डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महापुरुषांचे जीवाश्म होऊ नये म्हणून...

डॉ. सदानंद मोरे स्वतःला ‘महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक’ इतकंच म्हणवून घेत असले, तरी ते महाराष्ट्राच्या इतिहासाचे देशातील एक महत्त्वाचे भाष्यकार आहेत.‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक महाग्रंथात त्यांनी लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी हे महाराष्ट्राचं स्थित्यंतर मोठ्या ताकदीने आणि तपशिलाने मांडलं. त्यामुळे लोकमान्यांच्या अभ्यासाचा नवा आयाम प्रस्थापित झाला. शिवाय त्यांनी सविस्तर टिळकचरित्रही लिहिलं.या सगळ्याच्याही आधी लिहिलेल्या ‘तुकाराम दर्शन’पासून काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘विद्रोहाचे व्याकरण’ या महात्मा फुलेंच्या वैचारिक चरित्रापर्यंत जवळपास प्रत्येक ग्रंथात कमी किंवा जास्त टिळक सापडतात. त्यामुळे टिळकांवरचं नवं वैचारिक लेखन इतरत्र थांबलेलं असताना मोरेसरांना गवसलेले लोकमान्य महत्त्वाचे ठरतात. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने त्यावरची ही प्रश्नोत्तरं. 

प्रश्न - सर, महाराष्ट्राचा अभ्यास करताना लोकमान्य टिळकांनी तुम्हाला पहिल्यांदा कधी खुणावलं आणि पुढे तुम्ही त्यांच्या प्रभावाचा माग कसा काढलात? 

- लोकमान्य टिळकांचा परिचय महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असतोच. ‘शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही...’ टिळक-आगरकर वाद... कॉलेजमध्ये असताना तब्येतीसाठी ड्रॉप घेतला होता, वगैरे. मग तिथून एकदम जातो ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’. हे मलाही माहीत होतंच. पण माझ्या वडिलांकडे खूप पुस्तकं होती. त्यात ‘टिळक भारत’ नावाचं शि.ल. करंदीकर यांनी लिहिलेलं टिळकचरित्रही होतं. शिवाय गीतारहस्यही होतं. शाळेत असतानाच ते माझं वाचून झालं होतं. गीतेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना वडिलांबरोबर गीतारहस्यावरून चर्चाही व्हायच्या. त्यामुळे एखाद्या अभ्यासकाला टिळकांविषयी किमान माहिती हवी असते, त्याचा पाया अगदी शालेय वयातच घातला गेला होता. 

पण मी टिळकांकडे स्पेसिफिक कसा वळलो, ते इंटरेस्टिंगच आहे. विश्राम बेडेकरांचं ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक आलं होतं. तेव्हा मी अहमदनगरला प्राध्यापक होतो. ते नाटक मी पाहिलं. बेडेकरांनी अशी भूमिका घेतली होती, मी आगरकरांना न्याय देऊ इच्छितो. तेदेखील टिळकांसारखे स्वराज्यप्रेमीच होते, वगैरे वगैरे. ते सांगत होते की, मी आगरकरांचा समर्थक आहे. पण प्रत्यक्ष नाटकामध्ये टिळकांचं चित्रच जास्त उठावदार झालं.

त्याच्या आधी मी अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांचं आत्मवृत्त वाचलं होतं. हा फार मोठा माणूस होता. त्यांची बरीचशी धोरणं प्रतिगामी असल्यामुळे ती लोकांना आज आवडणार नाहीत. पण त्या काळची सामाजिक परिस्थिती काय होती, ते समजून घ्यायला त्यांचं आत्मवृत्त फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला नाटकात बेडेकर कुठे फसलेत, याचा अंदाज आला. म्हणून मी टिळक आणि आगरकर नाटकाचं परीक्षण करणारा एक लेख लिहिला. आमचा एक ज्येष्ठ स्नेही कॉ.भास्करराव जाधव ‘श्रमिक विचार’ नावाचं पत्र चालवायचे. त्यात मी दर रविवारी लिहायचो. त्यात मी लिहिलं की, बेडेकरांनी आगरकरांना कात्रजचा घाट दाखवला. कारण ते म्हणतात- मी आगरकरांचा पाठीराखा आहे, पण त्यांनी जास्त झुकतं माप टिळकांना दिलं. मी ते पुराव्यानिशीही मांडलं. त्यात आगरकर आणि टिळक ही काय भानगड आहे, याकडे माझं लक्ष गेलं. 

त्याच वेळी य.दि. फडकेंनी या नाटकासंबंधी लिहिलं होतं. भाषणं केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, यात आगरकरांचं चित्र हिणकस झालेलं आहे. आमचं मत एकच होतं. फडके त्या काळातले आधुनिक महाराष्ट्राचे फार मोठे अभ्यासक. मी त्या विषयात फारसा प्रसिद्ध नसलेला. संतसाहित्याचा अभ्यासक म्हणून थोडंफार नाव होतं, नाही असं नाही. पण फडकेंनी माझा लेख वाचला. तो त्यांना खूप आवडला. फडकेंकडे महाराष्ट्राच्या इतिहासाची अद्ययावत साधनं होती. माझ्याकडे तसं काहीच नव्हतं. पण मी मधल्या जागा कल्पनेने भरून काढल्या होत्या. 

य.दि. फडकेंनी मला बोलावलं. फडके त्या वेळेला पुणे विद्यापीठात पोलिटिकल सायन्सला होते. आमच्या गप्पा झाल्या. चांगली मैत्रीही झाली. त्या वेळी ते आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक प्रोजेक्ट करत होते. त्यात राजेंद्र व्होरा, यशवंत सुमंत, सुहास पळशीकर अशी सगळी राज्यशास्त्राची मंडळी होती. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. तरीही मला बोलावलं. ते मला बरं वाटलं. त्यात फडकेंची कॉम्प्लिमेंट- तुमचं वाचन सखोल आणि चौफेर आहे. अरे म्हटलं, असं आहे का? मी त्यांना होकार दिला. सगळ्यांनी मिळून करायचा प्रोजेक्ट काही झाला नाही. अर्थात फडकेंनी तो पुढे आपल्या पद्धतीने एकहाती पूर्ण केला. पण माझ्या आधुनिक महाराष्ट्राचा अभ्यास सुरू होता. आधुनिक महाराष्ट्रावरचा संतसाहित्याचा प्रभाव हा माझा कुतूहलाचा विषय होता. त्यामुळे मी ‘तुकाराम दर्शन’ लिहिलं. तुकाराम दर्शनची पार्श्वभूमी आधुनिक महाराष्ट्रच आहे. एका अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून लिहिलेला तो इतिहासच आहे. 

प्रश्न - ‘तुकाराम दर्शन’ ही तुमची साप्ताहिक सकाळमध्ये दीर्घ काळ चाललेली लेखमालिका. त्यानंतर ‘लोकमान्य ते महात्मा’ ही मालिकाही दीर्घ काळ चालली. पहिल्या लेखमालेचा दुसऱ्या लेखमालेशी काही संबंध होता, की दुसरी स्वतंत्रपणे जन्माला आली?

- तेच सांगत होतो मी. ‘तुकाराम दर्शन’ संपता-संपता मला एक गोष्ट जाणवली. टिळक 1920 मध्ये वारले. गांधीजींचं आगमन झालं. टिळकांच्या ज्या अनुयायांना गांधीजी पटत नव्हते, त्यांनी गांधींना विरोध केला; तो कोणत्या ग्राऊंडवर केला? त्या विरोधाची पायाभरणी इतिहासाचार्य वि.का. राजवाडेंनी तुकाराम विरुद्ध रामदास या वादाने केली होती. तुकोबा आणि त्यांचा वारकरी संप्रदाय हा नेभळट, निवृत्तिवादी आहे वगैरे. त्यांच्यामुळे स्वराज्य गेलं. आणि रामदास म्हणजे प्रवृत्तीवादी, लढाऊ वगैरे. त्याच प्रभावातले पत्रकार, ‘भाला’कार भोपटकर यांचं एक विधान वाचनात आलं- टिळक म्हणजे रामदास आहेत आणि तुकाराम टाळपिट्या गांधी आहे. ते वाचलं आणि मी उडालोच. म्हटलं, अशी भानगड आहे का? तुकाराम दर्शन इथे संपत नाही, ते इथपर्यंत जातं. इतिहासाचार्य राजवाडे वगैरे मंडळींनी रामदास विरुद्ध तुकाराम असं द्वंद्व मांडलं होतं. ते द्वंद्व वेगळ्या अर्थाने गांधी-टिळक यामधेही सुरू राहिलं, हे मला तिथे स्ट्राईक झालं. तिथेच मी ठरवलं की आपण याच्यावरती स्वतंत्र काम करायला पाहिजे. एका अर्थाने लोकमान्य ते महात्मा हे तुकाराम दर्शनचं एक्स्टेन्शन आहे. 

त्यात मी नेतृत्वाच्या संक्रमणाचा मुद्दा मांडला. टिळकांकडून गांधींकडे 1920 मध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं संक्रमण झालं. त्याचा महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम झाला. कपडेलत्ते, संगीत, साहित्य, नाटक, तमाशा, फिजिकल, आयडियॉलॉजिकल, सायकॉलॉजिकल- अशा सगळ्या गोष्टी आल्या. तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येतो, हे मी ‘तुकाराम दर्शन’मध्ये मांडलं होतं. तसा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना आपल्याला दोन केंद्रं पकडावी लागतात. एक- टिळक आणि दुसरे- गांधीजी. तशा प्रकारे मी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची द्विकेंद्री लंबवर्तुळाकार मांडणी केली. 

प्रश्न - सर, एक म्हणजे, गीता व श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान असा तुमच्या पीएचडीचा आणि त्यानंतरच्या अभ्यासाचा विषय. दुसरं म्हणजे, ‘जागृती’कार पाळेकर या ब्राह्मणेतर संपादकांच्या निवडक लेखांचं तुमचं पुस्तकही प्रकाशित झालं होतं. या दोन्ही बिंदूंपासून तुमचा टिळकांपर्यंतचा प्रवास कसा झाला? 

- ज्ञानेश्वरांनी गीतेचा मराठीत अर्थ सांगितला, तसाच टिळकांनी गीतारहस्य लिहून सांगितला. त्यामुळे त्यांच्यात साम्य काय, फरक काय- हा माझ्या कुतूहलाचा विषय होता. त्याचाही माझा अभ्यास झाला. त्यादरम्यान ‘केसरी’चे लोक दर वर्षी गीतारहस्य जयंती साजरी करतात. त्या दिवशी कुणाचं तरी प्रवचनवजा व्याख्यान असतं. त्यात मीही एका वर्षी ‘गीतारहस्याची निर्मितिमीमांसा’ असं व्याख्यान दिलं होतं. कृष्णामुळे या विषयात खोल गेलो होतो. या व्याख्यानामुळे मला अधिक खोलात जाता आलं. कृष्ण, टिळक आणि ज्ञानेश्वरमाऊली- असा तो अभ्यासाचा ट्रँगल होता. मी या तिघांचीही चरित्रे लिहिली.

तुकाराम दर्शनच्या आधीच ‘जागृती’कार भगवंतराव पाळेकरांवरच्या प्रोजेक्टची सुरुवात झाली. ते ब्राह्मणेतर चळवळीतले फार मोठे संपादक होते. त्यांच्या जागृती पत्राइतकी वर्षं दुसरं कुठलंच तोलामोलाचं ब्राह्मणेतर चळवळीतलं पत्रं चाललं नाही. ‘जागृती’कारांचा दृष्टिकोन फारच उच्च म्हणावा असा होता. संघर्षाच्या जागी संघर्ष करायला हवा. पण संघर्ष रोज नाही करायचा; योग्य त्या ठिकाणी आपल्याला समन्वयही करावा लागतो, अशी त्यांची भूमिका होती. ते अत्यंत सुसंस्कृतपणे लिहिणारे निष्पक्ष पत्रकार होते. 

जागृती हे पत्र 1917-18 मध्ये सुरू झालं. ते स्वातंत्र्यानंतरही चाललं. हा ब्राह्मणेतर चळवळीचा महत्त्वाचा कालखंड होता. बाबा आढाव यांनी मला पाळेकरांच्या निवडक लेखांचं संपादन करायला सांगितलं होतं. त्यासाठी आम्ही बडोद्याहून ‘जागृती’च्या फायली आणल्या. त्यातले लेख निवडले. त्याचं ‘निवडक पाळेकर’ म्हणून संपादन केलं. त्याला विस्तृत प्रस्तावनाही लिहिली. ते करताना त्यात या काळातल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या होत्या. टिळकांचे अनुयायी कोण आणि गांधींचे अनुयायी कोण, ब्राह्मणेतर चळवळीतल्या पुढाऱ्यांचा गांधींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला... ब्राह्मणेतर अगोदर गांधींच्या बाजूने होते. त्यांना गांधीजींविषयी आदर-सहानुभूती होती, कारण त्यांना ते आपल्यापैकी वाटत. पण टिळकांकडून गांधींकडे महाराष्ट्राचं नेतृत्व गेलं, तेव्हा हे लोक प्रत्यक्ष चळवळीत नव्हते. टिळक ते गांधी या संक्रमणकाळातला संघर्ष हा ब्राह्मणांमधलाच संघर्ष होता. प्रामुख्याने टिळकांच्याच अनुयायांमधला आपापसातला संघर्ष होता. अर्थात विनोबा भावे, शंकरराव देव यांच्यासारखे काही नवे तरुणही गांधींकडे आले होते. तेव्हा ब्राह्मणेतर चळवळ या संघर्षापासून अलिप्त होती, कारण त्यांचं लक्ष ब्राह्मणी वर्चस्वामुळे निर्माण झालेला ब्राह्मणेतरांचा बॅकलॉग भरून काढण्याकडे होतं. त्यासाठी त्यांची ब्रिटिश सरकारची मदत घ्यायलाही हरकत नव्हती.

हळूहळू त्यांच्याही हे लक्षात आलं की, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा अंतर्गत वाद आहे. आपला खरा शत्रू इंग्रजी साम्राज्य आहे. तो आपल्याला झुलवत ठेवतो आणि आपला उपयोग करून घेतो. हे कळण्याची प्रक्रिया काही सोपी नव्हती. त्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी प्रयत्न केले. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतले बिनीचे लोक म्हणजे जेधे-जवळकर हे हळूहळू गांधींकडे म्हणजे काँग्रेसकडे जाऊ लागले. त्यातून ब्राह्मणेतर चळवळीचा ऱ्हास सुरू झाला. 

शेतकरी-कामकऱ्यांची सत्ता येईल, या व्यापक दृष्टीने ब्राह्मणेतर पुढारी काँग्रेसमध्ये आले. आपण शेतकऱ्यांच्या- कामकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसला राबवू, असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी एक अपेक्षा तर थेट सत्ता आपल्या हातात यावी, अशी होती. काँग्रेस 1937 मध्येही जिंकली. त्यात ब्राह्मणेतरांचं योगदान होतं. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री- तेव्हा मुख्य प्रधान म्हणायचे- ते बाळासाहेब खेर झाले. खेर मंत्रिमंडळ 1946 मध्ये परत आलं. अर्थात तेव्हा मुंबई प्रांत होता. महाराष्ट्र नव्हता. त्यामुळे गुजराती भांडवलदारांचं वर्चस्व होतं. गुजराती बनिया आणि मराठी ब्राह्मण- हे वर्गाच्या भाषेत बोलायचं तर भांडवलदारांचं वर्चस्व होतं. त्यातून शेतकऱ्यांना-कामकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काही जणांनी शेतकरी कामगार पक्ष काढला. त्यात त्यांनी मार्क्स आणि फुले यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. पुढे ते शेतकरी कामगार पक्ष सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. या सगळ्या झिगझॅग प्रवासाचं चित्र मला जागृतिमध्ये दिसलं. हा प्रवास एका अर्थाने लोकमान्य ते महात्मा या बदलाचा अवशेष आहे. टिळक आणि गांधी या द्विकेंद्री मॉडेलचंच एक्स्टेन्शन आहे. 

प्रश्न - लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यात काही अंत:स्थ सूत्र होतं का? त्यांच्यात काही साम्य आणि फरक होते का? 

- आता तुम्ही विचारलेला प्रश्न ही आपली ॲकॅडेमिक लेव्हलवरची केवळ चर्चा आहे. पण हाच प्रश्न तेव्हा रोजच्या जगण्याचा भाग म्हणून लोकांना प्रत्यक्षात पडला होता आणि तो सर्वच दृष्टीने कळीचा प्रश्न होता. वरकरणी टिळकांपेक्षा गांधीजींचा पवित्रा एकदम वेगळा वाटेल. पण प्रत्यक्षात त्यांचं एक आंतरिक ऐक्य आणि सुसंगती आहे. कंटिन्युटी आहे. त्या वेळेला निर्माण झालेला वाद हाच होता की- गांधीजी टिळकांचं राजकारण पुढे नेत आहेत की, टिळकांचं राजकारण भरकटवत आहेत? ते टिळकांचे उत्तराधिकारी आहेत का? 

काही लोकांना वाटलं की- गांधीजी टिळकांची जागा घेऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी गांधीजींना विरोध केला. दुसऱ्या बाजूला काही टिळक अनुयायांना असं वाटलं की, ते टिळकांचा वारसा पुढे नेत आहेत. मुंबईतल्या गिरगावात नाना अभ्यंकर नावाचे एक कार्यकर्ते होते. ब्राह्मण सभेतल्या एका सभासदाने त्यांना विचारलं की, तुम्ही तर गांधीवादी दिसताय. त्यावर ते म्हणाले, ‘मी गांधीवादीच आहे, पण मी टिळकवादी आहे म्हणून मी गांधीवादी आहे’. नाना अभ्यंकरांची एक कादंबरीच आहे या कंटिन्युटीवरची. त्यांनी केलेला संघर्ष, सहन केलेली अवहेलना, टिंगल-टवाळी. 

एक ब्राह्मणेतर चळवळ आणि नंतरची आंबेडकरांची चळवळ सोडली, तर सगळ्या चळवळी टिळकांशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ- डांगेंची कम्युनिस्ट चळवळ. तिला टिळकांची प्रेरणा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू करणारे हेडगेवार, मुंजे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना असं वाटायला लागलं की, काँग्रेसमध्ये मुसलमानांना झुकतं माप दिलं जातं आणि हिंदूंचे हक्क मिळत नाही. म्हणून त्यासाठी संघाचा घाट बांधला. पण रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेतून सावरकर बाहेर येईपर्यंत- म्हणजे 1937 पर्यंत- भारतात हिंदुत्ववादी पक्ष नव्हता. हिंदू महासभा ही संघटना होती. हिंदू महासभेचे लोक हे काँग्रेसमध्येच असायचे. 

प्रश्न - वरच्या प्रश्नातला उत्तरार्ध राहिला. टिळक आणि गांधी यांच्यातले साम्य आणि फरक?

- दोघेही कट्टर देशभक्त, हे मान्यच करावं लागेल. अर्थात टिळकांच्या काही अनुयायांनी गांधीजींच्या देशभक्तीबद्दल संशय घेतलाय. त्यांना टिळकांचे अनुयायी कितपत म्हणायचं, हे माहीत नाही. कारण त्यांना टिळकांच्याच बऱ्याचशा गोष्टी मान्य नव्हत्या. टिळकांनी केलेला लखनौ करार, मंडालेतून सुटून आल्यानंतर काँग्रेसमध्ये जाणं, प्रखर हिंदुत्ववाद न घेणं- हे त्यांना मान्य नव्हतं. पण एरवी ते टिळकांशी जोडलेले होते. त्या काळात अफगाणिस्तानच्या आमिराने हिंदुस्थानावर हल्ला करायचा वाद सुरू होता, त्याला गांधीजींनीच निमंत्रित केलंय. गांधी हे फितूर आहेत, जयचंद आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर अशी मांडणी करत होते. काही लोकांनी त्यालाच जोडून असंही म्हटलं की, गांधीजी हे ब्रिटिशांचेच हेर आहेत. ते टिळकांची चळवळ मारायला पुढे आलेत. ते ब्राह्मणांच्या मुळावरच चाललेत- वगैरे. पण आज मागे वळून पाहताना काय दिसतं तर, आमिराला बोलावण्यात टिळकांचाही हात होता. फक्त ते प्रकरण रंगात यायच्या आत टिळक गेले. पण टिळकांनी आमिराला पुणेकरांच्या वतीने मानपत्र देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याला मुंबईत मुक्काम करू दिला नाही. तरीही आमिराची गाडी खडकी स्टेशनवर काही काळ थांबली असताना तिथे मानपत्र द्यायची व्यवस्था टिळकांनी केली.

याच लोकांनी पुढे गांधीजींवर मुसलमानांचा अनुनय केल्याचा आरोपही केला. पण त्याची सुरुवात टिळकांनीच केली, असं म्हणावं लागेल. तोही मुद्दा कट्टर हिंदुत्ववाद्यांनी मांडलेला आहे. लखनौ करार करताना टिळकांनी मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत जास्तच जागा दिल्या. टिळक हे मुसलमानविरोधी होते, ही अलीकडच्या काळात राजकारणी लोकांनी उठवलेली हूल आहे, असं तेव्हाच्या मुसलमानांचं मत नाही. मुसलमानांचे त्या काळातले मुख्य पुढारी शौकत अली, महंमद अली, मौलाना हसरत मोहानी आणि स्वतः बॅरिस्टर जीना हे सगळे टिळकांना राजकारणातले गुरू मानायचे. आपण त्याला ज्येष्ठ सहकारी म्हणू या. जीनांनी टिळकांबरोबर होमरूल चळवळीत काम केलंय. शौकत अली त्यांना गुरूच मानायचे. हसरत मोहानींनी टिळक गेल्यावर अप्रतिम असं शोकगीत उर्दूत लिहिलं. टिळक हे पूर्णपणे राष्ट्रवादी होते, ते कोणत्याही एका समाजगटाचे असण्याचं कारण नाही. त्यांना बदललेल्या जगाची कल्पना आली होती. ते प्रॅक्टिकल होते. 

प्रश्न - म्हणजे गांधीजी प्रॅक्टिकल होते, तसेच टिळकही प्रॅक्टिकल होते- असंच आहे ना?

- गांधीजीही प्रॅक्टिकल होते, पण ते वाटायचे नाहीत. गांधीजींना कोणतंही आंदोलन कधी थांबवायचं ते कळायचं. म्हणजे दत्ता सामंतांना गिरणीसंप कधी थांबवायचा, ते कळलं नाही. ते प्रॅक्टिकल नव्हतं. गांधीजी त्या बाबतीत परफेक्ट होते. चळवळ हाताबाहेर जाऊ लागलीय, पुरेसं यश मिळत नाही; तर ते लगेच थांबवायचे. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी असं म्हटलंय की, चळवळ कशी सुरू करायची, हे मी लेनिन यांच्याकडून शिकलो आणि चळवळ कुठे थांबवायची, हे गांधींकडून शिकलो. 

या दोघांत भेद कुठे होता ते तुम्हाला सांगतो. आणि तो दोघांनाही मान्य होता. टिळकांनी हिंदूंची व्याख्या केली होती. त्यातला एक मुद्दा होता की- ‘साधनानाम्‌ अनेकता’. हिंदूंबद्दल म्हणणं होतं, तेच त्यांचं राजकारणाबद्दल म्हणणं होतं. हिंदूंमध्ये भक्ती, कर्म, ज्ञान, योग असे वेगवेगळे मार्ग आहेत. तसंच राजकारणाचंही आहे. ते स्वातंत्र्याला राजकीय मोक्ष म्हणायचे. त्यासाठी कोणतं साधन वापरायचं? तर, साधनानाम्‌ अनेकता. प्रत्येकाच्या मार्गात आपापल्या रुचीप्रमाणे, कुवतीप्रमाणे, परिस्थितीच्या वाचनाप्रमाणे फरक पडेल; म्हणून एकाने दुसऱ्याला बाद ठरवायचं कारण नाही, असं टिळकांचं म्हणणं होतं. यातलं कोणतंही साधन योग्य नसेल, पण तुमचं साध्य जर चांगलं असेल- नैतिक दृष्टिकोनातून तर ते साधन चांगलंच होतं. पदरी पडलं आणि पवित्र झालं. त्यानुसार हिंसा ही वाईटच आहे. पण ती स्वराज्याच्या कारणासाठी केली, तर ती पवित्र होती.

पण गांधीजींनी काय केलं? साधनशुचिता मानली. ते म्हणाले, ‘स्वराज्य उशिरा मिळालं तरी चालेल पण ते हिंसक मार्गाने नको.’ साधनं नैतिक नसतील तर साध्यपण कलुषित होतं. हा दोघांच्यात फरक आहे, बाकी काही फरक नाही. गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळत असेल तर टिळकांची काहीच हरकत नव्हती. टिळकही हिंसेला घेऊन चालणारे नव्हते. पण कुणी ते करत असेल, तर त्यांनी त्यांना मदत केली. अर्थात गांधीजींनी त्यांना टिळकांसारखी बॉम्ब वगैरे आणायला मदत केली नाही, पण क्रांतिकारकांची शिक्षा कमी करायला मदत केलीच ना? गांधींजींना क्रांतिकारकांनी केलेला त्याग, त्यांनी सहन केलेले क्लेश यांच्याबद्दल आदरच होता. सावरकरांची अंदमानातून सुटका व्हावी, म्हणून गांधीजींनी अनेक वेळा लिखाण केलंय. काँग्रेसमधून ठराव आणलेले आहेत. फक्त गांधीजींचं म्हणणं होतं की, हिंसेतून हिंसाच होते. आपण स्वातंत्र्यानंतरही त्याच मार्गाने जाऊ, असं इतिहास सांगतो. म्हणून आम्हाला ते नकोय. 

प्रश्न - मंडालेच्या तुरुंगवासाच्या आधीचे टिळक वेगळे होते आणि मंडालेनंतर बदललेले टिळक वेगळे होते का? 

- प्रबोधनकार ठाकरे यांनी एका ठिकाणी म्हटलंच आहे की, मंडालेपूर्व टिळक वेगळे होते आणि मंडालेनंतरचे टिळक वेगळे होते. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन- इंग्लंडला जाण्यापूर्वीचे टिळक वेगळे आणि इंग्लंडहून आल्यानंतरचे वेगळे. 1914 ते 20 या काळात टिळक इंग्लंडला जाऊन आले. तिथे त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण, कम्युनिस्ट चळवळ, मजूर पक्षाचं राजकारण, साम्राज्यशाहीचं राजकारण पाहायला मिळालं. नवं साम्यवादी तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर श्रमिकांच्या माध्यमातून कसं पसरतंय, हेही त्यांनी अनुभवलं. त्यामुळे टिळक तिकडे कलले. त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की, टिळक अधिक जगले असते तर ते कम्युनिस्ट झाले असते. म्हणून तर कॉम्रेड डांगेंना असं वाटलं की, टिळकांकडून प्रेरणा घ्यावी. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिळक होणार होते. टिळकांचा कामगार चळवळीला पाठिंबाच होता. मंडालेच्या अगोदरही कामगारांना टिळक आपलेच वाटत होते. म्हणून टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली, तेव्हा मुंबईतल्या गिरणी कामगारांनी सहा दिवस हरताळ केला. तेव्हा मुंबईत इतक्या दंगली झाल्या की, सरकारला लष्कर बोलवावं लागलं. गोळीबारात लोक मेले. त्या कामगारांना चिथावणारा टिळक पक्षाचा कुणी नेता नव्हता. ते उत्स्फूर्तपणे झालं होतं. 

टिळकांना त्यांच्या या व्यापक दृष्टिकोनाला प्रॅक्टिकॅलिटीमुळे कधी कधी मुरड घालावी लागली. त्याला त्यांचा नाइलाज नव्हता. पण तो व्यापक दृष्टिकोन त्यांच्या अनुयायांमध्ये नव्हता. म्हणून पुढचे प्रॉब्लेम आले. संगती संगदोष म्हणतो, त्याप्रमाणे अनुयायांचे अवगुण लोक त्यांच्यावरच प्रोजेक्ट करायला लागले. हे प्रतिगामी आहेत, म्हणून यांचे गुरूही प्रतिगामीच असणार. असं नसतं, हे लक्षात घ्या. टिळकांना प्रतिगामी शिष्य सांभाळणं भाग पडलं. त्याच्याशिवाय स्वराज्याची चळवळ पुढे जाणार नव्हती. त्यामुळे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की, टिळकांच्या निर्णयांमधला परिस्थितीचा कोणता, दडपणाचा कोणता आणि त्यांचा स्वतःचा कोणता? हे बघा, त्यानंतर त्यांच्यावर आरोप करावे. 

प्रश्न - सर, या बाबतीत टिळकांशी तुलना करता, गांधीजींनी मात्र आपल्याला हवं ते आपल्या अनुयायांकडून करून घेतलं. 

- असं काय करता? गांधीजी हे टिळकांच्या पुढे गेले ना! टिळकांनी 1920 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत समाज जिथपर्यंत आणून ठेवला होता, त्याच्या पुढे गांधीजींनी नेला. टिळकांच्या आधी परिस्थिती काय होती? रानडे, गोखले यांचं राजकारण दिवाणखान्यापुरतं होतं. ड्रॉइंग रूममधलं. मोठमोठ्या लोकांच्या दिवाणखान्यात परिषदा भरायच्या. टिळकांनी ते रस्त्यावर आणलं, हे तर मान्यच करावं लागेल. म्हणून नेमस्त पुढारी त्यांना तेल्या-तांबोळ्यांचे नेते म्हणाले. त्यांच्या अनुयायांना ब्रूट फोर्स म्हणजे पाशवी बळ म्हणाले. हे आपल्या लिडरशिपमधलं प्रोग्रेशन होतं. टिळक परिस्थितीचा फीडबॅक घेऊन बदलायची गरज असेल तिथे बदलत होते. ती क्षमता त्यांच्यामध्ये होती. ती गांधींमध्येही होती.

प्रश्न - ‘लोकमान्य ते महात्मा’ ही मांडणी झाली त्याला पंधरा वर्षं झाली. तेव्हा काँग्रेस हा राजकारणातला मुख्य प्रवाह होता. आता ती जागा भाजपने घेतलीय. बदललेल्या परिस्थितीत आता ‘लोकमान्य ते महात्मा’ हे स्थित्यंतर नव्या प्रकारे बघावं लागेल का?

- नाही, अजिबात नाही. उलट लोकांमध्ये तशी दृष्टी असेल, तर आताच्या राजकीय स्थित्यंतराचा अर्थ लावताना त्याचा उपयोग होईल. आता हे लोकांना कळत नाही, त्याला मी काय करू? कोण सत्तेवर आहे, कोण येणार आहे, कोण जाणार आहे- हे बघून थोडंच लिहिलं होतं? मी जे लिहिलं, ते पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह लिहिलं होतं. 

प्रश्न - लोकमान्यांचं चरित्र लिहिताना टिळक नव्याने सापडले का? 

- ‘लोकमान्य ते महात्मा’ लिहिल्यानंतर मला असं वाटलं की, आपण टिळकांचं स्वतंत्र चरित्रच लिहायला हवं. मग मी दोन चरित्रं लिहिली. एक लहान आणि दुसरं मोठं. हे मुद्दामहून लिहिण्याचं कारण थोडं वेगळं होतं. लोकमान्यांचा लढा हा स्वातंत्र्यासाठी होता. आपल्याला राजकीय स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं. त्यामुळे त्या लढ्याचं प्रयोजन संपलं. दुसरा प्रश्न सामाजिक समतेचा किंवा न्यायाचा होता, तो अजून संपलेला नाही. तो चालूच आहे. त्यामुळे त्या काळात सामाजिक काम करणाऱ्यांबद्दल आत्ताच्या लोकांना आदर वाटतो. कारण ते प्रश्न अजून जिवंत आहेत. मग ते फुले, शाहू, आंबेडकर असतील किंवा आगरकर असतील. पण स्वातंत्र्याचा प्रश्न मिटल्याने आपण त्याच्यासाठी लढलेल्यांकडे त्या तीव्रतेने पाहत नाही. आज त्यांचं उपयुक्ततामूल्य संपलंय. त्यामुळे टिळकांचं काम समजून न घेता त्यांच्यावर टीका करताना कुणाला काही वाटत नाही. 

धनंजय कीर यांनी टिळकांचं चरित्र लिहिलंय. त्यांनीच फुले, शाहू आणि आंबेडकरांचीही चरित्रे लिहिलीत. त्या तिघांचा डिस्कोर्स अजून सुरू आहे. तो वाढतोय. टिळकांचं काय झालं सांगा पुढे? टिळकांचं चरित्र कोणी लिहिलंय का कीर यांच्यानंतर? त्यामुळे एकाच दृष्टिकोनातून मांडणी होत असल्यामुळे टिळकांवर अन्याय होण्याची शक्यता वाढते. मी काही टिळकांचा वकील नाही. पण एक अभ्यासक म्हणून त्याचा तटस्थ परिणाम मला जाणवतो. 

टिळकांचा खुंटलेला डिस्कोर्स मी नव्याने सुरू केलाय, हे लक्षात घ्या. का केला? तर, स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं काम महत्त्वाचं आहे. भले, ते स्वातंत्र्य मिळाल्यामुळे एका अर्थाने इतिहासजमा झालंय. फुलेंच्या संदर्भातही मी माझं योगदान दिलंय. पण दर पिढीगणिक आपल्या महापुरुषांची चरित्रं परत लिहिली गेली पाहिजेत. नव्या पिढीची भाषा बदललेली असते. प्रश्न बदलेलेले असतात, जगाकडे बघण्याची दृष्टी बघतलेली असते. पूर्वी समाज गतिमान नसताना हे बदल कमी व्हायचे. आता मात्र बदलाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीच्या भाषेत, त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात, त्यांच्या परिस्थितीच्या वाचनाच्या आधारे आपणाला महापुरुषांची चरित्रं पुन:पुन्हा लिहावी लागतील; नाही तर महापुरुष हे इतिहासजमा होतील. ते फॉसिलाइजड्‌ होतील. एखाद्या मृत प्राण्याचे अवशेष पृथ्वीच्या पोटात दडल्यानंतर त्याच्याभोवती काय काय जमा होतं? त्याचं फॉसिल म्हणजे जीवाश्म होतं. तसं आपण महापुरुषांच्या बाबतीत होऊ द्यायला नको. 

त्यामुळे मी टिळकांचं चरित्र लिहिलं. गांधीजींचं का लिहावंसं वाटलं नाही? कारण खूप लोक आहेत त्यासाठी. गांधी हे अलीकडच्या काळातलं चलनी नाणं झालंय. एके काळी महाराष्ट्रात टिळक हे चलनी नाणं होतं. लोकांनी ते त्या वेळेला एक्स्प्लॉइट केलं. मला त्या ट्रॅपमध्ये जायचं नाही. मी पुण्याच्या गंधर्ववेद प्रकाशनासाठी एक थोडक्यात आणि नंतर सविस्तर अशी दोन टिळकचरित्रं लिहिली. त्यात ‘कर्मयोगी लोकमान्य’ हे साडेचारशे पानांचं चरित्र आहे. त्यातल्या लहान चरित्राची आवृत्ती आता ‘सकाळ प्रकाशन’ने काढलीय. ती सर्वत्र उपलब्ध आहे. 

प्रश्न - आता शेवटचे दोन प्रश्न उरलेत. लोकमान्य टिळक हे केसरीचे जवळपास 32 वर्षं संपादक होते. त्यांच्या अग्रलेखांची वैशिष्ट्यं सांगाल?

- लोकमान्य टिळकांचं महाराष्ट्राच्या पत्रकारितेत महत्त्वाचं स्थान आहे. टिळकांचा मूळ पिंड हा कार्यकर्त्याचा व विद्वान अभ्यासकाचा होता. त्यांना लिहायची, बोलायची खरंच आवड नव्हती. ती आवड होती आगरकरांना. ते हौसेने लिहायचे, बोलायचे; पण अंगावर आल्यानंतर सर्वस्व पणाला लावण्याचा टिळकांचा स्वभाव होता. त्यांनी दोन गोष्टी सांभाळल्या. आपल्याला जे म्हणायचं आहे, ते म्हणायचंच- पण ते कायद्याच्या चौकटीतच मांडायचं, म्हणजे ब्रिटिश सरकारला तक्रार करता यायला नको. 

टिळकांचे नातू- मुलीचा मुलगा- ग.वि. केतकर हे पुढे केसरीचे संपादक होते. ‘तरुण भारत’चेही होते. त्यांनी म्हटलंय, ‘टिळक कायद्याच्या कुंपणावरून चालत गेले. त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडताच येणार नव्हतं. टिळकांना शिक्षा झाल्या, ते अग्रलेख त्यांनी लिहिलेलेच नव्हते. त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले होते. कारण टिळकांचा कायदा खूप पक्का होता.’ गजाननराव केतकर ग्रॅज्युएट झाले. त्यांना वाटलं, आपण केसरीत काम करावं. ते आजोबांकडे गेले. टिळक त्यांना म्हणाले, ‘तू नक्की काम कर. पण आधी लॉ करून ये. कारण लॉ न कळणाऱ्या लोकांमुळे मला शिक्षा झाली.’

लक्षात घ्या- टिळकांचं अपील हे बहुजन समाजाला होतं. त्यांची भाषा अगदी साधी-सोपी मराठी आहे. त्यामुळे टिळकांचे अग्रलेख त्या वेळच्या कुणालाही कळत. टिळक आणि आगरकर हे दोघेही विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या तालमीत तयार झाले. चिपळूणकरांनी एक मराठी घडवली होती. ती तेव्हाच्या उच्चभ्रू मराठी भाषकांना समजण्यापुरती होती. संस्कृतची पार्श्वभूमी असल्याशिवाय ती कळणारच नव्हती. गंमत म्हणजे, आगरकरांनी ती भाषा कॉपी केली. त्यांच्या भाषाशैलीवर चिपळूणकरांची छाप आहे. उदाहरणार्थ- मोठी पल्लेदार वाक्य लिहिणं. कधी कधी आगरकर त्यात गुंततात. 

टिळकांनी चिपळूणकरांचा प्रभाव सुरुवातीलाच टाकून दिला. त्याचं कारण टिळकांचा ऑडियन्स हा सर्वसामान्य माणूस होता. त्यांना त्यांची रीडरशिप माहीत होती. टिळकांचं संस्कृत हे आगरकरांपेक्षा चांगलं होतं, पण टिळकांनी संस्कृतचा प्रभाव आपल्या लिखाणावर कधीही येऊ दिला नाही. टिळक कुठल्या तरी तुरुंगवासातून सुटून आले, तर केसरीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्रलेख लिहिला- टिळक बंधमुक्त झाले. ते प्रूफ टिळकांकडे पाहायला आलं. त्यांनी पाहिलं. त्यांनी ‘बंधमुक्त झाले’ हा शब्दप्रयोग खोडला आणि लिहिलं, ‘टिळक सुटले’. हे टिळकांचं वैशिष्ट्य आहे. पंडिती परंपरेला टिळकांनी छेद दिलेला आहे. पंडिती भाषेची परंपरा चिपळूणकर, आगरकर यांच्यापासून सावरकरांपर्यंत गेलेली दिसेल. तुम्ही समजा तिघांचे एका बाजूला लेख ठेवले आणि मधे टिळकांचा ठेवला, तर तो वाचताना तुम्हाला ठसकाच लागेल. आपण हे काय वेगळंच वाचतोय राव! 

विषयांच्या संदर्भातही प्रचंड व्हरायटी होती. देशाचा एकही प्रश्न असा नव्हता की, ज्याला टिळकांनी हात घातलेला नव्हता. त्यांचा विचार देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून बाहेर काढण्यापुरता नव्हता, तर ‘नवा भारत’ घडवण्याचं टिळकांचं व्हिजन होतं. आर्थिक प्रश्नांवर त्यांनी लिहिलंय. सहकारी तत्त्वावर साखर कारखाने व्हावेत, असा अग्रलेखच आहे त्यांचा. पुण्यामध्ये पहिल्यांदा राजाबहादूर गिरणी सुरू झाली, तेव्हा टिळकांचा अग्रलेख आहे- ‘पुण्यातील पहिली चिमणी.’

शेतीबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल टिळकांनी लिहिलं. शेतकऱ्यांचे प्रश्न काँग्रेसने घेतले पाहिजेत, हे टिळकांनीच पहिल्यांदा सांगितलं. दुष्काळात शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राहावा, यासाठी त्यांनी चळवळ केली. म्हणजे अगदी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या चळवळीसारखीच- आम्ही सारा भरणार नाही. टिळकांनी त्यावर लेख लिहिले. सरकारचा कायदा छापून हजारो प्रतींचं महाराष्ट्रभर वाटप केलं. भाषणं केली. गावोगाव प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते एजंट नेमले. राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना त्यांनीच मांडलीय पहिल्यांदा. टिळकांचा विचार हा सर्वंकष आहे. 

प्रश्न - आता ऑगस्ट महिना येऊ घातलाय. म्हणजे गणपती जवळ आलेत. दर वर्षी सार्वजनिक गणपतीच्या मंडपांमध्ये टिळकांचा फोटो असतो; पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना टिळकांचा नेमका काय विचार होता आणि तो आज उरला आहे का?

- त्याला एक तात्कालिक कारण घडलं. लोकांच्या घरोघरी गणपती बसायचेच. पुण्यात प्रमाण जास्त होतं. पण त्याच वेळेला महाराष्ट्रात आणि पुण्यातही मोहरमचे ताबूत खूप असायचे. सगळे लोक भाग घ्यायचे त्यात. आखाडे वगैरे सगळे त्यापुढे नाचायचे. 1892-93 च्या दरम्यान दंगली झाल्या. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुरावा झाला. त्यामुळे मोहरमच्या ताबुतांपासून हिंदू दुरावले. दहा दिवसांची पोकळी निर्माण झाली. तिचा चांगला वापर करून घेता येईल, असं टिळकांच्या लक्षात आलं. त्यामुळे टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पर्याय दिला. टिळकांनी लोकांना नाचायला लावलं, अशातला भाग नाही. ते आधीपासून नाचतच होते, फक्त ते ताबुतांच्या मिरवणुकांकडून गणपतीकडे आले. टिळकांचे विचार त्यातून सांगितले जाऊ लागले. टिळकांनी असंतोष व्यक्त करण्याचं माध्यम घडवलं. 

हेही लक्षात घ्यायला हवं की, टिळकांनी हे काही ताबूतांच्या विरोधात केलं नाही. त्यांनी फक्त पर्याय दिला. मुसलमानांनी गणपती बसावावा, असं काही टिळक म्हणणार नव्हते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावं, याच विचाराचे ते होते. कोणताही धर्म कुणावर तरी लादण्याच्या विचाराचे ते नव्हते. 

पण शिवजयंतीचा विचार वेगळा होता. भारत नावाच्या देशाचं प्रतीक कोण होऊ शकतं, तर शिवाजीमहाराज. त्याचा संबंध धर्माशी असता कामा नये. शिवाजीमहाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे राष्ट्रीय पुढारी आहेत, ही भूमिका टिळकांनी घेतलीय. मग टिळक बंगालमध्ये जातात. तिथे शिवजयंतीचा उत्सव सुरू होतो. शिवाजीमहाराजांवर रवींद्रनाथ टागोर कविता लिहितात. टिळक तिथे असं विधान करतात की, ‘यापुढचा आमचा शिवाजी कदाचित मुसलमानांमधूनही येईल.’ हे टिळकांनी व्याख्यानातून म्हटलंय. त्याचं रेकॉर्ड आहे. टिळक असं म्हणाले, ‘शिवाजीमहाराजांचा लढा हा विशिष्ट धर्माविरुद्ध नव्हता, तर जुलमी राजवटीविरुद्ध होता. योगायोगाने ती जुलमी राजवट मुसलमानांची होती. उद्या तशी राजवट दुसऱ्या कोणत्या धर्माची झाली, तर आपण गप्प बसणार का? त्यामुळे शिवाजीमहाराजांना सगळ्या भारताने मानायला पाहिजे.’ असं त्यांचं मत होतं. हे सगळं मंडालेच्याही अगोदरचं आहे.

आणि टिळक मंडालेमधून परत आले, तेव्हा मुसलमानांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं. ते लोक टिळकांना बोलवायला लागले व्याख्यानांना. अजमेरच्या दर्ग्यात टिळक गेले. त्यांच्यावर तिथल्या मुसलमानांनी चांदीची फुलं उधळली. मोहरमच्या ताबुताच्या उत्सवातही टिळक सामील झाले. त्याचे फोटो आहेत. त्याच वेळेस खिलाफत चळवळ सुरू झाली होती. त्यांनाही टिळकांनी दिलासा दिला. ‘तुमच्या धर्मावरचं संकट असेल, तर हिंदू तुमच्या मागे उभे राहतील.’ फक्त आपली विचारसरणी पुढे नेण्याच्या नादामध्ये काही लोकांनी टिळकांवर फार अन्याय केलाय. 

आताच्या गणपती उत्सवाचं स्वरूप टिळकांच्या गणपती उत्सवाशी सुसंगत नाहीय, हे कुणीही सांगेल. टिळकांच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यात व्याख्यानं व्हायची. तो एक प्रकारचा ज्ञानयज्ञ असायचा. अख्ख्या भारतातून लोकांना बोलावलं जायचं. देशभरातून लोक यायचे, टिळकांच्या उत्सवात आपण चाललोय म्हणून. आता त्यापैकी काहीही उरलेलं नाही. त्यामुळे आपण आज जे करतो, त्यासाठी टिळकांना कसं दोषी धरणार?

(मुलाखत व शब्दांकन : सचिन परब)

-----

स्वातंत्र्याच्या गझलेचा शेर

मुलाखत सुरू असताना सदानंद मोरेसरांनी एक शेर ऐकवला. तो असा, 

मत्ल़’अ है ’गर तिलक गज़ल-ए-आज़ादीके 
तो यकिनन मक्त़़’अ है ‘महात्मा’।
क़ादिर अंदाज थे वे भी जिन्होने 
क़ा़िफया तंग किया दुश्मनका दरमियान।

याचा अर्थ असा, स्वातंत्र्याच्या गझलेचा मतला म्हणजे ध्रुवपद टिळक असतील तर गांधी हे नक्कीच मक्ता म्हणजे शायराची नाममुद्रा आहेत. या दोघांच्या दरम्यान झालेले इतर स्वातंत्र्यसैनिकही महत्त्वाचेच होते त्यांनी शत्रूचा ‘काफिया तंग’ केला. त्याचा नेहमीचा अर्थ शत्रूला त्रस्त केलं असा आहे. पण गझलेत काफिया म्हणजे यमक. हे सगळे नेमक्या यमकासारखे शोभून दिसले, असाही त्याचा अर्थ होतो. विशेष म्हणजे हा शेर स्वत: मोरेसरांनीच लिहिलेला आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’, या बहिणाबाईंच्या अभंगाची आठवण करून देणारा या शेराचा भाव आहे.

Tags: लोकमान्य स्मृतिशताब्दी टिळक आणि गांधी मुलाखत बाळ गंगाधर टिळक लोकमान्य ते महात्मा सचिन परब सदानंद मोरे sadanand more tilak and gandhi sadanand more lokmanya te mahatma tilak gandhi conflict tilak and gandhi lomanya bal gangadhar tilak tilak 100 death anniversary lokmanya tilak dr sadanand more interview of sadanand more sachin parab weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके