डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वाचन संस्कृती अभियान : प्रारंभ सोहळ्याचा वृत्तांत

पुस्तक विक्रीची संख्या वाढली यावरही समाधान मानता कामा नये. कोणती पुस्तके खपतात, कोणता समाजगट, वयोगट ती पुस्तके घेतो हे महत्त्वाचे आहे.

‘साधना' वाचन संस्कृती अभियानाचा अंक वाचकांपर्यंत पोचला आहेच. वाचकांच्या सूचनांचे सदैव स्वागत आहे. अंकाच्या प्रकाशनानिमित्ताने दोन कार्यक्रम झाले. एक दत्त सह. साखर कारखान्याच्या सभागृहात, शिरोळ, जि.कोल्हापूर दुसरा 'साधना 'च्या साने गुरुजी सभागृहात. 'साधना’च्या हीरक महोत्सवानिमित्ताने, अभियानाच्या या दोन्ही कार्यक्रमात आश्वासक असं बरंच काही घडलं. त्याची थोडी झलक.

म. द. हातकणंगलेकर :- जीवनात जे मोलाचे आहे, ते साठवले पाहिजे; जतन केले पाहिजे. वाचनसंस्कृती ही अशा प्रकारची गोष्ट आहे. आजची परिस्थिती, संस्कार याला अनुकूल नाही. यासाठीच या अभियानाला महत्त्व आहे. नवीन माध्यमे, दूरदर्शन याच्या स्फोटातून तरुण प्रौढ, वृद्ध सर्वांना 'पाहण्याचे’व्यसन लागले आहे. पुस्तक विक्रीची संख्या वाढली यावरही समाधान मानता कामा नये. कोणती पुस्तके खपतात, कोणता समाजगट, वयोगट ती पुस्तके घेतो हे महत्त्वाचे आहे.

लक्ष्मीकांत देशमुख :- मूलभूत विचार करण्यासाठी ग्रंथाला पर्याय नाही. 'लोकसत्ता' प्रभावी बनण्यासाठी ग्रंथसत्ता' प्रभावी हवी. विचारांच्या आधारे तपासणे चालू व्हावयास हवे. बौद्धिक आनंदासाठी वाचनाला पर्याय नाही. चांगले पुस्तक वाचल्यानंतर मिळणाऱ्या आनंदाची सर दुसन्या कशाला क्वचितच असेल. वाचन आपल्याला अधिक चांगला माणूस बनवते.

राजन गवस :- संगणक युगातही मुले पुस्तकाकडे आधाशीपणे पहात आहेत. ग्रंथालयात पुस्तके पाठवणे वेगळे आणि त्याचे अगत्य निर्माण करणे वेगळे. खेड्यापाड्यातील मुले आज वाचनसंस्कृतीपासून दूर नेण्याचा पद्धतशीर कट चालू आहे का, असा संशय येतो. "बळी तो कान पिळी’ हा जंगलचा कायदा आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आहे तो वाचन-संस्कृतीच्या क्षेत्रात येता कामा नये.

रामदास भटकळ :- वाचन-संस्कृती तत्त्वतः मान्य पण पाऊल पुढे पडत नाही. वाचन-संस्कृती माणसाला प्रगल्भ करते. 50 वर्षांत लोकसंख्या वाढली, साक्षरता वाढली, पण पुस्तकाच्या आवृत्तीची संख्या तेवढीच राहिली वा घटली. चुकीच्या विचार- सरणीच्या प्रभावातून हे घडत आहे. दूरदर्शनचा प्रभाव पचवून अमेरिकेत ग्रंथसंस्कृती तगली. आपणाकडे वाचनसंस्कृती न रुजण्याचे कारण शोधले पाहिजे. वाचन थांबले तर लेखकाचे लिखाण यांबेल. प्रतिभा ही अपवादात्मक दुर्मिळ देणगी आहे. तिचा आविष्कारच होणार नाही, ही गंभीर हानी आहे.

0 अप्पासाहेब सा.रे. पाटील यांचे सा. रे. ही आद्याक्षरे साऱ्यांना जपणारे या अर्थानेही खरी आहेत. वैयक्तिक सुबत्तेच्या परिस्थितीत संस्कार जपणे हे फार अवघड, म्हणून महत्त्वाचे आहे. - म. द. हातकणंगलेकर

0 जांभळी विद्यालय, शिरोळ येथील शिक्षकाकडून रोख पंचवीस हजार देणगी व उदगाव एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून एक लाख रुपये मिळाले. सा. रे. पाटील यांच्याकडून एप्रिलपूर्वी 'साधना हीरक महोत्सवी निधी साठी या भागातून एकूण 9 लाख रुपये देणार असल्याची घोषणा.

0 साधना दीपावली अंकासाठी (2005) भरघोस रकमेच्या जाहिराती देणाऱ्यांना शाल, गुच्छ, साने गुरुजींनी अनुवादित केलेले 'मानव जातीची कथा' हे पुस्तक देऊन कुलगुरू माणिकराव साळुखेंच्या हस्ते सत्कार. एका छोट्या विभागातून 7 लाखांच्या जाहिराती देणाऱ्या देणगीदारांबद्दल व त्यांना प्रवृत्त करणाऱ्या अप्पासाहेब सा.रे. पाटील यांच्याबद्दल कुलगुरूंकडून आदराची भावना व्यक्त झाली.

0 कर्नाटकात कोणत्याही मुख्यमंत्र्यापेक्षा भैरप्पा, अनंतमूर्ती, कारंथ यांना जास्त मान. - लक्ष्मीकांत देशमुख

0 राष्ट्र सेवादलातर्फे या वर्षी 'साधना ला एक हजार वर्गणीदार देण्याचा व तीस जिल्ह्यांत साधना-वाचन मंडळे चालू करण्याचा राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांचा संकल्प.

0 व्यक्तिगत प्रयत्नातून 'साधना ला दोन हजार वर्गणीदार मिळवून देण्याची लक्ष्मीकांत देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जि.प.) यांची घोषणा.

0 'साधना ट्रस्ट’चे ‘साधना ग्रंथालय' (मीडिया सेंटर) ही अपूर्वाईची व उपयुक्त गोष्ट, दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साहित्यिक कार्यक्रम, पॉप्युलर साहित्य-साधना या नावाने घेतला जाईल. - रामदास भटकळ

Tags: साधना हीरकमहोत्सव वाचन संस्कृती अभियान Program Sadhana Reading weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके