डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीय स्वातंत्र्यदिन आणि कम्युनिस्ट

आम्ही चळवळील मागे राहिलो नाही की घाबरलो नाही, याचा मला अभिमान वाटला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी या साऱ्या आठवणी आल्या तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य सोहळ्याच्या रोषणाईच्या झगझगत्या प्रकाशात माझ्या मनात अंधाराचे वादळ उठले होते.

मी अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन...

भारताच्या सुवर्णभूच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव या वर्षी साजरा होत आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचे 150 वर्षांचे गुलामीचे जू झुगारून स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद 1947 साली ज्या जाणत्यांनी अनुभवला ते भाग्यवान! ज्यांचे माता-पिता, पती-पत्नी, बंधू-भगिनी, पुत्र-कन्या यांनी स्वातंत्र्यलढयात आत्माहुती दिली, त्यांनी साश्रुनयनांनी तिरंग्यास वंदन केले. त्यागाच्या सामर्थ्यांचे सार्थक दशदिशांना उजळून आले. मातृभूमीच्या मुक्तीसाठी झालेल्या महायज्ञात फाशी जाऊन, बंदुकीच्या गोळ्या खाऊन ब्रिटिशांच्या तुरुंगात अत्याचार व हालअपेष्टा सोसत, ज्या लहानथोर वा अनामिकांनी आहुती दिली त्याची फलश्रुती अनुभवण्याची सुरुवात 15  ऑगस्ट 1947 पासून झाली. या आनंदोत्सवाला भूकंपाचा मोठा धक्का बसला. तो म्हणजे भारताचे दोन तुकडे झाले होते. 

अनेक वर्षे बंधुभावाने नांदलेल्या दोन जमातींमध्ये वैरभाव निर्माण करत करत ब्रिटिशांनी अखेरचा डाव साधला. हिंदुस्थान-पाकिस्तानची निर्मिती झाली. हे का झाले, कसे झाले याचा इतिहास मोठा आहे, आणि त्याचा खल असूनही चालू आहे. आता ते एक वास्तव आहे आणि या वास्तवात एक विस्तव सतत धगधगत असतो. कधी फार भडकतो व त्याच्या ज्वाला दोन्ही देशांना चटके देत राहतात. 15 ऑगस्ट 1947 च्या दिवशी आमच्या घरी आनंदाचे वातावरण होते. मी तेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होते. आमच्या घरावर तिरंगा फडकत होता. ठिकाणी झेंडावंदने इतकी होती की हिशोब नाही. मी झेंडावंदनाला गेले. दिवसभर देशभक्तिपर गीते दुमदुमत होती. 

रात्री तर सारी मुंबई दिव्यांच्या रोषणाईने न्हाऊन निघाली होती माझ्या जीवनातल्या घटना आठवल्या. शाळेत 5 व्या इयत्तेपासून मी विद्यार्थी संघटनेत काम करत होते. फी वाढविरुद्धचे अनेक संप आम्ही विद्यार्थिदशेत घडवले. नुकतेच होऊन गेलेले नाविकांचे बंड मी विसरणे शक्य नाही. आझाद हिंद सेनेच्या पुढाऱ्यांवरील खटल्यामुळे देशात खळबळ माजली. सशस्त्र बंड करण्याचा आमचा जन्मजात हक्क आहे अशा घोषणा सुरू झाल्या. त्यातच 1946 च्या फेब्रुवारी महिन्यात नाविकांचे बंड सुरू झाले. ब्रिटिश अधिकारी हिंदी नाविकांना जी हिणकस वागणूक देत होते त्यावरून हिंदी नाविक व ब्रिटिश अधिकाऱ्यांचे भांडण सुरू झाले. 

त्यावरून संप झाला तो देशभरातील जहाजांवर पसरला मुंबईतील कामगारांचा व जनतेचा नाविकांना पाठिंबा होता शहरात पोलीस व सैन्याचा बंदोबस्त असूनसुद्धा डांगे व रणदिवे धक्क्यावर जाऊन नाविकांच्या पुढाऱ्यांना भेटून आले. या नाविकांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देण्याचे आमच्या पक्षाने ठरवले संप रात्रीपासून सुरू झाला. काँग्रेसने या संपाला विरोध केला. मुंबईभर गोऱ्यांच्या बंदुकधारी गाड्या फिरू आगल्या. आम्ही विद्यार्थ्यांनी शाळा बंद करून मिरवणुका काढल्या. मुंबईभर लाठीमार व गोळीबार चालू होता. परळला आमच्यावर लाठीमार झाला. आमचा प्रयत्न अपोलो बंदरला जाऊन नाविकांना पाठिंबा देण्यास पोहोचणे हा होता. आम्ही अनेकजण तेथे पोहोचलो. मी परतताना परळच्या ऑफिसवर गेले. तेव्हा परळच्या गोळीबारात आमच्या पक्षाची कमल दोंदे गोळी लागून जागीच ठार झाली. तसेच कुसुम रणदिवेच्या पायाला गोळी लागून ती पडली. 

या भयंकर गोळीबारात जवळ जवळ 250 लोक मारले गेले. आम्ही चळवळील मागे राहिलो नाही की घाबरलो नाही, याचा मला अभिमान वाटला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी या साऱ्या आठवणी आल्या तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य सोहळ्याच्या रोषणाईच्या झगझगत्या प्रकाशात माझ्या मनात अंधाराचे वादळ उठले होते. माझे वडील कॉ. डांगे यांना पक्षाने त्या वेळी इंग्लंडला पाठवले होते, पक्षामध्ये भारताचे स्वातंत्र्याच्या प्रश्नावर उघड उघड दोन परस्पर विरोधी विचारप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले होते. एक प्रवाह तेव्हाचे जनरल सेक्रेटरी पी. सी. जोशी व दुसरा रणदिवे यांचा. भारताचे स्वातंत्र्य, फाळणी, वेगळ्या पाकिस्तान राज्याची मागणी. कॉग्रेससकट भारतातील भांडवलदारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी अनेक प्रश्नांवर 1947 च्या कालखंडात आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट विचारवंतांनी आपली मते प्रकट केली. 

रजनी पाम दत्त, सौविएतचे झुकोव्ह, डायकोव्ह, बालाबुशेविच इत्यादीचे परस्परविरोधी दृष्टिकोन मांडले गेले, त्याची चर्चा इथे शक्य नाही. नेहरू हे पुरोगामी असून त्यांच्या सरकारशी सहकार्य करावे हे पी.सी.जोशींचे मत तर कॉंग्रेस भांडवलदार व सरंजामदारांची संघटना आहे व स्वातंत्र्य म्हणजे या गटांनी केलेली तहजोड आहे, हे रणदिवे यांचे मत. 15 ऑगस्ट 1947 च्या पिपल्स एजच्या साप्ताहिकात दोघांचेही लेख प्रसिद्ध झाले. त्यानंतर 1948  च्या पक्ष परिषदेत नेहरू सरकार भांडवलदारांचे आहे अशा अनेक विशेषणांनी युक्त धोरणांची नवी घोषणा ‘ये आझादी झूटी है’ या स्वरूपात पुढे आली. यामुळे कम्युनिस्ट हे टीकेचे लक्ष बनले.

हे सारे आठवण्याचे कारण असे की, कम्युनिस्टांनी हिमालयाएवढ्या चुका केल्या पण त्या मान्य करण्याचा प्रामाणिकपणा व धारिष्ट्य त्यांनी दाखविले. ब्रिटिश राजवटीत डांगे यांच्यासारख्यांनी 13 वर्षे तुरुंगात काढली, भारतातील कामगारांचे प्रचंड लढे उभारून त्यांना संघटित करून त्यांचे मूलभूत हक्क मिळवताना प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य कम्युनिस्टांची ही चळवळ स्वातंत्र्यलढयाचा भाग नसून ते देशद्रोही आहेत असे म्हणणे म्हणजे स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसण्यासारखे आहे. समाजवादी तत्त्वज्ञान घेऊन कामगार-शेतकऱ्यांचे लोकशाही राज्य स्थापन करण्यासाठी आयुष्यातील सर्व सुखांची उधळण करणाऱ्या कम्युनिस्टांनी आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पुढाऱ्यांचे मार्गदर्शन घेताना आपला देश, त्याचा इतिहास, परंपरा, संस्कृती व स्वभाव हे लक्षात घेऊन त्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करायला हवे होते.  

इंग्लंडमध्ये लोकशाही आहे पण तेथे राजाराणीला लोकशाहीने राखले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर तेथील जनता वाटेल तेवढा पैसा खर्च करू देते. हा त्या देशाचा स्वभाव आहे. पण हे भारतात झाले नाही. कम्युनिस्टांनी भारताच्या भूमीला साजेसे खतपाणी घालून समाजवादाचे तत्त्वज्ञान रुजवायला हवे होते यात तिळमात्र शंका नाही. ते झाले असते तर देशाला आजच्या अराजकाचे वळण न लागता या सुवर्णमहोत्सवाच्या वर्षी भारत एका महाशक्तीच्या स्वरूपात उभा ठाकलेला दिसला असता.

Tags: इंग्लंड  पी.सी. जोशी कॉंग्रेस कॉ. डांगे पाकिस्तान हिंदुस्थान रोझा देशपांडे England P.C. Joshi Congress Co. Dange Pakisthan Hindusthan Roza Deshapande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके