डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सचिन हा पारंपरिक वारकरी घरातला व शिवाय आधुनिक शिक्षण घेतलेला. त्याने आपल्या कीर्तनातून या कायद्याचा नेमका आशय काय आहे व तो वारकरी धर्माशी विसंगत कसा नाही, याची मांडणी संतवचनांच्या आधारे कीर्तनातून केली. या उपक्रमाला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. वारकरी मंडळींचे गैरसमज दूर झाले. डॉ.दाभोलकर हे धर्माच्या विरुद्ध नाहीत, खऱ्या धर्माचे स्वरूप बिघडवून त्याचा गैरफायदा घेणाऱ्या धर्मशत्रूंचे विरोधक आहेत. त्यांचे कार्य ‘झाडू संतांचे मारग। आडरानी भरले जग’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीशी सुसंगत आहे. खरे तर जे काम पारंपरिक कीर्तनकारांनी करायला हवे होते, पण जे त्यांना काही कारणामुळे करता आले नाही, ते म्हणजे धर्मशुद्धीचे काम दाभोलकर करीत आहेत, हे आता स्पष्ट झाले.  

राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने एखाद्या समूहाला आपल्या मूळ संस्कृतीचा त्याग करून दुसरी संस्कृती स्वीकारावी लागते किंवा त्या दुसऱ्या संस्कृतीच्या प्रकाशात आपल्या संस्कृतीत काही बदल घडवून आणावे लागतात, त्याची प्रक्रिया अभ्यासकांसाठी स्वारस्यपूर्ण असते यात शंका नाही. अशा वेळी मूळ संस्कृती कसाला लागते म्हटले तरी चालेल. कधी ती आपल्या संस्था, संकेत, प्रथा इत्यादींचा पूर्णपणे त्याग करते; तर कधी त्यांना कालानुरूप अर्थ देत बदलण्याचा प्रयत्नही करते. कधी कधी या जुन्या गोष्टी अश्मीभूत अवशेषांप्रमाणे नुसत्याच टिकून राहतात एवढेच. त्यांना प्रत्यक्ष जगण्यात वा रोजच्या व्यवहारात स्थान नसते.

उदाहरण आपल्याच देशाचे घेता येईल. प्राचीन काळी येथील संस्कृती यज्ञप्रधान व यज्ञकेंद्रित होती. यज्ञाला केंद्रस्थानी ठेवूनच समाजातील उत्सव, समारंभ, सणवार साजरे केले जायचे. राजाला तर अश्वमेधासारखे खूप काळ चालणारे यज्ञ करावे लागत. या कालखंडाला सत्र म्हटले जाई. भारतीय नाट्यकलेचा विकास यज्ञाच्या साक्षीने झाला. महाभारतासारखी महाकाव्ये, पुराणे यांनी यज्ञासाठी जमलेल्यांसाठीच आकार घेतला.

पुढे उपनिषदकालीन ऋषी, भक्तिमार्गी लोक व विशेषत: बौद्ध-जैनांसारखे अवैदिक धर्म यांच्या प्रभावामुळे यज्ञसंस्थेला उतरती कळा लागली, त्याचा परिणाम या गोष्टींच्यावर झाल्याशिवाय राहिला नाही. पण उपनिषदांचा ज्ञानमार्ग असो, उत्तरकालीन भक्तिमार्ग असो किंवा अवैदिक धर्म असोत; ते याच मातीत उगवलेले व रुजलेले असल्यामुळे त्यांच्याशी सांस्कृतिक समायोजन करणे येथील लोकांना अवघड गेले नाही. वैदिक व अवैदिक यांच्यातील संघर्ष हा शेवटी अंतर्गत संघर्ष होता, हे लक्षात घेतले म्हणजे बौद्ध तत्त्ववेत्त्यांमधील ब्राह्मण पंडित बहुसंख्य का, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. यज्ञ वगळता बाकीच्या गोष्टी थोड्याफार परिवर्तनांसह तशाच राहिल्या. इतकेच नव्हे, तर उदाहरणार्थ- बुद्धाला विष्णूचा नववा अवतार अशी मान्यता मिळाली, बौद्ध तत्त्वज्ञानामुळे विकसित होऊ शकलेल्या शांत रसाला पारंपरिक रसव्यवस्थेत सामावून घेण्यात आले. उलटपक्षी बौद्ध-जैन पंडित संस्कृत भाषेत लिहू लागले.

दहाव्या शतकानंतर भारतावर इस्लामी राज्यकर्त्यांची सत्ता स्थापन झाली. साहजिकच पारंपरिक संस्था, संकेत इत्यादींना तोपर्यंत असलेला राजाश्रय संपुष्टात आला. याचा परिणाम म्हणून संस्कृत नाटके लिहिणे वा त्यांचे प्रयोग करणे कायमस्वरूपी बंद झाली (अपवाद तंजावरच्या मराठी राजांचा).

अर्थात, दरम्यानच्या काळात भारतामध्ये प्रादेशिक भाषांचा उदय झाला होता. भारत या नव्या संस्कृतीला सामोरा गेला तो याच नव्या प्रादेशिक भाषांच्या माध्यमांतून. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास इस्लामी सत्तेच्या- म्हणजे खिलजींच्या आक्रमणाच्या आधी मराठीत महानुभवांचे लीळाचरित्र व वारकऱ्यांची ज्ञानेश्वरी असे दोन महत्त्वाचे ग्रंथ निर्माण झाले. शिवाय वारकरी संतांनी मराठीमध्ये विपुल संख्येने अभंगांची निर्मिती केली.

अर्थात, तेराव्या शतकातील महाराष्ट्रामध्ये ग्रंथ छापण्याची म्हणजेच मुद्रणकला अस्तित्वात नसल्यामुळे या (हस्तलिखित) ग्रंथांच्या प्रसाराला नाही म्हटले तरी अंगभूत अशा मर्यादा होत्या. विशेषत: वारकरी संप्रदायाला या मर्यादांवर मात करता आली ती त्याने वापरलेल्या कीर्तन या माध्यमातून. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ ही संत नामदेवांची प्रतिज्ञाच होती.

खरे तर कीर्तन हा तसा नवा प्रकार नव्हता. भक्तिशास्त्राची मांडणी करणाऱ्यांनी कीर्तनाला नवविधा भक्तीतील एका प्रकाराचे स्थान दिलेले होते. महर्षी नारद हे आद्य कीर्तनकार मानले जातात. (आजही कीर्तनकारांच्या बैठकीला ‘नारदाची गादी, असेच म्हटले जाते) पण कीर्तनात कीर्तनकाराने निरूपण करायचे व श्रोत्यांनी ते ऐकायचे, अशी स्थिती होती. कीर्तनकाराला एखादा दुसरा साथीदार असला म्हणजे पुरे.

नामदेवी वारकरी कीर्तनाचा बाजच वेगळा. त्यात कीर्तनकाराला गायनाची व भजनाची साथ करण्यासाठी अनेक टाळकरी असतात- अगदी हजारोंच्या संख्येनेसुद्धा. त्यामुळे वारकऱ्यांचे कीर्तन वैयक्तिक न राहता समूहभक्तीचा प्रकार बनला. कीर्तनकाराला जशा अभंग-ओव्या पाठ असतात, तशाच त्या त्याला साथ करण्यासाठी उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांनासुद्धा पाठ असतात. प्रसंगी कीर्तनकारालासुद्धा न आठवलेला एखादा अनुरूप अभंग टाळकरी त्याच्या परवानगीशिवाय म्हणू शकतो.

कीर्तनाच्या या पद्धतीमुळे वारकरी परंपरेतील संतांचे अभंग महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले.

पण माझा मुद्दा मौखिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणे, हा नाही. मला विशेषत: कीर्तनात प्रतिपादिल्या जाणाऱ्या विषयांसंबंधी व आशयासंबंधी काही सांगायचे आहे.

हे सांगताना महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक टप्पा ओलांडून पुढे जावे लागेल. (तो टप्पा म्हणजे इ.स. 1645 ते 1818 या मराठेशाहीच्या कालखंडाचा) महाराष्ट्रात इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर इंग्रजांच्याच माध्यमातून त्यांचे ज्ञान, विज्ञान, सामाजिक-राजकीय संस्था आणि शिक्षणपद्धती यांचा आपण अंगीकार केला. लोकहितवादी व महात्मा फुले यांच्या हयातीतच मुंबई येथे विद्यापीठ स्थापन झाले. (1857 मध्ये कलकत्ता व मद्रास येथील विद्यापीठांच्या बरोबरीने) त्यामुळे या प्रक्रियेने अधिक वेग घेतला. इंग्लंडमधील राज्यपद्धती लोकशाहीवर आधारित असल्यामुळे तिचे प्रतिबिंब तेथील समाजाच्या सर्वच व्यवहारांमध्ये पडले होते. समाज, सभा, संमेलने, अधिवेशने, सेमिनार या गोष्टी हळूहळू आपल्याकडे प्रविष्ट झाल्या. ज्याला राजवाड्यांनी मंडळीकरणाराची प्रक्रिया असे म्हटले, ती ही प्रक्रिया होती. या संस्थांच्या माध्यमातून लोक एकमेकांशी चर्चा करू लागले. गरज पडेल तेव्हा त्या सर्वांचे निष्कर्ष सरकारलाही कळवू लागले. दरम्यान 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ या पत्राच्या रूपाने वृत्तपत्रसृष्टीचीही पायाभरणी केली होती. साधारण 1885 चा काळ विचारात घेतला तर प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, सार्वजनिक सभा, इंडियन नॅशनल काँग्रेस अशा संस्था कार्यरत झाल्या होत्या. तसेच केसरी, मराठा, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश ही वृत्तपत्रे सकल जनांना शहाणे करून सोडण्याचे व्रत चालवीत होती. या माध्यमांमधून प्रश्न मांडले जात होते व ज्ञानाचा प्रसारही होत होता.

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, भारतात ब्रिटिशांचे आगमन होऊन सत्ता स्थापन होईपर्यंत येथील लोकांना काही प्रश्न पडत होते की नव्हते? ज्ञानाची देवाण-घेवाण होत होती की नव्हती?

या प्रश्नाचे उत्तर अर्थातच होकारात्मक आहे. हे सर्व घडत होतेच; पण त्यासाठी वेगळी लौकिक स्वरूपाची व्यासपीठे नव्हती, माध्यमे नव्हती. अर्थात या प्रश्नांचे प्रमाण कदाचित कमी असेल, स्वरूपही तेवढे गुंतागुंतीचे नसेल; पण प्रश्न होते, ज्ञानही होते.

लौकिक व्यवहारांची धार्मिक व्यवहारांपासून पूर्णपणे फारकत करायची प्रक्रिया युरोपात जशी घडली तशी ती तेव्हा भारतात घडत नव्हती. त्यामुळे सामाजिक-राजकीय अशा लौकिक बाबींची चर्चा तेव्हा कीर्तनासारख्या पारंपरिक  धार्मिक माध्यमातूनच होत असे. 

या प्रकारचे स्पष्ट सूचन उत्तर पेशवाईतील होनाजी बाळा या प्रसिद्ध कवीच्या पंढरीवरील लावणीत आढळते. होनाजी म्हणतो...

‘‘हरिनामाचा गजर पताका वाळवंटी फडकती। ठायी ठायी कीर्तनी संत आपण नटला श्रीपती। कोठे सांगे ब्रह्मज्ञान, कोठे सांगे राज्यनीती। कोठे सांगे गोकुळातील स्वये बालपणाच्या स्थिती। कोठे सांगे गोपींचे प्रेम विषययुक्त बहुधा रीती। कोठे उद्धव बोलावूनी धाडी गोकुळालागुनि। म्हणे ये गोपींस बोधूनि।।’’

होनाजीच्या या लावणीमधील ‘राज्यनीती’ हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. कीर्तनात तेव्हा राजनीतीचीही चर्चा चाले, असा त्याचा अर्थ होतो. ही राजनीती पारंपरिक भारतीय राजनीती असणार हे उघड आहे, पण त्यामुळे काही फरक पडत नाही. राजनीतीसारख्या शुद्ध लौकिक व्यवहाराच्या चर्चेलाही कीर्तनात स्थान होते, हे महत्त्वाचे.

ब्रिटिशकाळात ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. नव्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांची व त्यांच्या उत्तरांची चर्चा करण्यासाठी ब्रिटिशांकडून घेतलेल्या माध्यमांचा उपयोग करणे येथील नवशिक्षितांना अधिक सोईचे वाटू लागले. त्यातूनच ही कीर्तनासारखी पारंपरिक माध्यमे आधुनिक काळातील लौकिक प्रश्न मांडण्यासाठी योग्य नाहीत, असेही वाटू लागले असणार. ही पारंपरिक माध्यमे हाताळणाऱ्यांनाही नव्या परिस्थितीची व प्रश्नांची पुरेशी जाण नसल्यामुळे ही फारकत अटळ ठरली.

तथापि मध्यंतरीच्या काळात जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाने न्या.रानड्यांच्या प्रभावळीतील सी.ग.देवधरांसारख्या देशसेवकाने, प्रार्थना समाजाच्या भांडारकर-शिंद्यांसारख्या धुरीणांनी, इतकेच नव्हे तर आंबेडकरी चळवळीच्या प्रारंभिक अवस्थेतील हरिभक्तांनी, गाडगेबाबा व त्यांच्या अनुयायांनी कीर्तनाचा वापर करून काही सामाजिक-राजकीय प्रश्नांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. लोकमान्य टिळकांनी तर स्वातंत्र्यलढ्याचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून राष्ट्रीय कीर्तनाची संकल्पना मांडली. तिला चांगला प्रतिसादही मिळाला.

तथापि, त्यामुळे पारंपरिकांच्या मांडणीवर मात्र फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. ते या बाबतीत उदासीन राहिले. हे कदाचित त्यांच्या फायद्याचेही असेल. धर्म, अध्यात्म, परंपरेचे पावित्र्य यांच्या नावाखाली त्यांना आपल्या निष्क्रियतेचे व उदासीनतेचे समर्थन करणे शक्यच होते. सुशिक्षितांचा तर या एकूणच परंपरेबद्दलचा दृष्टिकोन तुच्छतेचा. मग ही दरी अधिकच रुंदावली.

या गोष्टीचा प्रत्यय नुकताच जादूटोणा, नरबळीविरोधी कायद्याच्या संदर्भात आला. अशा कायद्याची चर्चा ज्या आधुनिक व्यासपीठावर होत असते; त्या सभा, संमेलने, परिसंवाद यांच्याकडे पारंपरिक कीर्तनाचा श्रोता फिरकत नाही. तो ज्या माध्यमांचा श्रोता आहे, ते आधुनिक मंडळींना वेगवेगळ्या कारणांमुळे वर्ज्य; उलट कायद्याला विरोध करणारी धूर्त मंडळी स्वत: या माध्यमाचा उपयोग करण्यात वा करवून घेण्यात वाकबगार, अशा परिस्थितीत या कायद्याचा नेमका आशय वारकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हता. त्यामुळे त्यांचा गैरसमज करून देऊन त्यांना कायद्याविरुद्ध उभे करणे अवघड नव्हते.

अशा परिस्थितीत ‘महंमदानेच पर्वताकडे जायचे’ असते. आमचा विद्यार्थी मित्र सचिन पवार व त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम केले. सचिन हा पारंपरिक वारकरी घरातला व शिवाय आधुनिक शिक्षण घेतलेला. त्याने आपल्या कीर्तनातून या कायद्याचा नेमका आशय काय आहे व तो वारकरी धर्माशी विसंगत कसा नाही, याची मांडणी संतवचनांच्या आधारे कीर्तनातून केली. या उपक्रमाला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. वारकरी मंडळींचे गैरसमज दूर झाले. डॉ.दाभोलकर हे धर्माच्या विरुद्ध नाहीत, खऱ्या धर्माचे स्वरूप बिघडवून त्याचा गैरफायदा घेणाऱ्या धर्मशत्रूंचे विरोधक आहेत. त्यांचे कार्य ‘झाडू संतांचे मारग। आडरानी भरले जग’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीशी सुसंगत आहे. खरे तर जे काम पारंपरिक कीर्तनकारांनी करायला हवे होते, पण जे त्यांना काही कारणामुळे करता आले नाही; ते म्हणजे धर्मशुद्धीचे काम दाभोलकर करीत आहेत, हे आता स्पष्ट झाले.

कीर्तनासारख्या माध्यमाचा असा उपयोग होण्याची गरजही त्यामुळे अधोरेखित झाली. नाही तर, ज्यांच्यासाठी कायदा केला जात आहे व इतकेच नव्हे तर अनेक संकटांनाही सामोरे जावे लागत आहे, नेमका त्यांचाच कायद्यासंबंधी गैरसमज व कायद्याला विरोध!

परंपरेचे आधुनिकीकरण हे परंपरेला मारक नसून पूरकच ठरते, हा या प्रकारातून घ्यायचा आणखी एक धडा.

Tags: डॉ.दाभोलकर समाजप्रबोधन कीर्तन सदानंद मोरे राज्यनीति अभंग होनाजी बाळा लोकमान्य टिळक लोकहितवादी महात्मा फुले आधुनिक Rajyniti Abhang Honaji Bala Lokmany Tilak Lokhitvadi Mahtma Phule Adhunik Dr. Dabholkar Samajprbodhan Kirtan Sadanand More weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके