डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेले ‘पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन’ 24 ते 26 फेब्रुवारी 2012 या काळात नाशिक येथे संपन्न झाले. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे व संत साहित्याचे अभ्यास डॉ.सदानंद मोरे या संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण अंशत: संपादित करून प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

‘‘सकळांचे पायी माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ।।

अहो श्रोते वक्ते सकळही जन । बरे पारखून घ्या रे हाती ।।’’

वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या मराठी संतसाहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, स्वागताध्यक्ष आणि स्वागत समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, उपस्थित फडकरी, दिंडीकरी, मठपती आणि उपस्थित सज्जन-  

सर्वप्रथम अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल वारकरी साहित्य परिषदेला मनापासून धन्यवाद! तसेच या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दलही मनापासून आभार.

अलीकडच्या काळातील महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांगायची झाली, तर संगीत रंगभूमी, दिवाळी अंक यांच्या बरोबरीने साहित्य संमेनाचाही उल्लेख करावा लागतो. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या आणि आज मुख्य प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेला अगदी सुरुवातीलाच महात्मा जोतीराव फुले यांनी आव्हान दिले होते. फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन मुख्य प्रवाहाला आव्हान देणारी काही संमेलने आजकाल भरताना दिसतात. तेव्हा आता, ‘संमेलने उदंड झाली’ असे एखाद्याला म्हणावेसे वाटले, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. आणि मग त्यात परत हे संतसाहित्य संमेलन आणखी कशाला, असाही प्रश्न कोणाला पडला, तर तेही समजून घेता येईल. तेव्हा पहिल्यांदा या प्रश्नाचे समाधान करावे लागेल.

रानडे यांच्या प्रेरणेतून भरत असलेल्या साहित्य संमेलनामधील साहित्य असो किंवा त्यांना पर्याय देऊ पाहणाऱ्यांधील साहित्य असो, या साहित्याचा इतिहास सव्वाशे वर्षांच्या मागे नेता येत नाही. केशवसुत आणि हरिभाऊ आपटे यांच्या कविता- कादंबऱ्यांपासून आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात केली, तर मराठी साहित्य हे फारच खुजे ठरेल.

या उलट ज्याला संतसाहित्य म्हणता येते त्याला तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचा प्रदीर्घ इतिहास आहे. आता पाच-सहाशे वर्षांचा इतिहास बाजूला ठेवून, आमचे साहित्य हे खरे मराठी साहित्य असे कोणाला म्हणायचे असेल, तर म्हणू द्यात. त्यातील हास्यास्पदता त्याच्या उच्चाराबरोबर आपोआपच स्पष्ट होते. दुसरे असे की, या भूमिकेमुळे मराठी साहित्याचा इतिहासही खंडित होतो. पाच-सहा शतकांच्या वाङ्‌मयेतिहासाशी आमच्या आजच्या इतिहासाचा संबंध नाही असे निष्पन्न होते. खरे तर ज्या मराठी भाषेत आपण लिखाण करतो ती मराठी भाषा हीच मुळी मुख्यत्वे संतांच्या साहित्याने घडवलेली भाषा आहे. म्हणजे आजच्या साहित्याचे मूलद्रव्य जी मराठी भाषा, तिचीच जडणघडण संतसाहित्याने केलेली आहे. या साहित्यातील मूल्ये कळत न कळत, ते साहित्य प्रत्यक्षपणे वाचले नाही तरी आमच्या भाषेतून ती आपोआप आपल्या मानसिकतेध्ये उतरत असतात.

स्वत: न्यायमूर्ती रानडे यांना मात्र संतसाहित्याची महती पुरतेपणी ठाऊक होती हे मुद्दाम सांगायला हवे. त्यांना हा वजावटीचा व्यवहार मुळीच आवडला नसता. तो त्यांना प्रश्न विचारणाऱ्या जोतीराव फुले यांना आवडला नसता, तसाच तो फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटला नसता. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश होण्यासाठी तळमळणारे रानडे या भाषेची वकिली संतसाहित्य वगळता कशाच्या आधारावर करू शकले असते? प्रार्थना समाजाचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक ठरलेल्या तुकोबांना नायक मानणाऱ्या रानड्यांना प्रार्थना समाज हा आजचा नवभागवत धर्मच आहे, अशी भूमिका घेताना ज्ञानेश्वर-एकनाथांशिवाय आणखी कोणाचा आधार मिळाला असता? समकालीन ब्राह्मणांच्या व्यवहारांचे सामान्यीकरण करून संतपरंपरेतील ब्राह्मण संतांच्या हेतूविषयी संशय घेणाऱ्या जोतीरावांना ‘अखंड’ लिहिताना तुकोबांचेच अनुकरण करावे लागले. त्यांचे अनेक ‘अखंड’ आणि तुकोबांचे अभंग यांच्यातील अंतर एका कार्बन पेपरच्या जाडीइतकेच आहे हे विसरता कामा नये. सार्वजनिक सत्यधर्माचे दैवत असलेल्या आदिसत्याची आरती फुल्यांनी ‘आरती ज्ञानराजा’ या प्रख्यात आरतीबरहुकूमच लिहिली, शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा लिहिताना त्यांना ‘‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हेच आठवले. मग त्यांची ज्ञानोबारायांबद्दलची वा विठ्ठल दैवताविषयीची बाकीची मते काहीही असोत. मराठी भाषेतील व संस्कृतीतील संतसाहित्याचा व वारकरी शैलीचा प्रभाव फुल्यांना पुरतेपणी ठाऊक होता आणि त्याचा उपयोग करून घ्यायला त्यांना काही अडचण येत नव्हती. तुकोबा हे तर त्यांचे स्वत:चे, सत्यशोधक समाजातील त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि त्यांना ‘ब्राह्मणी’ वाटणाऱ्या प्रार्थना समाजिस्टांचेही ‘रोल मॉडेल’च होते!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्या अनुषंगाने, त्यांना हिंदू धर्माचा अंगभूत भाग बनलेल्या जातिव्यवस्थेवर व त्या जातिव्यवस्थेला कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रमाणात मान्यता देणाऱ्या प्रत्येकावर टीकाही करावी लागली. त्यात त्यांनी संतांचाही अपवाद केला नाही, हे सारे वादाखातर मान्य करूनही वस्तुस्थिती अशीच आहे की, जोपर्यंत मराठी भाषेचा व साहित्याचा संबंध आहे, तोपर्यंत गाथाज्ञानेश्वरीला पर्याय नाही, याविषयी त्यांना शंका नव्हती. गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून इतर सर्व ग्रंथ समुद्रात बुडवले तरी फारसे नुकसान होणार नाही, हे सांगताना बाबासाहेब कचरत नाहीत. स्वत: बाबासाहेबांच्या मराठी लिखाणावरील आणि भाषणांवरील संतसाहित्याचा प्रभाव वादातीत आहे. ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या त्यांच्या वृत्तपत्रांवरील ब्रीदवाक्ये अनुक्रमे तुकोबा आणि ज्ञानोबा यांचीच होती. इतकेच नव्हे, तर बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही आपल्या अनुयायांनी संत नामदेवांच्या ‘‘देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।।’’ या धर्तीवर ‘बुद्धपदी दृढ भावो’ अशा प्रकारच्या गाथा लिहिल्या पाहिजेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. वऱ्हाडच्या दीनबंधू शेगावकरांसारख्या कवींनी ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला आणि नामदेव ढसाळांसारखे प्रतिभावंत कवीही आपल्या कवितेवरील ज्ञानोबा-तुकोबांच्या कवितेचा प्रभाव कधी नाकारीत नाहीत.

संतसाहित्याच्या या प्रभावाचे आश्चर्य वाटायचे खरे तर कारण नाही. भाषा हा मानवी अस्तित्वाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पंचमहाभूतांनी मनुष्याचा देह घडतो हे खरे आहे; परंतु मानवाची मानसिकता, विचारपद्धती, अभिव्यक्तीच्या रीती या भाषेनेच घडत असतात. माणूस हा मुख्यत्वे भाषिक प्राणी आहे. पाश्चात्त्य विचारवंत हायडेगर यांनी भाषा हे मानवी अस्तित्वाचे घर - हाऊस ऑफ बीर्इंग-असल्याचे सांगितले आहे. पण माणसाचे भाषा नावाचे हे घर त्याच्या दगडाविटांच्या घरापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आहे. हे घर आपल्यामधून निर्माण करून तो त्यात राहतो. गोगलगाईच्या कवचासारखे किंवा कोळ्याच्या जाळ्यासारखे हे घर आहे. ते त्याच्यापासून वेगळे करता येत नाही. त्याचे हे घर व तो यांच्यामध्ये एक प्रकारचा जैविक संबंध आहे. हे घर त्याच्या ओळखीचा- आयडेंटिटीचा-भाग आहे. ती त्याची निजात्मखूणच आहे.

महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणारांचे हे घर बांधण्यात मुख्य वाटा संतांचा आहे. असे असताना ब्रिटिश वासहतिक राजवटीमुळे आधुनिक झालेल्या लेखक-समीक्षकांना संतसाहित्य हे दूरचे वा परके का वाटायला लागले हा खरा प्रश्न आहे. याची काही जबाबदारी संतांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सांप्रदायिकांचीही आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहारात एकेकाळी अग्रभागी असलेल्या सांप्रदायिकांनी, नव्या इंग्रजी वळणामुळे आपला संप्रदायच भ्रष्ट होईल या भीतीने स्वत:ला आधुनिकतेपासून अलिप्त ठेवले. फुले, रानडे, डॉ. भांडाकर, वि. रा. शिंदे, प्रा. वा. ब. पटवर्धन या आधुनिकांना काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायच्या भानगडीत सांप्रदायिक मंडळी पडली नाहीत. परंपरा जपणे हेच आपले काम आहे असा समज त्यांनी करून घेतला. परंपरेचा विस्तार करणे, तिच्यात काळानुरूप बदल करणे यात ते कमी पडले. अर्थात्‌, परंपरा जपण्याचे जे कार्य त्यांनी केले ते महत्त्वाचे होते आणि त्याबद्दल आपण त्यांचे सदैव ऋणीच राहिले पाहिजे, यात शंका नाही. पारंपरिकांनी अशा तऱ्हेने स्वत:च स्वत:ला अलिप्तपणाने दूर ठेवल्यामुळे आधुनिकांची चांगलीच सोय झाली. त्यांचे निम्मे काम परस्परच झाले. संतसाहित्य हे देवधर्माशी संबंधित आहे, मध्ययुगीन आहे किंबहुना प्रतिगामी आहे. असा पवित्रा त्यांनी घेतला. या उलट, हे स्वत: आधुनिक आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहोत हे ओघाने निष्पन्न होणारच!

वस्तु:स्थिती काय आहे? ज्या युरोपियन साहित्याने (आणि ज्ञानविज्ञानाने) प्रभावित होऊन त्यांनी ही भूमिका घेतली, त्यातील उदाहरणार्थ मिल्टनचे ‘पॅरेडाइज लॉस्ट’, डान्टेचे ‘डिव्हाइन कॉमेडिया’, गटेचे ‘फाऊस्ट’ अशी महाकाव्ये देवधर्माशी संबंधित होती. बायबलच्या शब्दप्रामाण्यावर आधारीत होती. मध्ययुगीन म्हणता यावीत, अशीही होती. परंतु हे सारे वाङ्‌मय आदरपूर्वक डोक्यावर घेऊन त्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

या कलाकृती चांगल्या आहेत व कौतुकास पात्र आहेत, याविषयी आपले दुत व्हायचे कारण नाही. मुद्दा या मंडळींनी येथील पाचसहाशे वर्षांच्या, कोणत्याही साहित्यिक निकषांवर उत्तम दर्जाचे साहित्य ठरू शकणाऱ्या मराठी संतांच्या अशाच प्रकारच्या काव्याचे ‘संतसाहित्य’ असे वर्गीकरण करून त्याला इतिहासजमा करून टाकले, या दुटप्पीपणावर मात्र आक्षेप घ्यायला हवा. हा आक्षेप पहिल्यांदा वै. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी नोंदविला, तर त्यांच्याकडे कोणी लक्षच देईना.

चित्र्यांनी तुकोबांना मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी ठेवून, तुकोबांची कविता हा निर्णायक निकष मानून त्याच्या प्रकाशात आधुनिक साहित्याच्या मर्यादा दाखवायला सुरुवात केली. चित्र्यांनी तुकोबांच्या कवितेची जागतिक पातळीवरून समीक्षा केली आणि ते या निष्कर्षापर्यंत पोहचले की तुकोबांच्या कवितेशिवाय कविता हा वाङ्‌मयप्रकार अपूर्ण राहील. तुकोबांच्या कवितेशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही असे मोरोपंतांनी पूर्वीच नोंदवून ठेवले होते. एकोणिसाव्या शतकातील आंग्लविद्या विभूषितांनी शेक्सपियर वाचल्यावर मराठीत तसा लेखक तुकारामच याची त्यांना जाणीव झाली. शेक्सपियरचे भाषांतर मराठीत व तुकोबांचे भाषांतर इंग्रजीत करणाऱ्या वि. मो. महाजनींपासून ते विंदा करंदीकरांपर्यंत सर्व संबंधितांनी ही भूमिका जपली. आता चित्रे त्याही पुढे जाऊन कविता या ‘फॉर्म’बद्दलच विधान करतात. त्यांचे ‘पुन्हा तुकाराम’ हे पुस्तक या अर्थाने मराठी समीक्षेमधील कोपर्निकन क्रांतीच होती. पण तिची दखल घेऊन समीक्षेमध्ये जे ‘पॅरेडाइम शिफ्ट’- प्रमाणक परिवर्तन- व्हायला हवे होते, ते झालेच नाही. ‘संतसाहित्याची आजची प्रस्तुतता’ किंवा तत्सम विषयावर परिसंवाद झडतच राहिले. त्याहीपेक्षा गंमतीची गोष्ट म्हणजे, असा परिसंवाद तरी कशाला हवा, अशी पृच्छा वारंवार होत असते. म्हणजेच, संतसाहित्य परिसंवादापुरतेही उरू द्यायला ही मंडळी तयार नाहीत! अशा प्रकारचा परिसंवाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या नंतर म्हणजे आजच्या नाशिक संमेलनानंतर होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही संतसाहित्याला स्थान दिलेच पाहिजे, असा आमचा मुळीच आग्रह नाही. कारण या साहित्याचे महत्त्व तुमच्याच संमेलनावर कधीच अवलंबून नव्हते. मात्र, प्रस्तुततेचा प्रश्न परत परत उकरून काढून संतसाहित्याची चेष्टा करू नका.

माणूस हा जसा भाषिक म्हणजे भाषा निर्माण करणारा आणि भाषेचा उपयोग करणारा प्राणी आहे तसाच तो ऐतिहासिक प्राणी आहे; म्हणजे त्याच्या अस्तित्वाला इतिहासाचे परिमाण आहे. त्यामुळे त्याच्या कोणत्याही गोष्टीची चर्चा करताना ऐतिहासिक परिप्रेक्ष्य सोडता येत नाही. या परिप्रेक्ष्यातून पाहिले, तर काय दिसते?

तेराव्या शतकात पुढे आलेल्या वारकरी आणि महानुभाव या दोन्ही धर्मपंथांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. महानुभाव संप्रदायाने ईश्वरी अवतार मानलेल्या चक्रधरस्वामींचे ‘लीळाचरित्र’ म्हाइंभटांनी लिहिले. मराठीच्या आदिकाळात निर्माण झालेला हा ग्रंथ वाचताना मराठीच्या सामर्थ्याची आणि सौंदर्याची कल्पना आल्याशिवाय राहात नाही. वस्तुत:, वारकरी संप्रदायाप्रमाणे महानुभाव पंथही भक्तिपंथच आहे. इतकेच नव्हे, तर कृष्ण हे दैवत दोघांना समान आहे. कृष्णाचे दोन्ही ग्रंथ-गीता आणि भागवत दोघांनाही मान्य आहेत. मात्र, वारकऱ्यांचे विठ्ठल दैवत महानुभावांना मान्य नाही, तर वारकरी महानुभावांच्या चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू आणि चक्रधर यांना ईश्वरी अवतार म्हणून स्वीकारीत नाहीत. दोघांचाही अहिंसेवर भर आहे. मराठीच्या बाबतीत दोघेही अग्रही राहिले आहेत. समांतर पण तरीही अविरोधी प्रवाह म्हणून या उभय संप्रदायांना नांदायला हरकत नसावी. महानुभाव महंत नागराजबाबा यांनी यासाठी प्रयत्न केले होते, हा उल्लेख येथे करायला हवा. महानुभावांच्या देवतांबद्दल जर काही गैरसमज प्रचलित असतील, तर ते निर्मिण्यात वा पसरविण्यात वारकऱ्यांचा हात नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायला हवे (हे करणारे लोक दुसरेच आहेत). याचे एक कारण म्हणजे वारकरी पंथास पहिल्यापासूनच पुरेसे अनुयायी मिळाले असल्यामुळे त्यास दुसऱ्या कोणत्याही पंथाचे आव्हान असे कधी वाटलेच नव्हते. तो आपल्यातच मग्न राहिलेला आहे. इतर पंथीयांची दैवते, पुण्यपुरुष यांच्याबद्दल निंदाव्यंजक कथा निर्माण करण्याचे कारण त्याला कधीच पडले नाही. महानुभाव पंथात विठ्ठल व ज्ञानदेवादी संतांबद्दल काही आक्षेपार्ह कथा आढळून येतात (ते उत्तरकालीन प्रक्षेप असण्याची शक्यता अधिक आहे). अशा कथा वारकरी संप्रदायाने चक्रधरांबाबत कधीही निर्माण केल्या नाहीत. अशीच गोष्ट समर्थ संप्रदायाबाबतही सांगता येईल. चक्रधरांनी महानुभाव पंथाचा प्रचार करायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात पंढरीचे श्रीविठ्ठलदैवत लोकमान्य आणि राजमान्य झाले होते. चक्रधरांना आपल्या पंथास या पार्श्वभूीवर प्रतिष्ठित करायचे होते. त्यामुळे महानुभाव संप्रदायात विठ्ठलाविषयी स्पष्टीकरणकथांची निर्मिती होणे स्वाभाविक मानता येईल. सतराव्या शतकात तर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात दृढमूल झाला होता. संत एकनाथ नुकतेच समाधिस्थ झाले होते आणि तुकोबांचे कार्य 1630-35 नंतर जोमाने सुरू होते. या पार्श्वभूीवर स्वतंत्र संप्रदाय उभारताना रामदासी पंथियांनाही अशाच काही कथा निर्माव्या लागणार असणार हेही उघड आहे. वारकऱ्यांवर मात्र तशी वेळ कधीच आली नाही. हा संप्रदाय पहिल्यापासून आजपर्यंत, आजही वर्धिष्णूच राहिला आहे.

भारतदेशात एखादा साहित्यप्रवाह मुख्य प्रवाह होण्याच्या आड येणारे दोन अडथळे म्हणजे लिंगभाव आणि दुसरा वर्णजाती. संतसाहित्याने, विशेषत: वारकरी संप्रदायाने या दोन अडथळ्यांवर मात केल्याचे दिसून येते. एवढे प्राचीन आणि अभिजात संस्कृत साहित्य. पण त्यात किती लेखिका आणि कवयित्री आढळतात? महाकवयित्रींचे तर नावही घ्यायला नको. स्त्रिया आणि शूद्र यांना होता होईल तो दूरच ठेवण्याचा म्हणजे भाषेचा विकास आणि विस्तार थांबवण्याचा विलक्षण उपक्रम या मंडळींनी केला. रामायण-महाभारतातील सीता, द्रौपदी अशा स्त्रिया संस्कृत बोलतात; परंतु या आर्ष महाकाव्यानंतर लिहिल्या गेलेल्या संस्कृत नाटकांधील स्त्रिया संस्कृताऐवजी प्राकृत भाषा बोलताना दिसतात. हा काय प्रकार आहे?

स्त्रियांची ही कोंडी संतसाहित्याने फोडली. जनाई, मुक्ताई, सोयरा, निर्मळा यांच्यापासून तर बहिणाबाई सिऊरकरांपर्यंतच्या कवयित्रींची समृद्ध परंपरा संतसाहित्याने निर्माण केली. मुक्ताबार्इंचे गुरुत्व चांगदेवांनी आणि बहिणाबार्इंचे गुरुत्व दीनकवी या पुरुषांनी स्वीकारावे याकडे आपण गंभीरपणाने पाहणार आहोत की नाही?

स्त्रीपुरुषभेदांवर मात करणाऱ्या संतसाहित्याने तत्कालीन जातिभेदावरही मात केल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या अठरापगड जातींमध्ये संत निर्माण झाले व पंढरीनगरीत चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांनी काल्याचा म्हणजे सामाजिक अभिसरणाचा एक वेगळा प्रयोग केला. विशेष म्हणजे या सर्व संतांनी काव्यनिर्मिती केली. या निर्मात्यांमध्ये ब्राह्मण, शिंपी, सोनार, माळी, कुंभार, अत्यंज असे सर्व समाजघटक समाविष्ट होते. या संदर्भात एका गोष्टीचा उल्लेख मुद्दाम करायला हवा. प्रत्येक संताबरोबर त्याचे अभंग लिहून घेणारा कोणीतरी लेखनिक असे. जसे ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंदबाबा. चोखोबांसारख्या कथित अंत्यजाचे अभंग लिहून घेण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे आलेला लेखनिक वर्णाने ब्राह्मण होता. त्याचे नाव होते अनंतभट्ट अभ्यंग. इतरही काही संप्रदायांनी खालच्या वर्णजातीमधील माणसांना स्थान दिले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तेथे हे लोक केवळ अनुयायीच राहिले. वारकरी संप्रदायात मात्र त्यांना संतत्व मिळाले. त्यांच्या काव्यरचनेला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मुख्य प्रवाह अजून वेगळा काय असतो?

सर्वांना सामावून घेऊन संधी देतो तोच मुख्य प्रवाह. महानुभाव साहित्य सांकेतिक लिप्यांमुळे फक्त त्याच संप्रदायाच्या साधकांसाठी उपलब्ध होत असल्यामुळे एकूण मराठी जनतेला सुरुवातीच्या तीन शतकांपर्यंत तरी वारकरी संतांच्या साहित्याशिवाय पर्याय नव्हता. शिवकालात मराठ्यांच्या पराक्रमाला वाव मिळून स्वराज्य स्थापन झाले. या शूर मर्दांचे पोवाडे गाणे व ऐकणे लोकांना आवडू लागले. पेशवाईच्या काळात शूर मर्द विशेषत: उत्तरेत पसरले. त्यांचे एक साम्राज्यच निर्माण झाले. सत्तेच्या विस्ताराबरोबर विलासाचे रंगढंगही महाराष्ट्रात दाखल झाले. त्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यात पडणे अपरिहार्यच होते. त्यातूनच ‘लावणी’ नावाचा नवा वाङ्‌मय प्रकार पुढे आला. इ. स. 1750 हा जो निळोबारायांचा निर्वाणकाळ तोच लावण्या रचणाऱ्या कवींचा (त्यांना नंतर लोक ‘शाहीर’ म्हणू लागले) उदयकाळ होय. सातप्पा गवळी हा आद्य लावणीकार. प्रसिद्ध कवी होनाजी हा सातप्पाचा पुतण्या. पुढे ही परंपरा जवळपास अठराशे चाळीसपर्यंत टिकली. परशुराम हा तिचा शेवटचा दुवा. या कवींना त्यांच्या तुणतुणे या तंतवाद्यामुळे तंत कवी म्हणायची पद्धत आहे. याही मंडळींमध्ये सर्व जातीजमातीचे कवी होते. होनाजी हा गवळी; प्रभाकर, रामजोशी, अनंत फंदी हे ब्राह्मण; सगनभाऊ मुसलमान, परशुराम शिंपी. थोडक्यात, शाहिरी वा लावणीवाङ्‌मयात सर्व थरांतून साहित्यिक झाले खरे पण ते सर्व पुरुष होते ही त्या साहित्याची मर्यादा होय. स्त्रीकडे वा स्त्रीदेहाकडे विशिष्ट दृष्टीने पाहणाऱ्या पुरुष कवींची ही कविता आहे. स्त्रिया असल्या कविता लिहू शकतच नाहीत. थोडक्यात, या कवितेलाही मुख्य प्रवाहाचा दर्जा देता येत नाही.

राहता राहिले तिसऱ्या प्रकारचे कवी ज्यांना पंत कवी म्हटले जाते. मुक्तेश्वर, रघुनाथ, वामन, मोरोपंत ही त्यांची परंपरा होय. या कवींची मराठी ही बहुजनांची बोली नसून संस्कृतनिष्ठ असे. त्यामुळे तिचा लेखक आणि वाचकही उच्चवर्णीय ब्राह्मणच. काहीएक प्रमाणात संस्कृतची पार्श्वभूमी असल्याखेरीज ती लिहिता-समजता येणे शक्यच नव्हते. स्त्रिया आणि शूद्र तिच्यापासून कोसभर लांब. यातील शेवटचे कवी मोरोपंत. त्यांच्या कवितांचा अर्थ लावणे हे एक आव्हानच असायचे. थोडक्यात, पंत कवींचे  लिखाणही त्याच्या संकुचित लेखक-वाचक वर्तुळामुळे मुख्य प्रवाह होऊ शकले नाही.

दरम्यान बखर नावाचा एक गद्य प्रकार चमकून गेला खरा. मराठ्यांच्या पराक्रमाचा, लढायांचा इतिहास सांगणारे हे गद्य. महानुभावांनी स्वत:ला अलग करून घेतल्यानंतर लुप्त झालेले गद्य परत येते आहे असे वाटले खरे. पण नाही! कारण बखर फक्त तेच लिहू शकायचे की ज्यांचा राजदरबाराशी व राजकारभाराशी साक्षात संबंध आहे. त्यामुळे हे क्षेत्र बहुश: कायस्थ प्रभूंच्या ताब्यात गेले. त्याचाही मुख्य प्रवाह झाला नाही. मी साहित्यिकांच्या ज्या दोन प्रकारांचा उल्लेख केला त्या पंत आणि तंत कवींनी आपला स्वतंत्र मार्ग चोखाळला असला तरी त्यांनी संत आणि संत साहित्याशी संबंधच तोडला असे मात्र घडले नाही. पंत कवींना संतांविषयी विलक्षण आदर होता आणि तो आपल्या साहित्यातून व्यक्त करताना त्यांनी संकोच बाळगला नाही. संतांप्रमाणे त्यांनाही देव आणि धर्म यांच्यात स्वारस्य होतेच. पुराणकथा त्यांनाही आवडायच्या. ‘जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तयालागी वाणी?’’ असा प्रश्न विचारून वामन पंडितांनी तुकोबांविषयींची आपली आदरभावना व्यक्त केली. मोरोपंतांनी तर सर्वच संतांचे स्तुतिपाठ रचले आहेत. तुकोबांच्या अभंगांशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही, असे म्हणणाऱ्या मोरोपंतांनी; तुकोबांची कविता उच्चवर्णीयांनी म्हणू नये असे संकेत पेशवे दरबारातून जाऊ लागले तेव्हा खुद्द पेशव्यांस चार शब्द सुनावण्यास मागेपुढे पाहिले नाही.

लावणीकारांबद्दल तर खूप काही सांगता येईल. संतसाहित्य हा त्यांच्या चिंतनमननाचा विषयच होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशवाईच्या काळातील सुबत्तेुळे मानवी शृंगारास साहित्यात स्थान मिळाले. अनुभवाचा हा आविष्कार मराठी मनाला अनोखा होता. प्रवाहाच्या खंडितअखंडितपणाचा मुद्दा तुकोबांच्या शब्दांत स्पष्ट करणे उचित होईल. ‘‘अखंड न खंडे अभंग न भंगे। तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू।।’’ एखाद्या परंपरेला प्रवाहाची उपमा देण्यासाठी पहिल्यांदा तो पुरेशा काळापर्यंत वाहात राहिला पाहिजे. या निकषाला संतसाहित्य बरोबर उतरते, हे आता वेगळे सांगायला नको. कधीकधी होते असे की नवा साहित्यसंप्रदाय निर्माण झाला असे वाटते. निदान त्याच्या प्रवर्तकाने निर्मिलेल्या साहित्यात तशी क्षमता व सामर्थ्य असल्याची खात्री होते. पण तो वारसा पुढे नेऊन त्याचे प्रवाहात रूपांतर करण्याची क्षमता अनुयायांमध्ये नसते. त्यामुळे एका अर्थाने नदी उगमातच आटली असे होते. ज्ञानदेव- नामदेवांपासून निळोबांपर्यंत संतमालिका व संतसाहित्य अखंडित प्रवाहाच्या रूपाने अस्तित्वात राहू शकले याचे कारणच असे की आपला ठसा उमटवणारे, प्रवाहाचा भाग होऊनही एकमेवत्व टिकवणारे एकापेक्षा एक सर्जनशील प्रतिभावंत येथे होऊन गेले. प्रत्येकाचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या संतकवींमधील वैशिष्ट्ये प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी ‘कवी आणि काव्योदय’मध्ये अचूक टिपली आहेत. नामदेवरायांची ईश्वराबरोबरची लडिवाळ सलगी, एकनाथांच्या भारुडांमधील समाजाभिमुख विनोदगर्भता, तुकोबांचा रोखठोकपणा यामुळे ते ज्ञानदेवांपेक्षा आपापले वेगळेपण राखून ठेवू शकले.

संतसाहित्याला प्रवाह म्हणणे किंवा त्याची एक अखंड परंपरा मानणे ही एक पुनर्रचना, ‘रीकन्स्ट्रक्शन’ किंवा इतिहासाचे पश्चात्‌वाचन आहे असे कोणी म्हणेल. पण तसे म्हणायला संतांनी वावच ठेवला नाही. सुदैवाने आपल्याकडे गुरुपरंपरा सांगायची पद्धत रूढ होती. तेव्हा ज्ञानदेवांची परंपरा थेट निळोबांपर्यंत पोहोचते असे या संतांनीच केलेल्या उल्लेखांवरुन दिसून येईल. ज्ञानदेव- सच्चिदानंदबाबा- विश्वंभर- राघव- केशव- बाबाजी- तुकोबा- बहिणाबाई अशी ही गुरुपरंपराच आहे. निळोबांना तुकोबांनी स्वप्नात उपदेश केला तेव्हा याच परंपरेचा उच्चार झाल्याच्या नोंदी आहेत. पण हा झाला अध्यात्माचा भाग. इकडे साहित्याच्या क्षेत्रातही नामदेवराय हे तुकोबांचे काव्यगुरू, काव्यरचनेची प्रेरणा देणारे. तर स्वत: तुकोबा बहिणाबार्इंचे साक्षात काव्यगुरू.

या परंपरेतील प्रत्येक संताला आपल्या एकसंध परंपरेच्या अस्तित्वाचे भान होते. आपल्या ज्ञानदेव या आदिपुरुषाचे गौरवपूर्ण स्मरण व वर्णन उत्तरकाळात प्रत्येक संताने केलेले आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरकालीन संतांचा पूर्वकालीनांशी चालू असलेला सततचा संवाद. तुकोबा ज्ञानदेवांशी, एकनाथांशी बोलतात. एकनाथ ज्ञानदेवांशी, बहिणाबाई तुकोबांच्या अभंगांमध्ये राहिलेल्या जागा किंवा ‘गॅप्स’ भरून काढून त्यांची स्पष्टता करतात. एवढे आत्मभान कोणत्या साहित्य परंपरेला आहे? प्रवाहाची कल्पना हे ‘रीकन्स्ट्रक्शन’ नव्हे हे सिद्ध करण्यास बहिणाबार्इंचा ‘संतकृपा झाली। इमारत फळा आली’ हा अभंग पुरेसा आहे.

परंपरेच्या प्रवाहाला काळाची पार्श्वभूमी असते, तसेच त्याला एक गती असते, परिवर्तन होत असते. पण या प्रवाहाला ‘हाच तो’ असे ओळखण्यासाठी त्यात काही टिकाऊ स्थायी घटकांचीही गरज असते. संतसाहित्याच्या परंपरेत असे घटक आहेत हे खरे तर सांगायलाही लागू नये. वारकरी संप्रदायाच्या संदर्भात हे घटक आजरेकरांच्या फडावर फार चांगल्या प्रकारे सांगण्यात आले आहेत. ‘‘पंढरीची वारी, रामकृष्ण हरी आणि गाथा ज्ञानेश्वरी’’ हे ते घटक आहेत. त्यात दैवत व त्याची उपासनापद्धती (म्हणजे विठ्ठल व वारी), मूळ अधिष्ठान ग्रंथ आणि मंत्र यांचा समावेश होतो. यातील गाथा-ज्ञानेश्वरीचा उल्लेख महत्त्वाचा आहे, हे संप्रदायाचे साहित्य आहे. त्यात साहित्याच्या विकासाच्या अमाप क्षमता अनुस्यूत आहेत. कालप्रवाहात समाजाच्या गरजेनुसार त्यांची अभिव्यक्ती जो करतो तो संतसाहित्यात भर टाकतो, असे म्हणता येईल. या क्षमतांची ओळख पटण्यासाठीच या संमेलनाचा प्रपंच मांडला आहे व ती पटण्यातच त्याची फलश्रुती आहे असे मी मानतो. ‘

गाथा ज्ञानेश्वरी’ या शब्दप्रयोगाने ज्ञानेश्वरी व तुकोबांच्या अभंगगाथेचा निर्देश होतो असा समज प्रचलित आहे. तुकोबा वारकरी परंपरेच्या कलशस्थानी आहेत आणि अभंग या छंदास त्यांनी परिपूर्णतेला नेले त्यावरूनच रामचंद्र बडवे यांनी ‘अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची’ असे म्हटल्याचे आपण जाणतो. पण तुकोबांप्रमाणे इतरही संतांचे - ज्ञानोबारायांसकट - अभंग आहेत हे लक्षात घ्यायला हवे. ते सर्व म्हणजे त्यांच्या गाथांचा समावेश गाथा ज्ञानेश्वरीत करावा लागतो. सुरुवात अर्थातच ज्ञानेश्वरीपासून करावी लागते. ज्ञानेश्वरी म्हटले तर भगवद्‌गीतेवरील मराठी टीका आहे, म्हटले तर स्वतंत्र कृती आहे. पण मुद्दा असा आहे की ती एक स्वतंत्र अशी साहित्यकृतीही आहे. किंबहुना ती आधी साहित्यकृती आहे व मग तत्त्वज्ञानग्रंथ आहे असे प्रतिपादन डॉ.रा.शं. वाळिंबे यांनी केल्याचे आपण जाणतोच. तो वाद आपण बाजूला ठेवू. पण आपण साहित्यकृती निर्माण करीत आहोत, याचे भान ज्ञानोबारायांना होते यात शंका नाही. ‘साहित्यसोनियाचिया खाणी। उघडवी देशियेच्या अक्षोणी। महारसाची लावणी हो देई सैघ।।’’ अशी प्रार्थना ते गुरुमाऊलीला करतात. सांप्रदायिकांनी ‘इये मराठीचे नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळू करी।’’ यातील ब्रह्मविद्येवर भर दिला व साहित्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षाची भरपाई करणे हाही संतसाहित्य संमेलनाचा एक उद्देश आहे.

ज्ञानेश्वरी हे संपूर्ण संस्कृत साहित्यशास्त्रीय परंपरेचे मराठी भाषेत झालेले केवळ अंतिम पर्यवसान नसून परिपूर्ती आहे. तो या परंपरेचा कलश आहे. ज्ञानेश्वरांनी संस्कृत परंपरेची परिसीमा करून मराठी परंपरेची पायाभरणी केली. ज्ञानेश्वरांचे ध्वनिप्रतिध्वनी निळोबांपर्यंतच्या संतसाहित्यात उमटत राहिले. एवढी समृद्ध परंपरा मुख्य प्रवाह ठरली नसती तरच आश्चर्य!

ज्ञानेश्वरीतील ‘साहित्य सोनियाचिया खाणी’ उघडून पाहण्याचा प्रयत्न सांप्रदायिकांनी कधी केल्याचे ऐकिवात नाही. तो करायला पाहिजे हे लक्षात आले तर हे संमेलन सफल झाले असे मी मानतो. ‘न सरे लुटिता मागे बहुता जनी। जुनाट हे खाणी उघडली।।’’ असे आणखी शंभरेक वर्षांनी भरणाऱ्या संतसाहित्य संमेलानातील रसिकांना म्हणता आले पाहिजे. ‘‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’’ हा नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या साहित्यशास्त्राच्या आधारे प्रसृत केलेला जाहीरनामाच आहे. इतकी वर्षे आपण मंडळी हेच करीत आलेलो आहोत. परंतु आपण काय करीत आहोत हे आपल्याला नेमके माहीत नाही. हे आत्मभान जागृत करणे हाही या संमेनाचा एक उद्देश आहे.

ज्ञानव्यवहार आणि कलाव्यवहार यांना एकत्र नांदवण्याची सिद्धी संतसाहित्याने कशी साधली याचे उत्तर फार अवघड नाही. मुळात मानवी जीवन हीच एकसंध, एकजिनसी वस्तू आहे. आपण त्याचे भाग करतो ते आपल्या सोयीसाठी आणि दुसरे असे की ते समग्रतेने पेलण्याची क्षमता आपल्याकडे नसते. त्यातूनच किकेगार्दपासून ना.सी. फडक्यांपर्यंतची द्वंद्वे उत्पन्न होतात. कला की नीती, कलेसाठी कला की जीवनासाठी कला असे प्रश्न उपस्थित होतात. संतसाहित्यात या प्रश्नांना उत्तरे सापडतात का, याचा शोध घेण्याची प्रेरणा या संमेलनातून मिळायला हवी. संतांच्या या जीवनदृष्टीचा अंगीकार करून साहित्य लिहिणाऱ्या आधुनिक कादंबरीकारांमध्ये र.वा. दिघे यांच्या कादंबऱ्यांचा येथे उल्लेख करायलाच हवा. दिघ्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांमधील नायक हा वारकरी शेतकरी असतो. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील मुख्य धर्मपंथ आणि शेतकरी हा महाराष्ट्राचा मुख्य नागरीक. परंतु तो कधी कोणाच्या कथा-कादंबऱ्यांचा नायक म्हणून अवतीर्ण होत नव्हता. ही किमया दिघ्यांनी केली. त्यांचे वारकरी शेतकरी हे तत्त्वज्ञही आहेत. जीवनाचे भाष्यकार आहेत. मराठी समीक्षकांनी दिघ्यांचे मूल्यमापन करताना त्यांची प्रादेशिक किंवा ग्रामीण कादंबरीकार अशी संभावना करून आपल्या स्वत:च्याच मर्यादा उघड केल्या. वामन मल्हार जोशी जर वैचारिक कादंबरीकार असतील तर दिघ्यांनाही वैचारिक कादंबरीकार म्हणायला हवे आणि दिघे वैचारिक कादंबरीकार नसतील तर वामन मल्हारही नाहीत! वारकरी शेतकरी विचार करतो हेच कदाचित या समीक्षकांच्या पचनी पडत नसावे. वारकऱ्यांनी फक्त वारी करावी आणि शेतकऱ्यांनी शेती! इकडे तुकोबा म्हणतात ‘‘विचारावाचून। न पाविजे समाधान।।’’ दिघ्यांच्या ‘सोनकी’ नावाच्या एका कादंबरीत कलाक्षेत्राचाही विचार आहे. वारकरी जीवनदृष्टीतून आणखी उदाहरण द्यायचे तर चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभूंच्या ‘पाषाणपालवी’ या कादंबरीचे देता येईल. या कादंबरीतील नायकाला जेव्हा जेव्हा नैतिक पेच पडतो तेव्हा तेव्हा तो तुकोबांची गाथा उघडतो व त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. पण हे झाले कादंबरीतील, काल्पनिक उदाहरण. न्यायमूर्ती रानडे जेव्हा एखाद्या अवघड व गुंतागुंतीच्या खटल्याचे निकालपत्र लिहायला घेत तेव्हा कधी अडले तर तुकोबांचे अभंग वाचीत. संतसाहित्यात सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतात असे मला म्हणायचे नाही, पण ते साहित्य विचारांची एक बैठक देते, एक मूल्यदृष्टी देते जिच्या आधारे अशी उत्तरे शोधणे सोपे जावे. संतांनी मानवी जीवनाकडे समग्रतेने पाहिल्यामुळे त्यांना त्यातील अनेक द्वंद्वांचा निरास करता आला. संतांची कलामूल्ये ही त्यांच्या मानवी मूल्यांशी सुसंगतच आहेत.

निळोबांच्या निर्वाणापासून पेशवाईच्या अस्तापर्यंतचा साठसत्तर वर्षांचा कालखंड पंत आणि तंत कवींचा उत्कर्षकाळ होता. त्यानंतर हा देश ब्रिटिशांच्या अंमलाखाली गेला. या अमदानीतच या दोन्ही प्रकारचे साहित्यिक मागे पडू लागले. महाराष्ट्रातील लोकांना इंग्रजी भाषेद्वारा आधुनिक युरोपियन ज्ञानविज्ञानाचा व साहित्याचा परिचय होऊ लागला. ख्रिस्ती धर्माचीही ओळख झाली. येथील सुज्ञ लोक नव्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचा विचार करू लागले. बाळशास्त्री जांभेकर यांना या प्रक्रियेतील अग्रेसरत्व द्यावे लागते. ‘दर्पण’ पत्र काढून बाळशास्त्रींनी महाराष्ट्राला आधुनिक युगात नेले. पण या युगात वावरताना पाय घसरू नये, घसरला तर पुन्हा उभे राहाता यावे, स्वत:ला सावरता यावे, यासाठी कोणता आधार घ्यावा हा कळीचा मुद्दा होता. थोडक्यात, आपले स्वत्व आणि सत्त्व राखून आधुनिकतेला सामोरे जाऊन ती कशी आत्मसात करायची हा प्रश्न होता. ‘दर्पण’ काढून जी प्रक्रिया सुरू झाली तिला बळकट आधार हवा होता.

बाळशास्त्रींनी मग 1845 साली ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. महाराष्ट्रातील पहिल्या देशी असिस्टंट प्रोफेसरने व पहिल्या वर्तानपत्राच्या चालकाने ज्ञानेश्वरी छापली हा निव्वळ योगायोग मानता येत नाही. दोरावरून चालताना डोंबाऱ्याला तोल सांभाळण्यासाठी हातात काठी घ्यावी लागते. युरोपियन आधुनिकतेच्या दोरावरून चालण्यासाठी उपयुक्त ठरणारी ज्ञानेश्वरी ही काठीच होती. प्रसंगी नाठाळाचे माथी द्यायची असेल तर तुकोबांची गाथाही होतीच. पण गाथेत आणखीही काही होतेच. ते लक्षात आलेल्या बाळशास्त्रींच्याच शिष्याने, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ‘परमहंस सभा’ स्थापन करून नव्या परिवर्तनाला कसे सामोरे जायचे याचा एक प्रयोग केला. तो फसल्यावर उमेद न हरता याच मंडळींनी नव्या पिढीतील रानडे-भांडारकर आदी उच्चशिक्षितांच्या सहकार्याने प्रार्थनासमाज काढला. प्रार्थना समाजातील उच्चवर्णीयांच्या हेतूविषयी शंका येऊन जोतीरावांनी सत्यशोधक समाज काढला. पण या साऱ्या चित्रमालिकेमागे आधार म्हणून भित्तिरूपाने तुकोबा होते याची नीट दखल अद्याप घेतली गेलेली नाही.

सूत्ररूपाने थोडक्यात सांगायचे झाल्यास अतिशयोक्ती न करता असे म्हणता येईल की एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रामधील प्रबोधन तुकोबांच्या छायेत घडलेले आहे. दादोबा पांडुरंग ते विठ्ठल रामजी शिंदे अशी वाटचाल झालेले हे प्रबोधन मुख्यत्वे संतसाहित्याच्या आधाराने घडले हे एक लखलखीत सत्य आहे. त्याची पुढील काळातील व्याप्ती द्वारकानाथ वैद्य ते अलीकडील रा. ना. चव्हाण यांच्यापर्यंत दाखवता येईल. तुलनेने ती क्षीण होती हा मुद्दा वेगळा.

नैतिक विचारांच्या चर्चेशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही. रानडे-भांडारकरांची ग्रॅज्युएट लोकांची जी पहिली पिढी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून तुकोबांपर्यंत पोहोचली तिला तुकोबांचा एक नीतिमीमांसक या नात्याने परिचय झाला तो त्यांचे गुरू व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सर ॲलेक्झांडर ग्रँट यांच्यामार्फत. ग्रँटने तुकोबा वाचले. तुकोबांच्या अभंगातील नैतिक उंचीने त्यांना चकित केले. त्यांनी काही अभंगांचे इंग्रजी अनुवाद केले ‘फॉर्टनाइटली रीव्ह्यू’त लेख लिहिले. ग्रँटचे लक्ष वेधले ते ‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणजे जो आपुले।। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।।’’ या अभंगाकडे. हाच अभंग त्यांचे सत्शिष्य न्या.रानडे यांच्या आवडीचा ठरला आणि याच अभंगाने शाहू छत्रपतींच्या राज्यकारभाराची दिशा ठरवली. त्याचे असे झाले की, वेदोक्त प्रकरणात ब्राह्मण पुरोहितांनी शाहू महाराजांची धर्मकृत्ये वेदोक्त मंत्रांनी करायचे नाकारले तेव्हा महाराज साहजिकच खूप अस्वस्थ झाले. मनाला शांतता मिळावी म्हणून त्यांनी तुकोबांचा गाथा वाचायला घेतला. ‘‘बरे देवा कुणबी केलो। नाही तर दंभेची असतो मेलो।।’’ या अभंगावर ते थांबले. ‘‘तुकोबांसारख्या संतश्रेष्ठाला शूद्र ठरवून त्यांचा वेदार्थ सांगायचा अधिकार तत्कालीन धर्मार्तंडांनी नाकारला तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसालाही शूद्र ठरवून आपला वेदोक्ताचा अधिकार नाकारला गेला यात विशेष काय,’’ असे आपले सांत्वन त्यांनी करून घेतले. पुढे ते गाथेत अधिक खोल गेले. एका अभंगाने त्यांचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे ‘जे का रंजले गांजले’ हा होता. महाराजांनी यापुढे या अभंगातील तत्त्वानुसार राज्यकारभार करायचे ठरवले व त्यानुसार केलासुद्धा. त्यांनी करवीर संस्थानात प्रजाहिताचे जे कायदे केले ते याच अभंगातील सूत्रानुसार, रंजल्यागांजल्यांसाठी.

आता अगदी अलीकडचे सांगतो. महाराष्ट्रकन्या श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती झाल्यानंतर शपथ घेतल्यावर त्यांनी केलेल्या भाषणात तुकोबांचा हाच अभंग उद्‌धृत केला होता. राज्याचा कारभार चालवण्याचे सूत्र संतसाहित्यात मिळू शकते. खरे तर मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांसाठी अशी सूत्रे संतसाहित्यात मिळू शकतात. ‘एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ हे सूत्र घेऊन तात्यासाहेब कोऱ्यांनी सहकारी साखर कारखाना चालवला हे त्या परिसरात प्रवेश केल्याकेल्या लक्षात येते. तेथील तुकोबांच्या मूर्तीला अभिवादन करूनच कर्मचारी आपापल्या कामाला जातात. वाडियाशेठच्या दानशूरतेतून स्थापन झालेल्या पुण्याच्या वाडिया कॉलेजच्या प्रांगणातील वाडियांच्या पुतळ्याखाली कोरण्यासाठी संस्थापकांना ‘जोडुनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।।’ हीच ओळ समर्पक वाटली. संतांची वचने ही काही अलंकरणासाठी वापरण्यात येणारी सुभाषिते नाहीत. ती माणसांच्या जगण्यातून उगवलेली व जगण्यासाठी निर्मिलेली तत्त्वेच आहेत. आचार्य अत्र्यांच्या ‘दै. मराठा’चे ब्रीदवाक्य ‘भले तर देऊ’ त्यांनी तुकोबांकडूनच घेतले होते. ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती।।’’ पर्यावरणाचा पुरस्कार करण्यास यापेक्षा अधिक चांगले वचन कोठे मिळणार? ‘‘बळबुद्धी वेचोनिया शक्ती। उदक चालवावे युक्ती।।’’ आणि ‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोटी।।’’ या दोन वचनांत शेतीचे सर्व सार आले. बीज आणि पाणी म्हणजे शेती. मुद्दा एवढाच आहे की संतांच्या परमार्थाची पाळेमुळे अशा प्रकारे लौकिक व्यवहारात रुजली असताना संतसाहित्यावर पारलौकिकाचा शिक्का मारणे हे असंजसपणाचेच नव्हे तर नुकसानकारकही आहे.

राज्यकारभाराच्या मुद्यावरून आठवले. आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो. लोकशाहीत राजा आणि प्रजा समान पातळीवर असतात. तुकोबांची रामराज्याची कल्पना अशीच असल्याचे वि.स.पागे यांच्या लक्षात आले. तुकोबा म्हणतात.

‘‘रामराज्य राम प्रजा लोकपाळ। एकचि सकळ दुजे नाही।।

मंगळावाचोनि उमटेना वाणी। अखंडची खाणी एक रस।।’’

तसेच

‘‘अवघे जन मज झाले लोकपाळ। सोयरे सकळ प्राणसखे ।।’’

पागेसाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. संतसाहित्याचे अभ्यासक होते. 1972 च्या दरम्यान राज्यात मोठा दुष्काळ पडला. पागेसाहेब तेव्हा तुकोबांचा अभ्यास करीत होते. त्यांना तुकोबांवर नाटक लिहायचे होते. तुकोबांच्या काळातही मोठा दुष्काळ पडला होता. तुकोबांनी लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या मालकीच्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. त्यासाठी काम करणाऱ्यांना त्यांनी स्वत:च्या खिशातून मोबदला दिला. हेच पागेसाहेबांच्या रोजगार हमी योजनेचे मूळ.

साहित्याचाच विषय आहे म्हणून सांगतो. संतसाहित्यातील शब्दकळा हीच मुळी ‘अर्थ बोलाची वाट पाहे’ या दुर्मिळ प्रकारात मोडणारी आहे. शब्दांची ही खाण स्वत: शब्दप्रभू असलेल्या साहित्यिकांनाही नेहमी उपयोगी ठरते. पु.ल.देशपांड्यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ पासून गौरी देशपांड्याच्या ‘दुस्तर हा घाट’ पर्यंत कितीतरी उदाहरणे देता येतील. आणीबाणीच्या काळातील जयप्रकाशांच्या चळवळीचे अनुभव व्यक्त करताना विनय हर्डीकरांना ‘जनांचा प्रवाहो चालिला’चीच आठवण झाली.

अर्थात्‌, नुसत्या शब्दांचा आणि शीर्षकांचा मुद्दा तितका वजनदार नाही. 1960 च्या दरम्यान लिहू लागलेल्या काही मराठी साहित्यिकांनी आधुनिकतेच्या पाश्चात्त्य संकल्पनेच्या प्रभावाला सोडचिठ्ठी देऊन संतसाहित्याशी नाळ जोडली व ते स्वतंत्रपणे आधुनिक झाले. चित्र्यांचा उल्लेख केलेला आहेच. अरुण कोलटकरांची कविता तर उत्तराधुनिकतेशी नाते जोडणारी आहे. मराठी कादंबरी आधुनिक करणाऱ्या भालचंद्र नेमाड्यांनी तर ‘हिंदू’च्या निमित्ताने उत्तराधुनिक युगात पाऊल टाकले आहे ते संतसाहित्याच्या आधारेच.

साहित्याचे मूलद्रव्य जे शब्द त्याचे महत्त्व जो ओळखतो तोच उत्तम साहित्य निर्मू शकतो. ज्ञानोबा-तुकोबांनी ते कसे ओळखले होते हे पाहा – 

बिंब तरी बचके एवढे। परि प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे।

शब्दाची व्याप्ती तेणे पाडे। अनुभवावी।। (ज्ञानेश्वरी)

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू।।

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।

शब्द वाटू धन जनलोका।।

तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।

शब्देचि गौरव पूजा करू।।

आजचे संतसाहित्य संमेलन ही आपल्यासारख्याच सामान्य लोकांनी संतांच्या शब्दांची बांधलेली शब्दपूजाच आहे. ही पूजा करणाऱ्यांना आणि ती पाहण्याऐकण्यासाठी उपस्थित असणाऱ्यांना मनापासून अभिवादन आणि या पूजेचे पौरोहित्य करण्याची त्यांनी संधी मला दिल्याबद्दल आभार!

Tags: रोजगार हमी योजना वि.स.पागे वाडिया कॉलेज महाराष्ट्रकन्या श्रीमती प्रतिभाताई पाटील दर्पण’ पत्र र.वा. दिघे बौद्ध धर्म बखर संत एकनाथ महानुभाव पंथ कोपर्निकन क्रांती विंदा करंदीकर वि. मो. महाजनी शेक्सपियर वै. दिलीप पुरुषोत्तम चित्रे संतसाहित्य ज्ञानेश्वरी प्रार्थना समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हरिभाऊ आपटे केशवसुत न्या. महादेव गोविंद रानडे Rojgar Hami Yojana VS Page Wadia College Maharashtrakanya Smt. Pratibhatai Patil Darpan's letter R.W. Dighe Buddhism Bakhar Sant Eknath Mahanubhav Panth Copernican Revolution Vinda Karandikar Vs. Mo. Mahajani Shakespeare Vai. Dilip Purushottam Chitre Santsahitya Dnyaneshwari Prarthana Samaj Dr. Babasaheb Ambedkar Haribhau Apte Keshavsut Justice. Mahadev Govind Ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सदानंद मोरे,  पुणे
sadanand.more@rediffmail.com

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक अशी ओळख असलेल्या सदानंद मोरे यांची विशेष ओळख आहे ती इतिहास, तत्त्वज्ञान व संत साहित्य या विषयांवरील लेखनासाठी.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके