डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पण पाहू गेले तर जड काय  किंवा सूक्ष्म काय, सगळा विश्वाचा कंद  एकाच वस्तूच्या नाभिकमलातून बाहेर पडलेला आहे. म्हणून ‘जड’ म्हणून अवहेलित झालेली ज्ञानेसुद्धा खरीखरी सूक्ष्म आणि आत्मिक बलाचीच आहेत. ही ज्ञाने प्रसवणारे अनेक बालयोगी सृष्टीने देशोदेशी जन्माला घातलेले आहेत आणि मानवी जीवन समृद्ध करून सोडले आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या संबंधाने नितांत आदरबुद्धी बाळगणारांनीसुद्धा या देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांची ‘वळखण’ करून घ्यावी आणि मानवयोनी सध्या आहे त्यापेक्षा अधिक सुखी करावी.

सृष्टीची लहर कोठे कशी लागेल हे खरोखरच सांगता येत नाही. अमूक प्रतिभासंपन्न मनुष्य अमूकच ठिकाणी आणि अमूकच काळी का जन्माला यावा, याचे समर्पक उत्तर कोणी दिले आहे, असे वाटत नाही. संस्कृतीची वाढ ज्या देशात झाली आहे, त्या देशात प्रतिभासंपन्न माणसे जन्माला येतात, हे मात्र खरे आहे. अत्यंत मागासलेल्या आणि असंस्कृत देशात सृष्टी असली माणसे जन्माला घालीत नाही; पण पुढारलेल्या आणि सुसंस्कृत अशा सर्वच देशांत आपल्या या संपत्तीचा देव्हारा सृष्टी सजविते, असे मात्र नाही.

संस्कृतीची, म्हणजेच पर्यायाने ज्ञानाची, वाढ झालेल्या देशात प्रतिभाशाली माणसे जन्माला येतात याचे कारण, काही लोकांच्या मताने असे असते, की निरनिराळ्या सामर्थ्याची, तेजांची, भावनांची वाढ अशा देशांत अव्याहत चालू असते; त्या वाढीत सृष्टी एक मोठा टप्पा अचानक गाठते आणि प्रतिभाशाली माणसे उत्पन्न करते. हा वाढीच्या टप्प्याचा न्याय भौतिकशास्त्रांच्या आधुनिक अभ्यासात पुष्कळदा खरा झालेला दिसून येतो. ज्या देशांत शास्त्रांची प्रगती झालेली आहे, त्याच देशांत त्यांचा अभ्यास चालू राहतो; आणि ज्यांची कल्पनाशक्ती त्या अभ्यासात गर्क असते, ते संशोधक एखादा शोध अकल्पितपणे लावतात. ही कारणांची मीमांसा पटण्यासारखी आहे.

पण पुष्कळदा असे आढळून येते, की ज्या शोधाला किंवा नवीन विचाराला कसलाही आगापिछा नाही, आणि ज्याला ‘प्रगतीचा टप्पा’ असे नावही देता यावयाचे नाही, तो नवा शोध किंवा विचार एखाद्या देशात अकल्पितपणे प्रकट होऊन जातो; आणि प्रयत्न करूनही, त्याच्या या आगमनाचे कारण सांगता येत नाही. केवळ सृष्टीला भावले म्हणूनच तिने एखादे प्रतिभाशाली मन त्या काळी व त्या स्थळी धाडून दिले आणि नव्या शोधाचा किंवा विचाराचा अवतार झाला, असे स्वच्छ दिसून येते.

टॉलेमी, ॲरिस्टॉटल इत्यादिकांच्या विचारांची कैची युरोपियन लोकांच्या मनावर सतराशे वर्षे गच्च बसलेली होती. एक बायबलचे तरी ऐकावे, किंवा त्यातील विधानाशी विसंवादी नसलेले असे टॉलेमीचे किंवा ॲरिस्टॉटल्‌चे ऐकावे, असा दंडकच पडून गेलेला होता. ‘यात आपले काही चुकत आहे किंवा याने आपले काही अहित होत आहे’, अशी शंकासुद्धा कोणाच्या मनाला सतरा शतके शिवली नाही! असे असता रॉजर बेकन या सोळा वर्षांच्या पोराला ‘अरिस्टॉटलचे मत चुकले आहे, असे बेधडकपणे म्हणण्याचे स्फुरण प्राप्त व्हावे’, ही मोठ्या नवलाची गोष्ट आहे. पण इतिहासात हे नमूद झाले आहे, की एवढ्या बालवयात रॉजर बेकन याने ‘ॲरिस्टॉटलचे सिद्धांत चुकीचे आहेत’ असे साहसाचे विधान केले, तेव्हा लोकांना जे ‘साहस’ वाटले, ते साहस नसून ‘धैर्य’ होते. रॉजरला बुद्धीचे देणे एवढे मिळाले होते, की प्रस्थापित मतसंकेत उद्‌ध्वस्त करावयास काहीच हरकत नाही असे त्याला वाटू लागले.

आता बुद्धीचे हे स्वतंत्र स्फुरण त्याच्याच ठिकाणी का प्रकट व्हावे? आणि ते इंग्लिश भूमीतच का दिसावे? याचे कारण कोणी सांगू शकेल काय? शिवाय रॉजर याला हे स्फुरण इतक्या लहान वयात व्हावे, याचे तरी कारण काय? पुष्कळ अभ्यास करून, तुलना करून, पोक्त वय झाल्यावर, बुद्धीला काही निर्णय प्राप्त होणे, हे बरोबर आहे. परंतु बुद्धी अगदीच अपक्व असताना म्हणजे, वयाप्रमाणे पाहता बुद्धी अपक्व राहणेच स्वाभाविक असताना, त्याला एकाएकी तर्काचे एवढे बल प्राप्त व्हावे, याचेही मोठे नवल वाटते.

भौतिक विद्येची आपल्याकडेही पुष्कळ आवश्यकता होती. तिकडल्याप्रमाणेच ठराविक मतांची कैची येथे बळकट बसलेली होती. पण युरोपातील विचारांची कैची ढिली करण्याचे सृष्टीने मनावर घ्यावे, रॉजरच्या मुखाने तिने आपले नवे मनोगत बोलून दाखवावे आणि भारताच्या बाबतीत मात्र तिने तेव्हा आणि पुढेही मुग्धच राहावे, याचे खरोखर नवल वाटते. संस्कृतीची वाढ अवश्य होती, असे धरले तर भारतातील आपली संस्कृती तेव्हाच्या युरोपियन संस्कृतीपेक्षा कांकणभर सरसच होती. मग सृष्टीने हे नवे बालक आमच्या पदरी घालावयाच्याऐवजी इंग्रज लोकांच्या पदरी का घातले, कळत नाही. बरे, तेव्हाचे इंग्रज लोक अशा बालकाला पदरात घ्यावयास पात्र किंवा उत्सुक होते असे म्हणावे, तर तेही खरे नाही. या रॉजर बेकनच्या नव्या कल्पना म्हणजे शुद्ध पाखंड आहे, असेच तेव्हाच्या इंग्रजांनी ठरवले आणि मुंडण करून बैरागी बनलेल्या या ज्ञानराजाला त्यांनी एकदा आठ वर्षे आणि एकदा दहा वर्षे म्हणजे अठरा वर्षेपर्यंत कारावासात खितपत ठेवले! भौतिक विद्येची नवी कल्पना काढली म्हणून आमच्याकडील एखाद्या पंडिताला कोणी बंदिवासात टाकले असे इतिहासात तरी दिसत नाही. भौतिक विद्येचे काही शोध आमच्या पुरातन शास्त्रज्ञांनी लावलेले होते, पण त्यांचा छळ झाल्याचे ऐकिवात नाही. मग अशा अनुकूल भूमीत रॉजरसारख्याचा जन्म का होऊ नये? हा बालवयीन ज्ञानेश्वर इंग्लंडात जन्मला!

भौतिक वस्तूंवर आधिपत्य गाजविणाऱ्या नियमांपैकी काहींची दारे सृष्टीने गॅलिलिओला किलकिली करून दाखविली; आणि मग नव्या ज्ञानाची ओळख झालेला हा सोळा वर्षांचा पोर, थोरामोठ्यांची अब्रू घेऊ लागला. प्रार्थनामंदिरात एक उंचच्या उंच लामणदिवा सारखे हेलकावे खात होता. सहस्रावधी लोक त्याचे हेलकावे आदराने पहात आणि प्रार्थना मंदिराचे एक दिव्य वैभव म्हणून त्याला आदराने नमस्कार करीत. पण या लहानशा मुलाने आपल्या नाडीवर हात ठेवला, दर ठोक्याला झोका दोन्ही टोकांना कुठपर्यंत जातो व परत येतो हे पाहिले आणि गतिशास्त्राचा एक अभिनव सिद्धांत सांगून टाकला; त्याने नव्या शास्त्रालाच आरंभ करून दिला.

थोडा मोठा होताच, म्हणजे पुढे चारच वर्षांनी पिसा येथील झुकत्या मनोऱ्यावरून दोन विषम वजनाचे पदार्थ खाली सोडून व ते एकाच वेळी जमिनीला लागतात, हे दाखवून देऊन ॲरिस्टॉटलपासून चालत आलेल्या गतिविषयक कल्पना त्याने एकाएकी उद्‌ध्वस्त करून टाकल्या. कॉलेजचे प्राध्यापक त्याच्यावर रुष्ट झाले. ॲरिस्टॉटलला लटके ठरवणारा हा कोण, असे सनातनी लोक गर्जून ओरडू लागले. पण प्रत्यक्ष प्रयोगात, अत्यंत विषम वजनाचे दोन्ही पदार्थ भूमीला एकाच वेळी येऊन लागले, हे त्यांना नाकारता येईना. भांडवल बुडाल्याचे दु:ख त्यांना झाले. दीड सहस्र वर्षे वयाच्या मुनिवर्यांचा पाणउतारा झाला, हे शल्य त्यांना बोचू लागले; आणि त्यातही एका पोरसवदा माणसाने हे करावे, ही घशांत पडलेली कडू गोळी गिळावयास त्यांचा घसा घोटवेना. अलौकिक किमयेत मौन मानणारी सृष्टी बाजूला उभी राहून, या साऱ्या लोकांची उडालेली दुर्दशा पाहून खचितच मनापासून हसत असली पाहिजे! हा ज्ञानेश्वर इटलीत उदयाला आला!

केल्‌विन या बालकाच्याद्वारे सृष्टीने त्याच्या बापालाच फजित केले. बाप युनिव्हर्सिटीत मोठा प्राध्यापक होता. युनिव्हर्सिटीतील मुलांना घालावयाची उदाहरणे तो घरून लिहून नेत असे. पण मुलगा विल्यम हा ती सारी उदाहरणे बापाला घरच्या घरी आधीच सोडवून दाखवीत असे. या वेळी मुलाचे वय पुरते दहा वर्षांचेसुद्धा नव्हते. एकदा एक भारीच अवघड उदाहरण- (जे बापाला युनिव्हर्सिटीतही सुटले नाही) मुलगा सोडवावयास बसला. रात्रीची जेवणे होऊन सारेजण झोपी गेले. अर्थात मुलगाही निजला असेल, असे घरातल्या माणसांना वाटले. पण त्याला त्या उदाहरणाचे वेड लागले होते. मध्यान्हीच्या सुमारास माडीवरच्या आपल्या खोलीतून मुलगा मोठ्याने ओरडला, ‘सुटले, उदाहरण सुटले!’ बाप चटकन्‌ वर गेला आणि पाहतो तो, दगडी पाटीवर उदाहरणाची रीत मुलाने खरडलेली दिसली! त्याने बाराव्या वर्षी लॅटिन भाषेतील ‘देवांचा संवाद’ या पुस्तकाचे भाषांतर करून बक्षीस मिळवले; आणि सोळाव्या वर्षी ‘पृथ्वीचे स्वरूप’ या विषयावर एक विद्वत्ताप्रचुर प्रबंध लिहून मोठीच वाहवा मिळविली. या निबंधाचा उपयोग पुढे पन्नास वर्षे तो मधून मधून करीतच होता. बावीसाव्या वर्षी ग्लासगो येथे सृष्टिविज्ञानाचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. त्याची व्याख्याने सूत्ररूप प्रमेयांनी इतकी भरलेली असत, की अनेक शास्त्रज्ञांनी त्यांतील कित्येकांवर आपल्या संशोधनाच्या इमारती उभ्या केल्या. समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या तारेचा शोध यानेच लावला. सृष्टीने याला लहानपणापासूनच स्वतंत्र बुद्धीचे स्फुरण अर्पण केलेले होते. ज्ञानेश्वराप्रमाणेच हाही फार थोर पुरुष म्हटला पाहिजे.

‘बिनतारी संदेश’ ही शब्दसंहती आता आपल्या पाठातली झाली आहे. पण बिनतारेने संदेश जातो म्हणजे काय होते, हे फार थोड्या लोकांना माहीत असते. अमेरिकेत बसलेल्या माणसाच्या तोंडून निघालेला शब्द क्षणात हिंदुस्थानात बसलेल्या माणसाला ऐकू यावा, ही केवढी विचित्र किमया आहे! जग जवळ जवळ येत चालले आहे, या विधानाचा खराखरा अर्थ बिनतारी संदेशाने आपल्या चांगला ध्यानात येतो. या दोन स्थळांच्या दरम्यान सप्तसमुद्र भरलेले आहेत; आणि नवखंड पृथ्वी पसरलेली आहे. पण यांना न जुमानता अमेरिकन प्रेसिडेंटने टेबलावर मारलेली टिचकी हिंदुस्थानात तत्क्षणीच ऐकू येते. विधात्याने अंतरिक्षात पेरून ठेवलेले सूक्ष्म न्याय माणसाने ओळखीचे करून घेतले आणि मानवी जीवनात प्रचंड क्रांती करून टाकली. ज्या मार्कोनीने हे केले, तो या शोधाच्या वेळेस केवळ बावीस वर्षांचा होता. मार्कोनीची संशोधनाची साधने अगदीच ओबडधोबड होती, पण त्याच्या बुद्धीची झेप अंतराळाइतकीच मोठी होती. ‘माझ्या बाही म्या व्योम कवळिले’ असे ज्ञानेश्वरांनी आपल्या एका ओवीत म्हटले आहे. त्याचा पारमार्थिक अर्थ काय, ते त्यांना खचितच माहीत होते; पण मार्कोनीने ‘व्योम कवळिले’ हे मात्र सामान्य जनांनासुद्धा कळून आले. एक मैलाच्या अंतरावर हा प्रयोग त्याने करून पाहिला, मग दोन मैलांचे अंतर ठेवून तो प्रयोग केला. तो यशस्वी झाला. तिकडे टिचकी वाजली, की इकडे ऐकू येऊ लागले. इटलीतून उठून आपल्या साहित्यासह तो इंग्लंडात आला; आणि ब्रिटिश सामुद्रधुनीवरून त्याने आपला संदेश युरोपच्या भूमीवर एका निमिषात ऐकवला. जग खरोखरच जवळ आले. हा अद्‌भुत शोध बावीस वर्षांच्या मुलाने लावला! हा केवढा ज्ञानेश्वर होय!

आणखी एक मौजेचे उदाहरण सांगतो. आर्थर यंग या मुलाचे कौतुक सृष्टीने असेच केले. आपल्याजवळची अनेक सामर्थ्ये याच्या बुद्धिपिंडाच्या बनावात तिने आरंभीच खोचून ठेवली. तो दोन वर्षांचा झाला नाही, तोच आपल्या बोबड्या वाणीने भराभर वाचू लागला आणि लोक नवल करू लागले. सहा वर्षांच्या वयाला ‘डेझरटेड व्हिलेज’ हे गोल्डस्मिथचे काव्य त्याने पाठ म्हणून दाखवले. पण याच्याही आधी, म्हणजे चौथ्या वाढदिवसाच्या पूर्वी त्याने सगळे बायबल दोनदा वाचून दाखवले. लॅटिन आणि ग्रीक या पुरातन भाषा लवकरच त्याच्या घरी पाणी भरू लागल्या आणि पौगंड दशेतच तो निरनिराळ्या भाषा बोलू लागला. सारे लोक त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागले. एकवीस वर्षांचा असताना त्याने ‘डोळा’ या विषयावर निबंध लिहिला. आणि त्याची गणना विद्वानात होऊ लागली. मौज अशी, की आपल्याजवळची सर्वच वस्त्राभरणे सृष्टीने त्याच्या अंगावर घातली आहेत, असे दिसून आले. नामांकित डॉक्टरांत त्याची गणना होऊ लागली. कुस्तीच्या हौद्यात उतरला म्हणजे तो भल्याभल्यांची अब्रू घेऊ लागला. गायनाच्या मैफलीत त्याचे सुस्वर गायन केव्हा सुरू होते, याची वाट लोक पाहू लागले. कोणतीही कलाकृती असो, आर्थर यंग याने दिलेला निर्णय एकदम सर्वसंमत होऊ लागला. ‘समुद्राची भरती’ आणि ‘नौकानयन’ या विषयावरचे त्याचे निबंध चांगल्या शास्त्रज्ञांनी आदरबुद्धीने वाचले; आणि व्यावहारिक कौतुकाची गोष्ट अशी, की इन्शुअरन्स कंपनीच्या ॲक्चुअरीचे कामसुद्धा त्याने इतरांपेक्षा फार चांगले बजावले. ऑर्थर यंग ही एक सृष्टीची मोठी गंमतीदार कलाकृती समजली पाहिजे.

न्यूटन हा एका शेतकऱ्याचा पोर. चौदा वर्षांच्या वयापर्यंत त्याची आणि विद्येची तोंडओळखसुद्धा झालेली नव्हती; पण या वयातच त्याने एक पाणघड्याळ आणि सावलीचे घड्याळ तयार केले. किती वाजले हे या घड्याळावरून बरोबर कळत असे. वाऱ्याची शक्ती मोजता येईल, असे त्याला या वयातच वाटू लागले. वारा ज्या दिशेने वाहत होता त्या दिशेने त्याने एक लांब उडी मारली व ते अंतर मोजून ठेवले. मग वाऱ्याच्या उरफाट्या दिशेने त्याने आणखी एक उडी मारली अणि तेही अंतर मोजून पाहिले. या दोन अंतरात पडलेली तफावत वाऱ्याच्या शक्तीमुळे पडलेली आहे, असा तर्क न्यूटनने बांधला. यानंतर त्याला शाळेत घातले. तेथे युक्लिडचे सिद्धांत त्याने भराभर वाचून काढले व पुस्तक बाजूला टाकून दिले. तो म्हणाला; ‘हे सिद्धांत सिद्ध करण्याची एवढी खटपट युक्लिडने कशाला केली कुणास ठाऊक? यात सिद्ध करण्यासारखे काय आहे? त्या गोष्टी स्वयंसिद्धच आहेत. हा शुद्ध पोरखेळ आहे!’ याच वयात त्याने एक बिलोरी काच आणली आणि सूर्याच्या किरणांचे पृथक्करण केले. पांढऱ्या प्रकाशात सात निरनिराळे रंग आहेत, हा शोध त्याने याच वयात लावला. या वेळी तो केवळ सतरा वर्षांचा होता. बायनॉमिअल थिअरम म्हणून म्हणतात तो न्यूटनने तेविसाव्या वर्षी शोधून काढला; आणि चोवीस वर्षांच्या वयाला ‘इंटिग्रल कॅलक्युलस’ हा गणिताचा प्रकार त्याने शोधून काढला. पृथ्वी आणि चंद्रबिंब यांच्यातील आकर्षणाचा नियम याच वेळी त्याच्या लक्षात आला; आणि याच दोन वर्षांत गुरुत्वाकर्षणाचा नियमही त्याने शोधून काढला. ज्ञानेश्वराने ‘जीविताची इतिकर्तव्यता संपली’ असे पाहून ज्या वयात समाधी घेतली त्या वयाच्या आंतच न्यूटनने हे सारे शोध लावले होते. आपले किमयेचे पुस्तक सृष्टीने आपल्या हातांत घट्ट धरून ठेवले होते. न्यूटनने बालवयातील लडिवाळपणाने त्या पुस्तकाची अनेक पाने ओढून वाचून पाहिली; ज्ञानेश्वरांचे वाचन कदाचित याहूनही अधिक गूढ अशा ग्रंथांचे असेल; पण प्रापंचिकांना जो ग्रंथ त्यांनी प्रत्यक्ष दिला आहे त्याची योग्यता न्यूटनच्या ग्रंथाइतकी खचितच नाही!

आधुनिक जग कोणत्या अर्थवादाने भिरभिरू लागले आहे, हे आपल्याला माहीत आहे. कार्ल मार्क्सच्या सिद्धांताची छाप देशोदेशींच्या समाजजीवनावर गडद बसत चालली आहे. शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या महापुरुषांची सावली आता सर्व भूलोक व्यापून टाकील असे स्वच्छ दिसत आहे. ध्येयाचा तपशील आणि मार्गांचा तपशील या बाबतीत कोणाचे काही मतभेद असू शकतील; पण अखिल मानवयोनीला अन्न, वस्त्र, आणि निवारा यांची जोड लाभून मन- बुद्धीच्या सामर्थ्यबीजाच्या विकसनाला आणि विकसित झालेल्या सामर्थ्याच्या वापराला भरपूर संधी मिळून मानवयोनी एका शाश्वत काचातून मुक्त होत जाईल, असे आता स्पष्ट दिसते. हा काच दुर्दैवाने होतो, कर्मविपाकाने होतो, परमेश्वरी प्रक्षोभाने होतो इत्यादि अगतिकत्वातून निघालेली ज्ञाने, आता गलितगात्र होऊन बसत आहेत. ज्या आर्थिक तत्त्वज्ञानाची प्रभा अशा रीतीने फाकत आहे ते ज्ञान कार्ल मार्क्सला केव्हा स्फुरले, हे ऐकले तर आश्चर्य वाटेल. या वादातील मुख्य प्रमेय त्याला सव्वीसाव्या वर्षी स्फुरले! खरोखर कार्ल-मार्क्स हा आधुनिक काळातील प्रचंड ज्ञानेश्वर होय!

ज्ञानेश्वरांनी असेही म्हटले आहे की, ‘सर्व तिमिरांचा नाश झाला आहे, जगदाकार धवळले आहे’ त्यांच्या या गूढ प्रमेयाचा अर्थ अत्यंत उदात्त असला पाहिजे; आणि गोचर वस्तूंच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्मतम रज:कोशात वावरत असताना प्राप्त झालेल्या ज्ञानदीप्तीत त्यांनी हे उद्‌गार काढले असले पाहिजेत; पण पाहू गेले तर जड काय किंवा सूक्ष्म काय, सगळा विश्वाचा कंद एकाच वस्तूच्या नाभिकमलातून बाहेर पडलेला आहे. म्हणून ‘जड’ म्हणून अवहेलित झालेली ज्ञानेसुद्धा खरीखरी सूक्ष्म आणि आत्मिक बलाचीच आहेत. ही ज्ञाने प्रसवणारे अनेक बालयोगी सृष्टीने देशोदेशी जन्माला घातलेले आहेत आणि मानवी जीवन समृद्ध करून सोडले आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या संबंधाने नितांत आदरबुद्धी बाळगणारांनीसुद्धा या देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांची ‘वळखण’ करून घ्यावी आणि मानवयोनी सध्या आहे त्यापेक्षा अधिक सुखी करावी.

‘संत’ आणि ‘सुधारक’ यांचा  वारसा सांगत असतानाच त्यांची चिकित्सा करून, विज्ञानाकडे सजगपणे  पाहायला शिकवणारे लेखक अशी श्री.म. माटे यांची ओळख सांगता येईल. त्यांनी 1956 मध्ये लिहिलेला ‘देशोदेशीचे ज्ञानेश्वर’ हा लेख साधनाच्या कुमार दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता, नंतर तो त्यांच्या ‘साहित्यमंजरी’ या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला. हे पुस्तकही आता आऊट ऑफ प्रिंट आहे. मात्र इथे हा लेख पुनर्मुद्रित करण्याचे कारण म्हणजे, मागील तीन वर्षे व या वर्षी काढलेल्या बालकुमार अंकांची संकल्पना उदयाला येण्यास हा लेख कारणीभूत ठरला आहे.
- संपादक

Tags: बालकुमार साहित्य मंजिरी कुमार दिवाळी श्री म माटे देशोदेशीचे ज्ञानेश्वर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्री. म. माटे

(1886 - 1957) लेखक, संपादक, समाजसुधारक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके