डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘हिंदुत्ववाद- एक फेरमांडणी’ : प्रतिक्रियांना उत्तरे (उत्तरार्ध)

यापुढचा मोठा धोका म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्यांचा आहे, तसा इतिहासही आहे. इंडोनेशियाचा ईस्ट टिमोर हा प्रदेश ख्रिस्ती झाल्यामुळे त्याचे वेगळे राष्ट्र झाले. श्रीलंकेत तमिळवाद्यांना ख्रिस्त्यांचा पाठिंबा आहे. भारताच्या फाळणीला ख्रिश्चनांचा पाठिंबा होता आणि फाळणीच्या वेळी मुस्लिम लीग व ख्रिस्ती धर्मसंस्था यांचा समझोता होऊन छोटा नागपूर आणि ईशान्य भागात एक ख्रिस्तीस्तान उभारावे असा मनोदय होता.व्हॅटिकनमधील ख्रिस्ती धर्मपीठ गोवामुक्ती प्रतिकूल होते.9 

नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड ही एक दहशतवादी संघटना असून तिची कार्यालये न्यूयॉर्क, जिनिव्हा आणि हेगमध्ये आहेत, याचा अर्थ काय होतो?

11. माझे विधान- ‘मानवनिर्मित कायद्याखाली राहण्याची मुसलमानांची तयारी नाही; त्यांना कायदा हवा तो शरियतचा.’यावर जमादारांची टीका अशी की, 98% कायदे सर्वांना समान आहेत; आणि मुसलमानांचा जसा वेगळा कायदा आहे तसा हिंदूंचा आणि ख्रिश्चनांचाही आहे.

‘98%’हे अतिशयोक्त विधान आहे. पण तो मुद्दा आपण सोडून देऊ. मुख्य गोष्ट अशी की, मुस्लिमांची मनातून निष्ठा अल्लानिर्मित कायद्यावर असते. भारतात जे कायदे समान आहेत, ते ते नाइलाज म्हणून पाळतात आणि ते कायदे मुख्यतः इंग्रज सरकारने केलेले आहेत.

सर्व धार्मिक गटांचे वेगवेगळे कायदे आहेत हीच तर अडचण आहे. सर्वांना शंभर टक्के कायदा समान असला पाहिजे. पण वैयक्तिक कायदा समान असण्याला मुस्लिमांचा विरोध आहे.

जमादारही वैयक्तिक कायद्याच्या ‘सुधारणे’ बद्दल बोलतात; समान वैयक्तिक कायद्याविषयी बोलत नाहीत!

भारताची राज्यघटना व कुराण यांत विरोध आला तर काय श्रेष्ठ मानणार ही राष्ट्रनिष्ठेची खरी कसोटी आहे.

12. मी लोकशाही व धर्मनिरपेक्षतेबद्दल ‘तोंडदेखले’बोलतो आणि ‘देशाच्या विकासामध्ये ओबीसी, बहुजन समाज, मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्यांक यांच्या वाट्याबद्दल चकार शब्दही’बोलत नाही, असे जमादारांचे म्हणणे आहे.

धार्मिक अल्पसंख्यांक, विशेषतः मुस्लिम व हिंदू मागासवर्गीय आणि ओबीसी यांमध्ये मुळात फरक आहे. मागास आणि ओबीसी यांचा प्रश्न हिंदू समाजाने त्यांना संधी नाकारल्यामुळे उत्पन्न झालेला आहे आणि मुस्लिमांचा विकासात वाटा कमी आहे, तो प्रामुख्याने त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडल्यामुळे आणि संधीचा फायदा न घेतल्यामुळे निर्माण झालेला आहे-मग सच्चर समिती हवे ते म्हणो. धार्मिक रूढी आणि हटवाद यांच्या मिश्रणातून मुख्यतःमुस्लिम मागासलेपणाचा जन्म झालेला आहे. स्त्रियांचे कनिष्ठ स्थान, पडदा, तोंडी तलाक, निरक्षरतेचे जास्त प्रमाण, संततिनियमनाच्या अभावामुळे पोरवडा, त्यातून दारिद्य, शिक्षणासाठी मदरशांमधल्या धार्मिक शिक्षणावर भर, आधुनिक शिक्षणाकडे दुर्लक्ष, उर्दूचा आग्रह इत्यादी घटकांचा तो समुचित परिणाम आहे.

13. माझे विधान- ‘हिंदूंवर हिंदू म्हणून होणारे अन्याय हे मुसलमानांवर आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अन्यायांपेक्षाही अधिक आहेत तरी ते दुर्लक्षित राहिले आहेत.’

जिहादचा धोका मुसलमानांना नाही, तो हिंदूंना आहे. त्यामागे एक धर्मतत्त्व आहे. गुजरातमधील मुसलमानांवरील अत्याचार घृणास्पद आहेत, पण खिलाफतीच्या काळात मोपला मुसलमानांनी केलेले हिंदूंचे हत्याकांड अधिक हिंस्र होते आणि हिंदूंनी मुसलमानांवर जे अत्याचार केले त्यामागे धर्माज्ञा नाही.

जिहाद खरे म्हणजे सुरू झालेलाच आहे. ‘जम्मू-काश्मीरमध्ये 1989 पासून सुमारे 15 हजार नागरिक आणि 550 जवान मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वीस-बावीस वर्षांत भारतात सुमारे 65 हजार हत्या झाल्या आहेत. भारताच्या मर्मस्थळांवर झालेल्या हल्ल्यांची आठवण करायची तर 1993 सालचे मुंबईचे साखळी बाँबस्फोट, ऑक्टोबर 2001 मधील जम्मू-काश्मीर विधानसभेवरचा हल्ला, डिसेंबर 2001 मध्ये भारताच्या लोकसभेवरचा हल्ला, जानेवारी 2002 मध्ये कलकत्त्याच्या अमेरिकन सेंटरवर, सप्टेंबर 2002 मध्ये गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिरावर झालेले हल्ले, 2002 मध्येच जम्मूमधील रघुनाथ मंदिरावरचा हल्ला, ऑगस्ट 2003 मध्ये मुंबईत गेटवे ऑफ जव्हेरी बाजार येथे झालेले बाँबस्फोट, नंतरचे घाटकोपरचे स्फोट इत्यादींचा उल्लेख करावा लागेल.’हे लिहिल्यानंतरच्या काळात मुंबईत लोकल रेल्वेमध्ये एकाच वेळी अनेक डब्यात झालेले स्फोट, मालेगावचा आणि हैदराबादचा स्फोट यांची भर घातली पाहिजे.राज्ययंत्रणा खिळखिळी करणे हाही एक या हल्ल्यांमागचा एक उद्देश आहे.

ख्रिश्चन संकटाबद्दल मधु वाणी म्हणतात की, ‘ईशान्येकडे ज्या चळवळी सुरू आहेत, त्या धार्मिक चळवळी नाहीत’मुद्दा तो नाही, फुटीरपणाचा आहे. अलीकडच्या 2001 शिरगणतीप्रमाणे नागालँडमध्ये सुमारे 90 टक्के, मिझोराममध्ये सुमारे 87 टक्के व मेघालयमध्ये सुमारे 70% लोक ख्रिस्ती झाले आहेत.ईशान्येकडच्या सर्व राज्यांमध्ये ख्रिश्चनीकरण स्वातंत्र्यकाळातले आहे.8

या सर्व सहा राज्यांमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या 1991 साली 39 टक्के होती. ती 2001 साली 45 टक्के झाली. म्हणजे ख्रिश्चनीकरण वेगाने चालू आहे. ख्रिस्ती मिशनरी करीत असलेली धर्मांतरे प्रलोभनातून (इंड्यूसमेंट) आणि लबाडीतून (फ्रॉड) होतात, याबद्दल 1951 सालच्या मध्यभारत काँग्रेस शासनाने नेमलेल्या नियोगी कमिशनच्या काळापासून तक्रारी करण्यात येत आहेत.

यापुढचा मोठा धोका म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्यांचा आहे, तसा इतिहासही आहे. इंडोनेशियाचा ईस्ट टिमोर हा प्रदेश ख्रिस्ती झाल्यामुळे त्याचे वेगळे राष्ट्र झाले. श्रीलंकेत तमिळवाद्यांना ख्रिस्त्यांचा पाठिंबा आहे. भारताच्या फाळणीला ख्रिश्चनांचा पाठिंबा होता आणि फाळणीच्या वेळी मुस्लिम लीग व ख्रिस्ती धर्मसंस्था यांचा समझोता होऊन छोटा नागपूर आणि ईशान्य भागात एक ख्रिस्तीस्तान उभारावे असा मनोदय होता.व्हॅटिकनमधील ख्रिस्ती धर्मपीठ गोवामुक्ती प्रतिकूल होते.9 

नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड ही एक दहशतवादी संघटना असून तिची कार्यालये न्यूयॉर्क, जिनिव्हा आणि हेगमध्ये आहेत, याचा अर्थ काय होतो?

लेखाचा विस्तार वाढत चालला आहे. तेव्हा वाचकांपैकी या विषयाचा अभ्यास करू इच्छिणारी जी मंडळी आहेत, त्यांना मी विनंती करतो की माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्व विचाराची फेरफांडणी (राजहंस, पुणे, 2006) या पुस्तकातली मुस्लिम संकट व ख्रिश्चन संकट यांची चर्चा करणारी पृष्ठे 6 ते 24 वाचावीत. वरचा उतारा याच पुस्तकातून घेतला आहे.

14. मधु वाणी यांनी शांतपणे माझा लेख पुन्हा वाचला तर त्यांच्या लक्षात येईल की, लोकसंख्येबाबत अतिरंजित विधाने मी केलेली नाहीत. 2025 साली किंवा 2050 साली मुसलमान बहुसंख्य होतील किंवा चार बायका करण्याची त्यांना अनुज्ञा असल्यामुळे त्यांच्या वाढीचा वेग हिंदूंच्या वाढीच्या वेगापेक्षा मोठा आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही. (एकूणच माझी मांडणी संघाच्या मांडणीपेक्षा वेगळी आहे, सावरकर आणि गोळवलकर यांची मांडणीही एक नाही ह्या गोष्टी मधु वाणी लक्षात घेत नाहीत.) 

मुस्लिम लोकसंख्येचा प्रश्न मुस्लिम संकटाच्या पार्श्वभूमीवर पाहिला पाहिजे. भारतातले सर्वजण राष्ट्रवादी आणि धर्मनिरपेक्ष झाले, भारतातल्या राज्यसंस्थेची धर्मनिरपेक्षता निर्दोष झाली आणि सर्वांनी मनापासून ती मान्य केली तर माझ्या मते कुणाचीही लोकसंख्या कितीही वाढो किंवा कमी होवो, मला त्याची (वाणी यांच्या शब्दात) ‘चिंता’असणार नाही.

15.स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी व बालविवाह हे हिंदू ‘धर्मा’वर नसून ‘समाजा’वर असलेले कलंक आहेत, अशी सुधारणा वाणी यांनी केली आणि हिंदू धर्म सर्व धर्मात क्रूर आहे हे वाक्य त्यांनी गाळून टाकले, तर त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. सर्वच धर्म कमीजास्त प्रमाणात क्रूर होते आणि आहेतही. मात्र त्यांच्या क्रौर्याचे प्रकार वेगवेगळे आहेत.

मात्र हिंदूंच्या लोकसंख्यावाढीचा वेग स्त्रियांवरील अत्याचारांमुळे मुसलमानांपेक्षा कमी आहे असे त्यांना सुचवायचे असेल तर ते बरोबर नाही. अगदी 1881 सालच्या पहिल्या खानेसुमारीपासून आजपर्यंत दर दशकात मुसलमानांच्या वाढीचा दर हिंदूंच्या दरापेक्षा जास्त राहिला आहे, याचे महत्त्वाचे कारण मुस्लिम स्त्रियांना एकूण प्रजोत्पत्ती दर (टोटल फर्टिलिटी रेट) हिंदू स्त्रियांच्या दरापेक्षा मोठा आहे आणि अलीकडच्या काळात संततिनियमनाला मुस्लिम स्त्रियांचा प्रतिसाद कमी आहे.

तुलनात्मक लोकसंख्यावाढीच्या संदर्भात जमादार यांनी चलाखी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणण्यापेक्षा त्यांचे गणित चुकले आहे असे म्हणणे अधिक न्यायाचे होईल. 1981 ते 1991 आणि1991 ते 2001 या काळात हिंदूंच्या वाढीचा वेग 22.7 टक्क्यांवरून 19.9 टक्क्यांपर्यंत कमी झाला व मुस्लिम वाढीचा वेग त्याच काळात 32.9 टक्क्यांवरून 29.5 टक्क्यांपर्यंत कमी झाला.याची नीट टक्केवारी काढली तर हिंदूंच्या वाढीचा वेग 12.34टक्क्यांनी कमी झाला व मुसलमानांच्या वाढीचा वेग 10.34 टक्क्यांनी कमी झाला असे दिसून येईल. मुसलमानांच्या वाढीचा वेग हिंदूंच्या वाढीच्या वेगापेक्षा मोठा आहे हा जमादार यांचा निष्कर्ष चूक आहे.

16. भारतीय मुसलमान ‘आर्यांप्रमाणे’बाहेरून आलेले नाहीत, त्यांपैकी 98 टक्के येथलेच मूळ निवासी आहेत आणि मुस्लिम समाजात अधिक समता असल्यामुळे (स्वयंस्फूर्तीने) धर्मांतरित झालेले आहेत असे जमादार म्हणतात. आर्य बाहेरून आले हा सिद्धांत आज सर्वमान्य नाही आणि इस्लाममध्ये शंभर टक्के समता आहे हेही खरे नाही.

जगातील कुठलाही समाज हिंदूंच्या इतका विषम नाही हे मला मान्य आहे. मात्र सगळीच धर्मांतरे स्वयंस्फूर्तीने झाली हे खरे नाही.

17. ‘...तो इथलाच मूळ निवासी आहे. त्यामुळे इतर सर्व भारतीयांप्रमाणे त्याचाही भारतावर तितकाच अधिकार आहे’इति जमादार.... यात एक अडचण आहे आणि जमादारांना ती (वर उल्लेखिलेल्या इतर अनेक गोष्टींप्रमाणे) माहीत असावयास हवी.ज्यांचे हिंदू पूर्वज नरकात खितपत पडलेले आहेत त्या पूर्वजांबद्दल आणि त्यांच्या भूमीबद्दल मुसलमानांना कसे प्रेम वाटणार? (प्रत्यक्ष प्रेषितांची आई आणि चुलते मुसलमान नसल्यामुळे नरकात आहेत.प्रेषितांना अल्लाकडून संदेश येण्यापूर्वी निवर्तलेला मुलगाही नरकात.) शिवाय दार-उल-हरबची संकल्पना.

तरीही मुस्लिमांबरोबर सहजीवन अपरिहार्य आहे असे माझे मत मी मूळ लेखात मांडले आहे.

‘भारतात मुस्लिम आहेत आणि ते इथेच राहणार आहेत, ही वस्तुस्थिती हिंदुत्ववाद्यांनी एकदाची स्वीकारली पाहिजे. घटनेने ज्याप्रमाणे लोकशाही स्वीकारली आहे, तशीच धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे. ही धर्मनिरपेक्ष लोकशाही टिकवून ठेवण्यातच भारताचे राष्ट्रहित सामावले आहे,’हे जमादार यांचे म्हणणे मला शंभर टक्के मान्य आहे. असे असताना ‘हिंदुराष्ट्रा’चा वास त्यांना कुठून आला? वाणींनाही तोच प्रश्न विचारला पाहिजे.

18. ‘पाकिस्तान व बांगला देशात जे मुस्लिमेतर आहेत, ते तिथे आजही सुखासमाधानाने जगत आहेत,’असे जमादार म्हणतात. पुढील आकडेवारी त्यांच्या ‘सुखा-समाधाना’ची थोडीशी कल्पना देईल. फाळणीपूर्वीच्या आजच्या पाकिस्तानच्या प्रदेशात 1941 सालच्या शिरगणतीप्रमाणे हिंदूंची लोकसंख्या जवळजवळ वीस टक्के होती. ती आता (2001) दोन टक्क्यांहून कमी आहे. आजच्या बांगला देशात जो प्रदेश होता, त्यात हिंदूंची लोकसंख्या 1941 साली सुमारे तीस टक्के होती आज (2001) ती सुमारे दहा टक्के आहे. पाकिस्तानने अल्पसंख्यांचा प्रश्न कसा ‘सोडविला’याचे हमीद दलवाई यांनी पस्तीस वर्षांपूर्वी केलेले वर्णन जमादार यांनी वाचावे.11बांगला देशाच्या संदर्भात तस्लिमा नसरीन यांनी केलेले हिंदूंच्या हलाखीचे वर्णन जमादारांनी वाचले नसावे.

19. प्रदीप देशपांडे यांच्या लेखात मधु वाणी यांच्याप्रमाणेच त्यांचा संताप व्यक्त झाला आहे. फरक एवढाच की वाणी यांच्या लेखात काही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रदीप देशपांडे यांच्या लेखाचा वेगळा विचार करण्याची गरज नाही. रमेश आगाशे यांचे एक विधान असे आहे... ‘भारतीय इस्लाम धर्मीयांनी देशनिष्ठेला धर्मनिष्ठेपेक्षा वरचे स्थान देऊन धर्मविचाराने देशाशी गद्दारी करणार नाही, हे आपल्या वागणुकीतून दाखवून द्यावे ही शिवसेनेची मागणी अवास्तव असे म्हणता येत नाही...’हे विधान त्यांच्या त्याअगोदरच्या मांडणीवर काटच मारणारे आहे.

समारोप 

समारोपादाखल दोन मुद्दे मांडून हा बराच लांबलेला लेख पुरा करतो.अ. मूळ समस्या मुसलमानांच्या धर्माचे, इस्लामचे खरे स्वरूप काय आहे याच्या आकलनाविषयीची आहे. हे आकलन एकदा झाले म्हणजे भारतीय मुसलमानांचा एवढेच नव्हे, तर जगातल्यामुस्लिम समाजाचा इतिहास आणि वर्तमानातली त्यांची वागणूक यांचा पट उलगडतो.

काही अपवाद वगळता हा इस्लाम समजून घेण्याचा हिंदूंनी प्रयत्न केला नाही. सावरकर, सावरकारांपेक्षा जास्त सूक्ष्मपणे इस्लामची चिकित्सा करणारे आंबेडकर, शहा, कुरुंदकर आणि दलवाई यांनीही इस्लामवर स्वतंत्र ग्रंथ लिहिला नाही. गेली जवळजवळ आठशे-नऊशे वर्षे हिंदू आणि मुसलमान एकत्र राहत असूनसुद्धा या अवधीत शेषराव मोरे हेच बहुधा पहिले हिंदू असावेत की ज्यांनी 750 हून अधिक पृष्ठांचा इस्लामवरील ग्रंथ लिहिला.त्यांनतर पहिल्या चार खलिफांवर पुस्तक लिहून इस्लामच्या इतिहासाला आता त्यांनी प्रारंभ केला आहे.12.

जोपर्यंत भारतीय विचारवंतांचे लक्ष या विषयाकडे जात नाही, इस्लाम हा अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय होत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या लेखकाला ‘मुस्लिम द्वेष्टा’, ‘हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडणारा’इत्यादी आरोप सोसावे लागणार. जमादार यांनी मी ‘घटनाद्रोह’केला आहे असे म्हटले आहे. सुदैवाने मला साधनामधल्या टीकाकारांनी ‘देशद्रोही’म्हटलेले नाही. (पण भा.ल.भोळे यांनी माझ्या लेखनाला एके ठिकाणी ‘देशद्रोही’असे म्हटलेले आहे.) 

आ. ही दूषणे मला मिळतात याचे आश्चर्य नाही. मला आश्चर्य वाटते ते हुसेन जमादारांचे. प्रत्येक मुसलमान कुराण वाचतो असे नाही, त्यामुळे त्यांनी कुराण वाचलेले नसावे अशी शक्यता आहे. पण ज्याचे कार्य ते गेली पस्तीस वर्षे करीत आहेत असे अभिमानाने सांगतात, त्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी काय लिहिले आहे, हे त्यांना माहीत नसावे किंवा आजच्या त्यांच्या (जमादारांच्या) भूमिकेला गैरसोयीचे आहे म्हणून बाजूला ठेवावे, ही मात्र धक्का देणारी गोष्ट आहे.

जमादारांचे सगळे मुद्दे असगरअली इंजिनियर, रफीक झकेरिया, ए.जी.नूराणी या तथाकथित ‘पुरोगामी’ मुस्लिम विचारवंतांसारखेच आहेत. या विचारवंतांना धर्मनिष्ठ मुस्लिमांना दुखवायचे नसते, कुराणाकडे आणि हदीसकडे चिकित्सक नजरेने पाहायचे नसते म्हणून इस्लामी धर्मग्रंथांचा ‘उदार’आणि आधुनिक काळाला उचित असा अर्थ लावण्यात (किंवा त्यांवर लादण्यात) ते आपले चातुर्य पणाला लावीत असतात. तीच गत जमादारांची झालेली आहे.

मी प्रारंभापासून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा सहानुभूतीदार आहे आणि यथाशक्य त्याला मदतही केलेली आहे, हे जमादारांना माहीत आहे. माझ्या मते जमादारांची आजची भूमिका मंडळाच्या भूमिकेला छेद देणारी आहे.

Tags: कुराण राष्ट्रवाद मुस्लिम संस्कृती समाज हिंदुत्ववाद स ह देशपांडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स. ह. देशपांडे

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके