डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. मोहन नाडकर्णी हे वयोवृद्ध संगीत-समीक्षक. (वय 85 च्या पुढे) अनेक वर्षे इंग्रजी वृत्तपत्रांतून त्यांची अभ्यासपूर्ण समीक्षणे प्रसिद्ध होत असत. गेली काही वर्षे ते पुण्यात विजनवासात पत्नीसह शांतपणे जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांचा एकुलता एक पुत्र व त्याचे कुटुंबीय न्यूझीलंड येथे स्थायिक आहेत. वडिलांचे वाढते वय आणि अधूनमधून येणारे प्रकृतिअस्वास्थ्य यामुळे त्यांनी आईसह आपणाकडे राहावे असे साहजिकच त्याला वाटते. त्याप्रमाणे आता श्री व सौ. नाडकर्णी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात न्यूझीलंडला कायम वास्तव्यासाठी जात आहेत, म्हणून त्यांची भेट घेऊन हा लेख लिहिला.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या संस्थेने पुण्यात एक संगीत संमेलन आयोजित केले होते. 'यशवंतराव चव्हाण' सभागृहात अश्विनी भिडे गात होत्या. गाणे ऐन रंगात आले असता, पुढच्या आसनावरील एक बुजुर्ग श्रोते उभे राहिले आणि त्यांनी हात उंचावून मोठ्याने उत्कट अशी दाद दिली.

अश्विनीने मान लववून त्याचा स्वीकार केला आणि आभारादाखल दोन शब्द उच्चारलादेखील, असे प्रकार दिवाणखान्यातील छोट्या मैफलीत दिसून येतात. मोठ्या वातानुकूलित हॉलमध्ये असा प्रतिसाद आम्ही प्रथमच पाहत होतो. पण हे शोभून गेले, इतकेच नव्हे तर स्मरणीय ठरले. कारण दाद देणारे गृहस्थ म्हणजे जानेमाने संगीत-टीकाकार, श्री.मोहन नाडकर्णी होते.

काही महिन्यांपूर्वी कळले की ते पुण्यात आमच्याच औंध विभागात राहतात आणि आता न्यूझीलंडला वास्तव्य असलेल्या एकुलत्या मुलाकडे कायमचे स्थलांतर करणार आहेत. म्हणून त्यांना मुद्दाम भेटायला गेले. (काही काळापूर्वी आमची गंगूबाई हनगलांशी भेट झाली होती. या ज्येष्ठांकडे ज्ञानाचे भांडारच असते आणि त्यांच्याशी नुसत्या गप्पा करणे हीच मोठी पर्वणी असते.) मोहनरावांचे वय पंच्याऐंशी च्या पुढे. शरीर थकले असले तरी स्मृती तल्लख आणि जुन्या हकीकती सांगण्याची दांडगी हौस. मनमोकळे बोलणे झाले.

'तुम्ही संगीत-समीक्षक कसे झालात?' हा ठेवणीतला प्रश्न विचारताच ते म्हणाले, मला संगीताची फार आवड होती, पण तिथे अधिक लक्ष दिल्यास अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असे माझ्या आईवडिलांना वाटत होते- आणि त्यांचे बरोबरच होते. म्हणून मी तो व्यवसाय निवडू शकलो नाही, परंतु त्यातील रुची स्वस्थ बसू देईना. मैफली ऐकता ऐकता संगीताचा अभ्यासही होऊ लागला आणि मग मी परीक्षणे लिहू लागलो. पुढे नियमितपणे माझे लेख प्रसिद्ध होऊ लागले. पण खरे सांगू का? मी एक परखड टीकाकार असल्यामुळे या क्षेत्रात मी मित्रांपेक्षा शत्रूच जास्त निर्माण करून ठेवले...

पण यात फारसे तथ्य नसावे. कारण काही वर्षांपूर्वी संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनीच त्यांचा मोठा सत्कार घडवून आणला होता आणि नियतकालिकातील त्याविषयीच्या वृत्तात म्हटले होते की, 'असे भाग्य फार थोड्या टीकाकारांना लाभते.' हाती लेखणी आहे, म्हणून ती हवी तशी परजणाऱ्या छिद्रान्वेषी म्हणून गणल्या गेलेल्या टीकाकारांमध्ये, हंसक्षीरन्यायाने चांगल्याला मुक्तकंठाने दाद देणारे आणि गायकांची प्रगती व्हावी म्हणून शुद्ध हेतूने त्यांच्या कलेतील त्रुटी दाखवून देणारे मोहनरावांसारखे जाणते टीकाकार कलावंतांना हवेहवेसे वाटतात.

मोहनरावांनी जितेंद्र अभिषेकींची एक आठवण सांगितली. एकदा त्यांनी अभिषेकींच्या गाण्याचे थोडे कडक परीक्षण लिहिले. काही दिवसांनी जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात अभिषेकी देवीचा प्रसाद घेऊन त्यांना भेटायला आले. मोहनरावांनी गंमतीने त्यांना म्हटले, 'मला वाटले तुम्ही माझ्यावर रागावला असाल, रागाचाच हा प्रसाद नाही ना?' अभिषेकी खिलाडूपणे म्हणाले, 'अहो, तुम्ही सांगितल्याशिवाय आमचे दोष आम्हाला कळणार कसे?

मग मोहनराव त्यांच्या आठवणीने व्यथित होऊन बोलत राहिले. म्हणाले, 'एवढा ताकदीचा कलावंत, पण प्रकृतीची हेळसांड केली आणि अकाली निघून गेला...' आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळातील काही गंमती त्यांनी सांगितल्या.

'मी लिहू लागलो तेव्हा आमच्याच बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर एक दुसरे ताडमाड उंच मोहन नाडकर्णी राहात होते. त्यांनाही नाट्य, संगीतात रस होता. लोकांना वाटे की तेच लेख लिहितात.

एकदा त्यांनी चौकशी केली, 'हा लिहिणारा कोण?' तेव्हा त्यांच्या मित्राने सांगितले, 'तुमच्याच खाली राहणारा तो मोहन!' ते आश्चर्याने म्हणाले, 'तो गिड्डा?' (मोहनराव उंचीने वामनमूर्तीच आहेत) पुढे एकदा एकाच व्यासपीठावर आम्ही दोघे होतो. तेव्हा मी म्हटले, 'संगीतावरचे लेख लिहिणारे मोहन नाडकर्णी ते नसून मी आहे. 'सो नाऊ यू नो द लाँग अँड शॉर्ट ऑफ इट...' त्यावर श्रोत्यांनी हसून टाळ्या वाजवून मला दाद दिली..."

आमचे व्याही श्री.कर्णिक मोहनरावांचे जिगरी दोस्त. त्यांच्याकडून मोहनरावांच्या विनोदी स्वभावाच्या अनेक कहाण्या ऐकल्या होत्या. एकदा एक गायक सारंग रागातील काही अनवट प्रकार गात होते. त्यांच्या एका फुफ्फुसावर शस्त्रक्रिया झाल्याचे कळले होते. श्रोत्यांमध्ये 'हा कुठला राग' यांवर तर्क चालू होते. मोहनराव गंभीर चेहरा करून म्हणाले, 'हा एकलंगी सारंग!' त्यांच्याशी गप्पा करतानाही या विनोदबुद्धीचा प्रत्यय आलाच.

हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत यातील भेदाचे त्यांनी सुरेख विवेचन केले. अमीर खुस्त्रो यांनी आणलेले अरबी संगीत आणि भारतीय रागदारी संगीत (संदर्भ : संस्कृतमधील 'संगीत रत्नाकर') यांचा फार सुंदर मिलाफ हिंदुस्तानी संगीतात झाला आहे. त्यात सृजनशीलतेला खूप वाव आहे. रागांची चौकट जरी ठराविक असली तरी त्याचे नियम सांभाळून रागाचा एक्सटेम्पोर (आयत्या वेळी) विस्तार करण्यात गायकाचा खरा कस लागतो. ते त्याच्या सृजनशीलतेला आव्हान असते. कर्नाटक संगीतातील बंदिशी मात्र पाश्चात्त्य संगीतातील रचनांप्रमाणे ठरावीक स्वरात निबद्ध असतात आणि त्या तशाच गायच्या असतात. त्यात क्रिएटिविटीला फारसा वाव नसतो; याचे त्यांनी विवरण केले.

आमच्या विल्सन कॉलेजातील प्राध्यापक डॉ.ऊकरजी हे पाश्चात्त्य संगीतातील दर्दी. त्यांनी एकदा असाच आक्षेप घेतला होता की, हिंदुस्तानी संगीतात शेकडो वर्षे तेच राग गात आहेत. पाश्चात्त्य संगीत याप्रमाणे त्यात नवनवीन रचना घडविलेल्या दिसतच नाहीत. त्यांना मी उत्तर देताना, राग तेच असले तरी त्यांचा एक्सटेम्पोर विस्तार करण्यात गायकाचे कौशल्य, त्याची कल्पकता दिसून येते असे सांगितले होते. परंतु मी संगीतातील जाणकार नसल्यामुळे माझे उत्तर कितपत योग्य होते याबद्दल मला शंका होती. आज मोहनरावांशी बोलल्यावर जरा बरे वाटते.

घराण्याविषयी बोलताना त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, अंत्रोली, पतियाळा किराणा इत्यादी अनेक घराण्यांची वैशिष्ट्ये सांगितली. ग्वाल्हेर, आग्रा ही घराणी हिंदुस्तानी संगीतातील अध्वर्यू म्हणून घेतात, बुद्धीला आवाहन, आक्रमक शैली काहीशा कणखर आवाजाला प्राधान्य हे त्यांचे विशेष म्हणता येतील, तर किराणा घराण्यात भावनेला आवाहन, सौम्य शैली, आवाजातील माधुर्याला प्राधान्य हे विशेष दिसतात. गायकांविषयींच्या आठवणींचा तर त्यांच्याकडे खजिनाच आहे. केसरबाई आणि मोगुबाई यांच्याविषयी सांगताना ते म्हणाले, 'त्यांच्यापैकी अधिक श्रेष्ठ कोण असे मला नेहमी लोक विचारीत, मी त्यांना म्हणे की अशी तुलना अनाठायी आहे. त्या दोघी म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत.' अंजनीबाई मालपेकर यांचे गायन ऐकण्याचे भाग्य आपल्याला लाभले नाही, पण त्यांची स्वाक्षरी आपल्याकडे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. खाप्रूजी पर्वतकारांचे तबला वादन करण्याचा त्यांना कधी योग आला नाही, पण त्यांची कीर्ती मात्र त्यांनी भरपूर ऐकलेली आहे.

किशोरी आमोणकर यांच्या उत्तुंग प्रतिभेविषयी त्यांना पुष्कळ कौतुक आहे. तसेच आजच्या आघाडीच्या गायक गायिकांपैकी मालिनी राजूरकर, पद्या तळवलकर, अश्विनी भिडे, आरती अंकलीकर, शौनक अभिषेकी, अजित कडकडे इत्यादींच्याविषयीही त्यांनी स्तुतीपर उद्गार काढले. पण उदयोन्मुख कलाकारांचे गाणे आपण फारसे ऐकलेले नाही, आता आपण संगीत क्षेत्रातील, सार्वजनिक जीवनातून जवळजवळ निवृत्त झालो आहोत असे ते सांगत होते. यातून त्यांची समाधानी वृत्ती प्रत्ययाला आली. तरी मला मात्र थोडे उदास वाटले. कुणाच्याही निवृत्तीच्या वेळी वाटते तसे!

रागांची सरमिसळ करणे ही मोडतोड आहे असे त्यांना वाटते की ते एक कल्पकतेचे प्रतिभेचे लक्षण आहे असे वाटते, याविषयी मला त्यांच्याशी बोलायचे होते. त्याच संदर्भात बालगंधर्वांचा विषय निघाला. एखाद्या रागात ते वेगळाच सूर लावीत, परंतु त्यांची योग्यताच एवढी की शोभून जात असे, याबद्दल पु.लं.नी उल्लेख केलेला आहे असे म्हणताच मोहनराव म्हणाले, 'हो, 'स्वकुलतारक सुता म्हणतात ते भीमपलापात एका ठरावीक जागी शुद्ध 'नी' लावीत असत! असे म्हणतात की अल्लादियाखाँ तेवढेच ऐकायला आवर्जून येत असत आणि गाणे संपले की निघून जात असत...'

- असे अनेक किस्से त्यांच्या सान्निध्यात ऐकायला मिळाले. खरे तर या गप्पा संपूच नयेत असे वाटत होते. मोहनराव आणि त्यांच्या पत्नी सुनीतीबाई आता परदेशात स्थायिक होणार, तर त्यांच्या संगीतविश्वाचे काय होईल अशी आम्हाला हुरहुर वाटली, परंतु ते स्वतः निश्चिंत, कृतार्थ आहेत. वृद्धापकाळी पुत्राजवळ असणेच योग्य असे त्यांना वाटते आणि आम्हीही त्यांच्याशी सहमत आहोत. आदराने म्हणतो- 'शुभास्ते पंथान:!'

Tags: अश्विनी भिडे देशपांडे गंगुबाई हनगल जितेंद्र अभिषेकी शास्त्रीय संगीत संगीत साधना कामत मोहन नाडकर्णी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके