मनुष्य ज्यावेळी स्वतः धडपड करू लागतो त्यावेळीच त्याच्या विकासाला प्रारंभ होतो. आपल्याला जो अन्याय वाटतो तो दुसऱ्या कोणीतरी दूर करावा, अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आपण स्वतः त्याविरुद्ध झगडण्यास सिद्ध व्हावे लागते. मोठमोठ्या पुढाऱ्यांनी परकीय सरकार विरुद्ध झगडा केला म्हणून काही स्वातंत्र्य मिळाले नाही. बहुसंख्य लोकांनी आपल्या परीने तो लढा सुरू केला म्हणूनच ती चळवळ प्रभावी झाली.
काही माणसे संपत्तीच्या जोरावर प्रतिष्ठा पावतात, काही सत्तेच्या प्रकाशात चमकताना दिसतात आणि काही आपल्या सेवेमुळे पूजनीय बनतात. तिसऱ्या प्रकारच्या माणसांची संख्या अर्थातच फार अल्प असते. पूज्य भाऊसाहेब रानडे यांची गणना तिसऱ्या प्रकारच्या लोकात होते हे उघडच आहे. पूज्य हे विशेषण मी बुद्धिपुरःसर योजिलेले आहे. एखाद्याबद्दल गौरवाने लिहावयास बसले म्हणजे साहजिकच स्तुतिवाचक विशेषगांची उधळपट्टी करण्याचा मोह अनावर होतो. परंतु तशातला हा भाग नसून, मी ते विशेषण विचारपूर्वक वापरले आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळ कदाचित् भाऊंच्या बाबतीत मी ते विशेषण वापरले देखील नसते. संबंध समाज जेव्हा एखाद्या उदात्त ध्येयासाठी महान् प्रयत्न करावयास सज्ज होतो, खल प्रवृत्तीच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी जनसागर खवळून उठतो, त्यावेळी सर्वसाधारणपणेच सत्तांचा उत्कर्ष झालेला पहावयास मिळतो. सामान्य माणसे देखील त्या महान् सामाजिक प्रेरणेची साधने होऊन जातात. अहंतेचा त्यांना विसर पडतो आणि मामुली स्वार्थ भावनेच्या अतीत होऊन मोठमोठी कामे त्यांच्या हातून पार पडतात. परंतु एक ऐतिहासिक कार्य पूर्ण होऊन वातावरण संथ झाले म्हणजे पुन्हा पूर्ववत् अनुभव येऊ लागतो. पूज्य भाऊसाहेब रानडे याचा जीवनक्रम या दोन्ही प्रकारच्या अवस्थांमध्ये अत्यंत जवळून पहाण्याची मला संधी मिळाली. त्याचे बावनकशी सोने अनुभवाच्या कसोटीवर विद्ध झालेले आहे.
भाऊंच्या वयाला ता. 7 नोव्हेंबर रोजी साठ वर्षे पूर्ण होतील. जवळ-जवळ तीन तपाची तपस्या त्यांनी पूर्ण केली आहे. आपल्या जीवनामध्ये त्यानी कठोर व्रताचे पालन केले आहे. परंतु बहुसंख्य व्रती लोकांच्या ठिकाणी ज्या विकृती निर्माण होतात तशा विकृती त्यांच्या जीवनात नाहीत. श्री माणसे त्याग करतात ती फार अहकारी असतात. या ना त्या स्वरूपात त्यांना आपल्या त्यागाची किंमत हवी असते. कोणी सत्ता मागतो, तर कोणी मान मरातबाची अपेक्षा करतो. भाऊदेखील एका वस्तूची अपेक्षा करतात. त्यांना बंधुप्रेमाची तहान लागलेली आहे. प्रेम हवे असणारे लोकही कमी नसतात. परंतु त्यांना एकतर्फी व्यवहार हवा असतो. आपण कोणावर प्रेम करावयाचे नाही, परंतु जगाने मात्र आपल्यावर प्रेमाचा पाऊस पाडावा अशी त्यांची मागणी असते. हा देखील अहंतेचाच एक प्रकार आहे. परंतु भाऊचे तसे नाही. तुम्ही जितके प्रेम द्याल त्याहून अधिक ते तुम्हाला देतील. म्हणूनच राष्ट्र सेवा दलातील हजारो तरुणांना ते आई-वडिलांच्या ठिकाणी आहेत. जी गोष्ट आजपर्यंत इतक्या यशस्वी रीतीने कोणी करून दाखविलेली नाही ती त्यांनी केली आहे. तरुण मुला-मुलीचे कलापथक - आदर्श कलापथक त्यांनी गेली कित्येक वर्षे चालविले आहे. भाऊ ब्रह्मचारी आहेत. लग्नकार्य करून त्यांनी प्रपंच थाटलेला नाही. ते फकीर आहेत. जेथे जातील ते आपलेच घर असे ते मानतात. म्हटले तर सर्व त्यांचे आणि म्हटले तर काहीच नाही. सामान्यतः ब्रह्मचारी म्हटले म्हणजे चिडचिडे असायचे. पण भाऊ जातील तिथे आनंदाचे मळे पिकवतील. लहान मुलींपासून तो प्रौढ स्त्रियांपर्यंत सर्व बायकांना भाऊशी वागताना संकोच वाटत नाही अथवा भीती देखील वाटत नाही. इतकेच काय, परंतु आपल्या मुलींना कलापथकाबरोबर पाठविण्याबाबत त्यांचे पालक कधी खळखळ करीत नाहीत. कारण त्यांची खात्री पटलेली आहे की, भाऊंच्या पंखाखाली आपली मुले सुरक्षित आहेत.
भाऊंचे मन एखाद्या लहान मुलासारखे निर्मळ आणि निर्लेप असते. ते रागावतील, क्वचित् चिडतील देखील परंतु तेवढ्या वेळेपुरते. मागाहून मनात काही शिल्लक रहावयाचे नाही. त्यांना रागावलेले मी बघितले आहे. आणि मी देखील कित्येकवेळी त्यांच्याशी भांडलो आहे. परंतु त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या प्रेमादरात मुळीच कमीपणा आलेला नाही. किंबहुना प्रत्येकवेळी त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष पटल्यामुळे माझा आदर वाढतच गेला आहे. पूज्य साने गुरुजी, सेनापती बापट, आणि भाऊसाहेब रानडे यांचा पिंड कमी अधिक अंशाने एकाच प्रकारचा आहे. 1953 साली सेनापती बापट महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष झाले तेव्हा भाऊसाहेब त्यांचे कार्यवाह बनले. हा काही नुसता योगायोग नव्हे. परंतु सेनापती बापट काय किंवा भाऊ काय राजकारणी पुरुष नव्हेत. सेनापती बापट आणि भाऊसाहेब रानडे एकमताने अध्यक्ष व कार्यवाह झाले, ही गोष्ट कित्येक राजकारणी मंडळींना मुळीच आवडली नाही, काहींच्या मनात या घटनेमुळे जी अढी बसली ती अनेक वर्षे सुटू शकली नाही. त्यामुळे भाऊंच्या असामान्य गुणांची कदर त्यांना करता आली नाही व त्यांची सेवा जनतेच्य हिताच्या दृष्टीने व्हावी तितकी फलद्रूप झाली नाही. अर्थात् सेनापती बापट अगर भाऊसाहेब रानडे यांनी प्रांतिक काँग्रेस कमिटीवर जी पदे घेतली ती प्रसिद्धीच्या अगर अधिकाराच्या लालसेने घेतली असे मुळीच म्हणता येणार नाही. ही जबाबदारी स्वीकारावी, अशी सर्वसाधारण लोकांची इच्छा दिसली म्हणूनच त्यांनी भाबडेपणाने ते मान्य केले. त्यांना अधिकाराची अथवा प्रसिद्धीची हाव असती तर इतर काही मंडळींनी केले त्याप्रमाणे करून त्यांना ती सहज मिळवता आली असती. परंतु भाऊसाहेबांना त्याची जरुरी वाटली नाही. तोंडपुजेपणा करून अथवा सत्तास्पर्धेचे डाव खेळून आपले संपन्न जीवन त्यांना दरिद्री करावयाचे नव्हते.
आज आपला देश स्वतंत्र झाला आहे. परंतु जनमनाची पूर्वीची उभारी राहिलेली नाही. ध्येयवादाच्या उंच आकाशात भराऱ्या मारण्याची ईर्ष्या आज फारच कमी प्रमाणात दिसून येते. समाजातील दु:ख दैन्य संपलेले नाही. विषमता यत्किचितही कमी झालेली नाही. असंतोष वाढत आहे, वैषम्य पसरत आहे. परंतु समाजजीवनातील तामस प्रवृत्तींचे उच्चाटन अनुभवास येत नाही. राजकीय सत्तेच्या जोरावर सर्व काही करता येईल, ही भावना बळावत असल्याने जो तो सत्ता कशी हस्तगत करता येईल, याचा विचार करीत आहे. नवसमाज रचना निर्माण करण्यासाठी सत्तेची आवश्यकता आहे. परंतु राज्यतंत्राची चक्रे झपाट्याने फिरविण्याचे सामर्थ्यं जनतेमध्ये आहे. जनतेकडूनच ती चालनाशक्ती प्राप्त करून घ्यावयाची आहे. म्हणून जनमनामध्ये नवचैतन्य निर्माण करावयास हवे. सर्वच राजकीय पक्ष तसे बोलून दाखवितात. जनतेचे उत्स्फूर्त सहकार्य मिळविले पाहिजे असे म्हणतात. परंतु ही स्फूर्ती कशी निर्माण होईल त्याचा विचार करीत नाहीत. सत्तेच्या जोरावर ते करू म्हटल्यास अशक्य आहे. किंबहुना सत्तास्पर्धेच्या राजकारणात जे लोक स्वतःला गुरफटवून घेतात त्यांची स्थिती उत्तरोत्तर केविलवाणी होत जाते. जनमनापासून ते दूर जातात. जनतेच्या सात्विक भावनेला आवाहन करण्याचे त्यांचे सामर्थ्य कमी होते. आणि मग राजदंडाचा उपयोग करण्याचा मोह होतो.
परंतु राजदंडाने त्यांना अभिप्रेत असलेली सुधारणा होऊच शकणार नाही. त्यासाठी जनमनामध्ये आमूलाग्र क्रांती व्हावयास पाहिजे. मनुष्य ज्यावेळी स्वतः धडपड करू लागतो त्यावेळीच त्याच्या विकासाला प्रारंभ होतो. आपल्याला जो अन्याय वाटतो तो दुसऱ्या कोणीतरी दूर करावा, अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आपण स्वतः त्याविरुद्ध झगडण्यास सिद्ध व्हावे लागते. मोठमोठ्या पुढाऱ्यांनी परकीय सरकार विरुद्ध झगडा केला म्हणून काही स्वातंत्र्य मिळाले नाही. बहुसंख्य लोकांनी आपल्या परीने तो लढा सुरू केला म्हणूनच ती चळवळ प्रभावी झाली. महात्मा गांधीचा मोठेपणा यात होता की प्रत्येकाला ज्यात भाग घेता येईल, असा लढा त्यांनी निर्माण केला. आज आपल्या देशात जी सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे, तिच्या विरुद्ध बहुसंख्य जनता ज्यावेळी सात्त्विक बंड पुकारील त्यावेळीच आपले ध्येय दृष्टीपथात येईल. अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली म्हणून ती गेली नाही, अस्पृश्यता हा अन्याय आहे. त्या विरुद्ध आमची हृदये सात्विक संतापाने पेटू लागतील तेव्हाच ते पाप जाळून भस्म करण्याची शक्ती समाजामध्ये निर्माण होऊ शकेल. आपला देश गरीब आहे. तो संपन्न करावयाचा असेल तर सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेने आम्ही जीव तोडून मेहनत करावयास लागले पाहिजे. अभ्युदयाचा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. ही गोष्ट चुटकीसरशी होणार नाही. नदीचा ओघ सुरुवातीलाच मोठा आणि वेगवान नसतो. अनेक लहान-मोठे ओढे येऊन मिळतात तेव्हा ती सामर्थ्यशाली बनत जाते. सामाजिक क्रांतीचे देखील तसेच आहे. कोणी तरी त्या कार्याला प्रारंभ करावा लागतो. धर्मचक्र प्रवर्तित करावे लागते.
आचार्य विनोबा भावे यांनी विषमतेच्या विरुद्ध युद्ध पुकारले आहे. स्फूर्तीची गंगोत्री सुरू झालो आहे. अष्टौप्रहर सामाजिक कर्तव्याच्या भावनेने भारावलेल्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने ती मोठी होत जाईल. आणि भारतवर्षांचे आनंदवन करून टाकील. त्यासाठी भाऊंच्या सारखी फकिरी बाण्याने विधायक कार्याला वाहून घेतलेली, अन्यायाविरुद्ध सतत दंड थोपटून उभी राहिलली आणि ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ या वृत्तीने जगणारी थोर माणसे आम्हाला हवीत. पूज्य भाऊसाहेबांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभो आणि त्यांच्या हृदयात अखंड प्रकाशत असलेल्या ज्योतीने जनतेची हृदये उजळोत.
Tags: Senapati Bapat Bhausaheb Ranade S. M. Joshi सेनापती बापट भाऊसाहेब रानडे एस्. एम्. जोशी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या