डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'विश्वंभरे बोलविले': मानवी मनाच्या सूक्ष्म पदरांचा प्रत्यय देणारी कादंबरी

'विश्वंभरे बोलविले' या कादंबरीला आकर्षक अशी एक गोष्ट आहे. विश्वंभर हा या कादंबरीचा नायक. तोरणे गावातील पेशव्यांच्या राधा-कृष्ण मंदिराचा पुजारी. साधा, सरळ, निष्कपट स्वभावाचा, पापभीरू विश्वंभर आपले पूर्वापार चालत आलेले काम श्रद्धेने आणि मनापासून करी, लोक आपला आदर करतात या भावनेने तो स्वत:वरच खूष असे. मिळेल त्यात समाधानाने जगणाऱ्या विश्वभरला 'अंबू' नावाची सुंदर, सच्छील पत्नी होती व सुरेश नावाचा चुणचुणीत हुषार मुलगा होता.

देव आहे की नाही? नीती म्हणजे काय? मृत्यू होतो म्हणजे काय? हे सारे तत्त्वज्ञानाने विचारात घ्यावयाचे आणि सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे प्रश्न आहेत. तत्त्वज्ञानातील अशा उलगड्याचे स्वरूप तार्किक असते. त्यामुळे त्याची उत्तरे स्पष्टपणे देता येणे संभवनीय असते, परंतु प्रत्यक्ष जीवनव्यवहारात, माणसांच्या परस्परांशी घडलेल्या वर्तनातून, भोवतालच्या परिस्थितीला माणसांनी दिलेल्या भल्या-बुऱ्या प्रतिसादातून जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात, त्यातून त्यांच्या मनात जेव्हा विचारांचे भोवरे तयार होतात, तेव्हा त्यांचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे होते. मानवी मनातील विचार-भावनांची ही गुंतागुंत 'विश्वंभरे बोलविले' या कादंबरीत प्रत्ययकारी रीतीने प्रकटली आहे.

स्वत:च्या जगण्या-वागण्याबद्दलच्या व्यक्तीच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातील जगणे-वागणे यांतील अंतर आणि ताण यातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडत असते. सतत बदलत राहणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीमुळे या व्यक्तिमत्त्वाला कंगोरे निर्माण होतात तर कधी स्व-स्वरूपाचे भान येते. व्यक्तिमत्त्वाच्या या घडण्या-बिघडण्याचे चित्रण या कादंबरीत आहे आणि त्याचबरोबर श्रद्धा, प्रेम, असूया, स्वार्थ, राग, लोभ, भय, देशभक्ती अशा अनेक भाव-भावनांनी युक्त असलेल्या माणसांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे चित्र या कादंबरीत ठसठशीतपणे उमटले आहे. 

'विश्वंभरे बोलविले' या कादंबरीला आकर्षक अशी एक गोष्ट आहे. विश्वंभर हा या कादंबरीचा नायक. तोरणे गावातील पेशव्यांच्या राधा-कृष्ण मंदिराचा पुजारी. साधा, सरळ, निष्कपट स्वभावाचा, पापभीरू विश्वंभर आपले पूर्वापार चालत आलेले काम श्रद्धेने आणि मनापासून करी, लोक आपला आदर करतात या भावनेने तो स्वत:वरच खूष असे. मिळेल त्यात समाधानाने जगणाऱ्या विश्वभरला 'अंबू' नावाची सुंदर, सच्छील पत्नी होती व सुरेश नावाचा चुणचुणीत हुषार मुलगा होता. त्याचा संसार सुखाचा चालला होता. या सुखाच्या संसारात अचानक एक वादळ उठते. गावातला उनाड, लफंगा तरुण विष्णू वारंवार देवळात येऊन बसू लागतो. विश्वंभरच्या घरी जाऊ लागतो, थोडे जाणे- येणे सुरू झाल्यावर एके दिवशी तो अंबूला मिठी मारतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. अंबू चकित होते.

या प्रेमाच्या सर्वस्वी अनोख्या भावनेने थरारते आणि त्या भावनेच्या आहारी जाते. आपण वागलो ते चुकीचे आहे याची कल्पना असल्यामुळे दोघेही पुन्हा न भेटण्याचे ठरवितात. दुसऱ्या दिवशी फक्त तिचा निरोप घ्यावा व मुंबईस पैसे कमावण्यासाठी निघून जावे अशा हेतूने विष्णू तिला भेटण्यास जातो, पण या भेटीतही दोघे परस्परांच्या आकर्षणाला बळी पडतात. नेमका त्याचवेळी विश्वंभर काही निमित्ताने घरी परततो. परस्परांच्या मिठीतील दोघांना पाहून त्याचा संताप संताप होतो. हातात मुसळ घेऊन तो अंबूला धमकावतो आणि घरातून चालती व्हायला सांगतो. अंबूला क्षणात परिस्थितीचे भान येते, ती आपले कपडे घेते आणि विष्णूबरोबर जाण्याची तयारी दर्शविते. विष्णूही विश्वंभरकडे बघून कुत्सित हसतो व "रे शिंच्या भटा! हिला दागिन्यांनी मढवून दाखवीन, लोकांच्या भिक्षेवर नाही जगवणार. आणि आज तू आम्हा दोघांवर हात उगारलास त्याचा सूड घेईन सूऽऽड! सोडणार नाहीsss!" असे म्हणून अंबूला घेऊन मुंबई गाठतो. 

विश्वंभरची बायको विष्णूचा हात धरून पळून गेली हे समजल्यावर सगळे गाव त्याला चिडवते, त्याची कुचेष्टा करते. लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदर आहे, या विश्वंभरच्या विश्वासाला तडा जातो. याच सुमारास विना मास्तर आणि द्वारकानाथ गडकरी हे दोघेही विश्वंभरला सावरण्यासाठी परोपरीने मदत करतात. त्या तिघांची चांगली मैत्री जमते. हळूहळू विश्वंभर नव्या जीवनात रूळू लागतो. सुरेश अभ्यासात हुषार असल्यामुळे चांगले गुण मिळवितो. एवढ्यात प्रवचनाच्या निमित्ताने बिड्यशास्त्रीबुवा तोरण्यात येतात. ते विश्वंभरकडेच उतरतात. त्यांचे प्रवचन ऐकल्यावर आपल्याला असे बोलता आले पाहिजे असे विश्वंभरला वाटते. शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली तो झटून तयारी करतो आणि प्रवचने करू लागतो. लवकरच तो प्रवचनकार म्हणून प्रसिद्धीही पावतो.

या काळात तो आणि शास्त्रीबुवा अनेकानेक विषयांवर गंभीरपणे चर्चा करीत असतात. सुराला लागलेल्या विश्वंभरच्या आयुष्यात पुन्हा एक वादळ येते. स्कॉलरशिपला जिल्ह्यात पहिला आलेला, घरातील सर्व कामे निमूटपणे करणारा आज्ञाधारक सुरेश विश्वंभरचा पूर्वापार वृत्ती चालविण्याचा उपदेश धुडकावून, पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्याला पळून जातो. एकटेपणा विश्वभरला खायला उठतो. अनेकांनी सांगूनही त्याने पुन्हा लग्न करण्याचे नाकारलेले असते. आता तर सुरेशही नसतो. त्याचे दोन्ही मित्र, शास्त्रीबुवा त्याची समजूत घालतात. जीवन पुढे चालू राहते. 

इकडे मुंबईला गेलेले विष्णू व अंबू पुष्कळ कष्ट करतात. अंबू एक खानावळ चालू करते. त्या धंद्यात तिचा चांगलाच जम बसतो. विष्णू दुकान मांडतो. महायुद्धाच्या काळात त्याला भरपूर नफा मिळतो आणि एक मोठा व्यापारी, शेट म्हणून तो मुंबईत ओळखला जातो. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी होते. मुलगी मुकी असते आणि काही प्रमाणात मंदबुद्धी असते. एकदा मुद्दाम वाकडी वाट करून इस्टेटीची व्यवस्था लावण्याच्या निमित्ताने विष्णु अंबूला घेऊन तोरण्याला येतो आणि तिच्या विरोधाला न जुमानता मुलीला राधा-कृष्णाच्या मंदिरात ठेवून मुंबईस परततो.

आता विष्णूच्या गोतावळ्यातील लोक त्याला लग्न करण्यासाठी आग्रह करू लागतात; आणि विष्णूलाही आपल्याला 'वारस' हवा असे वाटू लागते. तो एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न करतो. लग्न झाल्यावरही अंबूशी संबंध चालू ठेवावे असे त्याच्या मनात असते; पण ती त्याला बाहेर हाकलून देते. तिचा व्यवसाय मुळातच चांगला चाललेला असतो, तो अधिकच कसोशीने करून ती भरपूर कमाई करते. तोरण्यात सोडून आलेल्या मुलीची ती खबरबातही घेत नाही; मात्र तेथील देवळातील सेवेकऱ्याची, विठूची बायको येशी त्या मुलीचा प्रतिपाळ करू लागते. वेड्या बळीच्या वासनांध नजरेपासून त्या मुलीला वाचवते. गावातील लोकांनी आक्षेप घेऊ नये म्हणून मुलीला देवळात झोपविते. एके रात्री मोठे वादळ होते. जोराचा पाऊस पडू लागतो त्यात ती मोनी भिजू लागते, बेंबटू लागते आणि दोन मरतुकडी कुत्री तिच्यावर भुंकू लागतात. दया येऊन विश्वंभर तिला घरी आणतो. कोरडे कपडे घालतो आणि सुरेशच्या अंथरुणावर झोपवितो. त्या दिवसापासून मोनी रोजच त्याच्याकडे येऊ लागते. येशीच्या सोबत कामे करू लागते. हळूहळू विश्वंभरला तिचा लळा लागतो, याच काळात पुण्याला गेलेला सुरेश अभ्यासात तर प्रगती करीत असतोच, पण त्याचबरोबर राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ, वेगवेगळ्या पक्षोपपक्षांचे कार्यक्रम- व्याख्याने ह्यांतही सहभागी होत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, साम्यवाद्यांची संघटना, सुभाषबाबूंचे अनुयायी या सगळ्यांपेक्षा गांधींकडे तो अधिक ओढला जातो आणि चळवळीत सक्रिय सहभाग घेतो. गुप्तपणे पत्रके टाइप करताना पकडला जातो. तुरुंगात गेल्यावर अन्य कोणा सहकार्यांचे नाव न सांगता धीरोदात्तपणे स्वत:ला संपवून हुतात्मा बनतो. 

इकडे तोरण्यातही स्वातंत्र्याच्या चळवळीचे लोण पोहोचलेले असते. चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, शांत्या मटकर व बाबू महाल्या पकडले जाण्याची भीती असते, तेव्हा विश्वंभर त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात लपवून त्यांचे पोलिसांपासून संरक्षण करतो. विश्वंभरची प्रवचनकार म्हणून दिवसेंदिवस वाढणारी ख्याती त्याच्या मित्रांच्या मनात असूया निर्माण करते. लेखक बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण न झालेला विना मास्तर, द्वारकानाथ गडकऱ्याच्या मदतीने कारस्थान रचतो आणि मोनीला देवघरात घेण्याचा भ्रष्टाचार विश्वंभर करतो म्हणून त्याची प्रवचने बंद करावीत अशी गळ देवस्थान कमिटीच्या प्रमुखांना घालतो.

मंदिराच्या पुजारीपणावर डोळा ठेवून असलेले श्रीरामशास्त्री त्यात भर टाकतात आणि मग एके दिवशी कमिटीची मिटींग बोलावून तिच्यापुढे विश्वंभरला उभे केले जाते. अक्करमाशी मोनीला गाभाऱ्यात घेण्याचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला जातो. त्यामुळे मंदिरातील देवांची, मंदिराची आणि देवांची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या पेशव्यांची अप्रतिष्ठा केल्याबद्दल पुजारीपण काढून घेतल्याची शिक्षा सांगितली जाते. उत्तरादाखल बोलताना, विश्वंभर म्हणतो... "मी मोनीला गाभान्यात घेतलं नव्हतं, पण वाटलं असतं तर तिला बेलाशक गाभाऱ्यात घेतलं असतं. तिलाच नव्हे तर विठूलाही. कारण असलाच देव, तर तीही देवाची लेकरं... तुमच्याप्रमाणंच आणि नसलाच देव तर काय प्रश्नच नाही!" आपण नव्याण्णव टक्के नास्तिक आहोत असे सांगून तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो, "देवाचं एक महान सत्य मला माहीत आहे... मूल जन्माला आल्यापासून भयाखालीच जगत असतं, थोडंसं मोठ्या झाल्यानंतर त्याला मृत्यूच्या अटळपणाची जाणीव होते... मरण उभं ठाकतं तेव्हा कुणाचीही साथसोबत नसते हेही त्याला उमजतं! जगतानाही त्याला समजतं की एक माणूस दुसऱ्याचा नाही, जगाच्या या जगड्व्याळ पसाऱ्यात ठायीठायी माणसांची मांदियाळी आहे; पण इथं कुणी कुणाचा नाही! मृत्यूकडे चालणाऱ्या, एकाकी पडलेल्या या माणसाला आधार हवा असतो. तो आधार म्हणून माणसांनीच देवाला निर्माण केलं! हजारो पिढ्यांपूर्वीच्या आमच्या-तुमच्या पूर्वजांनी. त्याला जमलं नसतं, तर काही शतकापूर्वीच्या आमच्या तुमच्या पूर्वजानं त्याला निर्माण केला असताच असता! आणि आजवर त्याला कुणी निर्माणच केला नसता, तर मी... या विश्वंभरभटानंच देवाला निर्माण केला असता! आणि म्हटलं असतं; 'हा देव आहे! हा सर्वव्यापी, सर्वसमर्थ आणि सर्वज्ञ आहे…" (पृष्ठ301)

विश्वंभरने आपण नास्तिक असल्याचे कबूल केल्याने त्याचे पुजारीपण काढून घेण्याचा निर्णय पक्का होतो. विश्वंभर घरी येतो. आसवं ढाळणाऱ्या येशीला चहा करायला सांगतो. मोनीशी हसून बोलतो. या त्याच्या अवस्थेचे वर्णन करताना लेखक-निवेदक लिहितो... विश्वंभर शिगोशीग संतुष्ट होता. हवेत गारवा, समोर चहा... मागचं-पुढचं काही असो. या घडीला तर आनंद आणि छातीभर मृद्गंध!! (पृ. 305) आपण जे जे करतो त्या साऱ्याची नोंद योगेश्वर घेतो; अशी श्रद्धा असलेला, ईश्वराकडे कधी काही न मागता केवळ त्याची मनोभावे सेवा करणारा विश्वंभर आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातो आणि अखेरीस देव माणसाने स्वत:साठी निर्माण केला, त्याला विश्वव्यापकत्व, सर्वज्ञत्वही त्यानेच दिले अशा पूर्णतः नास्तिक विचारापर्यंत येऊन पोहोचतो. देवाचे, जाती-धर्माचे ओझे दूर झाल्यामुळे, पोटापाण्यावद्दलच्या आणि राहण्या-जेवण्याबद्दलच्या अनिश्चिततेतही अनुपम सुख अनुभवतो.... अशी ही विश्वंभरची जीवनकहाणी चटका लावणारी, चित्ताकर्षक आहे. हे चित्ताकर्षकत्व कुणा पापभीरू, धर्मभीरू ब्राह्मणाची बायको कुणा लफंग्याचा हात धरून पळून गेली या घटनेतील सनसनाटीपणामुळे आलेले नाही; तर ही घटना आणि ह्या घटनेचे ज्या ज्या लोकांच्या जीवनावर परिणाम झाले, त्यांच्या जीवनातील घटना-प्रसंग यांच्या चिरेबंदी बांधणीतून आलेले आहे.

घटना- प्रसंगातील बारीक-सारीक तपशील नोंदवून वसंत नरहर फेणे प्रसंगाला जिवंत आणि प्रत्ययकारी बनवतात. परंतु हा तपशील भावी, घटनाप्रसंगांच्या अर्थपूर्णता सूचित करणारा असल्यामुळे हे सर्व घटनाप्रसंग परस्परांशी पक्केपणाने बांधले जातात. पुढे एका प्रसंगाचे जे अवतरण दिले आहे, ते त्याची साक्ष देईल. अंबूची अभिलाषा बाळगणाऱ्या विष्णूच्या मनात आपण आणि अंबूचा नवरा विश्वंभर यांच्या शारीरिक ठेवणीची तुलना होते आहे, अंबूच्या सहवासात विश्वंभरच्या चेहऱ्यावरचे समाधान तो टिपतो आहे. यांचा संबंध त्याच्या मनातील अंबूच्या अभिलाषेशी आहे. वसंत नरहर फेण्यांनी या घटनेचे वर्णन पुढीलप्रमाणे..... "विश्वंभर भट विष्णूपाशी आला. पुढे केलेल्या त्याच्या ओंजळीत विश्वंभरभटानं तीर्थाची धार धरली. मग झारी तबकात ठेवून त्यानं प्रसाद म्हणून निर्माल्य विष्णूच्या हातात दिलं.

विष्णूनं ते हुंगून कानाला लावलं. मात्र तो हा सारा वेळ आणि विठूला तीर्थप्रसाद देताना विष्णू विश्वंभरभटाला निरखून पाहात होता. तो हात लांब करून शक्य तितक्या दुरून विठूला झारीतलं तीर्थ ओतीत होता; किंवा त्यानं बऱ्याच वरून निर्माल्य विठूच्या हातात टाकलं, या गोष्टी विष्णूच्या लक्षात आल्याच नाहीत. त्याच्या लक्षात येत होता तो विश्वंभरभटाचा सस्मित चेहरा. डोकीवरील तुकतुकीत चकोटच्यामध्ये असलेला केसांचा वर्तुळाकार घेरा नि मध्यभागी असलेली, तेल लावल्यानं चमकदार दिसणारी शेंडीची दिमाखदार गाठ. विश्वंभर भट तसा उंचच होता. आपल्यापेक्षा दीड-दोन इंचांनी त्याची उंची अधिक भरेल. तो कृश नव्हता; पण त्याची छाती आपल्या छातीप्रमाणं भरदारही नव्हती; परंतु विश्वंभरभटाच्या चेहऱ्यावर तुष्टीपुष्टींचं समाधान सुखानं वस्ती करतंय असं वाटत असे... देवानं त्याला बायकोही तशीच दिलीय. देखणी आणि सोज्वळ... दोघांची दृष्टादृष्ट होताच विश्वंभर भटाचे ओठ बिलगले. त्याची ओठावरील मिशांची पट्टी रुंदावली. प्रसन्न हसू लाट पसरावी तसं चेहऱ्यावर पसरलं आणि डोळ्यांची इषद् पिंगट बुबळं लकलकली. "(पृष्ठ 2)

येथे घटनेतील तपशील घटनेला जिवंत आणि प्रत्ययकारी तर बनवतातच, परंतु त्याचबरोबर विश्वंभर भटाचं सोवळे सांभाळणे व नंतर विष्णूने त्याची बायको भ्रष्ट करणे, विश्वंभरभटापेक्षा आपली छाती भरदार असल्यामुळे विष्णूच्या मनात आपल्या पुरुषी सामर्थ्याच्या झालेल्या प्रत्ययाचे सूचन व भटाची तृप्ती मिळवण्याची त्याला झालेली सुप्त इच्छा, यांचे सूचन तपशिलातून वसंत नरहर फेणे करतात. 

कादंबरीतील घटनांमध्ये सहभागी असलेल्या आणि त्या घटनांना प्रतिसाद देणाऱ्या घटनांचे परिणाम सोसणाऱ्या व्यक्तींच्या मनातील भाव-भावनांचे चित्रण लेखक असेच प्रत्ययकारी जिवंत व सार्थ करतो. उदाहरणे सांगायची म्हटलं तर, सर्व कादंबरीच उद्धृत करावी लागेल. नमुना म्हणून एक प्रसंग पाहू... विष्णू आणि अंबू यांच्या पहिल्या प्रेमभेटीचे चित्रण लेखक पुढीलप्रमाणे करतो... "नाही तर काय? अंबी काही अवसान गोळा करून म्हणाली. मनात मात्र तिला काही वेगळंच वाटत होतं. आपल्या सौंदर्याची पूजा होतेय, आपण विवाहित आहोत हे माहीत असूनही इतका देखणा तरुण आपल्यावर लट्ट होतोय; गैर मानल्या गेलेल्या या प्रकारातील चोरटेपणाची थरथर, अशा अनेक भावनांचा गुंता त्यात होता. त्याबरोबरच त्याला रागराग करावा असंही वाटत होतं.. दुसऱ्याच क्षणी स्सऽऽऽ असा आवाज त्यानं केला, तेव्हा त्याचं शरीर शहारल्यासारखं झालं हे, कुठंतरी उत्सुक, कुठंतरी भीती, तरीही अपरंपार आत्मगौरवाच्या भावनेत लपेटलेल्या अंबीला जाणवलं... बंधारा अकस्मात फुटल्यावर अडवलेलं पाणी फुसंडावं, तसं फुसांडत त्याने तिला मिठीच घातली. तिच्या सुगंधी केशसंभारात त्यानं आपलं तोंड लपवलं नि तो पुटपुटला. 'अंबूऽऽ, तुझ्यावर फार फार प्रेम आहे गं माझं" असं प्रेमभराचं बोलणं अंबीनं विश्वंभराकडून ऐकलं होतं. परंतु ते म्हणजे लग्नाच्या नवरा-बायकोनं बोलावं तसं रीतीला धरून होतं. विवाह संस्कारातून त्या बोलण्याचा उगम झाला होता. एका परीनं विश्वंभरचं प्रेमाचार बोलणं हे परंपरेचा भागच होतं; परंतु विष्णूनं आता उच्चारलेला 'प्रेम' हा शब्द असा संस्कारजन्य नव्हता. तिला वाटलं विष्णूच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द स्वयंभू आणि स्वयंपूर्ण आहे! निखळ नि परिपूर्ण आहे! तरीही स्वत:ला सावरण्याचा तिनं प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचं फलित होतं... "कुणी पाहिलं तर.... " (पृष्ठ 15). 

वैवाहिक जीवनात समाधानी असलेली अंबू विष्णूसारख्या परपुरुषाला पहिल्या भेटीतच वश होते, ही घटना सकृतदर्शनी असंभाव्यच म्हणायला हवी, परंतु फेण्यांनी अंबूच्या मनातील परस्परविरोधी, भावनांच्या सूक्ष्म वर्णनातून ती प्रत्ययकारी झालेली सुप्त इच्छा, याचे सूचन या तपशिलातून केलीय. 

विश्वंभर, अंबू, विष्णू, सुरेश, विना मास्तर, गडकरी, शास्त्रीबुवा, मोनी, विठू, येशी या आणि यांच्यासमवेत आणखी काही व्यक्ती कादंबरीत आहेत. त्यांच्या मनातील भाव-भावनांचे आणि त्यांच्यातील बदलणाऱ्या परस्परसंबंधांचे चित्रण लेखकाने असेच प्रत्ययकारी रीतीने केले आहे. प्रारंभी, अडचणीत सापडलेल्या विश्वंभराला मनापासून मदत करणारे विनू मास्तर आणि गडकरी हे त्याचे मित्र, पुढे त्याला प्रवचनकार म्हणून प्रसिद्धी-प्रतिष्ठा व पैसा मिळू लागताच त्याची असूया करू लागतात व त्याला प्रवचने करण्यास बंदी व्हावी म्हणून कारस्थाने करतात किंवा विश्वंभराशी तात्त्विक चर्चा करणारे, त्याला उपदेश करणारे, अगदी जवळचा मानणारे शास्त्रीबुवा विश्वंभरची वृत्ती काढून घेतली गेली हे कळल्यावर उरावर बोझा नको म्हणून मागच्या मागे निघून जातात, असे कितीतरी प्रसंग मानवी मनाचे आणि मानवी संबंधांचे मनोज्ञ दर्शन घडवितात. सुरेशचे राष्ट्रीय चळवळीत सामील होणे आणि अखेरीस ध्येयवेडेपणाने स्वतःला संपविणे तरुणांच्या ध्येयवेड्या, साहसी, उत्कट मनोवृत्तीचे दर्शन घडविते. व्यक्तींच्या मनातील भाव-भावनांच्या अनेकविध छटांचे चित्रण हे या कादंबरीचे बलस्थान आहे. 

आपली बायको लफंग्या विष्णूचा हात घरून निघून गेली, या घटनेने विश्वंभर हादरतो. त्याच्या मनातील श्रद्धेला, पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींवरील विश्वासाला तडा जातो. त्यातून त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात... बाई शुद्ध का अशुद्ध ठरवायची कशी? शुद्ध आणि भ्रष्ट यांत नेमका फरक काय? आपण भ्रष्ट आहोत की नाही? खरेपणाने उत्तर देण्याची पंचाईत करणारे विचार त्याच्या मनात निर्माण होऊ लागतात. त्यांच्याशी तो निकराने झगडा करतो, त्याचा चरितार्थ देवाधर्माला धरून होत असला तरी देवाबद्दल त्याचं मन पूर्वीप्रमाणे नि:संदेह राहत नाही. 

शास्त्रीबुवांबरोबरच्या चर्चामध्ये मृत्यू म्हणजे काय असतं? जित्या जागत्या माणसांचं काय होतं? यांसारखे विषय येतात आणि त्यानंतरही त्याच्या मनात विचारचक्र चालूच राहते, अज्ञेयवादी झालेल्या शास्त्रीबुवांचा प्रभाव पचवून आणि आयुष्यातील अनेक खडतर प्रसंगांना तोंड देताना मनात निर्माण झालेला विचारांचा गुंता अनुभवाच्या निकषावर घासून घेतल्यावर विश्वंभराला देवमाणसानेच निर्माण केल्याचे सत्य गवसते, ते तो निर्भयपणे प्रकट करतो. विश्वंभरच्या वैचारिक प्रवासाचे चित्र कादंबरीत ठसठशीतपणे उमटले आहे. कोणा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसकसे घडत बदलत जाते त्याचे प्रत्यंतर विश्वंभरच्या या वैचारिक प्रवासातून येते तर; व्यक्तींची व्यक्तिमत्त्वे प्रसंगपरत्वे कशी बदलत, घडत- बिघडत जातात याचे दर्शन अंबू, विष्णू, सुरेश यांच्या जीवनानुभवांच्या चित्रणात घडते. 

कादंबरीतील घटनांचा काळ महायुद्धाच्या वेळचा आहे, त्यामुळे महायुद्धाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक परिणाम, स्वातंत्र्याची चळवळ, भूमिगतांची धरपकड अशा अनेक घडामोडींचे चित्रण कादंबरीत आहे. ते कादंबरीतील घटना- प्रसंगात एकजीवपणे मिसळून गेले आहे. 

कादंबरीची बांधणी चिरेबंदी आहे हे खरे पण; घटना- प्रसंगातील तार्किक संबंध पक्के ठेवण्यासाठी चार-दोन असंभाव्य किंवा न पटण्याजोग्या प्रसंगांची योजना लेखकाने केली आहे असे निरीक्षणाअंती जाणवते. उदा. वेड्या बळीच्या कामवासनेपासून मोनीला वाचविण्यास झटणारी येशी दिवसभर तिला सांभाळते पण रात्री मात्र देवळात झोपविते. ती त्याची जी कारणमीमांसा ती देते तीही पटणारी नाही. पण कथानकातील पुढे घडणाऱ्या घटनांचे धागेदोरे या घटनेत गुंतलेले आहेत! अशी अगदी थोडी, हाताच्या बोटावर मोजता येतील अशी उदाहरणे वगळली; तर घटनाप्रसंगांची घट्ट वीण, त्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या मनातील भाव-भावनांचे उलगडलेले सूक्ष्म पदर, त्यांच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब आणि घटना-प्रसंगांना असलेल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय संदर्भाचे भान अशा अनेक वैशिष्ट्यांसह साकारलेल्या रूपाला प्रत्ययकारितेचा परिसस्पर्श झाल्यामुळे कादंबरी सरस उतरली आहे.

विश्वंभरे बोलविले (कादंबरी)
लेखक : वसंत नरहर फेणे
स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद.

Tags: पुस्तक परिचय कथा कादंबरी ग्रंथ परीक्षण समीक्षा Critic Literature Philosophy Fiction Book Review Book weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके