डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कमला भसीन : स्त्रीवादी चळवळीचा अमूल्य शिलालेख

‘स्त्रीवाद’ म्हणजे पुरुष आणि स्त्री यांमधील युद्ध नाही. कित्येक वेळा पितृसत्ताक विचारांच्या स्त्रियांना काय केले, म्हणजे आपला होणारा  त्रास कमी होईल आणि कोणत्या रुढी-परंपरा सोडल्या तर आपण त्रासातून मुक्त होऊ? हेदेखील समजत नाही. मग स्त्रियांना त्रास तर होतो. त्यातून बाहेर कसे पडायचे तो मार्ग सापडत नाही. अशा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या विचारांतून, आपल्या स्टेज शोमधून आपले विचार पोहोचवले. हा लढा विचारांचा आहे. हे त्या वेळोवेळी सांगायच्या. भारतात नाही तर बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशातील स्त्रियांच्या प्रश्नांसाठी त्या ‘संगत’ या संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्यरत होत्या.

कमलाताई, तू गेलीस. अगदी पोरकं-पोरकं वाटतं आहे बघ. आपलं माणूस गेल्याच्या वेदना. आपलं माणूस खरं कोण असतं बरं? जे आपल्या बाजूने बोलते, आपल्या हक्कासाठी लढते. अगदी स्मिता गेल्यावर आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली ती तशीच भावना तुझ्यासाठीपण आहे. स्मिता माझी सखी. एका बेंचवर बसायचो, एका ताटात जेवायचो, सायकलवर सोबत जायचो, कायम सोबत राहिलो. हसलो. प्रसंगी रडलो. भरभरून आयुष्य जगलो. ती गेली नि मी खूप खूप रडले. ‘रडणे’ या शब्दाला लाज वाटावी इतकी! तसे तू गेल्यावर झाले, पण न रडता तुला वाचत, ऐकत बसले. पुन्हा पुन्हा तुला मनात साठवत होते. कळत होते- तू काळाच्या पडद्याआड शरीराने गेली आहेस. म्हणून तुला भरभरून साठवू पाहत होते. माझ्यात, माझ्या स्त्री असल्याच्या अंशात! तशी तू आयुष्यभर पुरशील इतकी माझ्या श्वासांत, विचारांत, जगण्यात भरली आहेस. माझ्याच काय, माझ्या सर्व मैत्रिणींच्या मनामनांत तू आहेस. तुझ्यासारखे काही अंश जरी जगता आले तरी हे जीवन धन्य होईल!

कमलाताई काय काम करायच्या? अगदी आपल्या घरापासून नाही, तर आपल्या घराच्या चार-पाच घरं सोडून चालणाऱ्या घरातील हिंसेपासून सुरुवात करते म्हणजे नवऱ्याने बायकोला मारणे हा प्रकार कुठे कुठे आढळतो? झोपडपट्टीत आपण सर्रास पाहतो. ती बाई बिचारी दिवसभर कष्ट करते. पैसे कमावते, दोन वेळेच्या जेवणासाठी! तर तो तिला दारूसाठी पैसे मागतो. नाही दिले तर ‘ती’ मार खाते. हे चित्र आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण मध्यम वर्गीय घरात ती मार खाते. कारण त्याला पाहिजे असते, ते तिने केलेले नसते, त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या हुकूमानुसार काही झाले नाही, तर रागा-संतापाच्या भरात तो तिच्यावर हात उचलतो. उच्च मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये तिथेही तो तिला मारतो. कारण ती सुंदर असते. संशय त्याच्या डोक्यात घर करून राहतो. मग संशयापोटी तो तिच्यावर हात उगारतो. स्थितीनुसार, स्थळानुसार, व्यक्तीनुसार कारणे बदलत जातात. पण मार मात्र तीच खात असते. याची कारणे काय असावीत? या समस्येच्या मुळाशी कमलाताई जातात. त्याचा शोध घेऊन, त्यावर उपायही त्या सहज सांगून जातात.

यात दोष पुरुषांचा असतो. पण त्याच्या मुळाशी गेले तर लक्षात येते की पितृसत्तात्मक विचारांचा दोष आहे. पितृसत्तात्मक विचार एक सामाजिक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमुळे महिलांना कमजोर इन्फिरियर समजले जाते, तर पुरुषांना उत्तम सुपिरियर समजले जाते. तुम्ही कोणावर हात उगारू शकता? कोणताही पुरुष आपल्या बॉसवर हात उगारत नाही. आपल्यापेक्षा मोठ्यांवर आपला हात उगारला जात नाही. तर आपल्यापेक्षा कमजोर लोकांवरच आपला हात उगारला जातो. अगदी रोज विचारपूर्वक पितृसत्ताक विचार सर्वांच्याच मनावर बिंबवले जातात. रक्षाबंधनाच्या वेळी माझा भाऊ माझ्यापेक्षा कितीही लहान असला तरी त्याला मी राखी बांधावी, असे घरातून सांगितले जाते. रोजच्या जगण्यात ‘मी त्याची काळजी घेत असते. त्याची रक्षा करत असते. अशा वेळी त्याने मला राखी बांधावी’ किंवा ‘हा सण दोघांनी एकमेकांना राखी बांधून साजरा करावा.’ याला भाऊबीज न म्हणता ‘बहीण भाऊबीज’ असे म्हटले तर खऱ्या अर्थाने हा बहीण-भावांचा सण साजरा होईल.

दुसरे उदाहरण आपले ज्याच्याशी लग्न होते त्याला ‘पती’ असे म्हणतात. याचा अर्थ काय होतो? मालक उदाहरणार्थ करोडपती-लखपती म्हणजे काय? करोडोंचा मालक, लाखांचा मालक. तसे माझा ‘पती’ म्हणजे माझा ‘मालक!’ आता एक मालक म्हटले की दुसरा सेवक होणारच. मालक आणि सेवक कुठे समान पातळीवर असतात का? म्हणजे रोजच्या जीवनात जर असे शब्द येत असतील तर, त्याचाही मनात  येतेच की मी मालक आहे. मला पाहिजे तसे मी हिला ठेवू शकतो. जर का हिने माझे नाही ऐकले तर ते ऐकण्यासाठी मी बळजबरी करू शकतो. तिला मारू शकतो. कारण मी मालक आहे!

हा जो विचार आहे तो बदलायचा कसा? महिलांच्या बाबतीत विचार केला तर जवळपास दीडशे वर्षांपासून स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी लढा चालू केलेला आहे. मग आता बदल कोणात करायचा? नक्कीच पुरुषांमध्ये करावा लागेल. कारण तुम्ही जर समाजात नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हिंसा कोण करते? पुरुषच! घरी कोण कोणाला मारते? पुरुषच त्यांच्या बायकोला मारत असतात. हे काही जन्मजात निर्माण झालेले नाही. पितृसत्ताक विचार, संस्कार, रूढी-परंपरा, यांतून हे निर्माण झाले. तसं जर असतं तर महात्मा गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले जन्माला आलेच नसते. जे काही उर्वरित 60 टक्के पुरुष हिंसा करत नाही. ते मर्दच असतात ना!

पितृसत्ताक  विचार हा दोघांनाही घातक आहे. एखाद्या पुरुषाची आई मरते तेव्हा त्याला रडायचं असतं पण रडता येत नाही. त्याला लहानपणापासून शिकवलं जातं. तू पुरुष आहेस, तू मर्द आहेस, तू रडायचं नाही! तू घाबरायचं नाही. कशा कशालाच घाबरायचं नाही. अंधाराला घाबरायचं नाही. अजून कोणती भीती वाटली तरी, तू व्यक्त व्हायचं नाही! तुला जरी आवडत असेल आईबरोबर स्वयंपाक करायला, तरी तू स्वयंपाक करायचा नाही.

कारण तू पुरुष आहेस. ही कामे बाईची आणि ही कामे पुरुषी हे तुम्हीच लहानपणापासून ठरवत गेलात. तसेच पोशाखाच्या बाबतीतही आहे. स्त्रिया रंगीत कपडे घालतात. पुरुष ठरावीक रंग वापरताना दिसतात. जर एखाद्याला साडी नेसाविशी वाटली तर नेसता येणार नाही कारण तो मुलगा असतो आणि त्याला मोठं होऊन पुरुष व्हायचे असते. मुलांनी छोटे कपडे घातले तरी चालतील, परंतु मुलींनी अंगभर कपडे घालून स्वतःला झाकून पाकून ठेवले पाहिजे. अशा प्रकारे तुम्हीच लहान मुलांच्या मनावर भेदभाव बिंबवत गेलात. त्यांना भावनांचे व्यवस्थापन करायला शिकवलेच नाही. तरुणपणात एखाद्या मुलीने प्रेमात नकार दिला तर तो नकार न पचवता, तो तिच्या तोंडावर ॲसिड फेकून तिला तिच्याकडे कोणी बघूच नाही, या भावनेने विद्रूप करतो. पितृसत्ताक विचार पुरुषांना अमानवीय करत आहेत. म्हणून आई गेल्यावरसुद्धा त्याला रडता येत नाही. कारण तो मर्द असतो.

आता तुम्ही म्हणाल, गुन्हा करणारा जेवढा गुन्हेगार असतो, तेवढाच सहन करणारापण गुन्हेगारच असतो. कारण महिला आपल्या पतीचा मार खातात. त्या विरोध का करत नाहीत? कारण  मारणाऱ्याला आणि  मार खाणाऱ्याला एकाच प्रकारचे संस्कार, रूढी, परंपरा, धर्म, संस्कृती यात वाढलेले असतात. कुटुंबातील मोठी माणसे जे सांगतात तेच पुरुष ऐकतात आणि स्त्रियापण.

यातून बाहेर पडायचे असेल तर कमलाताई उपाय सांगतात. तिने जर वडिलांना मारणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगितले की सासरी मला मारझोड होत आहे. तेव्हा वडिलांनी जर तिला म्हटले की- तुझे घर, तुझी माणसं तुझ्यासोबत आहेत. तू इकडे निघून ये. तुला मार खाण्याची, त्रास सहन करण्याची गरज नाही. मुलींना हुंडा देण्यापेक्षा त्यांना प्रॉपर्टी द्या. ज्यांना कोणी नाही किंवा त्यांना माहेर नाही, अशा स्त्रियांसाठी शेल्टर होम असणे गरजेचे आहे. स्त्रियांच्या बाजूने अशा गोष्टी असतील तर स्त्रिया नक्कीच मार खाणार नाहीत. हिंसा सहन करणार नाहीत.

मुलगा आणि मुलगी हा भेदभाव अगदी लहानपणीच होतो. मुलाला शिकायला प्रोत्साहित करतात. तसे मुलगी परक्याचे धन म्हणून मुलीचे शिक्षण करण्यात अनेक कुटुंबांत उत्साहाचे वातावरण नसते. अशाच एका लहान मुलीला तिचे वडील म्हणतात- ‘‘कशाला गं तुला पाहिजे शाळा?’’ तेव्हा ती लहान मुलगी बोलते, ‘‘मला विचारले म्हणून मी सांगते- कमलातार्इंच्या कवितेच्या रूपात...
‘क्यों कि मैं लडकी हूं, मुझे पढना है
सपनो ने ली अंगडाई है मुझे पढना है
कुछ करने की मन में आई है सो पढना है
क्यों कि मैं लडकी हूं मुझे पढना है
मुझे दरदर नही भटकना है मुझे पढना है
मुझे अपने पाँवों पर चलना है सो पढना है
मुझे अपने डर से लढना है सो पढना है
मुझे अपने आपही घडना है सो पढना है...’

मी जर मुलगा असते तर मला शिकायची गरज पडली नसती. पण मी मुलगी आहे ना! म्हणून मला शिकावेच लागेल! शिकल्यामुळे मला अनेक गोष्टी करता येतील. मला माझी पायवाट सापडेल. मला माझे आभाळ सापडेल. महिला एकटी असणे स्वतंत्र असणे हे तितकेसे सामाजिक दृष्ट्या चांगली गोष्ट आहे हे कोणी मान्यच करत नाही. चांगल्या सुसंस्कृत मुली, एकट्या घराबाहेर पडत नाहीत. कारण त्यांना ‘आवारा, वाया गेलेल्या’ या शब्दांची भीती वाटते. मग स्वतंत्र असणे तर शक्यच नाही. पण आत्ताच्या काळात या सर्व संकुचित विचारांना मागे टाकत मुली जगता आहेत. मला काय शोभा देते आणि काय नाही, ते मी ठरवीन. मला हे बिलकूल शोभत नाही की मी माझे कन्यादान करून घेतले. मला एकटीने स्वयंपाक करायला बिलकुल आवडत नाही. सोबत मला माझा जीवनसाथी हवा. जगताना मला सोबत हवी, पण कुठे यायला जायला मला सोबत नको. कारण एकटी जन्माला आले, एकटी मरणार! मग मी माझी काम करताना मला सोबत कशाला पाहिजे?

ज्या स्त्रियांचे पती या जगात नाहीत त्यांना तुम्ही एकटे आहात असे कायम जतवतात. ही एकटेपणाची व्याख्या कमलातार्इंना मान्यच नाही. त्या म्हणतात, ‘‘माझ्यासोबत माझा भाऊ आहे. वडील आहेत. मैत्रिणी आहेत. तेथे मी काम करते. तेथील माझे सहकारी आहेत. मग मी एकटी कशी?’’ असे प्रश्न कमलाताई समाजाला विचारतात. ‘स्त्रीवादा’ने मला खूप जबाबदार बनवले आहे. मला माणूस म्हणून रुजता आले. तसं पाहता कोणताही माणूस पूर्णपणे स्वतंत्र होऊ शकत नाही. एकमेकांवर अवलंबून राहणे यातच पूर्णत्व असते!

निसर्गाने स्त्री-पुरुषांत साम्य जास्त दिले आहे. फरक फक्त दोन-तीन आहेत. ते फरक शारीरिक फरक आहेत. ते प्रजननासाठी केले आहेत. यासाठी फरक केला नाही की कोण सत्ता चालवेल? कोण मोटरसायकल चालवेल? कोण स्वयंपाक करेल? जगात सात बिलियन लोक आहेत. पण त्यातसुद्धा दोन माणसं एकसारखी नाहीत. निसर्ग भेद बनवतो. पण भेदभाव करत नाही. निसर्गाने कधीच असे म्हटले नाही की हत्ती उंदरापेक्षा जास्त चांगला आहे. गुलाब झेंडूपेक्षा जास्त चांगला आहे. पुरुष स्त्रीपेक्षा जास्त चांगला आहे किंवा स्त्री पुरुषापेक्षा जास्त चांगली आहे. निसर्गाने केलेल्या भेदाला समाज भेदभावात परिवर्तित करतो. निसर्ग आपल्याला मानव बनवू पाहतो आणि कोणताही शिक्का आपल्यावर मारून पाठवत नाही. जेवढेपण लेबल आहे ते आपण लावतो आहोत. तू पुरुष आहेस,  तू स्त्री आहेस, तू श्रीमंत आहेस, तू गरीब आहेस, तू हिंदू आहेस, तू शीख आहेस, तू मुसलमान आहेस, तू दलित आहेस, तू ब्राह्मण आहेस. आता हेच बघा ‘माणूस’ म्हणून आपली किती मोठी ओळख आहे. ती पुसून या भेदभावात आता आपण अडकलो आहोत.

‘स्त्रीवाद’ म्हणजे पुरुष आणि स्त्री यांमधील युद्ध नाही. कित्येक वेळा पितृसत्ताक विचारांच्या स्त्रियांना काय केले, म्हणजे आपला होणारा त्रास कमी होईल आणि कोणत्या रुढी-परंपरा सोडल्या तर आपण त्रासातून मुक्त होऊ? हेदेखील समजत नाही. मग स्त्रियांना त्रास तर होतो. त्यातून बाहेर कसे पडायचे तो मार्ग सापडत नाही. अशा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या विचारांतून, आपल्या स्टेज शोमधून आपले विचार पोहोचवले. हा लढा विचारांचा आहे. हे त्या वेळोवेळी सांगायच्या. भारतात नाही तर बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशातील स्त्रियांच्या प्रश्नांसाठी त्या ‘संगत’ या संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्यरत होत्या.

मानवाधिकार, शिक्षण आणि महिला अधिकाऱ्यासाठी असणारी त्यांची निष्ठा अद्वितीय आहे. तर्कसंगत अभ्यासूपणे त्या व्यक्त व्हायच्या, त्यांचे विवेचन अगदी सहज असायचे. पितृसत्ता नैसर्गिक नाही. त्यामुळे ती बदलू शकते. हे बुद्धिप्रामाण्यवादाने त्या सांगत. त्यामुळे वाचकांचा, श्रोत्यांचा विवेक जागा होऊन त्यांना त्यांची वाट सापडे. ती वाट त्यांना भेदभाव न करता मानवतेकडे नेणारी आहे. त्यांचे विचार आणि सहज समजून सांगण्याची पद्धत, वेगवेगळी उदाहरणे देण्याच्या सवयीमुळे त्यांचा विचार एकदा जरी ऐकला तरी मुळापर्यंत जातो. अगदी झाडाला पाणी द्यावे तसेच. आपली मुळे घट्ट रोवली जातात तेव्हा वाटते कित्येक शतके लागली असतील या कमलातार्इंना घडवायला.

फाडफाड इंग्रजी बोलणारी, आपले विचार स्पष्टपणे मांडणारी, सहज समजावणारी आपली ही ताई मूळची पंजाबची. आता तो पंजाब पाकिस्तानात आहे. बालपणीचे शिक्षण राजस्थानातील खेड्यात झाले. एका वर्गात चार इयत्तांचे विद्यार्थी आणि शिकवायला एकच शिक्षक. अशा अवस्थेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे अकरा महिने परदेशांत नोकरी करून राजीनामा दिला. आपला गाव त्यांना बोलवत होता. जिथे त्या शिकल्या त्या सरकारी शाळा, कॉलेज त्यांच्यात बदल करण्याची, त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यातील चाळीस वर्षे समाजसेवा केली. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावले तर त्यांची मुलगी सत्ताविसाव्या वर्षी हे जग सोडून गेली. मुलगा लसीच्या निमित्ताने शरीरात रिॲक्शन होऊन अपंगत्व आले, ते कायमचे. ह्या घटना त्यांच्या आयुष्यात कायम न विसरता येण्याजोग्या आहेत.

अत्यंत प्रतिकूल रूढी-परंपरा प्रिय असलेल्या वातावरणात, आपली मुळे आधी भक्कम रोवून, मोठ्या धाडसाने त्या आपल्या विचारांची मशाल घेऊन, प्रत्येकाच्या विचारांना प्रकाशमान करत होत्या. त्यांनी आभाळाएवढे कार्य केले. ते कित्येक पिढ्यांना आता पुढे जायला सुखकर मार्ग सापडणारे ठरेल. ‘स्त्रीवादी’ चळवळीचा इतिहास लिहायला घेतला तर त्यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. ‘कमला भसीन’ स्त्रीवादी चळवळीतील एक अमूल्य शिलालेख आहे.

‘हम औरते जडों सी है और हमारी अपनी जडें भी है
इन्हीं जडों पर खडे हैं हम इन्हीं की बदौलत
लडे और चुपचाप आगे बढे हैं हम...!’

(गेल्या आठवड्यात कमला भसीन यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत.
- संपादक)

 

Tags: स्त्रीवादी चळवळ कमला भसीन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके