डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

टिबर नदीच्या काठी रोम शहर वसलेले आहे. रोम शहरात फिरताना असा भास होतो की, आपण 2700 वर्षांच्या पायऱ्या उतरून एखाद्या खोल भुयारात गाडलेल्या पुरातन शहरात तर जात नाही ना? रोम शहर बहुरूपी आहे. कामरूपी आहे. दिवसा संबंध शहरच एक म्युझियम बनून जाते, संध्याकाळी शहराचे एक शॉपिंग सेंटर बनते, तर रात्री शहररूप बदलून ओपन एअर रेस्टॉरंट बनते. शहराच्या पुरातन पोतड्यात असे अनेक मुखवटे आहेत. चौकाचौकांवर रूप बदलणारा रोम हा कॅलिडोस्कोप आहे- शोभादर्शक आहे. रोम दिवसा उजेडात पाहावे तसे रात्री दिव्यांच्या लखलखाटातही पाहावे. रोम ही खरेच ‘सा रम्या नगरी’ आहे. ‘‘मला विटांनी बांधलेले रोम सापडले. पण मी तुमच्यासाठी संगमरवरी रोम ठेवत आहे.’’ असे उद्‌गार रोमचा सम्राट ऑगस्टसने काढले.

मध्ययुगाच्या काळोख्या रात्रीत युरोप खंडातील इटलीमध्ये पंधराव्या शतकात सर्वप्रथम फ्लोरेन्स शहरात सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची- अर्थात रेनासान्सची सुरुवात झाली. लिओनार्दो दी विन्सी, मायकेल एन्जेलो, राफेल यांसारखे थोर प्रतिभावंत चित्रकार, शिल्पकार, वास्तुशिल्पज्ञ एकाच वेळी तेव्हा फ्लोरेन्स शहराचा कायापालट करत होते. बँकिंगच्या धंद्यात गडगंज संपत्ती मिळवलेल्या मेंडीची घराण्याचा या सर्व कलाकारांना आर्थिक आधार होता. फ्लोरेन्स शहर हे रेनासान्सचे फाऊंटन हेड असल्यामुळे इटलीच्या भेटीची सुरुवात फ्लोरेन्समधून करणे स्वाभाविक होते. तुस्कानो या अतिशय सुपीक प्रदेशात आर्नो नदीच्या काठी फ्लोरेन्स शहर वसले आहे. आर्नो नदीवरचा जुना लाकडी पूल आगीने भस्मसात झाला आहे, पण या नदीवर काही शतकांपूर्वीचा दुमजली पूल आहे. या पुलावर पूर्वी सोनारांची दुकाने होती. हा पूल आता पर्यटकांचे आकर्षण झालेला आहे.

फ्लोरेन्स शहरातील सेंट मेरी ऑफ द फ्लावर हे कॅथेड्रल रोममधील सेंट पीटर व लंडनमधील सेंट पॉल कॅथेड्रलमागोमाग जगातले तिसरे मोठे कॅथेड्रल आहे. त्याची लांबी 450 फूट आहे. या कॅथेड्रलच्या बाहेरच्या दर्शनी भागाला पांढरे व हिरवे इटालियन मार्बल्स लावल्यामुळे तो दर्शनी भाग अतिशय सुंदर दिसतो. पण सेंट मेरी ऑफ द फ्लावर कॅथेड्रलचे खरे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा डोम किंवा त्याच्या माथ्यावरचा घुमट आहे. 45 मीटर व्यासाचा व 114 मीटर उंचीचा हा प्रचंड घुमट विटांनी बांधलेला आहे. फिलिप ब्रुनेलेशी या विख्यात वास्तुशिल्पज्ञाने त्याची आखणी केली आहे. हा घुमट बांधताना फिशबोन म्हणजे माशाच्या काट्याच्या तत्त्वाचा उपयोग केला आहे. वस्तुत: एकाखाली एक असे हे दोन घुमट आहेत आणि दोन्ही घुमटांमध्ये पोकळी आहे. घुमटाच्या बाल्कनीवर जाण्यासाठी आतून घुमटाच्या पोकळीतून साडेचारशे पायऱ्यांचा जिना आहे.

कॅथेड्रलच्या भिंतींवर रंगीत फ्रेस्को पेंटिंग्ज आहेत. त्यातील एक पेंटिंग डांटे आपली डिव्हालीन कॉमेडी सांगतानाचे आहे. चर्चच्या भिंतीवर ही रंगीत फ्रेस्को पेंटिंग करण्यामागे धर्मगुरूंचा खास उद्देश होता. अशिक्षित कॅथॉलिक भाविक बायबल वाचू शकत नव्हते. त्यामुळे चर्चच्या फ्रेस्को पेंटिंग्जमधून त्यांना बायबलमधील प्रसंगांची माहिती मिळावी, या हेतूने ही रंगीत चित्रे चर्चच्या  सर्व भिंतींवर रंगवण्यात आली आहेत. कॅथेड्रलमध्ये उंचावरून लोंबणारी झुंबरे होती. कॅथेड्रलमध्ये फारसा उजेड नव्हता. एका कोपऱ्यात एक मेणबत्त्यांचे झाड मंद पेटले होते. त्याचा प्रसन्न उजेड सगळीकडे पसरला होता. कॅथेड्रलमध्ये अश्रुत शांती होती. त्या शांतीला अनाघ्रात सुगंधाची किनार होती. सगळीकडे निष्पर्ण निवांत होता. कॅथेड्रलच्या बाहेरच 89 मीटरचा बेल टॉवर दीपस्तंभासारखा उभा होता. कॅथेड्रलच्या प्राकारातच म्युझियम आहे. तिथे मायकेल एंजेलोने केलेली शिल्पे आहेत.

मायकेल एंजेलोने तारुण्यात केलेले आणि अजरामर झालेले शिल्प पिएटा हे रोमच्या सेंट पीटर कॅथेड्रलमध्ये आहे, पण मायकेल एंजेलोने आयुष्याच्या अखेरीस केलेले दुसरे पिएटा या म्युझियममध्ये आहे. व्हर्जिन मेरीच्या मांडीवरचे ख्रिस्ताचे पार्थिव आणि त्यामागचा ख्रिस्ताचा शिष्य असे हे शिल्प आहे. ख्रिस्ताच्या शिल्पाच्या रूपाने मायकेल एंजेलोने आपले रूपच शिल्पित केले आहे, असा जाणकारांचा अंदाज आहे. इथली दुसरी दोन शिल्पे म्हणजे दिवस व रात्र आणि पहाट व तिन्हीसांजा यांचे मायकेल एंजेलोने केलेले मानवीकरण. रात्र व तिन्हीसांजा यांच्या शिल्पातील स्त्रीसुलभ मार्दवता आणि दिवस व पहाट यांच्या शिल्पातील पुरुषी सामर्थ्य शिल्पकाराने समर्थपणे दाखवले आहे. रात्रीच्या पायाखाली दाखवलेले घुबडाचे छोटे शिल्प शिल्पकाराची सूचकता व्यक्त करते.

फ्लोरेन्स शहरातील युफिजी आणि ॲकेडमी ही म्युझियम पाहायलाच हवीत. युफिजी म्युझियममध्ये राफेल, लिओनार्दो दी विन्सी व मायकेल एंजेलो यांची पेंटिंग्ज आहेत. ॲकेडमीमध्ये मायकेल एंजेलोने आपल्या वयाच्या 29 व्या वर्षी केलेले डेविड हे जगद्‌विख्यात शिल्प आहे. 14 फूटांचा डेव्हिड हा पूर्ण नग्नावस्थेत आहे. गोलिएथला मारण्यापूर्वी डेव्हिडने घेतलेल्या पोजमध्ये केलेले हे शिल्प म्हणजे मानवी पुरुषार्थाचे प्रतीक मानले जाते. मायकेल एंजेलो कधीच माप घेत नसे. ‘शिल्पाचे माप आपल्या डोळ्यांमध्ये आहे’, असे तो म्हणे. ‘‘प्रत्येक शिल्प पाषाणात बंदिस्त असते. शिल्पकाराचे काम फक्त पाषाणाचा अनावश्यक भाग काढून ते शिल्प पाषाणातून मुक्त करणे हेच असते.’’ हे त्याचे उद्‌गार त्याच्या निर्मितिप्रक्रियेची साक्ष देतात.

मायकेल एंजेलोला चित्रकलेहून शिल्पकला श्रेष्ठ वाटत होती. मायकेल एंजेलो हा डावखुरा होता. त्यामुळे तो सर्वसाधारण माणसांपेक्षा अधिक सर्जनशील होता. तो धार्मिक होता, पण वृत्तीने बंडखोर होता. प्रसंगी पोपशी वाद घालायलाही तो घाबरला नाही. शिल्पकलेत काळाला गोठवण्याची क्षमता असते, हे एंजेलोला माहीत होते. आपल्या प्रत्येक शिल्पात तो जीव ओतून ते सजीव करत असे. त्याचे शिल्प श्वासोच्छ्‌वास करते आहे, त्याच्या रक्तवाहिन्यांतून रक्त वाहते आहे, त्याचे स्नायू आकुंचन पावले आहेत, डोळे रोखून पाहत आहेत... असा आपल्याला भास होतो. मायकेल एंजेलोची त्रिमितीतील सर्व शिल्पे 3600 कोनातून पाहता-पाहता त्यांची रूपे बदलत जाऊन त्यांचे बहुरूप आपल्याला दिसते.

मायकेल एंजेलो वास्तुशिल्पज्ञ नव्हता, पण त्याने फ्लोरेन्समधल्या काही वास्तूंची आखणी केली. त्याने आरेखित केलेल्या या वास्तूंचे वैशिष्ट्य म्हणजे या वास्तू मोकळ्या आभाळाच्या घुमटाखालील रेखीव-आखीव शिल्पासारख्या दिसत होत्या. सन 1475 मध्ये जन्मलेल्या मायकेल एंजेलोला दीर्घायुष्य लाभले. तो रोममध्ये 1564 मध्ये मरण पावला. त्याच्या शवाचे दफन त्याच्या जन्मभूमीत- फ्लोरेन्समध्ये मोठ्या सन्मानपूर्वक करण्यात आले.

सन 1483 मध्ये जन्मलेला राफेल मात्र अल्पायुषी ठरला. वयाच्या 37 व्या वर्षी म्हणजे 1520 मध्ये त्याला मरण आले. अतिशय प्रतिभावंत चित्रकार असूनही लिओनार्दो दी विन्सी व मायकेल एंजेलो हे फार मोठे ताकदीचे चित्रकार व शिल्पकार समकालीन असल्यामुळे राफेलचे कर्तृत्व झाकोळून गेले. पण रंग व रेषांवर त्याचे प्रभुत्व होते. चित्रातील त्याची व्यक्तिचित्रे जिवंत व सजीव वाटायची. त्यांचे डोळे बोलके वाटायचे. त्यांची देहबोली, हातवारे तो अचूक चित्रित करायचा. त्या व्यक्तिचित्रांच्या मागे असलेल्या वास्तूंची त्याची रेखाटनेसुद्धा अतिशय रेखीव अशी होती. स्कूल ऑफ अथेन्स हे राफेलचे विख्यात चित्र व्हॅटिकन म्युझियममध्ये आहे. त्याचे मॅग्नालिन हे चित्रही प्रख्यात आहे. त्याचे लिओनार्दो दी विन्सीच्या मोनालिसा चित्राशी कमालीचे साम्य आहे. मोनालिसा चित्र काढताना लिओनार्दोने राफेलच्या या चित्रापासून स्फूर्ती घेतली आहे, असे जाणकार रास्तपणे म्हणतात.

सन 1452 ते 1519 असे 67 वर्षांचे आयुष्य लाभलेला लिओनार्दो दी विन्सी हा अष्टपैलू होता.  मोनालिसाप्रमाणे त्याचे ‘लास्ट सपर’ हे चित्र अजरामर आहे. आपल्या चित्रातील मानवी आकृती हुबेहूब याव्यात यासाठी तो दफनभूमीत जाऊन शवांचे विच्छेदन करून त्यांचा अभ्यास करत असे. वर्तुळात आणि चौकोनात बसवलेल्या दोन नग्न मानवी शरीराकृतींचे त्याचे रेखांकन प्रसिद्ध आहे. लिओनार्दो दी विन्सी हा केवळ चित्रकार नव्हता; तो वास्तुशिल्पज्ञ, इंजिनिअर, युद्धशास्त्राचा तज्ज्ञ व नगरनियोजकही होता. त्याने विमान बनवण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला होता. लिओनार्दोच्या नोंदवहीत अनेक यंत्रांची रेखांकने व नोंदी आहेत. आपल्या नोंदी इतरांना वा शत्रूला कळू नयेत, म्हणून लिओनार्दोने त्या सांकेतिक लिपीत लिहून ठेवल्या होत्या. कालांतराने ही लिपी म्हणजे आरशात अक्षरांचे जे उलटे प्रतिबिंब पडते त्याची लिपी, हे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि लिओनार्दोच्या नोंदी वाचणे शक्य झाले.

सर्जनशील होण्यासाठी काय करावे, याची सात सूत्रे लिओनार्दोने सांगितली आहे. लिओनार्दोच्या पहिल्या सूत्राप्रमाणे सर्जनशील व्यक्तीच्या अंगी अमाप उत्सुकता असायला हवी. ही उत्सुकता छोट्या मुलासारखी निरागस असावी. या उत्सुकतेबरोबरच ज्ञानाची आकांक्षा, नवे कौशल्य कमावण्याचा ध्यास या सूत्रात अंतर्भूत आहे. दुसऱ्या सूत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग करून प्रयोग करणे, प्रत्यक्ष अनुभव घेणे, अनुभवाचे अनुभूतीत रूपांतर करणे अपेक्षित आहे. तिसऱ्या सूत्रानुसार मेंदूच्या उजव्या व डाव्या दोन्ही भागांचा सारखाच उपयोग करणे- अर्थात तर्कशास्त्र व प्रतिभा या दोन्ही निसर्गदत्त देणग्यांची आराधना करण्याचा उपदेश तो करतो. चौथ्या सूत्रात ठोस, बुद्धिप्रामाण्यवादी चौकट सोडून संदिग्धतेकडे वळायला सांगतो. इथे लिओनार्दोचा उपदेश बौद्ध शिकवणुकीशी सुसंगत वाटतो. पाचव्या सूत्रात शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्यास तो सांगतो. सहाव्या सूत्रात डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या पंचेद्रियांनी अधिक संवेदनशील व्हावे, असे त्याला वाटते. सातव्या आणि शेवटच्या सूत्रात वेगवेगळ्या गोष्टींतला आंतरिक सुसंवाद शोधा, असे त्याचे सांगणे आहे.

लिओनार्दो हा केवळ सर्जनशील कलाकार नव्हता; सर्जनशीलतेच्या प्रक्रियेबद्दल त्याने विचारमंथन केले होते, याची साक्ष ही सात सूत्रे देतात. सर्जनशील प्रतिभावंत हे कधीच खेड्यात जन्माला येत नाहीत. ते नेहमी शहरात जन्माला येतात किंवा त्यांचे कर्तृत्व शहरात बहरून येते, असा सर्जनाच्या क्षेत्रातला नियम आहे. पंधराव्या शतकात लिओनार्दो दी विन्सी, राफेल आणि मायकेल एंजेलो या तीन प्रतिभावंतांची देणगी देऊन फ्लोरेन्स शहराने हा नियम सिद्ध केला.

फ्लोरेन्स शहराजवळच पिसा आहे. पिसाचा कलता मनोरा पाहण्यासाठी पर्यटक तिथे जातात. 1173 मध्ये बांधायला घेतलेला हा मनोरा 1372 मध्ये पूर्ण झाला. बांधता-बांधताच हा मनोरा उजवीकडे कलू लागला. आज मनोऱ्याची एका बाजूने उंची 183 फूट, तर दुसऱ्या बाजूने 185 फूट आहे. मनोरा साधारण 5 अंशाने कललेला आहे आणि तो पडू नये म्हणून त्याच्या पायात धातूचे मिश्रण घालून त्याचा पाया मजबूत करण्यात आला आहे. मनोऱ्याच्या बाल्कनीपर्यंत जाण्यासाठी 296 पायऱ्या आहेत. बाल्कनीवरून पिसा शहराचे विहंगम दृश्य दिसते.

पिसा शहरात जगातील श्रेष्ठ शास्त्रज्ञ 1564 मध्ये जन्माला आला. त्याचे नाव गॅलिलिओ. चर्चमध्ये लोंबकळणाऱ्या झुंबराचे त्याने निरीक्षण केले. त्यावरून घड्याळातील लंबकाचा शोध लावणे शक्य झाले. गॅलिलिओने पिसाच्या टॉवरवरील बाल्कनीवरून दोन वेगवेगळ्या वजनांचे दगड खाली फेकले आणि ते एकाच वेळी खाली पडतात, हे सिद्ध केले. हॉलंडमधील चष्मे करणाऱ्या तंत्रज्ञानाचे तंत्र शिकून त्याने टेलिस्कोपचा शोध लावला. मग पृथ्वी व अन्य ग्रह सूर्याभोवती फिरतात, हे त्याने साधार दाखवून दिले. साहजिकच चर्चच्या रोषाला तो पात्र ठरला. त्याला नजरकैदेत टाकण्यात आले. उत्तरायुष्यात गॅलिलिओ आंधळा झाला. गॅलिलिओला केलेल्या शिक्षेबद्दल हल्ली पोपने जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.

पिसा शहरात गॅलिलिओचा समकालीन असा एक श्रेष्ठ गणितज्ञ होऊन गेला, त्याचे नाव फिबोनासी. फिबोनासीने एका पेटीत सशाचे जोडपे ठेवले आणि त्याला पिल्ले होत राहिली, तर काही काळाने एकूण किती ससे पेटीत असतील याचे अंकगणित मांडले. ही संख्या 144 असेल, हे त्याच्या लक्षात आले. या प्रयोगावरून 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, 89, 144 असा फिबोनासी सिक्वेन्स तयार झाला. या सिक्वेन्सची गंमत अशी की, पहिल्या दोन अंकांनंतर येणाऱ्या पुढच्या दोन अंकांची बेरीज केल्यास त्याच्या उजवीकडचा अंक येतो. त्यानंतर पहिल्या चार अंकांनंतर एखाद्या अंकांला त्याच्या डावीकडच्या अंकाने भागल्यास 1:618 हा रेशो आणि एखाद्या अंकास  उजवीकडच्या अंकाने भागल्यास 0:618 हा रेशो येतो. ह्या रेशोंना गोल्डन रेशो म्हणतात.

चित्रकार-शिल्पकार हे गोल्डन रेशो काही वेळा जाणूनबुजून, तर काही वेळा अनवधानाने आपल्या चित्रात-शिल्पात वापरतात. ते रेशो वापरल्याने चित्राचे-शिल्पाचे सौंदर्य तर वाढतेच, पण द्विमितीतल्या चित्रांना किंवा भिंतीवर केलेल्या शिल्पातल्या शिल्पांना त्रिमितीचे आभासरूप प्राप्त होते. 1, 2, 3, 4, 5 या अंकगणिती श्रेणीप्रमाणे आणि 2, 4, 8, 16 या भूमिती श्रेणीप्रमाणे 1, 1, 2, 3, 5, 8 ही फिबोनासी श्रेणी गणितातच नव्हे, तर अन्य शास्त्र व कलेत अतिशय उपयोगी ठरली.

फ्लोरेन्स, पिसा शहरात कॅफेज-रेस्टॉरंट्‌स जागोजागी आहेत. इटलीत आइस्क्रीमऐवजी जेलेटो नावाचा पदार्थ चाखायला मिळतो. तो आइस्क्रीमसदृश असतो. वेगवेगळ्या चवीचे, फ्लेवर्सचे, रंगांचे जेलेटो कुरकुरीत त्रिकोणी कोनांतून खाणे हा अनोखा अनुभव आहे. इटलीत मिळणाऱ्या क्रॉसेंटचा दर्जाही अतिशय उत्तम असतो. भारतात मिळणारा मैदा युरोपमधल्या मैद्याएवढा दर्जेदार नसल्याने असा क्रॉसेंट बनवणे भारतात शक्य नसते. मऊ गरमागरम क्रॉसेंट, त्याच्या समवेत हवे तर लोणी किंवा ऑरेंज मार्मालेट आणि मग कडक-कडवट कॉफी- हा झाला इटालियन ब्रेकफास्ट. इटलीत अनेक जण कॅफेत आरामात गप्पा मारत बसलेले असतात. याला इटलीत the sweetness of doing Nothing असे म्हणतात. कोकणीत त्यासाठी सुशेगाद असा शब्द आहे. बर्ट्रांर्ड रसेलने आपल्या तत्त्वज्ञानात ‘काहीच न करण्याचे’ महत्त्व सांगितले आहे. रिकामा वेळ कसा घालवावा, हे अनेकांना कळत नाही. लेझर टाइम हा 21 व्या शतकाला भेडसावणारा फार मोठा प्रश्न होणार आहे. रिकामा वेळ कसा घालवावा हे न कळल्यामुळे बरेच मानसिक प्रश्न उद्‌भवतात. इटलीने हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवला आहे.

फ्लोरेन्समधून ट्रेनने आम्ही व्हेनिसला गेलो. व्हेनिस हा महासागरातला अनेक बेटांचा समूह आहे. सुमारे सातशे- आठशे वर्षांपूर्वी समुद्रामध्ये मातीची भर घालून- अर्थात रिक्लेम करून ही बेटे निर्माण झालेली आहेत. विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे त्या वेळी व्हेनिसला व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आणि व्हेनिसची ऐहिक व सांस्कृतिक भरभराट झाली. मार्को पोलो हा प्रसिद्ध व्हेनिशियन व्यापारी आपले जहाज घेऊन व्हेनिसमधून चीनपर्यंत गेला. त्याने लिहिलेले प्रवासवर्णन विश्वविख्यात झाले. सेंट मार्क चौक हा व्हेनिसचा गुरुत्वमध्य आहे. या चौकातच सेंट मार्क बासिलिका ही पुरातन बासिलिका आहे. तिचा दर्शनी भाग आणि अंतर्दर्शनी भाग अतिशय सुंदर आहे. या चौकात दशदिशांतील पारवे स्वच्छंदपणे उडत असतात, पर्यटकांच्या अंगाखांद्यावर बसत असतात. या पारव्यांशिवाय सेंट मार्क चौकाचे चित्र पूर्ण होणार नाही. व्हेनिसचे अंतरंग पाहण्यासाठी तुम्हाला पायाळू बनून मनसोक्त हिंडावे लागते. तिथे हिंडताना पावलोपावली कालवे पार करावे लागतात आणि कालवे पार करताना अर्थातच छोट्या कमानीच्या पुलांवरून जावे लागते. व्हेनिसमध्ये असे 400 पूल आहेत.

यामधला हुंदक्यांचा किंवा सुस्काऱ्यांचा पूल (ब्रिज ऑफ सायज) सुप्रसिद्ध आहे. हा पूल उंचावर आहे आणि तो दोन इमारतींना दुसऱ्या मजल्यावर जोडतो. या इमारतींपैकी एक तुरुंगाची आहे. तुरुंगात जाताना कैद्यांना या पुलावरून जावे लागत असे, त्या वेळी ते सुस्कारे सोडत असत. त्यावरून या पुलाला हे नाव पडले. व्हेनिसमधला दुसरा पूल म्हणजे रिआल्टो ब्रिज. या पुलावर एके काळी बँकर्स भेटत असत आणि आपले आर्थिक व्यवहार पार पाडत असत. रिआल्टो ब्रिज पार करून थोडे उजवीकडे वळले की, व्हेनिसमधला माशांचा बाजार लागतो. व्हेनिस ही सामुद्रधुनीच असल्यामुळे तिथे ताज्या-फडफडीत माशांची रेलचेल असते. हे विविध प्रकारचे मासे पाहून माझ्यासारखा खवय्याच्या जिभेला पाणी सुटले नाही तरच नवल!

व्हेनिसमध्ये फिरताना अनेक छोट्या-छोट्या गल्ल्यांतून जावे लागते. त्यांना इथे ‘कॉली’ म्हणतात. काही वेळा इमारतीच्या खालील भुयारी मार्गातून जावे लागते. अशा मार्गांना ‘सोतोपोर्तेगो’ असे नाव आहे. व्हेनिसमध्ये पायी फिरून कंटाळा आला की, इथल्या ‘गोंडोला’त बसायचे आणि कालव्यांमधून जलसफर करायची. येथील गोंडोला चालवणारा सुंदर वेश करून होडीवर उभा असतो आणि होडी वल्हवता-वल्हवता मस्त लोकगीत गातो. गोंडोला कधी छोट्या जलप्रवाहातून जातो, तर कधी मोठ्या कालव्यातून. छोट्या जलप्रवाहाला इथे ‘रिओ’ म्हणतात, तर मोठ्या कालव्याला ‘कॅनॉल’ म्हणतात. गोंडोलातून फिरताना अष्टदिशांतून येणारा थंडगार वारा गात्रे सुखावतो. जलपात्रातून सफर करताना पात्राच्या दोन्ही किनाऱ्यांवरील  प्रियदर्शनीय वास्तूंचे दर्शन घडते. या वास्तूंचे वास्तुशिल्प बायझेंटाईन किंवा गॉथिक शैलीत केलेले आहे. दुरून जलसन्मुख सांता मारिया चर्च, त्रिकोणी कस्टम हाऊस, ॲकेडेमिया गॅलरी या वास्तू दिसतात.

व्हेनिसला लिओनार्दो दी विन्सीने केलेल्या यंत्रांचा, रेखाटनाचा व नोंदवह्यांचा म्युझियम आम्ही पाहिला. त्याशिवाय ॲकेडेमिया गॅलरीत जाऊन रेनासान्सकालीन पेंटिंग्ज पाहिली. व्हेनिसमध्ये चित्रपट महोत्सव, आर्ट्‌स फेस्टिव्हल, बिनालेसारखा द्विवार्षिक महोत्सव, बोटींच्या शर्यती, कार्निव्हल असे सण-उत्सव-महोत्सव वर्षभर साजरे होतात. यातील कार्निव्हलमध्ये व्हेनिसचे नागरिक आपल्या तोंडावर वेगवेगळे मुखवटे घालून मिरवणुकीत सामील होतात. विविध प्रकारचे, रंगांचे, आकारांचे मुखवटे हे व्हेनिसचे वैशिष्ट्य आहे. मुखवटा हा व्हेनिसचा सोव्हिनीरही बनला आहे. व्हेनिसला होड्या व जहाजे तयार करण्याचे कारखाने आहेत. मुरानो बेटावर काचेचे कारखाने आहेत. व्हेनिसचे कारागीर अनेक शतकांपासून काचनिर्मितीत पारंगत झालेले आहेत.

व्हेनिसहून रोमपर्यंतचा रेल्वेचा प्रवास चार-साडेचार तासांचा आहे. रोमला पोहोचेपर्यंत तिन्हीसांजा झाल्या होत्या. रोमला दोन-तीन दिवस आमचा मुक्काम होता. बरीच स्थळे पाहायची होती. टिबर नदीच्या काठी रोम शहर वसलेले आहे. रोम शहरात फिरताना असा भास होतो की, आपण 2700 वर्षांच्या पायऱ्या उतरून एखाद्या खोल भुयारात गाडलेल्या पुरातन शहरात तर जात नाही ना? रोम शहर बहुरूपी आहे. कामरूपी आहे. दिवसा संबंध शहरच एक म्युझियम बनून जाते, संध्याकाळी शहराचे एक शॉपिंग सेंटर बनते, तर रात्री शहररूप बदलून ओपन एअर रेस्टॉरंट बनते. शहराच्या पुरातन पोतड्यात असे अनेक मुखवटे आहेत. चौकाचौकांवर रूप बदलणारा रोम हा कॅलिडोस्कोप आहे- शोभादर्शक आहे. रोम दिवसा उजेडात पाहावे तसे रात्री दिव्यांच्या लखलखाटातही पाहावे. रोम ही खरेच ‘सा रम्या नगरी’ आहे. ‘‘मला विटांनी बांधलेले रोम सापडले. पण मी तुमच्यासाठी संगमरवरी रोम ठेवत आहे.’’ असे उद्‌गार रोमचा सम्राट ऑगस्टसने काढले. ‘रोम काही एका दिवसांत बांधून झाले नाही’ अशीही म्हण प्रचलित आहे, ती उगीच नाही.

दुसऱ्या दिवशी रोमची भ्रमंती सुरुवात केली, ती स्पॅनिश स्टेप्सला भेट देऊन. स्पॅनिश स्टेप्स या रोममधील एका टेकडीवर असलेल्या चर्चकडे जाण्यासाठी केलेल्या पायऱ्या. पण या पायऱ्या वास्तुशिल्पतज्ज्ञाने इतक्या रेखीवतेने बांधल्या आहेत, की त्याचे सौंदर्य अक्षरश: ऊतू जात आहे असे वाटावे ! स्पॅनिश स्टेप्सवर पर्यटक बसले की, या पायऱ्या सालंकृत होतात. रंगीबेरंगी होतात. त्यांचे सौंदर्य द्विगुणीत- त्रिगुणीत- शतगुणीत होते. स्पॅनिश स्टेप्सवर ‘रोमन हॉलीडे’ या गाजलेल्या चित्रपटाची नायिका ऑड्री हेपबर्न नायकाला भेटते, त्याची आठवण झाली. स्पॅनिश स्टेप्सवर बसले, की उठावेसे वाटत नाही आणि मोह होतो- वय विसरून प्रेमात पडावे!

त्यानंतर आम्ही सरळ व्हॅटिकन गाठले. व्हॅटिकन हे रोम शहराचा भाग असले तरी, राजकीय दृष्ट्या तो स्वतंत्र देश आहे. व्हॅटिकनमध्ये जिथे येशू ख्रिस्ताच्या शिष्याला पीटरला हौतात्म्य आले, तिथेच सेंट पीटर कॅथेड्रल बांधण्यात आले आहे. त्याच्या भोवतालचे पांढरे खांब, सभोवतालचा सारा परिसर प्रशस्त आणि प्रसन्न आहे. त्याची आखणी मायकेल एंजेलोने केली आहे. सेंट पीटर कॅथेड्रलचा डोम फ्लोरेन्सच्या मारिया ऑफ द फ्लावर कॅथेड्रलपेक्षा लहान असला तरी, त्याचे सौंदर्य फ्लोरेन्सच्या कॅथेड्रलच्या डोमपेक्षा तिळमात्रही कमी नाही. अतिशय प्रमाणबद्ध असा हा घुमट निळ्या आकाशाखाली मायकेल एंजेलोने तयार केलेले जणू रेखीव शिल्पच आहे!

सेंट पीटर कॅथेड्रलमध्ये आत गेल्यावर उजवीकडे मायकेल एंजेलोचे अजरामर पिएटा हे शिल्प आहे. व्हर्जिन मेरीच्या मांडीवरील क्रूसावरून नुकतेच उतरवलेले ख्रिस्ताचे कलेवर या संगमरवरी शिल्पात मोठ्या तन्मयतेने एंजेलोने कोरले आहे. व्हर्जिन मेरीच्या करुणार्द्र डोळ्यांत थिजलेले अश्रू त्याने या पाषाणी शिल्पात गोठवले आहेत. व्हॅटिकन म्युझियममध्ये राफेलचे स्कूल ऑफ अथेन्स हे चित्र पाहायला मिळते. सिस्टीन चॅपेलमध्ये मायकेल एंजेलोची फ्रेस्को पेंटिंग्ज आहेत. चॅपेलच्या प्रमुख भिंतीवर शेवटच्या निवाड्याचे- अर्थात लास्ट जजमेंटचे चित्र आहे. त्याच्या डावीकडच्या व उजवीकडच्या भिंतीवरच आणि चॅपेलच्या लंबगोलाकार छतावर मायकेल एंजेलोने बायबलमधल्या अनेक प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली आहेत. प्रकाशाची निर्मिती ईश्वर करतो, पाण्याची निर्मिती करतो, स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती करतो, आदम आणि इव्ह यांना घडवतो, पृथ्वी महापुरात बुडते, नोहा पशूपक्ष्यांना आपल्या होडीत घेऊन वाचवतो- अशी ही  विविध चित्रे आहेत. सिस्टीन चॅपेलमधली ही रंगचित्रे हा कलेच्या इतिहासातील चमत्कारच आहे.

एंजेलोने या चित्रातील येशू ख्रिस्त व व्हर्जिन मेरी सोडून इतर सर्व स्त्रीपुरुष हे नग्नावस्थेत चित्रित केले होते, पण पोपला ते आवडले नाही. या चित्रातील स्त्री-पुरुषांचे नग्न अवयव झाकावेत, असे पोपने त्याला सांगितले. एंजेलोने त्याला नकार दिला आणि हे स्त्री-पुरुष नग्न असले पाहिजेत याचे रास्त कारण पोपच्या नजरेस आणले. शेवटी एंजेलोच्या मृत्यूनंतर या चित्रातील स्त्री-पुरुषांचे नग्न अवयव फिगच्या पानांची चित्रे काढून अन्य चित्रकारांकरवी पोपने झाकून घेतले.

व्हॅटिकनजवळच पॅन्थॉन नावाची 2000 वर्षांची पुरातन वास्तू आहे. एवढी पुरातन वास्तू असूनही पूर्णपणे सुरक्षित आणि जशीच्या तशी असलेली ही रोममधील व जगातीलही एकमेव वास्तू असावी. पॅन्थॉनच्या दर्शनी भागाचे सौंदर्य शब्दातीत आहे. पॅन्थॉनच्या वास्तूची रचना वास्तुशिल्पज्ञांनी अशी केली आहे की, वर्षाच्या विशिष्ट दिवशी पॅन्थॉनच्या अंतर्भागातील देव्हाऱ्यावर सूर्यकिरणे पडतात. पॅन्थॉनकडून आमचे पाय रोमन फोरमकडे वळले. रोमन फोरम म्हणजे रोममधली बाजारपेठ. इथेच रोममधली मंदिरे आणि सिनेट होते. एका उंचवट्यावरून खालच्या रोमन फोरमचे दृश्य अतिशय विहंगम दिसते. रोमन सम्राट ज्युलियस सीझरचा खून झाला. इथेच मार्कस तुलियस सिसेरो हा रोममधला विचारवंत आपली प्रभावी भाषणे करत असे.

इथेच वयाच्या 28 व्या वर्षी सिसेरोचाही खून झाला. पण मरण्यापूर्वी सिसेरोने अनेक ग्रंथ लिहून ठेवले, त्यात वक्तृत्वाचे शास्त्र व कलेवर काही सूत्रे त्याने लिहून ठेवली आहेत. सिसेरोचे पहिले सूत्र म्हणजे, उत्स्फूर्त भाषण कधीच करू नये. भाषणाची भरपूर पूर्वतयारी करावी. दुसरे सूत्र आहे- भाषणाचा हेतू काय, आपण भाषण कोणत्या श्रोत्यांपुढे करणार आहोत याचे भान-अवधान ठेवून भाषणातील मुद्दे ठरवावेत. आपल्या मुद्यांची पायरीपायरीने विभागणी करावी, हे तिसरे सूत्र आहे; तर भाषण न वाचता ते स्मरणशक्तीच्या जोरावर आठवून करावे, हे चौथे सूत्र आहे. त्याचे पाचवे सूत्र- भाषणाच्या डिलिव्हरीबद्दल आहे. आवाजाचे आरोह-अवरोह, देहबोली, हातवारे हे सगळे अतिशय महत्त्वाचे असतात. सहावे सूत्र भाषेच्या शैलीबद्दल आहे. भाषणात भाषेची शैली प्रभावी हवी. काही वेळा त्यात शब्दांची किंवा वाक्यांची पुनरावृत्ती करावी. भाषेत सोपेपणा, सुबोधपणा असावा. विनोदबुद्धी असावी. श्रोत्यांच्या भावनेला आवाहन करणारी भावनात्मकता असावी.

रोमन फोरमजवळच रोममधला प्रख्यात कोलोसियम आहे. कोलोसियम म्हणजे रोमनकालीन स्टेडियम. इथे प्राण्यांच्या तसेच प्राणी व गुलाम- ज्यांना ग्लॅडिएटर्स म्हटले जाई- यांच्या झुंजी होत. या झुंजी हजारो लोक पाहत. बऱ्याच वेळा या झुंजी प्राणघातक होत. जनावरांचा व गुलामांचा त्यात मृत्यू होई. खेळांचे मानसशास्त्र रोमन लोकांना माहीत होते. युद्धाचा आनंद लोकांना घेता यावा, म्हणून शांततेच्या काळात युद्धाला पर्याय म्हणून खेळांचा शोध लागला. भारतात बौद्ध भिक्षूंनी बुद्धिबळाचा शोध याच मानसिकतेतून लावला. रोममधील कॅटकुम्बस म्हणजे भुयारी दफनभूमी. पण आम्ही या कॅटकुम्बस पाहू शकलो नाही. रोमन लोकांनी या दफनभूमी जमिनीखाली का केल्या, हेदेखील गूढच आहे.

रोमचे वास्तव्य संपता-संपता आम्ही ट्रेव्ही फाऊंटनला भेट दिली. त्याला ट्रेव्ही हे नाव ‘ट्रेव्ही’ या मुलीच्या नावावरून पडले, का हे फाऊंटन तीन रस्त्यांवर आहे म्हणून पडले- याचा वाद आहे. अखंड वाहणारा नितळ निळ्या पाण्याचा झरा इथे आहे. कारंज्याखाली जलाशय आहे. ट्रेव्ही फाऊंटनची श्रद्धा मोठी रंजक आहे. प्रत्येक श्रद्धेत थोडीशी अंधश्रद्धा असली, तरी त्यामुळे एखाद्या व्यक्तीभोवती, स्थळाभोवती किंवा वास्तूभोवती एक वलय-ऑरा निर्माण होतो, हे निर्विवाद. ट्रेव्ही फाऊंटनकडे पाठ करून त्याच्या जलाशयात नाणे फेकून रोममध्ये परतण्याची इच्छा मनात बाळगल्यास तुम्ही रोममध्ये हमखास परतता, अशी ती श्रद्धा आहे. आम्हीही ट्रेव्ही फाऊंटनकडे पाठ केली आणि त्याच्या खळाळत्या निळ्या पाण्यात नाणी फेकताना ‘पुनरागमनायच’ अशी आकांक्षा व्यक्त केली, हे सांगायलाच नको!

Tags: tourism travel blog paryatan data damodar nayak roman holiday desh videsh weekly sadhana 27 january 2018 sadhana saptahik प्रवासवर्णन पर्यटन दत्ता दामोदर नायक रोमन हॉलिडे देश-विदेश साधना साधना साप्ताहिक अंक 27 जानेवारी 2018 साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके