डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. ना. पेंडसे : श्रद्धांजलिपर संस्मरण

वयाची नव्वदी पार केलेला हा महानगरीय पांढरपेशा प्रतिभावंत मुळात कोकणचा अस्सल भूमिपुत्र, त्याच्या रक्तातच जिवट, चिवट, सोशीक, लढाऊ कोकण मुरलेले. जगण्याच्या संघर्षात वारंवार विविध प्रकारे 'हद्दपार' होणारे, वारंवार एल्गाराची दुंदुभी फुंकणारे ते अफाट आगळेवेगळे कोकणी जिणे. हा माणूस अखंडपणे जगला, पुनःपुन्हा जगला व त्याच्या जगण्याच्याच मग कादंबऱ्या झाल्या.

श्री. ना. पेंडसे (5 जाने. 1913 ते 23 मार्च 2007) गेले. कायमचे दृष्टीआड झाले. याची हळहळ वाटतेच, मृत्यूची अटळता मान्य करूनही! त्यांचे समृद्ध वाङ्मयीन संचित मात्र अनेक प्रकारे अनेकांची नजर दीर्घ काळपर्यंत खिळवून ठेवीत यात शंका नाही.

शिरुभाऊ म्हणजे 'गारंबीचा बापू' हे प्रारंभीचे समीकरण उत्तरोत्तर उजव्या बाजूने वाढतच गेले. ‘रथचक्र', 'लव्हाळी', 'तुंबाडचे खोत', 'ऑक्टोपस' ही त्या समीकरणाची वर्धिष्णू 'उजवी' बाजू! 

वयाची नव्वदी पार केलेला हा महानगरीय पांढरपेशा प्रतिभावंत मुळात कोकणचा अस्सल भूमिपुत्र, त्याच्या रक्तातच जिवट, चिवट, सोशीक, लढाऊ कोकण मुरलेले. जगण्याच्या संघर्षात वारंवार विविध प्रकारे 'हद्दपार' होणारे, वारंवार एल्गाराची दुंदुभी फुंकणारे ते अफाट आगळेवेगळे कोकणी जिणे. हा माणूस अखंडपणे जगला, पुनःपुन्हा जगला व त्याच्या जगण्याच्याच मग कादंबऱ्या झाल्या. हा बाबा ‘पछाडलेला' हेच खरे! मराठी नवकथा, नवकाव्य इत्यादींच्या नवसाहित्यप्रवाहात 'कोकण' ही मुख्य भूमी - मेनलँड - ठरावी. हा त्या काळाचा महिमा म्हटला पाहिजे. पण या काळाच्या महिम्याचे जे मोजके शिल्पकार होते, त्यात श्री. नां.चा मान मोठा आहे. रोमँटिक वास्तवाला किंवा वास्तवकेन्द्री रोमँटिसिझमला गहिरा गहनगूढ कोकणी जीवनपट फार फार परिपोषक होता, प्रेरक होता. नवसाहित्याला प्रिय असलेली गुंतागुंतीची विशेषतः स्त्रीपुरुष नाती, मनोविश्लेषणाला सुलभपणे सादर होणारा त्यांतील बहुपदरीपणा, त्यांतून दडपलेल्या लैंगिक वासना-वृत्तींचे झिरपणारे पाझर आणि रूढिग्रस्त वास्तवाच्या जीवघेण्या दबावांचा दाह, हे सर्व नव्या कथनात्म साहित्याला नवे परिमाण देणारे अपरान्तीचे वास्तव होते. मध्ययुगीन मराठी साहित्याला कोकणभूमीचे योगदान जे काही असेल ते असो: पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रारंभीचे कथा-कादंबरी साहित्य म्हणजे एक प्रकारे हर्णेचा दीपस्तंभ ठरले; असे म्हणता येईल. श्री.ना. हे या वाङ्मयीन कोकणवादाचे सर्जनशील प्रतिनिधी होते, यात शंकाच नाही.

‘तुंबाडचे खोत’ ही बृहत्कादंबरी (एका कुटुंबाच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे चित्रण करणारी) लिहूनही श्री.ना. मनोमन कोकणमुक्त झाले असे वाटत नाही. मुंबईसारख्या महानगरात आयुष्यभर राहूनही श्री.ना. यांच्या वर झालेली कोकणची 'करणी' दूर झाली नाही. त्यांनी महानगरीय वास्तवाला आपल्या नाटकांतून व कादंबऱ्यांतून साकारले हे खरे; पण त्यातील जीवननाट्याची आशयसूत्रेही कोकणी मनोवृत्तीचीच सूचक होती.

'कोकण' हे आजही व उद्याही एखाद्या आज-उद्याच्या श्री. ना. पेंडशांना चेटूक करून भारावून टाकणार नाही, असे नाही. खुद्द श्री.ना. हेदेखील शेवटी आभाळाची हाक ऐकण्यात गुंगले होते. लोकमान्य टिळकांवरील 'हाक आभाळाची' ही त्यांची अखेरची कादंबरी. वयाच्या नव्वदीतील माणूस आभाळाचीच हाक बहुधा रात्रंदिवस ऐकत असतो. लोकमान्य टिळक हे तीच हाक ऐकत होते, असे या कादंबरीच्या शेवटी वर्णन आहे. श्री.ना. हे खरोखरच भाग्यवान म्हणायचे! ही कादंबरी प्रकाशित झाली आणि मगच त्यांनी आभाळाच्या हाकेला ‘ओ’ दिली. सागराची साद ऐकणाऱ्या कोकणाला आभाळाच्या हाकेचे विशेष अप्रूप!

शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांनी मराठी साहित्यिकांपुढे एक कायमचे आव्हान उभे केले आहे हे खरेच! पण का कुणास ठाऊक, आजवर तरी ते आव्हान पुरेशा समर्थपणे कुणी पेलून दाखविलेले नाही. श्री.ना. हेदेखील यास अपवाद नाहीत. आभाळाची हाक हा एक प्रकारचा नियतिवादच! श्री.नां.च्या कादंबऱ्यांत त्याचे मोठेच सावट आहे. हे सावट कोकणात, महाराष्ट्रात, भारतात, खरे तर सर्वत्रच आहे. तरीही नियतिवादाशी लढणाऱ्या झुंजार व्यक्ती श्री.ना. यांनी प्रभावीपणे उभ्या केल्या, हे मान्य करावेच लागेल.

श्री.ना. हा एकान्तीचा प्रतिभावंत, लोकान्तीचा नव्हे. याला व्रतस्थपणा म्हणायचे कारण, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकान्त हा प्रचंड कल्लोळांनी उसळत होता. नवे प्रवाह, नवे वाद, नवे संघर्ष, नवे वास्तव. नव्या प्रणाल्या! पण श्री.ना. यांचा एकान्त कधी भंगला नाही. मिरवण्याची, पतप्रतिष्ठेची, तिसऱ्या पानाची स्पृहा त्यांना नव्हती. त्यांच्या बेटाभोवती वादळे घोंगावत होती, लाटा उसळत होत्या; पण ते व त्यांचे बेट तसे कोरडेच होते. इथे आठवण त्या काळातील अशाच इतर काही बेटांची होते. जी.ए. कुलकर्णी, इंदिरा संत, ग्रेस! 'कोसला' ने मराठी कादंबरी गदगदून हलविली; पण शिरुभाऊंचा 'कोसला' तिळमात्र उसवला नाही. कादंबरीकार म्हणून त्यांचे नाते हरिभाऊ आपट्यांशी होते; पण व्रतस्थता म्हणून त्यांचे नाते फडके-खांडेकरी परंपरेशीच होते. या दोन्ही प्रकारच्या नातेसंबंधात मात्र एक स्वतंत्र पेंडसे-ठसा होताच. म्हणूनच भालचंद्र नेमाडे त्यांना काही कादंबऱ्याच्या बाबतीत कृतिप्रधान कादंबरीकार म्हणून मानतात; तर इतर काही कादंबऱ्यांच्या बाबतीत त्यांना रीतिप्रधान समजतात. याचा अर्थ एवढाच की हा कादंबरीकार श्रेष्ठ दर्जाचा होता. सातत्याने स्वतःचेच अनुकरण करणारा नव्हता.

नवकथा आणि एकूणच कथासंस्कृतीच्या अत्यंत प्रभावी व लोकप्रिय कालखंडात श्री.ना. स्वतःची कादंबरीसंस्कृती निष्ठेने जतन करीत होते. श्री.ना. यांची बड्या अवकाशाची भूक कथेच्या चिंचोळ्या क्रीमरोलवर कशी भागणार? आपल्यातील कादंबरीकाराचा त्यांनी कथाकार होऊ दिला नाही, याला खूपच अर्थ आहे, म्हणजे हटवादी कोकणी कलंदरपणा!

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकप्रिय कादंबरीकारही होते व त्याच वेळी भालचंद्र नेमाडे यांच्या शब्दांत समीक्षकप्रिय कादंबरीकारही होते; लोकप्रिय साहित्य आणि समीक्षकप्रिय साहित्य यांचा तौलनिक अभ्यास करणाऱ्यांना श्री.ना. हे एक मोठे आव्हान ठरेल. गारंबीच्या बापूची राधा ही श्रीकृष्णाच्या राधेइतकीच मराठीत लोकप्रिय ठरली आहे ना?

मराठी कादंबरीला प्रगत व समृद्ध करणाऱ्या या थोर कादंबरीकाराला माझी विनम्र श्रद्धांजली!

Tags: थोर समीक्षक अस्सल कोकणी व्यक्तिमत्त्व श्री. ना.पेंडसे आदरांजली great critic genuine Konkani personality Shri. Na. Pendse Adaranjali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके