डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भांडवलशाहीनंतरची समाजव्यवस्था (पोस्ट-कॅपिटॅलिस्ट सोसायटी)

भांडवलशाहीनंतरची समाजव्यवस्था आणखी कोणतीही असेल पण मार्क्सप्रणीत समाजवादावर आधारलेली निश्चित असणार नाही. पारंपरिक अर्थाने जिला भांडवलशाही म्हटली जाते त्या व्यवस्थेपासून वेगळे वळण विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांनी घेतले आहे. अर्थव्यवस्थेतील व्यवहारांचे परिणामकारक संयोजन करण्याचे साधन बाजार-पद्धती हेच राहील, पण समाजव्यवस्था म्हणून विकसित देश भांडवलशाहीच्या पलीकडील अवस्थेत पोचले असून या समाजव्यवस्थेत नवे वर्ग आहेत आणि त्याच्या गाभ्यात उत्पादनाचा घटक म्हणून एक नवीन साधन आहे.

नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे भीष्म पितामह पीटर ड्रकर यांचा जन्म 1909 मध्ये व्हिएन्नाला झाला. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. फ्रैंकफर्ट येथे वार्ताहर म्हणून काम करीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा या विषयात डॉक्टरेट घेतली. त्यानंतर लंडनमध्ये एका आंतरराष्ट्रीय बँकेत त्यांनी अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले. 1937 साली ते अमेरिकेला गेले आणि 1939 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या तिसाव्या साली जगभर गाजलेले त्यांचे 'द एन्ड ऑफ इकॉनॉमिक मॅन' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट बिझनेस स्कूलमध्ये वीस पंचवीस वर्षे ते व्यवस्थापन शास्त्राचे प्राध्यापक होते. क्लेअरमोन्ट, कॅलिफोर्निया येथे 1971 पासून ते सामाजिक शास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. वाॅल स्ट्रीट जर्नल या ख्यातनाम आर्थिक नियतकालिकात ते नियमितपणे लिहितात.

चिंतनशील व्यासंगी प्राध्यापक

पीटर ड्रकर यांचे व्यवस्थापन शास्त्रावरील ग्रंथ तसेच अर्थशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्नांचे सखोल विश्लेषण यांचा जगात फार मोठा वाचकवर्ग आहे. त्यांचे ग्रंथ जगातील वीस एक भाषांमधून अनुवादित झाले असून एक चिंतनशील आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांना जगभर मान्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थित्यंतरांचे ते गाढे अभ्यासक असून त्यांची स्वतःची अशी विश्लेषणाची आणि विषय मांडणीची शैली आहे. त्यांनी केलेल्या विपुल लेखनात एक आत्मचरित्र, दोन कादंबऱ्या आणि विविध विषयांवरील अनेक निबंधांचा समावेश आहे. 

अगदी अलीकडे 1993 साली ते 84 वर्षांचे असताना, त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे पोस्ट कॅपिटॅलिस्ट सोसावटी-भांडवलशाहीनंतरची समाजव्यवस्था. या पुस्तकातील सिद्धांत आणि निष्कर्षाची जगातील विचारवंतांत चर्चा झाली असून गेल्या वीस पंचवीस वर्षांतील अर्थशास्त्रीय विचारधनात हे पुस्तक म्हणजे मोलाची भर आहे असे मानले जाते. त्या पुस्तकातील मध्यवर्ती सिद्धांतांचा हा थोडक्यात परिचय.

अर्थव्यवस्थेचे वेगळे वळण

ज्यांचा वैचारिक पिंड मार्क्सप्रणीत समाजवादावर पोसला गेला ते नेहमीच असे मानीत आले की अंतर्विरोधामुळे भांडवलशाहीचा नाश अटळ आहे आणि समाजाच्या वाटचालीची पुढची म्हणजे वरच्या स्तरावरची पायरी म्हणून समाजवादाची निर्मिती अपरिहार्य आहे. ड्रकर म्हणतात की वीस पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत अनेकांची ही मान्यता होती. पण आता मात्र लोकांची खात्री पटली आहे की भांडवलशाहीनंतरची समाजव्यवस्था आणखी कोणतीही असेल पण मार्क्सप्रणीत समाजवादावर आधारलेली निश्चित असणार नाही. पारंपरिक अर्थाने जिला भांडवलशाही म्हटली जाते त्या व्यवस्थेपासून वेगळे वळण विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांनी घेतले आहे.

अर्थव्यवस्थेतील व्यवहारांचे परिणामकारक संयोजन करण्याचे साधन बाजार-पद्धती हेच राहील, पण समाजव्यवस्था म्हणून विकसित देश भांडवलशाहीच्या पलीकडील अवस्थेत पोचले असून या समाजव्यवस्थेत नवे वर्ग आहेत आणि त्याच्या गाभ्यात उत्पादनाचा घटक म्हणून एक नवीन साधन आहे. 

भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळात उत्पादन साधनांचा मालक भांडवलदार वर्ग आणि त्याच्यावर अवलंबून असलेला आणि ज्याचे शोषण होत असे असा कामगारवर्ग असे समाजाचे विभाजन होते. पण विकसित देशात उत्पादनक्षमतेतील क्रांतीमुळे कामगारवर्ग हा सधन मध्यमवर्ग बनला. 1950 च्या सुमारास शोषित वर्ग हे त्याचे रूप साफ बदलून राजकारण आणि समाजकारणात त्याचा वाढता प्रभाव दिसू लागला. भांडवलशाहीच्या त्यानंतरच्या टप्प्यात व्यवस्थापकीय क्रांतीमुळे ज्याला 'बल्यू कॉलर' कामगार म्हणतात अशा कामगारांची संख्या निर्माणक उद्योगांत हळूहळू कमी होऊ लागली. सत्ता आणि दर्जा या दोन्ही दृष्टींनी त्यांचे महत्त्व कमी झाले. इसवी सन 2000 पर्यंत विकसित देशांत वस्तूंची निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या कामगारांची संख्या एकूण कामगारसंख्येच्या १/६ हून अधिक असणार नाही.

दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा काळ असा होता की भांडवलशाही देशांत, अमेरिकेत मॉर्गन, रॉकफेलर, फोर्ड, जर्मनीत सिमेन्स, थायसन, इंग्लंडमध्ये माँड, लिव्हर, आर्मस्ट्रॉन्ग.. अशा अतिश्रीमंत औद्योगिक घराण्यांकडे सत्ता, संपत्ती आणि सामाजिक मान्यता होती. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांची जागा व्यावसायिक व्यवस्थापकांनी घेतली आहे. अजूनही या देशात गर्भश्रीमंत लोक आहेत आणि वर्तमानपत्रांच्या 'प्रतिष्ठित' पानांत ते झळकतातही. पण आर्थिकदृष्ट्या त्यांना काही महत्त्व नाही. वर्तमानपत्रांच्या व्यापार सदरांत चमकतात ते बड्या कंपन्यांचे व्यवस्थापक. चर्चा चालते ती त्यांच्या अफाट पगारमानाची आणि त्यांना मिळणाऱ्या बोनसची. पण ते नोकर आहेत, धंद्याचे मालक नव्हेत.

पेन्शन-फंडांचे प्राबल्य

विकसित देशांत भांडवलाचा पुरवठा आणि गुंतवणूक जुन्या जमान्यातील भांडवलदार नव्हेत तर पेन्शन-फंड करतात. 1992 साली अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांच्या भाग भांडवलाचा तसेच त्यांच्या कर्जाचा अर्धा हिस्सा या पेन्शन-फंडाच्या मालकीचा होता. आणि या पेन्शन-फंडाचे लाभधारक मालक कोण आहेत? तर अमेरिकेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्मचारी! उत्पादन साधनांवर कामगारांची मालकी व नियंत्रण, ही समाजवादाची मार्क्सप्रणीत व्याख्या ग्राह्य मानली तर अमेरिका हा सर्वात जास्त समाजवादी देश मानावा लागेल, त्यात भांडवलशाहीची वैशिष्ट्ये कायम राहूनही पेन्शन फंडांचे व्यवस्थापन करणारे हे नवे भांडवलदार म्हणजे बिनचेहऱ्याचे, अनामिक पगारी नोकरदार-जे गुंतवणुकींचे तज्ज्ञ विश्लेषण करतात आणि भांडवल गुंतवणुकीचे निर्णय घेतात. 

भांडवलशाहीतील या विस्मयकारी स्थित्यंतराचे असे विश्लेषण करून ड्रकर म्हणतात की विकसित देशांत आता उत्पादनाचा निर्णायक आणि नियंत्रक घटक भांडवल वा श्रम वा जमीन नसून माहिती (Knowledge) हा आहे. भांडवलदार आणि कामगार अशा पस्परविरोधी वर्गाऐवजी या नव्या व्यवस्थेत प्राबल्य आहे ते माहिती आणि सेवा कर्मचाऱ्यांचे (Knowledge and service workers). हा नवा समाज विकसित देशांत साकार होत आहे. हा समाज भांडवलशाहीविरोधी नाही आणि बिगर-भांडवलशाही पण नाही. परंतु भांडवलशाहीत अनुस्यूत असलेल्या संस्था त्यात राहतील. उदाहरणार्थ बँका. परंतु त्यांच्या कार्याचे स्वरूप वेगळे असेल. या नव्या समाजाची रचना, त्याची सामाजिक व आर्थिक गतिमानता आणि त्याच्या समस्या या, गेली 250 वर्षे जी व्यवस्था प्रभावी राहिली आणि राजकीय पक्ष, सामाजिक गट, सामाजिक मूल्यव्यवस्था, वैयक्तिक आणि राजकीय बांधिलकी ज्या प्रश्नांभोवती केंद्रित झाली त्यांहून भिन्न आहे.

श्रमप्रक्रियेला माहितीचा आधार

या नव्या व्यवस्थेत उत्पादनाचे मूलभूत साधन भांडवल, नैसर्गिक सामग्री वा श्रमशक्ती नाही. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांच्या आर्थिक सिद्धांताचे आधार श्रमशक्ती आणि भांडवलाची वेगवेगळ्या क्षेत्रांतील गुंतवणूक किंवा वापर हे होते. संपत्ती निर्मितीच्या सर्व व्यवहारातील ते दोन महत्त्वाचे घटक होते. आता मूल्य हे मूलतः उत्पादनक्षमता आणि नित्यनूतन बदल (Innovation) यांतून निर्माण होते. श्रमप्रक्रियेला माहितीचा, तंत्रज्ञानाचा भक्कम आधार दिल्याने अधिक मूल्य निर्माण होते. माहितीवर आधारित या समाजात प्रभावी समाजगट हे माहिती-कर्मचाऱ्यांचे असतील. पूर्वी भांडवलाचा उत्पादक वापर कसा करावा याचे निर्णय भांडवलदार करायचे. 

आता माहितीचा उत्पादक कामासाठी वापर कसा करायचा याचे निर्णय माहितीतज्ज्ञ व्यावसायिक करतील. भांडवलशाहीत उत्पादन साधनांची मालकी भांडवलदारांची असायची. नव्या अर्थव्यवस्थेत कर्मचारी हे उत्पादन साधनांचे (Means of Productions) आणि उत्पादक अवजारांचे (Tools of Productions) मालक असतील. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचे पेन्शन-फंड हे कंपन्यांच्या भाग-भांडवलाचे मालक होत आहेत. या अर्थाने ते उत्पादन साधनांचे मालक आहेत, माहिती किंवा त्यावर आधारित कुशलता ही कर्मचाऱ्यांच्या मालकीची असते. तो जाईल तिथे तो ती बरोबर घेऊन जाऊ शकतो. म्हणून भांडवलशाहीनंतरच्या समाजव्यवस्थेत माहितीवर आधारित कामाची उत्पादनक्षमता आणि माहिती कर्मचारी यांना अनन्यसाधारण महत्त्व असेल.

या व्यवस्थेत सेवा कर्मचारी हा दुसरा महत्त्वाचा समाजगट असेल माहिती कर्मचारी होण्यासाठी लागणारी शैक्षणिक कुशलता त्यांच्यापाशी नसल्यामुळे त्यांचे समाजातील स्थान, दर्जा व महत्त्व त्यांच्याइतके असणार नाही. त्यांना योग्य प्रतिष्ठा देणे हे समाजापुढे मोठे आव्हान असेल. अर्थात् विकसित देशांसह सर्व देशांत अशा सेवा कर्मचाऱ्यांची बहुसंख्या असेल. समाजाचे बुद्धिमंत व व्यवस्थापक दोन वर्गात विभाजन होईल. पैकी पहिल्याचा संबंध हा शब्दांशी आणि कल्पनांशी/विचारांशी असेल तर दुसऱ्याचा लोकांशी आणि कामाशी असेल, या विभाजनाच्या पलीकडे जाऊन या दोन वर्गाचा संयोग साधणे हे नव्या अर्थव्यवस्थेपुढे मोठे आव्हान आहे.

राष्ट्र सार्वभौम?

अर्थव्यवस्थेतील या बदलांसंबंधी विवेचन केल्यावर ड्रकर सार्वभौम राष्ट्र (Nation state) संकल्पनेसंबंधी आपला अभिप्राय व्यक्त करतात. जागतिकीकरणाच्या संदर्भात त्यांचे म्हणणे असे, की दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या गेल्या पन्नास वर्षांत सत्तेचे एकमेव केंद्र असे जे सार्वभौम राष्ट्र-राज्याचे स्वरूप होते त्यात झपाट्याने बदल झाला आहे. राष्ट्राच्या शासनसंस्थेकडे आता सत्तेची मक्तेदारी नाही. विकसित देशातील शासनसंस्थेला आणि तिच्या सत्तेला देशातील विविध समाजगटांशी आणि नागरिक संघटनांशी जमवून घ्यावे लागते. 

विकसित राष्ट्रातील समाज ‘प्लूरॅलिस्ट' म्हणजे अनेक आर्थिक सामाजिक गटांवर आधारित झाले आहेत. हे झाले देशांतर्गत स्थित्यंतर. देशाबाहेर सरकारचे अधिकार व कार्य हे राष्ट्रसमूहांशी निगडित झाले आहेत. म्हणजे काही प्रश्नांबाबत निर्णय केवळ एका राष्ट्राचे सार्वभौम सरकार घेत नाही तर एका मोठ्या प्रदेशातील अनेक राष्ट्रांनी निर्माण केलेली प्रादेशिक/आंतरराष्ट्रीय यंत्रणा निर्णय घेते. त्या हद्दीपर्यंत राष्ट्राचे सार्वभौम सीमित होते किंवा त्या आंतरराष्ट्रीय यंत्रणेकडे हस्तांतरित होते उदाहरण, युरोपीय आर्थिक संघ. 

मात्र याचा अर्थ असा नव्हे की सार्वभौम राष्ट्र हळूहळू विलयास जाणार आहे. अजून अगणित काल एक सामर्थ्यशाली सत्ताकेंद्र म्हणून ते अस्तित्वात राहील, पण राष्ट्राच्या शासनसंस्थेला आपली सत्ता व अधिकार यांची भागीदारी सामाजिक संस्था व नागरिक गटांशी करणे भाग पडेल. मग सार्वभौम राष्ट्राचे कार्यक्षेत्र नेमके काय राहील? समाजातील स्वायत्त संस्थांच्या कार्याचे स्वरूप काय राहील? आंतरराष्ट्रीय म्हणजे नेमके काय? स्थानिक आणि अलग अशी क्षेत्रे कोणती?....येत्या काही दशकांत राष्ट्राराष्ट्रांच्या संबंधातील हे मध्यवर्ती राजकीय प्रश्न असतील. यांची उत्तरे काय असतील याचे अचूक भाकीत करणे कठीण आहे. गेली चार शतके ती राजकीय रचना जगात होती त्यापेक्षा साकार होऊ घातलेली नवी रचना वेगळी असेल.

आव्हानांची उत्तरे विकसित देशातच

पुस्तकाचा सर्व भर हा विकसित जगातील युरोप, अमेरिका, कॅनडा आणि जपान तसेच आशिया खंडातील नव्याने विकसित झालेल्या देशांतील स्थित्यंतरावर आहे. पण याचा अर्थ विकसनशील देशांना आपण कमी लेखतो असे नाही, असे ड्रकर म्हणतात. तसे कमी लेखणे हा मूर्खपणा होईल. कारण जगाचे दोनतृतीयांश लोक या देशांत राहतात. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकांत है प्रमाण तीन चतुर्थांश होईल. पण त्यांना अशी शक्यता दिसते की येत्या एक-दोन दशकात तिसऱ्या जगातील गरीब देशांचा झपाट्याने आर्थिक विकास होईल. विकसित देशांनाही तिसऱ्या जगाच्या आर्थिक अभ्युदयात रस आहे. तिथे झपाट्याने विकास झाला नाही तर त्या देशांतील असंख्य लोक विकसित देशांत स्थलांतर करतील. आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या एवढ्या मोठ्या जनसमूहाला विकसित देशांत समाविष्ट करून देणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. 

ज्या शक्ती भांडवलशाहीनंतरचा समाज आणि राज्यव्यवस्था निर्माण करीत आहेत त्यांचा उगम विकसित देशांत आहे. तेथील भौतिक विकासाचे ते फलित आहे. त्यामुळे या विकासाने निर्माण केलेल्या आव्हानांची उत्तरे तिसऱ्या जगात सापडणार नाहीत. ती विकसित देशांनाच शोधावी लागतील. जगात चिरंतन काहीच नसते. सध्याचा जमाना हा संक्रमणाचा आहे. भविष्यातील समाज कसा असेल हे विकसित देश तसेच त्यांच्या आर्थिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रातील नेते संक्रमणकालातील आव्हानांना कसे सामोरे जातील यावर अवलंबून आहे.

Tags: भांडवलशाही विकसनशील देश विकसित देश नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे भीष्म पितामह पीटर ड्रकर Developing countries developed country Capitalism and father of managerial economics a renowned economist Peter Drucker weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके