डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आगरकरांकडे कल असलेल्या लेखकांनी लिहिलेले टिळक चरित्र

अ.के.भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1956 मध्ये लिहिलेले ‘लोकमान्य टिळक अ बायोग्राफी’ हे इंग्रजी पुस्तक ‘जयको पब्लिशिंग हाऊस’ नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले होते. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रथमच आला असून, त्याचे प्रकाशन टिळकांच्या 101 व्या मृत्यूदिनी म्हणजे 1 ऑगस्ट 2021 रोजी झाले. साधनाचे भूतपूर्व संपादक ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 26 ऑगस्टला सुरू होत आहे, हे औचित्य साधून साधना प्रकाशनाने हे पुस्तक आणले आहे. मराठी आवृत्तीसाठी महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना आहे. 

23 जुलै 1856 हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सरसेनापती लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जन्मदिवस. कालगणनेप्रमाणे इ.स.2006 हे टिळकांच्या जन्माचे 150 वे वर्ष फारशा उत्साहाने साजरे झाले होते असे म्हणता येत नाही, पण 1956 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष मात्र यथोचित रीतीने साजरे झाले होते असे म्हणता येते. उदाहरणच द्यायचे झाले तर 2006 मध्ये काँग्रेस पक्षाने यानिमित्त काही विशेष उपक्रम राबवल्याचे आठवत नाही. 1956 मध्ये मात्र अखिल भारतीय काँग्रेस समितीने टिळकांचे इंग्रजी चरित्र लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शि.ल.करंदीकर, त्र्यं.वि.पर्वते यांनी आपापली टिळकचरित्रे दाखल केली. हे दोन्ही लेखक टिळक परंपरेतील मानले जातात. पर्वते यांनी तरुण असताना कॉ.डांगे यांच्याबरोबर टिळकपक्षाचे राजकारणही केले होते. वयाने व अनुभवानेही ते ज्येष्ठ होते. ग.प्र.प्रधान आणि अ.के.भागवत या लेखकांबाबत तसे म्हणता येत नाही. हे दोघे तेव्हा अगदीच तरुण म्हणजे पस्तिशीच्यात आत होते, यापेक्षा ते टिळकांच्या परंपरेतील नव्हते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. (याशिवाय याचदरम्यान ‘केसरी’चे लंडनमधील प्रतिनिधी द.वि.ताम्हणकर आणि केंद्रीयमंत्री डी.पी.करमरकर यांनी लिहिलेली चरित्रे स्वतंत्रपणे प्रसिद्ध झाली होती.) काँग्रेस समितीत या तीन चरित्रांमध्ये डावे-उजवे ठरवता येईना, म्हणून ते दहा हजार रुपयांचे बक्षीस तिघांना वाटून दिले. पर्वते आणि करंदीकर यांची चरित्रे प्रसिद्ध झाली, याचे कारण तेव्हा त्यांचा बऱ्यापैकी बोलबाला होता. करंदीकर, पर्वते (व ताम्हणकरही) पत्रकार होते. करंदीकरांचे सावरकर चरित्र प्रसिद्ध होते. त्या तुलनेत इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या प्रधान-भागवतांना तसे प्रस्थापित म्हणता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी लिहिलेले टिळक चरित्र काहीसे मागे पडले. तथापि ‘जयको’ या प्रकाशन संस्थेने ते छापायचे मान्य केले, पण ते निम्मे करून! लेखकद्वयीला ते मान्य नव्हते. शेवटी एकतृतीयांश मजकूर कमी करण्याबाबत तडजोड झाली व ते प्रकाशित झाले. तथापि प्रकाशकांनी त्याची भरपाई, बारीक टाईप वापरून पृष्ठसंख्या मर्यादित ठेवीत, करायची ती केलीच! आनंदाची गोष्ट म्हणजे जयको प्रकाशनाने 2008 मध्ये, पूर्वी वगळल्या गेलेल्या एकतृतीयांश मजकुरासह मूळ चरित्र प्रकाशित केले, ते 600 पानांचे झाले. सुदैवाने ते पहायला प्रधान हयात होते, दुर्दैवाने भागवत मात्र नव्हते.

मराठी माणसाच्या दृष्टीने त्याहीपेक्षा आनंदाची बाब म्हणजे 1 ऑगस्ट 2020 या टिळकांच्या मृत्युशताब्दीचे औचित्य साधन ‘लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी’ या प्रधान-भागवतांच्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याचे काम साधना प्रकाशनाने हाती घेतले आणि 1 ऑगस्ट 2021 रोजी म्हणजे टिळकांच्या 101 व्या मृत्युदिनी प्रकाशित होत आहे. या अनुवादाचे शिवधनुष्य अवधूत डोंगरे यांनी समर्थपणे पेलले आहे याची प्रारंभीच नोंद करतो. अवधूत डोंगरे आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांना मनापासून धन्यवाद. हा अनुवाद पहायला लेखकद्वयी आपल्यात नाहीत याची खंत वाटते.

अवधूत डोंगरे यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर ओळीला ओळ आणि शब्दाला शब्द देत म्हणजे यांत्रिकपणाने केले नाही हे आवर्जून नमूद करायला हवे. त्यांनी मूळ पुस्तकाव्यतिरिक्त टिपांची भर टाकून ते अद्ययावत केले आहे. मधल्या काळात डॉ.य.दि. फडके यांनी केलेले संशोधन, त्याप्रमाणेच मी ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथात पुरवलेला नवा तपशील यांची दखल घेत डोंगरे यांनी मूळ चरित्रातील रिकाम्या जागा भरून काढल्या आहेत.

करंदीकर तसेच पर्वते (आणि अर्थातच करमरकर व ताम्हणकर) एकीकडे आणि भागवत व प्रधान दुसरीकडे अशी चरित्र लेखकांची तुलना केली तर एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो. पहिल्यांदा उल्लेख केलेले चरित्रकार टिळकांचे भक्त म्हणता यावेत इतके टिळकांबद्दल पूज्यताभाव बाळगणारे होते, तसे भागवत-प्रधान यांच्याविषयी म्हणता येत नाही. वैयक्तिक जीवनात प्रधानसरांचा कल टिळकांपेक्षा आगरकरांकडे अधिक होता, असे आपण म्हणू शकतो. त्यांनी आगरकर लेखसंग्रह संपादित केला असल्याचे आपण जाणतो. उदारमतवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणून त्यांची ओळख आहे. ती टिळकांच्या विचारांच्या जवळ जाणारी नसल्याची जाणीव त्यांना स्वत:लाही होती.

पुढे 1969 मध्ये महात्मा गांधींची जन्मशताब्दी आली तेव्हा परत एकदा प्रधान आणि भागवत यांनी एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीत महात्मा गांधींवर ज्याला ‘रॅपीड रीडर’ म्हणतात, असे एक पुस्तक सिद्ध केले. भागवतांनीही गांधीवादी असलेल्या आचार्य स.ज.भागवतांच्या लेखांचे संपादन करून ग्रंथ प्रसिद्ध केला होताच. त्यानिमित्ताने त्र्यं.वि.पर्वते यांनीही ‘गांधीपर्व’ प्रसिद्ध केले. शि.ल.करंदीकर हे सरळ सरळ सावरकरवादी म्हणजे टिळक-सावरकर अशी संगती व सातत्य मानणारे. याउलट पर्वते, कॉ.डांगे यांना अनुसरत टिळकांकडून समाजवादाकडे येऊ पाहणारे. करंदीकरांना गांधीवादाचे वावडे, पण पर्वत्यांना ते नव्हते. म्हणून तर 1937 मध्ये सावरकर रत्नागिरी येथील सक्तीच्या क्षेत्रसंन्यासातून सुटले तेव्हा ‘त्यांनी मार्क्सच्या समाजवादी प्रणालीचा अंगिकार करून पुढील राजकारण करावे’ असे वाटणाऱ्या पर्वत्यांनी लिहिले, ‘‘कोणत्याही कारणास्तव जे या मताला विरोध करतील, ते मनुष्य जातीचे, मानवी संस्कृतीचे व तिच्या अधिकाधिक विकासाचे शत्रू ठरतील. सावरकारांच्या पुरोगामीत्वाची कसोटी ते या मताचे विरोध ठरतात की अभिमानी ठरतात, यावरून निश्चित होईल.’’ करंदीकरांची सावरकरांकडून अशी अपेक्षा असणे शक्य नव्हते. अर्थात सावरकरांनी पर्वत्यांऐवजी करंदीकरांचीच अपेक्षा पूर्ण केली असे म्हणावे लागते.

प्रधानसर ना टिळक-सावरकर या पठडीतील ना टिळक-मार्क्स या परंपरेतले. लोकशाही समाजवाद्यांना मार्क्सवाद जितका मान्य असतो, तितकाच त्यांना ते समाजवादी असल्याने मान्य होताच, त्यामुळे त्यांची स्थाननिश्चिती करताना मी त्यांना आगरकरवादी-मार्क्सवादी म्हणू शकतो. आगरकरी बुद्धिवादाची व व्यक्तिवादाची सांगड मार्क्सच्या समाजवादाशी घातली की जे रसायन तयार होते ते. कदाचित यामुळे समाजवादी पक्षात फाटाफूट झाल्यानंतर प्रधानांनी एसेम जोशींबरोबर जाण्यापेक्षा नानासाहेब गोरे यांच्या गटात जाणे पसंत केले असावे.

प्रधान आणि भागवत यांनी टिळकचरित्र लिहायचे ठरवले तेव्हा आपला आधुनिक व आगरकरी कल असलेला चिकित्सक दृष्टिकोन आड येईल की काय, अशी शंका त्यांना वाटली होती व ती त्यांनी प्रास्ताविकात व्यक्तही केली होती. ‘‘आपल्या सुरुवातीच्या काळातील आदर्शांचा नव्या दृष्टीने विचार करणं काही वेळा अस्वस्थकारक असतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अज्ञात पैलू आणि त्यांच्या मर्यादाही समोर आल्याने आपणास स्वत:च्या प्रत्येक गतकालीन मतांची वैधता शंकास्पद वाटायला लागते. लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा आणि कार्याचा अभ्यास सुरू करताना आमच्याही मनात अशीच भीती होती.’’

प्रधान आणि भागवत यांची ही भीती यथार्थ व स्वाभाविकच म्हणावी लागते. स्वत: हे दोघे समवयस्क लेखक, बाल्य व किशोरावस्थेत असताना त्यांना सर्वत्र टिळकांचा प्रभाव दिसला असणार. थोडे मोठे झाल्यावर आगरकर आणि गांधी यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहताना टिळकांच्यातील काही बाबी त्यांना खटकल्या असणार.

पण त्यांची भीती नि शंका टिळकांचा अभ्यास करताना विरून गेल्याचे ते सांगतात. कारण ‘व्यक्ती आणि नेता म्हणून टिळकांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुढंगी होतं की, अभ्यास पूर्णत्वाला जाईपर्यंत आम्हाला आमच्या प्रारंभिक साशंकतेचा पूर्ण विसर पडला होता. हे काम करीत असताना आम्ही जणू काही टिळकांच्या काळातील बौद्धिक व राजकीय वातावरण जगत होतो.’’

प्रधान-भागवतांनी या एका संक्षिप्त वाक्यात चरित्रलेखनाच्या पद्धतीचे जणू सूत्रच सांगितले आहे. गतकालीनांच्या चरित्रलेखनाच्या वेळी आपण आपल्या काळातील मूल्ये व मोजपट्ट्या घेऊन आपल्या अगोदरच्या अशा काळातील लोकांना लावायच्या प्रयत्न करतो की, ज्या काळात ही मूल्ये व या मोजपट्ट्या अस्तित्वातच नव्हत्या. कदाचित त्यांच्या काळातील समस्याही आपल्या काळातील समस्यांपेक्षा वेगळ्या असणार. अगदी प्रस्तुत चरित्रग्रंथाचे उदाहरण घेतले तरी ज्या काळात ते लिहिले गेले तो काळ स्वातंत्र्याचा होता. म्हणजे पारतंत्र्याची मुख्य समस्या आता (15 ऑगस्ट 1947) संपली होती. पारतंत्र्यातील दु:खे, त्रास, अवहेलना, शोषण आता प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय राहिला नव्हता. त्यामुळे पारतंत्र्याच्या गतसमस्येशी झगडण्यापेक्षा आजच्या दारिद्य्र, विषमता अशा समस्यांचा मुकाबला करणारे अधिक महत्त्वाचे वाटू लागले होते. टिळकांचे उपयुक्ततामूल्य संपले असे वाटू शकेल, पण फुले-आगरकर यांच्यासारख्यांचे आजही आहे. कारण त्यांनी ज्या समस्या मांडल्या व ज्यांचे निराकारण करण्याची प्रयत्न केले त्या अद्याप शिल्लक आहेत.

असे वाटणे हा मनुष्यस्वभाव आहे. आणि तसेही मृतांच्या समस्यांपेक्षा जिवंत असणाऱ्यांच्या समस्यांना महत्त्व द्यावे लागते. पण त्यामुळे चरित्रलेखकांना आणि एकूणच इतिहासकारांना आपल्या स्वत:च्या काळावर मात करावी लागते. आपल्या काळाला विसरून गतकालात प्रवेश करावा लागतो. गतकालीन चरित्रनायकाच्या मनात प्रवेश करणे हे ऐकायला चांगले वाटत असले तरी ते एवढे सोपे नसते. खरे तर शक्यही नसते. ‘परकायाप्रवेश’ हा शब्द तसा आलंकारिक अर्थाने घेणेच उचित ठरते. गतकालात प्रवेश करणे मात्र काही प्रमाणात नक्कीच शक्य असते. वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांच्या आधारे आपण त्या काळाची पुनर्रचना करू शकतो आणि त्या काळात वावरणारी माणसे कसे वागत असतील याची कल्पना त्या माणसांच्या मनोव्यापारावरून नव्हे तर त्या काळाच्या ज्ञानावरून (आपणही त्यांच्यासारखीच माणसे असल्यामुळे) करू शकतो. प्रधान आणि भागवत जणू याचप्रकारे आपल्या काळाचे ओझे खांद्यावरून खाली उतरवून ‘टिळकांच्या काळातील बौद्धिक वातावरणात’ जगले म्हणून त्यांची शंका गेली, भीती गेली व एका चांगल्या चरित्रग्रंथाची सिद्धी त्यांच्या हातून होऊ शकली.

ते असे का करू शकले असतील, याचे एक स्पष्टीकरणही त्यांच्याच प्रास्ताविकातून मिळू शकते. ‘‘आधुनिक महाराष्ट्राचे राजकीय तत्त्वज्ञ दिवंगत आचार्य शं.द.जावडेकर यांच्या मार्गदर्शनाचा असामान्य लाभ आम्हाला झाला. त्यांनी आमच्या बुद्धीला चालना दिली, आमच्या काही मूल्यधारणांमध्ये दुरुस्ती केली, आणि टिळक व त्यांचा काळ याबद्दल एक परिप्रेक्ष्य विकसित करायला आम्हाला मदत केली.’’

‘आधुनिक भारत’ लिहिणाऱ्या आचार्य जावडेकरांना एक व्यापक आणि ऐतिहासिक आकलनशक्ती होती. टिळकांकडून गांधींकडे आलेली आणि त्यासाठी सावरकरांना नाकारणारी काही उच्चवर्णीय मांडणी महाराष्ट्रात होती, त्यांच्यात जावडेकर महत्त्वाचे होते. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे, स.ज.भागवत अशी नावेही घ्यावी लागतात. या मंडळींचे वैशिष्ट्य यशवंतराव चव्हाणांच्या आठवणीच्या आधारे सांगता येते. गांधी व सावरकर यांच्या विचारांची समीक्षा करताना सावरकरांवर कठोर टीका करणारी ही मंडळी सावरकरांच्या ‘कमला’सारख्या काव्याचे रसग्रहण तितक्याच तन्मयतेने व सहृदयतेने करीत. जावडेकरांनी या दोन लेखकांच्या ज्या मूल्यधारणांमध्ये सुधारणा, दुरुस्ती केली त्यांचा संबंध त्यांच्या बुद्धिवादी व समाजवादी मूल्यधारणांशी असणार हे निश्चित. आणि त्याचबरोबर ‘टिळक आणि त्यांचा काळ याबद्दल एका परिप्रेक्ष्याचा विकास’ तितक्याच महत्त्वाचा मानायला हवा. त्यामुळे हे लेखक आपल्या काळाच्या बंधनातून मुक्त होऊन टिळकांच्या काळात प्रवेश करू शकले.

मी सांगतो त्या मुद्याचे प्रत्यंतर घ्यायला चरित्राचे पहिले प्रकरणसुद्धा पुरेसे व्हावे. टिळकांच्या बालपणाकडे लेखकांनी लक्ष वेधले आहे. बालपणी टिळकांवर सर्वाधिक प्रभाव टाकून गेलेल्या संकल्पना व ठसे उमटवून गेलेल्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. या संकल्पनांनी त्यांची मनोरचना घडली आणि त्यांच्या नंतरच्या आयुष्यातील पुस्तकं, माणसं व घडामोडींचं मूल्यमापन करण्यासाठीचे मानदंड त्यांना त्या काळात मिळाले. त्यांच्या विचारांना विशिष्ट दिशा मिळण्यामागे तारुण्यातील मैत्रीसंबंधाची उल्लेखनीय भूमिका होती. यातून त्यांच्या पुढील कृतीची वाटही स्पष्ट झाली.

मैत्रीसंबंधांनी लेखकांना अर्थातच गोपाळ गणेश आगकरांबरोबरची मैत्री प्रकर्षाने अभिप्रेत आहे. ‘‘तत्कालीन समस्यांना दोघांनीही परस्परांहून भिन्न प्रतिसाद दिला. बालपणातील त्यांच्यावर पडलेले भिन्न प्रभाव, त्याचप्रमाणे त्यांच्या भिन्न स्वभाववृत्ती यामागची मुख्य कारणे होत.’’

पण हे झाले प्रतिपादनाचे सार. चरित्रकार पुरेसा तपशील पुरवायला चुकत नाहीत. त्यासाठी त्यांनी 1956 पूर्वी उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व साधनांचा उपयोग करून घेतला आहे. त्यात न.चिं.केळकर यांचे त्रिखंडात्मक टिळक चरित्र तर केंद्रस्थानी असणार, यात शंका नाही. इतर लहान-मोठी उपलब्ध चरित्रंही त्यांनी तपासली होती. आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे टिळकांचे निकटवर्ती अनुयायी स. वि. बापट यांनी तीन खंडांमध्ये संग्रहित केलेल्या टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिकांचाही त्यांनी योग्य तेथे उपयोग करून घेतला आहे. (हे तिन्ही खंड नुकतेच परममित्र प्रकाशनाने  पुनर्मुद्रित केले आहेत.)

याच ठिकाणी अनुवादकाच्या जागरूकतेचे उदाहरण पहावयास मिळते. टिळकांच्या स्पष्टोक्तीमुळे व तोडून बोलण्याच्या स्वभावामुळे त्यांचे त्यांच्या महाविद्यालयीन स्नेह्यांनी वाल्टर स्कॉट यांच्या ‘केनिलवर्थ’ या कादंबरीतील ब्लंट या पात्राचे नाव पाडले होते. असे पूर्व चरित्रकारांनी नोंदवले आहे. खरे तर हे पात्र मुळात Blunt नसून Blount आहे. मराठी चरित्रकारांनी ब्लंट असे छापल्यामुळे प्रधान-भागवतांनी प्रस्तुत इंग्रजी चरित्रात हे नाव Blunt असे छापले. अनुवादक डोंगरे यांनी मात्र मुळातील साधने तपासून ते उच्चाराबरहुकूम ब्लाऊंट असे असण्याची दुरुस्ती वाढीव टिपांमध्ये केली आहे.

तत्कालीन परिस्थिती, महापुरुष आणि त्यांच्या कल्पना यांचा टिळकांवर कसा परिणाम झाला, याचे सूक्ष्म विश्लेषण करताना इतर चरित्रकाराप्रमाणे हे लेखकद्वय चिपळूणकरांना अवास्तव महत्त्व देताना दिसत नाहीत. उलट इतरांनी ज्यांना टिळकांचे (किंवा टिळकांना त्यांचे) प्रतिस्पर्धी मानून कमी महत्त्व दिले त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या टिळकांवरील प्रभावाला प्रधान-भागवत अधोरेखित करतात. बरोबरीने ते दादाभाई नवरोजी यांनाही योग्य ते स्थान देतात. चिपळूणकरांनी भले लोकांचा स्वाभिमान चेतवला असेल आणि त्या लोकांमध्ये टिळकांचाही समावेश असेल; परंतु सांविधानिक आंदोलनाची वाट आधीच कोणी तयार करून ठेवली असेल तर ती रानड्यांनी, असे प्रधान-भागवत यांचे निरीक्षण आहे आणि ते योग्यच आहे.

मात्र याच स्थानी लेखकांचा आगरकरी कलही स्पष्ट होताना दिसून येतो. टिळकांनी रानडे-आगरकरांचा श्रद्धाभाव आपल्यात येऊ दिला नाही, याची नोंद घेताना त्यांना टिळकांवरील आगरकरांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. वस्तुतः हा काही आगरकरांचा प्रभाव नसून टिळक आणि आगरकर या दोघांवरील मिल स्पेन्सरचा संयुक्त प्रभावाचा भाग आहे. टिळक-आगरकर यांचा पुढील विकासक्रम असेच सांगतो की, टिळक या प्रभावातून बाहेर पडले, पण आगरकर पडू शकले नाहीत. टिळक  मिल स्पेन्सर यांना ओलांडून पुढे जातात, आगरकर जात नाहीत. ते गेले असते तर कदाचित टिळकांच्या प्रभावामुळे असे म्हणण्यास जागा झाली असती, त्यामुळे ‘‘आगरकरांच्या प्रभावामुळेच टिळकांनी आत्ममुक्तीच्या संकल्पना आणि मानवतेच्या नि:स्वार्थी सेवेची इहवादी संकल्पना यांचा संयोग साधला असावा.’’ हे चरित्रकारांचे विधान अतिशयोक्त आहे. हा संयोग टिळकांनी साधला, हे खरेच आहे. पण तो भगवत्‌गीतेच्या प्रभावामुळे, आगरकरांच्या नव्हे. आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगरकरांनी ज्या पाश्चात्त्य ग्रंथांचे वाचन केले होते, त्या सर्व ग्रंथांचे वाचन टिळकांनी केले होते, उलट टिळकांनी भारतीय परंपरेतील जेवढे ग्रंथ वाचले होते तेवढे आगरकरांनी वाचले नव्हते. आमची मूळ प्रकृती म्हणजे भारतीय आर्यत्व न सोडता आम्हाला पाश्चात्त्य सुधारणांचा स्वीचार करायचा आहे; असे जरी अगरकर म्हणत असले तरी भारतीय आर्यत्व म्हणजे नेमके काय, हे सांगण्याइतपत त्यांची तयारी तेव्हा झालेली नव्हती हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच एवढ्या प्रतिज्ञेच्या पलीकडे जाऊन काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नसावा. आणि आणखी एक मुद्दा सांगावयाचा झाल्यास मिल स्पेन्सर यांचा प्रभाव हा त्या काळात स्वाभाविक व सार्वत्रिक होता. सुशिक्षित तरुणांमध्ये तर तो युगधर्म बनला होता. बंगालमध्येही अशीच परिस्थिती होती. या दोघांची महत्त्वाच्या बहुतेक पुस्तकांची भाषांतरे मराठी भाषेत झाली होती. भाषांतरकरामध्ये धो.के. तथा अण्णा कर्वे या तरुणाचाही समावेश होता. अण्णा स्त्रीशिक्षणाकडे वळले ते याच प्रभावामुळे.

टिळकांच्या पूर्वायुष्यातील शाळेची स्थापना, केसरी मराठा पत्रांची सुरुवात या घटनांचा पुरेसा उहापोह करून लेखक करवीर छत्रपती प्रकरणात दोघांना झालेल्या शिक्षेचीही चर्चा करतात. मग येते ती डी.ई. सोसायटीतील भाऊबंदी. पण ही भाऊबंदकी एकटी येत नाही. तिला जोडूनच केसरी मराठा पत्रांमधील भाऊबंदकी आहे आणि तिचे संदर्भ तेव्हा घडत असलेल्या सामाजिक संघर्षात रुतलेले आहेत. या दोन्हींचा परामर्श लेखकांनी तेव्हाच्या उपलब्ध साधनांचा पुरेसा वापर करून घेतला आहे. त्यातील काही अज्ञात मुद्दे नंतरच्या काळात डॉ. य.दि. फडके यांनी प्रकाशात आणले.

टिळक आणि आगरकर यांच्यातील वादाचे विवेचन करीत असताना लेखकांनी टिळकांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बालविवाहाच्या समस्येमधील सरकारी हस्तक्षेपाला टिळकांचा विरोध असला तरी त्यांनी ‘बालविवाहाच्या व्यवस्थेचे समर्थन कधीच केले नाही. उलट या व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम होत असल्याचे मान्य केले,’’ हे ते आवर्जून सांगतात. याउलट या वादात टिळकांबरोबर आलेल्या मंडळींना ‘‘बालविवाह प्रतिबंधक कायद्याला असलेला टिळकांचा विरोध तेवढा मंजूर होता. ही मंडळी कट्टर रूढीवादी होती. त्यांना स्थितिशील अवस्था टिकून राहायला हवी होती, ही वस्तुस्थिती आहे. टिळकांनी बालविवाहाचा जोरकसपणे धिक्कार केला असता आणि स्वत:ची भूमिका निसंदिग्धरीत्या मांडली असती तर त्यांना तेव्हा मिळाला तसा सनातनी लोकांचा पाठिंबा मिळाला नसता.’’

लेखकांचे वाक्य पूर्ण करायचे असेल तर त्यात घालावी लागणारी भर अशी- आणि सनातनी नसणाऱ्या लोकांनी त्यांना तेव्हा पाठिंबा दिला नसता. म्हणजे आपण परत त्याच पेचात अडकतो. सामाजिक सुधारणांची निकड वाटणारी मंडळी राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत तितकी उत्साही नव्हती. आणि राजकीय स्वातंत्र्य हवे असणारी मंडळी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत तितकी उत्साही नव्हती. आता ही परिस्थिती काही टिळकांनी निर्माण केली नव्हती. ती होती आणि ती मान्य करूनच आपली वाट निर्माण करावी लागणार होती. आणि भले प्रधान-भागवत म्हणतात त्याप्रमाणे टिळकांनी आपली भूमिका नि:संदिग्धरीत्या मांडली नसेल, त्यांची या संदर्भातील कृती पुरेशी बोलकी होती.  टिळकांनी आपल्या मुलींची लग्ने सनातत्यांना मान्य असलेले वय उलटून गेल्यावर लावली आणि त्यांना पुरेसे शिक्षणही दिले.

डेक्कन सोसायटीमधील वाद आणि टिळकांचा राजीनामा हे प्रकरण लेखकांनी अत्यंत नाजुकपणाने हाताळले आहे. ‘‘या टप्प्यावर टिळकांच्या आचरणात व उपदेशात अंतर्विरोध दिसत असला तरी, पूर्णत: शैक्षणिक कार्यासाठी समर्पित करून घेण्याच्या तत्त्वावर त्यांची खरोखरीच श्रद्धा होती हे मान्य करायला हवे.’’

टिळकांनी सादर केलेल्या राजीनामा पत्राबद्दलचे लेखकांचे मतही असेच चिंतनीय आहे. ‘‘हे निवेदन केवळ तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या कायदेतज्ज्ञाने केलेल्या युक्तिवादापुरते मर्यादित नाही. एका आदर्शवादी व्यक्तीच्या श्रद्धेची हेलावून टाकणारी अभिव्यक्ती त्यात आहे.’’

याच काळातील टिळकांच्या सहसा दुर्लक्षित कृतीकडे ‘उल्लेखनीय’ म्हणून लक्ष वेधण्याचे काम प्रस्तुत चरित्रग्रंथ करतो. ‘‘ड्युक ऑफ कनॉट भारतात आले असता टिळकांनी सैनिकी प्रशिक्षणाची संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. त्यांच्या प्रस्तावाला ड्युकने मंजुरी दिली आणि प्रस्तावित सैनिकी शाळेचे नाव ड्युक वरून असावे या सूचनेवरही सहमती दर्शवली.’’ या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली नाही, हा भाग वेगळा. मुद्दा असा आहे की, देशाला खरोखरंच स्वातंत्र्य मिळाले तर त्याच्या रक्षणासाठी प्रशिक्षित सैन्य बळाची उणीव नसावी या दूरदृष्टीने टिळक विचार करीत होते.

आगरकरांविषयी विशेष सहानुभूती असूनही लेखकांनी टिळकांना जास्तीत जास्त समजून घेऊन जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. आगरकर आदर्शवादी होते आणि टिळकांची धाटणी अधिक वास्तवाभिमुख होती हे त्यांचे तुलनात्मक मत योग्य वाटते. ‘‘टिळकांना स्वतःची ऊर्जा राजकीय प्रश्नांवर केंद्रित करायची होती आणि देशाच्या तत्कालीन परिस्थितीचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा घेतला तर टिळकांची चतुर व्यवहारबुद्धी समर्थनीय ठरते!’’ हा त्यांचा या संदर्भातील निवाडा आहे.

‘‘टिळकांच्या राजकीय जीवनामध्ये लक्षणीय विकास दिसून येतो’’ हे लेखकांचे निरीक्षण मला महत्त्वाचे वाटते. हा विकास असेही दाखवतो की, टिळकांनी आपल्या व्यक्तित्वाला कधीही ‘फॉसिल’ बनू दिले नाही. ते परिस्थितीशी सतत संवाद करीत, तिला प्रतिसाद देत राहिले. (प्रधानांच्या या मताचाच पुढे य.दि.फडके यांनी आणखी विस्तार केलेला दिसून येतो.) येथे लेखकांनी आपला मुद्दा सशस्त्र क्रांतिकारकांच्या संदर्भात स्पष्ट केला आहे. स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन हिंसाचाराचा अवलंब करणाऱ्या देशभक्त तरुणांना आणखी उचकावण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. ते स्वत: बहुसाधनवादी असल्यामुळे हिंसेच्या मार्गाला तत्त्वत: मुदलातच त्याज्य व अनैतिक मानत नाहीत. मात्र अशा प्रकारच्या सशस्त्र क्रांतीसाठी पुरेशी तयारी नसताना पतंग दिव्यावर झेपावत आत्माहुती देतो तसे हौतात्म्य पत्करायला ते मान्यता देत नसत. अशा प्रकारच्या फुटकळ असंघटित कृत्यांनी काही विशेष साधणार नाही, हकनाक बळी मात्र जातील. म्हणून ते असे काही करू इच्छिणाऱ्यांचा हिरमोड करीत असले तरी संघटित स्वरूपाच्या क्रांतीचे प्रयत्न त्यांना मान्य होते व अशा प्रयत्नांना त्यांनी बळ दिले असल्याचेही मानले जाते. तथापि सद्य:स्थितीत अशी क्रांती घडवून आणता येणार नाही, या वास्तवाची त्यांना जाणीव होती. गीतेतील, ‘दैवं चैवात्र पंचमम्‌ हा सिद्धांत त्यांना पुरतेपणी ठाऊक होता. आणि तरीही पन्नास टक्के तयारी झाली तर उरलेल्या पन्नास टक्क्यांसाठी दैवावर अवलंबून राहण्याचा धोका पत्करायची त्यांची तयारी असे. पण अर्थात अशी तयारी नाही हेही त्यांना समजत होते. साधनाम्‌ अनेकता हे त्यांनी हिंदू धर्माचे एक लक्षण मानले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीलाही हे लागू होते अशी त्यांची धारणा होती. गांधींचा व त्यांचा मतभेद होता तो याच संदर्भात. गांधी निरपवाद निरपेक्ष अहिंसेचे पुरस्कर्ते मानले जात. टिळक साधनसापेक्षता मानीत. आणि त्यामुळे त्यांचा गांधींच्या सत्याग्रहरूपी अहिंसात्मक मार्गाला विरोध असण्याचे कारण नव्हते. साध्याने साधनाचे समर्थन करता येते हा नैतिक मुद्दा व त्याला धरून साधनाची निवड करता येते. पण ही निवड करताना भोवतालच्या परिस्थितीचाही विचार करावा लागतो. परिस्थिती हे साधनाचे व्यावहारिक समर्थन झाले. गांधींचे या संदर्भातील विचार कान्ट या जर्मन नीतीवेत्त्याच्या निरुपाधिक आदेशासारखे वाटतात.

‘‘आंबे पिकण्यापूर्वी काढायचे नसतात आणि त्यात घाई गडबड केली तर आंबा वाया जातो हे कृपया लक्षात ठेवा.’’ असा सल्ला टिळकांनी गंगाधरराव देशपांडे यांना दिला असल्याचे चरित्रकार निदर्शनास आणतात. याचाच अर्थ असा होतो की, सर्व व्यवहारांच्या नैतिक व व्यावहारिक मूल्यमापनात काळ या घटकाचासुद्धा समावेश करायला हवा, तो केला की चरित्रकारांना ‘‘टिळकांच्या कृतीमध्ये अंतर्विरोध होता का? त्यांनी क्रांतिकारकांच्या एका गटाला एक सल्ला दिला आणि दुसऱ्या गटाला वेगळा सल्ला दिला असं घडलं होतं का? क्रांतिकारकांच्या संयोजनासाठी अस्तित्वात आलेल्या मंडळाचे सदस्य असतानाही ते महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना परावृत्त का करत होते?’’ अशा प्रश्नांची उत्तरे शोधता येतात. स्वत: या चरित्रकारांनीदेखील असा प्रयत्न केला आहे. ‘‘टिळकांच्या मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास केला तर या सकृतदर्शनी अंतर्विरोधाचा उलगडा होतो. ते क्रांतीसाठी तयारी करण्याच्या बाजूचे होते, पण कोणतीही तत्काळ कृती करणे त्यांना पटत नव्हते. अरविंद क्रांतीसाठी पायाभरणी करीत होते आणि तरुणांना क्रांतिकारी कारवाईसाठी आवश्यक प्रशिक्षण देत होते, म्हणून त्यांना टिळकांचा पाठिंबा होता. अभिनव भारत संघटनेचे सदस्य मात्र तत्काळ कृतीच्या पातळीवर विचार करत होते आणि असं पाऊल उचलणं आत्मघातकी ठरेल असं टिळकांचं ठाम मत होतं... टिळक केवळ क्रांतीच्या तयारीसाठी मदत करत होते.’’

या संदर्भात तुकाराम महाराजांच्या एका उक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही,  ‘तुका म्हणे आपुले बळ।युक्ती काळ कारण॥’ कोणत्याही कारणाच्या यशासाठी तीन घटक लागतात. बळ म्हणजे शक्ती, युक्ती म्हणजे बुद्धी आणि काळ.

या विवेचनानंतर चरित्रलेखकांनी टिळकांचा त्याविषयीचा विचार एका बाजूला सशस्त्र क्रांतिकारक आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी अशा दुहेरी संदर्भात साररूपाने सदर केला आहे तो असा, ‘‘दबावाचं राजकारण खेळून सत्ता काबीज करणं ही टिळकांची भूमिका होती. ही भूमिका गांधींसारख्या नेत्याच्या भूमिकेपेक्षा आणि क्रांतिकारकांच्या भूमिकेपेक्षा भिन्न असल्याचे इथे नमूद करणे आवश्यक आहे.’’ हा मुद्दा लेखक पहिल्या महायुद्धाच्या वेळी या तिघांनी घेतलेल्या भूमिकांच्या आधारे स्पष्ट करतात. ‘‘गांधी कोणत्याही अटीशिवाय सरकारला युद्ध प्रयत्नात मदत करायला तयार होते. क्रांतिकारी गटांना युद्धकार्याशी काहीच देणंघेणं नव्हतं, उलट ही परिस्थिती क्रांतिकारी कारवायांसाठी अनुकूल आहे, अशा दृष्टीने ते याकडे पाहत होते.’’

गांधी आणि टिळक या दोघांची भूमिका युद्धप्रयत्नात ब्रिटिशांना सहकार्य करायचीच होती. मात्र गांधींची भूमिका ब्रिटिशांना निरपेक्षपणे मदत करावी, या अडचणीच्या प्रसंगात त्यांची अडवणूक करू नये, अशी म्हणजे नैतिक म्हणता येईल अशी होती. उलट टिळकही ब्रिटिशांना मदत करण्याच्या मताचे असले तरी ते या प्रकाराकडे निखळ नैतिक दृष्टीने पाहायला तयार नव्हते. ते त्याकडे राजनैतिक दृष्टीनेही पाहत होते. ब्रिटिशांना मदत तर करायची, पण ती बिनशर्त नव्हे तर सशर्त; ही टिळकांची भूमिका होती. मदतीच्या मोबदल्यात त्यांना सरकारकडून आणखी राजकीय हक्क मिळवायचे होते. ‘साम्राज्याच्या गरजा येती स्वराज्याच्या काजा’ अशा प्रकारे ही भूमिका सूत्रबद्ध केली गेली.

अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेल्या गांधी चरित्राच्या प्रस्तावनेत टिळकांनी मांडलेल्या मुद्यांवरून लेखकांनी टिळकांचे गांधींविषयक मत स्पष्ट केले आहे.  त्यातून गांधीनी केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीचे स्वरूप चांगले समजून येते. न्याय आणि कायदा यांच्यातील भेद टिळक स्पष्ट करतात. न्याय हे तत्त्व असून कायदा त्या तत्त्वाच्या अंमलबजावणीसाठीचा व्यवहार आहे, स्वराज्यामध्ये या दोन बाबींत संगती असते, निदान फार अंतर नसते. परकीय सत्ता मात्र कायद्याचा उपयोग न्यायाचे साधन म्हणून करण्याऐवजी स्वतःचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी करते. यावेळी अशा कायद्याचे पालन न करणे हे न्याय तत्त्वाच्या पुष्टीसाठी आवश्यक ठरते. गांधींचा सत्याग्रह हेच करायला सांगतो.

अर्थात टिळक सत्याग्रहाकडे ‘साधानानाम्‌ अनेकता’ या सूत्रातील अनेक साधनांपैकी एक म्हणून पाहत होते. गांधींसाठी सत्याग्रह ही जीवननिष्ठा होती, असेही लेखक स्पष्ट करतात. टिळकांच्या जीवननिष्ठेचे वर्णन कर्मयोग असे करावे लागते. त्यासाठी त्यांना भगवद्गीता आधारभूत होती. शब्दांच्या लाघवासाठी येथे निष्काम शब्द वगळला जातो खरा, पण तो निष्काम कर्मयोग आहे. (जाता जाता ‘निष्काम कर्म’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा तुकोबांनी केला आहे याची नोंद घ्यावी’) आपण टिळकांना सर्व अर्थांनी पर्याय देत आहोत, या जाणीवेतूनच गांधींनी गीतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लावलेला अन्वयार्थ पकडणारा शब्द म्हणजे अनासक्ती योग. निष्कामता आणि अनासक्ती यांच्यातील अंतर असलेच तर फार थोडे असणार हे उघड आहे.

प्रधान, भागवतांनी लक्षात आणून दिलेला आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यात मतभिन्नता असली तरी पंजाबमधील दंग्याच्या वेळी लोकांनी केलेल्या अतिरेकी कृत्यांचा निषेध करणारा ठराव गांधींनी अमृतसर अधिवेशनावेळी मांडला तेव्हा टिळकांनी त्यांच्या दृष्टिकोनाला संमती दर्शवली होती.’’ म्हणजेच या मुद्याकडे टिळकसुद्धा राजनैतिक भूमिकेतून पाहण्याऐवजी नैतिक भूमिकेतून पाहत होते.

खरे तर टिळक आणि गांधी यांच्या विचारांकडे कसे पाहावे याचे सूचन दोघांनाही मान्य असलेल्या गीतेमध्येच सापडते. सांख्य आणि योग या परस्पर विरोधी मानल्या गेलेल्या विचारांच्या संदर्भात आपल्या विचारांची मांडणी करणारा भगवान कृष्ण ‘एकं साख्यं च योगं च’ या निष्कर्षापर्यंत येतो. मात्र ते सर्वांनाच कळेल अथवा पटेल असे मात्र नाही, याचीही नोंद त्याने घेतलेली आहे. ‘य: पश्यति स पश्यति’ ज्याला नजर असेल त्यालाचं हे कळेल!

टिळक आणि गांधी यांच्या विचारांबाबत असेच म्हणावे लागते ‘एक: गांधिटिळकश्च य: पश्यति स पश्यति’ मला वाटते प्रधान, भागवतांना हे बऱ्यापैकी दिसले आहे. म्हणून तर हे दिसण्याच्या मार्गातील अडथळेही दूर करण्याचा प्रयत्न करताना ते दिसतात, लिहितात- ‘‘गांधींनी कालांतराने स्वीकारलेलं धोरण व कार्यक्रम यावर टिळकांनी कसा प्रतिसाद दिला असता याची चर्चा करणे म्हणजे ‘जर-तर’चा निष्क्रिय खेळ होऊन बसेल. गांधींनंतरच्या व मार्क्सवादानंतरच्या काळातील कसोट्या टिळकांच्या राजकीय संकल्पनांना व कार्यक्रमांना लावणंही अन्याय ठरेल.’’

प्रस्तुत ग्रंथ जरी चरित्रात्मक असला आणि चरित्रग्रंथामध्ये चरित्रनायकाच्या कृतींवर भर देण्यात येत असला तरी चरित्रकारांनी त्यांच्या वैचारिक भूमिकेच्या चर्चेला पुरेशी जागा दिली आहे. विशेषत: टिळकांच्या नीतिशास्त्रीय भूमिकेला. ‘‘मिलने नमूद केलेली  नीतिशास्त्राची सामाजिक बाजू टिळकांनी स्वीकारली आणि गीतारहस्यामध्ये त्यांनी लोकसंग्रहाच्या संकल्पनेचा कैवार घेतला. ...हिंदू तत्त्वज्ञानामध्ये मुक्तीवर भर दिलेला आहे, तर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानामध्ये सामाजिक हिताला चालना देण्यावर भर आहे, याकडे त्यांनी निर्देश केला. या दोन्हींचं उच्चतम संश्लेषण भगवद्गीतेमध्ये झालं, कारण त्यात स्थितप्रज्ञतेने लोकसंग्रह करण्याचा आदर्श मांडलेला आहे असं त्यांचं प्रतिपादन होतं.’’

गीता हे नीतिशास्त्र असून तिची मांडणी पाश्चात्त्य नीतिशास्त्राच्या चौकटीत व परिभाषेत करायला हवी, या भूमिकेतून टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहिले. त्या काळात पाश्चात्त्य नीतिशास्त्राची दोन प्रमुख प्रारूपे (paradigms) होती. एक कान्टचे व दुसरे मिलचे. त्यापैकी कान्टचे प्रारूप आध्यात्मिक असल्याचे समजून टिळकांनी त्याचा पुरस्कार केला व मिलच्या आधिभौतिक प्रारुपाचा त्याग केला असे चित्र दिसते. प्रधान, भागवत मात्र असे सूचित करतात की, कान्टच्या आध्यात्मिक नीतिशास्त्रातील अंगभूत आकृतीवाद (formalism)  आणि मिलची आधिभौतिकता टाळत टिळकांनी गीतेच्या आधारे दोघांचा समन्वय केला. आकृतिवादामुळे कान्टला समाज नावाच्या अनुभवातील वास्तवाची स्वतंत्रपणे दाखल घेता आली नव्हती. टिळक ती लोकसंग्रहाच्या संकल्पनेतून  घेऊ शकतात. प्रधान, भागवत टिळकांच्या या दृष्टिकोनाला ‘आध्यात्मिक मानवतावाद’ असे संबोधतात.

ग्रंथात टिळकांच्या ज्ञानसाधनेची व ग्रंथकर्तृत्वाची पुरेशी चर्चा करण्यात आली आहे.

टिळक हे जरी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते मानले जात असले तरी राजकीय दृष्ट्या पाहिले असता, त्यांचा दृष्टिकोन अंतरराष्ट्रीय होता. आणि नैतिक दृष्ट्या विचार केला तर तो वैश्विक होता असेही लेखक सुचवतात. टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढा हा जागतिक स्वातंत्र्यलढ्याचा भाग मानला व त्या पद्धतीनेच आशियाई राष्ट्रांकडे पहिले हे ते निदर्शनास आणतात.

योगायोगाने मला टिळकचरित्र लिहिण्याची संधी मिळाली असल्यामुळे, टिळकांवरील बहुतेक साधनग्रथांचे वाचन मी केले आहे. त्यावरून निश्चितपणे असे म्हणू शकतो की, भागवत-प्रधानांचा प्रस्तुत चरित्रग्रंथ वेगळ्या आणि स्वतंत्र भूमिकेतून लिहिला आहे, त्यामुळे त्याचे स्थान अबाधित आहे. दुसरे असे की, त्यांनी टिळकविचारांचे विवेचन करताना आंतरराष्ट्रीय भूमिकेतून व आशिया खंडाला केंद्रस्थानी ठेवून केले आहे, त्यामुळे वर्तमान परिस्थितीतही ते उपयुक्त ठरेल.

एका दर्जेदार चरित्रग्रंथाला केवळ तो इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी वाचक मागील 65 वर्षे त्याला वंचित झाला होता. ही उणीव प्रस्तुत भाषांतरामुळे आता भरून निघाली आहे. त्यासाठी अनुवादक आणि प्रकाशक यांना पुनश्च धन्यवाद.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके