डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रंगलेला जोडराग : प्रकाशन – स्नेहमिलन

'भिन्न षड्ज' चे प्रकाशन करताना प्रा. राम जोशी, शेजारी साधना विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सदानंद बर्दे, तात्या बाक्रे, साधना परिवाराचे मित्र. व इतर संगीतप्रेमी आणि संस्कृतप्रेमी. भारतीय संगीतसाधकांवरच्या आपल्या लेखांच्या संहितेला त्यांनी नाव दिलं भिन्न षड्ज!

हे अभिनव साधना प्रकाशन 28 डिसेंबर 1997 च्या सायंकाळी दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये प्रकाशित झाले. प्रा. राम जोशी यांच्यासारख्या चतुरस्र विचारवंताने, कलांच्या मर्मज्ञाने आणि मुख्य म्हणजे तात्या बाक्रे यांच्या निकटवर्ती मित्रवर्याने या सोहळ्यात मुख्य भूमिका स्वीकारली आणि ती केवळ निभावली नाही, तर समजदारीने सजवली.

28 डिसेंबर 1997. केवळ या एका दिवसाच्या नव्हे तर संवत्सराच्या संध्याकाळी रसिक श्रोत्यांनी दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये उत्सुकतेने हजेरी लावली. 

तात्या बाक्रे, एक सव्यसाची पत्रकार. इतरांपेक्षा त्यांच्या भात्यात एक निराळंच संमोहनास्त्र होतं - भारतीय संगीतावरची मार्मिक आणि सहृदय टिप्पणी.

महान संगीत साधकांवरील तात्यांचे लेख म्हणजे स्मृतिसौख्याचे मधुघटच! या लेखांची संहिता भिन्न षड्ज - साधना प्रकाशनाने प्रकाशात आणली. प्रकाशनाचा समारंभ ही तशी नित्याचीच घटना असते. पण या समारंभाला एक निराळेपण होते. साधना परिवारातील या सुहृदाला आपली भावांजली वाहण्यासाठी तात्यांच्या आप्तमित्रांचा मेळावा त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी जमला होता. 'सर्वच समान एकाला अग्रमान' या न्यायाने प्राचार्य राम जोशी हे प्रकाशन समारंभाचे अध्वर्यु होते. ते तात्यांचे फार वर्षांचे चाहते आणि मित्र तर होतेच पण मर्मज्ञ आणि औचित्यविचार असणारे विवेचक, अशीदेखील त्यांची प्रतिमा सर्वज्ञातच आहे. 

तात्यांच्या पत्नी सुशीलावहिनी, कन्या वीणा आणि जामात श्रीकांत देशपांडे या कुटुंबीयांनी मुख्यतः कार्यक्रमाचे संयोजन केले होते. पण त्याबरोबर श्रीरंग वरेरकर, दत्ता मारुलकर प्रभृती मित्रमंडळींनीही खूप पुढाकार घेतला होता. साधना परिवाराच्या वतीने प्रा. सदानंद वर्दे, श्री. नाना डेंगळे आणि वसंत बापट समारंभाची सर्व अंगे सांभाळायला होतेच. पण ज्या सर्वांची नावे येथे देणे शक्य नाही, ते तात्यांच्या गुणांवर लुब्ध असणारे आणि अभिजात संगीताच्या मोहिनीने भान विसरणारे अनेकानेक रसिक श्रोते हीच या समारंभाची शान होती. 

प्रा. राम जोशी यांचे समजदारीने खुललेले भाषण, मित्रांनी मनापासून केलेला तात्यांचा गौरव आणि अंती देवकी पंडित या गुणवंत कलावतीचे अभिजात गायन अशी चढती कमान असल्यामुळे हा प्रकाशन सोहळा अविस्मरणीय झाला. 'भिन्न षड्ज'मध्ये नऊ उत्कृष्ट लेखांची झळाळी आणि भावनेचा ओलावा हे गुण लेखनातच मुळात आहेत, वासंती मुझुमदार यांचे बहुरंगी मुखपृष्ठ, शेखर गोडबोले यांनी कुशलाईने दिलेली चित्रसज्जा तसेच साधना प्रकाशनाने साक्षेपाने केलेली निर्मिती या सर्वांमुळे पुस्तक वाचकांना अलोलकीचे वाटेल, संग्राह्य वाटेल आणि आपल्या घरी ते असावे अशी असोशी ज्याच्या त्याच्या मनात निर्माण होईल असा विश्वास वाटतो.

तात्या बाक्रे या रसिकोत्तमाचा स्मृतिदिन तात्यांच्या गुणश्रीमंतीला स्मरून यथोचित रीतीने साजरा केल्याबद्दल साधना प्रकाशनाला धन्यवाद देणारे रसिक जड पावलांनी पण तृप्त मनाने सभागृहातून घरोघर गेले.

Tags: प्रा. राम जोशी तात्या बाक्रे भिन्न षड्ज सांस्कृतिक संगीत साधना प्रकाशन pro. ram joshi bhinn shadaj tatya bakre cultural program music sadhanaprakashan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके