ड्रीमरनर : ऑस्कर पिस्टोरिअसची ‘धावती कहाणी’

कोर्ट ऑफ आर्बिटरेशन इन स्पोर्टस्‌नं ऐतिहासिक अंतिम निर्णय जाहीर केला तो दिवस होता- 16 मे 2008. त्यांनी सांगितलं ‘प्रॉस्थेसिसमुळं ऑस्करला कोणताही विशेष तांत्रिक फायदा मिळतोय असं दिसत नाही. प्रॉस्थेसिसमुळं मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा त्याच्या वापरानं सोसावे लागणारे तोटे किंवा सोसाव्या लागणाऱ्या अडचणी केव्हाही अधिक आहेत. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलिटक्स फेडरेशन्स (आय.ए.ए.एफ.)नं ऑस्करवर लादलेले निर्बंध हे निरर्थक असल्यामुळं रद्द करण्यात यावेत व (आणि) ऑस्कर यापुढे कोठेही खेळण्यास मुक्त आहे.’

ऑस्करच्याच नव्हे तर इतरांच्याही दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा होता.

याबाबत बोलताना ऑस्कर म्हणतो, ‘मला कधीच कोणत्याही प्रकारे मी विकलांग आहे किंवा वेगळा आहे अशी भावना आली नव्हती. मात्र स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबद्दल माझ्यावर बंदी लादली गेली आणि कधीच मनात न उमटलेली विकलांगतेची ही भावना मनात जागी झाली.

‘‘खेळांमधून आपण सगळ्यांत महत्त्वाची एक गोष्ट शिकतो, विनम्रता! आणि विशेषत: प्रचंड सामाजिक, आर्थिक तफावत व जातीय भेदाभेदांचा इतिहास असणाऱ्या देशांबाबतीत तर खेळांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. खेळ ही एकच अशी गोष्ट आहे जी असली सर्व बंधनं झुगारून टाकते.’’ ऑस्कर पिस्टोरिअस या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचं हे मत, स्वानुभवातून आलेलं.

खेळ व्यक्तीमध्ये काय बदल घडवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्कर पिस्टोरिअस. या खेळाडूच्या ‘ड्रीमरनर’ या पुस्तकाचा सोनाली नवांगुळ यांनी केलेला अनुवाद नुकताच वाचला.

अनेक कारणांसाठी हे पुस्तक मला आवडलं. खेळाबद्दल तर ते आपल्याला जागरूक करतंच, पण त्याचबरोबर माणूस म्हणून स्वत:कडे, इतरांकडे आणि आपल्या कुटुंबाकडे, मित्रमंडळींकडे, देशाकडे, जगाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन ते आपल्याला देतं.

ऑस्कर पिस्टोरिअसला त्याच्या जगण्यातून, खेळातून गवसलेलं जीवनाबाबतचं आकलन म्हणूनच त्याच्यापुरतं मर्यादित न राहता ते प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायी ठरतं.

22 नोव्हेंबर 1986 या दिवशी जोहान्सबर्ग येथील सँडस्टोन क्लिनिकमध्ये जन्माला आलेल्या ऑस्करचा जीवनप्रवास सुरू होतो तो एका महत्त्वाच्या घटनेनं.

जन्मत:च त्याचे पाय थोडे वेगळे आहेत. वेगळे आहेत, दोषपूर्ण नव्हेत असं त्याच्या वडिलांच्या लक्षात येतं आणि त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी या घटनेचा केलेला स्वीकार, घेतलेले विचारपूर्वक निर्णय, ऑस्करचं संगोपन, त्याचं शिक्षण, रग्बीकडून त्याचा धावणे या क्रीडा प्रकारात प्रवेश, प्रॉस्थेसिसमुळं त्याला काही विशेष लाभ होतो का यासाठी त्याने दिलेला कायदेशीर लढा, बीजिंग पॅरॉलिम्पिक्समध्ये धावण्याच्या शर्यतीत त्यानं मिळवलेली तीन सुवर्णपदकं आणि लंडन ऑलिम्पिकसाठी धावपटूंच्या सर्वसाधारण संघात त्याचा झालेला समावेश ही त्याची ‘धावती कहाणी’ मुळातूनच वाचण्यासारखी.

लंडन इथं 2012 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक्स आणि पॅरॉलिंपिक्समध्ये एकाच वर्षी धावण्याची कामगिरी करून दाखवण्याच्या ऑस्करच्या स्वप्नांची परिपूर्ती होणार हे निश्चित झालं.

दोन्ही पायांविना ह्या दोन्ही स्पर्धांत धावण्यासाठी एखाद्या धावपटूची निवड होणं हाही एक वेगळा विश्वविक्रमच! इथं हे पुस्तक संपतं.

या पुस्तकातून काही मूल्यं रुजवायचा प्रयत्न झालाय आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. यातला आई-वडिलांचा विकलांग मुलाकडे बघतानाचा दृष्टिकोन, ऑस्करला प्रॉस्थेसिस- कृत्रिम पाय बसवायच्या आधी त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, घेतलेला तज्ज्ञांचा सल्ला, मुलापासून आजार न लपवणं हे एक नवा वस्तुपाठ घालून देतात.

ऑस्करचे वडील त्यांनी मुलाला लिहिलेल्या पत्रात एके ठिकाणी म्हणतात- ‘‘हा सगळाच प्रश्न ॲटिट्यूडचा आहे... मनोदृष्टीचा आहे.’’ (मनोदृष्टी हा शब्द अनुवादकाने (अनुवादकर्त्रीने) चांगला वापरला आहे.)

ते पुढे म्हणतात, ‘‘मला वाटतं ॲम्प्युटेशनच्या प्रत्यक्ष अनुभवातून जाणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनोदृष्टीपेक्षा त्यांच्या पालकांच्या मनोदृष्टीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. ते आपल्या अशा मुला-मुलींशी कशा प्रकारे वागतात यानं खूप फरक पडतो. अनेकदा पालकांच्या वागणुकीतूनच अडचणी निर्माण होतात.’’  ऑस्करच्या पालकांनी त्याची नुसती काळजी केली नाही तर काळजी घेतली आणि कुठेही त्याला जास्त जपलं नाही. त्यामुळे ऑस्करला आपण काही वेगळे आहोत असं कधी वाटलं नाही आणि त्यानं बालपण मनमुरादपणे अनुभवलं.

प्रिटोरिया बॉईज हायस्कूल या निवासी शाळेमध्ये स्वतंत्र राहणं, शाळेतील खेळाचं महत्त्व, शाळेची शिस्त आणि त्यातून आयुष्यातील संकटांना तोंड देण्याची ऑस्करमध्ये आलेली ताकद. हे सगळंच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होण्यासाठी त्याला उपयुक्त ठरलं.

या शाळेतच त्याची ॲथलेटिक्समधली रुची (आवड) वाढत गेली. ‘धावणं’ हेच आपलं निधान आहे हे त्याला कळलं. ‘‘मी पॅरॉलिंपिक्सचा खेळाडू नाही, मी ऑलिंपिक्सचाही खेळाडू नाही. मी निव्वळ खेळाडू आहे... धावपटू आहे!’’ हे सिद्ध करण्यासाठी ऑस्करला खूप झगडावं लागलं.

आईचा मृत्यू, प्रेमभंग, खेळातले ताणतणाव, वारंवार बदलावे लागणारे प्रॉस्थेसिस त्यामुळं होणारा त्रास हे सगळं त्यानं कसं पेललं आणि लहान वयात स्वत:चं व्यक्तिमत्त्व कसं घडवलं हे वाचून आपण थक्क होतो.

ऑस्कर किती समजूतदार आहे हे त्याच्या काही मतांमधून व्यक्त होतं.

तो म्हणतो, ‘‘मी निवडलेल्या क्षेत्रात प्रसारमाध्यमांकडे प्रोत्साहन किंवा उत्तेजन मिळवण्याचा मार्ग म्हणून पाहता येत नाही. प्रसिद्धी हा माझ्या खेळाचा हेतू नव्हे. प्रशिक्षण व ठरवलेल्या लक्ष्यावर एकाग्रता हे खेळाडूसाठी जास्त महत्त्वाचं ठरायला हवं.’’ त्याचं आणि भावाचं नातं, कौटुंबिक आठवणी, आईनं, वडिलांनी, भावानं त्याला लिहिलेली पत्रं, यातून व्यक्तीच्या वाढीसाठी कुटुंब किती महत्त्वाची भूमिका बजावतं हे दिसून येतं.

कोर्ट ऑफ आर्बिटरेशन इन स्पोर्टस्‌नं ऐतिहासिक अंतिम निर्णय जाहीर केला तो दिवस होता- 16 मे 2008. त्यांनी सांगितलं ‘प्रॉस्थेसिसमुळं ऑस्करला कोणताही विशेष तांत्रिक फायदा मिळतोय असं दिसत नाही. प्रॉस्थेसिसमुळं मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा त्याच्या वापरानं सोसावे लागणारे तोटे किंवा सोसाव्या लागणाऱ्या अडचणी केव्हाही अधिक आहेत. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलिटिक्स फेडरेशन्स (आय.ए.ए.एफ.)नं ऑस्करवर लादलेले निर्बंध हे निरर्थक असल्यामुळे रद्द करण्यात यावेत व (आणि) ऑस्कर यापुढे कोठेही खेळण्यास मुक्त आहे.’ ऑस्करच्याच नव्हे तर इतरांच्याही दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा होता.

याबाबत बोलताना ऑस्कर म्हणतो, ‘मला कधीच कोणत्याही प्रकारे मी विकलांग आहे किंवा वेगळा आहे अशी भावना आली नव्हती. मात्र स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबद्दल माझ्यावर बंदी लादली गेली आणि कधीच मनात न उमटलेली विकलांगतेची ही भावना मनात जागी झाली. माझ्या या धडपडीनं इतर लोकांना आज किंवा भविष्यात थोडी मदत मिळेल किंवा येणाऱ्या काळात कदाचित माझ्यासाठीच सगळे वेगळे होऊन गेलेलं असेल. ऑस्करची प्रत्येक स्पर्धेच्या क्षणी होणारी मन:स्थिती, त्या वेळचं आजूबाजूचं वातावरण हे चांगल्या पद्धतीनं अनुवादातून व्यक्त झालं आहे. काही वेळा आपणही त्याच्याबरोबर मैदानावर आहोत, आणि ती उत्कंठा अनुभवत आहोत असं वाटतं.

मी आधी लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक जी मूल्यं देतं, त्यात ऑस्करच्या सामाजिक जाणीवेचा आणि तो करीत असलेल्या सामाजिक कार्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ‘इंटरनॅशनल इन्स्पिरेशन’ या युनिसेफच्या उपक्रमात ऑस्कर सहभागी झाला आहे. जगभरात पसरलेल्या तरुणाईपर्यंत पोहोचून खेळांमधल्या असामान्य ताकदीनं त्यांना जोडून घेणं आणि त्या शक्तीचा उपयोग लहान मुलाचं जगणं समृद्ध करण्यासाठी करणं, असा (या) उपक्रमाचा उद्देश आहे.

याशिवाय 2012 हे वर्ष संपता संपता तो आणि इतर काहीजण एक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) सुरू करणार आहेत. एका संस्थेबरोबर ते सध्या कृत्रिम पाय विकसित करण्याचं काम करीत आहेत. असे पाय बनवून जेव्हा ते सगळ्यांसमोर आणतील तेव्हा त्याचं महत्त्व सिद्ध होईल, असंही ऑस्कर सांगतो.

याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या अशा भूसुरुंगमुक्तीच्या उपक्रमात तो सहभागी झाला आहे. जगभरातील वेगवेगळे भूप्रदेश भूसुरुंगमुक्त बनवण्याच्या आणि भूसुरुंगाचे बळी ठरलेल्यांना मदत करण्याच्या मोहिमेत ऑस्करनं आपला वाटा उचलला आहे.

तर, असा हा ऑस्कर पिस्टोरिअस! एक चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व. संपूर्ण पुस्तक वाचताना तो विकलांग आहे, हे लक्षात येत नाही.

या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सोनाली नवांगुळ यांनी. त्यांनीही स्वत:च्या विकलांगतेवर मोठ्या हिमतीने मात केली आहे. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाचा अनुवाद करणं याला विशेष महत्त्व आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी ऑस्करला लिहिलेले पत्र आहे. त्या पत्रात त्या स्वत:चा उद्देश स्पष्ट करताना म्हणतात, ‘छोट्या-मोठ्या अपंगत्वामुळे, टोकाच्या नैराश्याने अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत जगणाऱ्यांना काही नवी उमेद मिळावी यासाठी तुझी खरीखुरी कथा सांगणारं हे पुस्तक मराठी भाषेत यायला हवं असं मला मनापासून वाटतं आहे. हे काम माझ्या हातून झालं तर माझ्याही मनाची उमेद वाढणार आहे.’’

खरंच हे पुस्तक मराठीत आणून त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आहे. केवळ अपंगांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी- ज्यांच्यात काही ना काही गंड असतात, त्यावर विजय मिळवायची प्रेरणा हे पुस्तक देतं.

मनानं कणखर बनू पाहणाऱ्या प्रत्येकाला ते नवी उमेद देतं. त्याबद्दल सोनाली नवांगुळ यांचे मन:पूर्वक अभिनंदन; आणि आभार.

ड्रीमरनर (ऑस्कर पिस्टोरिअस)

सहलेखक : गियान्नी मेरलो

अनुवाद : सोनाली नवांगुळ.

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे.

मूल्य : 170 रुपये   

Tags: सोनाली नवांगुळ खेळाडू ऑलिंपिक्स पॅरॉलिंपिक्स विकलांग ऑस्कर पिस्टोरिअस Sonali Nawangul Athletes Olympics Paralympics Handicapped Oscar Pistorius weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके