डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

देव आणि धर्म यांच्याविषयी उदासीन असणाऱ्या साथी मंडळींना गुरुजींच्या या कृत्याचे महत्त्व पुरेसे उमगलेले आहे, असे म्हणता येत नाही. वास्तविक कोणी आस्तिक असो की नास्तिक, बुद्धिवादी असो की श्रद्धावादी, गुरुजींचा लढा हा समतेचा लढा होता. 

सर्व समाजवाद्यांना आदरस्थान वाटणाऱ्या साने गुरुजींना संतांचे स्थान, कार्य आणि महत्त्व चांगले उमगले होते. साने गुरुजींच्या आयुष्यामधील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न. गुरुजींपूर्वी माटे मास्तरांसारख्यांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्यासाठी गिंडे प्रभृतींच्यामार्फत काही हालचाली केल्या होत्या; पण त्या फोल ठरल्या. साने गुरुजींनी मग आपले प्राण पणाला लावून आमरण उपोषण सुरू केले. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. खुद महात्मा गांधींचा गुरुजींच्या भूमिकेबाबत गैरसमज झाला होता की करून देण्यात आला होता? पण गुरुजी गांधीजींच्या नाराजीला डगमगले नाहीत. पंढरपूरचे सनातनी पंडित एकत्र झाले. त्यांच्या प्रभावाखाली वारकरीही मंदिर प्रवेशाच्या बाबतीत प्रतिगामी भूमिका घेते झाले. शेवटी गुरुजींचा विजय झाला. विठ्ठलाचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले झाले. समतेच्या तीन एक पाऊल निर्णायकपणे पुढे पडले. 
देव आणि धर्म यांच्याविषयी उदासीन असणाऱ्या साथी मंडळींना गुरुजींच्या या कृत्याचे महत्त्व पुरेसे उमगलेले आहे, असे म्हणता येत नाही. वास्तविक कोणी आस्तिक असो की नास्तिक, बुद्धिवादी असो की श्रद्धावादी, गुरुजींचा लढा हा समतेचा लढा होता. या दिवशी विठ्ठल मंदिर खुले झाले तो दिवस 'मुक्ती दिवस' म्हणून सेवा दलाच्या प्रत्येक शाखेवर प्रतिवर्षी साजरा केला जायला हवा होता. पंढरपुरात गुरुजींचे भव्य स्मारक करायला हवे होते. कथामाला चालविणाच्या गोष्टीवेल्हाळांनी या खऱ्याखुऱ्या कथेवर संवाद साधायला हवा होता. ही फार मोठी संधी होती. ती बुद्धिवादाच्या दबावामुळे समाजवाद्यांनी दवडती. दलितांनी हिंदू धर्माचा त्याग केला, तरी नाशिकच्या काळा राम मंदिर व पुण्याच्या पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रहांच्या आठवणी ते अभिमानाने सांगतात. (महाडच्या चवदार तळ्याचा तर प्रश्नच नाही.) समाजवादांनी मात्र हा हातचा आणि हक्काचा वारसा वाया घालवला. 
15 ऑगस्ट 1948 ते 10 जून 1950 या काळात गुरुजींनी ‘साधना’मधून संतांच्या कार्यावर लिखाण केले. त्यात तुकोबांचाही समावेश आहे. ‘तुकारामांचे जीवन म्हणजे अखंड प्रयत्नवाद’, असे साने गुरुजी लिहितात. तुकोबांची गाथा म्हणजे महाराष्ट्राला अखंड बोधामृत पाजणारी कामधेनूच होय, असेही त्यांनी सांगितले आहे. "ऐसे भाग्य कै लाहता होईन । अवघे देखे जन 
ब्रह्मरूप ।’’ म्हणजे सारे भेद गळावेत. सर्वत्र मंगलाची अनुभूती यावी, हा त्यांचा अट्टाहास होता. जीवन गंगाजळाप्रमाणे निर्मल व्हावे (‘सर्वांगी निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।’) म्हणून त्यांची साधना होती." अशी गुरुजींची तुकोबांबद्दलची निरीक्षणे आहेत. 
‘सर्वांबद्दल प्रेम सर्वांबद्दल समभाव’ हेही तुकोबांचे एक वैशिष्ट्य. ते सांगतात, "ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामादी संतांनी पंढरपूरची वारी सुरू केली. साऱ्या महाराष्ट्रातून तेथे स्त्री-पुरुष येऊ लागले. एक प्रकारची एकता, मानवता फुलू लागली. तुकाराम महाराज पंढरपूरच्या वाळवंटातील सोहळ्याचे वर्णन करताना उचंबळून म्हणतात, 'कठोर हृदये. मृदु नवनीते पाषाणा पाझर फुटती 
रे । एकमेकां लोटांगणी गेली रे ।’ हा त्याला नमस्कार करीत आहे. तो मला करीत आहे. कठोरता गेली. हृदये प्रेमळ बनली. पाषाणांसही पाझर फुटतील, संतांनी महाराष्ट्रात एक तरी जागा अशी निर्माण केली, जेथे सारे समान म्हणून वागतील." "तुकारामांचे अभंग म्हणजे तुमचे आमचे वेद’’, असेही गुरुजी सांगतात. तुकोबांच्या 'वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा । वेरांनी वहावा भार माथा' या ओळी उद्धृत करून गुरुजी सांगतात की इतरांनी शब्द बोलावे, परंतु शब्दातील अर्थ, वेदांचा अर्थ आम्हांला माहीत आहे. सर्वत्र अद्वैत अनुभवणे हा वेदांचा खरा अर्थ. देवाची पूजा म्हणजे नुसती फुले वाहणे नव्हे. 'कोणाही जीवाचा न पड़ो मत्सर । धर्म सर्वेश्वर पूजनाचे' या चरणातील 'सर्वेश्वर' हा शब्द मला फार महत्त्वाचा वाटतो. "
तुकोबांविषयी लिहिताना कोणत्या अभंगाचा संदर्भ द्यावा आणि कोणत्या अभंगाचा देऊ नये, असे साने गुरुजींना झाले आहे. ते म्हणतात, "हजारो अभंगांमधून निवडानिवड काय करायची? तुकारामांच्या अभंगांवर आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवर सारा महाराष्ट्र पोसला गेला आहे. ज्याला तुकारामांचे चार अभंग येत नाहीत, असा मनुष्य महाराष्ट्रात आढळणार नाही. संतांनी महाराष्ट्राला संस्कृतीच्याच समान पातळीवर आणले. उच्च विचार सोप्या भाषेत घरोघर नेले. ग्यानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे वाङ्मय हे खरे राष्ट्रीय वाङ्मय, कारण ते सर्व घरांत गेले. मोरोपंतांची आर्या व वामनी श्लोक पांढरपेशी लोकांत व हरदासांत; परंतु आम जनतेत तुकोबांची वाणी गेली. तुकारामांच्या अभंगात प्रसाद आहे. कळकळ आहे. स्वानुभव आहे. ते रोकडे बोल आहेत. ते चावट बोल नाहीत. त्यांच्या अभंगात परिचयाचे दाखले, रोजच्या व्यवहारातील उपमा-दृष्टांत आहेत. कधी कधी त्यांची वाणी कठोर वाटते. ती वाणी क्वचित शिवराळ होते. विनोबा म्हणाले, "तुकारामांचा आईचा गुण अशा वेळी प्रकट होतो. आईच मुलावर रागावते. त्यांच्या त्या कठोर, कधी शिवराळ वाटणाऱ्या वाणीत त्यांची अपार करुणा आहे, त्यांचे वात्सल्य आहे.’’ गुरुजींचे स्वतःचे हृदय आईचे होते. त्यांची ‘श्यामची आई कोण विसरेल? करुणा हे मूल्य भारतीय समाजात भगवान बुद्धांपासून चालत आलेले आहे. पण आवश्यकतेनुसार कारुण्याला कठोरही व्हावे लागते. तुकोबांची कठोरता अशा प्रकारे कारुण्यमूलक आहे. क्रोध हा कधी करुण रसाचा स्थायीभाव होऊ शकेल का? तुकोबांचे अभंग हे अशा प्रकारे आव्हान देणारे आहेत. 
साने गुरुजींनंतर वारकऱ्यांच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या बाबतीत सक्रिय हस्तक्षेप करणारा समाजवादी कार्यकर्ता म्हणजे डॉ. बाबा आढाव, मुद्दा परत तोच. समतेचा. गुरुजींनी हरिजनांना मंदिरप्रवेश करता यावा म्हणून चळवळ केली, तर बाबांनी ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यातून चालणाऱ्या हरिजनांना बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून चळवळ केली. पण बाबांनी गुरुजींप्रमाणे हा संबंध पुढे मात्र वाढवला नाही.

(डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकातून)
 

Tags: पंढरपूर मंदिरप्रवेश आंदोलन अस्पृश्य pandharpur साने गुरुजी movement temple entry untouchables sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके