डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

धर्मांधांच्या हातांतून धर्माला सोडवा

‘टेकरेल ॲकॅडमी’च्या वतीने पुणे येथे, 17 व 18 मार्च 2015 असे दोन दिवसांचे युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. ‘गोवा दूत’ या दैनिकाचे संपादक सचिन परब हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील हा काही भाग.

सॉक्रेटिसने ज्ञान मिळवण्यासाठी तीन पायऱ्यांचा मार्ग सांगितलाय. आयडेंटिफाय युवर डॉग्माज : तुमच्या धारणा म्हणजे पक्के विचार समजून घ्या. क्वेश्चन युवर डॉग्माज : त्यांना प्रश्न विचारा आणि खरं-खोटं जाणून घ्या. आणि रिकन्स्ट्रक्ट युवर डॉग्माज : तुमच्या ज्या धारणा तकलादू निघतील, त्यांच्या जागी नव्या धारणा उभ्या करा. आजच्या परिस्थितीत मी धर्माच्या बाबतीतल्या माझ्या धारणा तपासून घ्यायचा प्रयत्न करीत आहे.

आमचे चंदूभाऊ म्हणजे चंद्रकांत वानखडे हे पुरोगाम्यांचं धर्माविषयीचं वागणं गाय आणि गोचिडीचं उदाहरण देऊन सांगतात. हिंदुत्ववाद्यांमधले धर्मांध गोचिडीसारखे हिंदूंवर म्हणजे गाईच्या पाठीवर चिटकून बसलेले आहेत. आमचे पुरोगामी गोचिडीला काढून टाकण्याऐवजी गोचिडीला मारण्याच्या नावाने गाईलाच बदडत आलेत. त्यामुळे गाईला राग येऊ लागला तो मारणाऱ्यांचा आणि रक्त शोषणारा परजीवी गोचीड मात्र आपला वाटू लागला. हिंदुत्ववाद्यांना आणि त्यातल्या धर्मांधांना उघडं पाडण्याऐवजी पुरोगामी मंडळी हिंदू धर्मालाच नावे ठेवू लागली.

हेच जगभरातल्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधल्या पुरोगाम्यांचंही झालं असावं. सर्वसामान्यांना धर्माचा आधार वाटतो. त्याच्याशी ते आपलं अस्तित्व बांधून ठेवतात. त्यांचं सगळं जगणंच धर्माशी आणि धर्मश्रद्धेशी जोडलेलं असतं. पुरोगाम्यांनी तो आधार त्यांच्यापासून खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वसामान्यांनी धर्म अधिकच कवटाळून घेतला. त्याचा फायदा धर्मांधांना होत आला आहे.

धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ माणूस बनायचं ध्येय चांगलंच आहे. पण बहुसंख्य पुरोगामी माणूसही बनले नाहीत आणि त्यांच्या हातातलं धर्म नावाचं हत्यारही कायमचं निसटून गेलं; हाती राहिलं पोथ्यांचं धुपाटणं. धर्माला नाकारण्याचं तत्त्वज्ञान थोरच आहे. भौतिकतावादाची पार्श्वभूमी, तर्क आणि विवेक यांचाही सन्मान व्हायलाच हवा. धर्माला सत्ता आणि शस्त्राची जोड मिळाली की त्याचं किळसवाणं रूप घाबरवून टाकणारंच आहे, हे तर त्रिवार मान्य.

हे सगळं खरं असलं तरी धर्म नाकारल्यावर पुरोगामी मंडळी धर्माला आपलं मानणाऱ्यांपासून लांब गेली. आजही जात आहेत. त्याची इतरही अनेक कारणं आहेत. पण धर्म नाकारणं हे त्यातलं एक मुख्य कारण आहे. धर्म ही अफूची गोळी ठरवणाऱ्यांपैकी बहुतेकांच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसं धर्मभोळी, अंधश्रद्ध, बावळट, प्रतिगामी, अविचारीच नाही तर मध्ययुगीन मानसिकतेचीही कळत-नकळत ठरवली गेली. तुच्छतावादामुळे अनेक बुद्धिवाद्यांना अहंगंडानं ग्रासलं. कुणाला आपलं म्हणावं यापेक्षा कोण आपले नाहीत, यांचीच यादी मोठी बनत गेली. त्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटली. पुरोगाम्यांविषयी त्यांना आदर वाटत राहिला, पण आपलेपणा संपला. आज पुरोगामी, सेक्युलर, विद्रोही, समाजवादी, कम्युनिस्ट हे शब्द बहुसंख्यांना आपले वाटत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

हिंदुत्ववाद्यांशी चाललेल्या शर्यतीत आपला पराभव झालेला आहे, हे पुरोगाम्यांनी मान्य करायलाच हवं. हे थोडं जास्त वाटत असेल तर मागे पडलो आहोत, असं म्हणावं वाटल्यास; पण टाळू नये, प्लीज. इथे मला निवडणुकांतल्या पराभवाविषयी बोलायचं नाहीय. लोकांच्या पाठिंब्यांच्या आणि त्यापुढे सांगायचं तर सर्वसामान्यांना आपलं वाटण्याच्या बाबतीत पुरोगाम्यांचे हाल बघवत नाहीत. कारण लोकांसाठी प्रामाणिकपणे सर्वस्व वाहिल्यानंतर हे घडलेलं आहे.

सर्वसामान्यांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला, तरच सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हिंदुत्ववादी पक्षांना मतं दिली म्हणून कुणी धर्मांध होत नाही. दाभोलकर, पानसरेंच्या खुनाचं फक्त स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनाच वाईट वाटलेलं नाही; त्यांत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारीही खूप साधी-साधी माणसं आहेत. दाभोलकर, पानसरेंविषयी ज्यांना आपलेपणा वाटला, ते आपले आणि ज्यांनी निर्लज्जपणे या खुनांचं समर्थन केलं, ते आपले नाहीत- ही सीमारेषा आता नीट समजून घ्यायला हवी. त्या धर्मांधांना सोडू नये; पण  त्याच वेळेस नव्यांना स्वीकारण्यासाठी बाहू पसरायलाच हवेत. अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त त्यासाठी दोन-तीन छोट्या गोष्टी लागतील. सर्वसामान्य माणसाच्या शहाणपणावर भरवसा आणि आदर उभा करावा लागेल. तसंच माणसं बदलू शकतात, यावर विश्वास आत-आत झिरपवून पक्का करावा लागेल. कोणत्याही लेबलाच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाला साद दिली, तर दगडही ओ देतो. फक्त ती हाक मारायची ताकद कमवायला हवी.

सावंतवाडीतल्या सेंलनाच्या तयारीसाठी गोविंदराव पानसरे गोव्याला दोनदा आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलेली एक गोष्ट ते नसताना खूपच महत्त्वाची वाटते आहे. ते म्हणाले होते- आपण ‘कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स्ड’ आता थांबवायला हवं. म्हणजे जे पुरोगामी विचारांविषयी आधीच पक्के आहेत, त्यांच्यासमोरच आपण तेच ते विचार पुन्हा मांडत राहतो. आपल्या कार्यक्रमांना त्यामुळे त्याच त्या लोकांचं कडबोळं जमा होत राहतं. आपलं वर्तुळ विस्तारत नाहीच, उलट आकुंचन पावत जातं. तेच ते ऐकून बहुतेक ‘कन्व्हिन्स्ड’ही गळू लागतात. आणि आपण नव्यांपर्यंत पोहोचत नाही. आपण नव्यांपर्यंत पोहोचायला हवं.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर जुन्या त्याच त्या स्टिरिओटाइप विचारांना फारसा अर्थ उरलेला नाही. त्याच्याशी आणि त्यांच्या व्यूहरचनेशी लढून कसं संपवायचं, हे धर्मांधांना नीट कळलेलं आहे. मला वाटतं, आज या महत्त्वाच्या वळणावर धर्माला स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. ज्यांनी-ज्यांनी त्यांच्यात राहून लोकांमधे खऱ्या पुरोगामित्वाचे कोंभ फुलवले, त्यांपैकी कुणीच कधी धर्म नाकारला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबाराय, महात्मा फुले, गांधीजी, राजर्षी शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, साने गुरुजी यांपैकी कुणीच धर्माला नाकारलं नव्हतं. उलट, धर्माने त्यांच्या चिंतनाचा आणि विचारांचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्यांच्यापेक्षा आपण जास्त पुरोगामी आहोत, असं कुणाला वाटत असेल, तर सॉरी बॉस... तुमचा आणि आमचा मार्ग वेगळा आहे.

काहीही करताना ते आधी स्वतःच्या डोक्यावर घासून घ्यायला शिकवतो, तो खरा धर्म. शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाविषयी आपुलकी उभा करतो, तो खरा धर्म. सगळ्या लेबलांपलीकडे माणसाला माणूस म्हणून बघायला शिकवतो, तो खरा धर्म. त्या खऱ्या धर्माची पताका विवेकवाद्यांनी हाती घ्यायला हवी. तसे झाले तर धर्माचे ढोंग धर्म म्हणून मांडणाऱ्या धर्मांधांचे वांदे करता येतील. चिकित्सा करणाऱ्यांनी धर्माला सोडलं, त्यामुळे धर्माचं मैदान धर्मांधांच्या हातात गेलं. धर्म संकुचित होत गेला. ज्याने विवेक उभा करायचा, तो धर्मच आज अविवेकी बनला आहे. प्रेम शिकवणारा धर्म हिंसक झाला आहे. आज जर धर्म असा असेल, तर तो खरा धर्म नाहीच.

खरा धर्म आम्हाला संतांनी सांगितलाय. खरा धर्म आम्हाला स्वामी विवेकानंदांनी सांगितलाय. खरा धर्म सांगणारी मोठी परंपरा आहे आपल्याकडे नचिकेतापासून ते पतंजलींपर्यंतची, वाल्मीकीपासून लोकायतांपर्यंतची, श्रीकृष्णापासून भगवान बुद्धांपर्यंतची, गोरखनाथांपासून बसवेश्वरांपर्यंतची, निवृत्तिनाथांपासून निळोबारायांपर्यंतची, नामदेवांपासून गाडगेबाबांपर्यंतची, तुकोबारायांपासून तुकडोजींपर्यंतची, जनाबार्इंपासून मदर तेरेसांपर्यंतची, विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंतची, जोतिबांपासून बाबासाहेबांपर्यंतची... ही सगळीच परंपरा खरा धर्म सांगत आलीय. तो धर्म व्यापक आहे, सर्वसमावेशक आहे. विवेकाला पटणारा आहे, माणुसकीचा अर्थ सांगणारा आहे.

अर्थातच यात अनेक परस्परविरोध आहेत. त्यामुळे यातलं सगळंच पटेल, असं नाही. त्यातलं जे पटेल ते उचलावं, नाही पटणार ते सोडावं. पण उकिरड्यावरच्या कुत्र्यांनी लचके तोडण्यासाठी धर्माला बेवारस सोडू नये, कारण तो आपला आहे. आपल्या बापांनी तो आपल्यासाठी मांडून ठेवलाय. विचारधारा संपल्यानंतरच्या जगातल्या मोकळ्या विचारांच्या आम्हाला आमच्या भाषेत हे समजावून द्या. खरं सांगतो, आग होईल आग! मग धर्माला धर्मांधांच्या हातातून सोडवणं अशक्य नाही.

मी आज महाराष्ट्राच्या बाहेर राहतो. देशभरातले अनेक मित्र सतत संपर्कात असतात. मला जेवढं कळतं, त्यानुसार आज देश महाराष्ट्राकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. देशातल्या आतापर्यंतच्या सर्वच स्थित्यंतरांत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. ती आजही महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे की नाही, हे माझ्यासारख्या महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्याला विचारा. धर्मांधांना ज्यांचं निव्वळ असणंदेखील खुपलं, ते दोन्ही विचारवंत आजही महाराष्ट्रातले आहेत. जोतिबांच्या पुण्यात दाभोलकरांना आणि शाहूंच्या कोल्हापुरात पानसरेंना संपवलं गेलं आहे. पण म्हणून संतांनी आणि विचारवंतांनी महाराष्ट्राच्या मातीची केलेली मशागत वाया  गेलेली नाही. ‘ज्ञानाचा एका’, ‘नाम्याचा तुका’ आणि ‘कबीराचा शेखा’ ही आमची व्यापक परंपरा आहे. फक्त आज त्याला ‘चोख्याचा भीमा’ ही नवी जोड देण्याची आवश्यकता आहे. नव्या क्रांतीची ठिणगी फक्त आणि फक्त इथेच पेटली जाऊ शकते.

महाराष्ट्र पुरोगामी नाही, असं पानसरेंचं वाक्य सर्वत्र सांगितलं जातं. पण ते वाक्य तेवढंच नव्हतं. महाराष्ट्र पुरोगामी होता; आज तो पुरोगामी उरलेला नाही, पण आपल्याला त्याला पुन्हा पुरोगामी बनवायचं आहे, असं पानसरेंनी सांगितलं होतं. आपल्याला त्यांचं स्वप्न वास्तवात उतरवायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र्‌ पुरोगामी नाही, हे नकारात्मक पालुपद डोक्यात ठेवून आपल्याला हताश-निराश व्हायचं नाही. धर्मांधांना तेच हवंय. ते आपण होऊ दिलं, तर धर्मांध जिंकतील आणि आमचे दाभोलकर-पानसरे हरतील.

दाभोलकर-पानसरेंना मारणाऱ्यांनो, आता बस्स. पाणी डोक्याच्या वर गेलंय आमच्या. आता आमची सटकलीय. आम्ही महाराष्ट्राची पोरं आहोत. आमचा नाद करायचा नाय. आता करा फक्त उलटी गणती. दाभोलकर-पानसरेंना आम्ही हरू देणार नाही. त्यांचा विवेक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करू. ते हरले, तर आमचा महाराष्ट्र हरेल. महाराष्ट्राला हरवायला अजून कोणाची माय व्यालेली नाय.

आई-बाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन सांगतो, ते आम्ही होऊ देणार नाही. हो, साईबाबाच. ‘टाइमपास’सारख्या सिनेाच्या डायलॉगमधे साईबाबा असेच पोहोचत नाहीत. आज साईबाबा महाराष्ट्रातल्या साध्यासुध्या लोकांच्या जगण्याचे आधार बनले आहेत. आणि कोण कुठला स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेणारा दीडदमडीचा उपटसुंभ येऊन आम्हाला ‘साईबाबा पुजू नका’ म्हणून सांगत असेल, तर ते आम्ही ऐकून घेणार नाही. ते कुठल्या धर्मसंसदेत सांगितलं जात असेल, तर आम्ही चुलीत घालतो ती धर्मसंसद. आम्हाला बाकी काही माहीत नाही, या फकिरानं एका पडक्या मशिदीत आजचा देशातला सर्वांत मोठा रामनवमीचा उत्सव साजरा करायला आम्हाला शिकवलेलं आहे.

चमत्काराच्या आत जाणीवपूर्वक दडवून ठेवलेले साईबाबा आज आम्हाला हवे आहेत. ते साईबाबा नाकारणाऱ्यांचं आणि दाभोलकर-पानसरेंना मारणाऱ्यांचं डोकं सारखंच आहे. गरिबांच्या सेवेत आयुष्य घालवणाऱ्या मदर तेरेसांना मेल्यानंतरही बदनाम करत राहावं, इतकं घाबरणाऱ्यांच्या डोक्याची ठेवणही त्यांच्यापेक्षा फारशी वेगळी नाही. अशा डोक्यांना ठिकाणावर आणण्यासाठीचा एक फॉर्म्युला मला इतिहासाच्या पानांमध्ये दिसतो. मला वाटतं, आपल्याला तपशीलवार माहीत असलेल्या इतिहासात दोघांनी हा फॉर्म्युला स्वतःच शोधून यशस्वी करून दाखवलाय. ते आहेत शिवाजी आणि गांधीजी.

छत्रपती शिवराय आणि महात्मा गांधी हे परस्परविरोधी वाटावेत, इतकी त्यांची प्रतिमा गढूळ करून आपल्याला सांगितलेली आहे. दोघांचा काळ वेगळा आहे, दोघांची शस्त्र वेगळी आहेत; पण थोडं खरवडलं की, या दोघांधली अनेक साम्यस्थळं दिसतात. मला विचाराल, तर आज भारतीय संस्कृती किंवा ‘आयडिया ऑफ इंडिया’ टिकून राहिली, ती या दोघांमुळेच. आपल्या काळातल्या आपल्या लढ्यांत या दोघांनाही प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. ते त्यांच्या आधी आणि नंतर जवळपास कुणाला मिळालेलं नाही. असं बरंच काही शोधता येईल, शोधायला हवं.

पण त्यातल्या दोन गोष्टी इथे अधोरेखित करायच्यात. एक- या दोघांचाही सर्वसामान्य माणसांवरचा आणि सर्वसामान्य माणसांचा या दोघांवरचा गाढ विश्वास. निस्तेज पडलेल्या लोकांवर त्यांनी जणू जादूच केली. साधी माणसं त्यांचे सैनिक बनली. त्या साध्याच माणसांनी इतिहासात अजोड असा त्याग आणि शौर्य यांचं दर्शन घडवलं. दुसरी गोष्ट म्हणजे, सर्वसमावेशकता. या दोघांच्याही विचारसरणीच्या चौकटी पोलादी नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीही जाऊ शकत होता. जात, धर्म, प्रांत असा कोणताही शिक्का त्यांच्यावर मारता येत नव्हता. त्यांच्याकडे सगळेच होते. सर्वच विचारधारांचे आणि सर्वच प्रकारचे लोक त्यांच्यासोबत गुण्यागोविंदाने राहत होते. तरीही ते सगळे मिळून एका दिशेने जात होते. आज या दोघांसारखा लोकलढा उभारायचा असेल, तर त्यांच्या या दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यांतली इतरही सूत्रं शोधता येतील. शोधायला हवीत.

मला वाटतं, शिवाजी आणि गांधीजी या दोघांनाही आपण लोकांपर्यंत पोहोचवायला हवं- खरे शिवाजी आणि खरे गांधीजी. या दोघांविषयी गैरसमजच फार आहेत, ते तोडायला हवेत. पानसरेंचं ‘शिवाजी कोण होता?’ हे त्यासाठीचा आपला आदर्श आहे. आपण साहित्यिक असू, तर आपण या दृष्टीने काम करू शकतो. ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या विषयावर शंभर भाषणं देण्याचा संकल्प सोडला आहे. गोव्याहून त्याची सुरुवातही झाली आहे. आमचे सोलापूरचे  काही मित्र एकत्र आलेत. त्यांनी याच विषयावर बोलण्यासाठी दहा-बारा वक्ते तयार केलेत. ते पानसरेंचा शिवाजी घेऊन जिल्हा पिंजून काढणार आहेत. मला ही दोनच उदाहरणं माहीत आहेत. असं राज्यभर घडत असेल किंवा घडू शकेल. या सर्व वक्त्यांसाठी आपण शिवाजी महाराजांवर शिबिरं आयोजित करू शकतो का? त्यांच्यासाठी महाराजांविषयी विविध संदर्भ असलेलं हँडबुक तयार करता येईल का? ‘शिवाजी कोण होता?’ हे छोटं पुस्तक आहे. स्वस्त आहे.

पानसरेंना जाऊन आता फक्त महिना झालाय. पुढच्या अकरा महिन्यांत या पुस्तकाच्या एक लाख प्रती विकायच्या, असा विचार आपण करू शकतो का? ‘दाभोलकर कोण होते?’, ‘पानसरे कोण होते?’ अशी या दोघांची चांगली चरित्रं लिहायला हवीत. शिवाय लहान मुलांसाठी, कुमारांसाठी सोप्या भाषेत छोटेखानी चरित्रंही हवीत. प्रयत्न केला तर हे दोघे शाळेच्या पुस्तकांतही पोहोचू शकतील. पानसरे गेली काही वर्षं सातत्याने शत्रुमित्रविवेकाविषयी बोलत असत. माओच्या एका सिद्धांताचा संदर्भ देत कार्यकर्त्यांनी आता नेमकं काय करायला हवं, ते सांगत. त्यांच्या समग्र साहित्यातले संदर्भ, माओचा मूळ सिद्धांत, त्यांची भाषणं शोधून काढत या विषयावर एक छोटी पुस्तिका तयार होऊ शकेल कदाचित. ते खूपच मोलाचं होईल.

दाभोलकरांच्या खुनानंतर आपण सनातन संस्थेविषयी बरंच बोलतो आहोत. पण सनातन काय आहे, हे सांगणारं नीट डॉक्युमेंटेशन मात्र आपण केलेलं नाही. गांधीजींच्या खुनानंतर तीन-चार दशकांनी त्या कॉन्स्पिरसीवर पुस्तकं यायला सुरुवात झाली. जगन फडणीसांचं ‘एका महात्म्याची अखेर’, य.दि.फडकेंचं ‘नथुरामायण’, सदानंद मोरेंचं ‘लोकमान्य ते महात्मा’, तुषार गांधींचं ‘लेट्‌स किल गांधी’ ही त्याची महत्त्वाची उदाहरणं. ही पुस्तकं आपल्या नकळत खूप काम करत आहेत. अशी पुस्तकं दाभोलकर, पानसरेंच्या खुनाविषयी नाही का लिहिली जाऊ शकत?

‘हू किल्ड करकरे?’ आलं, तसं ‘हू किल्ड दाभोलकर?’ आणि ‘हू किल्ड पानसरे?’ का नको? या विषयाशी थेट संबंध नाही, पण लेखक म्हणून आपल्याला काय करता येईल, यासाठी माझी एक टू डू लिस्ट आहे. ती जाता-जाता सांगतो. त्यातले ‘रिंगण’ आणि ‘प्रबोधनकार डॉट ऑर्ग’सारखे प्रयोग आम्ही मित्र करून पाहत आहोत. पण लिस्ट मोठी आहे. हजारो ख्वाहिशे ऐंसी की हर ख्वाहिश पे दम निकले. हिंदुत्ववाद्यांनी खूप मेहनत घेऊन स्वामी विवेकानंदांना हायजॅक केलंय. त्यांना त्यातून सोडवण्यासाठी वैचारिक लेखनाच्या पातळीवर काही प्रयत्न झालेत. पण ते कादंबरी, नाटक या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येऊ शकेल. भारतीय संस्कृतीला ब्राह्मणी म्हणून बाजूला सारणं खूप सोपं आहे.

पण ब्राह्मणी ठरवल्या जाणाऱ्या या संस्कृतीत ब्राह्मणांच्या तुलनेत बहुजनांचं योगदान फारच मोठं आणि महत्त्वाचं आहे. तशी काही इतिहासाची मांडणी होऊ शकते का? ऋषींचं मूळ शोधता येईल का? वयाच्या तिशीत भांबुडर्याला रेल्वेखाली जीव देणारे लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत यांच्यावर एखादी कादंबरी किंवा नाटक लिहिलं जाऊ शकतं का? राजारामशास्त्री भागवत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर, धर्मानंद कोसंबी, सत्यशोधक रा.ना.चव्हाण अशा महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला ललामभूत ठरणाऱ्या पण दुर्लक्षित असलेल्या विचारवंतांची पुस्तकं आज आपल्यासाठी उपलब्ध नाहीत. पण त्यांची ई बुक्स तयार होऊ शकतात. ती करण्यासाठी कुणी पुढे येईल का? आणि हो, साईबाबांची फिलॉसॉफी नेमकी काय आहे, हे चमत्कारांच्या पुढे जाऊन कुणी तरी मांडायला हवंच ना?

मी थोडा इतिहासात रमणारा असल्यामुळे माझ्या लिखाणाच्या कल्पना या अशा आहेत. तुमच्या डोक्यातली पुस्तकं वेगळीच असतील. ती यायला हवीत. त्यासाठी आपण सगळ्यांनी खूप लिहायला हवं. पण जे लिहू, ते आपल्या भाषेत हवं. जे लिहू, ते आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असायला हवं. त्यामागे नुसती प्रबळ ऊर्मी नको, तर मेहनतही हवी. मजकुराइतकीच त्याची मांडणीही महत्त्वाची आहे, त्यामुळे शैलीवरही आपण काम करायला हवं.

 

Tags: गोविंद पानसरे डॉ. नरेंद्र दाभोलकर गांधीजी शिवाजी महाराज संत इतिहास सचिन परब धर्मांधांच्या हातांतून धर्माला सोडवा Govind Pansare Dr. Dabholkar Gandhiji Shivaji Maharaj Sant History Sachin Parab Dharandhanchya hatantun dharmala sodava Drushtikon weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सचिन परब,  मुंबई
ssparab@gmail.com

पत्रकार
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके