डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्राचार्य देवदत्त दाभोलकर यांना आदरांजली वाहणारे म.द.हातकणंगलेकर व मोहन धारिया यांचे दोन लेख 8 जानेवारीच्या ‘साधना’ अंकात प्रकाशित झाले आहेत. दोघांनीही आपापल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला आहे, त्या हृद्य आहेत. तथापि, प्राचार्य दाभोलकर यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रातील कर्तृत्व व कामगिरी लक्षात घेता त्यांचे मूल्यमापन करणारे व त्यांचे योगदान नेमकेपणाने मांडणारे आणखी विस्तृत लेख किमान ‘साधना’मध्ये येणे अधिक उचित होईल. डॉ.नरेंद्र दाभोलकर हे साधनाचे संपादक, प्राचार्य दाभोलकरांचे बंधू आहेत असा आक्षेप कोणी घेणार नाही याची खात्री आहे. ‘साधना’ साप्ताहिक जी वैचारिक परंपरा घेऊन आज उभी आहे, त्याचा एक घनिष्ट अनुबंध म्हणजे प्राचार्य दाभोलकर. त्याचे विस्मरण होऊ नये. भरपाई यथावकाश होईल अशी अपेक्षा. या निमित्ताने प्राचार्य दाभोलकरांसंबंधीच्या माझ्या काही वैयक्तिक आठवणी सांगितल्या आणि निरीक्षणे नोंदविली तर ती अस्थानी होणार नाहीत.  

माझा आणि प्राचार्य देवदत्त दाभोलकरसरांचा स्नेह जुळला त्याचे कारण त्यांचे विद्यार्थीप्रेम. मी फर्ग्युसनचा विद्यार्थी असलो तरी मी पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर सर फर्ग्युसनचे प्राचार्य झाले. माझा त्यांच्याशी परिचय झाला तो वार्ताहर म्हणून. सर हाडाचे शिक्षक आणि मार्गदर्शक असल्यामुळे तरुणांशी सातत्याने संवाद साधणे त्यांना आवडे. माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन ते पुस्तके सुचवत असत. नंतर त्यांनी स्वत:चा वैयक्तिक ग्रंथसंग्रहच माझ्यासाठी खुला केला. त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या कपाटातून पुस्तके नेण्याची परवानगी दिली. अट फक्त एकच असे. त्या पुस्तकासंबंधी नंतर त्यांच्याशी टिपणवहीसह चर्चा करायची. विद्यार्थ्यांच्या वाचनाला मोकळीक देण्याची पण त्याच वेळी त्याला अकॅडेमिक शिस्त लावण्याची त्यांची ही क्लृप्ती अभिनव होती.

त्या वेळी कविवर्य अनिलांचे ‘कुसुमानिल’ हे पुस्तक चर्चेत होते आणि एका प्रेमकहाणीचा तो दस्तावेज असल्याने विद्यार्थ्यांत ते वाचण्याची अपार उत्सुकता होती. अनिल आणि कुसुमावती देशपांडे (त्या वेळी चिटणीस) फर्ग्युसनेमध्येच विद्यार्थी असतानाचा हा कालखंड असल्याने आम्हांला त्यातील स्थलकालाचे वाढीव आकर्षण होते. ‘ऑस्कर वाईल्ड’च्या ‘पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे’चा एक संदर्भ पुस्तकात होता, म्हणून ते वाचण्याची उत्सुकता होती.

पुस्तक स्वतंत्रपणे सरांकडे व इतरत्रही उपलब्ध नव्हते. ‘कंप्लीट वर्क्स ऑफ ऑस्कर वाईल्ड’मध्ये मात्र त्याचा समावेश होता. ‘इंटरनॅशनल’मध्ये ते उपलब्ध होते. सरांनी माझ्यासाठी ते स्वत: विकत घेतले आणि वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात नसेल, पण मला हवे असेल तर त्यांच्या नावावर इंटरनॅशनलमध्ये कोणतेही पुस्तक विकत घेण्याची परवानगीच त्यांनी मला दिली. ‘त्यामुळे माझा ग्रंथसंग्रह अधिक समृद्ध होईल’ अशी मिश्किल टिप्पणी करायला ते विसरले नाहीत. त्यांचे हे औदार्य मला फार लाभदायक ठरले.

कवी अनिलांच्या स्नेहबंधाचा अनुपम लाभ मला नंतर झाला. ते इतरांचे आप्पासाहेब असले तरी आम्हांला आप्पा झाले. आमच्या ओतूरच्या घरी ते आले. आठ-दहा दिवस राहिले. ‘दशपदी’ या त्यांच्या फार गाजलेल्या कवितासंग्रहाची प्रस्तावना त्यांनी ओतूरच्या आमच्या घरातील मागच्या माडीत कंदिलाच्या प्रकाशात लिहिली. दुसरा स्नेह मिळाला तो ‘इंटरनॅशनल’चे मालक विठ्ठलराव दीक्षित आणि नंतर उपेंद्र दीक्षित यांचा. गेल्या चाळीस वर्षांत असा एकही आठवडा गेला नाही की, मी त्यांच्या पुस्तकाच्या दुकानात गेलो नाही. मी स्वत:साठी खरेदी केलेल्या बहुसंख्य पुस्तकांवर ‘इंटरनॅशनल’चे लेबल आहे.

पुस्तकं वाचणं, खरेदी करणं, त्यावर टिपणं काढणं आणि नंतर त्यावर चर्चा करणं ही चतु:सूत्री मला शिकवली दाभोलकरसरांनी. मला वाटतं, या प्रक्रियेत सरांनी मला एकट्यालाच गुंफलं नसणार. सर्वच विद्यार्थ्यांबद्दल त्यांना फार प्रेम वाटे. त्याच संदर्भात आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. सर पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले, तेही काहीशा असाधारण परिस्थितीत व पेचप्रसंग निर्माण झालेला असताना. तत्कालीन कुलगुरूंच्या भ्रष्टाचारी व अकार्यक्षम कारभाराविरुद्ध पुण्यात तीव्र असंतोष निर्माण झालेला होता. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी थोर समाजवादी नेते एस.एम.जोशी यांनी उपोषण आरंभिले होते. केसरीचे संपादक जयंत  टिळक आणि इतर अनेक ज्येष्ठ पुणेकर या आंदोलनात अग्रभागी होते. महाराष्ट्र सरकारवरही मार्ग काढण्याचा दबाव होता. शरद पवार बहुधा त्या वेळी गृहखात्याचे मंत्री होते. त्यांनी या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी दाभोलकरसरांनी कुलगुरुपद स्वीकारावे असा आग्रह धरला. सरांचा नैतिक दबदबा, तत्त्वनिष्ठता, कार्यक्षमता, शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वान्यता असे अनेक घटक त्यांच्या निवडीमागे असावेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि यथावकाश विद्यापीठातील वातावरण तणावमुक्त झाले.

कुलगुरूंचे संरक्षित निवासस्थान विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच खुले झाले. सुंदर लाकडी काम आणि इटालियन मार्बलचे फ्लोरिंग असलेला पाच-सात खोल्यांचा टुमदार बंगला सरांच्या पारदर्शकतेमुळे मोकळा हसला. त्या काळी वार्ताहर म्हणून विद्यापीठाचं ‘बीट’ माझ्याकडे होतं. ‘सेनेट’ची मीटिंग ज्ञानेश्वर सभागृहात सुरू असताना, कुठल्या तरी कारणासाठी त्या वेळच्या पतित पावन संघटनेने विद्यार्थ्यांचा एक मोर्चा आणला. ‘पतित पावन’ म्हणजे त्या वेळची अतिजहाल विद्यार्थी संघटना. प्रथा मोडून आणि मीटिंग स्थगित करून दाभोलकर बाहेर आले आणि मोर्चाला सामोरे गेले. ‘घेराओ’ घालायचा असला तर मला एकट्याला घाला, इतर सदस्यांना त्रास नको असे म्हणाले. तणाव एकदम कमी झाला. विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद झाला. कटुता निर्माण झाली नाही. पण ते तिथेच थांबले नाहीत. आठवड्यातून एकदा नियमितपणे विद्यार्थ्यांशी बोलायला मला आवडेल असं त्यांनी जाहीर केलं. दर रविवारी सकाळी विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगच्या समोर असलेल्या हिरवळीवर भेटायचं ठरलं. हा उपक्रम काही काळ तरी सुरू होता. तो थांबला विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाअभावी, सरांच्या अनुत्साहामुळे नाही.

आजकाल विद्यार्थी आणि कुलगुरू यांच्यात अशा परस्परसंवादाची संधी उपलब्ध होणं दुर्मिळ आहे. अशा संवादासाठी दाभोलकर सर कशी संधी उपलब्ध करून देत त्याची आणखी एक आठवण सांगायला हवी. गांधीवादी विचारवंत आचार्य स.ज.भागवत अधेमधे दाभोलकरांकडे मुक्कामी असत. मी पत्रकारितेचा विद्यार्थी असताना असाच सरांचा निरोप आला. भागवतांना भेटण्यासाठी. मी खेड्यातून शहरात आलेलो आणि सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असल्याने आचार्यांना माझ्याशी बोलण्यात विशेष स्वारस्य असावे. मी वारंवार त्यांना भेटावे अशी सरांची इच्छा होती. दुर्दैवाने आचार्यांचे 1973 मध्येच निधन झाले. त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी ‘साधना’ कार्यालयातच ठेवला होता.

कुलगुरुपदावरून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षे दाभोलकर पुण्याच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’मध्ये नियमित जात. त्यांचे नेमके पद मला आता आठवत नाही. आठवड्याला माझी किमान एक फेरी तिथे असे. गप्पा होत. माझ्या कामाची आणि वाचनाची ते आवर्जून चौकशी करीत. चित्रातार्इंकडे नव्हे (त्यांना वेळच नसे) पण जे.पी.नाईकांकडे गप्पांसाठी ते मला आवर्जून नेत असत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अग्रक्रम बदलण्यासाठी शैक्षणिक खर्चाचा त्रिकोण डोक्यावर कसा उलटा केला पाहिजे (इन्व्हर्टेड पिरॅमिड), हे जे.पीं.नी फळ्याचा उपयोग करून मला इतके सुंदर समजावून सांगितले की, ते मी अद्याप विसरलो नाही. सर्वशिक्षा अभियान आणि ‘राइट टु एज्युकेशन ॲक्ट’विषयीच्या बातम्या आणि लेख वाचताना मला जे.पीं.चा तो धडा अजून आठवतो आणि त्यांच्या द्रष्टेपणाचा प्रत्ययही येतो.

गांधी आणि गांधीवादावरची त्यांची निष्ठा प्रखर असली तरी त्यांच्या बोलण्यात पाश्चात्त्य तत्त्वज्ञांची उद्‌धृते असतच. व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेर आणि रूसो त्यांना विशेष प्रिय असावेत. पुण्यात 1977 मध्ये झालेल्या पु.भा.भावे यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्‌घाटन सोहळा उधळला जात असताना प्रक्षोभ शांत करण्यासाठी पु.लं.पासून दाभोलकरांपर्यंत अनेकांनी व्यासपीठावरून श्रोत्यांना आवाहन केले. मतभेदाचे स्वातंत्र्य असले तरी ते व्यक्त करण्याची सनदशीर लोकशाही चौकट मोडता कामा नये असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते आणि त्यासाठी ‘व्हॉल्टेर’चे म्हणून मानले जाणारे सुप्रसिद्ध उद्‌धृत ‘I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it.‘ त्यांनी फार परिणामकारकतेने वापरले होते. अर्थात, विशिष्ट हेतूने प्रेरित असलेल्या जमावावर त्याचा अनुकूल परिणाम होण्याची शक्यता नव्हतीच.

वैचारिक स्वातंत्र्य आणि त्याची अभिव्यक्ती हा दाभोलकरांचा श्रद्धाविषय होता. आणीबाणीच्या काळात या स्वातंत्र्याचा झालेला संकोच दूर करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंतांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात त्यांचा पुढाकार होता. वर्धा आणि नंतर बहुधा जयपूरला झालेल्या ‘आचार्यकुल’ संमेलनात ते सहभागी होते.

फर्ग्युसन कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापकांनी सहवास सोसायटीत आपापली घरे उभारली. प्रा.डॉ.वि.रा.करंदीकर, प्रा.राजाभाऊ इनामदार, प्रा.वि.मा.बाचल वगैरे मंडळी त्यात होती. दाभोलकरांनीही आपले घर तिथे बांधले. ते पाहण्यासाठी आणि नंतर जेवणासाठी त्यांनी मला आमंत्रित केले. माझ्याबरोबर माझा मित्र आणि सहकारी अरुण खोरे होता. घर साधंच, परंतु सुंदर होतं. कमी खर्चात व्हावं म्हणून लोडबेअरिंग आहे, आर.सी.सी. नाही, असं त्यांनी त्या वेळी सांगितलं. सुनतार्इंनी स्वत:च स्वयंपाक केला होता. पडत्या काळात सुनताईंनी अरुणला मदत केली होती. त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कृतज्ञतेची भावना होती. अशी मदत उभयतांनी कितीतरी जणांना केली होती. त्याची वाच्यताही न करता. माणसांना मदत करणं होतंच. पण विधायक सामाजिक उपक्रमांना, विशेषत: वेगळ्या वाटेने जाणाऱ्या पण मूलभूत महत्त्वाच्या असणाऱ्या कामांना मदत करण्यासाठी ते नेहमीच स्वत:हून पुढाकार घेत.

‘सातार’ला स्थलांतर केल्यानंतर त्यांची कारणपरत्वे पत्रं येत. बहुधा कार्डच असे. पण त्यातही कुठल्या तरी उपक्रमांना मदत करण्याचा प्रस्तावच असे. प्रत्यक्ष भेटी दुर्मिळच झाल्या. गेल्या वर्षीच फेब्रुवारीत सातारला झालेल्या ग्रंथोत्सवात वक्ता म्हणून मी गेलो होतो. सरांना भेटायचंच असं ठरवलं होतं, पण कार्यक्रम संपायला उशीर झाला. भेटीची वेळ टळून गेली. पुण्याला परतलो आणि आता तर शक्यच नाही, पण आठवणी मात्र आहेतच. फार छान आठवणी...

Tags: मृत्युलेख सदा डुंबरे देवदत्त दाभोलकर fargusson collage sada dumbare devdatta dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदा डुम्बरे,  पुणे, महाराष्ट्र
sadadumbre@gmail.com

पत्रकार, लेखक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके